चोळ राजांच्या प्रदेशात भाग दुसरा.
( ज्येष्ठ नागरिक, भाविक आणि इतिहासप्रेमी यांच्यासाठी पर्यटन)
मागचा भाग
चोळ राजांच्या प्रदेशात भाग पहिला
https://misalpav.com/node/52470
चिदंबरम . गंगैकोंडाचोलापुरम. कुंभकोणम हे पाहिले.
या भागात तंजावूर आणि त्रिची.
या चार शहरांमधल्या प्रवास तास दीड तासांचा आहे.तंजोर -त्रिची आणि इतर हमरस्ते सुरेख, कडुनिंबाची झाडे कडेने. रस्ते चांगले आहेत आणि टोल नाक्यांचा बुजबुजाट नाही.
तंजावूर
इथे दहाला पोहोचल्यावर रुम घेऊन तयार होऊन बाहेर पडलो.
फोटो १
तंजावूर नकाशा
रेल्वे स्टेशन, बस स्टँड (जुना), बृहदीश्वर आणि पॅलेस आवार सर्व दोन किलोमीटर परिसरात आहे. प्रथम बृहदीश्वरला पोहोचलो. सुरवातीला भोसले राजांनी बांधलेले प्रवेशद्वार लागते. इथला भोसल्यांच्या शिलालेख हुकला. नंतर मंदिराचे छोटे गोपूर नंतर मुख्य मंदिर.
बृहदिश्वर मंदिर परिसर, तंजावूर. २०२४_०९_११
https://youtu.be/JfvKZwfuDTY
यामध्ये दिसेल - प्रवेशद्वार - जुना छोटा नंदी-देऊळ-नवा मोठा नंदी-मुख्य देऊळ.
दुपारी साडे अकराला बृहदिश्वर बाहेरून फिरून पाहाणे शक्य नाही. दगडी फरशी तापलेली आणि चप्पल काढायला लावतात. त्यापेक्षा अगोदरची देवळे भारी. अखंड आहेत पण मूर्ती फार काही विशेष नाहीत. खाली असंख्य शिलालेख जुन्या तमिळमध्ये अगदी स्पष्ट आहेत. १८०सेंमी पावसाच्या मानाने उत्तम.गुलाबी सँडस्टोन आहे.
गाभाऱ्यात जाऊन वरती शिखरापर्यंत पाहाणे मिळत नाही. अगदी जवळून दर्शन रु१००/- उगाचच घेत होते. तरी मी एका कुटुंबाबरोबर घुसलो. शिखराची फार प्रसिद्धी झाल्याने लोक येतात एवढेच.बाकी हजार वर्षांपूर्वीच्या चोला राजधानीचे अंश कुठेही उरले नाहीत. सुलतानी राजवटीत अकरावे ते तेरावे शतक सगळे गेले.
[[गाइड रु२००० घेतात आणि चार वाक्ये फेकतात. गंमत वाटली.
https://youtu.be/MtaMt3xRiuk?feature=shared .
त्यापेक्षा विकी लेख आणि इतर माहिती वाचून जा. ]]
तंजावूर फोटो स्लाईडशो २०२४_०९_१०
https://youtube.com/shorts/-W92LOtGCRU
आतमध्ये खास तंजावूरच्या बाहुल्या (बोम्मई, खेळणी)विक्रीस ठेवलेल्या दिसल्या. दोन हजार, पंधराशे रुपये जोडी असा भाव सांगितल्याने घेतल्या नाहीत. क्लोकरूमही आहे.
हे पाहून ओटोने पॅलेस कॉम्प्लेक्सला गेलो. आर्ट गॅलेरी, दरबार हॉल (१६००), सरस्वती महाल, बेल टावर, आणि ब्राँझ पुतळे (जुलै २०२४ मध्ये उघडले) हे सर्व पाहण्यासाठी एकत्रित तिकिट रुपये पन्नास आहे.
दरबार हॉल (१६००)आणि सरस्वती महालात मिळून हस्तलिखिते वीस पंचवीस मांडलेली होती. शिळाप्रेसची पुस्तके इंग्रजांची पंचवीसेक. जुनी दासबोध पोथी होती.
बाकी ३०हजार हस्तलिखिते दुसरीकडे कुठेतरी असावीत.अपेक्षित आकडा अधिक होता. पण आपल्याला संपर्क नाही. फोटोग्राफी बंदी आहे. तासाभरात सर्व पाहून झाले. ब्राँझ मूर्ती दालन चांगले आहे. नटराजाच्या मोठ्या मोठ्या पितळी/ ब्राँझ मूर्ती इथे पाहायला मिळाल्या. चंद्रशेखर,शिवगामी,नटराजा,पार्वती यांच्या दीड दोन फुटी शंभरेक मूर्ती आहेत त्या जुलै २०२४ च्या नव्या दालनात. तंजावूर मध्ये भोसल्यांची बरीच मालमत्ता आहे. राहतात इथेच.
भोसले राजांनी १९४८च्या पाकिस्तानी युद्धासाठी भारत सरकारला पन्नास कोटींचे सोने दिले होते. हे कुठेतरी वाचले होते.
तंजावूर दर्शन लवकरच संपले. वीणा बनवण्याचा कारखाना किंवा बोम्मईचा कारखाना पाह्यला गेलो नाही. त्यांचे चांगले विडिओ यूट्यूबवर आहेत. दुपारी जेवून आराम केला. पाच वाजता बाजारात फिरलो. साड्यांचे प्रकार आणि दर मुंबई पुण्यासारखेच आहेत. नंतर कालव्याकडे गेलो. फार रम्य जागा आहे. तिकडे तासभर बसलो.
अनैकट (कालवा) शहरातून वाहतो. दोन्ही बाजूने फुटपाथ सुंदर आहे.
फोटो २
कालवा१
फोटो ३
कालवा २
कुंभकोणम आणि तंजावूर स्थळदर्शन एकेक दिवसांत संपल्याने त्रिचीसाठी तीन दिवस मिळाले हे चांगलेच झाले.
तंजावर सोडून त्रिचीला अकराला पोहोचल्यावर रुम दोन दिवसांची घेतली. आराम केला आणि दोन वाजता बाहेर पडलो.
फोटो ४
त्रिची नकाशा
त्रिची जंक्शन स्टेशन आणि जुना सेंट्रल बस स्टँड यांच्या उत्तरेस पाच किलोमिटर वर रॉक फोर्ट/फोर्ट आहे . त्यावरचे मंदिर म्हणजे उच्चीपिलियार गणेश. मागे रॉक फोर्ट रेल्वे स्टेशन. फोर्टच्या पुढे एक किमी अंतरावर छतरम बस स्टँड. पुढे नदी (कावेरी) ओलांडली की श्रीरंगम आणि जंबुकेश्वर (तिरुवानैकवल). पुढे परत कोळीदम उर्फ कावेरीचा उत्तर प्रवाह.
श्रीरंगम बेटांची रचना-
हे श्रीरंगम बेटाच्या मध्यभागी आहे. श्रीरंगम बेट कावेरी नदीत पश्चिम ते पूर्व निमुळते आहे. लांबी साधारण वीस किलोमीटर. सर्वात डाविकडे(पश्चिमेला )मेलूर गाव आठ किलोमीटरवर आहे. तिथे कावेरीचे दोन भाग होतात. इथे मुक्कोबु गाव आहे. करूर रोडने इथे जावे लागते. अलिकडच्या (दक्षिणेचा) नदीला कावेरी आणि पुढचा (उत्तरेचा) प्रवाह कोळिदम नदी म्हणतात. दोन्ही प्रवाह पुन्हा पूर्वेला कल्लनाई गावापाशी(बारा किमी) एकत्र येऊन परत तीन भाग होतात. रेल्वे हे बेट ओलांडून जाते. देवळाजवळ श्रीरंगम स्टेशन आहे. सर्व एक्सप्रेस गाड्या इथे थांबत नाहीत.
बेटावर वस्ती खूप आहे आणि दर दहा मिनिटाला छतरम/सेंट्रल स्टँड ते श्रीरंगम बस सतत धावतात. रॉक फोर्टच्या स्टॉप जवळ तेप्पाकुलम तलाव आणि सेंट लॉर्ड्स चर्च आहे. याचे मनोरे (spire) दुरूनही दिसतात.फ्रान्समधल्या एका चर्चची ही प्रतिकृति आहे.
फोटो ५
रॉक फोर्ट/फोर्टच्या पायऱ्या
पायऱ्या पाहून घाबरायला नको. फोर्ट ची उंची फक्त १७० मिटरस आहे. वरती गणेश मंदिर आहे. उच्चीपिलियार कोईल. कायम उघडे असते. इथून त्रिची शहर छान दिसते. दुपारी हे पाहून श्रीरंगमला गेलो. चार वाजता देऊळ उघडले. हत्ती आहे. देवळाचा पसारा मोठा आहे आणि अंधार आहे. मुख्य गोपूर राजगोपूरम खूप उंच असले तरी त्यावर कलाकृती फारशा नाहीत.
फोटो ६
फोर्टवरून दृष्य
फोटो ७
राजगोपूरम श्रीरंगम
हे पाहून दोन किलोमीटरवरच्या तिरुवानैकवल उर्फ जंबुकेश्वरला गेलो . शिल्पांच्या बाबतीत हे श्रीरंगमपेक्षा शंभर पट चांगले आहे. पण फोटोग्राफी बंदी आहे.
[[माहितीसाठी Travel Book चे विडिओ पाहा.
Tanjavur
बृहदीश्वर
https://youtu.be/W92SD-ypFrY
Tiruchirapalli Trichhi )
१ श्रीरंगम
https://youtu.be/1ehtKleoGDA
२.जंबुकेश्वर
https://youtu.be/DXON_AA1KSM
जंबुकेश्वर/ तिरुवानैकवल
याचे गोपूर लहान असले तरी मोठी चित्रे आहेत. शिवालय असूनही कृष्ण गोपी वस्त्रहरणाचे मोठे शिल्प आहे. कृष्ण झाडावर आहे आणि गोपींनी आपले अंग हातांनी झाकायचा प्रयत्न चालवला आहे.
इकडे हत्ती आहे. असायलाच हवा .त्याची कथा आहे. हत्ती आणि कोळीचे पिंडाची पुजा करतानाचे मोठे शिल्प आहे. एक स्त्री ( गौरी?) बेलाचे पान वाहत आहे. जांबु ऋषी झाडाखाली (जंबुकवनातल्या) बसले आहेत. बाजूला दुसऱ्या शिल्पात शिव पार्वती नंदीवर बसले आहेत.
शिवाचे जलतत्वाचे देऊळ असल्याने पिंड पाण्यात आहे. एका वेळेस आठ आठ भाविकांना आत सोडतात पिंडीजवळ. अंधार आहे. आतमध्ये मागे पार्वतीचे वेगळे दालन आहे. डावीकडे कुमाराचे दालन. मोर समोर बसला आहे. नंदी असतो शिवासमोर तसा मोर. या दालनातल्या खांबांवर काही विशेष शिल्पे पाहिली. शिल्पे दोन फुटी ठसठशीत आहेत.
कुमार दालनात बरेच खांब आहेत. ते तीन फुट उंचवट्यावर आहेत. मधला मार्ग कुमार कार्तिकेयाच्या(?) मूर्तीकडे जातो. समोर मोर आहे.
खांबांवरची काही विशेष शिल्पे नोंद केली( फोटोला अनुमती नाही. )
१.शिकारी व्याधाच्या रूपात शिव, झाडाला बांधलेल्या झोक्यावर बसलेली ललना.
२.मोठा दंड घेतलेला रखवालदार आहे.
३.सहा हत्ती आणि एक सिंह डोंगरावर आहेत.
४.एका हंसाने चोचीत मोठा वेल धरला आहे. हंसाचे शरीर पंख असणाऱ्या घोड्याचे आहे.
५. शिवपिंडीवर दुधाची धार सोडणारी गाय आहे.
६.नागाच्या फण्यातला एक सर्प शरीराचा देव आहे.
७.मोठा त्रिशूळ घेतलेला रुद्र.
८.त्रिशूळ घेतलेला पशुपत.
९. चार हातांचा एक देव,शेपटी आहे.अरण्यात शिवपिंडीची पूजा करत आहे.
१०.सहा हातांची कुणी देवी आहे. तिच्या मस्तकामागे ज्वालांची प्रभावळ दिसत आहे. (सूर्याची पत्नी शची?)
११.विश्वामित्रासारखे एक हात वर करून नको म्हणणारा ऋषि. याला हार घातला होता.
१२. लक्ष्मी, दोन हातात शंख.
१३.वीणा वाजवणारी सरस्वती
१४.शंख आणि चक्रधारी विष्णू
१५. एक त्रिदेव. तीन मुखे
१६.दोन हात जोडलेला,मुकुटधारी राजा वाटतो आहे.
१७.मारुती
१८. पोपटावर स्वार आणि धनुष्याला बाण लावलेला मदन?
१९.साडी नेसलेली एक स्त्री,दोन हात,हातात बालक.
२०.एक वाकलेला,दाढीवाला ऋषी वाटतोय.,छातीच्या फासळ्या दिसत आहेत,हातात काठी आणि पात्र,शेपूट आहे आणि तीन पाय आहेत. भ्रींग महारिशी असं काही तमिळमध्ये लिहिलं आहे मूर्ती खाली.
२१. चार हातांचा शिव,पायाखाली राक्षस.
२२.चार हातांची देवी, वर हार, माला आहे,डोक्यावर मुकुट.
दुसरे दिवशी कल्लनाई इथे गेलो. छतरम स्टँड वरून बस जातात. वेगवेगळी धरणे बांधली गेली आहेत. अगदी पहिले दुसऱ्या शतकात कारैकल चोला राजाने एक बांध घातला. नदीचे दोन भाग झाल्याने एकीकडे पाणी दुसरीकडे गाळ साठू नये म्हणून बंधारा घातला तो तिनशे मिटरस लांबीचा आहे. तो कसा घातला ते चित्र रूपाने मणिमंदिरम स्मारकात पाहता येते. पाट्या तमिळमध्ये आहेत, त्यांचे फोटो घेतलेत. गूगल लेन्सने मराठीत भाषांतर करून पाहिले.इमारतीच्या मध्यभागी राजाचा हत्तीवरचा ब्राँझ पुतळा आहे. सुंदर वास्तू. जवळच्या बागेत (पुंगा) राजाचा सिमेंटचा पुतळा आहे. गावात नगरपालिका कचेरी आवारात मोठी लोखंडी घमेली ठेवलेली दिसली. ही नदीत टाकून दोरीने ओढतात आणि दुरुस्ती करतात. पूर्वी हत्ती ओढत असत. नंतर एका ब्रिटीश एंजिनिअरने बंधाऱ्याच्या अभ्यास करून सुधारणा केल्या.१८३६. जुना तसाच ठेवला आहे. त्याचा पुतळा आहे. भिंतींवर स्त्रीचे डोके असलेली गाय शिल्पे आहेत त्यांची कथा मिळाली नाही.
अगस्ती - कावेरी कथा
अगस्ती ऋषींचे दोन पुतळे आहेत. अगस्ती ऋषींना लग्न करावेसे वाटल्यावर त्यांनी एक कन्या निर्माण केली. तिचे नाव लोपामुद्रा. ती त्याने विदर्भ राजाकडे सांभाळायला दिली. मी नंतर येऊन नेईन म्हणाले. उपवर झाल्यावर अगस्ती गेले ती मागायला राजा विदर्भाकडे. पण राजा तयार होईना . इतक्या म्हाताऱ्याला लग्नासाठी ही मुलगी कशी द्यायची. पण लोपामुद्रा स्वतःच तयार झाली. अगस्तीने आपल्याच मुलीशी लोपामुद्रेशी लग्न केले मात्र ते पडले तपस्वी. त्यांनी तिला कमंडलूतील पाण्यात ठेवले आणि तपाचरणात विसरून गेले लग्न झाल्याचे. काही काळ गेला. मग एका कावळ्याने(गणपतीने) तो कमंडलू लवंडून टाकला आणि लोपामुद्रा नदी स्वरूपात वाहू लागली. तिला लोक कावेरी म्हणू लागले. कर्नाटकातील तलेकावेरी येथे उगम होऊन गुप्त झाली. आठ किलोमीटरवर भागमंडला येथे पुन्हा प्रकट झाली. वाहात तमिळनाडूत पुमपुहार येथे सागराला मिळते. जून ते सप्टेंबरपर्यंत सह्याद्रीचा पाऊस आणि ऑक्टोबर ते डिसेंबर तमिळनाडूतला पाऊस असा सात महिने प्रवाह जोरात असतो.सुंदर जागा. संध्याकाळी इथे गर्दी करतात, सकाळी तुरळक लोक असतात.
कल्लनाई धरण आणि बाग, त्रिची. २०२४_०९_१२
https://youtu.be/g48TnSNPGRM
मणिमंदिरम १, कल्लनाई, त्रिची. २०२४_०९_१२
https://youtu.be/Ce2CE_m6rR0
मणिमंदिरम २, कल्लनाई, त्रिची. २०२४_०९_१२
https://youtu.be/9fqvw-dp26A
तिसरे दिवशी हॉटेल सकाळीच सोडले आणि बटरफ्लाई पार्कला सामान घेऊन वेळ काढला.
यासाठी श्रीरंगमला जाऊन बाजूच्या गल्लीत शाळेजवळ मिनी बस मेलूर येथे जाण्यासाठी मिळते. सकाळी 08:15, 09:45, 12:20 .बस कमी आहेत. शेवटच्या स्टॉपजवळच बटरफ्लाय उद्यान गेट आहे. आम्हाला 09:45 ची बस मिळाली. लवकर जा. नऊला बाग उघडते आणि अकरापर्यंत फुलपाखरे असंख्य उडत असतात. नंतर गायब झाली उन्हाचा तडाखा वाढल्यावर. झाडी भरपूर आहे. रेस्ट हाऊसेस छान आहेत. गारवा आहे. दोन तीन मोर जवळच फिरतात. आतल्या कँटीनमध्ये फारसे पदार्थ नाहीत. सोबत न्यावे.
फोटो ८
श्रीरंगम ते मेलूर बटरफ्लाय पार्कसाठी बस वेळापत्रक
बटरफ्लाई पार्क, मेलूर, त्रिची.२०२४_०९_१३
https://youtu.be/UdUzbesxXUE
मोर, बटरफ्लाई पार्क, मेलूर, त्रिची.२०२४_०९_१३
https://youtu.be/8KoggzJkFwU
फुलपाखरे, बटरफ्लाई पार्क, मेलूर, त्रिची.२०२४_०९_१३
https://youtu.be/S-J-BBMJtqM
परतीची रेल्वे संध्याकाळी सहाची होती त्यामुळे बटरफ्लाय पार्क पाहून झाले.
तमिळनाडूत हा भाग आतला आहे आणि तमिळ भाषा बोलली जाते. इंदी (हिंदी) समजत नाही. काही कॉलेज विद्यार्थी किंवा रिटायर्ड लोक दिसले तर इंग्रजीत विचारता येते. परंतु थोडे तमिळ यावे. यूट्यूबवर learn tamil चे खूप विडिओ आहेत पण विस्कळीत आहेत. पाच वर्षांपूर्वी जर्मनीच्या Goethe Verlag संस्थेने हा प्रश्न सोडवला जगातील आणि भारतातील मुख्य अशा पन्नास भाषांचा शंभर धड्यांचा अभ्यासक्रम तयार केला आहे. 50languages.com
येथे कोणत्याही भाषेतून कोणतीही भाषा शिकता येते. विडिओ, ओडिओ आणि लेखी धडे थेट डाऊनलोड करता येतात. महानाभर बघितल्यास रोजच्या व्यवहारातील वाक्ये समजतात. माझा अनुभव चांगला आहे.
या चार शहरांत जमेल तेवढ्या गोष्टी पाहिल्या परंतू अजून खूप आहेत. आपल्या आवडीनुसार आणि वेळेच्या उपलब्धतेनुसार पाहता येतील. खाणे, राहाणे आणि प्रवास यात काहीच अडचण येत नाही. तिकडे फिरलेल्या वाचकांनी यात भर घालावी किंवा चुका सूचना कराव्यात. धन्यवाद.
___________________________________________________________
प्रतिक्रिया
21 Sep 2024 - 8:47 am | प्रचेतस
हा भाग जबरदस्तच. मंदिराच्या अजस्त्र दगडी कळस वर नेण्यासाठी शिखराच्या उंचीपासून जमिनीच्या पातळीपर्यंत एक लांबच लांब उतार असलेला मातीचा भराव केला. त्यावरून कळस वर चढवल्यावर हा भराव काढून टाकला व मंदिर पूर्ण केले. येथल्या मूर्ती अगदी नीटनेटक्या राहिलेल्या दिसतात.
बाकी आता इकडे जावे लागणारच.
त्रिची, श्रीरंगम, जंबुकेश्वर आवडले.
पोपटावर स्वार आणि धनुष्याला बाण लावलेला मदन? - हो
.एक वाकलेला,दाढीवाला ऋषी वाटतोय.- भृंगी (बदामीत ह्याची पुष्कळ शिल्पे आहेत) कायम शिवासोबत असतो.
22 Sep 2024 - 8:13 am | Bhakti
हो, ह्या पद्धतीने उंचीवर गोपूर /कळस चढविण्याचा एक व्हिडिओ मी पाहिला होता.
तंजावूर ब्रृहदिश्वर मंदिर
https://youtu.be/D3yBuyu_FOA?si=e5hQWuy7RrJMlZDk
23 Sep 2024 - 11:38 am | गोरगावलेकर
या भागात आमची अजून भटकंती झालेली नाही त्यामुळे सहल नियोजनासाठी उपयुक्त माहिती
26 Sep 2024 - 6:48 am | किल्लेदार
कधी इकडे जाणे झाले नाही. जावे लागेल.
26 Sep 2024 - 11:17 am | श्वेता२४
नेमकी माहिती व सुटसुटीत लेखन हे तुमच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. प्रवास नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली.स्लाईड शो करून टाकल्यामुळे एक वेगळाच अनुभव आला. फोटो सगळे छान आले आहेत.
26 Sep 2024 - 12:34 pm | कंजूस
फोटो स्लाईडशोमध्ये फोटोंना क्रमांक किंवा मथळा caption ही टाकता येतो पण मी टाकले नाहीत. अवघड नाही त्या app मध्ये फक्त जरा वेळ लागेल.
तमिळनाडूत सर्व देवळे पुजा होणारी आहेत ( ऐतिहासिक असली तरी) त्यामुळे आतील फोटो मिळाले नाहीत.
26 Sep 2024 - 3:17 pm | श्वेता२४
देवळाच्या आत खूप काही पाहण्यासारखे असते पण फोटो काढता येत नाहीत. देवाची मूर्ती सुंदर असते पण करणार काय.
26 Sep 2024 - 9:57 pm | कर्नलतपस्वी
या भागात फिरलो नाही. आपल्या लेखातून प्रेरणा घेऊन बकेट लिस्ट मधे टाकून ठेवतो.