घराच्या खाणाखुणा लक्षात ठेवाव्यात अशी घरे ..!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
20 Dec 2010 - 5:31 pm

घराच्या खाणाखुणा लक्षात ठेवाव्यात
अशी घरे आता राहिलीच आहेत कोठे ..??
आमच्या लहानपणची घरे जशी होती तशीच होती
कितीक काळ कुणास ठाऊक.?
माडीवरचे बळद कितीतरी जुने असावे
पुसलेच जात नाही मनातून
सिगारेट ओढणारा फेल्ट ह्यात घालणारा
पत्री डब्यावरचा अनेक मुखवट्याचा तो डबा
त्यात साठवलेल्या कितीतरी चीनी मातीच्या बाहुल्या
लोलक,भवरे आणखीन काय नि काय
कितीक काळ तसाच होता
पुसलाच जात नाही मनातून ....!!

डबल ब्यारलची सायकल होती हर्क्युलसची
मस्त दणकट मजबूत ...!!
आजोबांच्या काळातली
मामा वापरून त्याची मुले वापरू लागलेली
तशीच होती कितीक काळ कुणास ठाऊक...?
किती काळ पुरली किती वर्ष चालली
ही मस्त मजबूत सायकल हर्क्युलसची
पुसलीच जात नाही मनातून ...!!

आत्ता सायकल गेली स्कूटर आली
बदलून बाईक आली
परवाच कोणीतरी कार घ्या म्हणाले
हे सगळे आता भंगार झाले
काळ बदलला वेळ बदलली
स्कूटर विकली
बाईक घेतली कधी आठवत सुद्धा नाही

माझ्याच घरासमोर छान पटांगण होते
कधीतरी गायब झाले
छोटी-छोटी घरे झाली .
पटांगण गायब झाले
पटांगणाची छोटीशी गल्ली झाली
कधी झाली नि अंगण विस्कटून कसे गेले कुणास ठाऊक ..?

आता घरे बदलली माणसे बदलली
घराच्या खाणाखुणा लक्षात ठेवाव्यात
अशी घरे आता राहिलीच आहेत कोठे ...!!!
माझ्याच घरात सारखी तोडफोड चालू असते
घराचा नकाशा सारखा बदलत असतो दोन-तीन वर्षात
वस्तूच्या जागा बदलत असतात सारख्या सतत
कधीतरी येणारा हसून म्हणतो
सर ..!! ओळखलेच नाही तुमचे घर
इतका छान चेंज केलात...!!

घराच्या खाणाखुणा लक्षात ठेवाव्यात अशी घरे
आता राहिलीच आहेत कोठे ..??

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

रणजित चितळे's picture

21 Dec 2010 - 11:52 am | रणजित चितळे

आमचे असे वडीलोपार्जीत घर कधीच नव्हते.
पण असते तर त्या बद्दलची ओढ असती.

आपण रंगवलेली कविता आवडली

पियुशा's picture

21 Dec 2010 - 12:29 pm | पियुशा

सुन्दर !

पुन्हा एक नितळ सुंदर कविता ..
मन खुप मागे घेवुन जाणारी ...

गावाला(बारामती) असलेले ५ खणाचे माळवदाचे घर आठवले .. लहान असताना तेथे होतो .. दारातील नारळाचे झाड .. पुढील भिंतीच्या बाजुला आणि सभोवताली ठेवलेल्या लाकडांवर कारल्याचा वेल आणि त्याला छोटी छोटी आलेली कार्ली अचानक ध्यानी न मनी असतान्बा समोर येवुन गेली .
घर आता पडलेले आहे .. ते तसेच ठेवुन समोर नविन घर बांधलेले आहे.. पण मन आता जुण्याच घराकदे जाते आहे..
नारळाच्या झाडाखाली आई अंघोळ घालताना डोक्याला आणि तोंडाला मोठा फेस आनुन दे म्हनुन हट्ट करणारा मी अआणि ताईडिला मग हात उंचावुन भीती दाखवणारा मी पण आठवलो ...

आणि नुकतेच उरुळी कांचन चे घर(२५ वर्षा नंतर) सोडुन पुण्यात आल्याने ह्या खालील ओळींमुळे तेथील सगळ्या वस्तु डोळ्यासमोर नाच करु लागल्या
---
पत्री डब्यावरचा अनेक मुखवट्याचा तो डबा
त्यात साठवलेल्या कितीतरी चीनी मातीच्या बाहुल्या
लोलक,भवरे आणखीन काय नि काय
कितीक काळ तसाच होता
पुसलाच जात नाही मनातून ....!!

--
मध्ये एक जुने घर म्हणुन धागा दिला होता .. पण म्हणावा असा लेख झाला नव्हता .. त्यावर एक कविता करावी म्हणत होतो आपली कविता वाचुन त्याचीही आठवण झाली .. नक्कीच लिहिल्यावर सांगेन ...

धन्यवाद