पिनाडी पिनाडी पिनाडी………

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in जनातलं, मनातलं
28 Sep 2024 - 12:18 am

पबजी हा खेळ जवळपास सर्वांनाच माहीत असावा. ज्याने खेळला नाहीये त्याने देखील ह्या खेळाबद्दल ऐकले असावे. हा खेळ ऑनलाईन मल्टिप्लेअर सर्व्हायवल गेम आहे, जो लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता. तुम्ही आणि तुमची टीम एका मोठ्या बेटावर इतर ९६ खेळाडूंसोबत उतरता, आणि तुमचं ध्येय असतं, शेवटपर्यंत जिवंत राहणं. हे बेट एक युद्धभूमी असतं जिथे सर्वत्र शत्रू असतात, आणि जिथे तुम्हाला शस्त्रं, दारूगोळा, औषधं शोधून शत्रूंना हरवायचं असतं.
हा खेळ अर्ध्या तासासाठी तुमचं जग बदलतो, एका आभासी युद्धमय जगात तुम्हास नेतो. जिथे फक्त तुमची टीम आणि शत्रू. खेळाच्या सुरुवातीला, काहीच साधनं नसतात, फक्त तुमचं अस्तित्व टिकवायचं असतं. पण हळूहळू तुम्ही शस्त्रं गोळा करता, वाहनं मिळवता, आणि गेमचा "सर्कल" लहान होत जातो, त्यामुळे जिवंत राहण्याचं आव्हान वाढतं.
या खेळात फक्त शारीरिक चपळताच नाही, तर धोरण आणि रणनीतीही हवी असते. गनफायरमधून वाचनं, योग्य ठिकाणी वेळेत पोहोचणं, योग्य वेळी फायर करणे हे सगळं जमलंच पाहिजे. तुमचं काम असतं तुमच्या टीमला शेवटपर्यंत टिकवणं आणि तुम्हाला "चिकन डिनर" जिंकायचं असतं, म्हणजेच अंतिम विजय.
कधी कधी, खेळात नशिबाचा भागही मोठा असतो. योग्य शस्त्रं मिळणं, योग्य पद्धतीने सुरक्षित ठिकाणी पोहोचणं, आणि योग्य वेळी शत्रूवर हल्ला करणं हे सर्व कसे घडते, यावर गेमचा निकाल ठरतो. युजर-फ्रेंडली इंटरफेस, एकापेक्षा एक चित्तथरारक मोड्स आणि जगभरातील खेळाडूंसोबत असलेली स्पर्धा यामुळे पबजीने लोकांना एक नवं व्यसन दिलं होतं.
मात्र, या खेळाचे काही तोटेही होते. अनेक वेळा लोकांनी या खेळामुळे वेळ वाया घालवला, काहीजण तर इतके गुंतले की त्यांचे रोजचे जीवन विस्कळीत झाले. सरकारने देखील काही काळानंतर या गेमवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला, कारण मुलांमध्ये याचे व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत होते.
पबजीचं जग म्हणजे तुमचं जग बदलणारं एक छोटंसं प्रकरण होतं, जिथे प्रत्यक्षात काय आहे आणि आभासी जगात काय चाललंय ह्याचा ताळमेळ साधणं कठीण होतं. "बळी तो कान पिळी" ह्या तत्वावर हा खेळ उभा होता, ज्यामध्ये तुमचे जगणे फक्त तुमच्या निर्णयांवर ठरते. हा खेळ एका जपानी सर्व्हायव्हल सिनेमावर बेतलेला होता.
एकदा असाच गमतीदार प्रसंग माझ्यासोबत घडला. खेळात माझ्या टीममध्ये एक अनोळखी तमिळ मुलगा आला. सुरुवातीला आम्ही फारसं बोललो नाही, पण मला थोडं तामिळ येतं म्हणून मी विचारलं, "निंगा तामिळा?" त्याने उत्तर दिलं, "आम." मग आमची एक अप्रत्यक्ष मैत्री झाली.
विमानातून आम्ही दोघे आणखी दोन सहखेळाडूंसह पॅराशूट उघडून एका सुरक्षित स्थळी उतरलो. पटापट बंदुका, गोळ्या, बॉम्ब, स्मोक बॉम्ब, बुलेटप्रुफ जॅकेट, हेलमेट असे जगण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री आम्ही गोळा केली नी शत्रू शोधत एका जीप मधून निघालो. मध्येच थांबून काहींना मारून काहींना शोधून पबजी बेटावर आम्ही बरीच भटकंती केली., वस्त्या, शाळा, हॉस्पिटल, अपार्टमेंट, नदी, त्यावरील पूल, मिलिटरी लोकेशन, ट्रेनिंग सेंटर, भुयारे, उंचावटे अश्या विविध ठिकाणी लपलेले शत्रू शोधून शोधून मारले. बऱ्याच चकमकी झडल्या, आमच्या संघाची चांगलीच दहशत बसली होती, शत्रूतील अनेकांनी गोळीबार न करता लपून बसनेच पसंद केले, न जाणू गोळ्या चालवुन ह्याना आपण इथे आहोत हे कळावे. खेळ पुढे सरकू लागला तसा गोल छोटा होऊ लागला नी काही क्षणांतच अनेक लपलेले खेळाडू बाहेर येऊ लागले नी जिवाच्या आकांताने लढू लागले, मग पुन्हा जोरदार युद्ध पेटले. गोळीबार, बॉम्बफेक ह्यांचा वर्षाव सुरु झाला. अनेक खेळाडूंना आम्ही मारले, मोलोटोव्ह फेकून शत्रूंना होरपळून काढलं, स्नायपरने दुर्बिणीतून लपलेले खेळाडू टिपले, आणि विजयाच्या जवळ पोहोचलो. जवळपास ९० खेळाडू मेले होते, त्यातले ६० तरी प्रेक्षक बनून आमचा खेळ पाहत होते. मध्यंतरी आमच्या ४ लोकांच्या संघातील दोन खेळाडू अती आत्मविश्वासाने मारले गेले होते, ते एका घरात घुसले, नी घरातल्या एकट्या लपलेल्या शत्रूने आत्मघातकी स्फोट करुन स्वतः सह त्या दोघानाही उडवून दिले.
माझा तमिळ मित्र, तो खूप हुशार खेळाडू होता त्याने २० खेळाडू मारले होते, मी मात्र ४ खेळाडूच मारले होते. दोन वेळा गोळीबारात मी गंभीर जखमी झालो होतो नी त्याने मला उपचार करुन वाचवले होते. सर्कल प्रमाणे आम्ही त्या त्या मैदानात जाऊन लपू लागलो.
खेळ शेवटच्या टप्प्यात पोहोचला होता आता सर्कल खूपच छोटा झाला होता. एका ठिकाणी आम्ही गवतात रांगत रांगत घुसलो. आता शेवटचे ४ खेळाडू उरले होते. तो पुढे नी मी मागे रांगत पुढे जात होतो. आमचं “चिकन डीनर” नजरेच्या टप्प्यात होतं. पण अचानक शत्रूच्या गोळ्यांचा वर्षाव झाला, आणि तो माझ्या डोळ्यांसमोरच मरण पावला. त्या क्षणातच त्याने माईकवर ओरडायला सुरुवात केली, "पिनाडी... पिनाडी... पिनाडी………
मला काहीच कळेना.
मी एकटाच संघात उरलो होतो. संघाला विजय मिळवून द्यायची जबाबदारी आता माझ्या खांद्यावर आली होती. प्रचंड दारुसाठा, बाँब आणि शस्त्रं जवळ होती, पण कुठून शत्रू हल्ला करत होता हे काहीच समजेना. सगळीकडे गोळीबार आणि भीतीचे क्षण होते. त्याचवेळी "पिनाडी... पिनाडी" चा जप सुरूच होता. मी वेगवेगळ्या दुर्भिणी बंदुकीवर चढवल्या, शत्रू आजूबाजूला समोर सगळीकडे शोधला पण कुठेही दिसत नव्हता. वर मेलेल्या लोकांच्या स्कोर बोर्डवर ९७ मेल्याचं दिसत होत. म्हणजे मी आणी आणखी २ शत्रूच उरललेलो होतो. मी माजलेल्या गवतात उगाच बॉम्ब फेकले की असेल शत्रू तर मरावा. पण तसही काही झालं नाही. वेळेनुसार छोटा होत जाणारा गोल आता बराच छोटा झाला होता, शत्रू असून असून माझ्याच आजूबाजूला २५-३० मीटरच्या फेऱ्यात होता. आजूबाजूला गवत माजलेलं होतं, रांगत रांगतच उरलेले दोन्ही शत्रूही फिरत होते. बॉम्बफेकी नंतर मी उरलेल्या जागी मोलोटोव्ह फेकून आग लावली. वर मेलेल्या लोकांच्या स्कोर बोर्डवर आता ९८ मेल्याचं दिसत होत. म्हणजे मी आणी आणखी एक शत्रूच उरललेलो होतो. अजूनही पिनाडी पिनाडी ओरडणे सुरुच होते. आणि शेवटी एक बॉम्ब येऊन माझ्यावर पडला. माझ्या चिंधड्या उडाल्या. खेळाचा निकाल लागला.
विजयाच्या दारात उभं असताना आम्ही हरलो होतो. सोबती तामिळ मध्ये मला बरच काही काही बोलला जे मला समजलं नाही पण त्याच्या भावना माझ्या पर्यंत पोहोचल्या होत्या. वर्ल्डकप फायनल मध्ये एखाद्याने सेंच्युरी मारावी तरीही संघ हरावा तस त्याचं झालं होतं. खेळ संपल्यावर मला कुतूहल निर्माण झालं की "पिनाडी" चा अर्थ नेमका काय आहे? मी माझ्या तामिळ मित्राला फोन केला आणि विचारलं. त्याने संगीतलं
"पिनाडी" म्हणजे "मागे".

कथाप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

श्रीगणेशा's picture

28 Sep 2024 - 12:53 am | श्रीगणेशा

छान आहे कथा!

कंजूस's picture

28 Sep 2024 - 5:49 am | कंजूस

मुन्नाडी मुन्नाडी

कर्नलतपस्वी's picture

28 Sep 2024 - 6:00 am | कर्नलतपस्वी

Wired आभासी दुनियेतील गोष्टी या खऱ्या ,Unwired दुनियेतून काॅपी केलेल्या असतात. भारत पाकिस्तान,रशिया युक्रेन, इस्त्रायल, हम्मास, तालीबान,हे तरी काय पबजीच खेळत आहेत ना....

ॲडिक्शन मुळे तरुणाईवर वाईट परिणाम होत आहे. यामुळे वित्तहानी बरोबर शारीरिक,मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम होत आहेत. याच्याशी व्यवसाईकांना काही घेणे देणे नसते. पुर्वी इ कॅफे भरलेले असायचे. आता मोबाईल मुळे असले खेळ कुठेही,कधीही खेळता येते. हे आणखीनच धोकादायक ठरत आहे. तरूणाई एकलकोंडी होत आहे. असो दुनियादारी आहे.

अबा, कथेच्या दालनात आपले स्वागत आहेत. या पुढे नवकथांनी दालन सुशोभित कराल हीच इच्छा व त्या साठी शुभेच्छा.

+ १ स्क्रीन टाईम तर वाढतोच पण सतत याच स्टिम्युलसची सवय होऊन ॲडिक्शन होतं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Sep 2024 - 9:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पब्जी खेळ आणि त्यानिमित्ताने केलेल्या एका संघर्षमय सामन्याचं धावतं वर्णन वाचलं. आवडलं. व्यक्तीगत पब्जी कधी खेळलो नाही पण हेडफोन घालून व्यग्र आणि आपल्या दुनियेत रमलेली पोरं पाहिली आहेत. पब्जीचा जरा रागच येतो. पोरांच्या मानसिक शारिरीक स्वास्थ्य याची भिती वाटते. अर्थात अति झालं की जे व्हायचे ते दुष्परिणाम व्हायचेच.

टीव्हीला जोडून त्या व्हीडीयो गेमच्या कॅसेट्स टाकून दोन प्लेयरच्या गेम्स खेळायचो आमचा काळ सुपर मारियो ते पुढे असे बरेच आता वयपरत्वे सगळं कमी होत गेलं.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

28 Sep 2024 - 12:15 pm | प्रचेतस

लैच भारी लिहिलंय अबा. वर्णन मस्त केलंय.
हे गेम्स कधीच खेळलो नाही,कॉम्प्युटरवरचे आवडते गेम्स म्हणजे एज ऑफ एम्पायर्स सिरीज, फिफा, क्रिकेट 2000, मोबाईलवर फक्त चेस खेळत असतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Sep 2024 - 1:03 am | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद, श्रीगणेशा, कंजूस, कर्नल साहेब,भक्तिताई, बिरुटे सर, प्रचेतस सर. _/\_

संग्राम's picture

29 Sep 2024 - 8:24 am | संग्राम

खूप छान वर्णन केलेत अबा ...
या गेम बद्दल ऐकलं होत पण आज समजला ....
सेम पिंच प्रचेतस, एज ऑफ एम्पायर, इ ए क्रिकेट, फिफा, रोड रनर, एन एफ एस यापुढे गाडी कधी गेलीच नाही ....
आजकाल कधी कधी Nintendo Switch 'Sport' खेळतो ..ते पण एका जागी बसायला लागत नाही म्हणून ...

नठ्यारा's picture

29 Sep 2024 - 5:41 pm | नठ्यारा

अ.बा.,

बसल्या जागी जगाची सैर घडवण्याचं कौशल्य तुमच्याकडे आहे. प्रत्यक्ष वा आभासी काहीही असो. आजून येऊ द्यात. मजसारख्या आळश्याची चांदी आहे.

आ.न.,
-ना.न.