व्यसनेषु सख्यम!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
30 Jul 2010 - 7:22 pm

आज दुपारी ऑफिसातील काम उरकल्यानंतर थोडासा वेळ हाताशी होता म्हणून बऱ्याच दिवसांनी सीडी खरेदी आणि विंडो शॉपिंगसाठी लक्ष्मी रस्त्यावरच्या माझ्या आवडत्या दुकानात गेलो होतो. इथूनच मी पहिल्यांदा सीडी प्लेअर घेतला, तेव्हापासून तिथल्या सीडी, कॅसेट कलेक्‍शनच्या प्रेमात पडलो होतो. तिथली शिस्त आणि सगळं साहित्य व्यवस्थित मांडण्याची पद्धत फार आकर्षक आहे. आपल्याला हवी ती सीडी विकत घ्यायला फार सोयीचं जातं. असो.

अलिकडच्या काळात बरेच हिंदी, मराठी चित्रपट पाहायला वेळ झालेला नाही. अनेक सिनेमे घरी कॉंप्युटरच्या हार्डडिस्कवर असले, तरी ते बघणं झालेलं नाही. काही सिनेमे तर अर्धवट बघितले, पण इंटरव्हलनंतर बघायचे राहिले, ते राहिलेच. अनेक जुने, अर्धजुने सिनेमेही मी पाहिलेले नाहीत. पूर्वी घरून परवानगी नव्हती, कुठले सिनेमे बघायची त्याची अक्कल नव्हती, रत्नागिरीत फार काही बघण्याची संधी नव्हती...बरीच कारणं. बॅकलॉग बराच राहिलाय, एवढंच खरं.

हाच बॅकलॉग भरून काढण्याचे आता प्रयत्न चाललेत. त्यामुळे आज वेळ होता म्हणून थोड्या सीडी खरेदी कराव्यात, असा विचार करून दुकानात शिरलो होतो. दहा-पंधरा मिनिटांत खरेदी उरकून निघायचं होतं, पण सीडींचा खजिना पाहून रमायलाच झालं. मोझर बेअरच्या अलिकडे आलेल्या स्वस्तातल्या सीडी हे माझं पहिलं लक्ष्य होतं. पण डीव्हीडी पाहिल्या आणि त्यांच्या प्रेमात पडलो.

नव्या, जुन्या सिनेमांच्या अनेक डीव्हीडी खुणावत होत्या. माझे अलिकडच्या काळात चुकलेले अनेक सिनेमे एकत्रित उपलब्ध होते. त्यातही सर्वांत चांगल्या पॅकेजसाठी बरीच शोधाशोध केली. कमिने, वेन्सडे, देव डी, अशा एकूण सहा चित्रपटांची डीव्हीडी अवघ्या 55 रुपयांना पाहून मी थक्क झालो. अलिकडे पायरसी बोकाळल्यापासून 50 रुपयांत पाच, सहा चित्रपट की गोष्ट काही नवी नव्हती. पण ती बनावट सीडींच्या बाबतीत होती. अधिकृत, चांगल्या दर्जाच्या आणि कंपनीच्या सीडीसुद्धा एवढ्या स्वस्तात उपलब्ध असल्याची मला कल्पनाच नव्हती.
अवघ्य 55 रुपयांत सहा सिनेमे खरेदी करताना मला रत्नागिरीचे सिनेमा पाहण्यासाठीचे संघर्षाचे दिवस आठवले. तेव्हा थिएटरला तिकीट दहा रुपयांच्या आतच होते, पण तरीही घरून सिनेमा पाहायला जायला परवानगी मिळवण्यासाठी आटापिटा करावा लागायचा. "टीव्हीवर येईल तेव्हा बघ सिनेमा!' हे उत्तर ठरलेलं असायचं. मग काहीतरी कारण सांगून, बाबापुता करून परवानगी मिळवायला लागायची. नववीत असताना आईनं "थरथराट' बघायला परवानगी दिली नाही, तेव्हा तेवढा "थयथयाट' केला होता मी! दहावीच्या अख्ख्या वर्षात मी एकच चित्रपट पाहिला होता. मोठं झाल्यावर मी यंव करीन नि त्यंव करीन अशी स्वप्नं पाहायचं वय होतं ते. मी त्यावेळी मोठं झाल्यावर आपण तिन्ही थिएटरला लागलेले सगळेच्या सगळे सिनेमे दर आठवड्याला पाहायचे, असली स्वप्नं रंगवायचो. आमच्या महत्त्वाकांक्षेची झेप तेवढीच!

अनेकदा उन्हाळ्यात सार्वजनिक पूजेच्या निमित्तानं मळ्यात, मैदानात सिनेमे प्रोजेक्‍टरवर दाखवले जायचे. शेजारपाजारचा कुणीतरी जोडीदार शोधून मी ते पाहायला जायचो. टिपिकल मिथून, अमिताभ, नाहीतर जीतेंद्रचे सिनेमे असायचे. पण तरीही कुठेतरी शेणार, चिखलात, काट्यात, गडग्यावर बसून डोळे तारवटून ते सिनेमे पाहायचो. रस्त्यात बसलेलो असताना बस आली म्हणून चंबूगबाळं आवरून मध्येच उठावं लागायचं. पडद्याच्या समोरच्या बाजूला जागा मिळाली नाही, तर मागच्या बाजूनं उजव्या हातानं फायटिंग करणारा अमिताभ पाहावा लागायचा. मध्येच कुठून तरी सापबिप निघाला, तर पळापळ व्हायची. धुरळा, मातीनं कपडे खराब व्हायचं. पण "की न घेतले हे व्रत आम्ही अंधतेने' या निर्धारानं आम्ही टिकून राहायचो.
"राम तेरी गंगा मैली' पाहायला असाच कुठेतरी रस्ता तुडवत गेलो होतो. तिथे व्हिडिओवर सिनेमा होता आणि आम्ही सुमारे वीस-पंचवीस फुटांवर होतो. मंदाकिनीचं नखसुद्धा दिसणं शक्‍य नव्हतं! मग हिरमुसून परत फिरलो होतो.
मजा होती त्या दिवसांत!

आज 55 रुपयांत 6 सिनेमे, म्हणजे नऊ रुपयांना एक सिनेमा कायमस्वरूपी विकत घेताना हे सगळं आठवलं आणि फार वाईट वाटलं. आपण जिवापाड प्रेम केलेलं हे व्यसन एवढं स्वस्त आणि सहज होईल, अशी कधीच कल्पना केली नव्हती.
आपल्या आवडीच्या, अतीव प्रेमाच्या गोष्टीसाठी थोडेफार कष्ट करायला लागले पाहिजेत. सुखसोयी आयत्या मिळाल्या, तर त्यातली गंमत कमी होते, हेच खरं!

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

30 Jul 2010 - 7:33 pm | नितिन थत्ते

>>आपण जिवापाड प्रेम केलेलं हे व्यसन एवढं स्वस्त आणि सहज होईल, अशी कधीच कल्पना केली नव्हती.
आपल्या आवडीच्या, अतीव प्रेमाच्या गोष्टीसाठी थोडेफार कष्ट करायला लागले पाहिजेत. सुखसोयी आयत्या मिळाल्या, तर त्यातली गंमत कमी होते, हेच खरं!

आवडलं.

मला पूर्वीचे दिवस आठवतात जेव्हा खटपटी करून सारखे सिनेमे पहायचो. त्यावेळी आमचे आईवडील वर्षाला एखादा सिनेमा पहायचे. त्यांचे मला आश्चर्य वाटे, कसे यांना सिनेमा पहावा असे वाटत नाही.

आता मी स्वतः तीनचार महिन्यातून एखादा सिनेमा पाहतो तेव्हा ते दिवस आठवतात. बहुधा "आपण काय केव्हाही सिनेमा पाहू शकतो" हा विचारच सिनेमा पाहण्याची Urge घालवत असावा.

योगी९००'s picture

30 Jul 2010 - 7:41 pm | योगी९००

भावना मस्तपैकी उतरवल्या आहेत..

आज 55 रुपयांत 6 सिनेमे, म्हणजे नऊ रुपयांना एक सिनेमा कायमस्वरूपी विकत घेताना हे सगळं आठवलं आणि फार वाईट वाटलं. आपण जिवापाड प्रेम केलेलं हे व्यसन एवढं स्वस्त आणि सहज होईल, अशी कधीच कल्पना केली नव्हती. आपल्या आवडीच्या, अतीव प्रेमाच्या गोष्टीसाठी थोडेफार कष्ट करायला लागले पाहिजेत. सुखसोयी आयत्या मिळाल्या, तर त्यातली गंमत कमी होते, हेच खरं
मला पटतयं.. पण आनंद सुद्धा वाटला पाहिजे..कारण पैसे पण वाचले ना..अजून काही चित्रपट खरेदी करता येतील..!!!

"राम तेरी गंगा मैली' पाहायला असाच कुठेतरी रस्ता तुडवत गेलो होतो. तिथे व्हिडिओवर सिनेमा होता आणि आम्ही सुमारे वीस-पंचवीस फुटांवर होतो. मंदाकिनीचं नखसुद्धा दिसणं शक्‍य नव्हतं! मग हिरमुसून परत फिरलो होतो.

मंदाकिनीचे नख पहाण्यासारखा तो चित्रपट नव्हताच..पहिला अर्धातास चित्रपट पाहून मी थेटर बाहेर पडलो होतो (२ वेळा)..

सुखसोयी आयत्या मिळाल्या, तर त्यातली गंमत कमी होते, हेच खरं!
अगदी! घरी सगळ्या सोयी असल्या तरी शांतपणे एखादा सिनेमा पाहिलाय असे झाले नाही.
लेखन आवडले. ते वाचूनच लक्षात आले कि मीही एखादा सिनेमा पाहून किती दिवस झालेत.
मला वाटतं मागच्या महिन्यात मुलाच्या शाळेला सुट्टी लागल्यावर 'कराटे किड' थेट्रात जाउन पाहिला.
मध्यंतरी नऊ वर्षे मी मराठी सिनेमा पाहिलाच नव्हता. मग 'श्वास' पाहिला त्यातल्या प्रसंगांमुळे दोनेक दिवस रडारडी झाली. त्यानंतर एक दोन पाहिले असतील मग पुन्हा मागच्या वर्षभरात नाहीच.

मिसळभोक्ता's picture

31 Jul 2010 - 5:11 am | मिसळभोक्ता

'श्वास' पाहिला त्यातल्या प्रसंगांमुळे दोनेक दिवस रडारडी झाली.

माझ्या डोळ्यापुढे रंगाशेठ हमसाहमशी रडतायत, आणि वैनी उगी उगी म्हणून पाठीवरून हात फिरवतायत, असे चित्र उगाच चमकून गेले.

चतुरंग's picture

31 Jul 2010 - 6:04 am | चतुरंग

'श्वास' लागला हो! ;)

(हमसाहमशी)रंगा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jul 2010 - 9:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बर्‍याच दिवसांनी दिसलास रे!

छोट्या गोष्टीतून शेवटी काय मस्त लिहीलंस रे! मला लहानपणी वाटायचं मी कमावायला लागले की रोज तासतासभर फोनवर गप्पा मारत बसणार. दुसर्‍याने फोन केला तरी बाबा दोन मिनीटांच्यावर बोलूच द्यायचे नाहीत. आता फोन वाजला तरी काय संकट आहे असंच पहिले डोक्यात येतं.

आणि अनेक पिक्चर डाऊनलोड करून हार्डडिस्क भरवली आहे, पण बघायची इच्छाच होत नाही!

संदीप चित्रे's picture

30 Jul 2010 - 10:17 pm | संदीप चित्रे

काही व्यसनं अगदीच निर्व्यसनी असण्यापेक्षा बरी असतात त्यातलंच हे एक.
तुझ्या लेखामुळे खूप सिनेमांच्या आठवणी आल्या.
लिहिता रहा !

तुझा लेख वाचला आणि एका अशाच गोष्टीची आठवण झाली. 'गिरीदर्शन'चे ट्रेक्स! स्साला, त्या जमान्यात खिशात दमडा नसायचा, आणि ट्रेक करायची प्रचंड आग! वेळप्रसंगी सतीशदादाकडे, सचिनकडे उधारी करून ट्रेक्स केले. पैसे नव्हते म्हणून ढाक करायला मिळाला नव्हता तेव्हा ठरवलं होतं, नोकरी लागली की दर शनिवार-रविवार ट्रेक्स मारू! कसलं काय, मास्तरची भविष्यवाणी खरी झाली, आणि नोकरी लागली अन ट्रेक्स कमी होत गेले. गेल्या संपूर्ण वर्षांत फक्त २ ट्रेक्स! 'गिरी' बरोबर तर एक पण नाही!
सतीशदादा, सचिन, अजित रानडे, तू, गोखले मास्तर, दाढी, शेन, जय, बिट्ट्या, सरदार! सगळे हल्ली फक्त आठवणींमध्ये उरलेत!

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Jul 2010 - 7:40 am | llपुण्याचे पेशवेll

अगदी अगदी. ट्रेकला गेल्यावर पैसे कमी पडून नयेत म्हणून सकाळी घरून निघताना सायकलने जायचे, मित्राच्या घरी सायकल लावून मग तिथून सर्वजण चालत स्वारगेटाला जायचो. प्रत्येकी १-२ रुपये वाचावे म्हणून पायथ्याच्या बर्‍याच आधीच्याच स्टॉपचं तिकीट काढायचं आणि मग पुढे चालत जाऊन उरलेल्या पैशात धूर काढायचा. :) मजा यायची.

अभिजित लेख छानच.

असुर's picture

31 Jul 2010 - 5:29 pm | असुर

हा हा हा हा! खरं आहे, अगदी खरं आहे!
आम्ही कोथरूडला राहायचो. त्यामुळे तिथून सकाळी सायकलने स्वारगेट जाणं शक्य असायचं, पण ट्रेक संपवून घरी येताना ब्रह्मांड आठवायचं. यावर एक सोपा उपाय म्हणजे आम्ही भल्या पहाटे एखाद्या रिक्षावाल्या काकांना पकडायचो, अगदी गयावया करून त्यांच्या कडून स्वारगेटची लिफ्ट मिळवायचो.
आणि अगदीच पैसे द्यायची वेळ आलीच तर घासाघीस करून बसच्या तिकीटापेक्षाही कमी पैसे द्यायचो कारण रिक्षावाले काका 'बोहनी' या नावाखाली पैसे घेतल्याशिवाय जाउच द्यायचे नाहीत.

असं नव्हतं की पैसे नसायचेच! पण असलेले पैसे फार जपून वापरावे लागायचे. आणि रिक्षा वगैरेची चैन घरी मान्य होण्यासारखी नव्हतीच!
च्यायला, तेव्हा या असल्या ओढवून घेतलेल्या गरीबीतही दंगा असायचा.

अभिजित म्हणाला तसंच आहे, सुख स्वस्त झालं की त्याची किंमत उरत नाही!

--असुर

विजुभाऊ's picture

31 Jul 2010 - 10:11 am | विजुभाऊ

"सिनेमा सिनेमा " हा कृष्णा शाह ( तोच तो "शालीमार" चा निर्माता) ने काढलेला चित्रपट मला हवा आहे. कोणाकडे असल्यास सांगावे
बर्‍याच चित्रपटातील सीन्स जोडून हा चित्रपट बनवलेला आहे. चित्रपटातील सीन्स आणि त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद असा शूट केलेला आहे हा सिनेमा
कृष्णा शाह ने या बरोबरच फिल्म ही फिल्म हा एक चित्रपट बनवला होता. अर्धवट शुटिंग होऊन नन्तर कधीच पूर्ण न बनलेल्या चित्रपटातील षॉट्स घेऊन हा सिनेमा बनवला होता.
हे दोन्ही चित्रपट कोणाकडे असल्यास मला हवे आहेत

दिपक's picture

31 Jul 2010 - 10:20 am | दिपक

अभिजीतदा बरयाच दिवसानी लिहिलात लेख. बाकी व्हिडियोवर चित्रपट पाहण्याची मजा औरच होती. जॅकी श्रॉफचा ’हिरो’ पडद्यावर पाहिला होती. आजही ती बासरीची धुन ऎकली की ते सगळे डॊळ्यासमोर येते.

लिखाळ's picture

31 Jul 2010 - 12:43 pm | लिखाळ

छान.. लेख आवडला

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Jul 2010 - 1:46 pm | बिपिन कार्यकर्ते

बर्‍याच दिवसांनी दिसलात मालक. आणि जोरदार लेख. शेवटी मांडलेला विचार तर खरंच थोडा विचार करायला लावणारा.

सर्वात पहिले ..

अभिदा ..बराच लांब ब्रेक घेतलात !!

आपल्या आवडीच्या, अतीव प्रेमाच्या गोष्टीसाठी थोडेफार कष्ट करायला लागले पाहिजेत. सुखसोयी आयत्या मिळाल्या, तर त्यातली गंमत कमी होते, हेच खरं! >>>

सहमत !!

कोणे एके काळी आम्हालाही गिटारीच्या तारा खाजवायचा शौक होता ...परत सुरु करीन म्हणतो !!

निखिल देशपांडे's picture

1 Aug 2010 - 12:24 am | निखिल देशपांडे

ओ अभिजितदा बर्‍याच दिवसांनी...
लेख उत्तमच झाला आहे..
अर्धा विकेंड संपला तरीही आम्ही अजुन एकची चित्रपट पाहिलेला नाहिए हे उगाच आठवुन गेले.

धनंजय's picture

1 Aug 2010 - 6:11 am | धनंजय

प्रकटन आवडले

आपला अभिजित's picture

6 Aug 2010 - 10:04 am | आपला अभिजित

प्रतिक्रिया द्यायचे राहून गेले होते.

धागा पुन्हा वर येण्याची भीती असली, तरी धन्यवाद देण्यावाचून राहवत नाही.

मदनबाण's picture

6 Aug 2010 - 10:38 am | मदनबाण

लेख आवडला... :)