खरडवहीतील ‘भेळ’ !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
11 Aug 2025 - 12:38 pm

शालेय वयापासून हातांना एक खोड लागलेली आहे. शाळेत दररोज जेवढे तास असायचे तेवढ्या वह्या दप्तरात न्यायला लागायच्याच. प्रत्येक तासाला मास्तर काय शिकवत आहेत याकडे निम्मेच लक्ष असायचं आणि वहीत त्यांचे शिकवणे उतरवून घेण्याचा फारच आळस. पण त्याचबरोबर वहीची मागची पाने मात्र उलट्या क्रमाने ‘भरण्याचा’ नाद होता. काही विषयांचे तास कंटाळवाणे असायचे. मग अशावेळी मास्तरांचे आपण ऐकत आहोत असे खोटे खोटे भासवून एकीकडे वहीच्या मागच्या पानांवर पेन अथवा पेन्सिलने अनेक गोष्टी लिहिल्या आणि चितारल्या जात. चित्रकलेच्या बाबतीत अगदी उजेड असल्यामुळे मास्तरांचे चित्र/ व्यंगचित्र काढणे काही कधी जमले नाही. परंतु त्यांचे मुलांनी ठेवलेले टोपणनाव लिहून ते वारंवार गिरवत बसणे हे मात्र आवडीने केले जाई.

बाकी बिंदूचा समूह, रेषा आणि वेगवेगळ्या आकृत्या काढायचा मात्र नाद लागला व तो अजूनही आहे. यामध्ये एकाखाली एक रेघा काढणे, गोलाकार फसलेला गोल, त्रिकोण, चौकोन, चौरस असे काहीही मनाला येईल ते रेखाटायचे आणि गिरवत बसायचे. वहीला पेन टेकवल्यानंतर हात न उचलता आणि कुठलीही रेष दुसऱ्यांदा न गिरवता काही आकृत्या काढायची कोडी त्यावेळी असायची त्यांचाही सराव केला जाई. अशा प्रकारची एक विशिष्ट आकृती (चित्र पहा ) जगात कोणालाही काढता आलेली नाही असे त्या काळी मित्रांनी सांगितले होते. तरी देखील अट्टहास म्हणून तिचा प्रयत्न करत बसायचं. याच्या जोडीला कधी एखादा विनोद लिहिला जाई तर कधी चित्रपटांची नावे.

ok
आतापर्यंतच्या आयुष्यात ही चित्रातली आकृती चाळा म्हणून हजारदा तरी खरडली असावी.

अधूनमधून शाळेत दंगा केल्याबद्दल मास्तरांकडून शिक्षा केली जाई आणि क्वचित मार देखील खावा लागला. मग काय, त्या दिवशीचा तो सगळा राग वहीच्या पानांवर उतरणारच. मास्तरांच्या नावाने सांकेतिक भाषेतील काही अपशब्द, असं ते लेखन असायचं. घरच्या आघाडीवर सटीसामाशी कधीतरी मुलांच्या नकळत त्यांची दप्तरे तपासण्याचे काम पालक मंडळी करायची. त्यातून मग हे मागच्या पानांवरचे प्रताप देखील उघड व्हायचे. मग त्यावरून आपली चंपी होणारच. अर्थात असं काही झालं तरी त्यानंतर फार तर आठ दहा दिवस ‘घरच्या पोलिसांना’ घाबरून वहीच्या मागच्या पानांना आराम दिला जाई. पण मुळातच जी अंगभूत खोड होती ती जाणे कसं शक्य होतं ?

कॉलेजला जायच्या वयात तर ही खरडखोड अंगात चांगलीच मुरलेली होती. त्यामुळे कॉलेजच्या वह्यादेखील याला अपवाद कशा राहणार ? फार तर बारावीचे वर्ष थोडेफार गांभीर्याने घेतल्यामुळे मागच्या पानांचे भरण्याचे प्रमाण बऱ्यापैकी कमी राहिले. पण पुढे एकदाचे व्यावसायिक शिक्षणाच्या मळ्यात जाऊन पडल्यानंतर मात्र पुन्हा एकदा या सवयीने उचल घेतली. आता प्रौढत्वात प्रवेश केलेला असल्यामुळे खरड पानांच्या गुणात्मकतेत हळूहळू वाढ झाली. शालेय वयात टाईमपास किंवा निरर्थक खरडपणा जास्त असायचा. आता आपल्या वाचनातून आपल्याला आवडलेल्या निवडक गोष्टी, मार्मिक वाक्ये आणि सुविचारांची यात भर पडली. तसेच मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषा तिथे प्रेमळ भगिनीगत एकत्र नांदू लागल्या.

वर्षाच्या सुरुवातीला घेतलेल्या वह्या जेव्हा वर्षाखेरीस पहिल्या जात तेव्हा हे अगदी स्पष्टपणे दिसायचे, की जवळजवळ प्रत्येक वहीची एक पंचमांश पाने तरी मागच्या बाजूने सुरुवात करून खरडीनी भरलेली असायची. वरवर पाहता एखाद्याला वाटेल की ही पाने वाया घालवली आहेत. परंतु त्यातून मला जो काही विरंगुळा होत होता ते पाहता ती माझी एक मानसिक गरजच होऊन बसली होती. सरधोपट आणि चौकटीबंद शिक्षणपद्धती कित्येक विद्यार्थ्यांना आवडत नसते. मग त्याबद्दलची त्यांची व्यक्तिगत नाराजी अशाच काही प्रकारांमधून उमटत असावी.

यथावकाश शिक्षण संपले आणि पोटापाण्याचा कामधंदा चालू झाला तेव्हा क्षणभर असे वाटले होते की आता आपली ही खरड सवय बहुदा संपुष्टात येईल. पण कुठलं काय? साधारण दरवर्षी एखाद दुसरी डायरी घरी येऊन पडायची. तिचा वापर करताना बालपणापासून मुरलेलं तेच धोरण आता देखील चालू राहिलं. डायरीच्या पुढच्या बाजूने ज्या काही दैनंदिन व्यावसायिक/ व्यावहारिक नोंदी असायच्या त्या केल्या जायच्या परंतु फावल्या वेळात डायरीची मागची बाजू वर करून पाने उलटून तिकडे आपली खरड पुन्हा एकदा जोमाने चालू झाली. असेच एकदा कागदावर पेनाची फिरवाफिरवी करताना एक भन्नाट कल्पना सुचली. एरवी आपण कुठलाही मजकूर डावीकडून उजवीकडे शिस्तीत लिहित जातो. तो मजकूर जर आरशासमोर धरला तर त्याची त्यातली प्रतिमा उलटी दिसते. मग गंमत म्हणून वहीवर उजवीकडून डावीकडे आणि सर्व अक्षरे उलटी काढत काही गमतीदार लेखन करत बसायचो. हळूहळू त्यात गती आली आणि एकदा एका मित्राला ते दाखवले. त्यावर तो म्हणाला,

“अरे, छानच की. अशी सवय लिओनार्दो दा विंचीला होती, बरंका”, असे म्हणून त्याने मला आपले थोडेसे खुलवले.

संगणकपूर्व काळात हस्तलेखन ही बऱ्यापैकी गरज होतीच. त्यामुळे उपयुक्त लेखनाच्या जोडीला हे निरर्थक खरडकाम देखील उत्साहाने चालायचे. संगणकयुग अवतरल्यानंतर हस्तलेखनाचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले हे खरे. परंतु गेल्या तीन-चार वर्षात असे जाणवले की गरजेपेक्षा जास्त काळ संगणकात डोके खूपसून बसणेही बरोबर नाही. त्यावर जे काही वाचन झाले त्याचे मनन करता करता त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी किंवा मुद्दे पुन्हा एकदा कागदावर लिहायला सुरुवात केली आहे. दैनंदिन जीवनात कुठल्या ना कुठल्या कारणाने अनेक पाठकोरे कागद जमा होत असतात. ते गोळा करून एका पॅडवर लावून ठेवलेत आणि त्याची कोरी बाजू ही अशा खरडीसाठी वापरतोय आणि हळूहळू त्याची आवड पुन्हा एकदा वाढू लागलेली जाणवते आहे.

एकेकाळी आपण केलेल्या अशा खरडी जर जपून ठेवल्या तर कालांतराने सहज ती वही उघडून त्या पाहणे हे मात्र जबरी स्मरणरंजन असते. विशेषतः जर जुन्या खरडी पाच-सात वर्षे उलटून गेल्यानंतर चाळल्या तर कधी आपलेच आपल्याला हसू देखील येते. त्या खरडीमध्ये आपण करून ठेवलेल्या गमतीजमती पाहून आपण अगदी अचंबित होतो.

“काय हो, असे असते तरी काय खरडींमध्ये तुमच्या?”
असे जर तुम्ही विचाराल तर त्याचे प्रथमदर्शनी उत्तर हे असेल, की काय नसते या खरडींमध्ये ते विचारा !

फोनवर कोणाशी बोलता बोलता लिहून घेतलेले अन्य कोणाचे नंबर्स आणि पत्ते, एखाद्या कामाची/घटनेची स्मृतिनोंद, आवडत्या व्यक्तींची अनेकदा गिरवलेली नावे, सुविचार अन सुवचने, बाळबोध स्वरूपाची चित्रकला अन फरकाटे, गाण्यांचे मुखडे, काही अक्षरे जुळवून केलेली मजेदार दीर्घरुपे, सामान्य बेरीज वजाबाक्या अन गुणाकार भागाकार, काही कुजबुज स्वरूपाचा मजकूर . . . आणि कधीतरी डोसकं फिरल्यागत या सगळ्यावर अत्याचार करणाऱ्या संपूर्ण पानभर मारलेल्या मोठाल्या फुल्या, अशा असंख्य गोष्टी इथे एकमेकांमध्ये घुसलेल्या असतात. काही परस्परविरोधी गुणधर्माच्या गोष्टी तर शेजारी शेजारी सुखाने नांदत असतात. एखाद्या रम्य सुभाषिताच्या पोटात काटकोन त्रिकोणाचे टोक शिरलेले असते किंवा एखाद्या झकास विनोदाशेजारीच एखाद्या गाजलेल्या शोकांतिकेचे नाव कोरलेले असते. इथल्या लेखनात शिस्त नावाला सुद्धा नसते. गिचमिड हा खरडीचा स्थायीभाव. आकृत्या आणि शब्द यांची एकमेकात अक्षरशः घुसखोरी झालेली असते. लिहिण्याची पद्धतही अत्यंत मनमानी. सरळ, उभे, आडवे, तिरके असे कुठल्याही कोनातून इथे लिहिले जाते. तसेच पेन, बॉलपेन, पेन्सिल आणि कधीकधी स्केचपेन ही सर्व लेखन साधने वापरुन त्यांचे एकमेकांत छानपैकी जुंपलेले फराटे पण असतात.

लहान मुलाचे हस्ताक्षर खराब असले की त्याला आपण, “काय रे, कुत्र्याचा पाय मांजराला आणि मांजराचा पाय डुकराला”, या प्रकारची उपमा देतो अगदी तसाच हा प्रकार असतो. पण आपण या सगळ्याकडे जर चिकित्सक चष्म्यातून पाहिले तर मग त्यातले आंतरिक सौंदर्य जाणवते. हा सगळा सावळा लेखनगोंधळ कालांतराने पाहणे हे फारच मनोरंजक असते आणि कधीकधी ते चिंतनीय सुद्धा ठरते. नित्य अशी ‘खर्डेघाशी’ करणाऱ्या माणसांच्या दृष्टीने ते त्यांचे ‘खरड-साहित्यच’ म्हणायला हरकत नाही !

शैक्षणिक वयातील अशी खरडपाने आता जवळ नसल्याचे कधीकधी दुःख होते. एक दोन नमुने तरी ठेवायला हरकत नव्हती असे राहून वाटते. पदवी शिक्षणानंतरच्या विवाहपूर्व एकटेपणाच्या काळातील काही खरड-मनोगते तशी हृद्य होती पण ती केव्हाच रद्दीत गेली. असो. तेव्हाच्या आयुष्यात प्रेमप्रकरण वगैरे काहीच न घडल्याने त्या आघाडीवर मात्र खरडवही आसुसलेलीच राहिली. जर का ते घडते तर मात्र या पानांवर प्रेमाचे आलाप अगदी ओसंडून वाहिले असते, हे काय सांगायला पाहिजे? आयुष्याच्या पुढील टप्प्यात केलेल्या काही खरडी मात्र अजूनही जवळ आहेत त्यातला हा एक नमुना :
ok

कोविडपर्वात इथे विविध शब्दखेळ सादर केले होते. त्यातील काही प्रकारांची व्यक्तिगत तयारी करताना पुन्हा एकदा भरपूर खरडी झाल्या होत्या त्यातली ही एक आठवण :

ok

कोविड ऐन भरात असताना 2020मध्ये ऑनलाईन ‘Wordle’ या इंग्लिश शब्दखेळाचा आंतरराष्ट्रीय प्रसार खूप जोरात झाला आणि मी देखील त्याचा आयुष्यभरासाठी व्यसनी झालो. पुढच्या पाच वर्षांमध्ये वर्डलचे अनेक सुधारित अवतार आले आणि हळूहळू त्यांच्याही प्रेमात पडलो. गेल्या वर्षभरात ‘Clue Hurdle व Phrazle’ या दोन्ही प्रकारात मुरलोय. फ्रेजलमध्ये जे नवनवे अनौपचारिक (अमेरिकी) वाक्प्रचार सापडतात ते लाजवाब असतात. मग आपले कोडे सुटल्यानंतर जो वाक्प्रचार सापडतो तो हाताने कागदावर स्टायलीत लिहून ठेवण्यातली मजा काही औरच असते. असं काही गवसलेलं आणि आवडलेलं लिहीत गेलं की लिहिता लिहिताच ते ‘आपलं’ होऊन जातं असाही स्वानुभव ! अशा खरडीनी भरलेल्या सुट्या कागदांवरही इतके प्रेम बसते की ते लवकर रद्दीत टाकवतही नाहीत. मग त्यांची छानशी चळत पॅडवर साठत जाते.

ok

२० वर्षांपूर्वी एका मासिकात एका पत्रकारांचा लेख वाचला होता. त्यात त्यांनी दैनिकातल्या दोन स्पर्धक पत्रकारांची एक छोटीशी गोष्ट सांगितली होती. त्या दोघांपैकी एक होता दुपारपाळीचा तर दुसरा रात्रपाळीचा. एकाची कामाची पाळी संपली की त्याच टेबल खुर्चीवर दुसरा येत असे. टेबलाच्या खाली एक प्लास्टिकची कचराटोपली होती ज्यात ही मंडळी काही खरडून टराटरा फाडलेले कागद टाकून देत. तर या दोघांची एक गंमत होती. आपण कामावर आलो की जरा वेळाने आधीच्या माणसाने जे काही लिहून फाडून कचऱ्यात टाकलेले कागद असायचे ते मुद्दामून काढून बघायचे. हेतू असा, की हा प्राणी जो मजकूर फाडून टाकतोय तो नक्की काय स्वरूपाचा असतो?
या उद्योगातून ते दोघे एकमेकांचे व्यक्तिमत्व जोखत असत असे त्या लेखकांनी म्हटले होते.

या गोष्टीवर जरा मंथन केल्यानंतर माझ्याही मनात एक विचार आला. ज्यांना लेखनाची सवय आणि आवड आहे अशांच्या बाबतीत त्यांनी खाजगीत केलेल्या अर्थपूर्ण हस्तलेखन आणि निरर्थक खरडलेखन या दोन्ही गोष्टी शक्य झाल्यास पाहायला हव्यात. अर्थपूर्ण लेखन हे मुद्द्याला धरूनच असणार, पण खरं सांगायचं तर ते त्या व्यक्तीचे बाह्यरुप झाले. त्यात वेळप्रसंगी विविध आभासही जाणवणार आणि सार्वजनिक लेखनाच्या बाबतीत कधीकधी वाचकशरणता देखील. परंतु त्या माणसाचे सुप्त अंतरंग समजून घ्यायचे असेल तर त्याच्या निरर्थक खरडी बघण्याला पर्याय नाही. कदाचित अशा माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज त्या खरडकामातूनच येऊ शकतो का, असा एक प्रश्न मनात येतो. विचारपूर्वक स्वतःसाठी खरडलेलं जे काही असतं ते खऱ्या अर्थाने स्वांतसुखाय व प्रामाणिक असतं. अलीकडच्या काळात विद्यार्थीवर्ग वगळता हस्तलेखन हा प्रकार बऱ्यापैकी संपत चाललेला आहे. तरीपण जर एकेकाळी कोणी केलेल्या अशा खरडी जर योगायोगाने नजरेस पडल्या तर त्या बघायला नक्कीच मजा येईल आणि त्यावर थोडाफार विचारही करता येईल.

आपल्या वाचकांपैकी कुणाला अशी सवय होती किंवा आहे का? असल्यास आपल्या खरडीचे (आणि सार्वजनिक करायला हरकत नसलेले) काही नमुना फोटो इथे जरूर दाखवा. ते पाहणे रोचक असेल.
. . .
मित्रहो,
अशी आहे ही कागदावरील खरडाखरडीची गंमतजंमत अर्थात, फावल्या वेळात तिथे बनवलेली एक लेखन-भेळ. ही भेळ तुमच्यासमोर सचित्र सादर केली. आता ती चवीला कशी वाटली, हे मात्र तुम्हीच सांगायचे आहे !

ok

*************************************************************************************

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

सर्वात पहिल्यांदा म्हणजे खूप काळानंतर तुमचे नाव लेखक कॉलममधे बघून फार आनंद झाला. लेख सुंदर.. अगदी रिलेट करण्यासारखा. आमच्या शालेय जीवनापासून आताच्या कॉन्फरन्स आदि प्रवासात या खरडण्याची सदैव साथ मिळाली आहे. पाकळ्या पाकळ्या आणि त्याचे फूल.. ही एक सुपरहिट खरड. गाण्यांच्या दोन चार ओळी, वहीच्या पानांवर कोपऱ्यात थोडे थोडे बदलते असे काटकी सदृश मनुष्य चित्र. मग फ्लिप बुक सारखी पाने टर्र करून पलटली की सलग चल- चित्र..

इतरही बरेच काही. नववीत एका सॅडिस्ट सरांना एखाद्या पोराची वही उचलून त्यातील शेवटची पाने जाहीर वाचून दाखवण्याची करमणूक सापडली होती.

एखादे भाषण किंवा कॉन्फरन्स मधील प्रेझेंटेशन याचे मोठे अपयश म्हणजे टेबला टेबलावर पडलेल्या रायटिंग पॅडस मधे प्रेक्षक आणि श्रोते लोकांनी गिरबटलेली टकलू माणूस, फुले पाने, रांगोळ्या..

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Aug 2025 - 3:47 pm | राजेंद्र मेहेंदळे

वरील प्रमाणेच म्हणतो, पहीले लेखकाचे नाव बघुन आनंद वाटला. लेख आवडलाच आणि स्वतःच्या शालेय आणि कॉलेजिय जीवनाशी रिलेटही करता आला.

याच खात्यात पुस्तकातील माणसा/बायकांना काढलेल्या दाढीमिशा, कुंकू, वेण्या वगैरेही धरावे काय? तीही एक प्रकारे क्रिएटिव्हिटिच, नाही का?

याचेच मोठ्या प्रमाणावरचे रुप म्हणजे बाथरूम लिटरेचर, शाळेच्या मुतारीत, आडनिड्या भिंतींवर वगैरे काढलेली चित्रे आणि लेखन, जोड्या लावा वगैरे वगैरे बरेच काय काय आठवले या निमित्ताने :)

चटकदार भेळ वाटण्यासाठी आभार. तुम्हाला रेखाचित्रेही काढता आली असती तर आणखी मजा आली असती.

श्वेता व्यास's picture

11 Aug 2025 - 4:09 pm | श्वेता व्यास

भेळ आवडली. आमच्या शाळेमध्ये वह्या शिक्षकांकडे नियमित तपासणीसाठी जात असल्याने हे सगळे उद्योग रफ वही म्हणून वेगळ्या वहीमध्ये चालायचे. वरचं ते हात न उचलता, आणि रेघ न गिरवता काढण्याचं कोडं चांगलं आठवतंय, आणि ऑफ तासांना फुली-गोळ्याने भरलेल्या वह्या आहेत. पुस्तकांना मात्र विद्रुप करण्याची इच्छा कधी झाली नाही.

कुमार१'s picture

11 Aug 2025 - 4:21 pm | कुमार१

जुने जाणते मिपाकरहो,
उत्साहपूर्ण प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद !!

होय, मी मोजून सव्वा वर्ष ठरवून येथे लेखनविश्रांती घेतली होती. याचे कारण म्हणजे एकंदरीत आंतरजाल वावर ठरवून कमी करणे. दोन संस्थळांवर विहार करतांना दुप्पट वेळ जातो. त्यातून माझे बरेचसे लेखन माहितीपर असल्यामुळे प्रश्नोत्तरांचा भागही बऱ्यापैकी असतो; त्यात दमछाक देखील होते. त्यामुळे गेल्या सव्वा वर्षात पलीकडे प्रमाणात लेखन आणि इथे फक्त निवडक वाचनाचा अधूनमधून आनंद घेतला.
असो. तुम्हा सर्वांच्या प्रेमपूर्वक स्वागतामुळे हुरूप आलेला आहे हे नक्की.

आपणा सर्वांचेच प्रतिसाद रोचक आणि रंजक आहेत हे वे सां न ल. 😀

आता एखाद्या खरड-चित्रमय प्रतिसादाची पण वाट पाहतो.
🤚

मस्तच भेळ आहे.लहानपणी वहीच्या मागील पानांवर चांदण्या(हात न उचलता स्टार काढणे),फुलं असायची.थोर व्यक्तींची नावं,उगाच सुचलेल्या कवितेच्या ओळी असायच्या.
आता भेळ जास्त करत नाही,पण डायरीतल्या बऱ्याच पानांवर अगदी लहानपणापासून सुविचार म्हणजे "You can do it",Don't get scare,Be strong ,Goal -focus-dream ही अशी वाक्य आपोआप कोपऱ्यात ,समोर ,वरती लिहिली जातात.
१० वर्षांच्या माझ्या मुलीच्या भेळेत "श्रद्धा ,माझी तुझ्याशी कट्टी आहे."
"शुभ्रा,तू माझ्याशी बोल" असे काही आहे ;)

इकडे तिकडे कुठे लिहायचं मनावर घ्यायचं नाही. थोडासा इरसालपणा असल्याशिवाय भेळलेखन होत नाही.

कुमार१'s picture

12 Aug 2025 - 7:25 am | कुमार१

*

१० वर्षांच्या माझ्या मुलीच्या भेळेत

लहान मुलांची भेळ म्हणजे तर आनंदयात्राच !
..
*

थोडासा इरसालपणा

होय, अ ग दी !

कर्नलतपस्वी's picture

12 Aug 2025 - 3:08 pm | कर्नलतपस्वी

तुमचं आमचं सेम असतं.

आपली अनुपस्थिती जाणवली.

मस्तच, आठवणी जागवल्यात.

आम्ही एक ते दहा आकडे वहीच्या मागच्या पानावर काढून मामाचं घर प्राथमिक शाळेत खेळायचो.

सुधीर कांदळकर's picture

12 Aug 2025 - 3:25 pm | सुधीर कांदळकर

छान, जोरदार पुनरागमन. अभिनंदन.

भेळ आवडली. माझ्या शालेय कंपूचा छंद थोडासा वेगळा होता. वेगवेगळे ध्वनी निर्माण करून ठराविक, कंटाळवाणे शिकवणार्‍या शिक्षकांना सतावणे वा कंटाळा घालवणारी करमणूक निर्माण करणे हा उद्योग होता.

१. डेस्कच्या लाकडी सांध्यात ब्लेडचा तुकडा अडकवून तो वाद्याच्या तारेसारखा छेडला की टाँय टाँय असा एकतारीचा आवाज येत असे. पण तो कोठून येतो कसा येतो हे सरांना काय, इतर मुलांना पण कळत नसे. मग निर्माता शोधणे ही करमणूक असे. हे ठराविक मुलांचे गुपित होते.

२. शाळेत जमिनीवर शहाबादी फरशी होती. त्या जुन्या काळचे शर्टाचे काढता येणारे प्लॅस्टीकचे बटण फरशीवर ठेवून चपलेच्या वा बुटाच्या चामड्याच्या सोलने दाब देवून बटण सरकवले की कर्र् र्र र्र र्र .....च्च च्च .... चुईक ...च्युईक ..... असा जोरदार कर्कश ध्वनी येत असे. हाही कोठून येतो कसा येतो हे मात्र कळत नसे. हेही ठराविक मुलांचे गुपित होते. मग निर्माता शोधणे ही करमणूक असे.

काही शिक्षक दुर्लक्ष करीत तर काही शिक्षक भलत्याच पण द्वाडपणात प्रसिद्ध मुलांना पकडत आणि शिक्षा करीत. त्या मुलांनाही त्याचे काही वाटत नसे. पण करमणूक होऊन कंटाळा निघून जात असे.

३. काही मुले मुद्दाम कंपास पेटी जोरात जमिनीवर आपटत तर चुगलीखोर मुलांचे टिफीन पळवून जोरात आवाज करून पाडले जात. मग ज्याचा डबा त्याला शिक्षा होई. मग एक कंपासपेटी/डबा पडल्यानंतर आणखी काही कंपासपेट्यांना/डब्यांना पण पडावेसे वाटे.

३५ मिनिटे कंटाळवाणी जाण्यापेक्षां एकदोन वेळा असे घडणे चांगलेच! नाही? व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे हवेच! नाही?

मस्त आठवणी जागविल्यात. धन्यवाद.

कुमार१'s picture

12 Aug 2025 - 7:14 pm | कुमार१

आपुलकीयुक्त प्रतिसादांबद्दल धन्यवाद !
..

मामाचं घर प्राथमिक शाळेत खेळायचो.

खासच. हा खेळ बहुतेक सर्वांनी खेळलेला असतो.
**

शालेय कंपूचा छंद थोडासा वेगळा . . . व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे हवेच!

आ हा हा ! अशा खोड्या हा तर एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल.
लिहा कोणीतरी.