जिम कॉर्बेट नी केनिथ अँडरसन यांच्या वाघ, बिबळ्या शिकारीच्या कथा वाचताना सहज आठवले की आपण शिकार तर नाही, पण एका उपद्रवी उंदराला पकडले होते. उंदीर पकडण्यात कसला आलाय शूरपणा? पण हा उंदीर सतत चार दिवस चारचाकीत धुमाकूळ घालत होता. माणसे आणि वायर याने सोडल्या नव्हत्या. त्याला पकडणे सोपे नव्हते. तसेच चालत्या गाडीत (८०-१०० च्या स्पीडवर) याने जर मला अंगावर चढून किंवा पायात येऊन बिचकावले असते, तर गाडीसह मी कुठेतरी घुसलो असतो. माझ्या मृत्यूचे कारण कुठलाही डिटेक्टिव्ह, शेरलॉक होम्स, गोपीचंद जासूस शोधू शकला नसता. तर या अशा उंदराला मी कसे पकडले, याची ही कथा. पुढे-मागे तुम्हालाही कामात येऊ शकते.
गाडीत उंदीर घुसणे हे भयंकर प्रकरण असते. वायरी कुरतडणे, घाण करणे, फ्लोअर मॅट फाडणे असे अनेक उद्योग करून उंदीर तुमच्या गाडीची वाट लावू शकतो. उंदराने असे करू नये म्हणून यूट्यूबवर असंख्य व्हिडिओ आणि ॲमेझॉनवर असंख्य प्रोडक्ट्स आहेत. तरीही लाखो गाड्यांची दरवर्षी उंदरे वाट लावतात. त्यासाठी 3M टेप, जाळी बसवणे वगैरे वगैरे प्रयोग लोक करत असतात. काही विष घालून उंदराला मारतात, पण तो एखाद्या अवघड जागी जाऊन मेला तर त्याच्या प्रेताच्या वासाने गाडीत भयंकर वास सुटतो.
मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये लहान भावाचे लग्न होते म्हणून मी आणि माझे वडील Hyundai i10 ही माझ्या काकांची गाडी घेऊन नाशिकला पत्रिका वाटायला पोहोचलो. दिवसभर पत्रिका वाटून झाल्यावर आत्याच्या घरी जेवणे आटोपून आत्याला घेऊन रात्री १ वाजता नाशिक बाहेरच्या धुळे रोडवरील पंपावर २ तास घालवून CNG भरून आम्ही धुळ्याकडे सुसाट सुटलो. रस्ता मोकळाच होता. ट्रक सोडले तर हायवेला जास्त गर्दी नव्हती.
अचानक आत्याने सांगितले की माझ्या अंगावरून काहीतरी गेलं, आणि असं दोन-तीन वेळा झालं. मी एका भरपूर प्रकाश असलेल्या हॉटेलबाहेर गाडी लावली आणि आम्ही तिघांनी शोधाशोध सुरू केली. सर्व सामान काढूनही काही न मिळाल्याने, आम्ही भास झाला असावा असे समजून पुन्हा निघालो. नंतर १ तास काहीही हालचाल झाली नाही. जुनी गाणी आणि जुन्या गप्पा ऐकत प्रवास चालू होता. मध्यंतरी मलाही पायाजवळून काहीतरी गेल्याचा भास झाला, पण मी दुर्लक्ष केलं.
आत्याला ३ वाजता मालेगावात सोडून मी आणि वडील धुळ्याकडे निघालो. धुळ्यात तासाभराने पोहोचल्यावर, उतरल्या उतरल्या वडिलांच्या पायाला रक्ताची धार दिसली. मलमपट्टी करून, "उतरल्यावर ठेच लागलेली असावी" असे आम्हाला वाटले. पण वडिलांनी सांगितले की, "गाडीत मी झोपेत असताना मला काहीतरी चावलं, आणि जखमेवरून तो उंदीरच असावा" असा ठाम विश्वास व्यक्त केला. "मला जाणवत होतं, पण तू गाडी चालवताना घाबरू नये म्हणून मी काही बोललो नाही," असं त्यांनी बोलून दाखवलं.
मला मात्र गाडीत उंदीर वगैरे घुसू शकत नाही असं वाटत होतं. तरीही, यावर काय करता येईल म्हणून मी बऱ्याच लोकांना सल्ला विचारला. एकाने सांगितले, "गाडी वॉशिंगला टाकून दे, ते स्वच्छ करून उंदीर पळवून लावतील." त्याप्रमाणे, त्या दिवशी मी गाडी सर्विस सेंटरला धुवायला दिली. त्यांनी "डिझेल मारू, त्याच्या वासाने उंदीर पळेल" असं सांगितलं. ते करून झाल्यावर मी निर्धास्त होऊन गाडी घेऊन फिरत होतो.
रात्री आम्ही शहरातीलच काकांच्या घरी जायला निघालो – बायको, मी, काकू आणि मुलगा. मुलासाठी लावलेलं "शार्क डू डू डू डू" गाणं ऐकत आमचा प्रवास हळुवार सुरू होता. डिसेंबरचा महिना असल्याने मी गाडीत हीटर चालू केला. ५ किमीवरील घर ५०० मीटर राहिल्यावर, माझ्या चपलेतून डोकावणाऱ्या डाव्या पायाच्या तर्जनीला काहीतरी चावलं. मी जोरात पाय उचलला आणि गाडी बंद करून आतला लाईट लावला. सगळे दचकले. थोडं थांबून मी पुन्हा क्लच दाबून स्टार्ट करू लागलो, तर पुन्हा पायावर जोराचा हल्ला झाला.
आता मात्र माझी खात्री पटली की गाडीत उंदीर आहे, आणि हीटर चालू केल्यामुळे उष्ण वातावरणामुळे तो बाहेर आलाय. तरीही बायको आणि काकूने मला सांगितले, "घर जवळ आलंय, काय घाबरतो? मुलासारखा मुलगा असून पण, चालव." तेवढ्यात उंदराने माझ्या बाजूला बसलेल्या काकूच्या पायावर हल्ला चढवला. काकू आजारी असल्याने हालचाल करू शकत नव्हत्या, त्यामुळे जोरजोरात आरडा-ओरडा सुरू केला. पटकन दरवाजा उघडून खाली उतरू लागल्या. मागे पाहिलं तर बायको मुलाला घेऊन आधीच उतरली होती. ते तिघं एकमेकांची साथ करत पायी घराच्या दिशेने निघून गेले. गाडीत मी आणि उंदीर – आम्ही दोघच उरलो. आता काय करावे म्हणून सुचेनाच.
मी काकांना फोन करून घरातून माझे शूज घेऊन या, असं सांगितलं. त्यांनी टू-व्हीलरवर मला शूज आणून दिले. ते शूज घालून, जीन्सची बॉटम त्या शूजमध्ये खुपसून मी हिंमत करून गाडी चालू केली, आणि कशीबशी घरी पोहोचलो. नंतर घरातील सर्वांनी टॉर्च, बॅटऱ्या घेऊन १ तास उंदराचा युद्धपातळीवर शोध सुरू केला. पण उंदीर कुठेही दिसला नाही, किंवा त्याचा मागमूसही नव्हता.
दुसऱ्या दिवशी दिवसभर गाडी उन्हात उभी करून ठेवली – जेणेकरून गाडी तापून उंदीर पळ काढेल. पण त्या उपायावर विसंबून फायदा नव्हता. उंदीर जिवंत किंवा मेलेला हवा होता खात्रीसाठी. त्याशिवाय मी गाडी पुन्हा चालवू शकत नव्हतो.
अशात मला माझा एक “कार एक्सपर्ट” कलीग आठवला. मी त्याला फोन करून झालेला प्रकार सांगितला आणि यूट्यूबवर पाहिलेल्या व्हिडिओतील 3M टेप, तंबाखू, डांबर गोळ्या वगैरे काय वापरू, म्हणून सल्ला मागितला. त्याने सांगितले, "हे सगळं गाडीत उंदीर घुसू नये म्हणून आहे. आता जो उंदीर आधीच आत घुसलाय, त्याला हे सगळं वापरणं निरर्थक आहे. आता २ उंदीर पकडण्याचे पिन्जरे घेऊन गाडीत सापळा लाव. तेव्हाच उंदीर सापडेल."
त्याचे म्हणणे बरोबर होते, गाडीत उंदीर घुसू नये म्हणून काय करावे हे सांगणारे असंख्य व्हिडिओ होते, पण गाडीत घुसलेला उंदीर कसा काढावा हे सांगणारा एकही व्हिडो मला मिळाला नव्हता. त्या प्रमाणे मी धुळ्यातील प्रसिद्ध पेठ “पाचकंदील” भागात जाऊन एक पिंजरा विकत घेतला. पिंजरा विकणाऱ्याने मला सांगितले, "आत झेंडूचं फुल ठेवा. त्याच्या वासाने उंदीर येतो." पिंजरा आणि सोबत दोन स्टिक ग्लू पॅड आणून मी संध्याकाळी झेंडूच्या फुलासह गाडीत ठेवले आणि त्याचा फोटो काढून फेसबुकवरील एका कारला वाहिलेल्या समूहात झालेला सगळा प्रकार लिहून टाकला.
तिथे “new fear unlocked” वगैरे दणादण कमेंट्स पडू लागल्या. अशात एकाने कमेंट केली की, "झेंडूच्या फुलाऐवजी काजू-बदाम ठेवा."
त्याप्रमाणे मी काजू-बदाम घेऊन अर्ध्या तासाने गाडी जवळ गेलो. दरवाजा उघडून पाहिलं तर काय! झेंडूच्या फुलाचे चिथडे झाले होते. उंदीर पिंजऱ्यात अडकला होता. सापळा लावल्याच्या अवघ्या अर्ध्या तासात सापळा यशस्वी झाला होता.
उंदीर बाहेर काढून त्याला सोडून द्यावं असं ठरवलं. पण हा “अनुभवी” उंदीर परत येऊन गाडीत शिरेल अशी शक्यता होती. म्हणून त्याला रात्रभर पिंजऱ्यात पडू दिलं आणि सकाळी लांब सोडून यावं असं ठरवलं. ही आनंदाची बातमी मी फेसबुकवरील समूहात कळवली. तिथे "उंदराला मारून टाकावे" किंवा "जिवंत ठेवावे" यावरून दोन गट पडले.
सकाळी मी पिंजरा पाहिला, तेव्हा रात्रीच्या थंडीने उंदीर काकडून मेला होता. त्याला फेकून, पिंजरा गरम पाण्याने स्वच्छ धुवून काढला. त्यानंतर पुन्हा असा त्रास झालेला नाहीये. भविष्यातही कुणाला होऊ नये, अशी अपेक्षा!
हा सर्व प्रकार झाल्यावर मी दुसऱ्याचा दिवशी बाजरात जाऊन लेस नसलेले शुज आणून गाडीत ठेवले, जेव्हा केव्हा कुठेही जायचे असेल तर विना शुजची मी गाडी चालवत नाही, गाडीत खाद्यपदार्थ खाण्यास बंदी केली आहे. (अपवाद मुलगा) गायछाप जर्दा, साध्या मास्क मध्ये बांधून त्याच्या पुरचुंड्या इंजिन मधे जागोजागी “डिप्लॉय” केल्या आहेत.
प्रतिक्रिया
29 Jun 2025 - 10:42 pm | मारवा
वाचतांना अनेक वेळा अंगावर रोमांच आले.
उत्तम निवेदन शैली!
30 Jun 2025 - 8:05 am | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद मारवा!
29 Jun 2025 - 11:00 pm | कंजूस
अनुभव नक्कीच उपयोगी पडतील.
एक पिंजरा कायम गाडीत ठेवा. सुक्या खोबऱ्याचा तुकडा पिंजऱ्यातल्या तारेत खोचून ठेवणे.
----------------------
आमच्याकडे घरात हा प्रकार झाला एकदा. रात्री पायावरून काहीतरी गेलं. त्या खोलीला बंद करून लाकडी ड्रायवर तपासले तेव्हा 'तो' दिसला. मग तो ड्रायवर लगेच बंद करून ते कपाट ( छोटेच होते ) जिन्यात नेऊन उघडल्यावर उंदीर जिन्यावरून खाली गेला. दोन चार दिवसांनी काही पदार्थ खाल्लेले सापडले आणि लेंड्या दिसल्या. चिकट पुठ्ठा बाल्कनीत ठेवल्यावर रात्री आवाज झाला. उंदीर चिकटला होता पण पुठ्ठा इकडेतिकडे ओढत नेला होता. दुसऱ्या दिवशी मेलेला सापडला. चार पाच कुंड्या फरशी चिकट झाली ती खोबरेल तेलाने पुसून साफ केली. पुठ्ठा आणि उंदिर टाकून दिले. एका उंदरावर साठ रुपये खर्च झाले होते. चार दिवसांनी पुन्हा उंदिर आल्याची चिन्हे दिसली. यावेळी चिकट पुठ्ठा आणून तो दोन भागांत कापला. फरशीच्या जड तुकड्याला पुठ्ठे बांधले आणि ठेवले. रात्री उंदीर चिकटला पण पुठ्ठा हलवता आला नाही. सकाळी गच्चीत जाऊन एका काटकीने उंदीर बाजूला केला व पुठ्ठा घरात आणला. परत एक उंदीर आल्याचे लक्षात आल्यावर पुठ्ठा ठेवला. उंदीर मिळाला. काटकीने काढून पुठ्ठा परत ठेवला . एका अर्ध्या पुठ्ठ्यात पाच उंदीर पकडले. उंदीर कुठून येतो याचा शोध घेतल्यावर समजले की बाल्कनीबाहेर जी नेटची केबल होती त्यावरून नवनवीन उंदीर चढून येत होते. तिथून बाल्कनीतल्या झाडाच्या फांदीवरून घरात. ती केबल दूर केली.
तळपायाच्या कातडीला वास असतो ती उंदीर कुरतडतात. कपडे, रद्दी कुरतडून चिंध्या नेऊन घर बांधतात. वायरी, लाकूड कुरतडून दातांना धार करतात.
30 Jun 2025 - 8:13 am | अमरेंद्र बाहुबली
रोचक अनुभव,
घरात शिरू शकतील अश्या सर्व फटी बंद करून टाकाव्यात.
उंदराच्या लघवीला (?) एक विशिष्ट वास असतो, ज्या घरात उंदीर नसतात तिथे एकदाही उंदीर आला की तो विशिष्ट वास यायला लागतो. काही लोकांच्या घरात हा वास खूप असतो इतका की ते लोक त्या वासाल यूज टू झालेले असतात. आणी आपल्याला लक्षात आला नाही तर समजायचे की आपणही झालोय. मला अनेकवेळा तो वास काही रेस्टोरंट्स, घरे इथे जाणवतो तिथे मी पुन्हा जात नाही. बाकी फ्लॅट सिस्टीम मध्ये उंदरांचा त्रास नसतो हे जाणवले आहे.
29 Jun 2025 - 11:27 pm | चंद्रसूर्यकुमार
रोचक अनुभव.
यावर उपाय म्हणून मांजर पाळायचा विचार केला का? खूप गोंडस आणि प्रेमळ प्राणी असतो आणि त्यामुळे आपलेही उंदीर मारायचे काम परस्पर होऊन जाईल.
30 Jun 2025 - 8:15 am | अमरेंद्र बाहुबली
सोसायटीत एक मांजर पाळले आहे, पण त्याने २ व्हीलर्स चे सिट खराब करण्यापलीकडे काही भरीव काम केले आहे असे जाणवले नाही. उंदीर निर्मूलनात त्या मांजराचे काहीही योगदान नाही. त्याची सुस्तावलेली हालचाल पाहुन कळते की हे मांजर काही कामाचे नाही.
30 Jun 2025 - 7:20 am | कर्नलतपस्वी
बाहुबलीके कार मे उंदीर....
इसीलिये बाहुबली ने कट्प्पा को मारा होगा....
30 Jun 2025 - 8:16 am | अमरेंद्र बाहुबली
खिक्क
30 Jun 2025 - 11:08 am | कानडाऊ योगेशु
कटप्पा नसेल तो कॅटप्पा असेल.
30 Jun 2025 - 11:07 am | कानडाऊ योगेशु
उंदरासोबतच पाल सुध्दा कार वर चढु शकते.
कार क्लोज्ड पार्कींग मध्ये लावत असल्याने व पार्किंगच्या जागेचा भिंती अरुंद असल्याने पाल टपावर वा बॉनेट वर चढु शकते. एकदा असा अनुभव आला होता कार भरधाव होती व वायपर चालु केले तेव्हा तिथे असलेली पाल वायपर मुळे डायरेक्ट समोरच्या काचेवरच आली आणि एकदम दचकायला झाले.
1 Jul 2025 - 10:23 am | अमरेंद्र बाहुबली
बरेच अपघात हे असेच होत असावेत. आपल्याला कारणे कधी कळलीही नसतील.
30 Jun 2025 - 11:20 am | Bhakti
खुप माहितीपूर्ण,रंजक घटनाक्रम लिहिला.
पाल..ईई मला खुप किळस येते.लिहितांनाही लाज वाटते पण ,एका पालीने तर फ्रीजच्या बाजूची फरशी तिचे वॉशरूम केलंय.रोज सकाळी तिची घाण तिथे असतेच.पालीसाठी काही उपाय?
1 Jul 2025 - 10:05 am | नचिकेत जवखेडकर
अंड्याची टरफलं ठेवली तर नाही येत म्हणे पाल. आमच्या शेजाच्यांनी एकदा सांगितलं होतं. होतो का उपयोग माहित नाही पण करून बघा १-२ दिवस.
1 Jul 2025 - 10:43 am | चंद्रसूर्यकुमार
मागे एकदा कोणीतरी सांगितले होते की मोराच्या पीसाला पाल घाबरते. म्हणून चिकटपट्टीने भिंतीवर मोराचे पीस चिकटवून ठेवले होते. पण कुठचे काय. एक दिवस पाल त्या मोराच्या पीसाच्याच मागे जाऊन लपली होती :)
1 Jul 2025 - 10:44 am | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद ताई, नचिकेत म्हणतात तसे अंडे लावून फायदा होतो का पहा,
प्रोसेस :- अंडे घ्यायचे, त्याला बारीक छिद्रे पडायचे आतला बलक काढून घ्यायचा, त्याचे आम्लेट बनवून खाऊन टाकायचे. ते बारीक छिद्र पाडताना अंडे फुटणार नाही ह्याची काळजी घ्यायची ते अंडे खिळ्यात जिथे पाल येते त्या ठिकाणी अडकवून ठेवायचे.
दुसरी पद्धत :- भिंतीवर कांचा चीना राजा (असे काहीतरी) लिहायचे पाल सुशिक्षित असेल तर वाचून निघून जाईल निंपरत येणार नाही. :)
1 Jul 2025 - 6:10 pm | Bhakti
काही शाकाहारी उपाय नाही का ?;)
1 Jul 2025 - 8:04 pm | कर्नलतपस्वी
बल्लीदर्शन करा.
बरोबर कांजिवरम ची साडी पण घेऊन या.
कदाचित फायदा होईल.
तामीळ मधे पालीला बल्ली म्हणतात. हे एकमात्र पालीचे मंदिर आहे. मंदिराच्या छतावर मोठी चांदीची पाल आहे. तीचे दर्शन करण्यासाठी एक शिडी ठेवली आहे. कांचीपुरम मधे एक हजार मंदिरे होती. आता काहीच उरली आहेत. पण मंदिरे मात्र सुंदर आहेत.
1 Jul 2025 - 8:06 pm | प्रचेतस
हंपीतील मंदिरांतील भिंतींवर पाली देखील कोरलेल्या आहेत.
1 Jul 2025 - 9:17 pm | Bhakti
अहो, सोन्याची आणि हंपीची कोरलेली पाल हलत डुलत नाही ना .. लहानपणी माझ्या कडून अनवधानाने पालीचा दारात शिरच्छेद झाला होता.मुंडक एकीकडे धड एकीकडे तेव्हा दोन दिवस तापाने आजारी होते.तेव्हापासून किळसच येते.माझी मैत्रीण तर पाल दिसली तर अर्धा तास बैचेन होते.
1 Jul 2025 - 9:38 pm | कर्नलतपस्वी
तुम्हांला जायलाच हवे. तुमच्या हातून पालीचा मडर, मर्डर हो , त्याच्ये पापक्षालन फक्त याच मंदिरात होते अशी मान्यता आहे. झटपट जा आणी पापमुक्त व्हा.
30 Jun 2025 - 11:23 am | टीकोजीराव
झेंडूचे फुल आणि तंबाखूचा उपयोग उंदीरा विरुद्ध करता येतो हे पहिल्यांदा समजले
1 Jul 2025 - 10:44 am | अमरेंद्र बाहुबली
मलाही
30 Jun 2025 - 1:04 pm | अभ्या..
भौबली, गाडीत राजेश चुन्याची डब्बी पण ठेवत जावा. एखादा उंदीर गाय छापची पोटली घेउन जायाचा आणि चुना मागायला परत यायचा. ;)
.
पण उंदराना नाहीच आवडत गायछाप बहुतेक. :)
30 Jun 2025 - 1:57 pm | अमरेंद्र बाहुबली
खिक्क!
1 Jul 2025 - 10:45 am | अमरेंद्र बाहुबली
खिक्का!
30 Jun 2025 - 2:04 pm | कर्नलतपस्वी
सैन्यात प्रशिक्षणा दरम्यान सकाळी सकाळी खुपच घाई गडबड असते. मरायला वेळ नसतो. एक दिवस सकाळ कसली पहाटच म्हणावी लागेल . घाई घाईत युनिफॉर्म चढवला व परेड ग्राऊंड कडे पळालो. पुर्ण परेड करताना बुट ॲकंल मधे अंगठ्या जवळ काहितरी वळवळत होते. परेड करताना सारखा चुकत होतो. उस्ताद सारखा माझ्यावर भडकत होता. कधी एकदा तो पिरियड संपतो आणी कधी एकदा बुट काढून चेक करतो असे झाले होते.
बघतो तर काय बुटाच्या आत मधे एक रक्तबंबाळ मेलेली पाल. रात्री कधीतरी बुटात जाऊन बसली असावी.
एक दोन एक,लेफ्ट राईट मधे कधी तीला सद्गती मिळाली परमेश्वर जाणे.
1 Jul 2025 - 10:46 am | अमरेंद्र बाहुबली
हाहा. घाण मरण मिळाले पालीला!
30 Jun 2025 - 5:03 pm | विजुभाऊ
अथतो उंदीर पुराणजिज्ञासा संपूर्णम
बेष्ट लिवलंय अबा भाउ
1 Jul 2025 - 10:46 am | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद विजूभाऊ.
30 Jun 2025 - 6:32 pm | गामा पैलवान
अमरेंद्र बाहुबली,
भारी किस्सा आहे. गाडीत घुसलेला उंदीर कसा काढायचा यावर एक व्हिडू बनवाच.
आ.न.,
-गा.पै.
1 Jul 2025 - 10:47 am | अमरेंद्र बाहुबली
बघतो! लिहिणे सोपे आहे व्हिडिओ वगैरे नको.
1 Jul 2025 - 10:37 pm | गामा पैलवान
आयशप्पत, त्या कर्णावतीत पडलेल्या विमानात उंदराने घुसून महत्त्वाच्या वायरी कुरतडल्या तर नसतील?
-गा.पै.
2 Jul 2025 - 7:24 am | विवेकपटाईत
किस्सा आवडला. पण उंदीरा सारख्या घरात घुसून आपल्याला त्रास देणार्या उंदीरला कधीच जिवंत ठेवले नाही पाहिजे. उत्तम नगरला गल्लीत राशनची दुकान होती. उंदीर घरात येत असे. हत्या करणे पाप मी कधीच उंदराला मारले नाही. पिंजर्यात उंदीर बंदिस्त झाल्यावर उन्हाळ्याच्या दिवसात गच्चीवर पिंजरा ठेऊन देत असेल. दोन दिवसांत उंदीर शहीद. हिवाळ्याचे दिवस असेल तर रात्री पिंजरा गच्चीवर ठेऊन त्यावर थंड पाणी टाकीत असे. रात्र भारत उंदीर शहीद. हत्येचे पाप ही आपल्याला लागत नाही.
2 Jul 2025 - 10:22 am | सौंदाळा
काही वर्षांपूर्वी माझ्या कारमधे पण उंदीर घुसला होता.
घूसून बाहेर गेला होता.
एकदा कार मधे बसलो आणि चावी लावायच्या आधीच वडीलांनी बटन दाबून खिडकीची काच खाली केली, नंतर पाहिले तर बर्याच गोष्टी चावी न घालताच ऑपरेट होत होत्या. बॉनेट उघडून बघितल्यावर उंदराचे प्रताप दिसले. वडीलांना ताबडतोब कारमधून उतरवून कॅबने पाठवले. कार सर्व खिडक्या उघड्या ठेऊन हळू हळू चालवत सर्विस सेंटरला नेली. शॉर्ट सर्कीटमुळे कारला आगी लाग्॑ल्याच्या घटना पण आठवल्या, यात उंदरांचा सहभाग पण असू शकतो असे काही मित्र म्हणत होते.
बर्याच कुरतडलेल्या वायर बदलाव्या लागल्या. त्यानंतर काही दिवस कारमधे चावी लावायच्या आधी खिडक्या उघडत आहेत का किंवा अधूनमधून बॉनेट उघडून चेक करायची सवयच लागली होती, उंदराच्या दहशतीमुळे.
2 Jul 2025 - 4:23 pm | श्वेता व्यास
भारी किस्सा आहे. एकदा उंदराने वायपरला सप्लाय करणाऱ्या पाण्याची नळी आमच्या कारमध्ये कुरतडली होती. देव करो आणि असा कारमध्येच मुक्काम न करो त्याने.
2 Jul 2025 - 5:14 pm | अमरेंद्र बाहुबली
माझी दार दोन महिन्यातून एकदा हीच नळी कापतो.१५० रुपये दर ठरला आहे बदलायचा.