वाण्याचे सांगतो कुळ,
विकतो देहू गावी गुळ
नांदुरकीच्या झाडाखाली
बेतुक्या शोधतो मुळ
स्वर टाळ चिपळ्यांचा
विरून हवेत गेला
छेडून विणेच्या तारा
बेतुक्या थकून गेला
भोवती गर्द पाचोळा
काही हिरवा काही पिवळा
काही वार्याने उडून गेला
काही तीथेच निजला
दुथडी किनारा जोडी
सावरते पाण्याचे लोटं
विझतील श्रावणधारा
दोलायमान ही होडी
सोडून पाश होडीचे
तो घेऊन जाईल दूर
झुरतील बंध रेशमाचे
मग पुन्हा येईल पूर
प्रतिक्रिया
5 Sep 2025 - 9:51 pm | चौथा कोनाडा
सुंदर... चित्रदर्शी रचना
5 Sep 2025 - 11:02 pm | सौन्दर्य
"काही वार्याने उडून गेला,काही तीथेच निजला" एकदम मस्त.
असेच लिहिते रहा .
6 Sep 2025 - 12:24 am | चित्रगुप्त
थोडी थोडी समजली पण पूर्ण नाही. थोडं इस्कटून सांगा बेतुक्यापंत. दुर्बोधता हे नवकाव्याचे व्यवच्छेदक लक्षण असल्याचे गंगाधर गाडङीळ सांगून गेलेत खरे, पण तुम्ही - आम्ही हयात आहोत तोवर निदान विचारण्या- सांगण्याची सोय तरी आहे, म्हणून विचारले. बाकी काय नाय.
--- कुळं , गुळं,मुळं, लोटं, ( उच्चारात कुळम, गुळम, मुळम, लोटम) असे का लिहीले आहे ते समजले नाही)
--- बेतुक्या शोधतो मुळं ( यातला 'बेतुक्या म्हणजे धागाकर्ता कवी, असे अन्यत्र आलेल्या उल्लेखावरून वाटते, पण कवितेत ते समजण्याची सोय नाही) कसली 'मुळं' शोधतो आहे कवी ?
..... हे कळले नाही ( भोवतालच्या गर्दीतले काही लोक तरूण, काही म्हातारे आहेत, काही मृत आहेत तर काही रुग्ण आहेत .... असे काही आहे का ?
---- दोलायमान ही होडी .... म्हणजे 'भिवविती संध्याछाया' सरखे काही आहे का ?
---- 'तो घेऊन जाईल दूर' म्हणजे मृत्यु का ? 'मग पुन्हा येईल पूर' म्हणजे पुनर्जन्म का ?
कदाचित हे प्रश्न बालिश वाटतील, तरी ते पडले आहेत खरे. उत्तरे मिळाल्यास कवीचे एकंदरित भावविश्व, त्याच्या व्यामिश्र अनुभूती, त्या शब्दातून व्यक्त करण्याची ओढ, आवेग आणि कळकळ, भवनांचा सच्चेपणा, आयुष्याचा अंतकाळ जवळ येत असल्याची हुरहूर, वगैरे गोष्टींवर प्रकाश पडेल, अशी आशा वाटत्ये आहे.
6 Sep 2025 - 12:28 am | गणेशा
6 Sep 2025 - 6:36 am | चित्रगुप्त
तुकारामाबद्दल आहे ते पहिल्या कडव्यातून कळलेले असले, , तरी शेवटली तीन कडवी अगम्य वाटली.
6 Sep 2025 - 12:28 am | गणेशा
संत तुकारामा वर आहे हो काव्य
छान कविता.. प्रतिसाद लिहिला होता कवितेतून, आणि येथे द्यायचा राहिला, आता हरवला
6 Sep 2025 - 12:31 am | गणेशा
संत तुकाराम यांच्यावर असे वाचावे, typing mistake
6 Sep 2025 - 12:09 pm | कर्नलतपस्वी
कवीने कवितेचे स्पष्टीकरण स्वताच देऊ नये. वाचकांवर सोडावे ,ज्याला जो अर्थ काढायचा तो काढू द्यावा.
पन आपन काही ग्रेस नाही तेव्हा माझीच कवीता मीच उकलून सांगतो.
हे स्मशानवैराग्य आहे. काही दिवसापुर्वी एका परिजनाच्या अस्थी विसर्जनास देहूला जावे लागले.इंद्रायणी दुथडी भरून वहात होती. घाटावर आमच्या सारखेच काही दु:खी लोक उभे होते.लाल कपड्यात बांधलेला घट घेऊन तर दोन चार नातेवाईक फुलाची प्लास्टिक बॅग,दह्याचे पाकीट,उदबत्ती वगैरे घेऊन घट घेतलेल्या व्यक्तीला कोंडाळे करून उभे होते. काही पुजा करत होते,ज्यांची पुजा झाली होती ते मुख्य व्यक्तीला पुढ्यात घेऊन घट विसर्जनास नदीतीराकडे चालले होते.काहीनीं घट विसर्जन केले होते,दुथडी भरलेली इंद्रायणी विसर्जित फुले,घट घेऊन वेगाने पुढे चालली होती. परिजन अश्रुपुर्ण नजरेने प्रिय मृतात्म्यास शेवटचा निरोप देत होते. ज्यांची विसर्जित सामुग्री दृष्टिआड होत होती ते डोळे पुसत, एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून परत उलट्या वाटेने निघाले होते.
दुसरीकडे,मक्याची कणसे,भुईमुगाच्या शेंगा भाजणारे गाडीवान ग्राहकां बरोबर देणे घेणे करत उभे होते.मुलांची खेळणी विकणारे, कुंकू, पुजासामुग्री विकणारे टपरी सजवून गिर्हाईकां बरोबर हुज्जत घालत होते. इंद्रायणी काठी समोरच खाण्यापिण्याची हाॅटेले होती. बरेच भाविक इतस्ततः हिंडत होते. काही मोबाईल मधे फोटो तर काही सेल्फी घेण्यात स्वमग्न दिसले. काही यात्री गाडीतच डबे उघडून सकाळची न्याहरी करत होते. भरपुर यात्री गाड्यायेत जात होत्या. वाहनतळ गाड्यांनी खचाखच भरला होता. बारदानाच्या पथार्या पसरून भिकारी येणाऱ्या जाणाऱ्या कडे आशाळभूत नजरेने बघत होते.
दोन्ही दृश्यात किती विरोधाभास होता. कुणालाच कुणाशी देणे घेणे नव्हते. ते बघून मन पाण्यातल्या होडी सारखे हेलकावे खात होते.
सकाळचे उन,सुर्यदेवता ढगाळ वातावरणात कुठेतरी लपले होते. आम्ही अस्थिविसर्जन केल्या. विसर्जीत फुले दृष्टीआड झाली आम्ही जड पावलाने लौकिक संसाराकडे परत वळालो.जवळच नांदुरकीचे झाडाच्या पारावर टेकलो.
भुक लागल्याचे आठवण झाली. जवळच्याच हाॅटेलात जाऊन मिसळपाव व चहा घेतला.तसे देहू लहानपणापासून बरेच वेळा बघीतले होते. तरी पुन्हा एकदा महाराजांचे जन्मस्थान,गाथा मंदिर, बघीतले.
तेव्हांपासून डोक्यात विचार घोळत होता. आणी त्या विचार मंथनातून ही कवीता सुचली. बाकी सारे रूपकात्मक.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद.
6 Sep 2025 - 1:54 pm | अनन्त्_यात्री
आवडली!
6 Sep 2025 - 12:15 pm | कर्नलतपस्वी
बेसिक शुद्धलेखनाचा लोचा आहे. वैतरणीच्या काठावर पोहचलो आहे तरी लेखन काही शुद्ध होत नाही.
6 Sep 2025 - 1:01 pm | चित्रगुप्त
मला वाटलेच होते, ही कविता तुकारामावर नाही. आता डीटेलवार इस्कटून सांगितल्यावर कळले. अनेक आभार.
6 Sep 2025 - 6:34 pm | गणेशा
Oh! स्पष्टीकरणा नंतर समजली! :)
6 Sep 2025 - 6:45 pm | राजेंद्र मेहेंदळे
पण प्रतिसाद वाचल्यावर अजुन समजली. कविता आवडली हे.वे.सां.न.ल
बेतुक्याचे बेष्ट चालले आहे.
6 Sep 2025 - 7:23 pm | कर्नलतपस्वी
सर्व प्रतिसादांचे आभार.
6 Sep 2025 - 6:43 pm | गणेशा
कविता ही शब्दयात्री, उभी घाटावरी एकटी..
डोळ्यात साठल्या इंद्रायणी च्या लाटा..
क्षणात स्मशान वैराग्य.. क्षणात जीवनाची गाथा...
6 Sep 2025 - 7:22 pm | कर्नलतपस्वी
अती सुंदर प्रतिसाद. धन्यवाद.