गड्याऐवजी माझ्या श्रीमुखात!

डॉ.प्रसाद दाढे's picture
डॉ.प्रसाद दाढे in जनातलं, मनातलं
30 May 2010 - 1:31 pm

(सदर लेख माझ्या मातोश्रींनी लिहिला असून २४ मे २०१०च्या सकाळ मुक्तपीठात
प्रकाशित झाला आहे. मिपाच्या नियमांत बसत नसल्यास काढून टाकायला हरकत नाही.)

सुमारे पन्नास वर्षांपूर्वी घडलेली हकिगत मी सांगत आहे. त्यावेळी मी दहा वर्षांची असेन. अगदी बारीकशी, कुणाच्या
अध्यात ना मध्यात. आई- वडील, आजोबा, दोन काका-काकू, चुलत भावंडे असे भरलेले घर. मोठ्या भावडांमध्ये
खूप दंगामस्ती, भांडणे चालयची. कधी कधी त्यांना आजोबांच्या छड्या खाव्या लागत. माझ्या जन्मानंतर वडिलांचा व्यवसाय
अधिक भरभराटीला लागला त्यामुळे मी त्यांची फार लाडकी मुलगी होते आणि असे सर्व असताना मला माझ्या वडिलांनी
अगदी अचानक एक सणसणीत थोबाडीत दिली. माझी काही चूक नसताना! हे अघटित घडले तरी कसे? त्याचीच गमतीदार
हकिगत सांगणार आहे. त्यासाठी माझ्या वडिलांबद्दल थोडी माहिती सांगावी लागेल.
माझ्या वडिलांना आम्ही 'आप्पा' म्हणत असू. ते दहा वर्षांचे असताना त्यांना मलेरिया झाला. जवळजवळ महिनाभर ताप
येत होता. सतत औषधे घेतल्याने ताप बरा झाला; पण त्या औषधांचा त्यांच्या कनावर विपरीत परिणाम झाला. दोन्ही
कान बधिर झाले. अजिबात ऐकू येईना. शाळा- शिक्षण तिथेच थांबले. सुदैवाने त्या आधी जे शिक्षण झाले होते त्यामुळे लिहिता-
वाचता येत होते एव्हढेच. पण उत्तम बुद्धिमत्ता आणि भरपूर कष्ट करण्याची तयारी यामुळे त्यांना जे यश मिळाले ते
आश्चर्य करण्यासारखे होते.
एव्हढे मोठे व्यंग असल्याने या मुलाचे पुढे कसे होणार, अशी काळजी त्यांच्या वडिलांना वाटत होती. त्यांनी आपल्या
पायावर उभे राहणे तर गरजेचे होते. पोटापाण्यासाठी कोणता उद्योग करायचा हा प्रश्न होता. मग माझ्या आजोबांनी त्यांना
दोन म्हशी घेऊन दिल्या आणि दुधाचा व्यवसाय करण्यास सांगितले. अप्पांनी हे आव्हान स्वीकारले. अविरत प्रामाणिक कष्ट,
पडेल ते काम करण्याची तयारी यामुळे त्यांचा व्यवसाय इतका विस्तारला की त्यांच्या गोठ्यात २५-३० म्हशी होत्या. 'मुळेकर
डेअरी' नावारुपाला येत होती. आमचे राहण्याचे घर खालापूरला होते. तेथून काही अंतरावर महड (देवस्थान) येथे
म्हशींचा गोठा होता.त्याला आम्ही वाडा म्हणायचो. मध्यरात्री बारा वाजता उठून सायकलने वाड्यावर जायचे. तेथे कामाला
गडी माणसे होती, पण त्यांच्या बरोबरीने माझे वडील पण काम करीत. पहाटे पाचपर्यंत म्हशींचे दूध काढून बरण्या भरून ते
गडी घेऊन जायचे. घरोघर रतीब घालण्याचे काम करीत. तसेच दुपारी म्हशींचे दूध काढून ते चार वाजेपर्यंत ग्राहकांना
मिळत असे. अश्या प्रकारे खोपोली- सायमाळ येथील लोकांना दोन वेळा ताजे दूध पुरविले जायचे. असा हा डेअरीचा कारभार
चालविताना अप्पांना दिवसाचे चोविस तास कमी पडायचे.
घरची सर्व जबाबदारी माझी आई समर्थपणे सांभाळत होती. अप्पांचा बराच वेळ वाड्यावर जात होता. गाई-म्हशींना वेळेवर
खाणे देणे, पाणी पाजणे इ कामे नोकरांकडून करून घेणे मोठे जिकिरेचे होते. जसे त्यांचे त्यांच्या उद्योगावर प्रेम होते, तसेच
गडी माणसांवरही होते; पण नोकरांनी कामामध्ये काही चुकारपणा केला, लबाडी केली तर अप्पांचा पारा एव्हढा चढायचा, की
त्या नोकराच्या श्रीमुखात द्यायला ते मागे-पुढे बघायचे नाहीत.
गाई-म्हशींनी भरलेला वाडा म्हणजे त्यांचे सर्वस्व होते. त्यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी वाडाच असायचा. ह्याचे प्रत्यंतर मला
एके दिवशी आले. त्याचे असे झाले- त्या रात्री मी आई-वडिलांच्यामध्ये झोपले होते. साधारण बारा वाजता माझ्या गालावर
सणसणीत चपराक बसली! कुणाची? साक्षात माझ्या लाडक्या पिताजींची! मी मोठ्ठ्याने रडत, गाल चोळत जागी झाले. लगेच
आई जागी झाली. मी रडत रडत आईला सांगितले, 'मला अप्पांनी थोबाडीत मारली.' अप्पांना माझे रडणे ऐकू जाण्याचा
प्रश्नच नव्हता. आईने त्यांना उठविले. ते खडबडून जागे झाले. ते म्हणाले, " मी स्वप्नात वाड्यावर होतो." तिथे नोकराने, जेठू
नावाच्या गड्याने काहीतरी कामचुकारपणा केला होता. त्यामुळे संतापून त्यांनी जेठूला जोरदार थोबाडीत दिली. ती बसली
माझ्या गालावर! सकाळपर्यंत माझा गाल पुरीसारखा फुगला होता. घरातील सर्व मंडळी माझ्याकडे पाहून माझी चेष्टा करीत होती,
हसत होती.
एरवी जे वडील मी तब्येतीने नाजूक म्हणून मला फुलासारखे जपत होते, त्यांच्याकडून हा असा मार खाण्याचा प्रसंग आला. पण
ह्या घटनेने त्यांना फारच वाईट वाटले. कितीतरी दिवस त्यांना अपराधीपणाची बोचणी लागली होती. त्यामुळे ते माझे अधिकच
लाड करू लागले. मी तर मनातल्या मनात केव्हाच माफ केले होते त्यांना.
या प्रसंगानंतर एक गोष्ट मात्र झाली, अप्पांनी गड्यांच्या श्रीमुखात मारणे सोडून दिले!

- सौ. सुचेता प्रफुल्ल दाढे

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रदीप's picture

30 May 2010 - 1:42 pm | प्रदीप

ई-सकाळमधेच वाचली होती व लक्षात राहिली होती.

दुर्दैवाने तो मंच कुणी सिन्सीयरली काही लिहावा असा नाही, त्यामुळे चांगल्या लेखावरही अत्यंत वाईट प्रतिसाद तेथे येतात.

सन्जोप राव's picture

31 May 2010 - 5:17 am | सन्जोप राव

दुर्दैवाने तो मंच कुणी सिन्सीयरली काही लिहावा असा नाही, त्यामुळे चांगल्या लेखावरही अत्यंत वाईट प्रतिसाद तेथे येतात.
सहमत आहे. 'सकाळ' ची 'लाईफस्टाईल ही (मराठी?) पुरवणी पाहिल्यावर तर People get the government they deserve ची आठवण होते. दुसरा पर्याय नाही म्हणून आहे ते चालवून घ्यायला लागणे ही भारतीयांची शोकांतिका आहे.

सन्जोप राव
ठोकर ना लगाना हम खुद है
गिरती हुई दीवारों की तरह

छोटा डॉन's picture

31 May 2010 - 5:55 pm | छोटा डॉन

>>दुर्दैवाने तो मंच कुणी सिन्सीयरली काही लिहावा असा नाही, त्यामुळे चांगल्या लेखावरही अत्यंत वाईट प्रतिसाद तेथे येतात.

सकाळचे 'मुक्तपीठ' आणि 'पैलतीर' हे दोन्ही स्तंभ जरी चांगल्या उद्देशाने चालु असते तरी त्यावरचे येणार ( आणि प्रकाशित होणारे ) प्रतिसाद पाहता हा मंच अजिबात सिरीयस लेखनाच्या लायकीचा नाही हे खेदानेच म्हणावे लागेल.
सकाळची प्रतिक्रिया प्रकाशित करण्यापुर्वी 'पुर्वपरवानगी आणि पुर्वसंपादनाची पद्धत' पाहता अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येणे ह्यात संबंधितांचा निष्काळजीपना, बेफिकीरी, उद्दामपणा ह्या बाबी स्पष्ट दिसतात.
फडणीसांनी वेळेवर लक्ष दिले नाही तर लवकरच लेखक ह्या मंचाला राम राम ठोकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असो.

बाकी लेख वाचुन गंमत वाटली.
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

पांथस्थ's picture

30 May 2010 - 2:07 pm | पांथस्थ

मस्तच किस्सा आहे.

जाता जाता: आमच्या पिताश्रींनी मात्र आम्हाला अनेकदा 'पूरे होषो हवास में' बुकलुन काढलेला आहे.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

धमाल मुलगा's picture

31 May 2010 - 5:38 pm | धमाल मुलगा

सहमत!
अगदी करड्या अक्षरातल्या मजकूराशीही सहमत. :D

-(निगरगट्ट) ध.

डाक्टर,
किस्सा बाकी भारीच हां. काकूंनी रंगवलाही छानच. :)

मी-सौरभ's picture

30 May 2010 - 7:01 pm | मी-सौरभ

-----
सौरभ :)

टारझन's picture

30 May 2010 - 8:30 pm | टारझन

झोपेत सुद्धा "नेमकी श्रीमुखात बसली" ह्याचे आश्चर्य वाटले.
असो ;)

परिकथेतील राजकुमार's picture

31 May 2010 - 5:30 pm | परिकथेतील राजकुमार

हा हा हा !

मुक्तपीठात वाचलाच होता हा किस्सा, पुन्हा वाचताना देखील मौज वाटली.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

पाषाणभेद's picture

1 Jun 2010 - 3:28 am | पाषाणभेद

हेच म्हणतो.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

स्वाती दिनेश's picture

31 May 2010 - 6:35 pm | स्वाती दिनेश

मजेशीर किस्सा,
स्वाती

स्वाती२'s picture

31 May 2010 - 7:38 pm | स्वाती२

गमतीदार किस्सा!

मदनबाण's picture

31 May 2010 - 10:31 pm | मदनबाण

हेच म्हणतो... :)

मदनबाण.....

Laughing at our mistakes can lengthen our own life. Laughing at someone else’s can shorten it.
Cullen Hightower

प्राजु's picture

31 May 2010 - 11:03 pm | प्राजु

असाच किस्सा (झोपेत श्रीमुखात बडवण्याचा) माझ्या काकाच्या बाबतीतही झाला आहे. मात्र फरक इतकाच की काकाने (तेव्हा वय वर्षे १०) झोपेत माझ्या आज्जीच्या श्रीमुखात भडकवली होती. त्यानंतर मात्र माझ्या आज्जीने पुरे होषोहवास मे अगदी काळोख्या मध्यरात्री काकाला अंगण झाडायच्या खराट्याने झोडपून काढले होते.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

डॉ.प्रसाद दाढे's picture

1 Jun 2010 - 8:21 am | डॉ.प्रसाद दाढे

हा!हा!हा!
प्राजूसारखाच किस्सा माझ्या काकांचा झाला होता. ते बारा-चौदा
वर्षांचे असताना मधल्या सुट्टीत गोविंद नावाच्या मित्राबरोबर मारामारी
करत होते. सुट्टी संपत आली होती; शेवटची टप्पल गोविंदाच्या डोक्यात मारून काकांनी वर्गाबाहेर पळ काढला. "कुठे पळशील,
शेवटी वर्गातच येशील" आणि गोंद्या दारामागे वर्ग झाडायची केरसुणी
घेऊन उभा राहिला. पण काकाही वस्ताद होते, सुट्टी संपेस्तोवर परत
आलेच नाहीत. घंटा झाल्यावर गुपचुप मास्तरांच्या मागे लपून आले.
इकडे दबा धरून बसलेल्या गोंद्याने मास्तरांच्याच डोक्यात झाडू
घातला!
गोंद्याला चिंचेच्या फोकाचा यथेच्छ प्रसाद मिळाला हे सांगायला
नकोच! काकांनाही छड्या बसल्याच..

प्रदीप's picture

1 Jun 2010 - 2:04 pm | प्रदीप

काही माणसांकडून झोपेत, नकळत अगदी टोकाची कृत्ये घडतात. डॉ. दाढेंच्या लेखातील घटना व प्राजूच्या काकांच्या बाबतीत घडलेली घटना ह्याच प्रकारच्या होत. माझ्या आईच्या एका मामाविषयी मी अनेकदा तिच्याकडून अशीच एक गोष्ट ऐकली आहे. हा मेडिकलचा विद्यार्थी असतांना हॉस्टेलवर झोपेत एकदा त्याच्या रूममेटला उचलून खिडकीतून बाहेर फेकावयास निघाला होता. त्या मित्राने 'अरे मधू, हे काय करतोयस' वगैरे विचारूनही बराचा वेळ फायदा झाला नाही, शेवटी अगदी जिवाच्या निकराने त्या मित्राने मधूच्या थोबाडीत मारली तेव्हा मधूला खडबडून जाग आली व आपण काय करत होतो ते समजले.

पण काहीवेळा माणसे कमनशिबी असतात. जसे ब्रायन थॉमस हा ब्रिटीश गृहस्थ! त्याने झोपेत चक्क त्याच्या पत्निचा खून केला. कोर्टाने त्याला ह्यामागील कारणाची नीट मीमांसा करून निर्दोष सोडले. पण त्याचे आयुष्य आता मलिन झाले होते.

भडकमकर मास्तर's picture

1 Jun 2010 - 5:39 pm | भडकमकर मास्तर

त्याने झोपेत चक्क त्याच्या पत्निचा खून केला. ..कोर्टाने त्याला ह्यामागील कारणाची नीट मीमांसा करून निर्दोष सोडले.
एकूण ब्रिटिश मंडळी हुशारच

भानस's picture

3 Jun 2010 - 8:41 am | भानस

मजेशीरच.