"Child's Play Is Serious Business" ह्या उक्तीवर आधारित…
Anita Wadley ह्यांच्या "Just Playing" कवितेवरून स्वैर अनुवादित…
-----------------------------------------------------------------
रचत असेन कधी, ठोकळे एकमेकांवर
वाटत असेल अगदी, पोरखेळ हा तर !
शिकतो आहे मी, 'भार' आणि 'तोल'
असेनही उद्या मी, 'आर्किटेक्ट' अनमोल.... १
हाती माझ्या बाहुली, भातुकलीचा खेळ
नजर म्हणे तुमची, "आवरायला वेळ" !
'जपणं' नि 'सांभाळणं' शिकवतो खेळ
बनू उद्या 'आई'/'बाप' आम्ही एखादवेळ.... २
हातांवरती रंग, कधी चिखलातले कुंभार
वाटती तुम्हाला, पोरखेळ हे भंगार !
'सांगणं मनातलं' शिकवती ना खेळ
'कलाकार' उद्या मी, होईन एखादवेळ.... ३
श्रोते नाहीत कुणी, पण चढे वाचनास रंग
म्हणता मात्र तुम्ही , पोरखेळात पुरता दंग !
'समजणं' नि 'समजावणं' शिकवतो खेळ
असेन उद्या मी चांगला, 'शिक्षक' एखादवेळ.... ४
फिरेन कधी झुडपांतून, खिशांत असे सटरफटर
नक्की वाटेल तुम्हाला, फालतू वाया गेले पोर !
माहीत नाही अजूनि जे, ते शोधेल माझा खेळ
तुम्हीच म्हणाल मला मग, 'संशोधक' एखादवेळ...५
भान माझं हरपून जाता, सोडवण्या एखादं कोडं
म्हणू नका हं प्लीज आता, "काहीतरी करतं येडं" !
नुसता खेळण्यात नाही हो मी, वाया घालवत वेळ
सोडवताना मी प्रश्न उभारेन, 'उद्योग' एखादवेळ...६
भांडीकुंडी खुडबुडेन, मिटक्या मारेन थोडावेळ
तुम्हास नक्की वाटेल मग, भलतेसलते माझे थेर !
चवींमधले वेगवेगळे, फरक शिकवतो मजला खेळ
चाखत-चाखत आंबट-गोड, 'बल्लव' होईन एखादवेळ…७
उड्या मारतो दोरीवर की, वारा धावत असेन चपळ
तुमचं आपलं टुमणं की, 'देवासारखा बस अंमळ!'
शिकतो आहे 'शरीर' आणि, हालचालींचा मेळ
डॉक्टर, नर्स वा बहुधा, ऍथलीट होईन एखादवेळ...८
"काय केले शाळेत आज ? कसे होते दिवसाचे स्वरूप?"
"फार काही केले नाही पण, खेळलो मात्र सगळे खूप!"
रागवून आता म्हणू नका हं, "तुझे नुसते फालतू खेळ !"
'माझं' पेक्षा चांगलं 'आपलं', शिकायची ही तर वेळ...९
राहू द्याल 'आज' मला जर, स्वच्छंदी नि आनंदी
पाहू याल 'उद्या' मला तर, यश ठेवेन पायाशी
लहान आहे मी अजूनि, थांबा ना हो थोडावेळ
कामात आहे पुरता गढुनि, दिसतो नुसता पोरखेळ !!!... १०
---------------------------
www.atakmatak.blogspot.com
---------------------------
प्रतिक्रिया
23 May 2008 - 2:02 am | मुक्तसुनीत
बालमनाच्या दृष्टिकोनातून जगाकडे पहाणे, त्यातून काहीतरी सांगू पहाणे आणि त्यातून उत्तम बालकाव्य करता येणे या गोष्टी सोप्या नाहीत. तुमची कविता मला आवडली.
मुलांना कायकाय सांगायचे असते , जे ते सांगू शकत नाहीत. आनंदी वृत्ती , कुतूहल , त्यांचे स्वास्थ्य , कुठल्याही प्रेशरशिवाय काहीतरी शिकण्याची प्रक्रिया या सर्व गोष्टी त्यांच्या मूलभूत गरजांपैकीच. रोजच्या रहाटगाडग्यात मुलांच्या या गरजांकडे पहाणे ही , एक चांगला बाप , चांगली आई बनण्याच्या प्रक्रियेतील पायरी आहे. आमीर खानने आपल्या चित्रपटात तरी वेगळे काय सांगितले आहे ? घटाघटाचे रूप आगळे ही ओळ किती खरी आहे ! "आमच्या भावना , आमचे स्वातंत्र्य चिरडू नका, नंतर जगरहाटीप्रमाणे जगायचेच आहे , पण आता तर मोकळा श्वास घेऊ द्या !" हे मुलांना नेमक्या या शब्दात सांगता येत नसेल ; पण म्हणून त्यांना तशी जाणीवच नसते असे नव्हे !
तुमची कविता निश्चित आवडली. तिचे भाषांतर करावेसे तुम्हाला का तीव्रतेने वाटले असावे याचा अंदाज सहज येऊ शकतो.
23 May 2008 - 2:17 am | संदीप चित्रे
मुक्तसुनीत .. धन्स :)
माझ्या तीन वर्षांच्या मुलाला खेळताना पाहून मूळ इंग्लिश कविता प्रकर्षानं मनात यायची. अनुवाद करून ब्लॉगवर टाकावीशी वाटली !
बाकी श्रेय मूळ कवयित्रीचं :)
23 May 2008 - 2:14 pm | नरेंद्र गोळे
चित्रे साहेब, वा! छान आहे हो!!
मूळ सुंदर कवितेचा नितांत सुंदर अनुवाद.
मात्र, शेप म्हणजे आकार. भार नाही.
23 May 2008 - 7:31 pm | संदीप चित्रे
नरेंद्र ... ब्लॉग पाहून तिथेही प्रतिक्रिया देण्यासाठी विशेष धन्स.
>> मात्र, शेप म्हणजे आकार. भार नाही.
खरंय तुमचं म्हणूनच मी कवितेचा 'स्वैर अनुवाद' केलाय.
लिहिताना असं जाणवलं की भार आणि तोल एकमेकांच्या खूप जवळचे आहे पण त्यांचा अर्थ मात्र एकमेकांपासून खूप वेगळा आहे :)
23 May 2008 - 5:44 pm | वरदा
वेगळा विषय मला मूळ इंग्लीश कविता पण माहित नव्हती.. धन्यु!
23 May 2008 - 7:41 pm | प्राजु
सुंदर अनुवाद..
एक अतिशय चांगली आहे कविता.
प्रत्येक ओळ सुंदर आणि अर्थवाही आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 May 2008 - 7:44 pm | चतुरंग
'पोरखेळ' हा खरा 'थोरखेळ' असतो हे जाणून आहात हे पाहून छान वाटले. :)
(अवांतर - आमच्या ६ वर्षाच्या मुलाने तो डायनॉसॉर च्या भूमिकेत असताना केलेली उशा-पांघरुणांची गुहा मी 'आवरुन' ठेवायचे म्हणुन मोडली तेव्हा तो ज्या प्रकारे रडला ते बघून 'खरेच घर' मोडल्याचे दु:ख मलाही झाले, तेव्हापासून मी त्याला विचारल्याशिवाय 'घर' मोडत नाही! :) )
चतुरंग
24 May 2008 - 3:08 am | शितल
मस्त, मुला॑चे विश्व खुपच वेगळे असते आपण मोठी माणसे ते समजायला चुकतो, माझा मुलगा तर गाडया॑चा इतका शैकिन आहे की, हा घरात फक्त गाडी वरूनच इकडे तिकडे फिरत असतो, आणि कल्पनेत ही हा गाड्या तयार करत असतो आणि तु आता इथ था॑ब मी गाडीचे दार उघडतो आणि तुला आत घेतो, तिकडे सरक, मी ड्रायव्हि॑ग करतो आहे ना ? असे घरात मजेचे खेळ चालु असतात.
24 May 2008 - 4:41 pm | विसोबा खेचर
हम्म! छान आहे कविता...
तात्या.
25 May 2008 - 9:18 am | संदीप चित्रे
मनापासून धन्स :)
25 May 2008 - 11:53 am | ऋषिकेश
वा! एकदम वेगळ्या ढंगातील कविता.. एकदम भिडली.. इथे दिल्याबद्द्ल धन्यु!
बाकी अनुवाद स्वैर असला तरी भाव तोच पाहिजे असे वाटते. काहि ठिकाणी मुळ कवितेतील भाव निसटल्यासरखा वाटतोय.. शिवाय अनुवाद चालीत म्हणता आला असता तर बहार आली असती असे वाटते
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
27 May 2008 - 7:43 pm | संदीप चित्रे
धन्स ऋषिकेश... मी कविता मीटरमधे लिहायचा प्रयत्न करायला हवा :)