एक सुरेल आठवण

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
7 Nov 2010 - 11:53 pm

माझ्या नॉस्टॅल्जिक आठवणी बहुतांशी शास्त्रीय वाद्य संगीताच्या आहेत. कधी काळच्या कित्येक मैफली ध्वनीचित्राफितीसारख्या मनात कोरलेल्या आहेत. २९ डिसेंबर २००२ ची उ. विलायत खान साहेबांची सवाई मधली (शेवटची) मैफल त्या पैकी एक.

उ. विलायत खान हे माझं शास्त्रीय वाद्यासंगीताच्या क्षेत्रातील दैवत. सतार या तंतू वाद्याच्या रचने मध्ये आणि ती वाजवण्याच्या तंत्रामध्ये महत्वाचे बदल करून तिला 'गायकी अंग' देण्याचं आणि 'विलायातखानी बाज' प्रस्थापित करण्याचं 'अवतार कार्य' च त्यांनी केलं. निव्वळ सतारच नव्हे, तर एकूणच शास्त्रीय वाद्य संगीताच्या प्रचलित मर्यादा ओलांडणारी ती क्रांतीच होती. जपानी वाद्यवृंदाबरोबर फिनलंड मध्ये (कन ) फ्युजन(?) सादर करणे अशा प्रकारचे जाहिरातबाज माकडचाळे त्यांना कधीच पटले नाहीत. मैफलीत सतारीवर चांदनी केदार, आणि पिआनो वर 'मूनलाईट सोनाटा' वाजवा. आधी हिंदुस्तानी आणि कर्नाटक संगीताचा मेळ घाला, मग "east meets west" वगैरे प्रकार करा अशी त्यांची रोकठोक भूमिका होती. असो. या विषयावर आपल्या जुजबी माहितीच्या जोरावर मी आपले काही मत व्यक्त करणे हा 'तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलता किती' असाच प्रकार होईल त्यामुळे फ्युजन वगैरेबद्दल थोरथोर लोकांमध्ये मतभेद आहेत इतकेच सांगत आवरते घेतो.

थकलेले आणि खूपच आजारी दिसणारे खान साहेब आधार घेतच रंगमंचावर आले. सम्राटासारखे जगणाऱ्या त्या माणसाची अशी अवस्था पाहून फार वाईट वाटलं. अशा अवस्थेत मैफिलीत वाजवायची काय गरज आहे असा प्रश्न पडला. खान साहेबांनी सतार हातात घेतली, जोग आणि तिलंग अशा जोड रागात आलापी सुरू झाली, आणि सगळा नूर च पालटला. खान साहेब विलक्षण चैतन्यमय दिसायला लागले. हा तिथे अनुभवता येणाऱ्या नादब्रह्माचा 'साईड इफेक्ट' असेच म्हणायला हवे. मुळात गायकी अंगानी वाजवणं मुष्कील. गमक, मींड असे सगळे प्रकार वाजवताना बरेच वेळा हात साथ देत नव्हता. आयुष्य एखाद्या कलेसाठी वाहून घेतल्यावर जी एक प्रकारची हुकुमत येते, ती मात्र क्षणोक्षणी जाणवत होती. सतार खांसाहेबांच्या शरीराचाच अवयव असावी असं वाटत होतं. ख्याल 'साकार' होत होता. जोग आणि तिलंग हे तसे पूर्णपणे वेगळ्याच 'मूड'चे आणि तसे विसंगत ठरतील असे राग. या दोन्हीचा मेळ घालत एक तिसराच राग 'सिद्ध' करणे हे मोठ्या तपश्चर्येशिवाय शक्य नाही. खानसाहेब मात्र हे लीलया करत होते.

एखादी मुष्कील हरकत हवी तशी हातातून निघाल्यावर त्यांच्या चेहेऱ्यावर जो तृप्तीचा भाव दिसायचा, किंवा लहान मुलासारखं निर्व्याज हास्य यायचं - सगळंच अलौकिक, अपार्थिव होतं. 'हे अवघड काम आहे, आणि आता माझं वय झालं आहे, पण विजय (घाटे) जी सांभाळून घेतील' अशी प्रस्तावना करत त्यांनी असा काही तयार झाला वाजवला कि नेमका तरुण (? ) कोण आहे हा प्रश्न पडावा आणि कोण कुणाला सांभाळून घेतो आहे हे स्पष्ट व्हावं. याच मैफिलीत मध्येच सतारीची तार तुटली, खान साहेबांनी ती पटकन बदलून जणू काही घडलंच नाही अशा थाटात परत वाजवायला सुरुवात केली. त्या नंतर एक अप्रतिम रागमाला खानसाहेबांनी सादर केली. रागमाला कसली, एक प्रकारचा झंझावातच होता तो! सलग सादरीकरणाच्या सौंदर्याला बाधा येणार नाही अशा रीतीने 'सांधा बदलत' कित्येक रागरागीण्यांची झलक अत्यंत कलात्मक पद्धतीने ते दाखवत होते. असे प्रकार भक्तिभावाने आनंद लुटत ऐकणेच बरे. विश्लेषण करायला गेल्यास हाती काही गवसतंय, तोवर बरंच काही निसटून जावं असाच तो विलक्षण प्रकार होता. स्वरांच, रागांचं एक मनोहारी इंद्रधनुष्यच बघता आलं, अनुभवता आलं. विजय घाटे पूर्ण मैफिलीत समरसून अत्यंत समर्पक संगत करत होते.

श्रोत्यांमध्ये पं. शिवकुमार शर्मा, उ. शफात अहमद, श्रीमती प्रभा अत्रे इ. दिग्गज होते. त्यांची मनापासून दाद मिळत होती. माझ्या "अशा अवस्थेत मैफिलीत वाजवायचं काय नडलं आहे" या टिपिकल पोरकट, पुणेरी प्रश्नाचं असं जोरदार 'विलायातखानी' बाजाचं उत्तर मिळालं. हाच कुंडली मधला राजयोग असावा. २००४ मध्ये खान साहेबाना देवाज्ञा झाली. आता असा योग पुन्हा येणार नाही.

(अन्य संस्थलावरून पुन:प्रकाशित)

कलाप्रकटन

प्रतिक्रिया

यकु's picture

8 Nov 2010 - 12:08 am | यकु

पं. विजय घाटे लै भारी वाजवतात..
मला काही कळत नाही त्यातलं पण उगंच ऐकावं वाटतं कधीतरी..

चिंतामणी's picture

8 Nov 2010 - 12:15 am | चिंतामणी

उ. विलायत खान हे माझं शास्त्रीय वाद्यासंगीताच्या क्षेत्रातील दैवत.

बाकी उ.विलायत खानसाहेब हे नाव घेतले की त्यांच्या यमनची, दरबारी कानडाची आठवण करून देतात. त्याबरोबर पु.ल. देशपांड्यांचे "रावसाहेब" मधील वर्णन आठवते.

विसोबा खेचर's picture

8 Nov 2010 - 10:52 am | विसोबा खेचर

छान आठवण..

हिंदुस्थानी संगीताबद्दल कृपया अजूनही लिहा..

तात्या.

मूकवाचक's picture

28 Apr 2013 - 12:00 pm | मूकवाचक

अभिजात संगीतप्रेमींनी आवर्जुन पहाव्या अशा ध्वनिचित्रफिती -

विसोबा खेचर's picture

28 Apr 2013 - 6:16 pm | विसोबा खेचर

सुंदर लेखन..सुंदर आठवण..

तात्या.

-- या आमच्या शिळोप्याच्या ओसरीवर..
बसा घटकाभर..!

अक्षया's picture

29 Apr 2013 - 10:51 am | अक्षया

+ १

प्यारे१'s picture

30 Apr 2013 - 8:19 pm | प्यारे१

+२

चौकटराजा's picture

29 Apr 2013 - 9:58 am | चौकटराजा

सुंदर लेख ! आमच्या आवडत्या नय्यर साहेबांचे जे सितार पिसेस आहेत ते उ. रईस खान यानी वाजविलेले आहेत. व ते विलायतखानी बाजाच्या परंपरेतील सतारिये आहेत असे वाचल्याचे स्मरतेय. दुसरे आवडते सतारिये अबदुल हलीम जाफर खान ! रविशंकर याच्या सतार वादनापेक्षाही विलायत खान यांचे वादन आग्रहीपणे आवडणारे काही मला भेटले आहेत. बाकी जोग व तिलंग हे जोड राग हे काही कळले नाही. ते मूळ राग आहेत ना ?

मूकवाचक's picture

29 Apr 2013 - 10:47 am | मूकवाचक

उ. रईस खाँ, उ. शाहिद परवेज आणि पं. बुधादित्य मुखर्जी इमदादखानी/इटावा घराण्याची आणि विलायतखानी बाजाची सतार वाजवतात.

त्या मैफलीत उ. विलायत खाँसाहेबांनी जोग आणि तिलंग यांचे मिश्रण असलेला एक अप्रचलित (अछोप किंवा अनवट) राग - राग 'दोराहा' सादर केला होता.

मनोज श्रीनिवास जोशी's picture

30 Apr 2013 - 8:42 pm | मनोज श्रीनिवास जोशी

मैफिलीचे वर्णन आवडले. आपल्या दैवताला गाताना , वाजवताना पाहणे हे जणू स्वर्ग सुखच !
मस्त जमली असणार मैफल. वाजवणारा अवलिया आणि ऐकणारे कान तयार !