"आई....! ए, आऽई!!
लेकीची दबकी हांक कानावर आली तसा मंगलाबाईंचा डोळा उघडला पण पुरती जाग आली नव्हती. ’सकाळ झाली की काय!’ म्हणून नजर खिडकीवरल्या झरोक्याकडे गेली तो अजून काळोख गडदच होता. सरत्या ग्रीष्मातली रात्र तशी फार मोठी नसली तरी उजाडायला एखादी अजून घटका तरी जायला हवी होती. हे असं काहीसं भान जाणवतं न जाणवतं तोच पुन्हा एक दबकी हाक! पण या वेळी कणभर कण्हल्यासारखी. पुढ्यातच झोपलेल्या लेकीच्या पाठीवर त्यांचा हात गेला आणि तसाच तो आभावितपणे तिच्या कपाळावरही गेला.
"काय गं? काय होतंय?"
"आईऽऽ, पोऽऽऽट...."
"दुखतंय?"
"हंऽ!!"
"बरं. थांब!"
मंगलाबाईंनी उठून बसत उशालगतच्या कंदिलाची वात थोर केली आणि मनूकडे पाहिलं. तर मनूचा चेहरा कसनुसा झालेला. कंदिल हातात घेऊन त्या स्वैपाक घराकडे गेल्या आणि पाचच मिनिटात चिमुटभर ओवा आणि पाण्याचं भांडं घेऊन परतल्या.
"हं, हे घे. बरं वाटेल जरा वेळात."
मनूने हातावर ठेवलेला ओवा तोंडात टाकला आणि पाणी पिऊन पाय पोटाशी घेऊन एका अंगावर कलंडली.
फटफटायला लागलं तशा मंगलाबाई उठल्या. तशीही झोप अशी लागलेली नव्हतीच. मनू झोपलेली होती. निदान तशी दिसत तरी होती. पण तिच्या कडे पहायला वेळ कुठे होता. आत्ता तिच्या शाळेची वेळ होईल, तिची तयारी होणं आधी महत्वाचं होतं. मंगलाबाईंनी न्हाणीत जाऊन तोंड धुतलं, स्वैपाक घरातल्या चुलीत लाकडं सारली आणि त्यांना पेटतं घालून अंघोळीच्या पाण्याचा गुंडा त्यावर चढवून त्या मनूकडे वळाल्या.
"मनू, ...मन्या बेटा... उठतेस ना? चल शाळेची वेळ आत्ता होईल बाळा, चल ऊठ."
मनू जरा वेळाने उठलीही. पण तिच्यात रोजची तरतरी नव्हती. तिच्या पोटात अजूनही तसं दुखत होतंच. पण तसं दाखवलं तर आईची किती तारांबळ होईल या विचाराने ती तसं दाखवत नव्हती. तिची अंघोळ, आवरून झालं. आईनं दिलेलं दूध बशीत ओतता ओतता तिनं ऊंचावलेलया भुवया वडिलांचा खोलीकडे वळवत डाव्या हाताचा पंजा 'त्यांचं काय?' अशा अर्थी वळवला.
"काऽय की! रात्री खूप वेळ कांही वाचन चाललं होतं बाई त्यांचं! केंव्हा झोपले कोणजाणे.
कांही सभा-बिबा असेल. लगेच अंघोळ करून घे तू, आवर आणि पळ."
केस विंचरून झाले आणि मंगलाबाई वेणीचे पेड गुंफत होत्या. तोच,
"आई...." मनूनं पुन्हा कण्हल्यासारख्या तशाच दबक्या सुरात साद घातली.
"हंऽऽ! बोल."
"आज मी शाळेत नाही गेले तर...चालेल?"
"कां? काय झालंय?"
"कांही नाही! जरा कसंसच वाटतंय."
"जरा पोटच तर दुखतंय ना? मी हिंगाचं चाटण करून देते. ते घे. बरं वाटेल.परीक्षा जवळ आलीय ना? शाळा बुडवून चालेल कां?"
"पण मी घरी आभ्यास करेन ना!"
"तू करशीलच गं. पण ह्यांचं काय? शाळा बुडवलेली आवडणारे का त्यांना? मलाच बोलणी बसतील."
"बऽऽरं. जाते मी."
"शहाणी बाई माझी ती!" आई मायेनें पाटीवर एक हलकासा धपका घालत म्हणाली.
अंघोळ करून तयार झालेली मनू देवाला नमस्कार करून दप्तराला हात घालणार तोच बाहेरून तिच्या मैत्रिणीची, कर्व्यांच्या शकूची हांक आलीच. तशी, "आई निघाले गंऽऽ!" म्हणत ती घरा बाहेर पडली.
शाळेत जाणार्या पाठमोर्या मनूकडे मंगलाबाईंनी जरा काळजीनंच नजर टाकली. शाळेत जातांनाचा रोजचा उत्साह दिसत नव्हता तिच्यात. बळेच ओढत नेल्यासारखी चालली होती. सकाळच्या कामांना हात घालतांना मंगलाबाई विचार करीत होत्या.मनूने शाळेत न जाण्याबाबत पहिल्यांदाच विचारलं होतं.त्यालाही त्यांना नाही म्हणावं लागलं. नसती गेली एक दिवस शाळेत तर त्यांना कांही फरक पडत नव्हता. पण, तिच्या बाबांना, दिनकररावांना ते मुळीच चाललं नसतं. तशी ती त्यांची लाडकी होतीच. पण त्या मागचं खरं कारण मनू कमालीची हुशार होती. शाळेत पहिला नंबर कधी सोडला नव्हता तिनं आजवर. आणि म्हणूनच तिच्या बाबतीत दिनकररावांच्या अपेक्षा कमालीच्या उंचावलेल्या होत्या. मनूनं झाशीच्या राणीसारखी एक दैदिप्यमान स्त्री म्हणून नांव करावं ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी काय लागेल ते करायला ते मागे पुढे पाहात नसत. ती तीन वर्षाची झाली तेंव्हा पासून तिला ते तिला क्रांतिकारकांच्या गोष्टी सांगायचे. पण मनूवरच्या त्यांच्या प्रेमाला कडक शिस्तीचा आणि धाकाचा एक गडद मुलामाही होता.
दिनकरराव शहरातील एका दिवाणी वकीलाकडे कारकून म्हणून होते. पण १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध आणि क्रांतिकारकांचा इतिहास हे त्यांचं मर्मबंध होतं. जशी संधी मिळेल तसे सार्वजनिक सभांमधून ते क्रांतिसंग्रामावर व्याख्याने देत असत. त्यांच्या अभ्यासिकेत क्रांतिकारकांच्या जीवनावरील अनेक पुस्तके होती आणि भिंतीवरही मंगल पांडे पासून ते स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत झाडून सार्या क्रांतिकारकांच्या तसबिरी लावलेल्या होत्या. रणरागिणी झाशीची राणी हे तर त्यांचं दैवतच होतं. तो सारा इतिहास त्यांना मुखोद्गत होता. इतर कुणाचेही जन्मदिवस त्यांच्या फारसे खिजगणतीत नसायचे पण ११ नोव्हेंबर १८३५ हा कु.मनकर्णिका मोरोपंत तांबे या तेजशलाकेचा जन्मदिवस मात्र ते विजयादशमीच्या हिरीरीने साजरा करायचे.आणि म्हणूनच की काय आपल्या एकुलत्या एका मुलीचं नांवही त्यांनी ’मनकर्णिका’ ठेवण्याचा अट्टाहास केला होता. दिनकररावांचे वडील बेचाळिसच्या चवळवळीतले एक अग्रणी होते. तसे ते गेलेही. पण दिनकररावांच्या स्वरूपी भाबडी श्रद्धा आणि एक प्रकारचा कर्मठपणा मागे ठेऊन.
मंगलाबाईंनी केरवारे करायला हाती केरसुणी घेतली तोच "पेऽपऽऽर" अशी हांक कानावर आली म्हणून त्या पुढल्या दाराकडे वळाल्या. पेपरवाल्या पोर्याने टाकलेले वर्तमानपत्र घेऊन त्या दिनकरपंतांच्या खोलीकडे वळाल्या तोच "बघूऽ!"म्हणत तेच दार उघडत पुढे झाले. मंगलाबाईंचे केरवारे झाले तरी मधल्या खोलीच्या दाराच्या चौकटीला ओठंगून उभे असलेले दिनकरपंत तसेच ताजे वर्तमानपत्र वाचत होते.
"अहो, तोंड धुताय ना? मी चहाचं बघते."
"अहो, काय हे? यात आजही काही नाही."
"कशा बद्धल म्हणताय? कांही खास आहे की काय?"
"खास म्हणून काय म्हणताय? अहो शंभर वर्षं झाली..... आणि यांना त्याचं कांहीच नाही! अगदीच तुरळक उल्लेख! काय म्हणायचं काय, याला? किती कृतघ्नता ही!
"अगं बाई! कांही विपरीत का घडलंय का कांही?"
"छे, छे, तसं विपरीत नाही कांही. पण विपरीतच की!"
"तुम्ही काय म्हणताय ते कांही समजत नाही बाई. पण असेल तसंच काही तरी. ते जाऊ देत.
.तुम्ही चहाला येताय ना?"
"चहा? तुम्हाला चहाचं पडलंय पण इथे बघा काय चाललं आहे ते. अहो, त्या संग्रामाला या वर्षी पुरती शंभर वर्षं होताहेत आणि हे, हे, यांना त्याचं सोयरसुतकही नाही. आम्ही त्या वीरांचं नीटसं स्मरणही करू शकणार नाही आहोत कां? बसाऽऽ, बसा लेको टोप्या फिरवत आणि दोंद वाढवत!" दिनकररावांचं स्वगत चालूच होते. दिनकररावांच्या या अशा चिडखोर स्वभावाची मंगलाबाईंना नेहेमीच काळजी वाटायची.
मंगलाताईची नजर अभावितपणे भिंतीवरच्या कॅलेंडरकडे गेली. त्यातला १९५७ या आंकड्याने त्यांना ठळकपणे खुणावलं आणि छंदिष्ठ दिनकररावांच्या त्या असंबद्ध उद्गारांचा त्यांना अर्थ लागला. पण त्याकडे लक्ष द्यायला त्यांना सवड नव्हती आणि दिनकररावांना टीका करायला आज एक आवडता विषय मिळाला त्यात कांही नवल नव्हतं म्हणून त्यांच्याकडेही फारसं लक्ष द्यायची गरज नव्हती. कारण ते नेहेमीचंच होतं.
नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे दिनकररावांची स्नान, देवपूजा, ध्यान ही सारी आन्हिके पार पडेतो भिंतीवरच्या घड्याळाने नवाचे टोले आणि ते त्यांच्या कचेरीकडे रवाना झाले. ते आता दीड-दोन वाजता जेवायला येतील तो पर्यंत घरातली नित्याची कामे आवरावी म्हणून मंगलाबाई पदर खोचून सरसावल्या. दिव्यांची आवस दोन दिवसावर आली होती. गौरी-गणपतीही अगदी टप्प्यावर आले होते. शाळेत जातांनाचा मनूचा चेहरा डोळ्यापुढून हलत नव्हता. तिला रवा-बेसनाचे लाडू फार आवडत. थोडे करून ठेवावेत म्हणून मनात आलं होतं. त्यासाठी थोडा रवा काढायला हवा होता. सकाळच्या मधल्या वेळेत गहू ओलावून ठेवले होते. ती पाटी घेऊन मंगलाबाई जात्यावर बसल्या.
जात्याने चार दोन गरके घेतले असतील नसतील तोच,.
"काकूऽऽऽ!" अशी हांक कानी आली आणि तिच्यातल्या आर्ततेने मंगलाबाईंच्या काळजात धस्स् झालं.
आवाज कर्व्यांच्या शकूचाच होता.
."आले गऽऽ!" म्हणत मंगलाबाई ताडकन उठल्या आणि पुढच्या दाराकडे धावल्या. दार उघडून पाहातात तो, शकूच्या खांद्यावर हात टाकून मनू अवघडल्यागत उभी.
" अगं बाई! काय झालं गं? पडली बिडली की काय ही? आणि दप्तर गं तिचं....."
" काकू, आधी आंत तर येऊ देत. सांगते सगळं..."
शकू आंत आली तशी, मनू मटकन् खाली बसली आणि दोन्ही गुडघ्यांत चेहरा लपवून हमसाहमशी स्फुंदू लागली. मंगलाबाईंना कांही कळेना. शकूने त्यांना डोळे मोठे करत कांहीसं खुणेनेच कांहीतरी सांगितलं आणि,
"अगऽऽऽ बाई. हे असंऽऽ.....माझ्या लक्षांत यायला हवं होतं गंऽ..... सकाळी ती तशी कुरकुरत होतीच बाई..... अरे देवा.....बरं झालं बाई जवळ तू होतीस म्हणून....केवढे उपकार....."
" काकू, ते उपकाराचं र्हाऊ द्यात. तुम्ही शांत व्हा. तिला बघा. मला शाळेत परत जायला हवं. मी निघू?"
" हो! जा बाई जपून. पण एक मिनिट, याचा.....शाळेत,....... वर्गात कांहीऽऽ .....?"
" नाही. तसं कुणालाच कांही कळालेलं नाही. मधल्या सुटीत आम्ही एकीला गेलो तेंव्हा हे असं झालं. मी हेडबाईंना सांगून
तिला इकडे घेऊन आले. तिचं दप्तर शाळेतच आहे. संध्याकाळी घेऊन येते."
" बऽरं. जा. जपून जा होऽ."
मंगलाबाई मनूच्या शेजारी येऊन बसल्या आणि मायेने तिच्या मस्तकावरून हात फिरवू लावल्या.
" उगी बाळा. हे असं होतंच असतं. मोठी झालीस ना! बाईला हे सोसावंच लागतं बाळा. तू न्हाणीकडे जा. मी आलेच."
मनू न्हाणीघराकडे जायला निघाली तशी मंगलाबाईनी बाजूच्या कोठीघरातल्या फळीवरून ट्रंक खाली काढली आणि त्यातल्या एका मऊसूत लुगड्याचे मोठाले धडपे फाडले. ते घेऊन त्या न्हाणीघराकडे गेल्या. न्हाणीघराकडून सगळं आवरून पुन्हा माजघरात आली तेंव्हा मनू बरीच सांवरली होती तरी रडणं पुरतं थांबलेलं नव्हतं.हुंदके चालूच होते. काय झालं आहे याची पुसटशी कल्पना एव्हाना तिला आली होती. पण मनाची अवस्था भोवंडल्यागत झाली होती.
'लाल काळ्या पंखांचा एक भला मोठा कावळा कुठूनसा झेपावतो आहे, तो त्याच्या भल्या मोठ्या पंखात गुरफटवून अलगद उचलून आपल्याला घेऊन जातो आहे आणि भुताच्या टेकडीमागील अंधार्या दरीत ढकलून देणार, तिथून रांगत रांगत आपण पुन्हा घरी येणार,...कधी?.....किती दिवस?.....एक?...दोन?.....कदाचित चारही !...’
मनातल्या वावटळीसारख्या घोंघाव्यानं घशात आवंढा अडकला होता; स्वत:वरच चिडली होती. माजघराच्या बाजूच्या सोप्यालगतच्या चिंचोळ्या खोलीकडे ती आपसुक गेली आणि अवघडून बसून राहिली. एरवी फारशी वापरात नसलेली ती खोली कधी वापरली जायची हे तिला ठाऊक होतं. मंगलाबाई पुन्हा तिच्या समोर आल्या आणि कोठीघरातून आणलेली घोंगडी आणि एक धुवट परकर-पोलके मनूकडे भिरकावले, तेंव्हा त्यांचेही डोळे झरत होतेच. ते पाहून तर मनूला पुन्हा उमाळा आला. एक मोठी किंकाळी पोटातून बाहेर येते आहे की काय असं वाटायला लागलं. पुन्हा तोच आवंढा घशात अडकून राहिला.
" पुरे. तू जरा पड आता. दमली असशील. स्वैपाकाचं बघायला हवं मला. हे जेवायला येतीलच तासाभरात. त्याआधी व्हायला हवं सारं. नाही तर पुन्हा शंखनाद होईलच..... तो कांही चुकणार नाही..." आईचे तुटक तुटक शब्द तिला ऐकू आलेही आणि नाहीही.
मंगलाबाई पुन्हा अंघोळ करून स्वयंपाकाच्या ओट्याकडे वळाल्या तशी मनूने फारसा आवाज होणार नाही अशा बेताने तिची खेळाची ट्रंक पुढे ओढली आणि उघडून बसली. काय नव्हतं त्यात! कचकड्याचे वाघ सिंह, जपून ठेवलेले गेल्या पोळ्याचे मातीचे बैल, पसा भर कवड्या, ओंजळभर सागरगोटे, जवळपास तितक्याच कांचेच्या बिल्लोरी गोट्या, एक काचेचं भिंग, एक तुटकी हस्तिदंदी फणी, भातुकलीची भांडी, भावलीच्या लग्नाचा पसारा, त्यातले इवलाले कपडे, दागीने, सजावटीच्या झिरमोळ्या, कलाबतू, मोरावर बसलेली पण आता रंग उडालेली मातीची शारदा, आणि बरंच बरंच कांही. या सार्यावरून पुन्हा पुन्हा हात फिरवतांना मनू जराशी गुंगली. अचानक कांहीतरी आठवल्य़ागत मनू एकदम दचकली. भितीवरल्या फळीकडे नजर गेली. 'ती' तिथेच होती. ताडकन् उठत मनूने कोपर्यातली घडवंची पुढे ओढली, तिच्यावर उभे राहात तिने फळी वर ठेवलेली दीड-दोन वितीची एक लाकडी ठकी खाली काढली. तिच्यावरली धूळ परकराच्याच शेवाने झटकली आणि तिला उराशी कवटाळत तिथेच घडवंचीवर बसून राहिली. शांत, चुपचाप डोळ्यातले पाणी न खळवता. जणू ती भावली आता दूर गांवी जणार होती, कदाचित पुन्हा कधीही न भेटण्यासाठी. तशी मनू ठकीला बिलगली होती.
" काय करतेयेस गं ताईऽ? जेऊन घेतेस बाळा..?" मंगलाबाईंचा स्वयंपाक होत आला होता.
आईचा आवाज मनूला आज नेहेमीपेक्षा अधिकच मधाळ वाटला.
" कांही नाहीऽऽऽऽ! अशीच बसलेऽऽय" मनूचा स्वर अजून कातरच.
" जेऊन घेतेस? भूक लागली असेल ना गं?"
" नाही. नको. बाबा येतीलच ना एवढ्यात. त्यांच्या बरोबरच......."
मनूचा स्वर चढा आणि कडवट झालेला आणि क्षणभर एक भयावह स्तब्धता त्या घराच्या पोकळीत भरून राहिली. मनू एकटक हातातल्या ठकीकडे पाहात होती पण तिच्या डोळ्यात नेहेमी असायची तशी ममता, मार्दव नव्हतं. उलट एक प्रकारची कृद्धता, चीड त्यातून बाहेर पडू पाहात होती.
मंगलाबाईंनी मनूचं सगळ्या जेवणाचं ताट वाढलं. एका हातात ताट, दुसर्या हातात पाण्याचं लोटी-भांडं घेतलं आणि त्या मनूच्या खोलीच्या दारापाशी आल्या.
"चल. ऊन ऊन जेऊन घे."
"नकोय मला." मनूच्या आवाजात हा असा उद्धटपणा पूर्वी कधी दिसला नव्हता.
"अगं असं काय करतेस. भूक लागली नाही? हेही येतीलच एवढ्यात. त्यांचा आणि काय तमाशा होतोय देवजाणे हे पाहून. तू जेऊन घे आणि ताट-वाटी मागल्या दारी घेऊन जा. मी पाणी घालते......." मंगलाबाईंचं वाक्य अजून पुरं झालंही नाही तोच,
"नक्कोय म्हणून सांगतेय नाऽऽऽऽ! नक्कोय मला ते जेवण बिवण" म्हणत मनूनं पुढे होत त्यांच्या हातातले ताट हाताच्या फटकार्याने उधळून लावले.
"काऽऽर्टेऽऽऽ!" असं किंचाळत मंगलाबाई मनूच्या अंगावर धावल्या आणि उगारलेला हात तिच्यावर टाकण्यापूर्वी शिळा झाल्यागत थबकल्या, एक हंबरडा फोडत मटकन् खाली बसल्या. दोघींच्याही मनावरच्या ताणाचा कडेलोट झालेला होता.
"अरे, काय चाललं आहे हे? काय प्रकार आहे हा?"
मधल्या दारातून आत येणार्या दिनकररावांच्या दिवाळीतला सुतळी फटाका फुटावा अशा गर्जनेने दोघींचाही श्वास आतल्या आतच अडकला. भयचकित झालेल्या हरिणी-पाडसागत दोघींचे डोळे दिनकरावावर खिळून राहिले.
पलिकडल्या भिंतीपाशी ते रिकामे ताट पालथे पडलेले, त्यात कांहीवेळापूर्वी वाढलेले अन्न जमिनीवर इतस्तत: विखुरलेले, घरंगळत गेलेल्या लोटीतील पाण्याचा थारोळा मधल्या खांबापर्यंत गेलेला, मनू उभी असलेली ती खोली, रडून रडून लाल झालेले डोळे पलथ्या मनगटाने पुसू पहात असलेली मनू, खोलीच्या दारात अजूनही मटका मारून बसलेल्या आणि गुडघ्यात मान घालून स्फुंदणार्या मंगलाबाई या सार्या चित्राचा अर्थ उमगायला दिनकरावांना पांच एक मिनिटे लागली. आणि जसा मनात तो उलगडा झाला तसे तरा तरा मनूजवळ गेले. छातीशी गट्ट कवटाळत तिला घेऊन ते बाहेर आले आणि त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.
"तुमचा हा बावळटपणा पुरे झाला आता. घ्या ते आवरून घ्या आणि जेवणाची पाने घ्या. हे असे डोळे फाडून माझ्याकडे बघत राहू नका. मी पाने म्हणालो. पान नाही. आमची दोघांचीही पाने घ्या. तुम्ही नंतर बसा हवं तर. आणि होऽऽ जिकडे तिकडे डंका वाजवत फिरू नका याचा. निव्वळ निसर्ग आहे हा. जेवणं झाल्यानंतर दुपारी तुम्ही त्या प्रीतिपाखर मध्ये घेऊन जा मनूला आणि येता येता त्या पारापसल्या कापडाच्या दुकानात जा. ओळखतो तुम्हाला तो. मनूसाठी चार दोन चांगल्या वॉयलच्या साड्या आणि काय पोलक्याची छिटं बिटं घेऊन या."
"अहो,....पण......त प्रीतिपाखर......म्हणजे......."
म्हाईताय मला. तुम्ही ज्याला मिशनरी मडमांची शाळा म्हणता तीच. तिथे डागदर कावस नावाच्या बाई आहेत. त्या तिथे प्राथमिक सेवा केंद्र चालवतात. मनूला घेऊन जा. त्या तिला नीट समजाऊन सांगतील काय सांगायचे ते. गोरे असले तरी चांगली माणसे आहेत ती. आमचा लढा होता तो राज्यकर्त्यांशी. जे चांगलं आहे ते आहेच. मनूलाही मी अशीच डागदर करणार आहे. होशील ना गं मनू!!"......"आणि हो. ते शिवाशिव, बाजूला बसणं ते तसलं कांही करू नका. मला आजिबात चालणार नाही ते. निसर्गनियम असतो. फार कांही जगबुडी होणार नाही ती तसली भाकडं पाळली नाहीत तर.
अजूनही बाबांच्या मिठीच्या दुपट्यात उबावलेल्या मनूच्या अंगावरून मोरपिसं फिरत होती.
ती मोरपिसं, सकाळी शाळेत पहिल्या तासाला बाई शिकवीत असलेल्या कवितेतल्या झुंजु-मुंजू या शब्दाचा आणखी एक अर्थ समजाऊन सांगत होती.
अरुण वडुलेकर.
प्रतिक्रिया
5 Sep 2010 - 4:25 pm | कुक
वाह
5 Sep 2010 - 6:40 pm | पैसा
तेव्हाचं वातावरण आणि बापलेकीचं भावविश्व छान उभं केलंत डोळ्यासमोर!
5 Sep 2010 - 9:44 pm | केशवपुत
छान!!!
भावस्पर्शी झुंजु-मुंजू .
6 Sep 2010 - 5:20 am | भानस
अरुणदादा, कथा आवडली. तेव्हांचा काळ आणि कालानुरूप रुढी आणि विचारसरणी अगदी छान वर्णन केली आहेस. भावस्पर्शी!!!
6 Sep 2010 - 5:42 am | शिल्पा ब
नेहमीचीच निसर्ग घटना आणि जुना काळ छान रंगवलाय.
6 Sep 2010 - 6:13 am | सन्जोप राव
लहानशी कथा आवडली. कथेला मोजकेच प्रतिसाद आले आहेत हे या कथेचे यशच मानायला पाहिजे. अरुणराव, सुमारांच्या सद्दीत हे असेच होत असते. वाईट वाटून घेऊ नका.
14 Sep 2010 - 1:47 am | भडकमकर मास्तर
सहमत...
कथा आवडली...
6 Sep 2010 - 12:31 pm | अरुण वडुलेकर
कुक, पैसा, केशवपुत, भानस, शिल्पा ब, सन्जोपराव,
प्रतिक्रिये बद्दल तुम्हा सर्वांचे आभार.
सन्जोपराव,
मार्मिक प्रतिसाद, धन्यवाद.
गालिबचा शेर तर अगदी 'दिलसे' आवडला.
6 Sep 2010 - 1:13 pm | नेत्रेश
कथा चांगली आहे पण तार्किक द्रुष्ट्या एक गोष्ट खटकली....
त्यांच्या घरी 'ती' खोली आहे, मंगलाबाईंनी मनुला (दिनकररावांच्या भीतीने ) 'त्या' खोलीत बसवले. म्हणजे त्या ही स्वतः 'तेथे' बसत असणार. ते दिनकररावांना चालते / मान्य आहे.
पण तेच मुलीच्या बाबतीत अमान्य आहे? की हेच कथेतुन सांगायचे आहे?
6 Sep 2010 - 2:44 pm | अरुण वडुलेकर
नेत्रेश,
पण तेच मुलीच्या बाबतीत अमान्य आहे? की हेच कथेतुन सांगायचे आहे?
प्रथमतः या सूक्ष्म अवलोकनाबद्दल आपले आभार.
माझे लेखन इतक्या जाणीवपूर्वक वाचले गेले/जाते ही मोठी आनंदाची बाब आहे.
आपले म्हणणे बरोबर आहे. दिनकरराव मनूच्या बाबतीत विशेष ह ळवे आहेत.
त्यांना त्या प्रथेचा भाकडपणा मान्य नाही. निदान या पुढे तरी ती प्रथा चालू राहावी
हे त्यांना मान्य नाही.
प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
6 Sep 2010 - 3:35 pm | विसुनाना
नुक्तेच 'महर्षी ते गौरी' हे पुस्तक वाचत आहे.
त्यातल्या धोंडोपंत-रधोंच्या काळाच्या आसपास घडत असावी असे वाटणारी ही कथा आवडली.
हरुणराव, लिहित रहा.
8 Sep 2010 - 3:59 pm | दिपक
कथा आवडली अरुणराव.
8 Sep 2010 - 4:26 pm | स्पा
झकास.........
13 Sep 2010 - 10:38 pm | माजगावकर
अतिशय सुंदर कथा आणि लेखन शैली!
13 Sep 2010 - 10:57 pm | मेघवेडा
कथेतले बारकावे व्यवस्थित अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले आहेत. सर्वच पात्रांचं अतिशय सुंदररित्या चित्रण केलं आहे. पात्रांना नुसता चेहराच दिलेला नाही तर त्यांची संपूर्ण व्यक्तिरेखा योग्यपणे उभी केली आहे! शीर्षकही समर्पक! सगळंच छान! आदर्श लिखाण! भावस्पर्शी आहेच! :)
13 Sep 2010 - 11:15 pm | प्रियाली
वाचताना घशात आवंढा अडकला होता. शेवट वाचून डोळ्यात पाणी आले, आनंदाने.
वर्णनाची आणि लेखनाची शैली अप्रतिम आहे.
13 Sep 2010 - 11:30 pm | प्राजु
क्या बात है!! क्लास!
13 Sep 2010 - 11:51 pm | रेवती
हा धागा नजरेतून निसटला होता.
कथा छानच!
वडीलधार्यांनीच या नको असलेल्या चाली मोडल्या कि जास्त आनंद होतो.
13 Sep 2010 - 11:54 pm | चतुरंग
अत्यंत संवेदनशील आणि चित्तवेधक लिखाण. वर्णनाची शैली आणि अनपेक्षित शेवटामुळे कथेने मनाच्या गाभ्यात सूर मारला.
फारच सुरेख कथा. जियो!
(किंचित अवांतर - तुलना म्हणून अजिबातच नव्हे परंतु रामदासांच्या ताकदीची कथा लिहिणारे अजून एक लेखक अरुण वडुलेकरांच्या रुपाने मिपाला मिळाले ह्याचा परमआनंद झाला!)
चतुरंग
14 Sep 2010 - 1:50 am | टिउ
(अवांतरासह) सहमत!
- टिउ