गोवा: पुर्वपीठिका
रविवारी १९ डिसेंबर. तुम्ही म्हणाल त्यात काय मोठ्ठ? कॅलेंडरच्या इतर दिवसासारखाच एक दिवस. पण मी म्हणेन आजच्याच दिवशी भारत पूर्णपणे स्वतन्त्र झाला. १५ ऑगस्ट १९४७ ला जरी भारताचा स्वातंत्रदिन म्हणुन साजरा होत असला, तरी गोमंतक हा भारताचा अविभाज्य भाग १९ डिसेंबर १९६१ या दिवशी पोर्तुगीजांच्या ४५० वर्षांच्या जुलमी राजवटीतुन स्वतंत्र, मुक्त झाला. म्हणुन हा पुर्ण स्वातंत्रदिन! त्यानिमित्ताने गोव्याबद्दल आणि ह्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल सांगायला खूप खूप आवडेल -
गोव्यात पोर्तुगिजांचा प्रवेश
--युरोपिय देशांमधे भारत तसा सुपरिचित होता. विशेषतः विजयनगर साम्राज्यामुळे आणि आशिया खंडातील सुवर्णभूमी म्हणुन ओळखला जात असे. अश्या ह्या सुवर्णभूमीशी प्रत्यक्ष संबंध कोणत्या देशाला नको असतील? म्हणुन मग पोर्तुगालच्या राजाने भारतापर्यंत पोचणारी दर्यावर्दी वाट शोधण्यासाठी वास्को-द-गामा ह्याला पाठवले (१४९८). वास्को द गामा भारतात यशस्वीरित्या पोचला. म्हणजे वाटेत मिळणार्या जहाजांची लूट, जाळपोळ, बायका मुले पळवणे, छोटे देश लूटणे, बाटाबाटी अशी यशस्वी काम करत आला..कालिकतच्या राजाने आधी त्याचा सत्कार केला खरा पण नंतर त्यांचे बिनसले. १२ दिवस राहुन तो परत गेला. जाण्यापुर्वी त्याने इथे एक वखार ही स्थापली. परत जाताना मलबार्च्या हिंदुंना घेउन गेला. आता तिकडे नेल म्हणजे बाटवण हे तर ओघानच आल. आणि मग परत पाठवुन दिले (ही पोर्तुगालच्या राजाची वसाहतविषयक धोरणांची नांदी होती) वास्को द गामा भारतात येण्यापुर्वीच ख्रिस्ती धर्म बर्यापैकी पसरलेला होता.
यानंतर ज्या ज्या वेळेला पोर्तुगालची जहाजे/गलबतं भारतात आली ती वाटेत भेटणार्या यात्रेकरुंच्या गलबतांची लुटमार, जाळपोळ इ. केल्याशिवाय कधीच राहिली नाहीत.
इ.स १५०३ च्या ६ एप्रीलला पोर्तुगालच्या राजाने अल्फान्सो-दे-आल्बुकर्क याला ४ गलबतांचा ताफ़ा देउन भारताकडे पाठवले. कोचीननजिक किल्वा येथे उतरल्यावर त्याने तिथल्या राजाशी व्यापारासंबधी बोलणी तर केलीच पण तसा करार करताना त्याने एक मागणीही केली. पोर्तुगालतर्फ़े तिथे जो माणुस राहिल त्याच्याकडे तेथिल ख्रिश्चनांचे तंटे बखेडे सोडवण्याचे व न्याय देण्याचे काम सोपवावे. आधी राजा तयार झाला नाही; पण शेवटी त्याने ती मागणी मान्य केली. हा पोर्तुगालचा भारतातील पहिला व्हाइसरॉय. फ़्रासिंस्कु दि आल्मेदा. ह्याची धोरणे व्यापारविषयक होती पण आल्बुकर्कची महत्वाकांक्षा सत्ता स्थापण्याची होती. पण त्यांना तशी योग्य भूमी मिळत नव्हती.
ही संधी त्यांना मिळाली पण तेव्हा पोर्तुगीजांचा भारतात प्रवेश होउन ११ वर्षे लोटली होती.
----------
ख्रिस्तपुर्व पहिल्या शतकापासुन इतिहासाचे सिंहावलोकन केले असता गोमांतकावर मौर्य, सातवाहन, अभीर, त्रकुटक, बटपुरा, कल्चुरी, कोकण मौर्य, चालुक्य, राष्ट्रकुट्, शिलाहार, कदंब, यादव आदि राजवंशांनी राज्य केले. दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दिन खिलजी याचा सरदार मलिक कफुर याने इ.स १३१२ साली गोमंतकावर स्वारी करुन राजधानी गोपकपट्ट्णची(आत्ताचे गोवा वेल्हा) जाळपोळ केली. ही मुसलमान राज्यकर्त्यांची गोव्यावरील पहिली स्वारी होती..
त्यानंतर हसन बहामनी ने १३५२ ते १३५८ च्या सुमारास स्वारी करुन गोवापुरी बेट कदंब राजांकडुन जिंकुन घेतले. गोवा शहराला त्याने सहा महिने वेढा दिला होता. यावरुन कदंब राजाचा जबरदस्त प्रतिकार दिसतो. याच काळात विजयनगरला हिंदु राज्य स्थापन झाले होते.
----------------
गोमंतक ईस्लामी अधिपत्याखाली असताना गोमंतकीय जनतेस 'नायटे' लोकांचा फार त्रास होत असे. हे नायटे म्हण्जे मलबारी हिंदु स्त्रिया व अरबी मुसलमान यांच्यापासुन झालेली मिश्र संतती. हे लोक फार क्रूर व धाडसी. चाचेगिरीत माहिर भटकळ , होन्नावर ह्या बंदराजवळच्या भागत त्यांचे वास्तव्य असे. विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय याला अरबस्थानातुन घोडे आणताना व्यत्यय आणल्याने त्याने त्यांचा नि:पात करायला एका मांडलिकास सांगितले. तर त्याने राजाचा हुकुम शब्दश: पाळला. १०००० हुन अधिक नायट्यांना मारले. जे उरले सुरले नायटे बचावले त्यांनी गोव्याचा आश्रय घेतला व गोव्यातुन विजयनगर संस्थानला त्रास देणे सुरुच ठेवले. तर ह्या नायट्यांनी मुस्लिम राजवटीपासुन गोमांतकीयांना छळणे सुरु केले होते. त्यांना धडा शिकवावा व गोवा सोडून जाण्यास भाग पाडावे यासाठी यासाठी वेर्णे च्या सरदेसायांनी त्यांच्यावर हल्ला केला व कित्येकांना मारुन टाकले . पण एवढे होउनही नायटे गोवा बेट सोडुन गेले नाहीत . तेव्हा सरदेसायांनी लोकांची तक्रार तिमोजा ह्या गोमंतकीय, विजयनगरच्या वरिष्ठ अधिकार्याच्या कानावर घातली. गोव्यावर हिंदु सत्ता स्थापन व्हावी व त्याचा सुभेदार आपण व्हावे असे तिमोजाला वाटत असे.

मग तिमोजाने होन्नावर येथे असलेल्या फ्रांसिस्कु आल्मेदा या पोर्तुगीज व्हाईसरॉय ची भेट घेतली व त्याची मदत मागितली. पुढे तिमोजा व आफोंसो दी आल्बुकर्क ची भेट झाली आणि गोव्यावर स्वारीचा बेत पक्का झाला. पोर्तुगिजांना व्यापार आणि द्रव्य पाहिजे तेवढे मिळाले की संतुष्ट होतील, गोमंतक पुन्हा विजयनगर साम्राज्याचा हिस्सा होइल व आपण सुभेदार बनु अशी तिमोजाची समजुत होती. याउलट येनकेण प्रकारेण हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्यावर आपल्या सत्तेची भूमी असावी अशी आल्बुकर्कची ईच्छा होती. पण ती सफल होत नव्हती करण हिंदुस्थानचे राजे भूमी हातची जाऊ न देण्याबाबत फार जागरूक होते. अशा समयी तिमोजाची कल्पना त्याच्यासाठी खूप मोट्ठी संधी होती.
हा कट शिजत असतानाच गोव्यावर राज्य करणार्या आदिलशहाचा मृत्यु झाला व त्याचा मुलगा ईस्माईल गादीवर बसला. आणि गोव्यात त्यांचे केवळ २०० सैनिक होते. ही संधी साधुन आल्बुकर्क ने गोव्यावर स्वारी केली व तिसवाडी सर केली. पोर्तुगीजांनी गोवा जिंकण्यापुर्वी, गोव्यावर हिंदुंचे स्वामित्व होते. इस १३५२-१३६६ व १४७२-१५१० या काळात तेवढी मुसलमानी सत्ता होती. मुसलमानी सत्ता नको म्हणुन तिमोजाने व गोमंतकीय हिंदु लढवय्यांनी आल्बुकर्कला मुक्तपणे साह्य केले. पण झाले भलतेच.
--------------
गोवा जिंकल्यानंतर
आल्बुकर्क शूर होता, तसाच धूर्त मुत्सद्दी होता. गोवा बेट जिंकल्यावर त्याने दवंडी पिटुन प्रजेस धार्मिक स्वातंत्र्य जाहीर केले. सतीची प्रथा बंद केली. पण हा त्याचा मतलबीपणा होता. त्याला पोर्तुगीज सत्ता गोव्यात स्थापायची होती. त्यासाठी पोर्तुगीज संस्कृती येथे रुजणे महत्वाचे होते. याच उद्देशाने त्याने पोर्तुगीज पुरुषांस ठार झालेल्या मुसलमानांच्या विधवांशी विवाह करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांना घोडा, घर, गुरे जमीन दिली. गोवा बेटाचे ख्रिस्तीकरण करण्याच्या मार्गात आणि ख्रिस्ती प्रजेचा विकासच्या मार्गात स्थानिक लोकांची अडगळ आल्बुकर्कला वाटली. आणि प्रसंगी त्यांना गोव्याबाहेर हाकलण्याची तयारीही होती.
आता सत्ता स्थापन झाली म्हणजे बाटाबाटी ,लुटालुट व त्यासाठी जनतेचा अमानुष इ. सगळ राजरोस सुरु झाल. १ एप्रिल१५१२ ला पोर्तुगालचा राजा दों मानुएल याला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो काही ब्राह्मणांनी व नाईकबारींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला!!!! हे काही सुखासुखी झाल नसेल....
गोमंतकात पहिले चर्च भाणस्तारच्या किल्ल्यात बांधले गेले. त्याला नाव दिले सेंट कॅथरिन चर्च कारण ज्या दिवशी गोवा जिंकला तो दिवस सेंट कॅथरिन चा होता. दुसरे चर्च जुने गोवे (old goa) इथे उभारण्यात आले. हे स्थळ गोवा जिंकताना झालेल्या लढाईत , ज्या स्थानावरुन मुसलमान सैन्याने पळ काढला त्या ठिकाणी बांधण्यात आले.
आल्बुकर्कच्या गोव्यात पोर्तुगीज रक्ताची केंद्रे वाढवणे व ख्रिस्ती धर्मप्रसार यांच्या हव्यासामुळे स्त्रिया व कुमारिकांची स्थिती अत्यंत दयनिय झाली होती. एकाही मुस्लिम पुरुषाला जिवंत राहु दिले नव्हते. मग तो सैनिक असो वा साधा नागरिक!! त्यांच्या घरच्या विधवा स्त्रिया, कुमारिका यांना कैदेत ठेवण्यात आले होते. जे कोणी पोर्तुगीज पुरुष त्यांच्याशी लग्नास राजी होत त्यांना त्या स्त्रिया पत्नी म्हणुन दिल्या जात. शिवाय घर, पैसे, कपडे, जमीनही मिळे. इतर स्त्रिया गुलाम म्हणुन जीवन कंठीत. काहींना तर पोर्तुगालला पाठवण्यात आले होते.
ईस्माईल आदिलशहाने गोवा जिंकण्याचे २ प्रयत्न इ.स १५१६ व इस १५२० मधे केले पण त्याचा दारुण पराभव झाला आणि सासष्टी, बारदेश व अंत्रुज (आताचे फोंडा) हे ३ महाल (तालुके) त्याला पोर्तुगीजाना द्यावे लागले. आणि या विजयाने आल्बुकर्कचा आत्मविश्वास वाढला व त्याची खात्री झाली आता त्याची गोव्यातील सत्ता अबाधित आहे. आणि त्याने जोमाने ख्रिस्ती धर्मप्रचाराला सुरुवात केली.
इस १५३० साली पोर्तुगालचा राजा दीं ज्युआव याने मिंगेल व्हाज नावाच्या धर्मोपदेशकास गोव्याचा धर्माधिकारी म्हणुन पाठविले. आणि धर्मांतरे सुरु झाली. हा राजा त्यावेळी केवळ १९ वर्षांचा होता याच सुमारास गोव्यात कॅथॉलिक बिशपची गादी स्थापन करण्यात आली.
क्रमशः
प्रीतमोहर
सातारकर
प्रतिक्रिया
13 Dec 2010 - 5:13 pm | स्पा
झकास
माहितीपूर्ण लेख..
पूर्ण स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा......
बाकी ,, फोटू टाकलेले आहेत काय ?
दिसत नाहीयेत
13 Dec 2010 - 5:15 pm | यशोधरा
चांगलं लिहिते आहेस प्रीमो...
13 Dec 2010 - 5:15 pm | प्रीत-मोहर
टाकलेत दिसत नाहीएत...संमं कडे मदत मागितलेय.....
13 Dec 2010 - 5:21 pm | बिपिन कार्यकर्ते
चेक केलं. तुम्ही बहुधा तुमच्या जीमेल अकाउंटमधून चिकटवले आहेत फोटो. ते आधी पिकासा, फ्लिकर किंवा तत्सम संस्थळांवर टाका आणि मग इथे चिकटवता येतील.
13 Dec 2010 - 5:17 pm | यकु
छान लिहीलंय .. अगदी सुरुवातीपासून..
फोटोचं तेवढं पहा...
13 Dec 2010 - 5:18 pm | बिपिन कार्यकर्ते
समयोचित आणि अगदी सविस्तर... बाकी त्यातल्या ऐतिहासिक गोष्टींच्या सत्यासत्यतेबद्दल माहित नाही, पण प्री-मोंनी अगदी नीट लेखन केल्याबद्दल मात्र कौतुकच.
13 Dec 2010 - 5:22 pm | प्रीत-मोहर
मी गोवा सरकारने प्रकाशित केलेली काही पुस्तकं रेफर केलीत...आणि ही माहीती दस्तुरखुद्द मनोहर हिरबा सरदेसाई ह्यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध झालीत. त्यामुळे सत्यता गॅरंटेड
13 Dec 2010 - 5:24 pm | बिपिन कार्यकर्ते
वोक्के. मग प्रश्नच मिटला. आता अनकंडिशनल कौतुक. ;)
ते फोटोचं सांगा जरा...
13 Dec 2010 - 5:21 pm | पुष्करिणी
वाचतेय, चांगला झालाय लेख्..फोटो आणि पुढील भागांच्या प्रतिक्षेत
13 Dec 2010 - 5:32 pm | अवलिया
समयोचित लेख.
13 Dec 2010 - 7:17 pm | मेघवेडा
वा वा, वाचतोय. छान लिहिते आहेस. पुभाप्र.
अवांतर : सासष्टी म्हणजे आताचं मडगांव ना? (साळशेत तालुका?) सासष्टी/सत्तरी या तालुक्यांच्या नावाच्या उगमाबद्दल काही माहिती द्याल का?
13 Dec 2010 - 7:57 pm | प्रीत-मोहर
हो सासष्टी म्हणजे आत्ताच साल्सेत तालुका.
सासष्टी/ सत्तरी या नावांबद्दल माहीती मिळवियचा प्रयत्न करते..सध्या तरी ऐकीव माहिती सांगते ती म्हणजे गावांच्या संख्येवरुन ही नावं पडली असावित.
सासष्टी- ६६ गाव असलेला तालुका,
सत्तरी ७० गाव
बारदेश- १२ प्रांत असल्याने नाव पडल असेल तसच
तिसवाडी-> ३० वाड्या
डिचोली- (भटग्राम) -ब्राम्हणांची वस्ती असलेला भाग
फोंडा(अंत्रुज),पेडणे,सांगे ,केपे ,मुरगाव ,काणकोण यांच्याबद्दल काही माहिती नाही
पैसाताई, माधवकाका यांनी प्रकाश पाडावा :)
13 Dec 2010 - 7:59 pm | मेघवेडा
आमच्या मातोश्री नि त्यांच्या मातोश्रीदेखील असंच सांगतात. :D
पण कुतूहल म्हणून सांगतो नि विचारतो, विकीपीडियावर तिसवाडी नि साल्सीट संबंधी आणखी एक इंटरेस्टींग रेफरन्स मिळाला होता म्हणून विचारलं मी. आता यातलं कुठलं अधिक योग्य आहे यावर काही माहिती उपलब्ध आहे का? कारण विकिपीडियावर असलेली सगळीच माहिती पूर्णपणे विश्वासार्ह नसते हे मी जाणतो. पण दिलेला संदर्भ बर्यापैकी खात्रीशीर वाटतो. तसाच गावांचाही संदर्भ नावांनुसार योग्य वाटतो. का दोन्हीच योग्य म्हणूयात? ;) म्हणजे साष्टीत सहासष्ट गावं नि प्रत्येक गावचं एक गौड सारस्वत कुटुंब?
का कोण जाणे पण मला हे गावांचं लॉजिक नेहमीच इल्लॉजिकल वाटत आलेलं आहे. म्हणजे तिसवाडीत तीस असू शकतात एकवेळ, कारण तसा तो तालुका बर्यापैकी लहान आहे, पण सत्तरी तसा बराच मोठा तालुका आहे. त्यात फक्त ७० च गावं?
13 Dec 2010 - 8:09 pm | प्रीत-मोहर
पुर्वी लोकवस्ती अशी नसायची. सत्तरी व सांगेचा बराचसा भाग वनांकित होता, अजुनही आहे पण तेवढ्या प्रमाणात नाही. आणी जिथे लोकवस्ती असायची तो गाव... आणि जंगलात वन्य प्राणीही असायचे.. सह्याद्री पर्वत्रांगांच्या कुशीत वसलेला असा हा तालुका. त्यामुळे सत्तरच गाव असण सहज शक्य आहे :)
13 Dec 2010 - 8:39 pm | मेघवेडा
हम्म बरोबर आहे. वाळपईला एकदा बसस्टॅण्डवर उभा असताना निरनिराळ्या गावांत जाणार्या बसेस पाहून मी २५-३० गावांची नावं सहज टिपली होती. (वाटल्यास आठवणीप्रमाणे लिहून देतो. :D ) म्हणून मला वाटायचं की सत्तरीत फक्त ७० गावं असणं शक्यच नाही. :)
>> जंगलात वन्य प्राणीही असायचे!
आयला हो का? वा! सहीच! =)) =))
13 Dec 2010 - 8:51 pm | पैसा
२ महिन्यांपूर्वी वाळपईला एक ढाण्या वाघ मारला गेला होता त्याचे फोटो पेपरांमधे झळकले होते. पण सरकार अजूनही कबूल करत नाही की गोव्यात पट्टेरी वाघ आहेत, कारण मग जंगल पूर्ण राखीव करावं लागेल, ते खाणमालकांच्या लॉबीला परवडणारं नाही. शिवाय वन्य हत्ती, बिबटे यांचा धुमाकूळ नेहमीच चालू असतो. कारण त्यांच्या रहाण्याच्या ठिकाणी माणसं घुसली आहेत.
(तू पुढच्या वेळी येशील तेव्हा आधी कळव. २/४ बिबटे तुझ्या भेटीला पाठवते आणि पाठोपाठ मी आणि प्रीमो येतो!)
13 Dec 2010 - 10:56 pm | प्रीत-मोहर
ए हो ...२-३महिन्यापुर्वी माझ्या गुरुजींवर हल्ला केला होता बिबट्याने ..ते घरी जात असताना
13 Dec 2010 - 11:02 pm | बिपिन कार्यकर्ते
अरेरे! वाईट हो... आता कसा आहे... बिबट्या?
13 Dec 2010 - 11:06 pm | प्रीत-मोहर
त्याला योग्य त्या ठिकाणी पाठवण्यात आल :)
13 Dec 2010 - 9:04 pm | प्रीत-मोहर
=)) =)) =)) =))
13 Dec 2010 - 8:13 pm | पैसा
गावांची संख्या बरोबर आहे. सत्तरी मोठा तालुका भौगोलिक दृष्ट्या असला तरी तरी बराचसा जंगलानी व्यापलेला आहे. त्यामुळे गावांच्या संख्येचा संदर्भ बरोबरच आहे.
13 Dec 2010 - 7:30 pm | सुनील
छान, समयोचित लेखमाला. पुढील भाग लवकर येऊदे!
मुक्तीदिनाच्या सुवर्णमहोत्सवप्रसंगी गोव्यातून प्रसिद्ध होणार्या हेरॉल्ड ह्या वृत्तपत्रात एकूण मुक्तीविषयी आणि स्वातंत्रसैनिकांविषयी काय छापून येते, ते पाहणे उद्बोधक ठरेल!
अवांतर
वास्को द गामा भारतात येण्यापुर्वीच ख्रिस्ती धर्म बर्यापैकी पसरलेला होता.
असे समजले जाते की, सेन्ट थॉमस इ.स. ५२ मध्ये केरळात आला होता. त्याने धर्मांतरीत केलेल्या मंडळींना आज सिरियन ख्रिश्चन असे संबोधले जाते.
@ मेघवेडा
सासष्टी म्हणजे आताचं मडगांव ना? (साळशेत तालुका?)
होय.
सासष्टी/सत्तरी या तालुक्यांच्या नावाच्या उगमाबद्दल काही माहिती द्याल का?
६६ गावे असलेला तालुका तो सासष्टी (सध्या उच्चार साष्टी) आणि ७० गावे असलेला तो सत्तरी! (गरजूंनी गावे मोजून पहावीत! मी मोजलेली नाहीत!!)
अति अवांतर - मुंबई बेटालगत असलेल्या बेटालाही (उपनगरे अधिक ठाणे शहर) साष्टी हेच नाव होते!
13 Dec 2010 - 7:58 pm | प्रीत-मोहर
आता सत्तरीत सत्तरहुन अधिक गाव झालीत :)
13 Dec 2010 - 8:17 pm | पैसा
प्रीमो या लेखासाठी तुला शाबासकी द्यावी तेवढी थोडी आहे. गोवा म्हणजे खा प्या मजा करा हाच संदेश आताचे राज्यकर्ते सुद्धा देत आहेत. गोव्याचा इतिहास केवढा जुना आहे याची लोकाना फारशी माहिती नसते. याचं कारण हीच ४५० वर्षांची पोर्तुगीज राजवट असावी.
मी फोंड्यात गेली १८ वर्षे रहाते, पण फोंड्याशी संभाजी राजांचा किती जवळचा संबंध आहे, याची इथल्या स्थानिकाना देखील अजिबात कल्पना नाही. फोंड्याचा किल्ला म्हणजे मर्दनगड. तो स्वतः संभाजी राजानी पूर्ण करविला. पण त्याबद्दल कोणाला काही विचारलं तर नन्नाचा पाढा ऐकू येतो. आज त्या किल्ल्यात एक शंकराचं लहानसं देऊळ आहे. तिथे वर्षात एकदा जत्रा भरते. पण किल्ल्यावर जायला रस्ता देखील नाही. काही जागी तटाचे भग्न अवशेष आहेत.
तू ज्या लेखमालिकेचा संकल्प केला आहेस, त्यातून निदान काही लोकाना गोव्याच्या इतिहासाबद्दल औत्सुक्य निर्माण झालं तरी ही मालिका यशस्वी झाली असं मी म्हणेन. खूप छान मनोरंजक पद्धतीने लिहितेयस. पुढच्या भागाची वाट बघते.
13 Dec 2010 - 8:30 pm | प्रीत-मोहर
अशीच कथा कदंबांच्या राजवाड्याची.. गोवा वेल्हाच्या जंगलात भग्नावशेष दिसतात अजुन....
हा माझा खारीचा वाटा गोव्याची प्रतिमा सुधारण्याचा. आणि संदेश की गोवा खूप वेगळा आहे. इथे चर्चेस व बिचेस व्यतिरिक्त खूप काही आहे...
सातारकरांनी खूप प्रोत्साहन दिल म्हणुन काहीतरी लिहु शकले मी :)
14 Dec 2010 - 1:22 am | योगप्रभू
मी काही कट्टर हिंदुत्त्ववादी नाही, पण गोव्यात आलेल्या अनुभवामुळे मला वाटते, की स्थानिक हिंदूंनाच आपल्या इतिहासाबद्दल पुरेशी आस्था दिसत नाही. प्रीतमोहरने कदंबांच्या भग्न राजवाड्याबद्दल सांगितले. मला छत्रपती शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केलेले सप्तकोटीश्वराचे मंदिर पाहायचे होते. तर टुरिस्ट सर्व्हिसवाले म्हणू लागले, 'साहेब! रस्ता खराब आहे. तिकडे कुठे जाता? खाण्यापिण्याच्या पण चांगल्या सोयी नाहीत.' शेवटी बेत रद्द केला आणि ठरवले, की पुढच्या खेपेस बाईक भाड्याने घेऊन एखाद्या स्थानिक मित्रासोबत ते देवस्थान बघून यायचे.
गोव्यातील चर्चेस आणि शांतादुर्गा, मंगेशी ही मंदिरे स्वच्छ आणि सुविधायुक्त आहेत, पण ऐतिहासिक सप्तकोटीश्वर मंदिराकडचा रस्ता का सुधारत नाहीत?
पण मला गोवा आणि तिथली संस्कृती खूप आवडते. वर्षातून एक सुटी गोव्यात घालवणे मस्ट.
13 Dec 2010 - 11:08 pm | इन्द्र्राज पवार
"....गोवा म्हणजे खा प्या मजा करा हाच संदेश..."
प्री.मो. यांच्या या माहितीपूर्ण लेखासाठी त्याना धन्यवाद देतानाच 'पैसा' यांच्या वरील प्रतिसादास विशेषतः या वाक्याला तितकेच महत्व दिले पाहिजे. भले गोव्यातील राज्यकर्ते तसे म्हणतही असतील पण गोव्यात सुट्टीसाठी जाण्यार्या बहुतेक सर्वच पर्यटकांचे तिथे जाऊन दोनदिवस खा प्या (प्या साठीच बहुधा...) करायचे, नोटा उधळायच्या आणि सोमवारी पहाटे आपल्या आपल्या गावी परतायचे.
आम्हीही त्यातलेच. मडगाव येथील फाटार्डो (की फुर्टाडो...? बघा नावही नीट माहिती करून घेतले नाही) क्रिकेट स्टेडियमवर आयोजित वन डे मॅचेस बघण्यासाठी यायचे, सामना संपला की ती रात्र म्हापश्यात काढायची.... का? तर तिथल्या 'कमळाबाई" च्या खाणावळीतील (आता मोठे हॉटेल झाले आहे...बहुधा 'पेडणेकर' असे काहीसे आडनाव आहे त्या हॉटेल मालकाचे) माश्याचे विविध प्रकार गट्टम करण्यासाठी.....आणि सकाळी 'व्वा...छान झाली गोवा ट्रिप...!" असे म्हणत कोल्हापूरला परतायचे....झाले गोव्याविषयीचे प्रेम दाखवून.
पण आता प्री.मो. चा लेख वाचल्यानंतर पटते की, माहितीचा किती प्रचंड खजाना दडला आहे या सुंदर आणि निसर्गाने वेढलेल्या छोट्याशा असा राज्यात.
पुढील लेखनास शुभेच्छा..!!
इन्द्रा
13 Dec 2010 - 11:18 pm | प्रीत-मोहर
धन्स इन्द्रा दा
ते फातोर्डा आहे!!!!
13 Dec 2010 - 9:00 pm | प्राजु
सुरेख!! अतिशय माहितीपूर्ण!!
13 Dec 2010 - 9:26 pm | लतिका धुमाळे
माहितीपूर्ण लेख.
लतिका धुमाळे
14 Dec 2010 - 12:20 am | निनाद मुक्काम प...
अप्रतिम लेख व खूप नवीन माहिती मिळत आहे तिचे सार म्हणजे ख्रिस्ती व मुसलमान लोकांनी वाट्टेल ते करून स्वताचा धर्म वाढवला .
भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून जागरूक राहणे इष्ट
पुढील लेखाची वाट पाहतोय
14 Dec 2010 - 8:58 am | आंसमा शख्स
चांगला लेख, वाचायला वेळ लागला. ही माहिती मला नव्हती.
गोव्यातल्या ख्रिश्चन मंडळींनी वाचला पाहिजे. जुने जाऊ द्या पण नवीन धर्म आला तर बरोबर सुख समाधान येणे जरुरीचे आहे. अन्यथा कशाचा काय उपयोग आहे?
इतिहासातून हेच शिकले पाहिजे. आपली मुळे ओळखली पाहिजेत.
म्हणून मी नेहमी म्हणतो की मी आधी भारताचा, इथल्या मातीचा.
14 Dec 2010 - 10:47 am | धनंजय
छान.
आंत्रुज महाल नव्या कोन्क्विस्तीतला ना?
आल्बुकेरने आदिलशहाकडून जिंकले ते तीन "जुन्या कोन्क्विस्ती"चे महाल - बारदेश, तिसवाडी आणि सासष्टी...
14 Dec 2010 - 11:16 am | प्रीत-मोहर
नाही. सगळ्यात आधी तिसवाडी जिंकला नंतर ते तीन.
धनंजय दा
गोवा, दमण दीव च्या स्वातंत्रलढ्याचा इतिहास खंड १ रेफर केलय मी यासाठी :)
संपादक : श्री. मनोहर हिरबा सरदेसाई
गोवा सरकार द्वारा प्रकाशित
14 Dec 2010 - 10:56 am | sneharani
मस्त माहिती दिलीस ग या लेखात!
:)
14 Dec 2010 - 11:03 am | ढब्बू पैसा
मस्तच लिहिलं आहेस प्रिमो! खूप माहितीपूर्ण आणि ओघवता झालाय लेख :). गोव्याबद्दलची बरीचशी माहिती माझ्यासाठी नवीन आहे. गोव्याला इतका मोठा इतिहास आहे हे खरच ठावूक नव्हतं!
पुढचा भाग लवकर लिही!!
(ढ) ढब्बू पैसा
14 Dec 2010 - 12:09 pm | नंदन
छान आणि समयोचित लेख!
>>> तर त्याने राजाचा हुकुम शब्दश: पाळला. १०००० हुन अधिक नायट्यांना मारले.
नायट्यांचा काटा काढला? :)
14 Dec 2010 - 12:12 pm | मस्त कलंदर
मस्त गं. छान नव-नवी माहिती मिळतेय. लिहित रहा.
14 Dec 2010 - 2:02 pm | sagarparadkar
मस्त लेख ....
आता वास्को-द्-गामा आणि गोव्याचा विषयच निघाला आहे तर एक्-दोन प्रश्न मनात आहेत ते विचारतो:
पूर्वी एकदा उल्लेख वाचला होता कि या वास्कोने केरळ्चा राजा 'झामोरीन' ह्याच्या मुस्काटात / थोबाडीत मारली होती. हा एव्ह्ढा लांबून आलेला खलाशी असं कसं काय करून शकला, झामोरीन आणि त्याच्या सैनिकांचे हात काय केळी खायला गेले होते? का ही गोष्टच खोटी आहे?
गोवा मुक्तीचा विषय निघालाच आहे तर ह्या संबंधात नेहरुंच्या भूमिकेवर अधिक विस्तृतपणे प्रकाश पडला तर बरं होईल. हे जरा अवांतर वाटेल पण तसं ते नसावं. शिवाय ज्येष्ठ गायक कै. सुधीर फडके आणि त्यांच्या पत्नी ललिताबाई ह्यांच्या गोवामुक्तीविषयक कार्यावर पण थोडे वर्णन यावे असं वाटतंय.
14 Dec 2010 - 2:22 pm | प्रीत-मोहर
आता झामोरिन आणी वास्कोच बिनसल हे माहिताय..त्याने त्याच्या मुस्काटात / थोबाडीत मारली की अजुन कुठे मारल ह्या डिटेल्स नाय मिळाल्या मला :)
नेहरुंच्या भुमिकेवर बरच ऐकलय.. फक्त पुरावे गोळा करुन यथावकाश टाकेन....
14 Dec 2010 - 2:11 pm | स्मिता.
प्रीमो, लेख अतिशय माहितीपूर्ण आहे. गोव्याबद्दल नसलेली बरीच जास्त माहिती यातून मिळाली.
असेच लिहीत राहा. पु. ले. शु.
14 Dec 2010 - 2:12 pm | गणेशा
धन्यवाद आपले ..
लेख आवडला
14 Dec 2010 - 7:21 pm | शैलेन्द्र
खुप छान लेख...
छ्त्रपतींच्या आयुष्यात, फसलेल्या मोहीमा थोड्याच.. त्यातल्याही अत्यंत महत्वाच्या म्हणजे गोवा व जंजीरा.. जर छत्रप्तींनी गोवा जिंकला असता तर नक्किच आज गोव्याची संस्कृती वेगळी असती.
जर चिमाजी आप्पांनी वसई जिंकली नसती तर आज वसईचा गोवा झाला असता.
14 Dec 2010 - 11:13 pm | टारझन
विस्तृत आणि अभ्यासपुर्ण लेखाबद्दल कंडिशनल कौतुक .
कंडिशन = NULL ;
- गोवन
24 Feb 2015 - 8:59 pm | जेपी
शेवटला क्रमश: लिहीलय..
पुढचा भाग कधी येणार..
24 Feb 2015 - 9:29 pm | प्रीत-मोहर
हे पुर्ण नाही झाल. त्यानंतर वेगळी लेखमाला लिहिलीय. टीम गोवा आयडीने. ती वाचा
25 Feb 2015 - 6:43 am | अत्रन्गि पाउस
प्लीज धागा वर काढा कि तो ..
25 Feb 2015 - 8:50 am | प्रीत-मोहर
http://www.misalpav.com/node/24071
25 Feb 2015 - 1:35 am | सांगलीचा भडंग
मस्त माहिती .
इंग्रजांनी पण गोवा घेण्यासाठी फारसा प्रयत्न केले नाही का ? म्हणजे बाकीचे सगळे भारत घेतल्यावर फक्त गोवा कसे काय सोडले ?गोवा च्या इतिहासामध्ये इंग्रजांचा काही सहभाग आहे का ?
25 Feb 2015 - 10:12 am | ज्योति अळवणी
छान आणि माहिती पूर्ण लेख. गोव्या सारखाच् सुंदर