पुर्वार्ध : वडीलांच्या मृत्युनंतर गारगोटीचा शिरीष भोसले जगायला, पैसे कमवायला म्हणून मुंबईला राहणार्या आपल्या जिवलग मित्राकडे सतीशकडे येतो. इथे आल्यावर शिर्याला कळते की सतीश, त्याचा जिवलग मित्र ऑफीसच्या कामासाठी म्हणून परदेशी गेला आहे. मग सुरू होतो नोकरीचा शोध. याला शेंडी लाव्..त्याला टोपी घाल असे अनेक धंदे करता करता एके दिवशी .......
बिलंदर : भाग १ आणि २ : http://www.misalpav.com/node/11483
**********************************************************************************
"औध्या......... माझा दोस्त गेला रे. मारला त्या भडव्यांनी त्याला."
अवधूतला हा जबरद्स्त शॉक होता. तो मटकन खालीच बसला.
"शिर्या.....
"त्यातल्या एकाला तर आजच संपवलाय मी. या माझ्या हातांनी त्याची मान मोडलीय मी. त्यातल्या एकाला पण सोडणार नाहीय मी. एकेकाला रक्त ओकायला नाही लावले तर नावाचा शिर्या नाही. पण त्याच्या आधी ज्या कामासाठी माझ्या दोस्ताचा जीव गेला ते काम पुर्ण करणार आहे मी."
शिर्याच्या एकेका शब्दात अंगार भरलेला होता जणु.
"शिर्या तु काय बोलतोयस मला काहीही कळत नाही. अरे सत्या तर परदेशात गेलाय ना....?"
अवधूतचा स्वर रडवेला झालेला होता. गेल्या तीन वर्षात सत्याशी खुप घट्ट मैत्री जमली होती त्याची. त्याच्या प्रत्येक अडचणीच्या काळात सत्या सख्ख्या भावासारखा त्याच्या पाठीमागे उभा राहीला होता ठामपणे. तो जिवाभावाच मित्र आता या जगात नाही ही कल्पनाच त्याला मान्य होत नव्हती.
जरा वेळाने शिर्या शांत झाला आणि हळु हळू बोलायला लागला.....
"या सगळ्या गोष्टीला साधारण सहा महिन्यापुर्वी सुरूवात झाली. सत्याला इव्हेंट मॅनेजर म्हणुन प्रमोशन मिळाले, सत्याला थोड्या वरच्या वर्तुळात प्रवेश मिळाला. आणि एका नव्या जगाचे धागे दोरे त्याच्यासमोर उकलायला सुरूवात झाली....!"
"पण शिर्या, या सर्व गोष्टी तुला कुठे आणि कशा कळाल्या?"
अवधुतने शिर्याला विचारले तसा शिर्या बसल्या जागेवरून उठला. कपाटात ठेवलेली एक हॅवरसॅक त्याने बाहेर काढली. त्या हॅवरसॅकमधुन त्याने एक डायरी बाहेर काढली.
"घे हे वाच आणि या अशा तीन डायर्या भरल्यात औध्या. त्याही अवघ्या सहा महिन्यात तीन डायर्या.....! आता हे विचार, मला या डायर्या कशा आणि कुठे मिळाल्या? नाही..तु विचार रे.....!"
"शिर्या, जरा शांत हो रे. असा चिडू नकोस यार."
"शांत होवू.. अरे... अरे औध्या.. माझा मित्र मेलाय. त्याला त्या लोकांनी पुरला, का जाळला का..........
शिर्याचा आवाज दाटला, तोंडातून शब्द फुटेनात..... "किं त्याचे तुकडे करून गटारात..........., त्याचे मारेकरी उजळ माथ्याने फिरताहेत आणि मी षंढासारखा वाट पाहतोय संधीची. साला अजुन ते जिवंतपणे, राजरोस फिरताहेत आणि मी.....!"
"शिर्या शांत हो आधी....."
"सॉरी यार औध्या...पण काय करु यार? मेरा सबकुछ था यार वो.... कधी बापालापण भिक नाय घातली मर्दा, पण सत्याने सांगितलं ते डोळे झाकुन ऐकलं. त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकुन विश्वास टाकत आलो. सगळी व्यसनं, उलटे सुलटे धंदे सगळं सोडलं आणि हा नालायक मलाच सोडून गेला."
शिर्या ढसा ढसा रडायला लागला, तसा अवधुतने त्याला खांद्यावर हळुवारपणे थोपटले.
"शांत हो शिर्या, आता पुढे काय करायचं ते ठरवायला हवं. नक्की काय झालं होतं काही सांगशील का मला? " हा अवधुत काही निराळाच होता.
शिर्याने चमकून एकदम त्याच्याकडॅ पाहीले, पहिल्यांदाच त्याच्या चेहर्यावर स्मित आले.
"आता मला सांग, तुला हे नक्की कसं काय कळालं ते."
शिर्या गंभीर झाला.
"औध्या, काल सकाळी माझ्याशी बोलून तू बाहेर पडलास. मलाही इंटरव्ह्युसाठी दिड - दोन च्या दरम्यान निघावे लागणार होते. तसा वेळ होता हातात. म्हणुन थोडं "जाता येता" चाळत पडलो होतो. तेवढ्यात दाराची बेल वाजली. मी उठून दार उघडले तर कुरिअर होतं."
"सतिष देशमुख इथेच राहतात का? त्याचं एक कुरिअर परत आलय."
"दोस्ता, सतिष तर नाहीये, तो काही कामानिमीत्त शहराच्या बाहेर गेलाय. खरेतर देशाच्या बाहेर गेलाय. मी घेतो ना ते परत. दे इकडं."
"नाही साहेब, तसं कुणालाही देता येणार नाही. कुरिअर देताना त्यांनी तशीच अट घातली होती. ज्याच्या नावे आहे त्याला किंवा जर परत आले तर फक्त त्यांच्याच हातात ते देण्यात यावे अशी त्यांची मुख्य अट होती. त्यासाठी त्यांनी स्पेशल पेमेंटदेखील केलेय. तेव्हा सॉरी. हे पार्सल मी फक्त त्यांच्याच हातात देवू शकतो." कुरिअरवाला आपल्या भुमिकेवर ठाम होता.
"अं अं ठिक आहे दोस्ता, पण निदान ते कुणाला पाठवलं होतं ते तरी सांगशील की नाही. कदाचित मी काही मदत करू शकेन."
"औध्या, ते पार्सल सतिषने कुणाला पाठवलं होतं माहितीय?"
औध्याच्या चेहर्यावरचं प्रश्नचिन्ह अजुनच मोठं झालं.
"त्या पार्सलवर नाव होतं.... श्री. शिरीष भोसले.... पत्ता माझा गारगोटीचा होता. साहजिकच मी माझी ओळख पटवून ते ताब्यात घेतलं. औध्या ते पार्सल म्हणजे एक छोटंसं पाकीट होतं..त्यात फक्त दोन वस्तू होत्या. एक चावी आणि एका स्टांपपेपरवर लिहीलेलं कल्याणमधल्याच एका बॅंकेच्या नावे , माझ्या नावाने असलेलं एक ऑथोरिटी लेटर आणि लॉकर नंबर. मी लगेच बॅंकेकडे गेलो. बँकेच्या लोकांना पटवणं थोडं कठीण गेलं. पण एक तर ते ऑथोरिटी लेटर आणि आपली बोलबच्चनगीरी वापरून मी त्यांना पटवले. त्या लॉकरमध्ये एक बॅग होती... ती..."
शिर्याने त्या हॅवरसॅककडे बोट केलं.
*********************************************************************************
"अरे सुदेश, वो इरफान किधर है? आज आया नही? उसको सुबहसे फोन लगा रहा हू... फोनपे भी आ नही रहा है! "
"सर..त्याच्या घरी एक माणुस पाठवला होता सकाळी पण घरालाही कुलूप आहे. शेजारी पाजारी म्हणताहेत की काल तो घरी आलाच नाही. "
"सुदेश, थोडा चेक करो. ये बंदा थोडा सस्पिशिअस लग ही रहा था मुझे ! देखो इस बार मै कोई रिस्क लेना नही चाहता! बडा लॉट है इस बार. १२ पिसेस है! कमसेकम १०-१२ खोके की बात है... मुझे कोई लफडा नही चाहीये इस बार! वो कल्याणवालेका पेमेंट कर दिया ना पुरा? बाद में कोइ लफडा नही चाहीये मुझे."
"मै देखता हूं सर, आप फिकर मत करो. जायेगा कहा? रात को चला गया होगा किसी आर.एल.ए. में! मी माणसं पाठवतो त्याला शोधायला. और कल्याणवालेका पुरा पेमेंट सेटलमेंट कर दिया है, आप फिकर मत करो!"
"ओ.के. जैसे ही इरफान आ जाये, या उसका कुछ पता चले मुझे इनफॉर्म कर देना. आय एम लिव्हींग नाऊ. साडे सात बजे एक इंपॉर्टंट मिटींग है बिझिनेस के सिलसिलेंमें !"
"आप बेफिक्र रहो सर, मै इंतजाम कर लुंगा ! इरफान चा पत्ता लागला की तुम्हाला कळवतोच."
**********************************************************************************
"अवधुत.. त्या हॅवरसॅकमध्ये काही डायर्या, एका एन्व्हलपमध्ये सत्याचं मृत्यूपत्र आणि बाकीची कागदपत्रं... क्रेडिट कार्डं वगैरे होती. मृत्युपत्र पाहून मी ही हादरलो. मग त्या डायर्या वाचायला सुरूवात केली. त्या डायर्या चाळताना एक गोष्ट लक्षात आली की सत्या खुप मोठ्या प्रकरणात नकळत गुंतला गेला होता."
"म्हणजे मी समजलो नाही? सत्यासारखा माणुस कुठलीही चुकीची, बेकायदेशीर गोष्ट करणार नाही, याची खात्री आहे मला."
"मलाही आहे. म्हणुनच या प्रकरणाच्या मुळाशी जायचा निर्णय घेतला. कारण डायरीतील काही गोष्टी खुप भयानक आहेत औध्या. तुला तर माहीतीच आहे, सत्याची कंपनी मॉडेल्स हंट, टॅलेंट हंटसारखी कामे करते. वेगवेगळ्या स्तरातून गुणी माणसं... मग त्यात मुलं, मुली सगळेच आले, निवडून त्यांच्या कला गुणांना राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय पातळीवर वाव मिळवून द्यायचा. यातून त्याची कंपनीही प्रचंड कमिशन कमवते."
"बरोबर...! माहीत आहे मला. गेल्या महिन्यात मी सत्याला विचारलं पण होतं. माझी चुलत बहीण खुप छान गाते. गाण्याच्या परीक्षाही झाल्या आहेत तिच्या. तिच्यासाठी काही संधी मिळाली तर बघ म्हणालो होतो मी सत्याला. तर एवढा चिडला, म्हणला असल्या टॅलेंट हंट मधुन गुणवत्तेला वाव मिळत नसतो. तिला म्हणाव प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा... कधीना कधी नक्की संधी मिळेल. थोडा राग आला होता त्यावेळी सत्याचा, पण नंतर थोडा विचार केल्यावर त्याचे म्हणणे पटले मला."
अवधुत.. अरे सत्याने तुला नकार दिला कारण त्याच्या कंपनीचा खरा व्यवसाय काही वेगळाच आहे. अशा शोज मधुन मुलं, मुली गोळा करायचे. ही माणसं गोळा करताना शक्यतो फारसे पाश नसलेली, किंवा अगदी गरीब घरातून आलेली मुलं, मुली गोळा करण्यात यायची. त्यातल्या काही जणांना खरोखर त्याचे गुण, कला जगासमोर पेश करण्याची संधी मिळायची. बाकीच्यांना इंटरनॅशनल शो साठी म्हणुन दुबई, मस्कत ई. ठिकाणी पाठवण्यात यायचं. प्रत्येक काम मनापासुन करण्याची घाणेरडी खोड असलेल्या सत्याने या सगळ्याचं एक स्टॅटिटिक्स काढण्यासाठी म्हणून थोडा खोलवर जावून अभ्यास केला, तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की अशा ठिकाणी गेलेल्या व्यक्तीपैकी विशेषतः लहान मुले आणि तरुण मुलींपैकी ५० ते ६०% जण परत आलेलेच नाहीत."
"काय? तुला नक्की काय म्हणायचय शिर्या?"
अवधुत जवळजवळ ओरडलाच.
"मला पक्कं माहीत नाही. पण सत्याने एक छान शब्द वापरलाय यासाठी.... फ्लेश मार्केटिंग !"
"फ्लेश मार्केटिंग?... ते काय असतं बाबा आणखी?" अवधुत गोंधळात पडला होता.
" नो आयडीया... पण बहुतेक वेश्या व्यवसायाला किंवा त्याच्याशी संबंधीत व्यवसायाला फ्लेश मार्केटिंग म्हटलं जातं." शिर्याने अवधुतकडे रोखुन बघत उत्तर दिलं.
"म्हणजे तुला असं म्हणायचय की या अशा टॅलेंटहंटमधून गोळा केलेल्या तरुण मुली गल्फमध्ये वेश्याव्यवसाय किंवा तत्सम गोष्टींसाठी विकायचं काम सत्याची कंपनी करते? तसं असेल तर हे खुप भयंकर आहे. आपल्याला पोलीसांकडे जायला हवं शिर्या."
"गप बे... पोलीसांकडे जाण्यासाठी पुरावा लागतो. आणि सत्याच्या या डायर्या पुरावा होवू शकत नाहीत. अॅंड फॉर युवर काईंड इन्फॉर्मेशन, पुरावा मिळाला तरीही मी पोलीसांकडे जाणार नाही. माझ्या सत्याच्या मारेकर्यांना मी माझ्या हाताने शिक्षा देणार आहे."
"पण मग लहान मुलांचं काय होतं? त्यांचे आई-वडील पोलीसांकडे जात असतीलच ना? आणि त्यांना कुठे आणि कशासाठी विकले जाते?"
"औध्या, मुळात अशा कारणासाठी निवडली गेलेली मुले सरळ सरळ झोपडपट्ट्यांतुन उचलली , पळवली जातात. इतर कलाकारांबरोबर त्यांना बाहेर पाठवले जाते. पण ही मुले परत येत नाहीत. कुणी तक्रार केलीच तर कधी पैसे देवून, कधी धाक दपटशा करुन त्यांना गप्प बसवले जाते. आता या मुलांचा उपयोग काय म्हणशील तर गल्फ देशांतील अरबांच्या विकृत वासनांसाठी किंवा मग उंटांच्या शर्यतीसाठी."
शिर्याचा चेहरा तापलेल्या विस्तवासारखा भयंकर दिसत होता.
"हे खुपच भयानक आहे रे शिर्या. पण मग आता आपण काय करायचं?"
"मी माझ्यापरीने सुरूवात केलीय. काल मी सत्याच्या ऑफीसात गेलो होतो... नोकरी मागायला. माझा चेहरा आणि शरीर हे महत्त्वाचं साधन ठरू शकेल तिथे प्रवेष मिळवण्यासाठी. इंटरव्ह्यु देवून आलोय. तिथे मी माझी इमेज पैशासाठी काहीही करायला तयार असलेला एक तरुण अशी तयार करुन आलोय. विशेष म्हणजे इंटरव्ह्युच्या वेळी त्यांनी मला तुला लवकरच कळवू म्हणुन वाटाण्याच्या अक्षता लावल्या. पण त्यानंतर दोनच तासांनी मला त्यांच्या एका माणसाने गाठले."
"अच्छा, म्हणजे त्या लोकांनीच तुला मारहाण केली तर........!" अवधुत सावरुन बसला.
"चल बे, लाल मातीतलं शरीर आहे हे. तो किस्सा वेगळाच झाला.....!"
शिर्या कालचा तो प्रसंग डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करु लागला....
**********************************************************************************
इंटरव्ह्युनंतर शिर्या बाहेर पडला तो थेट समुद्रावर पोचला. डोक्यात विचारांचं थैमान माजलेलं.
सत्याचं नक्की काय झालं असेल? सत्या या क्षणी कुठे असेल? काय करत असेल? हजार प्रश्न..... हजार शंका.....
"पैसा कमाने आये हो दोस्त?"
कुठुनतरी प्रश्न आला आणि शिर्याने एकदम मान वळवून बघितले.
"कोण बे तू?"
"अरे दोस्त बोल रहा हुं तो दोस्त ही रहुंगा ना!"
"हे बघ राजा, आपण कुणाशीही अशी लगेच दोस्ती करत नाही. कोण आहेस आणि काम काय आहे ते बोल? मग ठरवेन दोस्त आहेस की......"
शिर्याच्या आवाजात खुन्नस होती.
"दोस्त... वहीसे हूं...जहा अभी तुम इंटरव्ह्यु देके आ रहे हो....! वैसे नाम इरफान है मेरा.........
क्रमशः
विशाल कुलकर्णी.
प्रतिक्रिया
18 Mar 2010 - 12:12 pm | हर्षद आनंदी
सही लिंक लागतीय, आता सूड कसा घेणार याची उस्तुकता!!
शिरवळकर ट्च जाणवला.. सही हे भिडू
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
18 Mar 2010 - 12:42 pm | संग्राम
ज ब रा
18 Mar 2010 - 12:47 pm | अस्मी
सॉल्लिड...पुढे काय होणार याची उत्सुकता आहे...
आणि एक...
??
- मधुमती
18 Mar 2010 - 1:02 pm | विशाल कुलकर्णी
मधुमतीतै त्याला पिवळा पितांबर म्हणतात.. ;-) चालायचच, समजुन घ्या ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
18 Mar 2010 - 2:13 pm | अस्मी
नाही अहो. तसं नव्हे...मला म्हणायच होतं की सत्या म्हणलय तिथे तुम्हाला शिरीष म्हणायचं होत का?
- मधुमती
18 Mar 2010 - 2:16 pm | अस्मी
नाही अहो. तसं नव्हे...मला म्हणायच होतं की सत्या म्हणलायत तिथे तुम्हाला शिरीष म्हणायचं होत का?
- मधुमती
18 Mar 2010 - 2:33 pm | विशाल कुलकर्णी
खरेच की! हे असं होतं बघा घाई केली की. बाकी धन्स आणि बदल केलाय.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
18 Mar 2010 - 6:17 pm | प्रभो
लवकर लिही रे पुढचा भाग.
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
18 Mar 2010 - 7:00 pm | गणपा
विशाल भौ लौकर टाका हो पुढचा भाग.
19 Mar 2010 - 1:20 am | स्वप्निल..
म्हणतो!!
18 Mar 2010 - 8:03 pm | अनिल हटेला
शिरवळकर ट्च जाणवला..
अगदी अगदी ...
पू भा प्र.....:)
बैलोबा चायनीजकर !!!
© Copyrights 2008-2010. All rights reserved.
19 Mar 2010 - 1:48 am | Pain
त्याच्या आधिच्या कामगिरिमुळे असेल कदाचित, पण शिरीषबद्दल थोडी शन्का आहे.