सर, इतकं जिवापाड प्रेम करु नका !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
19 Oct 2007 - 1:31 am

              एखादा दिवस असा उजाडतो की, त्यादिवशी निर्णय घ्यायचाच असतो. खूप काळ टाळुनही अखेर अटळ असलेला.   आपण वेगळे होणार नसतो पण आपल्यातलं अतंर वाढणार होतं,  हे तुही मान्य करत नाही अन मीही. आभाळ भरुन आल्यावर भावनाशील होतो आपण. गुलमोहराच्या झाडावर फुले असतात तो पर्यंत नजर हटत नाही, अन शब्द संपत नाही  त्याचे कौतुक करतांना. काहीतरी असावं लागते काही तरी जाणवण्यासाठी.  तु अशीच महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीत भेटलेली....आणि मग प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन तुझेच. तुझे निराळेपण अधीकच भावत गेले आणि आपण  अधिक जवळ आलो. त्याचे रुपांतर मैत्रीत कधी झाले कळलेच नाही,  हा माझ्या दोस्तीचा प्रवास.  कधीतरी निर्हेतूक भटकणे, बसमधील नियमित महाविद्यालयापर्यंतचा प्रवास, भान हरपून मारलेल्या गप्पा, हे सारे जरा विचित्रच. मला अजूनही खरे वाटत नाही, तुझे माझ्यापासून दूर जाणे.  सुखः दु:खाविषयी बोललो, कळत नकळ्त, अधिकाधिक गुंता वाढवत परस्पर संबधाचा ! म्हटले तर,  तसे बोलण्यात अनेक विषय अन प्रश्नही न सुटलेले.  कधीतरी गृहीत धरुन घेतो आपण अनेक प्रश्नाची उत्तरे. तुझ्या डोळ्यात पाहतांना तुझी भीती वाटते. खरे तर तसे काही नव्हते ? पण मीही जपले स्वत:ला. माझे सर्वच तुला माहित आहे, मी तुला कधी सांगीतले नाही अन तु ते मला कधी विचारलं नाही.  तु म्हणतेस, सर, तुम्हाला कोणीही फसवू शकते, असे म्हणत असतांना तू मला फसवायचं काहीच कारण नाही. किंबहुना तू मला फसवूच शकत नाही, हे माझे विधान म्हणजे , मी शांतपणे सारे काही स्वीकारतो आणि आहे त्याला सामोरे जातो. यातले सर्वच माझ्यापासून विलग होणार हे जाणतो मी, पण छातीत असह्य कळ आली की मला तुझी आठवण होते. देण्यासारखे माझ्याकडे काही नाही आणि तुमच्याकडे आहे तरी काय ! असे जेव्हा तु बोलतेस,  तेव्हा मला खिन्न वाटते, स्वत;चे रुप एखाद्या जूनाट इमारतीसारखे....! पण लगेच... मी हे गमतीने म्हणते हं ! असं म्हणायचं . मला हे आवडते, ते आवडत नाही, राग येतो, वाईट वाटते, तुमच्याकडून ही अपेक्षा नाही.......... हे सर्व मला आवडलेच पाहिजे असे नाही. ....पण तुझ्या गप्पांच्या मैफिलीत रमतो मी. असे अनेकदा घडलंय,  हॉटेलमधील वेटर काही बोलायचा नाही, पण हसायचा ! मग लक्षात यायचं इथून गेले पाहिजे.  निघतांना काहीतरी बोलणं राहून जायचे.  पुढच्या भेटीपर्यंत तीच घुसमट. तुझ्याजवळ काय आहे,  ते मी कधी सांगीतले नाही.   पण तुझ्याकडे आहे, अमर्याद आकाश, सततची समुद्रगाज आणि एक विश्वास झूळझूळ्त्या स्फटीक पाण्याच्या स्पर्शासारखा. तुझ्या माझ्याकडे पाहाणा-यांच्या मनात काय चाललंय, हे ओळखण्याइतपत मनकवडे आपण.   तुझी ओळख करुन देतांना मी कधीच अडखळलो नाही...सरळ सांगायचो ' ही माझी मैत्रीण', पण तुला ते जमलेच नाही. 'हे माझे सर' म्हणत असतांना, मी स्वतःला दूर जंगलात टेकडीवर पोर्णिमेच्या भिजत्या थंडीसह, अपरात्री, त्रयस्थासारखा वाटतो , हे तू कधी पाहिलेच नाही.  जे विसरायला हवं ते विसरता येत नाही.   जे आठवाय्ला हवं ते आठवत नाही.   मला आठवताहेत माझे साजरे केलेले सर्वच वाढदिवस यात वेगळं काही नाही. कारण तू सर्वांचेच वाढदिवस साजरा करतेस. तुझे फ्रेंडसर्कल तसे मोठेच आहे.   अर्थात तेही मला जमले नाही. .........!
              खूप दिवसानंतर भेटलेल्या माझ्या मैत्रीणीशी बोलतांना माझे रितेपण तू पाहिले आहे, विसरावे असे काहीच नसते. तुझ्याकडे यायचंय मला. पाऊस पडून गेलेल्या सायंकाळी, मंद उदास प्रकाशात... मी वाचणार आहे माझी कविता तुझ्या परवानगीशिवाय. असा विचार येतेवेळी फुलदाणीत आलेला निर्जीवपणा विसरता येत नाही. तुझ्यापासून मी काय लपवून ठेवू ? माझ्या ओठापर्यंत आलेला शब्द मला परत गिळता येत नाही. मी तुझ्यासमोर संपूर्ण काळोखी गुहेसारखा. तू फूलपाखराइतकी सहज वावरतेस त्यातल्या एक एक दालनात. तुला ठाऊक आहे, माझ्या आत्मविमन्सकतेचा ढासळत जाणारा प्रत्येक कोपरा आणि कदाचित एखाद्या जागी असलेली खोल अंधारात प्रेमाची ओल. तुझ्यापासून मी काय लपवून ठेवू ? उभा आहे मी तुझ्याच सुफल सहवासाच्या मातीवर ! 'सर, यानंतर इतके जिवापाड प्रेम कोणावर करु नका ! तुम्हाला ते जमत नाही, हे सांगायला तू विसरत नाही. लेणीतील शिल्प असो, की निसर्गचित्राचे दालन. ते पाहतांना त्यावरची तासनतास चर्चा.  माझ्या लक्षात आलंय, मी तुझ्या चित्रात आहे, रंगात आहे, कुंचल्यात आहे, मी तुझ्यात आहे, तुझ्या डोळ्यातल्या इवल्याशा एकाकी प्रतिमेसारखा. गाण्याच्या मैफलीत तू गाणं गातेस तेव्हा मी डोळे मिटून तुझ्या दूर जाण्याचा विचार करतो, का ? तू पुन्हा येशील तेव्हा तू लावलेलं गुलमोहराचे झाड वाढलेले असेल न ओळखण्याइतके. म्हणूनच माझ्या मैत्रीचा पराभव झाला असं वाटतं ! अंधूक प्रकाशात दाटून आलेला हूंदका मला नेईल कदाचित जुन्या काळात. सारे काही स्तब्ध झाल्यावर तुझ्या गाण्यांचा आवाज आणि अर्थही कधी समजेल मला. पण मीच पुन्हा आल्याचं कळवणार नाही कुणाला. खूप थंडी असेल तर बरोबर घेऊन येईन आठवणीने माझा नेहमीचा ओव्हरकोट. दु:ख गुरफटून घेता येईल इतका ढगळ शिवलेला. तोच एक धागा सुखाचा अन........!

मुक्तक

प्रतिक्रिया

सहज's picture

19 Oct 2007 - 7:35 am | सहज

वा! काय मन उघडून दाखवलय. किती सहज, किती आकर्षक. जसे आडवाटेत एका जागी अचानक एक वेगळेच फूल नजरेस पडते व काही क्षण आपण त्या सुंदर फुलाचे रंग, पा़कळ्या, नाजूक आकार, स्पर्श, मंद सुगंध ह्यात मंत्रमुग्ध होउन जातो. तसे झाले.

ह्याला म्हणतात "मनातले "...खूपच आवडला.

मला एकेक वाक्य लिहून वा वा क्या बात है, हे सहीच असे लिहायला आवडत नाही पण काही वाक्य / भावना एकदमच थेट आत भिडल्या. :-)

परत नेहमी सारखेच आम्ही भुंगे आपल्या नव्या मनःपुष्पाच्या उमलायची वाट पहात आहे, पण सध्या ह्या रसास्वादात तृप्त आहोत, मधाळत आहोत.... मनसोक्त!

प्रमोद देव's picture

19 Oct 2007 - 8:06 am | प्रमोद देव

डॉक्टरसाहेब काय सुंदर शब्दात मांडलेय तुमची वेदना !
अप्रतिम लिहिलेय.
(पण असे सारखे सारखे गुंतू नका बरे.)

विसोबा खेचर's picture

20 Oct 2007 - 11:03 am | विसोबा खेचर

गुलमोहराच्या झाडावर फुले असतात तो पर्यंत नजर हटत नाही, अन शब्द संपत नाही त्याचे कौतुक करतांना.

पण तुझ्याकडे आहे, अमर्याद आकाश, सततची समुद्रगाज आणि एक विश्वास झूळझूळ्त्या स्फटीक पाण्याच्या स्पर्शासारखा.

वा बिरुटेसाहेब! अतिशय सुरेख लिहिलं आहे तुम्ही...

एखादी सुंदर कविताच वाचतो आहे असं वाटलं!

हृदयाला हात घालणारा, संग्रही ठेवावा असा लेख...

कधी काळी आमच्याही आयुष्यात आली होती अशीच एक सालस! आम्ही तिला पटवली होती, अगदी प्रयत्नपूर्वक! :)

तुमच्या लेखाने आमच्या दोघातल्या खूप आठवणी जाग्या झाल्या.. पुढे काही दानं चुकीची पडली आणि आमच्या वाटा वेगळ्या झाल्या! असो..

तात्या.

अर्धवटराव's picture

9 Apr 2010 - 12:46 pm | अर्धवटराव

तरीच... !!!

(नियती स्वीकारणारा) अर्धवटराव
-रेडि टु थिन्क

प्रकाश घाटपांडे's picture

21 Oct 2007 - 12:42 pm | प्रकाश घाटपांडे

" फायनल ड्राफ्ट" या नाटकाची आठवण झाली.
तु म्हणतेस, सर, तुम्हाला कोणीही फसवू शकते

तुम्हाला एक व्यक्ती कधीही फसवू शकणार नाही . ती म्हणजे आपण स्वतः
मी लेख अक्षरशः डोळे मिटून बघितला. ( डोळ्यातलं पाणी कुणी चुकुन बघितलं तर?)
प्रकाश घाटपांडे

राजीव अनंत भिडे's picture

21 Oct 2007 - 2:33 pm | राजीव अनंत भिडे

फारच सुंदर लेखन. फार आवडले!

वरील सर्वांच्या प्रतिसादांशी सहमत आहे. हा लेख मिसळपावला नक्कीच एका अत्यंत तरल अशा भावनात्मक पातळीवर नेऊन ठेवतो असे मला वाटते.

प्राध्यापक महाशय, आपल्याकडून अजूनही अशाच उत्तमोत्तम लेखांची अपेक्षा आहे,

राजीव अनंत भिडे,
हिंदु कॉलनी, मुंबई.

बेसनलाडू's picture

21 Oct 2007 - 3:06 pm | बेसनलाडू

विस्कळीत स्वरूपातले, प्रामाणिक भावनांमधून उतरलेले लेखन वाटले. औटघटका असे सैरभैर वाचायला मिळणे, हा एक प्रकारचा रुचिपालट म्हणावा काय? लिहीत रहा.
(शुभेच्छुक)बेसनलाडू

प्रियाली's picture

21 Oct 2007 - 5:17 pm | प्रियाली

>>विस्कळीत स्वरूपातले, प्रामाणिक भावनांमधून उतरलेले लेखन वाटले. औटघटका असे सैरभैर वाचायला मिळणे, हा एक प्रकारचा रुचिपालट म्हणावा काय? लिहीत रहा.

लेखन वाचल्यावर नेमका प्रतिसाद काय लिहावा असा प्रश्न पडला होता. बेसनलाडूच्या प्रतिसादाने तो "सहज" सुटला.

धनंजय's picture

22 Oct 2007 - 1:39 am | धनंजय

प्रामाणिकपणा अत्यंत प्रभावी आहे. लेखनाची चौकट मात्र थोडी बुचकळ्यात पाडणारी आहे. त्यामुळे "आपल्याला समजले की नाही" असा विचार करत अजून प्रतिसाद दिला नव्हता : तीन-चार वेळा वाचण्यासारखे हे स्फुट खासच आवडले.

नंदन's picture

22 Oct 2007 - 2:12 am | नंदन

म्हणतो. सहमतीशी सहमत आहे :)

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

कोलबेर's picture

22 Oct 2007 - 2:18 am | कोलबेर

सहमतीच्या सहमतीशी सहमत आहे :-)

स्वाती दिनेश's picture

21 Oct 2007 - 5:10 pm | स्वाती दिनेश

प्रामाणिक भावनातून उतरलेले लेखन वाटले.
हेच मलाही वाटले.
स्वाती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Oct 2007 - 10:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरे तर हा लेख , यापुर्वी दै. लोकमत मधे प्रसिद्ध झालेला होता. आता काही महिण्यांपुर्वी लिहिलेला असल्यामुळे , इथे लिहितांना आणि टंकण्याच्या त्रासामुळे त्यात अनेक बदल सुचत गेले. त्यामुळे त्यात विस्कळीतपणा आलाही असेल. पण, हा लेख आम्ही साहित्यप्रकारातील 'ललित' हा प्रकार हाताळून पाहण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात म्हणतात की, कमी शब्दातून अधिक आशय वाचकाला, अनेकानेक अनुभवासहीत आस्वादता आला पाहिजे, सार्वत्रिक अनुभव देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे आणि तसा करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला. एक सुंदर, तरल भाव-भावनांची, दीर्घ कविता वाचत आहोत असा अनुभव वाचकाला यावा असा आमचा प्रयत्न होता. आपल्या सर्वांच्या प्रतिसादाने लेखकाचा उत्साह वाढला, वाढवला आहे, अजूनही या लेखन प्रकारात आम्हाला काही सुधारणा नक्कीच करता येतील, तेव्हा प्रतिसादाबद्दल..........

सहजराव, देव साहेब, तात्या,घाटपांडे साहेब्,राजीव, बेसनलाडू , प्रियाली, धनंजय,नंदन, कोलबेर आणि स्वातीजी आपले सर्वांचे आभार मानतो , त्यामुळेच लिहिण्याचे बळ येते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गुंडोपंत's picture

24 Oct 2007 - 11:01 am | गुंडोपंत

सरांचे स्फुट आवडले!
प्रेमाची साधी पण तितकीच गुंतागुंतीची भावना प्रभावीपणे व्यक्त केलीत!

नेहमीच नवनवीन साहित्याचे प्रकार देणारे सर, कोणताही साहित्यप्रकार लिलया हाळू शकतात यात शंका नाही!
हृदय सहजतेने उलगडून दाखवणारे आपले शब्द आवडले.
नितांत सुंदर अलवार काहीतरी वाचण्याचा आनंद मिळाला.
आवडले.

वर काही सदस्यांनी म्हंटले आहे की हा आपला अनुभव असावा... असेलही!

पण जर तसे नसेल तर, आपले इतरांच्या मनाचे स्पंदन इतक्या समर्थपणे व्यक्त करता येणे हे अगदीच अप्रतिम मानावे लागेल!

आपला
गुंडोपंत
(सरांच्या साहितसाहित्याचा)

शुचि's picture

9 Apr 2010 - 6:29 am | शुचि

कोमल हळूवार भावनंचं सुंदर कोलाज
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

पाषाणभेद's picture

9 Apr 2010 - 7:15 am | पाषाणभेद

मस्त लेख. सुंदर भावना कागदावर उतरल्यात.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Apr 2010 - 10:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शुचि आणि पाषाणभेद प्रतिसादाबद्दल आभारी.....!

आपल्या प्रतिसादामुळे नुसता धागा नव्हे, आठवणीही वर आल्या....!
धन्यु....!

-दिलीप बिरुटे

शानबा५१२'s picture

9 Apr 2010 - 11:50 am | शानबा५१२

सर, इतकं जिवापाड प्रेम करु नका !

च्यायला हे आम्हाला कधी कोणाला बोलावसच वाटल नाही
कारण तशी वेळच नाही आली कोणी तस भेटण्याची

*******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****
LATEST : D,तु मेर को भलते टाईम मे क्यु मिली?

मदनबाण's picture

9 Apr 2010 - 1:06 pm | मदनबाण

अप्रतिम... :)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

जयवी's picture

9 Apr 2010 - 1:34 pm | जयवी

अहा....... अतिशय तरल...खरंच ....सुंदर कविता वाचतेय असं वाटलं.
बेसनलाडूशी अगदी सहमत आहे.
राजासाब....... आप तो छा गये......!!

वाहीदा's picture

9 Apr 2010 - 2:31 pm | वाहीदा

तुझ्याकडे यायचंय मला. पाऊस पडून गेलेल्या सायंकाळी, मंद उदास प्रकाशात... मी वाचणार आहे माझी कविता तुझ्या परवानगीशिवाय. असा विचार येतेवेळी फुलदाणीत आलेला निर्जीवपणा विसरता येत नाही. तुझ्यापासून मी काय लपवून ठेवू ? माझ्या ओठापर्यंत आलेला शब्द मला परत गिळता येत नाही. मी तुझ्यासमोर संपूर्ण काळोखी गुहेसारखा. तू फूलपाखराइतकी सहज वावरतेस त्यातल्या एक एक दालनात.! .....

अप्रतिम !! =D>

~ वाहीदा

अरुंधती's picture

9 Apr 2010 - 3:40 pm | अरुंधती

आवडलं! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

रमेश भिडे's picture

8 Jun 2016 - 5:37 pm | रमेश भिडे

छान लेख असल्याने वर काढतोय.

सर, लिखाण आवडलंय.

किंबहुना तू मला फसवूच शकत नाही, हे माझे विधान म्हणजे , मी शांतपणे सारे काही स्वीकारतो आणि आहे त्याला सामोरे जातो. यातले सर्वच माझ्यापासून विलग होणार हे जाणतो मी, पण छातीत असह्य कळ आली की मला तुझी आठवण होते. देण्यासारखे माझ्याकडे काही नाही आणि तुमच्याकडे आहे तरी काय ! असे जेव्हा तु बोलतेस, तेव्हा मला खिन्न वाटते, स्वत;चे रुप एखाद्या जूनाट इमारतीसारखे....!
हा उतारा वाचुन क्षणभरासाठी हताश थकलेला प्रियकर डोळ्यांसमोर तरळुन गेला.
असफल प्रेमाची वेदना जाणवली.
मिसरा गालिब का कैफियत सबकी अपनी अपनी.
सुंदर लेख
आवडला.

विवेकपटाईत's picture

8 Jun 2016 - 7:24 pm | विवेकपटाईत

आयुष्यात घडलेली खरी घटना वाटते. एवढे प्रभावी भावनाशील लेखन कधी कधीच वाचायला मिळते. जुन्या जखमा.....

मी वाचणार आहे माझी कविता तुझ्या परवानगीशिवाय. >>>मी खल्लास झालो हे वाचलं कि…. सुंदर लेख आहे… व्वा…

नीलमोहर's picture

9 Jun 2016 - 1:12 pm | नीलमोहर

सुरेख लिहीलेय, अगदी भावविभोर..

प्रचेतस's picture

9 Jun 2016 - 1:21 pm | प्रचेतस

सर हल्ली लिहित नाहित.
त्यांनी पुन्हा लिहितं व्हावं ही विनंती.

सूक्ष्मजीव's picture

11 May 2020 - 10:21 pm | सूक्ष्मजीव

जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा.

या ओळींचा अर्थ असं काहीतरी वाचल्यावर जास्तच कळू लागतो.

अ प्र ती म !! याला मौक्तीक म्हणायचे काय? :-)

हे वाचून असे पुन्हा जाणवले - मिपाच्या समुद्रात अशी अनेक हिरे, माणके, मोती, मोहरा अजून आहेत; ज्यांचे खन करणे बाकी राहिलेले आहे. सुक्ष्मजीव यांचे हा धागा वर काढल्याबद्दल अनेक धन्यवाद.

बिपीन सुरेश सांगळे's picture

14 May 2020 - 9:31 pm | बिपीन सुरेश सांगळे

सुंदर सर

ती जखम अशी की
पुन्हा काळजात कळ आली
रिती विहीर सयीची
अन मनाचा तळ खाली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 May 2020 - 1:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अपनी इन खामोश ऑखों मे
और कितनी वफा रखू

तुम ही को चाहू और
तुम्ही से फासला रखू.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार...!

-दिलीप बिरुटे

पण हे धागालेखक हल्ली कुठेतरी हरवून गेलेत असं वाटतं. या आणि परत असं उत्स्फूर्तपणे लिहा बुवा डीबी सर.

प्रचेतस's picture

15 May 2020 - 1:40 pm | प्रचेतस

ते मोदींमध्ये हरवून गेलेत वाटतं.
लिहा हो असं तरल

खिलजि's picture

15 May 2020 - 3:56 pm | खिलजि

शप्पथ , जब्बराव लिवलंय .. आज ये खिलजी ढेर हो गया

प्रेमाचं पूर आलाय , जिथून तिथून त्या स्त्रीलिंगी नद्या खळखळ वाहत, दुथडी भरून , या आठवणींच्या

सागराला मिळाल्या .. अन मग मलाही उधाण आलं ..

=======================================================

तुला स्मरून मी हाता लेखणी धरतो

दिवा मालवतो अन पेटवतो एक मेणबत्ती

त्या मंद प्रकाशात मला तू दिसतेस

लेखणी तीच काम करत असते

मेंदू जरी सुन्न असला त्या आठवणींत

तरी हात चालूच असतात

आतून सौम्य धक्के बसत असतात

मेणबत्ती आणि माझं मन दोघेही वितळत असतात

त्या आठवणी , मात्र अश्याच बरसात असतात

कैक पत्रांवर,

तो मन प्रकाश आठवणींची तीव्रता कमी करत असतो

मी मात्र असाच लेखणी घेऊन लिहीत असतो

कितीवेळ याचे भान नसते

हळूहळू ज्योत मंद होत जाते आणि मळवट

अन , त्याबरोबर तुझी आठवणसुध्दा

खिलजि's picture

15 May 2020 - 4:24 pm | खिलजि

" मन प्रकाश " च्या ऐवजी मंद प्रकाश असे वाचा

" हाता " च्या ऐवजी हातात असे वाचा

मळवट च्या ऐवजी मालवते असे वाचा

प्राची अश्विनी's picture

15 May 2020 - 4:44 pm | प्राची अश्विनी

वाह!
का कोण जाणे पण "सर प्रेमाचे काय करायचे ?" आठवले.

सुबोध खरे's picture

15 May 2020 - 10:56 pm | सुबोध खरे

वा बिरुटे सर

दंडवत घ्या पामराचा

कुठेतरी खोल काळजात एक कळ उठली!

अशी कोणी मैत्रीण(दुर्दैवाने) नसली तरी भावना पार आतपर्यंत जखम करून गेली.

असंच लिहा आणि लिहीत राहा

ते राजकारण सारखं रुक्ष गद्य सोडून द्या तुमची प्रतिभा कोळपुन जाईल त्यात.

__/\__

सुबोध खरे's picture

15 May 2020 - 10:57 pm | सुबोध खरे

वा बिरुटे सर

दंडवत घ्या पामराचा

कुठेतरी खोल काळजात एक कळ उठली!

अशी कोणी मैत्रीण(दुर्दैवाने) नसली तरी भावना पार आतपर्यंत जखम करून गेली.

असंच लिहा आणि लिहीत राहा

ते राजकारण सारखं रुक्ष गद्य सोडून द्या तुमची प्रतिभा कोळपुन जाईल त्यात.

__/\__

यश राज's picture

15 May 2020 - 11:37 pm | यश राज

एकदम तरल भावना मांडल्यात