गिनिपिग

मिनासो's picture
मिनासो in जे न देखे रवी...
25 Apr 2008 - 7:54 am

आपण सगळेच गिनिपिग.... एकमेकांचे.

जात, भाषा, प्रांतांसारख्या भेदभावांच्या पिंजऱ्यातून
नात्यागोत्यांच्या अन प्रतिष्ठेच्या दावणीला बांधलेले.

तृप्त होण्याची आशा करत बसलेले,
पण सुखाच्या अमिषात असते दुःख कालवलेले.

प्रेमाच्या गोंजारण्याने अन द्वेषाच्या टोचण्यांने हाकतोय एकमेकांना,
भावनांच्या झोपाळ्यावर झुलवतोय एकमेकांना.

पिंजऱ्यातील बंदिवास, पिजऱ्यातीलच स्वातंत्र्य,
त्यातीलच जय, त्यातीलच पराजय.

त्यातच आपले, त्यातच परके,
त्यातच वरचे, त्यातच खालचे.

आपणच भोपळा, आपणच विळी,
आपल्याच सुखासाठी घेतो, आपल्यांचाच बळी.

बाहेरून पाहाणाऱ्याला वेडे ठरवणारे
स्वार्थी वागण्याला सन्मान देणारे

गिनिपिगच नेते अन गिनिपिगच अनुयायी,
एकमेकांना ओरबाडून होतात आनंदी.

बाहेर पडण्याचा शोक करणारे,
आत येण्याचा उत्सव करणारे.

आतीलच गमले अन आतीलच इमले,
पिंजऱ्यांच्या डागडूजीत सगळेच रमले.

आपण सगळेच गिनिपिग.... एकमेकांचे.

कविता

प्रतिक्रिया

सत्या's picture

25 Apr 2008 - 10:08 am | सत्या

आपला.,....,....,पिकासो.