तो: एक विचारु ?
ती: ह्म्म.. विचार की..
तो: तिच्या गावी जातोय तर एकदा भेटेन म्हणतोय..
ती:( कातर,व्याकूळ झालेले डोळे लपविण्यासाठी मान फिरवून ) बघ. म्हणजे ठरव तूच !
तो: एकदा भेटूनच येतो.
ती: परवा सकाळी येशील नं घरी?
तो: हो.
तो जातो. ही सैरभैर. ही भेटण्याआधी ती याच्या आयुष्यात होती. लाटेसोबत आलेल्या शिंपलीसारखी. दुसर्या लाटेबरोबर निघूनही गेली....हिला त्या जखमा दिसल्या तेव्हा दातओठ खाऊन जिवाच्या कराराने त्या पुसण्यासाठी किती झगडली ! आणि आज पुन्हा तो म्हणतोय............
रात्रभर कूस बदलत आभाळातल्या चांदण्या मनात टोचवून घेत राहिली. चांदण्याही मग हक्काने टोचत राहिल्या. पहाटे बागेतल्या गवताबरोबर हिच्या उशीवरही दव पडलं होतं.
आजचा दिवस नि रात्रही जायची आहे अजून.
मनातल्या डोहावर कितीतरी गोष्टी तरंगत राहिल्या. निळसर गुलाबी रंगाचे कागद, अत्तराच्या कुपीचे हरवलेले झाकण, चंद्रलिपीतली अक्षरे नि त्याला चिकटलेली मोरपिसं ...!!!
रात्र पुन्हा गढूळली. क्षितिजावर रेंगाळणारे ढग गाफिल क्षणी मनात वस्तीला आले. आणि तो पण आला....
खात्री नव्हती ? होती की. तरीपण..काय...तिच्या मनात चाललंय तरी काय???
<"दारी उभा गे साजण
नको त्याच्यापुढे जाऊ"
दुखले का ? की संताप आहे हा ?
"त्याने यात्रेत भेटल्या
कोण्या पोरीच्या देहाला
दिले आभाळाचे बाहू"
ढग बरसतील नं आता? प्रलय येणार... बघू त्याच्या चेहर्याकडे? ऊन असेल की सावली तिथे?
" हात नाहीत गं त्याला
उभा अंधारी साजण "
मी पाऊल टाकू ? पहिलं ?
तोच येतोय पुढे!
मूठीत काय त्याच्या ? ओंजळ पुढे करतेय मी..
चाफा ! पहिल्या भेटीत मी त्याला दिलेला...!!!!
भरून आलेल्या आभाळाला एक गार झुळूक भेटली..पाऊस !
" हात नाहीत गं त्याला
उभा अंधारी साजण
तिने जीव दिला तरी
त्याने वाहत्या पाण्याचे
इथे आणले पैंजण..."
जिंकली की ! आता पाऊस थांबलाय. पहाट केशरी दवात भिजतेय्....चाफा नव्या गंधाने दरवळतोय !
( लेखातील कवितेचे कवी- ग्रेस)
प्रतिक्रिया
5 Aug 2010 - 8:36 pm | अर्धवट
>>( लेखातील कवितेचे कवी- ग्रेस)
असं होय, आम्हाला लेखच ग्रेसांचा वाटला.
5 Aug 2010 - 8:57 pm | शुचि
सुंदर!
अतीव प्रेमाबरोबर भूतकाळही येतो प्रेमिकाचा आणि छळतो.
फार सुंदर लिहीलय.
5 Aug 2010 - 9:26 pm | मुक्तसुनीत
लेखाचे शीर्षक वाचताना इंग्रजी/मराठी अश भेसळ करून वाचण्याची सवय नडली ! :-(
5 Aug 2010 - 10:04 pm | श्रावण मोडक
अवघड आहे. =))
मुख्य प्रतिसादय: लेखन आवडले!
5 Aug 2010 - 10:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ही प्रतिक्रिया या आयडीतून अपेक्षित नव्हती. :-)
लेख आवडला.
5 Aug 2010 - 11:43 pm | ज्ञानेश...
टारझनची उणीव कोण कोण भरून काढू पाहतंय, हे बघुन डोळे पाणावले.
आणि हो,
लेख आणि कविता आवडली.
7 Aug 2010 - 7:32 am | आमोद शिंदे
मुसुंकडून ढासू प्रतिक्रिया.
आता "कुणी उधळली मुठ नभी ही रम्य सुवर्णाची... " ह्यावर मुसु काय कमेंट काय करतात ह्या प्रतिक्षेत
7 Aug 2010 - 9:25 am | llपुण्याचे पेशवेll
कुणी उधळली मुठ नभी ही रम्य सुवर्णाची.
=)) =)) =))
6 Aug 2010 - 3:25 am | बेसनलाडू
(आस्वादक)बेसनलाडू
मुसु, सांभाळा!
(काळजीग्रस्त)बेसनलाडू
6 Aug 2010 - 12:00 pm | Pain
हे हे हे
:D :D :D
5 Aug 2010 - 10:53 pm | Dhananjay Borgaonkar
हातच सोडुन पळत्याच्या माठीमागे लागण्यात काय अर्थ आहे?
6 Aug 2010 - 12:09 am | मस्त कलंदर
माया, लेख खरेच आवडला... छान लिहिले आहेस...
6 Aug 2010 - 12:24 am | मुक्तसुनीत
मी वर अत्यंत वात्रट प्रतिक्रिया दिली आहे खरी. परंतु लिखाण अतिशय आवडलेले लिहायचे राहून गेले.
तुमच्या या लेखात ज्याप्रमाणे ती ग्रेसची प्रसिद्ध कविता आहे तसाच "इजाज़त" हा सिनेमा सुद्धा आहेसे मला वाटले.
6 Aug 2010 - 11:56 am | अवलिया
इतर कुणी अशीच प्रतिक्रिया दिली असती तर तशीच राहिली असती की उडाली असती याचा विचार करत आहे.
लेखन सुरेखच !!
6 Aug 2010 - 12:06 pm | यशोधरा
मुसुंची पहिली प्रतिक्रिया आत्ता वाचली. अनपेक्षित आणि अस्थानी अशी वाटली खरीच.
माया, ती प्रतिक्रिया म्हणजे तुझ्या सुरेख लेखाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून लावलेले गालबोट आहे असे समज. :) लिहिती रहा.
6 Aug 2010 - 7:38 pm | मुक्तसुनीत
माझ्या एका प्रतिक्रियेवरचा "खल" (पन् अन्-इंटेंडेड ! ;-) ) रोचक वाटला.
6 Aug 2010 - 12:29 am | मिसळभोक्ता
रात्रभर कूस बदलत आभाळातल्या चांदण्या मनात टोचवून घेत राहिली. चांदण्याही मग हक्काने टोचत राहिल्या. पहाटे बागेतल्या गवताबरोबर हिच्या उशीवरही दव पडलं होतं.
सुंदर ! आणखी लिहा !
6 Aug 2010 - 12:50 am | चतुरंग
आवडले! :)
चतुरंग
6 Aug 2010 - 1:59 am | हर्षद आनंदी
शब्दच संपले.. आधी ग्रेस यांची कविता .. त्यात हा असा लेख!!
" हात नाहीत गं त्याला
उभा अंधारी साजण
तिने जीव दिला तरी
त्याने वाहत्या पाण्याचे
इथे आणले पैंजण..."
सार्या बंधनापलिकडले!
6 Aug 2010 - 2:08 am | अनामिक
खल्लास! खूप सह्ही लिहिलं आहे.... अजून असेच लेखन येऊ द्या!
6 Aug 2010 - 2:39 am | मेघवेडा
सुंदर!
6 Aug 2010 - 6:53 am | सहज
तीन वेळा वाचावं लागलं :-)
पुलेशु.
6 Aug 2010 - 7:55 am | राजेश घासकडवी
तुम्हाला काव्यमय लेखनाची देणगी आहे. ही वाक्यं वाचून
'रातभर दर्द की शमा जलती रही
गम की लौ थरथराती रही, रातभर
याद के चॉंद दिल मे उतरते रहे
चॉंदनी डगमगाती रही, रातभर'
या ओळींची आठवण झाली.
एखाद्या कवितेच्या रसग्रहणाची ही अनोखी, आणि आल्हाददायक पद्धत वाटली. कवितेच्या भावविश्वात लेख इतका गुरफटलेला आहे की तीपासून तो वेगळा काढता येत नाही. मात्र कवितेतला तो आपले दिलेले बाहू सोडून येतो, आणि ती गेली असली तरी तिच्या आठवांचे पैंजण वाजवत येतो... तुमच्या लेखातला तो आपले बाहू परत घेऊन आला आहे (की मुळात ठेवूनच आला नव्हता?) तेसुद्धा चाफ्याने भरलेले. कवितेतल्या ती चा संसार उध्वस्त झालेला आहे तर लेखातल्या ती चा बहरला आहे, ही तफावत या लेखात तितकीशी स्पष्ट झालेली नाही.
6 Aug 2010 - 10:37 am | अर्धवट
वा वा.. डुगडुगसरका योग का काय म्हन्त्यात तो हाच काय...
एका काव्याचं रसग्रहण तितक्याच ताकदीनं..
बाकी माया, घासुंच्या मुद्द्यात प्वाइंट हाय, कवितेचा फॉर्म ट्राय कर ना एकदा
6 Aug 2010 - 10:13 am | यशोधरा
माया सुरेख लिहिलं आहेस.
6 Aug 2010 - 11:32 am | स्वाती दिनेश
किती सुरेख लिहिलं आहेस माया,
त्या इतर धाग्यांवरच्या धुरळ्यात हे लपून गेलं होतं, आत्ता दिसलं.. खूप आवडले,
स्वाती
6 Aug 2010 - 11:35 am | निखिल देशपांडे
माया सहीच लिहिला आहेस लेख..
6 Aug 2010 - 4:03 pm | मितान
अब्बाब्बाब्बा.... मला खरंच वाटलं नव्हतं एवढे लोक प्रतिक्रीया देतील म्हणून !
शिमगा,होळी,रंगपंचमी बघत हळूच्कन टाकला होता लेख ;)
असो. अजून मी बाबी की कार्टी ते कळायला थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल... !!!
सर्व उत्साहवर्धक प्रतिक्रीयांबद्दल मनापासून धन्यवाद ! :)
6 Aug 2010 - 4:29 pm | विजुभाऊ
मला हे आठवले
I dont have any complaints about life without you
But .... its truth...Life is not LIFE; without you
6 Aug 2010 - 6:16 pm | मितान
म्हणजे विजुभाऊ,
"तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही
तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नही.... " खूप आवडतं गाणं :)
पण या लेखाची, कवितेची शेड थोडी वेगळी नाही वाटत ?
6 Aug 2010 - 6:23 pm | रेवती
छान लेखन!
अजून येउ द्या!
असे लेखन केल्यानंतर बाबी होण्यार उशीर तो कसला?;)
6 Aug 2010 - 6:35 pm | परिकथेतील राजकुमार
छान लेखन.
अवांतर :- मुसुंची प्रतिक्रीया पण भारीच. जे सगळ्यांच्या मनात आले तेच फक्त त्यांनी टंकले हे नक्की.
आजकाल लोक्स सदस्यांकडून विशीष्ठ प्रकारच्या लेखनाचीच न्हवे तर प्रतिक्रीयांची देखील अपेक्षा का ठेवत आहेत ? ;)
6 Aug 2010 - 7:08 pm | बिपिन कार्यकर्ते
थोरांनी सगळं म्हणून / कौतुक करून झालेलं आहेच. मी याहून काय वेगळं बोलणार? माया ज्ञानेश यांचे लेखन वरचेवर वाचायला मिळाले तर स्वतःच्याच नशिबाचा हेवा वाटेल.
7 Aug 2010 - 9:46 am | vikas kulkarni
prem ani tyacha bhut kal khupch chan .....
7 Aug 2010 - 10:42 am | अप्पा जोगळेकर
ज्यांना कविता कळते त्यांनी उत्तम आहे असे प्रतिसाद दिले आहेत म्हणजे चांगलीच असणार.
लेखाचे शीर्षक वाचताना इंग्रजी/मराठी अश भेसळ करून वाचण्याची सवय नडली !
+१. अस्सेच म्हणतो.
8 Aug 2010 - 12:31 am | रश्मि दाते
मायाजी आपण बाबी व्हायच्या वाटेवर आहात शुभेछा माझ्या कडुन आपल्या प्रवासा करिता
8 Aug 2010 - 1:02 am | रश्मि दाते
मायाजी आपण बाबी व्हायच्या वाटेवर आहात शुभेछा माझ्या कडुन आपल्या प्रवासा करिता