चोळ राजांच्या प्रदेशात - भाग पहिला

कंजूस's picture
कंजूस in मिपा कलादालन
18 Sep 2024 - 1:37 pm

चोळ राजांच्या प्रदेशात भाग पहिला
चिदंबरम . गंगैकोंडाचोलापुरम. कुंभकोणम

तमिळनाडूचा काही भाग दोन वर्षांपूर्वी पाहिला होता. कांचीपुरम, महाबलीपूरम, वेल्लोर वगैरे.
(तमिळनाडू - वारसा आणि ऐतिहासिक स्थळे पर्यटन.
https://misalpav.com/node/50801 )

मंदिरे पाहाणे, देवदर्शन हे निमित्तमात्र. मुख्य उद्देश भटकंती वेगळ्या भागातली. आता गणपतीच्या दिवसांत सहा दिवस दक्षिणेकडे गेलो. चिदंबरम - कुंभकोणम - तंजावूर आणि तिरुचिरापल्ली (त्रिची). तमिळनाडूमध्ये ९५ टक्के धार्मिक पर्यटन आहे. परंतू इथली देवळे ऐतिहासिक वारसा म्हणून आहेत. चोळ राजांच्या प्रदेशात म्हटलं तरी इथे चालूक्य, पांड्य, सुलतान, नायक, मराठा आणि ब्रिटिश राजवटी राज्य करून गेल्या. हिंदू राजे एकमेकात लढून जय मिळाल्यावर विजयोत्सव किंवा शक्ती प्रदर्शन म्हणू देवळे बांधत. हरलेल्या राजाचे बांधलेले वाडे पाडले गेले तरी देवळे तशीच राहात. त्या देवळांचा विस्तार केला जाई. गोपुरे वाढवली जात. आताच्या सहलीची सुरुवात चिदंबरम येथून केली. शेवट तिरुचिरापल्ली येथे केला.

(माहिती काढण्यासाठी काही विडिओ यूट्यूबवर पाहिले. हिंदीत आहेत आणि जानेवारी २०२४मधले आहेत.

१ चिदंबरम
https://youtu.be/xpocc47COIs

२ गंगैकोंडाचोलापुरम
https://youtu.be/oJd7F450bH8

३ दारासुरम
https://youtu.be/L7QvLWskUs0

४ कुंभकोणम येथील मंदिरे
https://youtu.be/ZqL0bcoyWVQ)

वाहतूक आणि प्रवास साधने -
चिदंबरम - कुंभकोणम - तंजावूर आणि तिरुचिरापल्ली या शहरांमधील अंतरे साधारणपणे चाळीस ते पन्नास किलोमीटर आहेत.एकेक दिवस राहून बघून पुढे जायचे. त्रिचीला तीन दिवस मिळाले त्याचा उपयोग झाला. बटरफ्लाय पार्क आणि कल्लनाई या दोन जागा देवळं नसलेल्या आहेत. स्थानिक पर्यटनासाठी ओटो रिक्षा, टॅक्सी आणि बसेस भरपूर आहेत. शिवाय सर्व ठिकाणं शहराच्या मध्यवर्ती भागात दोन ते पाच किमी अंतरात आहेत. श्रीरंगम, बटरफ्लाय पार्क आणि कल्लनाई हे श्रीरंग बेटावर आहेत.

राहाणे -
ही सर्व शहरं जुनी आणि धार्मिक ठिकाणांच्या पर्यटनामुळे भरपूर वाढलेली आहेत. दहा बारा किमी विस्तार झाला आहे. ठिकाणं शहरांच्या जुन्या भागांत आहेत. सर्व प्रकारची आणि थरांतील हॉटेल्स आहेत. गैरसोय होत नाही.

खाणे -
प्रत्येक शहरात दोन प्रकारची रेस्टारंटस असलेले भाग सापडतात. इडली,वडे वगैरे शाकाहारी जेवणाची तसेच परोट्टा,रोट्टी,सामिष आहाराची वेगळी. शिवाय फळांचे स्टॉल्स ही खूप आहेत.

वातावरण -
तमिळनाडू राज्य मान्सून पट्ट्यात येत नाही. इकडचा पावसाळा संपला की तिकडे ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत पाऊस पडतो. पाऊस संपला,भात तयार झाले की पोंगल (संक्रांत )मोठा सण येतो. या वेळी मोठी सुट्टी असते. वीस जानेवारीला संपते. त्यानंतर गर्दी नसते आणि हवा आल्हाददायक असते.
त्यांचा सप्टेंबर म्हणजे इकडचा मे महिना. तरी फार कडक उन्हाळा वाटला नाही. कावळ्यांची घरटी बांधायची लगबग दिसली. भोकराच्या झाडावरची भोकरं पिकली होती. काही आंब्यावर आंबे तयार झाले होते. आम्ही काही आंबे घेतले त्याची चव फारच छान होती.

-----------------------------------
चिदंबरम -
आम्ही पाचला संध्याकाळी पोहोचलो. झटपट एक रुम घेऊन चिदंबरम मंदिराकडे गेलो. वेळ भरपूर होता कारण दहापर्यंत देऊळ उघडे असते. फोटोला बंदी. सर्व देवळे सकाळी सहा ते बारा आणि दुपारी चार ते आठ उघडी असतात. दुपारचा बारा ते चारमधला वेळ वाया जातो. चिदंबरम हे शिवाच्या नटराजा अवतारासाठी प्रसिद्ध आहे. परंतू नटराजाची मोठी अपेक्षित मूर्ती आत नाही. दोन फुटी काळ्या दगडातली आहे. शिवाय वस्त्र नेसवलेलं. दुरूनच दिव्याच्या उजेडात काही दिसलं नाही. देऊळ बऱ्यापैकी मोठं आहे, एक पुष्करणी आहे. पण रात्र असल्याने आवरतं घेतलं. चिदंबरम पासून पंधरा किलोमिटरसवर कांदळवन आणि समुद्र आहे. खारफुटी झाडे. याचे इकडे संशोधन केंद्र आहे. तिकडे गेलो नाही.

गंगैकोंडाचोलापूरम -
चिदंबरम ते गंगैकोंडाचोलापूरम(३५किमी) थेट जाण्यासाठी अधुनमधून बसेस असतात. किंवा वाटेत काट्टुमानारकोईल येथे बस बदलावी लागते. किंवा कुंभकोणमला जाऊन तिथून परत(३०किमी) यावे लागते. कुंभकोणमला जाणाऱ्या आणि तिकडून दर दहा पंधरा मिनिटाला बसेस असतात. पण आम्हाला सातची तिरुपुर बस मिळाली त्याने देवळापाशी पोहोचलो. गाव बाजुलाच आहे. चोळ राजा राजेंद्र याने बंगालपर्यंत सैन्य मोहीम नेऊन तिथल्या पालवंशीय राजांना जिंकून बंदी करून आणले. यांची अगोदरची तंजावूरमधली राजधानी इकडे आणली. तिथल्या बांधलेल्या बृहदिश्वर मंदिराची थोडी लहान प्रतिकृती म्हणजेच इथले मंदिर. गंगै (गंगा) कोंडा (आणली) चोला (चोळ राजा) पुरम (गाव शहर) असा याचा अर्थ आहे. वर्ष १०३५ मध्ये पूर्ण. चोळ राज्य पांड्य राजांनी बळकावले आणि नंतर इतर राजवटीत राजधानीचे काही शिल्लक राहिले नाही. तरी पुरातत्व विभागाने उत्खनन करून शोधाशोध केली आहे.
फोटो १
गंगैकोंडाचोलापुरम परिसर उत्खनन

मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एकच हॉटेल आहे वसंता भुवन. स्वच्छ आणि चविष्ट नाश्ता मिळाला. मंदिराचा परिसर सुशोभित राखला आहे आणि प्राकाराची वीस फुटी भिंत बहुतेक नवी असावी. आतमध्ये टॉयलेट, पिण्याचे पाणी, माहिती प्रकाशन केंद्र आहे. तुरळक पाच दहा पर्यटक आले होते. बाहेर पार्किंग आहे.
आतील मंदिराचे आणि शिल्पांच्या फोटोंच्या स्लाईड शो पाहा -
https://youtu.be/2VoeZdiqPMc

जिंकलेले पाल राजे कुंभांमध्ये गंगा घेऊन आले होते. इकडे जो सिंह दिसतो आहे त्याच्या पोटात एक जिना आहे तो आता जाळीच्या दरवाजाने बंद केला आहे. त्या जिन्याने बाजूच्या विहिरीत जाण्यासाठी दार आहे. त्या विहिरीत गंगा ओतली गेली होती.
विडिओ
https://youtu.be/_22dz79VmoQ

हे पाहून कुंभकोणमकडे गेलो.

कुंभकोणम (उच्चार कुम्पाकोणम )

इथे एक दिवस राहिलो. रुम घेऊन जेवण करून प्रथम महामघम तीर्थाकडे गेलो. शहराच्या मध्यभागी तंजावूर रस्त्यावर बस स्टँडपासून महामघम तीर्थ आणि काशिविश्वेश्वरार (१किमी) + आदिकुंभेश्वर आणि सारंग पाणी (२किमी)+ दारासुरम ऐरावतेश्वर (२किमी) अशा अंतरावर आहे.
फोटो २
महामहीम तीर्थ

फोटो ३
रुद्र, आदि कुंभेश्वरार कोईल

फोटो ४
.हत्ती , आदि कुभेश्वरार कोईल

आणखी बरीच मंदिरे आहेत. सर्व दुपारी बारा ते चार बंद असतात. महामहीम तलावाच्या चारी बाजूने चार चार याप्रमाणे सोळा शिवालये आहेत. या तलावात अमृताचे थेंब पडले अशी पौराणिक कथा आहे. अर्थात इथेही कुंभमेळा होतो गुरु सिंह राशीत आल्यावर. पुढचा मेळा २०२८मध्ये. आणि मसी उर्फ अर्ध कुंभ २०२२,२०३४...या प्रमाणे. तलावाला कुंपण आहे . जवळच काशिविश्वेश्वरार हे मंदिर आहे. बंद होते. येथून दारासुरमला पोहोचलो साडे तीन वाजता. ते लवकर उघडून दिले ते फिरून पाहिले. पश्चिमाभिमुख आहे. मूर्ती सुंदर.
विडिओ
https://youtu.be/4VcrFzkZOgs

फोटो ५
दारासुरम पाटी

मंदिरात एक छोटासा जिना आहे दहा पायऱ्यांचा. त्यावर आघात केल्यास स्वर वाजतात. तो आता बंदिस्त केला आहे.
फोटो ६
संगीत पायऱ्या, दारासूरम ऐरावतेश्वर

या मंदिराच्या बाजूला पार्वतीअम्मन मंदिर आहे. सिंहाची शिल्पे खूप आहेत. परिसरात विणकरांची घरे आहेत. सुती साड्या हातमागावर विणतात. येथून मागे आदिकुंभेश्वरारला आलो. देवळात हत्ती आहे आणि रुद्राचे मोठे शिल्प आहे. परतताना कॉफी दळून विकणाऱ्या गिरण्या दिसल्या . थोडी कॉफी घेतली. पण चिक्कमगळुरुला घेतलेली अधिक चांगली होती.

कुंभकोणममध्ये ओटो रिक्षावाले, हॉटेलवाले नवग्रह मंदिर टूअर करायची का विचारतात. पण ते नवग्रह एकाच मंदिरात नसून वेगवेगळी नऊ मंदिरे आहेत. बरेच अंतर आहे. फसू नका.

फोटो ७
नवग्रह मंदिर यादी

पुढील भागात तंजावूर आणि त्रिची.

मिपाकर देर्देकर यांनी सुचवलेल्या विडिओ एडिटर ऍपमुळे वाटरमार्क नसलेले फोटो स्लाईडशो टाकता आले. वीस फोटोंचा (1080p)स्लाईडशो करता येतो फ्री वर्शनमध्ये. ( Play store link .. https://play.google.com/store/apps/details?id=videoeditor.videomaker.vid... ) . स्लाईडशो केल्याने लेखामध्ये खूप फोटो टाकता येतात फार खटपट न करता. शिवाय जीमेल स्टोरेजमध्ये ते मोजले जात नाही.

माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, कुणाला ट्रिप प्लान करायला उपयोगी पडेल. आम्ही रेल्वे आणि स्थानिक बसने प्रवास केला. आगावू आरक्षण फक्त रेल्वे तिकिटाचे केले. हॉटेल्सचे राहाण्याचे आरक्षण नाही. भरपूर आहेत व पाहून ठरवता येतात. अडचण आली नाही. स्थानिक भटकंतीसाठी कुणी ओटोरिक्षाने जाताना दिसले नाहीत. त्यांचा दर पन्नास रु किलोमीटर आहे. बसेस स्वच्छ आणि भरपूर असतात. एक रुपया किलोमीटर तिकिट. सरकारी एसटीत महिलांना फुकट, आधारकार्ड मागत नाहीत.
विमानाने जायचे झाल्यास त्रिची एअरपोर्ट आणि चैन्नई एअरपोर्ट. त्रिचीला राहून त्रिची आणि तंजावूर जाऊन पाहता येईल. कुंभकोणमला एक दोन दिवस राहावे लागेल. कारण देवळे दुपारी बंद असतात. या सहलीला मदुरै जोडता आले असते पण रामेश्वरमसाठी ते ठेवले आहे. सध्या रामेश्वरचा मंडपम ते पंबन रेल्वे पूल बंद आहे. रस्त्याने जाता येते. बघू पुढे कधीतरी.

ऐतिहासिक नोंदी, नावे, तारखा इतर स्रोतातून खात्री करावी. प्रत्येक देवळाची विशेष दंतकथा, पौराणिक कथा आहे पण ती इथे दिली नाही. Travel book चानेलच्या विडिओंत दिलेली आहे. माझे विडिओ साध्या मोबाईल कॅम्राचे HD आहेत. थोडे धूसर दिसतील. एक कल्पना यावी म्हणून दिले आहेत.
लेखातील चुका आणि सूचनांचे स्वागत. धन्यवाद.

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

18 Sep 2024 - 4:08 pm | श्वेता२४

हे माझ्या बकेट लिस्ट मध्ये ठिकाण आहे. सध्या मुलगा लहान असल्यामुळे त्याला कंटाळा येईल म्हणून याचे नियोजन केलेले नाही. कधीतरी मी व माझा नवरा असे दोघेच हम्पी व तंजावर, त्रिची ही स्थळे पाहायचे ठरवले आहे. आम्हाला ऐतिहासिक गोष्टींची आवड आहे. निवांत व माहिती घेत पाहण्यात दोघांनाही रस असल्यामुळे व्यवस्थित वेळ काढून अत्यंत बजेटमध्ये ही ठिकाणी करायची ठरवली आहेत. तुम्ही दिलेली माहिती माझ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण मी सुद्धा हे ठिकाणे रेल्वे बस व रिक्षा इत्यादी साधनांनीच करावयाची ठरवले आहेत. फोटोमुळे व स्लाईड शो मुळे तिथल्या मंदिरांची कल्पना आली. धन्यवाद.

आंद्रे वडापाव's picture

18 Sep 2024 - 4:27 pm | आंद्रे वडापाव

छान लेख व माहिती .

(वरील सांस्कृतिक प्रदेशाला (राजकीय सीमा नव्हे ) "चोला मंडलम" असे म्हणतात का ? मंडल = प्रदेश अश्या अर्थी )

हे चोला अकराव्या शतकातील.

पण आद्य चोला पहिल्या शतकातील होते. काराईकल चोला म्हणतात. त्यांचे राज्य आताच्या तमिळनाडूएवढे अधिक केरळचा भाग पसरले होते. पुढच्या लेखात येईल. तमिळी लोकांना चोलांचा फार अभिमान असतो. पुमपुहार बंदर तेव्हा प्रसिद्ध आणि प्रचलित होते.

उत्तम सुरुवात, चोळांची ही तीन जगप्रसिद्ध मंदिरे आजही पूजेत आहेत. तमिळनाडूमधले मंदिरांचे नियम कडक, दुपारी बंद, शिवाय गाभार्‍यातल्या मूर्तीला वस्त्रे नेसवलेली असतात. दगडी जीना आवडला. इकडे भाषेचा प्रश्न येत नाही का? कर्नाटकात फारसा प्रश्न येत नाही, मोडक्या तोडक्या भाषेतून समजते पण तमिळ अवघड जाते.
बाकी कोंडा म्हणजे "आणली" ह्यापेक्षा "जिंकली" जास्त योग्य. पल्लव नृसिंहवर्मनने बदामी जिंकून स्वतःस वातापीकोंडा अशी पदवी धारण केली होती.

इकडे भाषेचा प्रश्न येत नाही का?

येतो. पण तो प्रश्न मी कसा सोडवला ते पुढच्या भागात. खरं म्हणजे भारतीय/जगातील मुख्य पन्नास भाषांसाठी पाच वर्षांपूर्वी प्रोजेक्ट गुटेनबर्ग , जर्मनी यांनी विडिओ ओडिओ लेखी अशी साईट बनवली. 50languages.com व्याकरण वगळून थेट कामाची वाक्ये दिली आहेत. पर्यटकांसाठी उपयुक्त.

Bhakti's picture

18 Sep 2024 - 10:16 pm | Bhakti

चोळ राजांविषयी अधिक माहिती नाही, यानिमित्ताने छान माहिती मिळेल.

राघव's picture

26 Sep 2024 - 3:02 pm | राघव

वाचतोय!

कर्नलतपस्वी's picture

26 Sep 2024 - 9:54 pm | कर्नलतपस्वी

आपले लेख भटकंती साठी उपयोगी पडतात.