`कांदे'पालट!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
26 Dec 2010 - 7:32 pm

कांद्यानं शंभरी गाठल्याचे संभाव्य परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर दिसून आलेच. पण इतर न दिसलेले आणि फारसे प्रकाशात न आलेले परिणामही देण्याचा हा प्रयत्न.
...
मुलगी "पाहण्याच्या' कार्यक्रमात शिष्टाचारसंमत आणि समाजमान्यताप्राप्त "कांदे-पोहे' जाऊन त्याजागी "बटाटा-पोहे' आले. त्यामुळे "अहो, शकूला कांदे-पोहे आणायला सांगा,' असं म्हणून "आमची शकू फर्मास कांदे-पोहे करते हो!' अशी भलामण करण्याची संधी वधुपित्यांच्या हातून निघून गेलेय. त्याऐवजी शकूला बटाटे-पोहे आणण्याची हाक दिली जातेय. "मुलगी नाकानं कांदे सोलणारी आहे हो!' असं म्हणण्याचीही वरमाईंची पंचाईत झालीय!
...
- परवाचीच गोष्ट. दिनकरकाका गोखले सदाशिव पेठेतून मंडईपर्यंत तंगडतोड करीत मंडईत कांद्याला चार रुपये कमी भाव असेल, या आशेने गेले. दोन-चार दुकानं फिरले, पण मनासारखा कांदा मिळेना. भावही कोणी ओरडून सांगत नव्हते. मंडईच्या कांदा बाजारात शुकशुकाट होता. एका ठिकाणी मनाचा हिय्या करून गोखलेकाकांनी भाव विचारला, तेव्हा सत्तर रुपये किलोचा भाव ऐकून तिथेच चक्कर येऊन पडले म्हणे. कांद्याच्या बाजारात असूनही त्यांना शुद्धीवर आणायला कुणी कांदाही फोडला नाही म्हणतात!
...
लपाछपी, डोंगर की पाणी, रंग रंग कोणता, विषामृत, असे खेळ सध्याच्या क्रिकेटच्या आक्रमणात भरडून गेलेच आहेत, पण अध्येमध्ये खेळला जाणारा "कांदेफोडी'चा खेळही मुलांच्या क्रीडाविषयक आयुष्यातून बाद झाला. परवा गल्लीत कुणी पोरं "कांदेफोड' खेळत होती, तर अण्णा दांडेकरांनी त्यांना बडवून काढलं. "ही कसली तुमची श्रीमंती थेरं' म्हणून ते त्यांच्या अंगावर खेकसले. पोरांना मार खाण्याचं कारणच न कळल्यामुळं ती नुसतीच धुमसत राहिली.
...
छापून तयार असलेल्या पुढच्या वर्षीच्या सर्व दिनदर्शिका "कालनिर्णय', "भाग्यलक्ष्मी'वाल्यांनी माघारी घेऊन त्यात महत्त्वाची दुरुस्ती केली म्हणे. कांद्याचे भाव उत्तरोत्तर वाढतच राहण्याची शक्‍यता असल्यानं "कांदेनवमी'च्या तिथीचा उल्लेख कॅलेंडरांतून काढून टाकण्यात आल्याची चर्चा आहे. जो सण साजराच होणार नाही, त्याचा उल्लेख तरी कशाला हवा कॅलेंडरात?
...
कांद्याची भजी, कांद्याचं थालीपीठ, कांदा-बटाटा रस्सा, कांदा-लिंबू "मारके' मिसळ, कांद्याची पीठ पेरून भाजी, कांदा उत्तप्पा, वगैरे पदार्थ अजिबात कांदा न वापरता कसे करता येतील, यावरच्या पुस्तकांना आणि "पॉकेट्‌स बुक'ना प्रचंड मागणी आल्याचं समजतं. काही पुस्तकांच्या तर तीस-चाळीस आवृत्त्या (प्रत्येक आवृत्ती पन्नास पुस्तकांची या हिशेबाने) निघाल्याचंही विश्‍वसनीय सूत्रांकडून कळलं आहे.
...
कांदा-लसूण खाणे वर्ज्य असलेल्या "चातुर्मासा'ची व्याप्ती वाढवून ती बारा महिन्यांपर्यंत करावी, या मागणीसाठीही मोठी आंदोलनं उभी राहत आहेत.
...
महाग झालेल्या कांद्याला पर्याय म्हणून अळवाचे कांदे, पालकाचे कांदे रोजच्या जेवणात वापरायला लोकांनी सुरवात केली आहे.
...
कांद्याचे भाव आणखी वाढू नयेत म्हणून चिडका कांदा, अकलेचा कांदा, असे शब्दप्रयोगही दैनंदिन व्यवहारातून काढून टाकण्याचा अध्यादेश सरकारने काढला आहे.
...
प्रत्यक्ष कांद्याऐवजी कांद्याचा इसेन्स बाजारात आलाय आणि तो प्रचंड खपतोय. हल्ली डाळीच्या पिठात हा इसेन्स घालून कांदा भजी केली जातात म्हणे! कांदा "एक्‍स्कूझिव्ह' झाल्यामुळं कांद्याच्या परफ्यूमला अचानक मागणी वाढलेय. "ऍक्‍स', "झटॅक'पेक्षा हा परफ्यूम जास्त "पॉवरफुल' असल्याची जाहिरात केली जातेय.
...
...आणि सरतेशेवटी...सर्वांत महत्त्वाचं.
"कांद्यानं केला वांदा' हे नाव चित्रपटाला मिळण्यासाठी पंचवीस जणांनी एकाच वेळी अर्ज केलाय आणि आपल्यालाच हे नाव पहिल्यांदा कसं सुचलं, असा दावा करण्यावरून मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांमध्ये भांडणं लागली आहेत!

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

मस्त रे अभिजीत.
कांदे पालट आवडला.

"ही कसली तुमची श्रीमंती थेरं' म्हणून ते त्यांच्या अंगावर खेकसले. पोरांना मार खाण्याचं कारणच न कळल्यामुळं ती नुसतीच धुमसत राहिली.

अजुन हसतोच आहे. =)) =))

रेवती's picture

26 Dec 2010 - 8:35 pm | रेवती

असेच म्हणते आणि हसते.;)

सूर्यपुत्र's picture

26 Dec 2010 - 8:12 pm | सूर्यपुत्र

आजच्या सकाळ मधल्या सप्तरंग पुरवणीत सदर लेख लिहिणारे अभिजित पेंढारकर आपणच का?

तुमचे लेख मस्त असतात.

आपला अभिजित's picture

27 Dec 2010 - 12:38 am | आपला अभिजित

हो रे बाबा!

पण तू `ध्येयहीन` का झालायंस??

परिकथेतील राजकुमार's picture

27 Dec 2010 - 7:20 pm | परिकथेतील राजकुमार

पण तू `ध्येयहीन` का झालायंस??

त्यांचा आयडी बदल झालाय ;)

मालक बर्‍याच दिवसांनी आपले सुखद दर्शन झाले.

लेख सकाळ मध्ये आणि इथे दोन्हीकडे वाचला, एकदम खुसखुशीत.

पिंगू's picture

26 Dec 2010 - 8:20 pm | पिंगू

हाहा कांदेपालट जबरा आहे हो...

- (जेवणातून कांदे वगळणारा) पिंगू

डावखुरा's picture

26 Dec 2010 - 11:12 pm | डावखुरा

मस्त कांदायन....

पिवळा डांबिस's picture

26 Dec 2010 - 11:38 pm | पिवळा डांबिस

छान नर्मविनोद!
:)

Nile's picture

27 Dec 2010 - 12:37 am | Nile

सामान्यांचा खंदा समर्थक या नात्याने, निषेध म्हणुन कांदेपोहे करुन खावेत म्हणतो. ;-)

रमताराम's picture

26 Dec 2010 - 11:55 pm | रमताराम

लय हशिवलंस रं दादा. कांद्यापरीस हसून हसूनच डोल्यातून ज्यास्ती पानी आलं.

स्वाती२'s picture

27 Dec 2010 - 12:04 am | स्वाती२

मस्त!

आपला अभिजित's picture

27 Dec 2010 - 12:42 am | आपला अभिजित

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद, मित्रहो!!
खरं तर गेल्या आठवड्यात पन्नास रुपयांना दोन किलो कांदा घेऊन आलोय. कांद्याचे भाव घसरत असल्याचे पाहून पुन्हा छातीत धस्स झालं. आपण घेतलेला कांदा संपेपर्यंत तरी त्यापेक्षा कमी भावात मिळणार नाही ना?

मस्त , खुमासदार लेख ..वाचून मजा आली. धन्यवाद.

कांदेफोड हा कुठला खेळ?

मस्त कलंदर's picture

27 Dec 2010 - 6:21 pm | मस्त कलंदर

ज्याच्या/जिच्यावर राज्य असेल त्या खेळाडूने प्रथम दोन्ही पाय पसरून बसायचे व इतरांनी ते पाय ओलांडून पलिकडे जायचे. त्यानंतर
१. एका उभ्या पावलावर दुसरे उभे पाऊल
२. दुसया पावलावर एक हात सर्व बोटे पसरून
३. पहिल्या हातावार दुसरा हात सर्व बोटे पसरून
४. नंतर राज्य असलेला खेळाडू अंगठे धरून
५. अंगठे धरलेला हात हळूहळू वरती घेत पाठीची कमान ऊंच करत जायचे
अशा तर्‍हेने अडथळ्याची उंची वाढवत जाऊन जो सगळ्यात शेवटपर्यंत जास्तीत जास्त अडथळे पार करू शकतो तो हा खेळ जिंकतो. [जो अडखळतो, तो खेळातून तेव्हाच बाद होतो]

सहज's picture

27 Dec 2010 - 8:36 am | सहज

आवडला!

स्वाती दिनेश's picture

27 Dec 2010 - 9:49 am | स्वाती दिनेश

एकदम झकास लेख, आवडला.
स्वाती

दिपक's picture

27 Dec 2010 - 10:12 am | दिपक

झकास!

दादांच्या ’येऊ का घरात’ मध्ये ’कांदेपोर्णिमा’ चा उल्लेख होता. ते आठवले. :-)

अमोल केळकर's picture

27 Dec 2010 - 12:23 pm | अमोल केळकर

झकास . मस्त

अमोल केळकर

सुहास..'s picture

27 Dec 2010 - 12:29 pm | सुहास..

परत एकवार अभिदा टच लिखाण !!

मस्त चिमटे आणि कोपरखळ्या !!

श्रावण मोडक's picture

27 Dec 2010 - 12:43 pm | श्रावण मोडक

नर्मविनोद.
हा विनोद अगदी पोटापर्यंत जाऊन पोचला कालची एक आठवण आल्याने. आवडतं म्हणून एके ठिकाणी मटण खायला गेलो. मटणाच्या थाळीबरोबर कांद्याऐवजी मुळ्याच्या चकत्या. पहिल्या भाकरीवर पानावरून उठलो. :(

सूर्यपुत्र's picture

27 Dec 2010 - 1:56 pm | सूर्यपुत्र

कांदा मार्केट मधील एका मित्राने काही किलो कांदे असेच दोस्ती खात्यात दिले.

(अकलेचा कांदा)

आपला अभिजित's picture

27 Dec 2010 - 6:57 pm | आपला अभिजित

आपल्या मनसोक्त प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद, दोस्तहो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Dec 2010 - 8:38 pm | निनाद मुक्काम प...

भारतातील नवश्रीमंत उच्चमध्यमवर्गीय जनतेला कांद्याचे भाव कधीच वांदा करणार नाहीत ( २०% एकूण लोकसंख्येच्या ) पण इतर लोकांना मात्र नक्कीच त्यांतील दाहकता जाणवेल .पण ह्या लेखात तिला नर्म इनोदाची मस्त फोडणी मिळाली आहे .फार पूर्वी पाणी टंचाई प्रसंगी गजरा ह्या दूरदर्शन वरील .कार्यक्रमात छान पणे विडंबन सदर झाले होते .आत घडलंय बिघडलय पण बंद झाले .तेव्हा ह्या सुंदर लेखावर कुठे काही दृश्य स्वरुपात काही पाहता येणार नाही ह्याची अंमल खंत वाटते .