"बालकवि" ~ निसर्गसौंदर्यात रममाण होण्याची तीव्र तळमळ !

इन्द्र्राज पवार's picture
इन्द्र्राज पवार in जनातलं, मनातलं
6 May 2010 - 12:00 am

"५ मे" ~ बालकविंचा हा स्मृती दिन (१९१८ च्या या तारखेस त्यांचा अपघाती म्रुत्यु झाला होता.)आज आकाशवाणीवर बालकवि यांच्याविषयी एक खास कार्यक्रम सादर करण्यात आला, जो अगदी योगायोगाने मला ऎकायला मिळाला. निवेदक बालकविंच्या प्रभावाखाली असल्याचे जाणवत होते इतक्या तन्मयतेने त्यांनी त्यांना प्रदान केलेल्या वेळेत या जादुगाराचे मराठी भाषेतील योगदान प्रस्तुत केले.

चला आपल्या संस्थळावर या निमित्ताने प्रतिभेचे ईश्वरदत्त देणगी लाभलेल्या या कवीची आपणास आवडलेली, स्मरणात राहिलेली, अभ्यासलेली वा इतर कोणत्याही प्रसंगाने मनात रुंजी घालत असलेली "कविता" आठवू या.....आणि मराठी शारदेच्या प्रांगणात आपल्या तेजस्वाने सदैव लखलखत असणा-या या अढळ ता-याचे स्मरण करु या....!

मी जाणीवपूर्वक "फ़ुलराणी" व "श्रावणमास" या दोन कवितांना न घेता (कारण....या दोन्ही प्रत्येक मराठीप्रेमीच्या ह्र्दयात घर करुन आहेत) त्यांची याच पठडीतील "संध्यारजनी" चा विचार करु इच्छितो. बालकवि हे नेहमी स्वप्नरंजनात दंग झालेले असल्यामुळे निसर्गाच्या रम्य देखाव्यात त्यांची सर्व स्वप्ने साकार होताना दिसतात. निसर्गातील एखादे द्र्श्य पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर एक कल्पनाचित्र त्याचसमयी तरळू लागते आणि थोड्याच वेळात असल्या कल्पनाचित्रांची परंपराच तयार होते. "संध्यारजनी" कवितेतील तारकांच्या आगमनाचे हे मनमोहक वर्णन :

संध्येच्या खिडाकीत येउनी ही हसरी तारा,
हळुच पाहते, खुणावितेही ’या - या’ कोणाला ?
पलिकडचा तो तेजोमय नव पडदा सारुन
बघते, हसते, क्षणात लपते, ही दुसरी कोण ?
लाजत, लाजत असाच येइल सारा स्वलोक,
मुग्ध बालिका जमतिल गगनी आता नवलाख
आली होती भरती, आता अस्तसमुद्राला
त्या लाटांतुन काय सांडल्या या मौक्तिकमाला
कल्पतरुंची फुले उडाली की वा-यावरती ?
आकाशीच्या गंगेला की बुदबुद हे येती ?
नव टिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे ?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे ?
विश्वशिरावर टोप चढविला हि-यामाणकांचा !

केवळ २८ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या महान कवीला विनम्र वंदन !!!

कवितासद्भावना

प्रतिक्रिया

प्राजु's picture

6 May 2010 - 12:08 am | प्राजु

बालकवींवर एक कविता माझ्या आईने लिहिली होती.. ती आठवली.

तुझ्याच शब्दे डौल मिरवी, हिरवळ ही हिरवी
तुझ्याच स्पर्शी फुटते या ढगांना सोनेरी पालवी
तूच एकला फुलराणीला गोड गोड लाजवी
निसर्ग तुझा, तू निसर्गाचा.. बालकवी तू निसर्ग कवी!!

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

इन्द्र्राज पवार's picture

6 May 2010 - 11:07 am | इन्द्र्राज पवार

सुरेखच ! त्यातही "तूच एकला फुलराणीला गोड गोड लाजवी" या कल्पनेला तर अन्य उपमा नाही, इतकी ती मोहक आहे. आमचे इंग्रजीचे प्रोफेसर "बालकवी" म्हटले की चटकन ह्ळवे होत आणि शेलीच्या अमर अशा "स्कायलार्क" मधील खालील कडव्यात बालकवीशी संवाद साधत :

“Teach me half the gladness
That thy brain must know,
Such harmonious madness
From my lips would flow,
The world should listen then, as I am listening now ?”

(एक विनंती : आपल्या मातोश्रीनी बालकवि प्रमाणेच त्या काळातील अन्य कवीसंदर्भात कविता केल्या असल्यास त्याही वाचायला खूप आवडेल.)
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

फारएन्ड's picture

6 May 2010 - 5:38 am | फारएन्ड

सुंदर कविता आहे. ही माहीत नव्हती. उपमा सुरेख आहेत.

'आनंदी आनंद गडे' आणि 'माझे गाणे' ही लताची दोन गाणीसुद्धा बालकवींचीच आहेत ना?

इन्द्र्राज पवार's picture

6 May 2010 - 11:36 pm | इन्द्र्राज पवार

होय..... या दोन अत्यंत सुन्दर आणि मधुर गाण्याखेरीज बालकवींचे ".... तू तर चाफेकळी" हे आणखीन एक प्रसिध्द गीत जे आशालता वाबगांवकर यांनी "मत्स्यगंधा" नाटकासाठी गायले होते.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

विकास's picture

6 May 2010 - 5:52 am | विकास

गेल्या वर्षी देखील बिरूटेसरांनी बालकवींवर चर्चा घडवून आणली होती. अर्थात म्हणून परत जन्मदिवस लक्षात ठेवून झाले तरी उत्तमच आहे... त्याबद्दल आभार.

त्यांचे शब्द आणि निसर्गाचे वर्णन वाचायला खूप आवडते. गूढ कवितेतील औदुंबर ही कविता आठवली...(आठवणीतून लिहीत असल्याने चुभूद्याघ्या)

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
नीळासावळा झरा वाहतो, बेटाबेटांतून
चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट जाहली हिरवी गर्दी पुढे
पायवाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे
हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहाकडे
झाकळूनी जळ गोड काळीमा पसरे लाटांवर
पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर

श्रावणमास आणि फुलराणी प्रमाणेच आनंदी आनंद गडे ही कविता पण मराठी मनात, गाणे म्हणून कायमची रुजली आहे असे वाटते.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

वाहीदा's picture

6 May 2010 - 1:00 pm | वाहीदा

औदुंबर कितीदा वाचली तरी नविन नविन च अर्थ मिळतो
खरो खर च गुढ कविता आहे ही ..

झाकळूनी जळ गोड काळीमा पसरे लाटांवर
पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर

~ वाहीदा

इन्द्र्राज पवार's picture

6 May 2010 - 1:40 pm | इन्द्र्राज पवार

विकास जी....
बालकविंविषयी यापूर्वी इथे लिखाण झाले असणार (असणारच....) याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नव्हती. आता तुम्ही ती लिंक दिली असल्याने मला त्या चर्चेचा खूप आनंद घेता येईल; जो मी निश्चित घेईन. धन्यवाद.
(जाता जाता एक किरकोळ दुरुस्ती : "५ मे" हा बालकवींचा स्मृतीदिन आहे.... जन्म दिन नव्हे.)
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

स्पंदना's picture

6 May 2010 - 12:36 pm | स्पंदना

छान विषय निवडलात इन्द्राजदा! चला त्या निमित्ताने प्रतिक्रिया मधुन बरीच माहिती मिळेल जी आत्तापर्यन्त माहित नव्हती. पुलेशु!! :H

प्राजु कवीतेच बाळकडु कोठुन मिळाल हे गुपीत कळल ह!!

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

इन्द्र्राज पवार's picture

6 May 2010 - 1:47 pm | इन्द्र्राज पवार

नक्कीच मिळेल... किंबहुना माझा तोच उद्देश आहे. "बालकवी" ही आपणा मराठी मनाच्या व्यक्तिमत्वातील "आंतरसाल" आहे.... जिला स्पर्श होताच आपण नकळत हळवे बनतो.... जसे आता झालो आहे.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

निसर्ग, खळखळून वाहणारे झरे, पशु पक्षी आणि हिरवीगार वनश्री यांचे सौंदर्य माणसाला भुरळ न पाडतील तर नवलच.
पण मुबईत अन शहरात बालपण गेलेल्या आमच्या सारख्या असंख लोकांना बालकवींच्या कवितांतून निसर्ग जाणवला

बंदिस्त भिंतीमध्ये पुस्तकी शिक्षण घेणार्या आम्हा मुंबईकरांना, फुलांच्या थव्यावर मस्त बागडणारं फुलपाखरू पाहण्याचा आनंद बालकवींच्या निसर्गकवितांनीच दिला

बालकवींची 'श्रावण मासी' ही कविता ही देखिल अशीच नितांत सुंदर

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फ़िरुनी ऊन पडे !
वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणि भासे !

झालासा सुर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे
तरुशिखरांवर, उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे !

उठती वरती जलदावरी अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा !
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुन येती अवनीवरती ग्रहगोलचि एकमते !

फडफड करुनि भिजले आपुले पंख पाखरे सावरिती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती !

खिल्लारे ही चरती रानी,गोपही गाणी गात फिरे
मंजुळ पावा गात तयाचा श्रावणमहिमा एकसुरे !

सुवर्णचंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवरळा
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला !

पुढचे आठवत नाही :-(

~ वाहीदा

इन्द्र्राज पवार's picture

6 May 2010 - 2:12 pm | इन्द्र्राज पवार

".....पण मुबईत अन शहरात बालपण गेलेल्या आमच्या सारख्या असंख लोकांना बालकवींच्या कवितांतून निसर्ग जाणवला...."

खरंय !! ग्रामीण भागात राहिलेल्या आमच्यासारख्यांना तुम्हा मुंबईकरांची ही वेदना आणि निसर्गाशी जवळीक साधण्याची ही तळमळ नेहमीच जाणवते, विशेषतः ज्यावेळी अशा पध्द्तीने तुम्ही आससुन लिहीता.

बा. सी. मर्ढेकर म्हणायचे "मुंबईत अरुणोदय होत नाही, तर गिरिणोदय होत असतो."

"घनःश्यामसुंदरा श्रीधरा गिरिणोदय झाला,
उठि लवकरि दिनपाळी......"
------------- गोंगाटला सारा !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

अमोल नागपूरकर's picture

6 May 2010 - 12:35 pm | अमोल नागपूरकर

बालकवी जळ्गावपासून जवळ असलेल्या भादलीचे. लेखात लिहिल्याप्रमाणे तिथेच रेल्वे खाली सापडून त्यान्चे अपघाती निधन झाले. त्यान्चे वय त्यावेळी फार नव्हते.

shaileh vasudeo pathak's picture

6 May 2010 - 7:11 pm | shaileh vasudeo...

बालकवी जळ्गावपासून जवळ असलेल्या भादलीचे नाहीत.
त्यांचे गांव धरणगांव जळ्गावपासून २८ कि.मि.

शैलु

इन्द्र्राज पवार's picture

6 May 2010 - 9:55 pm | इन्द्र्राज पवार

.....का किंवा कसे कोण जाणे पण बालकवींना आपला मृत्यु फार लवकर आणि तोही अपघाती येणार अशी भावना व्हायची आणि लक्ष्मीबाई टिळक त्यांचा हा भ्रम दूर करण्याचा (अयशस्वी...) प्रयत्न करायच्या.... पण दुर्दैवाने वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी त्यांना अखेरीस अपघातीच मरण आले.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

आनंदयात्री's picture

6 May 2010 - 1:19 pm | आनंदयात्री

बालकवी !!
आणी कविता !!! अहाहा !!

>>इतर कोणत्याही प्रसंगाने मनात रुंजी घालत असलेली "कविता" आठवू या....

ही घ्या !!

कोठुनि येते मला कळेना

कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
काय बोचते ते समजेना
हृदयाच्या अंतर्हृदयाला ।।

येथे नाही तेथे नाही,
काय पाहिजे मिळावयाला?
कुणीकडे हा झुकतो वारा?
हाका मारी जीव कुणाला?

मुक्या मनाचे मुके बोल हे
घरे पाडिती पण हृदयाला
तीव्र वेदना करिती, परि ती
दिव्य औषधी कसली त्याला !

आनंदयात्री's picture

6 May 2010 - 1:20 pm | आनंदयात्री

बालकवी !!
आणी कविता !!! अहाहा !!

>>इतर कोणत्याही प्रसंगाने मनात रुंजी घालत असलेली "कविता" आठवू या....

ही घ्या !!

कोठुनि येते मला कळेना

कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
काय बोचते ते समजेना
हृदयाच्या अंतर्हृदयाला ।।

येथे नाही तेथे नाही,
काय पाहिजे मिळावयाला?
कुणीकडे हा झुकतो वारा?
हाका मारी जीव कुणाला?

मुक्या मनाचे मुके बोल हे
घरे पाडिती पण हृदयाला
तीव्र वेदना करिती, परि ती
दिव्य औषधी कसली त्याला !

शुचि's picture

16 May 2010 - 5:41 am | शुचि

काय एकेक उपमा अहेत या कवितेते. वा.

>>मुग्ध बालिका जमतिल गगनी आता नवलाख
आली होती भरती, आता अस्तसमुद्राला
त्या लाटांतुन काय सांडल्या या मौक्तिकमाला
कल्पतरुंची फुले उडाली की वा-यावरती ?
आकाशीच्या गंगेला की बुदबुद हे येती ?
नव टिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे
?>>

धन्यवाद ही कविता दिल्याबद्दल.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

इन्द्र्राज पवार's picture

23 May 2010 - 3:53 pm | इन्द्र्राज पवार

श्री. सदानंद रेगे यांनी "बालकवी" वर रचलेली (आणि फारशी प्रसिद्ध न झालेली....) ही रोखठोक कविता....

"ठोम्बरे"

ठोम्बरे तसा भोळसटच होता
स्वभावानं राणीच्या रुपायासारखा लख्खं, खणखणीत
देव्हार्‍यातला देवच जसा
शामळुशेट शाळीग्राम
पहावं तेव्हा त्याला भूत डसलेलं असायचं
दिवेलागण झाली की माझं बापडीचं एकच काम
“ठोम्बरे, ये बाबा…….”
मग ठोम्बरे यायचा
आणि लक्षुमबाई मिठमोहर्‍यांनी त्याची दृष्ट काढायच्या
टिळकांना सांगीतलं की म्हणत
“तु कशाला लागतेस त्या भुताच्या पाठीस
That could be a holy ghost!”

एक दिवस ठोम्बरे मला म्हणाला
“आई, आज मन दुखतय सारखं सकाळपासनं”
मला वाटलं नेहमीचाच वात्रटपणा चाललाय त्याचा
मी पोळी लाटुन तव्यावर घातली
तो म्हणाला खरचं आई, तुमच्या गळ्याशप्पथ”
मी म्हटलं मेल्या, मी मेले तर तुझं रे काय जाणारे?”
तो म्हणाला मग, मी… मी जातो मरुन”
मी म्हटलं तेवढं मात्र नको करुस
मला रडायला वेळ नाही
दुपारी मला सांडगे घालायचेत
आणि संध्याकाळी….
टिळकांशी भांडायचय”

तव्यावरची पोळी परतत होते
तेव्हा माझ्या कानाशी लागुन तो म्हणाला
“आई, माझ्या मनात एक औदुम्बर उगवतोय
त्याचा ठणका लागलाय सारखा”
मी त्याच्यासारखाच हेल काढीत म्हटलं,
“छान, आता टिळक आणि तु
दोघे त्याच्यावर जाऊन बसा
चव्वीस तास
खाली येऊच नका
नाहीतर असं करा
तुझा तो औदुम्बर आकाशाला लागला
की त्याची फुलं आण
तुझ्या फुलराणीला वेणी करु आपण”
तो म्हणाला, “छान कल्पना आहे
खरचं छान, Good, Excellent!
वेणी For फुलराणी
My फुलराणी!”

बोलता बोलता तो धुम रुळावरुन धावतच सुटला
मी ओरडतेय, “ठोम्बरे, थांब…..
असा वेड्यासारखा धावतोयस काय”
पण तो धावतच होता….
निर्झरासारखा धावत होता
तुळशीच्या पांदीतुन तो मला दिसत होता
अखेर तो एक ठिपका झाला
नी आकाशात कुठं दिसेनासा झाला

टिळक रात्री उशीरा घरी आले
तेव्हा त्यांच्या पिशवीत मातीने बरबटलेल्या
वहाणांचा जोड होता एक
मी कुणाचा म्हणुनही नाही विचारलं
म्हटलं, “असेल एखाद्या होली घोस्टाचा
आपल्याला कशाला पंचाईत?”
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"