माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे -- १
१) संगीत पुण्यप्रभाव व संगीत राक्षसी महत्वाकांक्षा या दोन नाटकांची १९५० सालातली कोकणातल्या गुहागरातील जाहिरात. नटवर्य नानासाहेब फाटक, मास्टर दामले (नूतन पेंढारकर), मा दत्ताराम अशी मातबर ष्टार कास्ट! जाहिरातींवरून गुहागरातले दामले नावाचे कुणी वकील नाटकाची तिकिटं विकण्याचे काम पाहात असत असं जाहिरातीतून कळतं! :)
-----------------------------------------------------------------------------------------------
२) कलापूरभूषण चंद्रकान्त, संगीतभूषण पं रामभाऊ मराठे, धुमाळ, सुलोचना दिदी, कुमारजी, गुरुवर्य पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थात पुल्दे, आणि त्यांचा लाडका असलेला मराठी ग्रामिण चित्रपटातला एक अत्यंत गुणी कलाकार वसंत शिंदे!
या शिणेमावाल्यांच्यात आमचे रामभाऊ मराठे आणि कुमारजी काय करत होते कुणास ठाऊक?! :)
अर्थात, रामभाऊंनी त्यांच्या ल्हानपणी गोपाळकाला, माणूस (कशाला उद्याची बात फेम चायवाला पोरगा) इत्यादी काही चित्रपटात कामे केली होती!
बाय द वे, या शिणेमावाल्यांच्यात आमचे भाईकाका काय करत होते असं विचारण्यात अर्थ नाही. संगीत, साहित्य, नाट्य, एकपात्री, उत्तम वक्ता, चित्रपट! ते कशात नव्हते तेवढं विचारा! :)
-----------------------------------------------------------------------------------------------
३) पं रामभाऊ मराठे आणि त्यांना गुरुस्थानी असलेले नारायणराव बालगंधर्व! रामभाऊंनाच काय, भीमण्णा, मन्सूरअण्णा, भाई देशपांडे, कुमारजी, बाबूजी.. यादी मोठी आहे. नारायणराव बालगंधर्व कुणाला गुरुस्थानी नव्हते ते विचारा! बालगंधर्व करतात ते गाणं अणि टिळक करतात तो विचार असा एक काळ महाराष्ट्रात होता..!
-----------------------------------------------------------------------------------------------
४) किराणा घराण्याच्या कोकिळकंठी गायिका गानहिरा हिराबाई बडोदेकर आणि वसंतराव एका सांगितिक सुखसंवादाच्या वेळी! हिराबाईंचा वसंतरावांवर अतिशय लोभ होता. भाईंचा लाडका वसंता देशपांडे होताच तेवढा गुणी! मोठा माणूस..!
-----------------------------------------------------------------------------------------------
५) ही पाहा वसंतरावांची शिकवणी सुरू आहे. भाईकाकांना आणि गझल/ठुमरी सम्राज्ञी साक्षात बेगम अख्तरीबाईंना ठुमरी-दादर्यातल्या काही ठेवणीतल्या जागा वसंतराव ऐकवताहेत! अहो अख्तरीबाईंना ठुमरी-दादर्यातल्या चार गोष्टी ऐकवायच्या म्हणजे काय सोपं काम आहे काय? तो अधिकार केवळ वसंतरावांचाच!
जाता जाता - असं ऐकलं आहे की अख्तरीबाईंना आपल्या महारष्ट्रीयन पद्धतीचा वरण-भात अतिशय आवडत असे. त्यावर जे तूप घातलं जाई त्याला अख्तरीबाई इत्तर (अत्तर) असं म्हणत. गरमागरम वरणभातावर सुरेखसं साजूक तूप घातल्यावर जो सुगंध/घमघमाट सुटतो तो अख्तरीबाईंना एखाद्या ठेवणीतल्या खानदानी अत्तरासमान भासत असे! याला म्हणतात रसिकता!:)
-----------------------------------------------------------------------------------------------
६) हम्म! थांबा थांबा! उगीच तिथे जाऊन डिष्टर्ब करू नका! :)
भीमण्णा, उस्ताद अल्लारखा आणि उस्ताद वसंतखा जरा निवांत बसले आहेत!
-----------------------------------------------------------------------------------------------
७) हम्म! फोटूच्या मधोमध हातात छडी घेऊन ते कोण मोठ्या रुबाबात उभे आहेत?
उस्तादांचे उस्ताद, सम्राटांचे सम्राट, तब्बलजींचे तब्बलजी उस्ताद अहमदजान थिरखवासाहेब! तबल्यातला अंतीम शब्द..!
-----------------------------------------------------------------------------------------------
८) वसंतखांच्या एक सत्कार समयी शरद तळवलकर. शरद तळवलकरांच्या बाबतीत भाईकाका एकदा गंमतीने म्हणाले होते - नावाप्रमाणेच स्वभावातही कुठेही काना-मात्रा-वेलांटी-उकार नसलेला माझा एक साधा, सरळ सज्जन मित्र -
श र द त ळ व ल क र! :)
-----------------------------------------------------------------------------------------------
९) 'संविदिनी निपूण' वगैरे वगैरे शब्द साफ कमी पडावेत अश्या पं गोविंदराव पटवर्धनांच्या साठीच्या सत्कार समयीचा हा फोटू. सोबत मराठी संगीत रंगभूमीवरील ऋषितुल्य व्यक्तिमत्व अण्णा पेंढारकर, सुरांचा सौदागर छोटा गंधर्व, महाराष्ट्राच्या सारस्वताची शान
पु. ल. दे., आणि गोविंदरावंच्या सौभाग्यवती. मला व्यक्तिश: गोविंदरावांचा थोडाबहुत सहवास लाभला, त्यांच्या पायाशी बसून चार गोष्टी शिकता आल्या हे माझं भाग्य!
-----------------------------------------------------------------------------------------------
१०) काय म्हणू? 'मम सुखाची ठेव' असं म्हणू की 'जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्ध्यकाचे..!' असं म्हणू??
उतारवयातल्या गलीतगात्र झालेल्या बालगंधर्वांची एक खाजगी मैफल. नारायण श्रीपाद राजहंस, अर्थात नारायणराव बालगंधर्व! मराठी संगीत रंगभूमीचा बादशहा, सम्राट!
जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते सर्व रसिकांना द्यायचं या हट्टापायी नाटकांचे पडदे, गालिचे, झुंबरं इत्यादींवर त्या काळातदेखील अक्षरश: लाख्खो रुपये खर्च केलेला, ज्याची शोफर्ड ड्रिव्हन गाडी होती, ज्याच्या कोटाला सहा सहा सोन्याची बटणं असत, ज्याच्या नाटक कंपनीत कलाकार आणि नोकरचाकर यांच्याव्यतिरिक्त रोजचं पन्नास-साठ पान सहज उठत असे बालगंधर्व!
त्यांचे वार्धक्य विपन्नावस्थेत जावे या परीस दुसरी शोकांतिका ती कोणती?
त्यांना पेन्शन मिळावं आणि दोन वेळचा भात तरी सुखाने खाता यावा म्हणून पुलंनी सरकार दरबारी खेटे घातले होते, पत्रव्यवहार केला होता!
पण 'दादा ते आले ना?' असा संवाद म्हणत स्वयंवरात 'नाथ हा माझा'च्या स्वरांची मनमुराद उधळण करणारा तो बादशहा सरकारी पेन्शनवर फार काळ जगलाच नाही! आणि नाही जगला तेच एका अर्थी बरं!
अहो सगळ्यांनाच सुनिताबाईंसारखी कणखर आणि तेजस्वी पत्नी नाही लाभत! नाहीतर बालगंधर्वांसारखेच पूर्णत: व्यवहारशून्य असलेल्या भाईकाकांचीही तीच गत झाली असती हे नि:संशय! आमच्या सुनिताबाई मात्र अनेकांकरता कटू ठरल्या, कजाग ठरल्या! परंतु त्यांची पुण्याई म्हणूनच तुम्हाआम्हाला भाईकाका लाभले नायतर या संधीसाधू जगाने त्यांचीही केव्हाच माती केली असती!
असो,
शेवट जरा कटू होतो आहे, भरकटतोही आहे पण त्याला माझा इलाज नाही. क्षमा करा..
नारायणरावांच्या 'नाथ हा माझा' करता मात्र आजही जीव तुटतो!
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
14 May 2009 - 3:41 pm | दिपक
केवळ निशब्द: करुन टाकलेत तात्या.. धन्य झालो
धीस इज वॉट तात्या इज :)
14 May 2009 - 4:26 pm | परिकथेतील राजकुमार
सहमत.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
14 May 2009 - 5:36 pm | सायली पानसे
सहमत..
15 May 2009 - 6:56 am | सँडी
अप्रतिम!
-संदीप.
काय'द्याच बोला.
14 May 2009 - 4:11 pm | अनंता
तात्या समजतील अशी आशा करतो!!
श्रीमंत तात्यांचा विजय असो!!!
वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
14 May 2009 - 4:21 pm | विकास
संग्राह्य चित्रे!
आमच्या सुनिताबाई मात्र अनेकांकरता कटू ठरल्या, कजाग ठरल्या! परंतु त्यांची पुण्याई म्हणूनच तुम्हाआम्हाला भाईकाका लाभले नायतर या संधीसाधू जगाने त्यांचीही केव्हाच माती केली असती!
अगदी खरे आहे.
14 May 2009 - 7:29 pm | स्वाती दिनेश
विकासशी सहमत आहे, :)
स्वाती
14 May 2009 - 4:22 pm | सहज
ही मालीका अशीच चालू राहू दे!!
14 May 2009 - 4:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
केवळ अप्रतिम संग्रह !
14 May 2009 - 4:47 pm | घाटावरचे भट
छान!!
14 May 2009 - 6:28 pm | अवलिया
सुरेख!
--अवलिया
14 May 2009 - 6:50 pm | शुभान्कर
छान आहेत ... सुंदर
14 May 2009 - 7:10 pm | चतुरंग
अहो हा खजिना आहे खजिना! असा मुक्तपणे उधळल्याबद्दल तुमचे किती आभार मानू?
काही प्रश्न/शंका -
१ - (फोटो१०) उतारवयातल्या नारायणरावांच्या खाजगी मैफिलीत - मागे भिंतीला टेकून बसलेले, तोंडावर हात असलेले भीमण्णा असावेत अशी पुसट शक्यता वाटते आहे. तात्या, तुम्ही खात्री करु शकाल का?
त्याच फोटोत -माईकच्या मागे बसलेले कोटवाले सदगृहस्थ पं.रामभाऊ मराठे?
२ - (फोटॉ७) उस्ताद थिरकवाँसाहेबांच्या फोटोत सगळ्यात उजवीकडे हात मागे बांधलेले वसंतखां आहेत का?
३ - (फोटो २) सुलोचना बरोबर असलेल्या दुसर्या बाई कोण? कुमारजी आणि पुलं ह्यांच्या मधे मागच्या बाजूला कोण आहेत - मा.विनायक?
सर्वच चित्रे अफलातून आहेत! पुन्हा एकवार अनेकानेक धन्यवाद तात्या!! :)
चतुरंग
15 May 2009 - 2:33 am | मिसळभोक्ता
२ - (फोटॉ७) उस्ताद थिरकवाँसाहेबांच्या फोटोत सगळ्यात उजवीकडे हात मागे बांधलेले वसंतखां आहेत का?
अर्थातच !
-- मिसळभोक्ता
(अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)
14 May 2009 - 7:12 pm | विनायक प्रभू
कलेक्शन
14 May 2009 - 7:40 pm | सुमीत भातखंडे
धन्यवाद तात्या. फारच सुरेख छायाचित्र आहेत.
बालगंधर्व करतात ते गाणं अणि टिळक करतात तो विचार असा एक काळ महाराष्ट्रात होता..!
क्या बात है. सहमत.
हा खजिना आमच्यासाठी खुला केल्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत.
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!!!
14 May 2009 - 8:44 pm | शाल्मली
तात्या,
खरंच सुरेख फोटो! चतुरंग म्हणतात त्याप्रमाणे खरंच हा खजिना आहे!
तुम्हाला अनेक धन्यवाद!
--शाल्मली.
14 May 2009 - 9:35 pm | यशोधरा
काय सुरेख छायाचित्रं आहेत! :) खूप खूप धन्यवाद ह्या चित्रांसाठी!
14 May 2009 - 10:40 pm | ऋषिकेश
वा!
अमुल्य फोटों बरोबर.. अनमोल शब्द
खुप छान लेखन.. तुमचं असं मनापासून उतरलेलं - थेट भिडणारं- खास तात्या-शैलीतील लेखन बर्याच काळानंतर वाचलं
+१.. खरं बोललात
ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
14 May 2009 - 11:09 pm | धनंजय
अमूल्य फोटो +१
आणि सुनिताबाईंबद्दल आदर+१
15 May 2009 - 5:33 am | Nile
हेच म्हणतो!
अजुन येउद्या. :)
14 May 2009 - 11:04 pm | संदीप चित्रे
काय एक से एक फोटो आहेत तात्या...
लाख लाख धन्यवाद :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
14 May 2009 - 11:58 pm | प्राजु
हा लेख आणि त्यातले फोटो अमोल ठेवा आहे.
तुमच्यामुळे निदान हे फोटोतरी पहायला मिळाले.. हे आमचं भाग्य.
खूप खूप धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 May 2009 - 1:51 am | बिपिन कार्यकर्ते
वा!!! तात्यासाहेब, खूपच मस्त छायाचित्रं... दुर्मिळ... आणि अप्रतिम. दोन्ही भागातली छायाचित्रं खरंच कधी बघितली नव्हती.
बालगंधर्व करतात ते गाणं अणि टिळक करतात तो विचार असा एक काळ महाराष्ट्रात होता..!
क्या बात है.... गंधर्वाचं गाणं ऐकायला लोकं काय वेडी होती हे आमची आजी नेहमी सांगायची... (तिच्या लेखी नारायणराव, बालगंधर्व वगैरे नव्हतंच.... गंधर्व म्हणले की एकच... बालगंधर्व, बास्स, दुसरे कोणी नाही).
बिपिन कार्यकर्ते
15 May 2009 - 2:09 am | चित्रा
सुरेख छायाचित्रे. तुमच्याकडे असा हा संग्रह आहे याचे अप्रूप वाटले.
15 May 2009 - 2:55 am | नंदा
तात्या, दोन्ही लेखांतली छायाचित्रे, त्यावरल्या तुमच्या टिप्पण्या, आणखी काही अनुषांगिक किस्से लिहून काढलेत तर मौजेसारख्या एखाद्या दिवाळी अंकासाठी छान लेख होईल.
15 May 2009 - 8:05 am | वाटाड्या...
वसंतरावांच्या बरोबर पु.ल. , अख्तरीबाई आणि पेटीवर आहेत आप्पा....
काय बहार आली असेल...आहाहा..नुसतं ऐकत राहावं....
फारच छान कलेक्शन तात्या....
असेच अजुन येत राहुदेत...
लाख लाख धन्यवाद...
वाटाड्या....
15 May 2009 - 8:20 am | पिवळा डांबिस
तात्या,
मस्त सिरियल चालू केली आहेस....
जुन्या मशहूर नावांचीच फक्त नांवानेच आजवर ओळख होती आता त्यांचे फोटो बघून (उदा. भास्करबुवा, अहमदजान थिरखवा) खूप खूप बरं वाटलं....
बाकी हे फोटो इतरत्र वापरायला तुझी काही हरकत आहे का?
भास्करबुवांचा फोटो मी माझ्या कंप्युटरसाठी बॅकड्रॉप म्हणुन वापरायचा विचार करीत आहे....
कळव...
आ.
पिवळा डांबिस
15 May 2009 - 10:49 am | माया
आपला दुर्मिळ संग्रह मोलाचा ठेवा आहे.
15 May 2009 - 11:23 am | भाग्यश्री
वॉव.. अफलातून संग्रह! बरीच जुनी लोकं दिसली!
दुरून दुरून का होईना पण बालगंधर्वांच्या लांबच्या नात्यातली लागत असल्याने(चुलत चुलत आजोबा का कोणीतरी) मस्त वाटलं! :)
www.bhagyashree.co.cc
15 May 2009 - 9:16 pm | श्रीकृष्ण सामंत
पंडीत तात्याबुवा अभ्यंकर,
हा आपला अमुल्य फोटोंचा संग्रह बघून,
आमच्या डोळ्याचं पारणं फिटलं,
आणि
आपलं संगीतावरचं प्रेम मानलं,
म्हणून म्हटलंय,
"प्रेमाला उपमा नाही
ते देवा घरचे देणें"
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
16 May 2009 - 9:45 am | विसोबा खेचर
श्रीकृष्णा,
तुझ्यासारख्या वडिलधार्याचा आशीर्वाद मिळाला. खूप समाधान वाटलं!
तुझा फ्यॅन,
तात्या.
16 May 2009 - 9:49 am | विसोबा खेचर
श्रीकृष्णा,
तुझ्यासारख्या वडिलधार्याचा आशीर्वाद मिळाला. खूप समाधान वाटलं!
तुझा फ्यॅन,
तात्या.
16 May 2009 - 4:31 am | मयुरा गुप्ते
फोटो बघुन डोळे धन्य झाले पण मनाला अधिकाधीक खजिना बघण्याची ओढ लावली तात्या तुम्ही.
अमुल्य ठेवा आमच्या पुढे मोकळ्या हातानी रीता केल्याबद्दल धन्यवाद.
--मयुरा
16 May 2009 - 10:05 am | ठकू
तात्यानु,
श्रीमंत आहात!
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे