जॉन अब्राहम १ ==> जॉन अब्राहम २
शेवटी दुसर्या दिवशी १५ एप्रिलला सकाळी ७:२२ वाजता लिंकन यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले . . .
अब्राहम लिंकन
अब्राहम लिंकनचा जन्म फेब्रुवारी १२, इ.स. १८०९ रोजी केंटकी राज्यातील हार्डिन काउंटीमधील सिंकिंग स्प्रिंग फार्मवरील एका खोलीच्या लाकडी खोपट्यात झाला.
लिंकनने त्यांच्या राजकीय जीवनाचा प्रारंभ इ.स. १८३० साली इल्युनॉयच्या विधिमंडळाची निवडणूक लढून केला. या वेळी त्यांचे वय २३ वर्षाचे होते. याच काळात त्यांनी इल्युनॉयच्या सैन्यदलातही कॅप्टन म्हणून सेवा केली. या काळात त्यांना युद्धास मात्र सामोरे जावे लागले नाही.
या काळात त्यांनी बरेच लहान लहान व्यवसाय करण्याचे अयशस्वी प्रयत्नदेखील केले. त्यांनी दारु विकण्याचा परवाना घेऊन व्हिस्की विकली. याच काळात त्यांनी सर विल्यम ब्लॅकस्टोनच्या इंग्लिश कायद्यावरील भाष्य या चार खंडाच्या पुस्तकातील दुसरा खंड वाचला. या पुस्तकाने प्रभावित होऊन त्यांनी स्वतःचे स्वतःच कायद्याचे शिक्षण घेतले. यानंतर १८३७ मध्ये त्यांना इल्युनॉय राज्यात वकिली करण्याची परवानगी मिळाली. याच वर्षी त्यांनी आपले बस्तान याच राज्यातील स्प्रिंगफील्ड गावी हलविले व स्टीफन टी. लोगन यांच्याबरोबर वकिलीच्या व्यवसायास सुरुवात केली. लवकरच ते या राज्यातील प्रतिष्ठीत व यशस्वी वकिलांपैकी एक बनले व त्यांची आर्थिक परिस्थितीदेखील सुधारली.
अब्राहम लिंकनने इ.स. १८३४ पासून इल्युनॉय राज्याच्या विधिमंडळात प्रतिनिधी म्हणून काम केले. याच काळामध्ये ते व्हिग पक्षाचा सभागृहातील नेता म्हणुनही काम केले. त्यांनी इ.स. १८३७ मध्ये गुलामगिरीच्या प्रथेचा विधिमंडळात पहिला निषेध केला. या वेळेस ते या प्रथेस अन्यायकारक व चुकीचे धोरण असे म्हणाले.
लिंकनने नंतर इ.स. १८४१ साली विल्यम हर्नडॉन या व्हिग पक्षाच्या सदस्याबरोबर वकिलीच्या व्यवसायास सुरुवात केली. या दोघांनीही इ.स. १८५६ मध्ये नव्यानेच सुरू झालेल्या रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला.
अमेरिकन गृहयुद्ध हे युनायटेड स्टेट्सच्या स्थापनेपासून सुरू झालेल्या गुलामगिरीचे समर्थक आणि विरोधक यांच्यातील संघर्षाचा कळस होता. उत्तरेकडील राज्ये आणि गुलामगिरीची दक्षिणेकडील राज्ये यांच्यातील हा विभागीय संघर्ष राजकीय तडजोडींच्या मालिकेमुळे चिघळला होता, परंतु १८५० च्या उत्तरार्धात पश्चिमेकडील राज्यांपर्यंत गुलामगिरीच्या विस्ताराचा मुद्दा उकळत्या बिंदूवर पोहोचला होता. १८६० मध्ये राष्ट्रपती म्हणून गुलामगिरी विरोधी रिपब्लिकन पक्षाचे सदस्य अब्राहम लिंकन यांच्या निवडीमुळे दक्षिणेकडील ११ राज्यांचे विभाजन झाले, ज्यामुळे गृहयुद्ध सुरू झाले.
१८६०-६१ मध्ये दक्षिणेकडील राज्यांनी अमेरिका देशातून फुटून निघण्याचे ठरविले. त्यात दक्षिण कॅरोलिना, मिसिसिपी, फ्लॉरिडा, अॅलाबामा, जॉर्जिया, लझियाना, टेक्सस, व्हर्जिन्या, अर्कॅन्सा, टेनेसी आणि उत्तर कॅरोलिना या राज्यांचा समावेश होता. त्यातून अमेरिकेत उद्रेक झाला. १८१५ ते १८६१ या काळात उत्तरेकडील राज्यांची अर्थव्यवस्था झपाट्याने आधुनिक आणि वैविध्यपूर्ण होत होती. जरी शेती हे उत्तरेतील प्रबळ क्षेत्र राहिले, तरीही तेथे औद्योगिकीकरण रुजले होते. शिवाय, उत्तरेकडील लोकांनी कालवे, रस्ते, वाफेवरील नावा आणि रेल्वेमार्ग यांचा समावेश असलेल्या विस्तारित आणि विविध वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. तसेच बँकिंग आणि विमा यासारख्या आर्थिक उद्योगांमध्ये आणि टेलिग्राफसह स्वस्त, मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या वर्तमानपत्रे, मासिके आणि पुस्तके या उद्योगांमध्ये सुद्धा गुंतवणूक केली होती.
याउलट, दक्षिणी अर्थव्यवस्था मुख्यतः मोठ्या शेतांवर (लागवड) आधारित होती जी कापसासारख्या व्यावसायिक पिकांवर अवलंबून होती. त्यासाठी ते मुख्य कामगार शक्ती म्हणून गुलामांवर अवलंबून होते . उत्तरेकडील लोकांनी गुंतवणूक केल्याप्रमाणे कारखाने किंवा रेल्वेमार्गांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी , दक्षिणेतील लोकांनी त्यांचे पैसे मुख्यतः गुलामांमध्ये गुंतविले होते. १८५० च्या दशकात कापसाची किंमत गगनाला भिडली होते आणि गुलामांचे मूल्य - जे शेवटी मालमत्ता होते - समानतेने वाढले होते. १८६० पर्यंत दक्षिणेकडील गोऱ्यांची दरडोई संपत्ती उत्तरेकडील गोर्या लोकांपेक्षा दुप्पट होती आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी तीन-पंचमांश दक्षिणेकडील लोक होते.
१७८४ च्या अध्यादेशाप्रमाणे नवीन प्रदेश आणि राज्यांमध्ये गुलामगिरीचा विस्तार हा एक मुद्दा होता. १८१८ मध्ये जेव्हा मिसुरीच्या गुलाम प्रदेशाने राज्याचा दर्जा मागितला तेव्हा १८२० मध्ये निर्णयावर येण्यापूर्वी काँग्रेसने दोन वर्षे वादविवाद केला होता. १८४८ मध्ये मेक्सिकन-अमेरिकन युद्धाची समाप्ती झाली आणि त्याचा परिणाम म्हणून अमेरिकेने मिळवलेला अंदाजे ५ लक्ष चौरस मैलांचा नवीन भूभाग यामुळे या वादाला एक नवीन पैलू जोडला गेला. नैतिकतेच्या भावनेने किंवा मुक्त श्रमाचे रक्षण करण्यात स्वारस्य असलेल्या अधिकाधिक उत्तरेकडील लोकांमध्ये १८५० च्या दशकात त्या बंधनाचे निर्मूलन करणे आवश्यक आहे ही भूमिका वाढायला लागली. गुलामगिरीचा विस्तार मर्यादित केल्याने गुलामगिरी संपुष्टात येईल अशी भीती दाक्षिणात्य गोर्यांना वाटू लागली. १८५० च्या दशकात दोन्ही बाजूंचे ध्रुवीकरण वाढत गेले आणि राजकारणी तडजोडीद्वारे विवाद रोखू शकले नाहीत. जेव्हा स्पष्टपणे गुलामगिरीविरोधी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार अब्राहम लिंकन यांनी १८६० च्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला, तेव्हा सुरूवातीला सात दक्षिणी राज्ये (दक्षिण कॅरोलिना, मिसिसिपी, फ्लॉरिडा, अॅलाबामा, जॉर्जिया, लुझियाना आणि टेक्सस) यांनी धोका पत्करला आणि संघटित होऊन अमेरिकेतून वेगळे होऊन नवीन देश निर्माण करण्याचा निर्णय घेतला.
(क्रमशः)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
==============================================================================
_____________________________________________________________________________________________________
दुपारी १२:३० च्या सुमारास मुख्य रस्त्यावरून केनेडींच्या कारने डीले प्लाझापासून वळण घेतले. टेक्सस शालेय पुस्तके संग्रहालयापाशी केनेडींची गाडी पोहोचली असताना अचानक गोळीबाराचे आवाज ऐकू आले.
कोणाला काही कळण्याच्या आतच अध्यक्ष केनेडींच्या मानेत आणि डोक्यात गोळ्या घुसल्या. त्याच वेळी मुख्यमंत्री कोनालींच्या पाठीतही गोळी घुसली . . .
२२ नोव्हेंबर १९६३
गाडीचालकाने परिस्थिती ओळखून शीघ्रगतीने गाडी काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या पार्कलँड रूग्णालयाकडे नेली. परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच केनेडींचा मृत्यू झाला होता. तात्काळ एका ख्रिश्चन धर्मगुरूलाही निरोप पाठविण्यात आला.
दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अध्यक्ष केनेडींचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री कोनाली सुद्धा गंभीर जखमी झाले होते. परंतु नंतर उपचारानंतर ते वाचले.
त्यानंतर केनेडींचे पार्थिव लव्ह फील्ड विमानतळावर आणून एअर फोर्स विमानात ठेवले. विमानोड्डाणापूर्वी एका लहान खोलीत चेहरा उतरलेल्या उपाध्यक्ष लिंडन जॉन्सनना जिल्हा न्यायाधीश सारा ह्युज यांनी अध्यक्षपदाची गुप्ततेची शपथ देण्यात आली कारण अमेरिकी घटनेनुसार अध्यक्षपद रिकामे राहू शकत नाही. हा शपथविधी अंदाजे दुपारी २:३८ वाजता पार पडला.
लिंडन जॉन्सन, जॅकलीन केनेडी आणि सौ. जॉन्सन
केनेडींची हत्या डोळ्यांसमक्ष झालेली पाहून उपाध्यक्ष लिंडन जॉन्सन हादरले. केनेडींच्या हत्या अमेरिकेला अस्थिर करण्यासाठी रशियाने उचललेले फक्त पहिले पाऊल आहे अशी त्यांना चिंता वाटायली लागली. केनेडींचे पार्थिव ज्या एअर फोर्स १ विमानातून वॉशिंग्टनला नेले होते, त्याच विमानातून जॉन्सन सुद्धा निघाले. काही जण म्हणतात याच विमान प्रवासात जॉन्सन यांना अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली होती.
त्यापूर्वी एक तास आधी पोलिसांनी ली हार्वे ओस्वाल्ड याला केनेडींची हत्या केल्याच्या आरोपावरून अटक केली होती. ओस्वाल्ड हा निवृत्त सैनिक असल्याचे नंतर समजले. टेक्सस शाळापुस्तके संग्रहालयात तो नुकताच नोकरीस लागला होता.
अध्यक्ष केनेडींचा मारेकरी ली हार्वे ओस्वाल्ड
टेक्सस शालापुस्तके संग्रहालयाच्या सहाव्या मजल्यावरील एका खिडकीच्या जवळ पिस्तुलातील गोळ्यांचे अवशेष सापडले. त्याच मजल्यावर एक पिस्तुल सापडले जे ओस्वाल्डच्या नावावर नोंदलेले होते. संग्रहालयातील कर्मचार्यांची मोजणी केल्यानंतर २ कर्मचारी सापडत नसल्याचे लक्षात आले. त्यातील एक जण केनेडींची मिरवणूक पाहण्यासाठी संग्रहालयातून बाहेर पडून रस्त्यावर गेलेला होता व हत्येनंतर पोलिसांनी संग्रहालयाच्या इमारतीला वेढा घातल्याने त्याला इमारतीत प्रवेश करता आला नाही.
दुसरा न सापडलेला कर्मचारी ओस्वाल्ड होता. तो एक महिन्यापूर्वीच संग्रहालयात कामाला लागला होता. गोळीबार झाल्याच्या अर्ध्या तासापूर्वीच ओस्वाल्ड सहाव्या मजल्यावर दिसला होता. गोळ्या झाडल्यानंतर काही वेळातच त्याचा संग्रहालयाचे व्यवस्थापक व पोलिसांबरोबर थोडा वाद झाला होता. त्याचे वर्णन तात्काळ प्रसिद्ध करण्यात आले. गोळ्या झाडल्यानंतर लगेचच ओस्वाल्ड संग्रहालयाच्या जवळच असलेल्या आपल्या निवासस्थानी गेला व तेथून १५ मिनिटांनंतर तो बाहेर पडला. रस्त्यात टिपिट नावाच्या पोलिस अधिकार्याने त्याला हेरले. हा माणूस प्रसिद्ध झालेल्या मारेकर्यासारखा दिसतो हे त्याच्या लक्षात आले. त्याने लगेच ओस्वाळ्डला थांबविले, परंतु ओस्वाल्डने आपल्याकडील पिस्तुलाने टिपिटवरही गोळी झाडली ज्यात तो लगेच मरण पावला. अनेक नागरिंकाच्या समक्ष त्याने टिपिटवर गोळी झाडली. तेथून तो टेक्सस नाट्यगृहात गेला व तेथेच अंदाजे १:५० वाजता पोलिसांनी त्याला पकडले.
ली हार्वे ओस्वाल्ड आपली बंदूक आणि एक रशियन वृत्तपत्र हातात धरून उभा असताना. याच बंदुकीतून त्याने केनेडींवर गोळ्या झाडल्या असे वॉरन चौकशी आयोगाच्या अहवालात नमूद केले होते.
ओस्वाल्डची हीच ती बंदूक
_________________________________________________________________________________________
(क्रमशः)
प्रतिक्रिया
15 Jan 2025 - 5:17 pm | चंद्रसूर्यकुमार
अॅब्रॅहॅम लिंकन रिपब्लिकन पक्षाचे अगदी सुरवातीचे सदस्य होते. हा पक्ष गुलामगिरीविरोधात होता. तर डेमॉक्रॅटिक पक्ष १८२९ ते १८३७ या काळातील वर्णद्वेषी अध्यक्ष अॅन्ड्र्यू जॅक्सन यांच्या धोरणांमुळे प्रभावित झालेल्यांनी स्थापन केला होता. आता मात्र परिस्थिती अगदी उलट दिसते. वर्णवर्चस्ववादी गोरे जास्त करून रिपब्लिकन पक्षात दिसतात तर त्याविरोधी भूमिका असलेले डेमॉक्रॅटिक पक्षात.
१८६० मध्ये अध्यक्षीय निवडणुक झाली होती त्यात लिंकन रिपब्लिकन पक्षाकडून होते. ते उघडपणे गुलामगिरी विरोधात होते. तर त्यावेळेस डेमॉक्रॅटिक पक्षात फूट पडली होती. त्याचे कारण दक्षिणेकडील राज्यांमधील डेमॉक्रॅटिक नेते गुलामगिरीचे समर्थन करत होते पण उत्तरेकडील नेते उघड समर्थन करू नव्हते पण गुलामगिरी काढावी असे त्यांचे म्हणणे नव्हते. त्यामुळे अधिक कट्टर सदर्न डेमॉक्रॅट्स आणि त्यामानाने सौम्य नॉर्दन डेमॉक्रॅट्स अशी फूट पडली त्यामुळे लिंकनना ती निवडणुक बरीच सोपी गेली. आधीच्या भागातील प्रतिसादात उल्लेख केलेले स्टिफन डग्लस नॉर्दन डेमॉक्रॅटिक पक्षाकडून उमेदवार होते.
लिंकननी १८६४ ची निवडणुक परत लढवली. त्यावेळेस त्यांच्याविरोधात डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार होते जॉर्ज मॅकलेलान. हे गृहस्थ यादवी युध्दात उत्तरेकडील सैन्याचे (म्हणजे लिंकनच्या बाजूचे) सेनापती होते. त्यांचा स्वतःचा गुलामगिरीला विरोध होता मात्र गुलामगिरीला विरोध करायच्या नादात देशाचे तुकडे व्हावेत असे त्यांना वाटत नव्हते. त्यामुळे लिंकननी आदेश दिले तरी कोंडीत पकडल्या गेलेल्या दक्षिणेकडील सैन्याचा निर्णायक पराभव करायला हल्ला करायचा सोडून ते थंड बसून राहिले. १८६४ मध्ये या जॉर्ज मॅकलेलान यांनी पाहिजे असेल तर दक्षिणेच्या राज्यांना गुलामगिरी चालू ठेऊ देऊ पण यादवी युध्द थांबवू या अजेंड्यावर लिंकनविरोधात निवडणुक लढवली होती. त्या निवडणुकीच्या प्रचारात जॉर्ज मॅकलेलान यांनी लिंकनविरोधात विखारी शब्द वापरले होते. लिंकन अध्यक्ष असले तरी त्यांना रणांगणातील डावपेच कळत नव्हते. त्यामुळे ते प्रचारात लिंकनचा उल्लेख 'बफून' म्हणून पण करत होते.
15 Jan 2025 - 6:51 pm | श्रीगुरुजी
छान माहिती. ज्ञानात भर पडतीये.
18 Jan 2025 - 11:02 am | चंद्रसूर्यकुमार
सुरवातीला लिंकनचा रिपब्लिकन पक्ष गुलामगिरीच्या विरोधात होता. त्या कार्यासाठी स्वतः लिंकननी आपल्या प्राणाचे बलिदान केले. तर डेमॉक्रॅटिक पक्ष मात्र वेगळा होता. सगळे डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते गुलामगिरीच्या बाजूने होते असे नाही पण गुलामगिरी काढावी असे फार डेमॉक्रॅटिक नेत्यांना तितक्या तीव्रतेने वाटत होते असे वाटत नाही.
यादवी युद्ध चालू असताना सुरवातीला दक्षिणेकडील लोकही गुलामगिरीच्या बाजूने होते असे म्हणायला हरकत नसावी. मात्र लिंकनची हत्या झाल्यानंतर ते चित्र बदलले. दक्षिणेतल्या लोकांनाही लिंकनच्या बलिदानानंतर गुलामगिरी वाईट होती हे समजले असे म्हणायला हवे. लिंकनची हत्या केल्यानंतर दक्षिणेतून आपल्याला मोठे समर्थन मिळेल आणि आपण तिथे जाऊन लपू शकू असे लिंकनच्या मारेकर्याला वाटत होते पण तसे झाले नाही.
या बदललेल्या वातावरणाचा परिणाम म्हणजे यादवी युध्द झाल्यानंतर जवळपास ६७ वर्षात व्हाईट हाऊसमध्ये बराचसा काळ रिपब्लिकन अध्यक्ष राहिला आणि डेमॉक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष त्या मानाने कमी काळ राहिला. १८६४ मध्ये लिंकन जिंकले होते. त्यानंतर १८६८ आणि १८७२ मध्ये यादवी युध्द काळात शेवटी उत्तरेचे सेनापती असलेले युलिसिस ग्रँट, १८७६ मध्ये रूदरफोर्ड हेस, १८८० मध्ये जेम्स गारफिल्ड आणि त्यांची हत्या झाल्यानंतर चेस्टर आर्थर हे रिपब्लिकन अध्यक्ष झाले. १८८४ आणि १८९२ मध्ये ग्रोव्हर क्लिव्हलँड हे डेमॉक्रॅटिक अध्यक्ष झाले. पण १८८८ मध्ये बेंजामिन हॅरीसन, १८९६ आणि १९०० मध्ये विलिअम मॅकिन्ली, १९०१ मध्ये त्यांची हत्या झाल्यानंतर थिओडोर रूझवेल्ट, १९०४ मध्ये थिओडोर रूझवेल्ट आणि १९०८ मध्ये विलिअम हॉवर्ड टाफ्ट हे रिपब्लिकन अध्यक्ष झाले. १९१२ मध्ये माजी अध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट आणि अध्यक्ष विलिअम हॉवर्ड टाफ्ट यांच्यातील मतभेदांमुळे थिओडोर रूझवेल्ट यांनी तिसर्या टर्मसाठी आणखी एक निवडणुक लढवली. त्यात रूझवेल्ट आणि टाफ्ट या दोघांचाही मतविभागणीमुळे मोठा पराभव झाला आणि डेमॉक्रॅटिक वुड्रो विल्सन १९१२ मध्ये आणि नंतर १९१६ मध्ये अध्यक्षपदावर निवडून गेले. परत १९२० मध्ये वॉरन हार्डिंग,१९२४ मध्ये केल्विन कूलिज आणि १९२८ मध्ये हर्बर्ट हूवर हे रिपब्लिकन अध्यक्ष निवडून आले. १९२९ ची महामंदी आली नसती तर कदाचित आणखी काही काळ रिपब्लिकनांचे व्हाईट हाऊसवर वर्चस्व राहिले असते. पण त्या महामंदीमुळे १९३२ मध्ये डेमॉक्रॅटिक फ्रँकलीन रूझवेल्ट निवडून आले आणि मग खर्या अर्थाने डेमॉक्रॅटिक पक्ष व्हाईट हाऊससाठी शर्यतीत खर्या अर्थाने आला.
१९३२ च्या सुमारास यादवी युध्द संपून ६७ वर्षे झाली होती. यादवी युध्दाच्या वेळेस गुलामगिरीचे उघड/छुपे समर्थन करणारे डेमॉक्रॅटिक नेतृत्व मागे पडून पूर्ण नवे नेतृत्व पुढे आले होते. त्यामुळे यादवीच्या वेळेस डेमॉक्रॅटिक नेत्यांची भूमिका हा विषय मागे पडला आणि डेमॉक्रॅटिक पक्ष खर्या अर्थाने व्हाईट हाऊसच्या शर्यतीत आला.
18 Jan 2025 - 1:24 pm | श्रीगुरुजी
थिओडोर रूझवेल्ट यांनी तिसर्या टर्मसाठी आणखी एक निवडणुक लढवली.
अमेरिकेत अध्यक्ष जास्तीत जास्त दोन वेळाच अध्यक्ष होऊ शकतो हा कायदा अमेरिकेत का, कोणी व केव्हा आणला?
जर एखाद्या वर्तमान अध्यक्षाच्या अकाली निधनामुळे किंवा वर्तमान अध्यक्षाने काही कारणाने राजीनामा दिल्याने उपाध्यक्ष अध्यक्ष झाल्यास त्याची अपूर्ण मुदत हा अध्यक्षपदाचा पूर्ण काळ समजला जातो का? म्हणजे उपाध्यक्ष जेमतेम एक महिनाच अध्यक्षपदावर असला तर त्याला भविष्यात जास्तीत जास्त एकदाच अध्यक्ष होता येते का?
18 Jan 2025 - 1:41 pm | चंद्रसूर्यकुमार
अमेरिकेचे अध्यक्ष हा लेख मी २० जानेवारी रोजी लिहिणार आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांविषयी मला जे काही माहित आहे ते त्या लेखात लिहिणार आहे. तो लेख विनाकारण लांबलचक व्हायला नको म्हणून मूळ लेखात काही मुद्दे आणि नंतर हळूहळू प्रतिसादांमधून उरलेले मुद्दे लिहिणार आहे. त्यात २० जानेवारीलाच याविषयी लिहिणार आहे.
15 Jan 2025 - 8:24 pm | मुक्त विहारि
दोन्ही मस्त...
वाखूसा...
15 Jan 2025 - 9:43 pm | चंद्रसूर्यकुमार
यापुढील कोणत्या तरी भागात या दोघांच्या हत्येविषयीच्या कॉन्स्पिरसी थिअरींचा उल्लेख करणार ना? करणार असल्यास त्यावर मी लिहित नाही. दोघांच्या, विशेषतः केनेडींच्या हत्येविषयी मसालेदार कॉन्स्पिरसी थिअरी आहे.
15 Jan 2025 - 10:52 pm | श्रीगुरुजी
कॉन्सिरन्सी थिअरी लिहिणार आहे. पण खूप विस्तृत स्वरूपात नाही.
17 Jan 2025 - 10:28 am | सौंदाळा
लिंकन आणि केनडी दोघांची हत्या आणि दक्षिणेतील राज्यांच्या गुलामगिरीच्या प्रथेबद्दल वरवरची माहिती होती.
पण या लेखमालेतून विस्तृतपणे कळत आहे.
हा भाग पण आवडला.