॥सिडनीपुराणम्॥

मेघवेडा's picture
मेघवेडा in जनातलं, मनातलं
3 May 2010 - 10:43 pm

श्री गणेशाय नमः। सचिनं वन्दे।
अथ सिडनीपुराणम।

Alan Border and Sunil Gavaskar with the infamous Border-Gavaskar Trophy Steve Waugh and Saurav Ganguly at the toss - 4th test, Sydney. 'Guard of Honour' - Steve Waugh leading the Australian team one last time!

२००३-२००४ चा ऑस्ट्रेलियन समर, बोर्डर-गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा सामना. ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार स्टीव्ह वॉचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला शेवटचा सामना त्यामुळे या सामन्याकडे अख्ख्या जगाची नजर वेधलेली होती. एकीकडे मागल्या खेपेला भारतात झालेल्या मानहानीकारक पराभवाची सव्याज परतफेड करून त्यांच्या कप्तानास सन्मानपूर्वक निरोप देण्यास उत्सुक ऑस्ट्रेलियन संघ. तर समोर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील अपमानकारक पराभवाने चवताळलेला, बेंगाल टायगर च्या नेतृत्वाखालील भारतीय संघ. मालिका १-१ बरोबरीत. एकीकडे अनिल कुंबळे भयंकर फॉर्मात तर दुसरीकडे ब्रेट ली सपशेल अपयशी! रिकी पॉण्टींगच्या नावावर दोन, तर राहुल द्रवीडच्या नावावर एक द्विशतक लागू. गांगुली, लक्ष्मण, सेहवाग सर्वांच्या नावावर एकेक शतक लागू. एकूण काय तर सिडनी कसोटी रंजक ठरणार याबाबत जराही शंका नव्हती. ऑस्ट्रेलियन मीडियाने स्टीव्ह वॉला तर अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या सर्व गोंधळात साहेबांचं कुठेच नाव नव्हतं! सचिनच्या त्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांतल्या धावा होत्या:
ब्रिस्बेनः ०(३) आणि खेळला नाही.
अ‍ॅडलेडः १(६) आणि ३७(५९) आणि
मेलबर्नः ०(१) आणि ४४(७९).
पण तरी मैलोन् मैल प्रवास करून केवळ त्याला बघण्यासाठी येणारे ऑस्ट्रेलियन चाहतेही होते. कारकीर्दीचा आलेख घसरत जात असल्यामुळे टीकाकारांना आयतंच मोकळं मैदान मिळालं होतं. पण सामन्याच्या पहिल्या दिवशी ड्रेसिंग रूम मध्ये बसलेल्या सचिनचा चेहरा निर्विकार होता. त्या निर्विकार चेहर्‍यामागे एक वादळ दडलं होतं हे पुढल्या दोन दिवसात जगानं पाहिलं!

सचिनने ५ डावांमध्ये केवळ ८२ धाव्या जमवाव्यात हे चाहत्यांच्या दृष्टीने अपयशच! पण केवळ त्या मालिकेतच नव्हे तर भारताच्या २००३ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर तो एकूणच थोडा डाऊन झाला होता. तो पराभव त्याच्या जिव्हारी लागला होता. पूर्ण वर्ल्डकप त्यानं जवळजवळ एकहाती खेचलाच होता. पण अंतिम सामन्यात संघ कसोटीस न उतरल्यानं भारताचा पराभव झाला आणि सचिनचं एक स्वप्न अपूर्णच राहिलं.. १९९६ सालीही असंच घडलं होतं पण तेव्हा नसता माज नडला होता.. वर्ल्ड कप जिंकायची सुवर्णसंधी केवळ 'लाहोरला फायनल खेळायची नाही' या अट्टाहासापायी सोडून दिली होती भारतीय संघाने(नक्की? की मॅनेजमेंटने? आणि कंट्रोल बोर्डाने की आणि कुणी??) असो. २००३ वर्ल्डकप नंतर सचिनचा खरंच बॅडपॅच सुरू झाला. वर्ल्डकपनंतर न्यूझीलंड भारतात आली दोन कसोटी सामने खेळायला. त्या दोन सामन्यांत द्रवीडने एक द्विशतक आणि सेहवाग, गांगुली, लक्ष्मण, अ‍ॅस्टलच काय तर रिचर्डसन, विन्सेंट, मॅकमिलन, स्टायरीस या सगळ्या पहिली दुसरीतल्या पोरांनीही एकेक शतके लावली! तर सचिनच्या त्या दोन सामन्यांतल्या धावा होत्या ८,७,५५ आणि १!! तो नुसता धावांच्या बाबतीतच बॅडपॅच मध्ये नव्हता तर त्याची ताकद असणारे कव्हर ड्राईव्हज, स्क्वेअर ड्राईव्हज यांचं टायमिंग नीट बसत नव्हतं. हातातील कामे सोडून बघत बसावे असे त्याचे ऑफसाईडची भक्कम तटबंदी चिरत जाणारे नेत्रदीपक फटके निष्प्रभ ठरत होते. चेंडूच्या टप्प्यावरून त्याच्या ट्रॅजेक्टरीचा अचूक वेध घेणारी ती गरूडाची तीक्ष्ण नजर जणू धोका देत होती त्याला. चेंडू थोडा 'आऊटसाईड दी ऑफ' पडला की त्याच्या वेगाची जराही तमा न बाळगता मारलेले, पॉईंट आणि कव्हरला जरी जॉण्टी आणि गिब्ब्स उभे राहिले तरी त्यांना हताशपणे बघत बसावं लागेल असे ते त्याचे ते प्रेक्षणीय स्क्वेअर ड्राईव्हज जणू इतिहासजमा झाले होते! चेंडू थोडा फुललेन्ग्थ पडणार असा अंदाज आला की क्षणार्धात पुढला पाय थोडा पुढे सरसावून त्यावर अख्ख्या शरीराचा तोल सांभाळत मारलेले, अंबरात सौदामिनी कडाडल्याचा आभास निर्माण करणारे, अंगावर काटा आणणारे त्याचे कव्हर ड्राईव्हज आता मात्र अलगद त्याच्या बॅटची कड घेऊन स्लिप किंवा गलीतील क्षेत्ररक्षकाच्या हाती विसावत होते. हातहातभर चेंडू वळवणार्‍या शेन वॉर्नला सेटल होण्यापुरताही वेळ न देणार्‍या त्याला, स्टुअर्ट मॅकगिल (त्याचेही लेगस्पिन दर्जेदारच म्हणा..) ट्रबलवत होता! एकूण ऑफस्टंपबाहेरच्या चेंडूंनी सचिनची विकेट सहजरित्या मिळत होती. आणि त्यात भरीस भर म्हणून काय तर त्याच्याविरूद्धची पायचितची अपील्स उचलून धरली जात होती तर कधी सरळ चेंडूंना पॅडींग करण्याची दुर्बुद्धी त्याला होत होती.

अशा सगळ्या परिस्थितीत सिडनी कसोटी ही सचिनची खरीच कसोटी होती. मागल्या खेपेस (१९९१-९२ साली) याच मैदानावर १४८ धावा काढून त्याने टीकाकारांची थोबाडे बंड केली होती. यावेळेस मात्र त्याला आल्याआल्याच लीने दोन वेळा दोन अप्रतिम आऊटस्विंगर्सवर गंडवले. दोन-तीन षटकांनतर मॅकगिलचा एक अप्रतिम वळलेला - जवळजवळ काटकोनात वळलेला - चेंडू सचिनला बीट करून गेला! सचिनला इतका गंडताना मी पहिल्यांदाच पाहत होतो. इतर वेळी हाच चेंडू त्याने 'डान्सिंग डाऊन द ट्रॅक' करून, टप्प्यावर उचलून लाँगऑफच्या वरून स्टॅण्ड्समध्ये भिरकावून दिला असता. पण हाच असतो बॅडपॅचचा परिणाम. इतर वेळी कॉन्फिडण्टली मारले जाणारे फटके अशा वेळी रिस्की वाटू लागतात. मॅकगिलचा तो चेंडू अप्रतिमच होता. एखाद्या कुंभारानं फिरत्या चाकावर मडके अलगद हाताने फिरवावे तसा मला भास झाला अगदी त्याचा तो हातभर वळलेला चेंडू पाहून. (आणि त्याक्षणीच मी मॅकगिलचा फॅन झालो. असो.) त्याक्षणी तो चेंडू जर सचिनच्या बॅटची कड घेऊन गेला असता तर आज कदाचित चित्र वेगळेच असते. कधीकधी अशा लहानसहान गोष्टीच कारकीर्दीची दिशा ठरवू शकतात. खेळांमध्ये नशीबपालट हा अशाच बॅटची कड आणि तिची विड्थ, गोलपोस्ट आणि त्याचा थिकनेस, रेसट्रॅकचा एखादा कॉर्नर आणि त्याचा अँगल यावर अवलंबून असतात. इथंही तसंच घडलं खरं. देवाचे आपण आभार मानायला हवेत की त्या मॅकगिलने त्याला त्या अप्रतिम लेगस्पिनवर बीट केलं. त्यावेळी सचिनच्या चेहर्‍यावरचे भावही बोलके होते. स्वतःवर थोडासा नाराज झाल्यासारखा वाटला तो तेव्हा. कदाचित त्यानं मॅकगिलच्या या चेंडूवर बीट होणं हे कारण ठरलं आणि त्याच्या करिअरची दिशाच बदलली! माझ्यामते, या मॅकगिलच्या चेंडूपासूनच "ऑफसाईडबाहेरच्या चेंडूला स्पर्शच करायचा नाही! ऑफबाहेरचे चेंडू आपल्याला धोका देतायत सध्या, तर आपण त्यांपासून दूरच राहिलेले बरे" असं त्यानं मनास समजावलं आणि आपली कारकीर्दीतील सर्वोच्च खेळी - २४१* - बांधली, उभारली, साकारली. कसोटीच्या दुसर्‍या दिवशी, भारताच्या डावाच्या १७०व्या षटकात, ३९५ व्या चेंडूचा सामना करत जेव्हा त्याने २००वी धाव घेतली, तेव्हा जवळजवळ ४०,००० लोक एससीजीवर (आणि मी माझ्या घरात) उभे राहून एका महान खेळियाला आणि त्याच्या तितक्याच महान खेळीला मानवंदना देत होते. ही खेळी म्हणजे ९ तासांच्या अथक परिश्रमांचे फलित होते. त्याची एक तपश्चर्या पूर्ण झाली होती. तो तब्बल ५३२ मिनीटे खेळपट्टीवर तळ ठोकून होता. या नऊ तासात सार्‍या जगाला दिसलेला सचिन म्हणजे नेहमीचा 'दे दणादण' फटकेबाजी करणारा सचिन नव्हता. तर सावकाशपणे अतिशय संयमाने एक एक धाव जोडत हे द्विशतक त्यानं पूर्ण केलं होतं. मुळात हे शतकच त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं होतं! सचिन संपल्याच्या टीका करणार्‍यांना त्याचं सडेतोड उत्तर होतं ते. त्यानं शतक पूर्ण झाल्यावर असा काही पंच मारला हवेत, जणू तो त्याच्या टीकाकारांना सांगत असावा, की आजही मी फक्त मला हवेत तेच शॉट्स खेळून शतक लावू शकतो! हे पहा सचिनचं सेलिब्रेशन, अनुक्रमे शतक आणि द्विशतक पूर्ण झाल्यावर:

वरकरणी, स्कोअरबोर्डवरून आपल्याला कल्पना नाही येणार त्याने त्या मॅरेथॉन खेळीत घेतलेल्या अथक परिश्रमांची. ब्रेट ली, नेथन ब्रॅकन, जेसन गिलेस्पी, स्टुअर्ट मॅकगिल सर्वांनी आपला गृहपाठ व्यवस्थित केला होता. ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूंची नुसती खैरात वाटली जात होती. या अपेक्षेने, की सचिन काहीतरी छेडछाड करायला जाईल आणि आपली विकेट देऊन बसेल! पण त्यांना बिचार्‍यांना काय कल्पना आपण कुठल्या निश्चयाच्या महामेरूसमोर उभे आहोत! कांगारूंनी रचलेल्या या सापळ्यात आपण फसायचे नाहीच असं ठरवूनच तो जणू खेळत होता. त्याने इतके चेंडू सोडलेले मी आयुष्यात प्रथमच पाहत होतो! सुरूवातीला थोडं विचित्र वाटलं पण तो ३०-४० च्या आसपास पोहोचेपर्यंत अंदाज येऊ लागला होता की पुढं काय वाढून ठेवलंय या कांगारूंच्या ताटात आणि मी टीव्हीसमोरून अजिबात हललो नाही मग! सचिनला असं कठोर मनोनिग्रहाने ऑफसाईडबाहेरचे चेंडू सोडताना पाहून मला अतिशय आनंद होत होता. यासाठी की आपला सचिन धावांमध्ये पुन्हा परततोय. नेहमी ज्या मार्गाने तो सहजरित्या धावा जमवी, तोच मार्ग धावा जमवण्यासाठी आज तो टाळत होता. आणि माझं असं प्रामाणिक मत आहे, की तो सचिन होता म्हणूनच त्याला हे जमलं. बाकी ऐर्‍यागैर्‍याचं काम नव्हे ते! अगदी याच कारणासाठी मी त्याला माझ्या मागच्या लेखात 'निश्चयाचा महामेरू' म्हटलं होतं. आता त्यानं फॉर्म मध्ये परत येण्यासाठी स्वीकारलेला हा मार्ग योग्य होता की नाही हा वादाचा विषय ठरू शकेल. अगदी बॉयकॉटपासून बेनॉपर्यंत सर्वच यावर चर्चा करत होते. पण मला त्याच्याशी काहीही देणंघेणं नव्हतं. त्या दिवशी एक वेगळाच सचिन जगाला दिसला. अतिशय मनोनिग्रही, आपल्या निर्णयावर ठाम! प्रसंगी लीचे बाऊन्सर्स अंगावर घेणारा. प्रसंगी अगदी ज्युसी टेम्प्टिंग हाफ व्हॉलीज् केवळ ड्राईव्हज् मारायचे नाहीत म्हणून दुर्लक्ष करून सोडून देणारा. आणि अशा सचिनला बघायला मिळालं याचा अपार आनंद मला झाला होता! मी आनंदाच्या भरात बाबांना म्हटलं, "बाबा, आपला सचिन आता कोण्णाला ऐकत नाही.." त्याने सोडलेल्या प्रत्येक चेंडूत मला बॅडपॅचमधून बाहेर पडलेला सचिन डोळ्यांसमोर दिसत होता अगदी! लोक वाट्टेल ते बडबडतात अगदी. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर "पार बोअर केलान सचिनने आज.. अरे सोडतो कसले हाणायचे सोडून.. या सचिनला पण काय झालंय ना.. अरे काय ते.. किती कूर्मगति" असल्या कमेंट्स पास होत होत्या. पण त्या खुळयांना काय कळतंय, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही!

ऑफसाईडचे चेंडू वर्ज्य म्हणून मग त्याने नवनवीन इनोवेशन्स वापरले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिडल स्टंपचा गार्ड घेतला. दोन तीनदा त्याला मोह आवरता आला नाही ऑफबाहेरचे चेंडू स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा पण तेवढंच. मग मात्र त्यानं कुण्णाला ऐकलं नाही. चेंडू ड्राईव्ह करण्याऐवजी कट करण्यावर त्यानं भर दिला. पेडल स्वीप्स, रिव्हर्स स्वीप्स, लेट लेट कट्स वापरले. (इथं 'लेट' चुकून दोनदा टाईप झालेला नाही हे लक्षात घ्या!) त्याचा भर मात्र लेगसाईडला स्कोअर करण्यावरच होता. स्टीव्ह वॉने सचिनसाठी नेहमीच ७-२ फील्ड लावली आणि सचिनने त्याचा पुरेपूर फायदा उठवला! मॅकगिलने जरा म्हणून शॉर्टलेन्ग्थ दिली की साहेब बॅकफूटवर गेलेच आणि एखाद्या बापाने आपल्या पोरीला छेडणार्‍या टपोरी पोराच्या कानाखाली साण्णकन् हाणावी तशा आवेशात हाणलाच एक जोरदार पुल!! ब्रॅकन मुळात लेफ्ट आर्म टाकत असल्याने त्याचे चेंडू अ‍ॅक्रॉस येत होते आणि त्यामुळे जरा का फुललेन्ग्थ दिली की थोडं 'शफल अक्रॉस' करून हलकेच चेंडूला दिशा देत मारलाच एक नितांतसुंदर फ्लिक!! अगदी मिडल-ऑफचे चेंडू - मिडल-ऑफ हां, मिडल-लेगही नाही - तो शेवटच्या क्षणी 'शफल अक्रॉस' करून, मनगट वळवून फ्लिक करत होता. सगळ कसं.. अंडर टोटल कंट्रोल!! ब्रॅकनविरुद्ध फ्लिक्स, ऑन ड्राईव्हज तर मॅकगिलविरूद्ध पुल आणि स्वीप या फटक्यांचा त्यानं सढळहस्ते वापर केला! त्यात अखंड पृथ्वीतलावर फक्त त्यानेच मारावेत असे त्याचे ते पेटंट स्ट्रेटड्राईव्हज् सुद्धा दिमतीला होतेच! एकूण काय तर ऑफसाईड म्हणजे स्कोअरींगसाठी वर्ज्य एरिया! नाही म्हणजे ऑफला एकही फटका तो खेळला नाही असं नाही. पण शक्यतो ड्राईव्हज वर्ज्य! आणि त्यामुळेच ही खेळी ग्रेट ठरली! म्हणजे लूज बॉल मिळेपर्यंत वाट बघायची आणि त्यातही ऑफस्टंपच्या बाहेर लूज बॉल मिळाले तरी त्यांच्या नादाला जायचं नाही! केवढा तो मनोनिग्रह, केवढा तो संयम! पुढील तक्ता पाहिल्यास आपल्याला याचा बरोब्बर अंदाज येईल. (आकडे पहिल्या दिवसअखेरचे आहेत. सचिन त्यावेळी १५६ चेंडूत ७३ धावांवर नाबाद होता. पण हे आकडे त्याच्या मनोनिग्रहाचा अंदाज देण्यास पुरेसे आहेत!)

Total balls faced - 156
Balls outside off stump - 101
Runs scored - off side - 19
Runs scored - leg side - 54
Boundaries - off side - 3
Boundaries - leg side - 9

(ऑफस्टंपबाहेर टाकलेल्या १०१ चेंडूंपैकी त्याने सोडले किती हेही दिले असते तर आणखी चांगला अंदाज बांधता आला असता त्याच्या मनोनिग्रहाचा! माझ्या मते यातले कमीत कमी ५० तरी सोडले असावेत त्याने.)

अर्थात सचिन एका बाजूला आपला पूर्ण वेळ घेत फॉर्म मध्ये परतत असताना, दुसर्‍या बाजूने तितकाच जबाबदारीचा खेळ करणार्‍या खेळाडूची गरज होती. सचिनचा स्ट्राईकरेट कमी होता आणि त्यात भारताला वेगाने धावा काढणेही तितकेच आवश्यक होते. मालिका जिंकण्यासाठी ही कसोटी जिंकणे अत्यंत गरजेचे होते आणि कसोटी जिंकायची तर लवकरात लवकर जास्तीत जास्त धावा जमवून डाव घोषित करायचा होता. त्यात चोप्रा, सेहवाग, द्रवीड तिघे ७० धावांच्या अंतरात तंबूत परतले! भारत तीन बाद १९४. त्यावेळी एका मजबूत आधारस्तांभाची गरज होती भारतीय संघाला. सचिनने एक बाजू लावून धरली असताना समोरून पडझड थांबवणे अत्यावश्यक होते आणि तितकेच आवश्यक होते वेगाने धावा जमवणे. अशावेळी गांगुलीने स्वतःऐवजी लक्ष्मणला ५व्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवले. आणि तिथून पुढे अख्खा एक दिवस जे दृष्य पाहायला मिळालं त्याची गोडी खरंच अवीट होती. सचिन एकाबाजूला रामायण महाकाव्य रचत होता तर दुसर्‍या बाजूला लक्ष्मणाने महाभारत रचलं! रामाची धीरगंभीरता, संयम आणि कठोर मनोनिग्रह सचिन क्षणोक्षणी दाखवत असताना, दुसर्‍या बाजूस लक्ष्मण कुरूक्षेत्रावर रणात उतरलेल्या पार्थासारखा तेजस्वी, आक्रमक पण तितकाच संयमी भासत होता. एकाच दिवशी एकाच सामन्यात एकाच वेळी दोन एपिक इनिंग्ज पाहायला मिळणं म्हणजे 'अहो भाग्यम्!' आपली विकेट घालवायची नाही अशा निश्चयाने खेळतानाच ब्रेट ली या प्रतिस्पर्ध्यांच्या हुकुमी एक्क्यावरच लक्ष्मणने आक्रमण केले! अक्षरशः ८ च्या अ‍ॅव्हरेजने लीला फोडून काढत होता लक्ष्मण. सचिनला त्याची मोलाची साथ लाभली म्हणूनच सचिन ही महान खेळी रचू शकला! आणि सचिन खुल्या दिलानं ते मान्यही करतो. लक्ष्मण एका बाजूला ८ च्या अ‍ॅव्हरेजने फोडत असल्यामुळे सचिनला दुसर्‍या बाजूस सावकाश खेळण्याची संधी मिळाली. ती लढत मैदानापुरती मर्यादित उरली नव्हती तर तो एक उच्च दर्जाचा माईंडगेम झाला होता. स्टीव्ह वॉने या दोघांची भागीदारी मोडण्यासाठी हरतर्‍हेचे प्रयत्न केले. सातत्याने बॉलर्स बदलत राहिला, अ‍ॅटॅकिंग फील्डींग लावली, स्लेजिंग वापरलं काय काय नि काय काय! पण दोघांनी ऑस्ट्रेलियन अ‍ॅटॅक कुटला अगदी. सचिनच्या शतकापाठोपाठ लक्ष्मणनेही शतक झळकावले. त्याचे पेटंट फ्लिक्स, इनसाईड आउट कवर ड्राईव्हज पुनःपुनः पाहून डोळ्यांचे पारणे फिटत होते! शेवट १७८ धावांची आणखी एक 'व्हेरी व्हेरी स्पेशल' खेळी रचून तो बाद झाला. पण तोपर्यंत त्यानं आपलं काम व्यवस्थित केलं होतं. सचिनला सपोर्टिंग इनिंग्ज असं आज त्या इनिंग्जबद्दल म्हटलं जात असलं तरीही लक्ष्मणची ती खेळी त्याच्या इतर खेळींइतकीच स्पेशल, स्वतःचा ठसा उमटवणारी होती. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ३५३ धावांची भागीदारी करत नवा इतिहास रचला आणि भारत तोपर्यंत सुस्थितीत पोचलेला होता.

दीडशतक पूर्ण झाल्यावर सचिनला आपला हरवलेला आत्मविश्वास परत गवसल्याची चिन्हे दिसू लागली. एखाद दुसरे ड्राईव्हज दिसू लागले! त्यानं ब्रॅकनला मारलेला एक अप्रतिम लीनिंग कव्हर ड्राईव्ह म्हणजे 'तो' सचिन परत फॉर्मात आल्याची पावती होती! सचिनच्या बॅटमधून तेच बहारदार फटके परत वाहू लागले आणि माझ्यासारख्या सचिनभक्तांच्या डोळ्यांतून अश्रू!! सर्व प्रयत्न करून थकलेल्या बिचार्‍या कांगारूंकडे हताशपणे बघण्याशिवाय काहिएक पर्याय उरला नव्हता. स्टिव्ह वॉ तर म्हणत असेल, हीच मॅच मिळाली का रे तुला, माझी शेवटची मॅच? का सगळा प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे घेतोयस वळवून? माझ्यासाठी राख काहीतरी? तीच गत ली गिलेस्पी, मॅकगिल, गिलख्रिस्ट, पॉण्टिंग सार्‍यांचीच! सारेच ऑस्ट्रेलियन खंदे वीर निष्प्रभ झाले होते एका भारतीय तार्‍यापुढे! त्यांनी अक्षरशः हात टेकले, गुडघे टेकले! ते तरी बिचारे काय करणार म्हणा.. जेव्हा सचिन पूर्ण भरात खेळत असतो तेव्हा तुमच्या हातात काहीच नसतं.. हताशपणे बघण्याशिवाय!

तिसर्‍या दिवशी सकाळी ७०५/७ या धावसंख्येवर भारताने डाव घोषित केला तेव्हा सचिन २४१ धावांवर नाबाद होता! तब्बल ६१३ मिनीटे, ४३६ चेंडूत २४१ धावा, ३३ चौकार आणि एकही षटकार नाही! पुढे भारताने ऑस्ट्रेलियाला ४७४ धावांत गुंडाळून फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजी स्वीकारली. सचिनने पुन्हा ६० धावा काढल्या तर राहुल द्रवीडने ९१ धावांची एक अविस्मरणीय खेळी करत भारताला ४३ षटकांत २११ धावांचा पल्ला गाठून दिला. द्रवीड शतकाच्या उंबरठ्यावर असताना ब्रेट लीच्या एका तेज तर्रार बाऊन्सरने त्याच्या कानाचा वेध घेतल्याने भारताने डाव घोषित केला आणि ऑस्ट्रेलियासमोर सुमारे १०० षटकांत ४४३ धावांच आव्हान ठेवलं. पण शेवट स्टीव्ह वॉने ८० धावांची झुंझार खेळी करून सामना वाचवलाच! शेवटच्या दिवसाचा तर क्षणन् क्षण थरारक होता. कुंबळेचा खतरनाक स्पेल, पार्थिव पटेलचं स्टीव वॉ ला डिवचणं, गांगुलीची आक्रमकता, स्टीव्ह वॉने घेतलेल्या प्रत्येक धावेवर होणारा टाळ्यांचा कडकडाट सर्व काही विलक्षण! घरात टीव्हीवर बघताना सुद्धा थरार जाणवत होता! त्या क्षणी तिथं एससीजी वर उपस्थित प्रेक्षक तर भाग्यवंतच खरे! स्टीव्ह वॉच्या खेळीने ऑस्ट्रेलियानं सामना वाचवला खरा पण मालिका १-१ अशी बरोबरीत सुटल्यानं बोर्डर-गावस्कर ट्रॉफी भारताकडेच राहिली! स्टीव्हला मालिकाविजयानं निरोप द्यायचं कांगारूंचं स्वप्न सचिननं हाणून पाडलं होतं आणी स्टिव्हला स्वतःलाही ही जाण होती, त्यामुळेच तर त्यानं सचिनला उद्देशून 'यू आर अ‍ॅन इन्स्पिरेशन!' असे गौरवोद्गार काढले! सिडनी कसोटी खेळाडूंनी दाखवलेल्या फायटींग स्पिरीटमुळे गाजली. शेवटच्या क्षणापर्यंत लढला गेलेला सामना अनिर्णित राहिला खरा बट क्रिकेट वॉज द विनर देअर!!

असो. भारताने पहिला डाव घोषित केल्यावर सचिनला २४१* या धावसंख्येवर आनंदाने बॅट उंचावत पॅव्हेलियनमध्ये परतताना पाहून त्याच्याइतकाच आनंद त्या ४०,००० प्रेक्षकांना झाला होता, कारण एकही जण आपल्या खुर्चीत बसलेला नव्हता. हर्षा भोगले, शास्त्री, अक्रम, सिद्धू सगळेच उभे राहून त्याचं अभिनंदन करत होते. त्यां सर्वांनीच काय माझ्यासारख्या कित्येक जणांनीदेखील आपल्या घरात टिव्हीसमोर उभे राहून टाळ्या वाजवल्या असतील! स्टीव्ह वॉच्या शेवटच्या कसोटीवर आता फक्त त्याचंच नाव नव्हतं. ती कसोटी सुरू होण्यापूर्वी स्टीव्ह वॉचा एवढा उदो उदो झाला असताना, मात्र दोन दिवसात प्रसिद्धीचा प्रकाशझोत आपल्याकडे वळवून घेण्यात यशस्वी होणं म्हणजे घरातल्या दिव्याचा झोत वळवून घेण्याइतकं सोप्पंय होय म्हाराजा? जाईल तिथं इतकं प्रेम माझ्या माहितीत तरी आणखी कुठल्याच खेळाडूच्या नशिबात केव्हाच आलं नाही! आणि जगाने इतका उदो उदो करूनही या विनम्र माणसाचे पाय सदैव जमिनीवरच राहिले!! आणि म्हणूनच तो एक महान खेळाडू आहे. भलेही त्याची ही खेळी लक्ष्मणइतकी मॅजेस्टिक नव्हती. पण अपयशाच्या काट्याकुट्यातून जाणार्‍या वाटेवरून मार्गक्रमण करत असलेल्या नवशिक्या खेळांडूसाठी नक्कीच आदर्शवत होती. त्याच्या या एका खेळीनं कठीणसमयी खचून न जाण्याची मानसिकता आमच्या अंगी बाणवली! वेळ पडल्यास अंगावर संकटांचा मारा झेला पण प्रतिकार न करताच पराभूत होऊ नका ही शिकवण दिली. कठोर मनोनिग्रह, संयम आणि चिकाटी या गुणांची कास धरली असता मोठ्या दिव्यांतून सुखरूप बाहेर पडता येतं हेही आमच्या तरूण मनावर बिंबवलं! आणि त्याचबरोबर यशाची कितीही उत्तुंग शिखरे पादाक्रांत केलीत तरीही पाय होमक्रीजमध्ये फर्म असायला हवेत असा उपदेश आपल्या खेळातून आणि वागण्यातून तो नेहमीच देत आला आहे!

सचिन आजही त्याच्या या खेळीला आपल्या सर्वोत्तम खेळींपैकी एक मानतो. कालौघात अनेकांना त्याच्या या खेळीचा विसर पडेलही कदाचित. एका साधारण क्रिकेटरसिकासाठी शारजातल्या त्याच्या वादळी, झंझावाती १४३ धावांच्या खेळीइतकी ही २४१* धावांची खेळी संस्मरणीय नसेलही कदाचित. पण स्टीव्ह वॉला एकदा विचारा, सचिनची तुझ्या दृष्टिने सर्वोत्तम खेळी कोणती.. तो नक्कीच सांगेल.. जिथं मी संपलो तिथं नवा सचिन सुरू झाला.. नक्कीच सिडनी कसोटीतील २४१*!
आणि खरंच.. जिथं लारा, स्टीव वॉ सारखे दिग्गज संपतात.. तिथंच आपला सचिन सुरू होतो!!

॥इति सिडनीपुराणम्॥

(सर्व फोटो आणि आकडेवारी क्रिकइन्फोवरून साभार)

-- मेघवेडा

क्रीडाआस्वाद

प्रतिक्रिया

प्रभो's picture

3 May 2010 - 11:00 pm | प्रभो

शेवटी सिडनीपुराणाला वेळ भेटला म्हणायचा तर!!!!

एकच शब्द....जबरदस्त!!!

ऋषिकेश's picture

3 May 2010 - 11:06 pm | ऋषिकेश

काय बोलणार! कधी नव्हे तो क्रिकेटवरील लेख वाचून डोळ्यात पाणी तरारलं

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

सुचेल तसं's picture

3 May 2010 - 11:47 pm | सुचेल तसं

अप्रतिम रे मेघवेडा!!!! आठवड्याला किमान एक लेख लिही राव तू क्रिकेटवर....

योगी९००'s picture

4 May 2010 - 12:09 am | योगी९००

लेख छान झालाय..पण नाव सिडनीपुराणम् या ऐवजी सचिनपुराणम् असे नाव द्यायला हवे होते..कारण..

शेवटच्या दिवसाचा तर क्षणन् क्षण थरारक होता. कुंबळेचा खतरनाक स्पेल, पार्थिव पटेलचं स्टीव वॉ ला डिवचणं, गांगुलीची आक्रमकता, स्टीव्ह वॉने घेतलेल्या प्रत्येक धावेवर होणारा टाळ्यांचा कडकडाट सर्व काही विलक्षण! घरात टीव्हीवर बघताना सुद्धा थरार जाणवत होता!

कारण शेवटच्या दिवसाविषयी फारच त्रोटक लिहिले आहे..हा दिवस सुद्धा तितकाच थरारक होता जशी सचिनची खेळी....

खादाडमाऊ

प्राजु's picture

4 May 2010 - 12:24 am | प्राजु

अशक्य लिहिलं आहेस..
जियो!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

वाचक's picture

4 May 2010 - 12:26 am | वाचक

क्रिकेटविषयीची 'पॅशन' आणि सचिन बद्दलची भक्ती जाणवतेय अगदी.
जर शेवटच्या दिवसाबद्दल, आक्रमण आणि बचावाच्या डावपेचांबद्दलही येउ द्यात.

शानबा५१२'s picture

4 May 2010 - 9:55 am | शानबा५१२

धाग्याशी संबंधितच असावा. - संपादक

*************************************************
देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे!
ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.

राजेश घासकडवी's picture

4 May 2010 - 11:03 am | राजेश घासकडवी

आणि एखाद्या बापाने आपल्या पोरीला छेडणार्‍या टपोरी पोराच्या कानाखाली साण्णकन् हाणावी तशा आवेशात हाणलाच एक जोरदार पुल!!

वा. प्रतिभा ओसंडून चाललेली आहे. भक्ताला परमेश्वर दिसल्यावर सर्व बंधनं तुटतात, तसं काहीसं. हा लेख वाचून आम्हासारख्या मर्त्य माणसांना देवाबरोबरच इतक्या निस्सीम भक्तीचंही दर्शन घडलं...

राजेश

जे.पी.मॉर्गन's picture

4 May 2010 - 12:31 pm | जे.पी.मॉर्गन

जहबर्‍या लेख रे मित्रा...... अचाट लिहीलं आहेस ! आणि लाइक अ ट्रू स्पोर्ट्स्मन, साहेबांचा जयघोष करतांना इतरांचं विस्मरण होऊ दिलं नाहीस. वॉ, द्रविड, लक्ष्मण, गांगुलीची कॅप्टनसी... सगळ्यांचा उल्लेख खूप खूप महत्त्वाचा होता.

>>पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर "पार बोअर केलान सचिनने आज.. अरे सोडतो कसले हाणायचे सोडून.. या सचिनला पण काय झालंय ना.. अरे काय ते.. किती कूर्मगति" असल्या कमेंट्स पास होत होत्या.<<
अरे शास्त्रीय संगीताला बोअर म्हणणारे, गझलांना रडगाणं म्हणणारे, बुद्धीबळाला कंटाळवाणा प्रकार म्हणणारेही महाभाग आहेतच की. आपण फक्त "हाय कम्बख्त तूने तो पी ही नहीं" म्हणायचं आणि आपल्या वारुणीचा आस्वाद घ्यायचा ! मैफिलीतल्या आलाप जोड झाल्याइतकाच विशेषतः कसोटी क्रिकेटमधला बॅट्स्मन "सेटल" होण्यापर्यंतचा त्याचा खेळ आनंद देणारा असतो हे क्रिकेटचं "वेड" लागलेलाच समजू शकेल. साहेबांच्या जागी दुसरा कोणी असता तर "मरू दे तिच्यायला" म्हणून आडवे तिडवे फटके मारून विकेट फेकून मोकळा झाला असता. "सच्या म्हणजे केवळ टॅलेंट आहे" म्हणणार्‍यांना क्रिकेट मधलं काही समजत नसतं ! ह्या लेखात सच्याच्या खेळाचा हा खूप महत्त्वाचा पैलू तू दाखवलास ! आपल्या कॉमन टिळ्या-माळेचा अभिमान वाटला ! अप्रतीम झालंय लिखाण ! जियो !!

जे पी

विशाल कुलकर्णी's picture

4 May 2010 - 12:50 pm | विशाल कुलकर्णी

नादखुळा रे...

सगळी मॅच डोळ्यासमोर उभी राहीली मित्रा. पुनःप्रत्ययाचा आनंद की काय म्हणतात ते हेच! जहबहरा.... एकदम मस्त !

कसला बहरला आहेस मित्रा ! त्रिवार मुजरा स्विकारा सरकार !
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

भोचक's picture

4 May 2010 - 6:24 pm | भोचक

मस्त लिहिलंय. बाकी गांगुलीच्या कॅप्टन्सीबद्द्ल वाचायला आवडेल. भारतीय मानसिकतेत आक्रमकता भिनवलेल्या गांगुलीने विजयाच्या सातत्याची सवय आपल्याला लावली.

(भोचक)
महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव

चतुरंग's picture

4 May 2010 - 7:18 pm | चतुरंग

आपल्या बॅडपॅचमधून फक्त आपणच आपल्याला बाहेर काढू शकतो हे सचिनने सिद्ध केलं - कोणत्याही मोठ्या होऊ पहाणार्‍या खेळाडूसाठी हा वस्तुपाठ आहे.
अशावेळी शैली बदलायला लागली तरी चालेल कारण ते तात्पुरतं असतं. आपल्या आतल्या आवाजाशी इतकं प्रामाणिक राहणं हे त्या खेळावर जिवापाड प्रेम असल्यामुळंच शक्य होतं!
बहारदार लेखन, जियो!!

चतुरंग

जे पी मॉर्गन आणि मेघवेडा....आता क्रिकेट विषयी उचंबळून लिहिणारे दोघे जण मिपावर आहेत...त्यांच्या लेखांच्या long-standing partnership ची वाट पाहणार आता!

मेघवेडा: फारच छान लिहिलंय, आणखी येऊ द्यात.

संदीप चित्रे's picture

4 May 2010 - 10:52 pm | संदीप चित्रे

मी माझ्या मित्रांशी बोलताना नेहमी हेच म्हणतो की च्यायला त्या तेंडल्याला स्वत:चं क्रिकेट आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त समजतं .. त्याची संपूर्ण कारकीर्द आपल्या बघायला मिळतेय हेच आपलं मोठं भाग्य आहे.. त्याला शिव्या देणारे आपण कोण?

वीरेंद्र सेहवाग म्हणाला होता की ह्याच सामन्याच्या आदल्या सामन्यात सचिनने त्याला सांगितले होते की मी पुढच्या सामन्यात शक्यतो कव्हर ड्राईव्ह मारणार नाहीये कारण मी त्यामुळे बाद होतोय. सेहवागला वाटायचं हे शक्य नाही कारण कव्हर ड्राईव्ह न मारून शतक कसं करणार?
सिडनेला सेहवागच्या लक्षात आलं की ह्याने खरंच कव्हर ड्राईव्हज मारले नाहीयेत !
सचिनबद्दल सेहवाग जे भरभरून बोलला आहे त्या लेखाचा दुवा इथे देत आहे.

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 May 2010 - 10:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मेव्या, मस्त लिहीलं आहेस. मी पण आख्खा लेख वाचला.

अवांतरः तुझा (आणि जे.पी. मॉर्गनचा देव आता ट्वीटरवर आहे, sachin_rt नावाने)

अदिती

जे.पी.मॉर्गन's picture

5 May 2010 - 11:12 am | जे.पी.मॉर्गन

अदिती,

सच्या ट्विटर वर आलाय आणि ११ तासांच्या आत त्याचे १८ हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स झालेत... ट्विटर सर्वर्सची आता खरी परीक्षा आहे !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 May 2010 - 11:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ट्विटर सर्वर्सची आता खरी परीक्षा आहे !

हा "सच्चा" भक्त! :-)

अदिती

जे.पी.मॉर्गन's picture

6 May 2010 - 11:00 am | जे.पी.मॉर्गन

आकडा आता लाखाच्याही बराच पुढे गेलाय..... अभी तो ये सिर्फ शुरुवात है .. आगे आगे देखिये होता है क्या !

प्रमोद देव's picture

5 May 2010 - 11:52 am | प्रमोद देव

मेव्या...खूपच छान लिहितोस तू.
मीही सुनील आणि सचिनचा पंखा आहे...पण मला असं कधीच नाही लिहिता येणार..
इथे मिपावर ती प्रतिभा तुझ्यात आणि जेपीमॉ मध्येच आहे...लगे रहो...पुलेशु.

फारएन्ड's picture

6 May 2010 - 5:43 am | फारएन्ड

खूप छान वर्णन आहे. मीही ही पूर्ण मॅच पाचही दिवस बघितली होती. आधी प्रचंड काम केल्यामुळे जानेवारी चा पहिला आठवडा आम्हाला सुट्टी दिली होती आणि १ तारखेच्या संध्याकाळपासून ही बघायला मिळाली. (ऑस्ट्रेलियातील सामने म्हणजे उसगावात पर्वणी - कारण संध्याकाळी ४-५ च्या सुमारास चालू होतात).

मला आणखी एक आवडले म्हणजे लक्ष्मण च्या खेळाचा उल्लेख. दुसर्‍या दिवशी मॅच 'बॅलन्स' मधे असताना सचिन आक्रमक नव्हता तेव्हा लक्ष्मण ने ब्रेट ली ला तूफान धुतला होता. आणि सचिन वरचे प्रेशर काढून घेतले होते. त्याचे महत्त्व येथे दिल्याने व्यक्तिपूजक लेखामध्ये होते तसे झाले नाही.

अजून लिहा. वाचायला आवडेल.

अस्मी's picture

10 May 2010 - 2:21 pm | अस्मी

अशक्य....!!! एक नंबर लिहिलयंस रे...

जिथं लारा, स्टीव वॉ सारखे दिग्गज संपतात.. तिथंच आपला सचिन सुरू होतो!!

absolutely

असंच लिहित राहा :)

- अस्मिता

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
ओळखेल कुणीतरी मला माझ्यापेक्षा जास्त..
स्वतः सूर्याला तरी कुठे दिसतो सूर्यास्त