विनोदी स्तंभ लेखन
थाप
आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की आपली फजिती करून घ्यायची नसेल तर काही तरी शक्कल लढवून वेळ मारून न्यावी लागते. त्यावेळी सत्य-असत्य, खरे-खोटे याची तात्विक चर्चा करायला उसंत नसते. सत्य नेहमीच बोलले पाहिजे अशी अट घालून जीवन जगता येत नाही. शेळीचे दूध व सहा मनुकांवर सर्वांना आयुष्य कंठता येत नाही. गैरसोईच्या सत्याला अक्कल चालवून खरे करण्याच्या कलेला "थाप" असा सोईचा शब्द आहे.
जीवनात पहिली थाप साधारणपणे 'उशीर का झाला ?' या यक्षप्रश्नाच्या उत्तरातून प्रसव पावते. सुरवातीला प्रसव वेदना होतात. पण मग शाळा-कॉलेजात नंतर ऑफिसात वरचेवर घडणार्या पेचप्रसंगातून सराव होतो. पटाईतपणा येतो.
किरकोळ थापांपर्यंत ठीक कारण त्याचे फारसे कोणी मनावर घेत नाही. पण लफडी करणार्यांना थापांचे वरदान लागते. कॉलेजात पोरींवरून, ऑफिसात प्रमोशनसाठी तर सार्वजनिक कार्यात खोट्या प्रतिष्ठेपायी थापांना ऊत येतो.
काहींना आपल्या खर्या गोष्टी देखील थापा असाव्यात असे ऐकणार्याला वाटून नये म्हणून, 'आई शप्पत', 'आप बिलीव्ह नहीं करोगे', 'मैं झूट नही बोलता हूँ' अशी पुस्ती वारंवार जोडावी लागते.
फुशारकी थापेची नातलग. नसलेले गुण, पात्रता व हिम्मत फुशारकीला लागतात. शिकारी, लष्करातील शिपाईगडी यांना तिच्याविना राहवत नाही.
स्त्रीवर्गाला आपले वय आणि वजन सांगताना अभावितपणे थाप मारावी लागते. तेवढे सोडून बाकी गोष्टी फूगवून सांगण्यात त्यांना जे समाधान मिळते त्यामुळे त्या थापांना पुरूषवर्ग थाप मानतच नाहीत.
हास्यरस निर्मितीला अतिशयोक्ती हा गुण मानला तरी त्या थापाच असतात. आचार्य अत्र्यांनी साष्टांग नमस्कार नाटकात हा रस रावबहाद्दुरांच्या तोंडीच्या संवादात असा घातला आहे. 'रामदास स्वामींच्या हजारोंच्या संख्येने काढलेल्या दंड-बैठकांमुळे शिवथर घळीत पुरूषभर मोठा खड्डा पडला आहे. पण ते काहीच नाही. पुढे ते फुगवून म्हणतात,
"आम्ही देखील काही कमी नाही. बसल्या बैठकीला आम्ही हजार-हजार साष्टांग नमस्कार घालतो. अगदी आगगाडीच्या प्रवासात देखील. आहात कुठे महाराजा? पण मनातल्या मनात !"
आता कै. प्रल्हाद केशव अत्र्यांसारखा नाटककार गेल्या 5000 वर्षात झाला नाही म्हणून त्यांना सगळेच शोभून दिसते.
******
शब्द संख्या 280
प्रतिक्रिया
6 Oct 2009 - 7:59 pm | टारझन
आपल्या तिन गोष्टी हृदयाला भिडल्या लेखक मोहोदय
१. आपल्या लेखाचं नाव : "विनोदी स्तंभ लेखन थाप" जणु आगगाडीचे डब्बे, जाणुनबुजुन "हायफन" न वापरण्याचा प्रयोग आवडला.
२. फुशारकी थापेची नातलग. : फुशारकी आणि नातलग असे "अचानक" पाहुन अवाक् झालो :)
३. शब्द संख्या 280 : जबराट .. काय जबरदस्त स्वपरिक्षण केलं आहे.
उत्तेजनार्थ पॉईंट ४ : लेखाला १० पैकी ८ गुण. ( टायटलसाठी अर्धा गुण, "फुशारकी नातलग" साठी २ गुण, लेखणसंख्या मोजण्यासाठी दिड गुण, उत्तेजणार्थ ६ गुण मर्यादित शब्दसंख्येसाठी )
प्रतिसाद शब्द संख्या : मोजुन ल्ह्या रे कोणीतरी :)
- (णाडीप्रेमी) नशाकांत स्मोक
6 Oct 2009 - 8:03 pm | अवलिया
आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की आपली फजिती करून घ्यायची नसेल तर काही तरी शक्कल लढवून वेळ मारून न्यावी लागते.
काहीजण नाडीलेखन सोडुन विनोदी लेखन लिहितात.
उत्तेजनार्थ बक्षीस :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
6 Oct 2009 - 8:33 pm | विकास
"हा लेख एकदम आवडला" आणि ही थाप नाही! :-)
7 Oct 2009 - 1:39 am | प्राजु
गुड वन!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
7 Oct 2009 - 6:57 am | सहज
२८० शब्दांमधेच मधेच का उरकलेत? लिहा ना अजुन. चांगले लिहले आहे.
एकदा मोजले पाहीजेत २८० शब्द, नाहीतर थाप असायची.
बर ओळखा बरे, लेख चांगला आहे हे खरे की थाप....? ;-)
7 Oct 2009 - 8:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
चटपटीत लेख ... अर्थातच आवडला. छोटा झाला आहे खरा, पण त्यामुळेच कदाचित जास्त परिणामकारक वाटला.
अदिती
7 Oct 2009 - 9:45 am | चतुरंग
चना जोर गरमची एकच फक्की मारुन तोंडाला पाणी सुटावे आणि चने संपून जावेत तसे झाले! ;)
चतुरंग
7 Oct 2009 - 10:08 am | विजुभाऊ
'आप बिलीव्ह नहीं करोगे', 'मैं झूट नही बोलता हूँ' अशी पुस्ती वारंवार जोडावी लागते.
हे बहुतेक शब्द हिंदी भाषीक आहेत. तुम्हाला असे म्हणायचे आहे का की हिंदी भाषीक लोक जास्त थापा मारतात. किंवा थापा मारताना हिंदी भाषेचा जास्त उपयोग होतो.
उत्तर भारतीय लोकांचा अनुनय करायचे सोडून हे काय चालवलय?
का करीबे... हिया थापवा मारनवा के वासते आवत हो का?
7 Oct 2009 - 10:19 am | योगी९००
लेख आवडला...आणखी थापा चालल्या असत्या...मला रोज एक तरी थाप कोणाला तरी मारावी लागते.
एक थाप मात्र खरीखुरी थाप असते..तिला तुम्ही खोटी थाप असे नाही म्हणू शकणार...ओळखा पाहू...?
(तबला किंवा ढोलकी वर मारलेली थाप...)
खादाडमाऊ
7 Oct 2009 - 10:22 am | प्रकाश घाटपांडे
अचुक 'नाडी' पकडली ब्वॉ!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
7 Oct 2009 - 10:38 am | नंदू
छोटा, चटपटीत लेख आवडला. =D>