टाईल्स लावता घरा..... !!

जयवी's picture
जयवी in जनातलं, मनातलं
31 Aug 2010 - 2:25 am

असं म्हणतात, “घर पहावं बांधून आणि लग्न पहावं करुन” !! म्हणजे काय की घर बांधणं, लग्न समारंभ आयोजित करणं…. ही फार मोठी कामं आहेत. अगदी मान्य !! ह्या कामात खरोखरंच जीव मेटाकुटीला येतो. पण घरात टाईल्स बसवणं हे सुद्धा इतकं जिकीरीचं काम असेल असं आम्हाला परवा-परवा पर्यंत तरी वाटलं नव्हतं.

तर त्याचं असं झालं. नवीन नवीन आखातात आलो तेव्हा सगळ्या घरातल्या wall to wall गालिच्याचं कसलं कौतुक होतं !! अगदी वेगवेगळ्या कोनातून, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या लाईट्स मधे आपल्या घरचा गालिचा किती सुरेख दिसतो ह्याचं कोण अप्रूप होतं !! पण जसजशी वर्ष जायला लागली…तसतसा ह्या कौतुकाचा भर ओसरायला लागला. दुसरा गालिचा बदलून झाला तरी उसमे वो पहले वाली बात नही रही !! कौतुक तर सोडाच पण आता त्याचा चक्क त्रास व्हायला लागला. इथे सारख्या होणार्‍या धुळीच्या वादळांमुळे कितीही vacuum केलं तरी गालिच्यातली धूळ काही पूर्ण निघत काही. मग ती जमतच जाते. शिवाय ढगाळ वातावरण असलं की गालिच्याची लहर फिरते आणि लहरीप्रमाणे गालिचाही वर खाली फिरतो. पार्ट्या झाल्या की हमखास पदार्थांची चव गालिचाला हवीच असायची. कधी आमटी, तर कधी लोणचं, कधी चिकनचा रस्सा तर कधी हाक्का नुडल्स !! कोणा म्हणून कोणाला रागवायची सोय नाही आणि गालिच्याची तर काहीच चूक नाही. तर अशा विविध वासांनी, रसांनी, रंगांनी वेळोवेळी समृद्ध झालेला गालिचा किती नकोसा झाला असेल ह्याची कल्पना करा !! म्हणजे… नाही म्हणायला वेळेवारी Carpet Shampoo वगैरे चोचले सुरु होतेच. पण कंटाळा मात्र आलाच होता. त्यातून शेजारच्या बिल्डींगमधल्या दोघी-तिघी मैत्रिणींनी टाईल्स वगैरे लावून घेतल्यावर त्यांच्या घराचा झालेला कायापालट बघितल्याने तर आपणही टाईल्स बसवून घ्याव्या ही इच्छा वारंवार मनात यायला लागली. इच्छा माझ्या मनात पण त्याचा त्रास मात्र ह्यांना होत असावा. कारण जो काही खर्च होणार होता त्याचं वाढतं आकारमान इतकी वर्ष माझ्यासोबत काढल्याने ह्यांना आधीच जाणवलं होतं. पण उठता बसता जेव्हा हा विषय निघायला लागला तेव्हा ह्यांना प्रकरण झेपेनासं झालं आणि ह्यांनी शेवटी मनाविरुद्ध का होईना पण आपण टाईल्स बसवायच्या ह्यावर शिक्कामोर्तब केलं.

माझी तर लगीनघाईच सुरु झाली. आधी कारपेंटरला बोलावून घरातलं सामान सगळं dismantle करायचं, सामान हलवायचं, टाईल्सचं सिलेक्शन, टाईल्स लावणार्‍याचा शोध, खरेदी, लावून घ्यायच्या, मग पुन्हा फर्निचर assembling…… सगळं सामान पुन्हा लावणं….. आई गं…. ह्या सगळ्या विचारश्रृंखलेत मी इतकी बांधल्या गेले की मी झोपेतसुद्धा “थोडा इधर, थोडा उधर……संभालके, गिरेगा…. असली वाक्यं बरळायला लागले. तसे आमचे हे फार फार सहनशील हो…..!! असो….!!

तर माझी उडालेली लगबग बघून ह्यांनाच दया आली. “मै हू ना…..” असं प्रेमळ आश्वासन देत त्यांनी सगळी सूत्रं हातात घेतली. कारपेंटरशी बोलून वेळ निश्चित केली. तो घर येऊन बघून गेला आणि कामाचं भलं मोठं मानधन सांगून गेला. पण काम अगदी छान करुन देईन असं आश्वासनही देऊन गेला. मग त्या दिवशी गोरज मुहूर्तावर आम्ही टाईल्सच्या दुकानात प्रवेश करते झालो. टाईल्स बघत असतानाच एका पाकिस्तानी टाईल्स लावणार्‍या भल्या गृहस्थाचं तिथे आगमन झालं आणि एका ऐतिहासिक मुहूर्ताची मेढ तिथेच रोवली गेली. तो खरोखरीच भला गृहस्थ निघाला. त्याच्या मदतीने ३-४ दुकानं फिरुन आम्ही टाईल्स निवडल्या. मोहम्मद (तो भला गृहस्थ) म्हणाला की मी उद्या संध्याकाळी टाईल्स गाडीने आणून पोचवेन. बाकी सामानही घेऊन येईन. आता तुम्हाला पुन्हा इथे यायची गरज नाही. आम्ही सुखासमाधानाने घरी आलो. त्याने सांगितल्याप्रमाणे आम्हाला दुसर्‍या दिवशी रात्रीपर्यंत वेळ होता समोरचा हॉल आणि पॅसेज रिकामा करायला. दुसर्‍या दिवशी ठरवल्याप्रमाणे कारपेंटर आला. त्याने हॉलमधलं सामान dismantle केलं…आम्ही सगळं सामान आवरुन हॉल रिकामा केला. संध्याकाळी मोहम्मद सांगितल्याप्रमाणे सामान घेऊन आला. बिल्डिंगच्या खाली सामान रचून ठेवलं. खरं तर ह्यांनी त्याला सामान आत ठेवायला सांगितलं पण त्याच्या सोबत सामान उचलायला आलेला माणूस ऐकेचना. तो म्हणाला, मै सामान बाहरही रखूंगा…….अंदर आप ले जाना !! काय करणार …..त्याचं ऐकावंच लागलं. त्यावेळी माहित नव्हतं की ही एका वेगळ्याच नाट्याची नांदी होती !!

त्याने रचून ठेवलेल्या सामानावर हॅरीसने (बिल्डिंगच्या watchman ला इकडे हॅरीस म्हणतात…पण तसं म्हटलं की त्यांना खूप रागही येतो. त्यामुळे हे त्याला “सादिक” म्हणजे “मित्रा” म्हणतात. पण मला त्याच्याशी बोलताना काय म्हणायचं हे कधीच कळत नाही……. असो) एक प्लॅस्टिक अंथरुन त्याच्या त्या छोट्याशा चुकीवर पांघरुण घातलं. आम्ही आनंदाने जेवलो…आणि उरलेली आवरासावरी करायला लागलो कारण मोहम्मद दुसर्‍या दिवशी सकाळी साडे सहा वाजता कामाला सुरवात करणार होता. अचानक ११ वाजता बेल वाजली. म्हटलं इतक्या रात्री कोण…? दार उघडलं तर समोर हॅरीस ! तो बोलला, ’ आत्ताच बिल्डिंगचा मालक आला होता…चक्क ६ महिन्यांनी…आणि त्याने ते बाहेर ठेवलेलं सामान बघून विचारलं की हे काय……. मी सांगितलं की तुम्ही टाईल्स बसवताय. तर तो बोलला जर तुम्हाला टाईल्स बसवायच्या असतील तर आधीच्या टाईल्स काढून मग ह्या टाईल्स बसवाव्या लागतील.” आम्ही हे ऐकून चक्रावूनच गेलो कारण आधीच्या टाईल्स काढणं हे एक खूपच मोठं, वेळखाऊ, महागडं आणि कठीण प्रकरण होतं ज्याचा आम्ही विचारही केला नव्हता. एकतर इथले मालक वर्ष-वर्ष आपल्या बिल्डिंगकडे फिरकत नाहीत आणि आम्ही नेमकं आमचं सामान बाहेर ठेवतो काय आणि मालक येतो काय……..हं…..एकूण आमचंच टाइमिंग सॉलिड चुकलं होतं !!

मग हे म्हणाले, मी त्यांच्याशी बोलू शकतो का…तर हॅरीसने त्याचा नंबर दिला. हे त्याच्याशी बोलले तर तो म्हणाला, तुम्हाला माझ्या इंजिनिअरशी बोलावं लागेल आणि मग त्याने त्याच्या इंजिनिअरचा नंबर दिला. त्याला फोन केला तर तो म्हणाला की पहिली गोष्ट म्हणजे हे तुमचं घर नाहीये. त्यामुळे तुम्ही इथे काही करु शकत नाही आणि जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही आधी तशी परवानगी घ्यायला हवी होती. खरं तर आमच्याच खर्चाने आम्ही ते काम करत होतो तरी परवानगी न घेतल्याची चूक आमची झालीच होती. आमची चूक ह्यांनी मान्य केली…..त्याबद्दल माफीही मागितली आणि आता काय करु शकतो हे विचारलं. बाकी मैत्रिणींनी जेव्हा टाईल्स बसवल्या तेव्हा परवानगी घेतल्याबद्दल काही सांगितल्याचं मला आठवत नव्हतं. ह्यांनी मनातल्या मनात माझ्या आततायीपणाला अजून एकदा दोष देत त्याच्याशी बोलणं सुरु ठेवलं…..अर्थात ह्यांच्या त्या जळजळीत कटाक्षाकडे मी सरळसरळ दुर्लक्ष केलं. त्याचं म्हणणं असं होतं की जर तुम्ही टाईल्स बसवल्या तर जमिनीची लेव्हल वाढून सगळ्या दरवाज्यांना त्रास होईल त्यामुळे तुम्ही घरातले सगळे दरवाजे नवे करुन द्या. नाहीतर जुन्या टाईल्स काढून मगच नव्या लावा. आता आली का पंचाईत !

ह्यांनी शांत स्वर ठेवून त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की असं होणार नाही कारण आम्ही ते सगळं चेक करुनच टाईल्स आणल्या आहेत. पण तो ऐकेचना. दरवाज्याला जर त्रास झाला तर तो खरं तर आम्हालाच होणार होता आणि ती काळजी आम्ही घेणारच होतो. पण ह्याला कोण समजावणार…? शेवटी तो म्हणाला….की तुम्ही हॅरीसला एकदा दाखवा आणि मगच काम सुरु करा. “चालेल” असं म्हणून ह्यांनी फोन ठेवला. हॅरीसला टाईल्स कारपेटवर ठेवून दाखवलं …त्याला पटलं. तो गेला आणि आम्ही थोडेसे शांत झालो. मनातून थोडेसे खट्टू झालो. आधीची excitement बरीच कमी झाली होती. पण खर्च करुन बसलो होतो. आता मागे पाय घेऊ शकत नव्हतो….जायचं पुढेच होतं. गणपती बाप्पाला साकडं घालून झोपलो. झोप मात्र येत नव्हती. सकाळी डोळा लागला आणि लगेच उठायची वेळ झाली.

ह्यांचं ऑफिस होतं. मी आणि पिल्लु घरी असणार होतो. त्यामुळे ह्यांना जायच्या आधी कामाची सुरवात बघून जायचं होतं. बरोबर साडे सहाच्या ठोक्याला मोहम्मद आपल्या एका साथीदारासोबत कामाला हजर झाला आणि १५ मिनिटात कामाला सुरवातही केली. रात्री झालेल्या एपिसोडची कथा त्याला सांगितल्यावर त्याने अगदी आत्मविश्वासाने सांगितलं की “माफी मुश्किल”……म्हणजे “काहीही प्रॉब्लेम होणार नाही”. हे त्या दिवशी फक्त शरीरानेच गेले ऑफिसमधे.

इकडे ह्याचं काम सुरु झालं. घराच्या बांधणीचं कुठलंही काम असो……मला सगळं मनापासून बघायला आवडतं. ओल्या सिमेंटचा वास, कारागिरांचे चालणारे कसबी हात आणि शून्यातून साकारणारं ते शिल्प….ह्याचं मला नेहेमीच अप्रूप वाटत आलंय. त्याचं काम बघून मी आदल्या दिवशी झालेला सगळा मनस्ताप पार विसरले. मी आणि माझं पिल्लु दोघेही त्यांची किमया बघत होतो. हेच काम मी भारतातही करताना बघितलंय. पण इथे असलेली नवनवीन उपकरणी, सोयी ह्यामुळे बघितलेलं काम सुद्धा नवं वाटत होतं. त्या दोघांचं एकमेकांमधलं understanding इतकं जबरदस्त होतं की त्यांना एकमेकांशी बोलायची सुद्धा गरज नव्हती. मोहम्मद ला काय हवंय हे त्याच्या assistant, चौधरी ला न सांगताच कळायचं. एखाद्या मशीनसारखे त्यांचे हात चालत होते. Tiles Adhesive चं मिश्रण तर त्याने चक्क Hand Blender सारख्या उपकरणाने केलं. एक मस्त proportion तयार झालं. मग त्याने जमीनीवरचा गालिचा काढून, जमीन स्वच्छ झाडून घेतली आणि सिमेंटचं मिश्रण पसरुन त्यावर एकेक टाईल्स बसवायला सुरवात केली. ते सिमेंट पसरवायचं Tool सुद्धा वेगळंच होतं. त्याला दाते होते. त्यामुळे सिमेंट पसरवताना सुरेख waves तयार होत होत्या. अगदी रांगोळीसारखी नक्षी दिसत होती. त्यामुळे त्यावर टाईल्स अगदी पक्क्या बसत होत्या. टाईल्स कापायसाठी त्याने जे मशीन आणलं होतं त्यामुळे अगदी लोण्यातून सुरी फिरवावी इतक्या सहजतेने टाईल्स कापल्या जात होत्या. मला तर हे सगळं बघून अगदी फोटोच काढावेसे वाटत होते….पण माझ्या अती उत्साहाला माझ्या पिल्लानेच रोखलं.

एका रेषेत आणि एकाच पातळीवर टाइल्स लावण्याचं त्याचं कसब वाखाणण्यालायक होतं. शिवाय सगळं काम इतक्या शांतपणे करत होता की आपण इतकं creative काम करतोय ह्याची त्याला कल्पनाही नसावी. टाईल्स बसवून झाल्यावर त्याने स्कर्टिंग केलं. सगळं पुन्हा झाडून काढलं. मग चौधरी ला “शरबत” बनवायला सांगितलं. शरबत म्हणजे White Cement आणि पाण्याचं मिश्रण. ते थोडंसं घट्टसर मिश्रण त्याने सगळीकडे ओतलं आणि mop ने सगळीकडे पसरवलं…..चांगलं ३-४ वेळा. त्यामुळे टाईल्स च्या gap मधे अगदी आतपर्यंत ते सिमेंट गेलं. त्यानंतर ५ मिनिट थांबून ओल्या स्पंजने सगळी फरशी हलकेच पुसून काढली. थोडं पाणी वाळल्यावर White Cement ची पावडर एका कपड्याने सगळ्या gaps मधे भरत गेला. अशी प्रत्येक गॅप दोघांनी मिळून भरली आणि छोट्या कपड्याने पुसत गेले. एकदम झकास चकचकीत फरशी तयार झाली. ते सगळं बघून आम्ही इतके excited होतो की आता हॅरीस आल्यावर काय होणार वगैरे प्रश्नच विसरुन गेलो. इतकी छान फरशी बघून तो नक्कीच खुश होणार होता.

बरोबर साडे नऊला तो आला. वाटलं होतं तसाच खुश झाला. दरवाजे वगैरे पण अगदी विनातक्रार उघडत होते. तो गेला. मी लग्गेच ह्यांना फोन करुन सगळी बातमी दिली. ह्यांनी पण सुटकेचा निश्वास सोडला. १२.३० ला हॉलचं काम संपवून मोहम्मद गेला. आता दोन्ही बेडरुमसाठी तो दुसर्‍या दिवशी सकाळी येणार होता. तो गेल्यावर आम्ही आंघोळी, जेवणं आटोपली तेवढ्यात कारपेंटर बाकीचं सामान dismantle करायला आले. सगळं होईस्तोवर हे आलेत. मग सगळ्यांनी मिळून सामान सगळं हॉल मधे आणलं. तोपर्यंत रात्र झाली होती. साधारण ८ च्या सुमारास हॅरीस पुन्हा आला. म्हणाला की इंजिनिअर बघायला येतोय आणि त्याने बघेपर्यंत तुम्ही काम सुरु करायचं नाही असं त्याने सांगितलंय. झालं……… पुन्हा एकदा टेन्शन ! टाईल्स लावल्याचा कुठलाच आनंद उपभोगू द्यायचा नाही असं त्या इंजिनिअर ने पक्कं ठरवलं होतं. मग करायचं काय…. ! हे म्हणाले, आपण सगळं खरं खरं सांगून टाकूया. त्याला येऊन बघू दे……..म्हणजे त्याचं त्यालाच कळेल की काम व्यवस्थित झालंय म्हणून. पण तो म्हणाला की नाही… असं करु नका कारण त्या लोकांचे इगो फार मोठे असतात. नको म्हटलं असताना सुद्धा काम केलंत येवढी गोष्ट सुद्धा त्यांना चिडायला पुरेशी होईल. मग हॅरीसनेच त्यावर उपाय सांगितला. तो म्हणाला की हा माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. प्लीज…….माझ्यासाठी, मी म्हणतोय तसं करा. मग त्याने त्याचा प्लॅन सांगितला आणि इथे सुरु झालं नाट्य…..!! ढॅण्‌टॅढॅण…….!!!!!!

नाटकाची तिसरी घंटा म्हणजे हॅरीसचा एक missed call असणार होता. म्हणजे तो इंजिनिअर बिल्डिंग मधे दाखल झालाय ह्याचा तो सिग्नल असणार होता. मग तो इंजिनिअर सोबत वर येऊन बेल वाजवणार…….आम्ही दार उघडायचं नाही. पुन्हा एकदा बेल वाजेल…….तरीही उघडायचं नाही. मग तो इंजिनिअरला घेऊन पहिल्या मजल्यावरच्या एका रिकाम्या घरात घेऊन जाईल आणि कारपेटवर ती टाईल ठेवून दाखवेल की दारांना काहीही त्रास होत नाहीये. हे जर त्याला पटलं तर ठीक नाही तर हॅरीस फोन करुन, आमच्याशी बोलून………आमच्या घरी येऊन झालेलं काम त्याला दाखवणार होता. सगळं ठरलं.

इंजिनिअर ऑफीसमधून निघालाय हे कळलं तेव्हा आमच्या घरी कारपेंटर बाकीचं सामान dismantle करत होते. ते बाहेर जाईपर्यंत आम्ही अगदी बेचैन होतो. पण काम करवून घेणंही तितकंच गरजेचं होतं. कारण … उद्या सकाळ…..साडे सहा….. मोहम्मद !

ते गेले तेव्हा जाणवलं की खूप भूक लागलीये. माझा सैपाक तयारच होता. अगदी चुपचाप जेवणं उरकली. तेवढ्यात हॅरीसचा missed Call आला. म्हणजे तो इंजिनिअर बिल्डींग मधे आला होता. एकदम टेन्शन आलं. आम्ही हॉल आणि किचन मधला दिवा मालवला आणि बेडरुम मधे गुपचूप बसलो. शांतता अगदी सहन होत नव्हती. एकमेकांच्या श्वासाचा पण आवाज मोठा वाटत होता. धडधड वाढत होती. खोकलू नका, उगाच फिरु नका, मोबाईल बंद करा…….अनेक सूचना सुरु होत्या. वेळ जाता जात नव्हता. मनात बाप्पाला घातलेल्या साकड्याची आठवण करुन देणं सुरुच होतं. तेवढ्यात बेल वाजली. श्वास रोखल्या गेला. पुन्हा दुसरी बेल वाजली. आम्ही काही दरवाजा उघडला नाही. बाहेर पुन्हा एकदा शांती झाली. आता काय….! तेवढ्यात ह्यांचा मोबाईल वाजला……… अनोळखी नंबर…..पुन्हा एकदा टेन्शन…..फोन उचलायचा की नाही ? शेवटी आपोआपच बंद झाला. २०-२५ मिनिटं कशी गेली आमचं आम्हालाच माहीत. मग पुन्हा बेल वाजली. आता…. दार उघडायचं की नाही ह्या विचारात असतानाच पुन्हा बेल वाजली. मग टकटक झाली. मग मात्र हे दार उघडायला गेले. झोपेत असल्याची acting करत दार उघडलं. समोर हॅरीस ! तो म्हणाला, तुम्ही झोपला आहात का? तर हे बोलले, अरे आम्ही तुझ्याच नाटकात आहोत. आता तूच सांग काय करायचं ? तो हसला….म्हणाला……… माफी मुश्किल…..मी त्याला इकडे आणलं……तुम्ही दार न उघडल्यामुळे मी ठरल्याप्रमाणे खाली घेऊन गेलो आणि त्याला दाखवलं. त्याला ते पटलं आणि तो म्हणाला की करु दे त्यांना टाइल्स चं काम. आई गं……….. त्याचे ते शब्द ऐकून जीव भांड्यात पडला…. अगदी धन्य धन्य झालं ! बाप्पाला आम्ही घातलेलं साकडं आठवत होतं म्हणायचं

अतीव आनंदाने आम्ही बाकीचं काम केलं. दुसर्‍या दिवशी मोहम्मद ने तितक्याच समरसतेनं आपलं काम चोख बजावलं…….कारपेंटरनेही मनापासून काम केलं आणि आम्हाला उपकृत केलं. आता आम्हाला पुन्हा उत्साह आला आणि त्याच भरात सगळी आवरासावरी झाली. कचरा बाहेर टाकताना जे कोणी घरात डोकावले त्यांनी टाईल्सचं केलेलं कौतुक ऐकून मनातून अगदी गहिवरुन आलं…..वाटलं…. ह्याच साठी केला होता अट्टाहास !

इति टाईल्स पुराण्‌म समाप्तम्‌ ।

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

31 Aug 2010 - 10:11 pm | संदीप चित्रे

एकंदर टाईल्सपुराण सस्पेन्स थ्रिलरप्रमाणे रंगलं तर !
फोटू असते तर बघायला आवडले असते :)
--------
तुझ्या लेखामुळे माझी 'चक्कर कथा' आठवली :)

शिल्पा ब's picture

31 Aug 2010 - 9:19 am | शिल्पा ब

छान लिहिलंय...पण इतका त्रास tiles बसवायला !! असो.

सहज's picture

31 Aug 2010 - 9:25 am | सहज

:-) धन्य!!!

छान लिहले आहे.

अवांतर - Parquet Flooring करायला परवानगी, वेळ, खर्च, टाईल फिक्सींग (मॅच फिक्सींगसारखे) इ तुलना?

स्वाती दिनेश's picture

31 Aug 2010 - 9:58 am | स्वाती दिनेश

लिहिलं छान आहे पण ते सगळं नाट्य अनुभवताना किती टेन्शन आले असेल याचीही कल्पना आली. शेवटी एकदाचा हिरवा झेंडा मिळूम काम पूर्ण झाले याचा आनंद मोठा असेल ना?
स्वाती

जयवी's picture

31 Aug 2010 - 6:56 pm | जयवी

अगदी अगदी :)

मस्त कलंदर's picture

31 Aug 2010 - 10:22 am | मस्त कलंदर

माझ्याही हॉलमधल्या टाईल्स बदलायच्या होत्या. खरंतर हा तळमजल्यावरचा फ्लॅट बिल्डिंग बांधली जात असताना स्टोअररूम म्हणून वापरला होता. त्यामुळे काही टाईल्स तुटल्या होत्या आणि जमीन थोडी वरखाली होती. घर घेण्या आधीच बिल्डरने हे सगळे बदलून देतो असे सांगितले होते. त्यामुळे जेव्हा त्याचे कामगार आले तेव्हा मी सोसायटीत याची कल्पना दिली नव्हती. काम चालू झाले आणि सोसायटीतले काही नतद्रष्ट येऊन "बिल्डर कोण आला हे काम करणारा ? सोसायटीला हे काम पसंत नाही. आताच्या आता बंद करा" असे म्हणू लागले.
मी शहाणपणा इतकाच केला होता की सोसायटी-बिल्डर, म्हाडा-सोसायटी (बिल्डिंग पुनर्विकसनामधली आहे) अशी सगळी जी काही अ‍ॅग्रीमेंट्स माझ्या बँकेने मागवली होती , ती त्यांना देण्या आधी पूर्ण वाचली होती. त्यातल्याच एका क्लॉजमध्ये 'बिल्डींगमध्ये कोणत्याही बांधकामास सोसायटीमला परवानगी नाही, मात्र builder has irrevocable rights of any construction' असे लिहिले होते. त्यामुळे त्या लोकांना मी नम्रपणे(?) "तुमचा अभ्यास कमी पडतोय. मोठे व्हा" असे सुनावले. नंतर कुणीच तिकडे फिरकले नाही. :)
मात्र कामगार कसे काम करत आहेत हे पाहण्याचा लुत्फ न उठवता मी आदल्या रात्रीचे राहिलेले "आनंदी-गोपाळ" आणि नंतर मोडकांची तिढा वाचत बसले होते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Aug 2010 - 11:37 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पहिला परिच्छेद वाचून आधी क्रमशः नाही ना पाहिलं! म्हटलं जयवीताईलाही लागण झाली असं नको!! जयवीताई, टाईलपुराण आवडलं, मस्त लिहीलं आहेस. फोटो दाखव ना आता नवीन, चकचकीत घराचा.

मकीचं "मोठे व्हा" वाक्य शॉलेट्ट आवडलं!

स्वाती२'s picture

31 Aug 2010 - 6:52 pm | स्वाती२

मस्त लिहिलय!

धन्यवाद दोस्तांनो :)

पिल्लाचं ऐकून फोटो न काढल्याचं मात्र आता दु:ख होतंय. आता गणपतीसोबत काढून पाठवेन फोटो :)

"मोठे व्हा" खरंच जबरी :)

कानडाऊ योगेशु's picture

31 Aug 2010 - 8:07 pm | कानडाऊ योगेशु

टाईलपुराण आवडले.
तुमचा घरमालक देवमाणुसच म्हटला पाहीजे.
आमचा घरमालक/मालकीण घरामध्ये साधा खिळासुध्दा ठोकु देत नाहीत आणि इतर काही अडचण आलीच तर सरळसरळ "आप ही देख लो" (घरमालक मुसलमान आहे.) म्हणुन परस्पर वाटेला लावतात.

-(भाडेकरु) योगेशु

पैसा's picture

31 Aug 2010 - 8:21 pm | पैसा

खरंच हो. आमचा तर शॉक येणारे प्लग सुद्धा बदलू देत नही.

चतुरंग's picture

31 Aug 2010 - 8:27 pm | चतुरंग

ही चेष्टा असेल असे समजतो - जर तसे नसेल तर मात्र दुर्लक्ष करु नये - ही अतिशय गंभीर बाब आहे आणि मोठा अपघात होऊ शकतो! तातडीने योग्य ती उपाययोजना करा.

(४२०वोल्टचा झटका घेतलेला)चतुरंग

पैसा's picture

1 Sep 2010 - 12:45 am | पैसा

खरंच चेष्टा नाही. पण त्यात भानगड अशी की भिंतीतले वायरींग असल्यामुळे आम्ही परस्पर आणलेल्या इलेक्ट्रिशियन्सना पण काही समजत नाही. अर्थिंग आहे असं म्हणतात. पण शॉकचं कारण कोणी सांगू शकत नाही. सध्या "त्या" दोन्ही प्लगना काळ्या चिकटपट्ट्या लावून ठेवल्या आहेत.

मिसळभोक्ता's picture

1 Sep 2010 - 2:29 am | मिसळभोक्ता

माझ्या मते ४८० वोल्ट इंडस्ट्रियल पॉवर म्हणून येते (किंवा वॉशर / ड्रायर साठी).

चतुरंग's picture

1 Sep 2010 - 8:33 am | चतुरंग

ते गणित असे आहे -
इंडस्ट्रिअल सप्लाय हा फेज टु न्यूट्रल २७७ वोल्ट असतो आणि फेज टु फेज ४८० वोल्ट असतो (गुणक २ नसून १.७३ असतो - टॅन १२० डिग्री)
तसेच घरातला सप्लाय हा फेज टु न्यूट्रल २४० वोल्ट असतो आणि फेज टु फेज ४१५ वोल्ट असतो
त्यातला मी ४१५ वोल्टचा झटका खाल्ला होता, संपता संपता राहिलो होतो! :( (४२० हा नंबर पेश्शल असल्या कारणाने तो वापरला इतकेच ;) )

(ऑलमोस्ट 'चपला' घातलेला)चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2010 - 9:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो मिभोकाका, भारतातला प्रसंग असणार हा! घरातला सप्लाय २३० व्होल्ट्स, ५० हर्ट्झचा असला पाहिजे. पण तो तसा खरंच असतो का??

लेख एकदम झां'टाईल'मॅटिक झालाय! ;)

(कितीतरी लोक, "घरात 'स्टाईल्स' बसवून घेतल्यात" असे बोलताना ऐकले आहेत! ;) )

(स्टाईलिश्)चतुरंग

योगेश...देवमाणूस ....... अरे अरबी लोक कुठल्या कॅटेगरीत मोडतात हे अजून तरी कळलेलं नाहीये ;)

धन्यु स्टाईलिश चतुरंगा :)

अरे भारतवारी, नंतरचा हँगओव्हर आणि मग हे स्टाईल पुराण ......ह्यामुळे जमलंच नाही काही लिहिणं. आता बघूया.

मदनबाण's picture

1 Sep 2010 - 5:46 am | मदनबाण

मस्त लेखन... :)

अनिल २७'s picture

1 Sep 2010 - 10:43 am | अनिल २७

>>तेवढ्यात ह्यांचा मोबाईल वाजला……… अनोळखी नंबर…..पुन्हा एकदा टेन्शन…..फोन उचलायचा की नाही ? शेवटी आपोआपच बंद झाला. २०-२५ मिनिटं कशी गेली आमचं आम्हालाच माहीत. मग पुन्हा बेल वाजली. आता…. दार उघडायचं की नाही ह्या विचारात असतानाच पुन्हा बेल वाजली. मग टकटक झाली. मग मात्र हे दार उघडायला गेले. झोपेत असल्याची acting करत दार उघडलं. समोर हॅरीस ! तो म्हणाला, तुम्ही झोपला आहात का? तर हे बोलले, अरे आम्ही तुझ्याच नाटकात आहोत. आता तूच सांग काय करायचं ? तो हसला….म्हणाला……… माफी मुश्किल…..मी त्याला इकडे आणलं……तुम्ही दार न उघडल्यामुळे मी ठरल्याप्रमाणे खाली घेऊन गेलो आणि त्याला दाखवलं. त्याला ते पटलं आणि तो म्हणाला की करु दे त्यांना टाइल्स चं काम. आई गं……….. त्याचे ते शब्द ऐकून जीव भांड्यात पडला…. अगदी धन्य धन्य झालं ! बाप्पाला आम्ही घातलेलं साकडं आठवत होतं म्हणायचं

= हॅरिसने बनवल तुम्हाला..

जयवी's picture

1 Sep 2010 - 11:33 am | जयवी

अनिल....... हो रे.......... असंही असू शकतं :)

पण नाही..... आमच्याशी छान पटतं त्याचं.....तो कशाला देईल त्रास !