50 दिवसांसाठी 50 गमती आणि प्रयोग!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
1 May 2025 - 8:27 pm

नमस्कार! मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यांचा वेळ कसा जाणार ही‌ पालकांची चिंता आहे. मुलांसाठी 50 गमती व प्रयोग मी आणत आहे. दररोज मी माझ्या ब्लॉगवर एक प्रयोग व एक गमतीची कृती पोस्ट करेन. ह्या प्रयोगांसाठी घरामध्ये असलेल्या गोष्टीच लागतील! हे सर्व प्रयोग व गमती करायला अगदी सोप्या आहेत. वय 8 पासून पुढची व मोठेही त्याचा आनंद घेऊ शकतात. हा पहिला प्रयोग.

प्रयोग 1. पाणी कसं पडत नाही?

हा आश्चर्यकारक प्रयोग मला माझ्या मुलीने- अद्विकाने करून दाखवला! एक ग्लास पाण्याने पूर्ण भरा. एक ग्लासच्या आकारापेक्षा मोठा पुठ्ठा घ्या. ग्लासपेक्षा थोडा मोठा आकार कापून घ्या. ग्लासमध्ये पाणी पूर्ण् भरा. ग्लासवर पुठ्ठा ठेवा. आता ग्लास सिंकच्या वर धरा. ग्लास व पुठ्ठा दोन्ही व्यवस्थित पकडा. आता ग्लास उलटा करा! पुठ्ठ्याच्या खाली ठेवलेला हात काढून घ्या. हात काढला तरी पुठ्ठा पडत नाही आणि पाणीही पडत नाही! खालून काहीच आधार नसूनही पुठ्ठा पडत नाही! हे होण्याचं कारण म्हणजे पाण्याचं वजन हे खालून वरच्या दिशेने असलेल्या वातावरणाच्या दाबापेक्षा कमी असतं! ग्लास पूर्ण भरलेला मात्र हवा. 2-3 वेळेस हे करून पाहा व आनंद घ्या!

गंमत कृती 1. कागदापासून फटाका बनवा!

हीसुद्धा गंमत अद्विकाने मला दाखवली. कागदापासून तुम्ही मोठा दचकवणारा आवाज करणारा फटाका बनवला आहे का? त्याला एक मिनिटही लागत नाही. एक कागद घ्या, त्याला दोनदा दुमडा. मग त्यावर एक ट्रिक करायची! थोडा प्रयत्न करून पाहा व तुमच्या दोस्तांना विचारा. खूप सोपं आहे. मित्रांना दचकवायला किंवा घाबरवायला नक्की वापरता येईल!

तुमचा अनुभव नक्की शेअर करा. मी दररोज माझ्या ब्लॉगवर असा एक प्रयोग व एक गंमत पोस्ट करेन. ब्लॉगची लिंक ही आहे. पोस्टस इंग्रजीमध्येही उपलब्ध असतील. इथेही अधून मधून अपडेटस देईन.

(वाचल्याबद्दल धन्यवाद. लेख जवळच्यांसोबत अवश्य शेअर करावा. -निरंजन वेलणकर 09422108376. आकाश दर्शन, ध्यान, फन- लर्न व फिटनेस सत्र. लेख लिहीण्याचा दिनांक: 1 मे 2025)

तंत्रविज्ञानलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

चांगला उपक्रम आहे. एका लेखात पाच प्रयोग द्यावेत.
..........
अरविंद गुप्ता यांची दोन अशा खेळण्यांची पुस्तके आहेत.

मार्गी's picture

2 May 2025 - 3:59 pm | मार्गी

धन्यवाद! रोज पोस्ट करणार असल्यामुळे थोडी‌ मर्यादा आहे. म्हणून रोज एक प्रयोग व एक गंमत असं ठरवलं आहे.

आजचा प्रयोग व गंमत इथे वाचता येईल.

मार्गी's picture

6 May 2025 - 6:03 pm | मार्गी

मागच्या दिवसांमध्ये पोस्ट केलेले काही प्रयोग व गमती:

माठ कशामुळे गार होतो?
खेळाच्या मैदानात तुमची पाण्याची बाटली गार कशी ठेवणार?
तेच पाणी, पण वेगळा अनुभव
पंखा कसा काम करतो?
सायकल हळु चालवण्यातली गंमत
ओल्या पृष्ठभागावरून घसरणे!
आडवा होणारा हात
सांडणारं पाणी

सगळे प्रयोग व गमती इथे वाचता येतील. धन्यवाद.

मार्गी's picture

9 May 2025 - 8:30 pm | मार्गी

प्रयोग 9. पाण्यावर वस्तु का तरंगतात?

पाण्यावर वस्तु का तरंगतात ह्यावर तुम्ही कधी विचार केला आहे का? एक सोपी गोष्ट करू. कागदाची एक छोटी नाव बनवू व ती बादलीभर पाण्यात सोडू. तरणशक्ती किंवा प्लावकता (buoyancy/ upthrust) ह्या गुणधर्मामुळे वस्तु तरंगतात. तरणशक्ती हे त्या द्रवाचं बल असतं जे त्यावर पूर्णत: किंवा अंशत: बुडालेल्या वस्तुच्या वजनाला विरोध करतं. वस्तुचा तरंगण्याचा गुणधर्म ते दर्शवतं. जेव्हा लाकडासारखी एखादी गोष्ट पाण्यावर तरंगते, तेव्हा लाकूड हे समान वजनाच्या पाण्याच्या तुलनेत कमी पाण्याचे विस्थापन करत असते (कारण त्याची घनता पाण्याहून कमी असते). जी वस्तु पाण्याच्या वजनापेक्षा कमी वजनाला विस्थापित करते, ती तरंगते. विचार करा- आपण जमिनीवर उभे राहू शकतो, कारण आपण आपल्या वजनाच्या जमिनीला फार कमी प्रमाणात विस्थापित करतो. परंतु कल्पना करा की, एकदम एखादी मोठी इमारत जमिनीवर उभी राहिली, तर तिच्यामुळे समान वजनाच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात विस्थापन होईल व त्यामुळे इमारत जमिनीवर उभी राहू शकणार नाही तर आत जाईल.

गंमत 9. तुमच्या होडीचे प्रवासी!

आता तुमच्याकडे पाण्यावर तरंगणारी छोटी नाव आहे. ती तरंगू शकेल अशा प्रकारे तुम्ही त्यात काय काय ठेवू शकता? एखादं छोटं रबरबँड? एखादं छोटं इरेझर ती नेऊ शकेल? किंवा छोटं चॉकलेट? आणि समजा एखादं सॉफ्ट टॉय पाण्यावर तरंगत ठेवायचं असेल तर किती मोठी नाव लागेल? विचार करा! प्रयत्न करा! आणि अशा स्टीलच्या तीन वस्तु सांगा ज्या पाण्यावर तरंगतात! होय!

सगळे प्रयोग व गमती इथे वाचता येतील.

- निरंजन वेलणकर

मार्गी's picture

17 May 2025 - 11:12 am | मार्गी

50 दिवसांसाठी 50 गमती आणि प्रयोग!
नमस्कार. आजपर्यंत 17 प्रयोग व 17 गमती पोस्ट केल्या आहेत. गेल्या काही दिवसांमधले प्रयोग व गमती अशा आहेत:

ज्योत किती‌ वेळ चालेल?
ऑक्सीजन आपल्यासाठीही आवश्यक असतो!
पत्त्यांसोबत खेळण्याची वेगळी पद्धत!
तुम्ही हे चॅलेंज घ्याल का?
चमचा कसा तरंगेल?
तरंगणारे फळ व भाज्या
पाणी इकडून तिकडे नेणे!
तुमच्या मित्रांची नावे वापरून शब्दकोडं बनवा!
रंगांसोबत शिकूया!
स्ट्रॉ व छोट्या नळीचा वापर
तरंगणारा बटाटा!
सोबत महत्त्वाची!
बटाट्याचे लांब जाणारे कोंब
बेशिस्त अक्षरे!

इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.

मार्गी's picture

24 May 2025 - 6:56 pm | मार्गी

नमस्कार. आजपर्यंत 24 प्रयोग व 24 गमती पोस्ट केल्या आहेत. मला त्या पोस्ट करतानाच खूप मजा येते आहे. इतके ते प्रयोग व गमती इंटरेस्टिंग आहेत. काही उदाहरणं-

प्रयोग 21. आपोआप फुटणारे फुगे

आपण फुग्यांसोबत थोडं खेळूया. त्यासाठी एक ट्रिक करूया. एक संत्र किंवा लिंबू घ्या. त्याची साल कापा व सालीवर दाब देऊन त्यातल्या द्रवाचे थोडे थेंब गोळा करा. हे थेंब फार महत्त्वाचे आहेत. जेव्हा तुम्ही असा एक थेंब फुग्यावर सोडता, तेव्हा लगेचच फुगा फुटतो. तुम्हांला बोटसुद्धा ठेवावं लागत नाही किंवा जोर द्यावा लागत नाही! फक्त त्या द्रवाचा एक थेंब फुग्यावर सोडा, बस्स! मित्रांसोबत हे करा व हात न लावता फुगे फोडण्याची तुमची ट्रिक त्यांना दाखवा! पण हे का होतं? हे होण्याचं कारण म्हणजे त्या द्रवामध्ये फुग्याचं रबर लगेचच विरघळतं व फुग्यामध्ये एक बारीक छिद्र तयार होतं व तो फुटतो! प्रयत्न करा, हे करा व इतरांनाही दाखवा! आणि स्पर्श न करता फुगा फोडण्याचे इतर कोणते मार्ग आहेत का, ह्यावरही विचार करा.

गंमत 19. एकाच भाषेत बोलायचं

एक मिनिट एकाच भाषेत बोलायचं. हे वाटतं तितकं सोपं नाहीय. कोणतीही भाषा घेऊन प्रयत्न करून पाहा. एक मिनिट म्हणजे 60 सेकंद. फक्त एक भाषा. एकही शब्द दुस-या भाषेचा आला नाही पाहिजे! सोपं वाटतंय? करून पाहा. हवं तर मित्रांसोबत हा खेळ खेळा. एक जण बोलेल व इतर जण तपासतील! हा एक खेळ होऊ शकतो. जितके शब्द दुस-या भाषेतले बोलाल ते नोट करा! सगळ्यांत कमी जो असे शब्द वापरेल तो जिंकेल! बघा, मीसुद्धा दुस-या भाषेतले किती शब्द लिहीलेत इथे!

इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.