डच बालकथा - हत्ती आणि मासोळी

मितान's picture
मितान in जनातलं, मनातलं
4 Aug 2010 - 12:19 pm

एक होतं जंगल. त्या जंगलात एक हत्ती रहायचा. दिवसभर त्या जंगलात खेळत रहायचा. भूक लागली की झाडावरची फळं खायचा आणि तळं, तलाव, झरा असे जिथे सापडेल तिथले पाणी प्यायचा. हत्तीची जंगलात सगळ्यांशी मैत्री होती. तो सर्वाना मदत करायचा. त्यामुळे सर्वांचा आवडता होता.

एके दिवशी तो असाच जंगलात फिरत होता. फिरता फिरता तो जंगलाच्या दुसर्‍या टोकाला गेला. त्याला खूप खूप तहान लागली होती. म्हणून तो पाणी शोधू लागला. उन्हाळ्यामुळे बहुतेक सर्व ठिकाणचे पाणी आटले होते. काही ठिकाणी नुसताच चिखल राहिला होता तर काही तळ्यांचे डबक्यात रुपांतर झाले होते. खूप शोधल्यानंतर हत्तीला अखेर एक जागा सापडली. तिथे खड्ड्यात पाणी दिसले. हत्तीने त्यात आपली सोंड बुडविली. आणि फुर्रर्रर्र करून पाणी पिऊ लागला. एक मिनिटात सगळे पाणीच संपले ! सगळे पाणी हत्तीने पिऊन टाकले होते ! " अरेच्चा ! पाणी संपले सुद्धा ! " हत्ती मनात म्हणाला. तेवढयात त्याला सोंडेच्या टोकावर काहीतरी वळवळ जाणवली....बघतो तर काय....एक छोटीशी मासोळी पाण्यातून बाहेर पडल्यामुळे तडफडत होती. अगदी सोंडेच्या टोकावर ! हत्तीने पाहिले. मासोळीला म्हणाला " हाय, कशी आहेस ? " मासोळीला हत्तीचा खूप राग आला होता. तिचे सगळे पाणी त्याने संपवले होते नं.. " काय रे हत्तीदादा, एवढा मोठा झालास तू तरी तुला काही कळत नाही ! माझे पाणी संपवलेस. आता मी कुठे राहू ? पाण्याबाहेर तर मी जगूच शकत नाही. तुझ्यामुळे मी आता मरून जाणार ! दुष्ट आहेस तू ! " असे मासोळी खूप रागारागाने बोलली. हत्तीला खूप वाईट वाटले.आपली चूक त्याला समजली. पण त्याने मुद्दाम पाणी संपवले नव्हते. तो म्हणाला," अगं मासोळी, चुकून संपलं गं पाणी! मी तुला दुसरे पाणी शोधून देतो. चल आपण शोधूया.. "
मासोळी म्हणाली," तू खरंच मला मदत करशील ? " " हो गं हो. नक्की करेन" हत्ती म्हणाला. मग ते दोघे पाणी शोधत शोधत फिरू लागले. पाणी काही सापडेना. मासोळीची तडफड खूपच वाढू लागली. हत्तीला खूप वाईट वाटले. आपल्यामुळे मासोळीला त्रास होतो आहे हे बघून त्याला रडू आले. दोन्ही डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. टप टप पाणी जमिनीवर पडले. तो म्हणाला, " आता काय करायचं? " पाणी बघून मासोळीने टुण्णकन त्यात उडी मारली. आणि ती म्हणाली, "हत्तीदादा, हे पाणी मला थोडावेळ पुरेल. तू दुसरे पाणी शोधून ये तोवर मी इथेच थांबते. " हत्तीला गंमतच वाटली. तो पाणी शोधायला एकटाच निघून गेला.

तिथेच जवळ एका चिखलाच्या डबक्यात एक मगर होती. ती हे सगळे दुरून बघत होती. मासोळीला एकटी सोडून हत्ती निघून गेल्याचे तिने पाहिले. मासोळी बघून तिच्या तोंडाला पाणी सुटले. आज आयतीच मेजवानी मिळणार म्हणून ती खूष झाली. दबक्या पावलांनी मासोळीच्या मागे गेली नि एका घासात तिने मासोळीला गट्टम् केले ! हत्ती परत आला तर तिथे मासोळीच नाही. "आता काय करायचं?" पण तिथल्या झाडावरच्या एका धीवर पक्षाने हत्तीच्या कानात सगळे सांगितले. हत्तीला मगरीचा एवढा राग आला.. त्याने तिला उचलले नि झाडावर उलटे टांगले ! मगरीला खूप भीती वाटली. ती हत्तीला तिला झाडावरून खाली उतरवण्यासाठी विनवू लागली. हत्ती म्हणाला, " आधी ती गिळून टाकलेली मासोळी बाहेर टाक मग मी तुला खाली उतरवतो." मगरीपुढे काही पर्यायच नव्हता. तिने मासोळी खाली टाकली.

मासोळी हत्तीला म्हणाली, " तुला बघून आत्ता कुठं माझ्या जिवात जीव आला ! आता सोड बरं मला पाण्यात ! " हत्तीचे तोंड एवढुसे झाले. त्याला अजून पाणी कुठे सापडले होते ! तो म्हणाला" मी पटकन येतो. तू इथेच माझी वाट बघ." आणि तो पाणी शोधायला निघाला. इकडे झाडावरच्या धीवर पक्षाने एक झडप मारली नि मासोळीला चोचीत उचलले. पिल्लांना खाऊ मिळाला या आनंदात तो घरट्याकडे निघाला. समोर हत्ती उभा ! त्याने आपल्या सोंडेत धीवराचे घरटेच पकडले होते. त्यात धीवराची पिल्लं घाबरून ओरडत होती. धीवराला आपली चूक समजली. त्याने मासोळीला अलगद खाली ठेवले. हत्तीनेही मग घरटे जागेवर ठेवले.

त्याने मासोळीला उचलले आणि सापडलेल्या छोट्याश्या तळ्याकडे निघाला. मासोळीला ते तळे पाहून खूप आनंद झाला. तिच्या आधीच्या घरापेक्षा इथे थोडे जास्त पाणी होते. हत्तीने तिला पाण्यात सोडताच सुळसुळ पोहत ती आनंदात गिरक्या घेऊ लागली. ते बघून हत्तीला खूप खूप आनंद झाला. अखेर त्याने मासोळीला वाचवले होते !

उन्हात फिरून फिरून हत्ती खूप थकला होता. आणि त्याला खूप तहान लागली होती. त्याने समोरच्याच पाण्यात आपली सोंड बुडविली. आणि तो ढसाढसा पाणी पिऊ लागला. दोन मिनिटात तळयातले पाणीच संपले !!!! त्या तळ्यात तर खूप खूप मासोळ्या राहात होत्या. सगळ्याच्या सगळ्या हत्तीकडे रागारागाने पाहू लागल्या. हत्तीने मात्र डोक्याला हात लावला ! आता काय करायचं???

( विरंगुळा म्हणून या डच बालकथेचा अनुवाद केला आहे. बघा तुम्हालाही आवडते का कथा... ! )

बालकथाभाषांतर

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2010 - 12:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अनुवाद मस्त जमला आहे.
पण एक शंका आहे: धीवर पक्षी म्हणजे नक्की कोणता पक्षी?

मितान's picture

4 Aug 2010 - 12:34 pm | मितान

धीवर म्हणजे किंगफिशर .

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2010 - 1:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ओह! मी खंड्या हे नाव ऐकलं होतं. तुझ्या गोष्टीमुळे आणखी एक नाव समजलं.

कानडाऊ योगेशु's picture

4 Aug 2010 - 4:53 pm | कानडाऊ योगेशु

झाडावर धीवराची हाले चोच लाल..अश्या ओळी असलेली एक कविता बालभारतीत होती.
तिथेच खंड्या उर्फ धीवर उर्फ किंगफिशरची पहिल्यांदा ओळख झाली .

जिप्सी's picture

4 Aug 2010 - 12:57 pm | जिप्सी

खरच मस्त आहे गोष्ट !!!! बर्याच दिवसांनी बालकथा वाचली.

मजकूर संपादित.

rajesh84's picture

4 Aug 2010 - 1:07 pm | rajesh84

छान जमल बुआ....

मस्त कलंदर's picture

4 Aug 2010 - 1:18 pm | मस्त कलंदर

आवडली. आणि आपल्याकडच्या कथेशी साधर्म्य नसल्याने एक नवीच छान कथा समजली.
माझी भाची, तिला गोष्टी ऐकायला खूप आवडायचे. ती छोट्या शिशुवर्गात असताना तिला अलीबाबाची भलीमोठी गोष्ट पाठ झाली होती आणि मी घरी नसताना आलेल्या माझ्या मैत्रिणीला ऐकवली होती. पण मला सांग म्हटले की पठ्ठी मला आठवत नाही, तूच सांग म्हणून हट्ट धरायची. सुरूवात केली रे केली, "ही गोष्ट माहित आहे, दुसरी सांग" म्हणून हट्ट धरायची. तेव्हा नवनवीन कथा कुठून आणायच्या हीच मोठी अडचण होती. तेव्हा अशा वेगवेगळ्या भाषांतल्या कथा मिळायला हव्या होत्या. :)

अवांतरः लोकांनी समंजसपणे इतर धाग्यावरचे स्कोर्स निदान या सुंदर धाग्यावर सेटल करू नयेत.

मितान's picture

5 Aug 2010 - 11:34 am | मितान

म क ,
मला पण या गोष्टी रुचिपालट म्हणून आवडल्या. मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीतून काही बोध किंवा तात्पर्य काढण्याची भानगड यात नाही ;)

दीपक साकुरे's picture

4 Aug 2010 - 1:22 pm | दीपक साकुरे

छान अनुवाद ... मला त्या मासोळीचे नवल वाटते की एव्हडा वेळ पाण्याबाहेर राहुनही ती जिवंत राहिली..:)
अजुन वाचायला आवडेल..

जिप्सी's picture

4 Aug 2010 - 1:24 pm | जिप्सी

स्कोर्स सेटल करणे हा उद्देश अजिबातच नव्हता. समंजसपणे माफ करावे हि विनंती !

मस्त कलंदर's picture

4 Aug 2010 - 3:01 pm | मस्त कलंदर

धन्यवाद. :)

गणपा's picture

4 Aug 2010 - 1:25 pm | गणपा

आवडली.
संकलन करीत आहे. :)

डच बालकथा - हत्ती आणि मासोळी = कापूसकोंड्याची गोष्ट..

असच कहि वाटत आहे असो पण अनुवादासाठी +१ उत्तम कथा....

मितान's picture

5 Aug 2010 - 11:35 am | मितान

ही मस्त आयडियाची कल्पना सुचवलीत !
आता कापुसकोंड्याची गोष्ट डच मध्ये अनुवादित करून इकडच्या मित्रांना ऐकवते ;)

निखिल देशपांडे's picture

4 Aug 2010 - 2:05 pm | निखिल देशपांडे

सही कथा आहे..
अनुवाद छानच आहे हा..
अशा इतर काही कथा पण येउद्या

स्वाती दिनेश's picture

4 Aug 2010 - 3:05 pm | स्वाती दिनेश

माया, छानच ग,
अशा अनुवादित बालकथा येऊ देत अजून.
स्वाती

प्रियाली's picture

4 Aug 2010 - 4:47 pm | प्रियाली

त्या तळ्यात तर खूप खूप मासोळ्या राहात होत्या. सगळ्याच्या सगळ्या हत्तीकडे रागारागाने पाहू लागल्या. हत्तीने मात्र डोक्याला हात लावला !

छान छान! उद्बोधक!!

डचांकडे हत्तीच्या गोष्टी केल्या जातात याचे नवल वाटले. मला वाटायचे की ज्या प्रदेशात जे प्राणी असतात त्यांच्याच लोककथा वगैरे तयार होतात. असो. :) माझा गैरसमज असेल.

धनंजय's picture

4 Aug 2010 - 9:25 pm | धनंजय

आवडली.

मितान's picture

5 Aug 2010 - 11:39 am | मितान

सर्वांचे उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल आभार. :)

@प्रियाली,
अगं ही लोककथा नाही. अगदी १० वर्षांपूर्वी लिहिलेली बालकथा आहे. मुलांना आकर्षण असते ते सगळे प्राणी आपल्या गोष्टीत पण येतातच की...

सहज's picture

5 Aug 2010 - 12:20 pm | सहज

हे एक बोर्डबुक असेल व प्रत्येक पानावर एक चित्र कसे असेल नजरेसमोर उभे राहीले!

छान अजुन येउ दे!

बालकथेच केलेल भाषांतर फारच सुरेख झाल आहे... :)

परिकथेतील राजकुमार's picture

5 Aug 2010 - 1:19 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त साधी सोपी डोक्याला शॉट न लावणारी कथा. आवडली एकदम.