कवळा
कवळा हा श्रावणात येतो. शंकराला ही भाजी आवडते म्हणुन श्रावणी सोमवारी नेवेद्यासाठी मुगाच्या भाजीत कवळा घालण्याची प्रथा आहे. तसेच श्रावणी सोमवारी कांदा लसुण खात नाहीत म्हणुन सोमवारी केलेल्या पदार्थांत कांदा लसुण घालत नाहीत. पण इतर दिवशी ह्यात कांदा लसुण घालुन चविष्ट पदार्थ बनवता येतात.
कवळा, मुग भाजी
साहित्य :
मोड आलेले मुग १ वाटी
कवळ्याची पाने चिरुन
फोडणी : हिंग, हळद, मसाल (किंवा मिरची),
चवी पुरते मिठ
अर्धा लिंबाचा रस
गरजे पुरते पाणी
थोडी चिरलेली कोथिंबीर
थोड ओल खोबर खरवडून
पाककृती
प्रथम भांड्यात वरील फोडणी देउन मग त्यात मुग व चिरलेला कवळा टाकून ताटावर पाणी ठेउन मुग शिजु द्यावेत. मधुन मधुन भाजी ढवळायची. मुग शिजले की त्यात मिठ, लिंबाचा रस, ओले खोबरे घालून एक वाफ आणून गॅस बंद करावा.
कवळा, भेंडी आमटी
साहित्य :
कवळ्याची जूडी (पाने खुडून चिरुन घ्यावीत)
साधारण पाव किलो भेंडी चिरुन
२ छोटे कांदे चिरुन
फोडणी - तेल, राई, जिर, कढीपत्ता, मिरची १, ५-६ मेथी दाणे,हिंग,
पाव चमचा हळद
१ ते २ चमचे मसाला
लिंबा एवढ्या चिंचेचा कोळ
तेवढाच किंवा त्यापेक्षा थोडा जास्त गुळ
चविपुरते मिठ
अर्धा चमचा गरम मसाला
थोडस ओल खोबर खरवडून
पाककृती :
प्रथम भांड्यात फोडणी देउन चिरलेला कांदा घालावा व परतवावा. ह्यातही कांदा शिजवण्याची गरज नसते. कांदा कच्चटच चांगला लागतो. कांद्यावर हळद, मसाला घालावा. आता चिरलेली भेंडी व कवळा घालून परतवुन चिंचेचा कोळ घालावा. गरजे पुरते पाणी घालावे आता भेंडी शिजु द्यावीत. (चिंचेचा कोळ घातला तरी भेंडी शिजतात) भेंडी शिजली की त्यात गुळ, गरम मसाला, मिठ, ओल खोबर घालून उकळी येउ द्यावी व गॅस बंद करावा. ही आमटी भाताबरोबर सगळ्यांना खुप आवडते.
कवळ्याच्या वड्या
साहित्य :
कवळ्याची एक जुडी (पाने खुडून चिरुन)
१ मोठा कांदा चिरुन
१ ते दिड वाटी बेसन
१ चमचा गोडा मसाला
हिंग, हळद,
२-३ मिरच्या बारीक चिरुन (किंवा थोडी मिरची पुड)
थोडी कोथिंबीर चिरुन
चवि पुरते मिठ
तळण्यासाठी तेल
पाककृती :
वरील सर्व जिन्नस एकत्र करावे शक्यतो पाणी टाकू नये. त्याच्या चपट्या वड्या तव्यावर शॅलो फ्राय कराव्यात. ह्याचीच डिप फ्राय करुन गोल भजी देखिल होते. किंवा आळुवडी व कोथिंबीर वडी प्रमाणे वाफवुनही करता येते ही वडी.
रानभाज्या :
१) कुरडूची भाजी - http://www.misalpav.com/node/8533
२) कंटोळी - http://www.misalpav.com/node/8546
३) टाकळा - http://www.misalpav.com/node/8565
४) भारंगी - http://www.misalpav.com/node/8576
५) कुलू - http://www.misalpav.com/node/8587
६) शेवळ - http://www.misalpav.com/node/12640
७) आंबट वेल - http://www.misalpav.com/node/12658
८) टेरी (अळू) - http://www.misalpav.com/node/12743
प्रतिक्रिया
17 Jun 2010 - 1:58 pm | गणपा
मस्त..
तुला कुठुन ग इतक्या सगळ्या भाज्या मिळतात ?
कवाळी (?) म्हणुन पण एक पावसाळ्याच्या दिवसात येणारी भाजी असते ना.
दिसायला गवता सारखी किंवा भाताच्या लहान रोपा सारखी असते, खाली बुडच्या जवळ सफेद रंग असतो. माहिती आहे का?
आई बिरड्या सोबत अप्रतिम भाजी करायची.
(दुरदर्शन वरुन हाकललेली माशी इथे आलिये होय ;) )
17 Jun 2010 - 2:04 pm | जागु
धन्यवाद.
गणपा कवाळीला आम्ही कुलू म्हणतो. वरच्या लिंक मध्ये आहे ती भाजी.
मी उरणला राहते. इथला बराचसा शहरी सोडला तर डोंगराळ व शेतजमीनीचा परिसर आहे. त्यामुळे ह्या भाज्या कातकरणी डोंगरातुन घेउन येतात विकायला. कवळा शेतजमीनितही होतो.
17 Jun 2010 - 2:36 pm | गणपा
येस्स्स हिच म्हणत होतो मी. :)
मी उरणला होतो ८-१० महिने (९८-९९ ) गणपतीत च्या आसपास.
नेव्हल बेस मध्ये प्रजेक्ट चालु होता, रहायला उरण ला. मस्त दिवस होते ते.
17 Jun 2010 - 10:50 pm | रेवती
छानच ग जागु!
तुझी ही रानभाज्यांची मालिका रंगते आहे अगदी!
रेवती
18 Jun 2010 - 5:40 am | सहज
एकदा ही भाजी विकत घेताना विचारा हो की ह्या रानभाज्या आहेत (पावसाळ्यात अश्याच ऑपॉप येतात) की याची लागवड (बिया, रोप) करतात. तुमच्या लेखमालेतील काही भाज्या कधी पाहील्याच नाही आहेत. अश्या न पाहीलेल्या पालेभाज्यांचा प्रॉब्लेम असा की कितपत कडवट आहेत किंवा किती पाणी सुटते हा अंदाज न आल्याने भाजी नीटशी जमत नाही.
असो, परत एकदा अतिशय संग्रहणीय लेखमाला!
18 Jun 2010 - 6:36 pm | अक्षय पुर्णपात्रे
असेच म्हणतो.
अवांतर: फोटोतील माशी संस्करण करून काढता येईल काय?
18 Jun 2010 - 6:50 pm | सहज
माशी उडून गेली.
18 Jun 2010 - 6:54 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री सहज यांचे अनेक आभार.
संपादकांसाठी: हा फोटो जागु यांच्या अनुमतीने लेखात टाकता येईल काय?
18 Jun 2010 - 7:10 am | पाषाणभेद
लेखमाला उत्तम आहे. पुढच्या पिढीला 'काही इतिहासकालीन भाज्या' असे त्यांचे वर्णन सांगावे लागेल तेव्हा ही लेखमाला पाहूनच भाजी कशी असावी याचे प्रत्यंतर येईल.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
18 Jun 2010 - 10:12 am | वेताळ
लिहा. माझ्या आवडीची भाजी आहे.
वेताळ
18 Jun 2010 - 11:49 am | जागु
गणपा, रेवती, सहज, पाषाणभेद, वेताळ धन्यवाद.
सहज, रानभाज्यांची लागवड करत नाहीत. त्या आपोआप डोंगरात, पडीक जमिनीत उगवतात. त्यांच्या चवीबद्दल आवश्यक तिथे मी टाकले आहे टिप मध्ये. ह्यातील कुठल्याच पालेभाजीत पाणी घालायचे नाही.
वेताळ, तांदळीच्या भाजीचे वर्णन सांगा. पाहीली असेल मी कदाचित.
18 Jun 2010 - 2:04 pm | स्मिता चावरे
छानच पाककृती आहेत या ...
19 Jun 2010 - 11:25 am | जागु
गणपा, सहज, रेवती, अक्षय, पुर्णपात्रे, पाषाणभेद, वेताळ, रसराज धन्यवाद.
सहज फोटोसाठी तुम्ही मला नेहमीच मदत करता त्याबद्दल धन्यवाद.
पुर्णपात्रे तुम्ही कोणता लेख लिहत आहात ? फोटो घ्या आणि मलाही दाखवा लेख.
पाषाणभेद तुमचा प्रतिसाद आवडला.
19 Jun 2010 - 8:28 pm | नरेश_
आता अळंबी (भोपड) ची पाकृ लिहा!!
भारतीय रेल्वे हागणदारीमुक्त कधी होणार देव जाणे !
19 Jun 2010 - 8:58 pm | मदनबाण
मश्रुमची पाकृ येउंदे... :)
मदनबाण.....
"Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep."
Carl Sandburg
21 Jun 2010 - 10:33 am | जागु
नरेश, मदनबाण भोपड अजुन आले नाहीत. ते ढग जेंव्हा भरपुर गडगडतात तेंव्हा येतात.