गेला महिनाभर खंडेरावाच्या घराचे आम्ही सदस्य होतो.खाणदेशातले मोरगाव आमचच गाव होत :) :)
हिंदू जगणयाची समृद्ध अडगळ ही भालचंद्र नेमाडे यांची ज्ञानपीठ मिळवलेली प्रसिद्ध कादंबरी पूर्ण (३६ तास ) ऐकली . तर ६०३ पानांची छापील कादंबरी आहे .
मागे केलेल्या चर्चेनुसार अनेकांना हि कादंबरी १००-२०० पानानंतरच रटाळ वा वाचावी अशी वाटली नाही. मी छापील पुस्तक वाचायला घेतले असता माझीही तीच अवस्था झाली असती कारण कादंबरीच्या शीर्षकामुळे माझ्यासारखे अनेक वाचक याकडे आकृष्ट झाले आहेत यात मुळीच दुमत नाही. परंतु शीर्षकानुसार हि कादंबरी पहिल्या भागात अजिबात मनाला भिडत नाही. मग शीर्षकाचे ओझे व आपल्या अपेक्षा बाजूला सारत ,खंडेराव याची कहाणी म्हणून वाचताना कादंबरीची मुळें समजायला लागतात .
कादंबरीच्या सुरुवातीला भारत -पाकिस्तान सिंधू संस्कृती यांच्या पासून सुरुवात होते.स्वातंत्र्याचा लढा त्याचा अर्थ यांची संक्षिप्त विविध कथांद्वारे उहापोह दिसते. नंतर खंडेरावच्या आयुष्यात आई वडील,भाऊ,बहिणी ,आत्या ,काकू ,काका यांच्या प्रत्येकाच्या आयुष्याचा तुकडा कादंबरीत त्याच्या लहानपणासून ते शिक्षणाच्या विविध टप्प्यांपर्यंत जोडला जातो. तसेच ग्रामीण जीवनातील आजूबाजूचे विविध जातीपातीतील लोकांचे जीवन त्यातील दु:ख आनंदाचे प्रसंगही त्याचा आयुष्याशी जोडून एक रंगेबेरंगी उबदार गोधडीच तयार होते.पण असे हे ग्रामीण जीवन ,रोजच्या जीवनातील प्रसंग कधीच उजेडात आले नाही .केवळ अभिजात संशोधन कथाच प्रकाशित होतात .आणि मग अशा अनेक ग्रामीण कथा एक अडगळ होतात पण त्याही समृद्ध आहेतच ना म्हणून या हिंदू भूमीवरच्या ही जगण्याची समृद्ध अडगळ आहे असे वाटून गेले
असा खंडेराव ग्रामीण भागातून शिक्षणासाठी ,संशोधनासाठी शहरात गेल्यावर ग्रामीण मुळांपासून दूर होत जात असतानाच वडिलांच्या अखेरच्या काळात त्याला एकाच मुलगा या नात्याने पुन्हा मागे फिरावे लागतेच ,तेव्हा पुन्हा एकदा जगण्याच्या बदलेल्या व्याख्या अनेक छोट्या छोट्या संभाषणातून रेखाटल्या आहेत.
या कादंबरीची अस्सल ग्रामीण कथा साहित्याच्या दृष्टीने नक्कीच वाहवा करायला पाहिजे.अशा खिळवून ठेवणाऱ्या खुसखुशीत पद्धतीने कथा समोर रेखाटल्या आहेत. कादंबरीच्या शेवटी घरात खंडेराव एकटाच पुरुष ,तेव्हाही आणि संपूर्ण कादंबरीतही बाईचे सोशिक जीवन ,गौण स्थान याविषयी अनेकदा स्पष्टपणे नावड दाखवलीच आहे ,ही अजून एक जमेची बाजू वाटते.
कांदबरीत शिव्यांची लाखोटी भरभरून आहे.आपण तरीही कादंबरीचा गाभा दूषित न करता वेगच वाढवतात .
खूप दिवसांनी ग्रामीण जीवनावरची काठावरची कादंबरी न वाटता खोल डोहात नेणारी कादंबरी वाचाल्याची करमणूक नक्कीच झाली." वंशवृक्षाच्या पारंब्या " हा कादंबरीचा पुढचा भाग असणार आहे व तसेच हि कादंबरी एकूण चार भागांची असणार आहे असे वाचनात आले आहे.
-भक्ती
प्रतिक्रिया
23 Jul 2025 - 10:33 am | प्रसाद गोडबोले
पुस्तक जाऊ दे खड्ड्यात, म्हणजे ते आधीच गेलेले आहे
पण मला एक प्रश्न पडला आहे की
प्रकाशकांना परवडते कसे अशी पुस्तके प्रकाशित करणे ?
मराठी प्रकाशन व्यवसायातील कोणाला तरी बोलावून पॉडकास्ट करायला मजा येईल !
23 Jul 2025 - 2:20 pm | Bhakti
काय माहीती नाही? पॉप्युलर प्रकाशन आहे.
अवांतर पण प्रकाशक आणि लेखक यांच्यातील मधुर नात्यांचं एक उदाहरण पुन्हा समजले.पद्मगंधा चे जाखडे हे २१ जुलैला रा.चि.ढेरे यांच्या जन्मदिनी त्यांचे एकतरी पुस्तक पुर्नप्रकाशन
करतात.नरहर कुरुंदकर म्हटले की देशमुख आणि कंपनी अजोड नातं होतं.गो.नी.दांडेकर आणि मृण्मयी प्रकाशन आहेच.
हरारी,डारियस प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद, अच्युत गोडबोले म्हटलं की मधुश्री प्रकाशन समीकरण दिसते.
अजून आठवलं की सांगते.
26 Jul 2025 - 6:09 am | प्रचेतस
गोनीदा आणि मॅजेस्टिक हे नातं होतं. त्यांची बहुतेक पुस्तकं मॅजेस्टिकची आहेत. मृण्मयी प्रकाशन ही त्यांच्या मुलीची, वीणा देव यांची प्रकाशन संस्था आहे जी गोनीदांची पुस्तके आता पुन:प्रकाशित करत आहे
26 Jul 2025 - 10:46 am | Bhakti
अच्छा! मृण्मयी वीणा देव यांचे हे माहिती होतं.पण वाटलं सुरूवात गोनीदा यांनी केली असेल.
पु.लं.ची पुस्तके मौज प्रकाशनाची दिसत आहेत.दुर्गाबाईंची वरदा प्रकाशनाची आहेत,पण पैसे,दुपानी,ऋतूचक्र इतर प्रकाशनाची आहेत.प्रसिद्ध पुस्तकांचे हक्क मिळवण्यासाठी नंतर चढाओढ असते असे वाचलं होतं.
26 Jul 2025 - 11:13 am | प्रचेतस
रामदास भटकळांचे पॉप्युलर, श्री पु भागवतांचे मौज, कोठावळ्यांचे मॅजेस्टिक, माजगावकरांचे राजहंस, अनंतराव कुलकर्ण्यांचे कॉन्टिनेन्टल ह्या जुन्या प्रकाशन संस्थांनी अनेक दर्जेदार लेखक घडवून पुस्तकेही दर्जेदार दिली असे म्हणता येईल. ह्या संस्था उत्तम लेखक जिव्हाळ्याने राखून ठेवण्यासाठी देखील प्रसिद्ध होत्या आणि आहेत. वरदाच्या ह. अ. भावेंनी प्राचीन साहित्य मराठीत आणून आतबट्ट्याचाही व्यवहार केला असे म्हणता येईल. मराठी वाचकांवर ह्यांचे मोठे ऋण आहे. आता मात्र तसे लेखक राहिले नाहीत आणि मेहतांसारख्या तद्दन बाजारु प्रकाशन संस्था सध्या जोरात कार्यरत आहेत. मात्र त्यांनी देखील भैरप्पांची पुस्तके मराठीत आणून मोठे कार्य केले आहे असे म्हणता येईल.
26 Jul 2025 - 11:52 am | Bhakti
+१००
23 Jul 2025 - 1:41 pm | चौथा कोनाडा
आटोपशीर आणि सुंदर ओळख.
मी पहिले तीनही भाग वाचलेले आहेत.. काही ठिकाणी रटाळपणा नक्कीच अनुभवायला येतो.. कादंबऱ्यांमध्ये सुद्धा पुनरुक्ती जाणवत राहते. पण त्या रटाळपणासहित कादंबऱ्या आवडून जातात.. मनात घर करून राहतात.
ही सुद्धा यादीच आहे.. अजून योग आलेला नाहीये.
ही तुम्ही कुठल्या प्लॅटफॉर्मवर ऐकली?
23 Jul 2025 - 2:06 pm | Bhakti
धन्यवाद चौको.स्टोरीटेलवर ऐकली.
25 Jul 2025 - 2:45 pm | चौथा कोनाडा
ओके... कुणाच्या आवाजात आहे ?
25 Jul 2025 - 3:15 pm | Bhakti
अतुल पेठे यांचे अभिवाचन आहे.
छान नाट्यमय पद्धतीने अभिवाचन केले आहे.
26 Jul 2025 - 11:15 am | प्रचेतस
नाट्यमय अभिवाचनामुळेच तुम्हाला आवडली असावी, अन्यथा वाचताना ही कादंबरी अतिशय रटाळ वाटते.
26 Jul 2025 - 11:51 am | Bhakti
:) :)
25 Jul 2025 - 9:35 pm | कपिलमुनी
रामूने सत्या बनवला.. मग सत्यासारखं काहीतरी बनवायचा म्हणून ढीगभर पिक्चर केले..
नेमाडेंनी कोसला लिहिली..मग कोसला सारखा काहीतरी लिहायचा म्हणून हिंदू लिहिली.
26 Jul 2025 - 10:48 am | Bhakti
हिंदू कादंबरीला 'काहीतरी' नाही म्हणता येणार,मला कोसला आवडली नाही.पण ही हिंदू कादंबरी आवडली.
26 Jul 2025 - 8:51 am | कर्नलतपस्वी
यांची कोसला खुप लोकांना आवडले. माझ्या संग्रहात आहे पण कधीही वाचायला घेतल्यावर एकदोन पानाच्या पुढे प्रगती होत नाही. तेच भैरप्पांचे अनुवादित पुस्तक एका बैठकीत संपते.
असो. किंडलपेक्षा कागदी पुस्तके आवडतात. नवीन आणले की त्याचा येणारा वेगळाच सुवास लहानपणीच्या नवीन शाळेची पुस्तके आठवतात.
26 Jul 2025 - 10:54 am | Bhakti
भैरप्पा _/\_ सध्या ' पर्व 'ऐकायला सुरूवात केली आहे.माझं आताच भैरप्पांच्या कादंबरीबरोबर नातं निर्माण झालंय.आवरण,वंशवृक्ष अक्षरशः वेड लावलं.त्यांच्या कानडी कादंबरींचा भावानुवाद मराठीत करून उमा कुलकर्णी यांनी वाचकांसाठी खुप खुप बहुमोल कार्य केले आहे _/\_
26 Jul 2025 - 11:22 am | प्रचेतस
जा ओलांडूनी, सार्थ, पारखा ह्या देखील उत्कृष्ट कादंबर्या आहेत, त्या आवर्जून वाचा. कन्नड कादंबर्यांमुळे मी तर भारावून गेलोय. अफलातून चित्रण असते. शिवराम कारंथांची पुस्तके तर आवर्जून वाचा, मुकज्जी, अशी ही धरणीची माया, चोमा महार, डोंगराएव्हढा ह्या त्यांच्या एकाहून एक सरस कादंबर्या आहेत. ह्या शिवाय अनंतमूर्ती ह्यांची संस्कार, रावबहादूर कुलकर्णी ह्यांची ग्रामायण, गोपाळकृष्ण पै यांची स्वप्न सारस्वत ह्या सर्वच कादंबर्या आवर्जून वाचण्यासारख्या आहेत.
26 Jul 2025 - 11:50 am | Bhakti
वाह! मस्तच! नक्कीच वाचणार.
26 Jul 2025 - 3:52 pm | कर्नलतपस्वी
अंजावर चकटफू पडफ मिळाले. तीनशे पानं एका सटक्यात वाचली. महाभारतावरील एक वेगळा दृष्टिकोन आवडला म्हणून अमेझोन वरून मागवले. नंतर तुमच्याच (प्रचेतस, ) शिफारशीनुसार बाकीची अक्षरधारामधे खरेदी केली. सर्व चांगली आहेत.. कारंथांची मागवतो.
सध्या फोटोग्राफी चा नाद लागलाय. अधुनिक तंत्रज्ञानामुळे बरेच फोटो बरेच येतात पण जरा शास्त्रशुद्ध शिकावे म्हणून डाॅक्टर कात्रे यांचे डिजीटल फोटोग्राफी हे पुस्तक मागवले आहे.
26 Jul 2025 - 11:26 pm | सुक्या
धन्यवाद प्रचेतस
लगोलग ही सारी पुस्तके बुकगन्गा वर ऑर्डर केली.
26 Jul 2025 - 1:14 pm | श्वेता२४
म्हणून ऑफीसच्या पुस्तक प्रदर्शनात हे पुस्तक खरेदी करणार एवढ्यात माझ्या वरीष्ठांनी माझ्यकडे आहे घेउ नका म्हणाले. नंतर त्यांनी आणून दिले. काही पाने वाचूनच ही पुस्तक पूर्ण होणर नाही याची खात्री पटली. पुस्तक परत केले व पैसे वाचवल्याबद्दल सरांना चहा दिला. :))
27 Jul 2025 - 3:34 pm | चौथा कोनाडा
27 Jul 2025 - 12:01 am | रामचंद्र
उद्धव ज. शेळक्यांची 'धग'. तपशील बदलले असतील पण आपल्याकडचं संसारी स्त्रीचं आयुष्य फार काही बदललं आहे असं वाटत नाही.
27 Jul 2025 - 7:42 pm | मारवा
मौज प्रकाशनाने नेमाडे यांचे महत्व ओळखण्यात चूक केली. माझ्या माहितीप्रमाणे कोसला चा पहिला खर्डा मौजेकडे गेला होता व तो नाकारण्यात आला होता चूकभूल देणे घेणे.
मौजे च्या प्रकाशकांचा एक साहित्यविषयक विशिष्ट दृष्टीकोन होता. कलात्मक सौंदर्य त्यात ते महत्वाचे मानत. त्यांना सामाजिकतेचे वावडे होते असे नव्हे.पण त्यांना मूलभूत कलात्मक सौंदर्य साहित्यिक मूल्य जे घाट शैली आशय संदर्भात आहे ते अधिक मोलाचे वाटत. कलेसाठी कला या बाजूचे मौज प्रकाशन होते. पण त्यांनी या मर्यादेमुळे एकीकडे अनेक चांगलेनलेखन नाकारले हे जसे खरे आहे तसेच भागवत आदींनी त्यांच्या साहित्य तत्वांचा अंगीकार असलेले अतिशय सकानसुंदर साहित्य सुद्धा प्रकाशित करून एकूण मराठी साहित्य समृद्ध केले. श्रीपु एकदा म्हणाले की आम्ही काय नाही दिले पेक्षा काय दिले प्रकाशिले त्यावरून आमचं मूल्यमापन करावे
पॉप्युलर चे भटकळ हे मौजेचे उत्तम तत्व आणि मौजे ने नाकारलेले किंवा सामाजिक आशयप्रधान साहित्य या दोघांचा उत्कृष्ट balance पॉप्युलर ने केला असे माझे मत आहे. एकीकडे ग्रेस यांचे सर्व साहित्य आणि एकीकडे नेमाडे यांचे साहित्य पॉप्युलर सारखी संस्था प्रकाशित करू शकते हे भटकळ यांचे greatness आहे विशाल साहित्यिक दृष्टिकोन आहे. Best of both worlds
मौज चां दमदार विरोधी बाजूचा काउंटर प्रवाह प्रकाशित करणारी संस्था बघू गेलो तर सर्वात वर लोक vangmay गृह हे आहे. ही साम्यवादी मंडळींची संस्था आहे पण अतिशय दमदार सकस साहित्य निर्मिती इथे होते.
राजहंस ही पॉप्युलर चा पाया प्रेरणा असलेली संस्था आहे. पण त्याहून अधिक चे वैशिष्ट्य म्हणजे ती आधुनिक आणि खऱ्या अर्थाने पॉप्युलर साहित्या ची सुद्धा प्रकाशन करणारी आहे. गंमत म्हणजे मौज आणि पॉप्युलर हे जसे नावाच्या विरुद्ध गंभीर साहित्य प्रकाशित करणाऱ्या संस्था आहेत.
Lokwvangmay गृह नावाला जगते.
पद्मगंधेचा कल हा संशोधनात्मक वैचारिक स्वरूपाच्या साहित्य कडे अधिक आहे.
(या सर्वांनी या प्रकाशक मी लेखक घडवले असे म्हणणे हा सर्व महान लेखकांचा अपमान आहे )
मला स्वतःला भागवत फार snobbish elite वाटतात. त्यापेक्षा मला भटकळ जवळचे वाटतात. भागवत मला गमतीने कधी कधी fountain head कादंबरीतील ellsworth toohey पात्रासारखे भासतात.
काही लेखक स्वतः च प्रकाशित होतात जसे उत्तम कसदार लेखन असले तरी आणिंकही ठिकाणी पूर्णपणे प्रचारी चुकीचे असले तरी आ हा साळुंखे वगैरे स्वतःची पुस्तके स्वच्छ छापतात. उद्धव शेळके धग कार स्वतः प्रकाशन संस्था चालवत त्यांची परिस्थिती हलाखीची होती पुस्तक विक्री हा पोटाचा व्यवसाय होता असेही आहेत काहींप्रकाशक.
प्रास प्रकाशन सारखे अशोक शहाणे सारखे अतिशय मनस्वी प्रकाशक ज्यांनी अरुण कोल्हटकरांच्या अद्भुत सुंदर कविता अतीव सुंदर रीतीने प्रकाशित केल्या या कवितेच्या पुस्तकांचा कागद त्यांचा रंग त्यांचा आकार सर्व काही वेगळा प्रयोगशील आणि फार काबील ए तारीफ असा आहे. याला म्हणतात साहित्यावरील प्रेम.
निर्मितीं मूल्ये राजहंस ची उत्कृष्ट आहेत .मेहता प्रकाशन प्रामुख्याने अनुवादित साहित्य प्रकाशित करते आणि बिकने वाला मालं
त्यांची काही साहित्यिक धारणा असेल असे वाटत नाही.
श्री गजानन बुक डेपो म्हणजे महाराष्ट्राचा गीता प्रेस सारखा अवतार काहीसा.
शब्दालय हे श्रीरामपूर सारख्या आडगावचे प्रकाशन पण भारी पुस्तके प्रकाशित करतात विलास सारंग आदनची सुद्धा.
पेंग्विन सारख्या जागतिक प्रकाशनाने एक उत्तम.मराठी कथांचे संकलन प्रसिद्ध केले होते. ते कौतुकाने घेतले. निशिकांत मिरजकर हे संकलक होते उत्तम कथा पण पुस्तकात इतक्या ढिगाने व्याकरण आणि शब्द यांच्या चुका होत्या की माझ्या या प्रतिसादाला तुम्ही चक्क निर्दोष म्हणाल.त्यावर मेघना पेठे यांनी पेंग्विन ची खूप खेचली होती.
मराठीत आहे तर काहीही छापा अशी चूक पठ्ठे इंग्रजीत करतील का ?
अंतर्नाद चे प्रकाशन मौजे च्या सत्यकथे ला टक्कर होते. कॉम्रेड भानू काळे हे थोर साहित्यिक जाण असलेले प्रकाशक होते. अंतर्नाद बंद करावे लागले याची मोती खंत आहे
सध्या नव्या दमाचे पपायरस प्रकाशन सुंदर आणि उत्कृष्ट लेखन घेऊन येत आहे.
27 Jul 2025 - 8:21 pm | Bhakti
खुपच सुंदर प्रतिसाद!मला म्हणून मिपावर लेख लिहायला आवडतात.नाहीतर ही माहिती माझ्यापर्यंत यायला अजून पाच वर्षे लागली असती :)
लोकवाङमयची पुस्तकं हा समाज हुंकार आहे.आ.ह.साळुंखे म्हणजे लोकायत संस्था.होय पपायरस प्रकाशनही उत्तम पुस्तकं छापित आहेत.