श्री गणेश लेखमाला २०२४ - आली गौराई अंगणी

मी-दिपाली's picture
मी-दिपाली in लेखमाला
12 Sep 2024 - 6:46 am

आली गौराई अंगणी..

“गऊ, त्या झाडाच्या जवळ नको गं जाऊ सारखी. सोड एकटं त्याला थोडा वेळ.” आई खिडकीतून बघत ओरडली.
“झाडांशीही बोलावं. कळतं त्यांना सगळं. पुस्तकात आहे आमच्या. आईला काही कळत नाही, हो नं?” नवीनच लावलेल्या प्राजक्ताच्या रोपट्यापाशी गऊचं हितगुज चालूच होतं. तोवर आई तिथे पोहोचलीच. तिला लेकीची झाडांवरची माया आणि हट्टी स्वभाव दोन्ही चांगलंच माहीत होतं.
“अगं हो, पण तुझ्या बोलण्याकडे लक्ष देण्यासाठी त्याला थोडं स्थिर तर होऊ दे इथे. आपली माती सोडून आलंय ते इकडे. भांबावलं असेल.. आणि असंही.. एकदा झाड लावलं की थोडा वेळ काळजी घ्यावी. पाहावं, त्याभोवतालच्या मातीतून हवा खेळती राहते की नाही ? माती थोडी जून आणि खतावलेली हवी. पाणीही जमिनीत मुरेल इतपतच द्यावं. उगाच साचून राहील मुळाशी इतकं नको. इतकी प्राथमिक काळजी घेतली की बाजूला व्हावं. त्या झाडाच्या आसपास फिरकूदेखील नये. लागवडीच्या वेळी घ्यायची ही निगा आणि ते व्यवस्थित तग धरेपर्यंतची उदासीनता या दोन्ही गोष्टींमुळे पुढे मग झाड जोमाने वाढतं, फुलतं आणि बहरतं.” आई असं काही सांगायला लागली, की मात्र गऊ मन लावून ऐकायची.
“हे म्हणजे आई, अगदी जसं तू माझ्याबरोबर करायचीस, तसंच नं ? मला आठवतंय, मी लहान असताना पडले, की तुझ्याकडे आशेने बघायचे. वाटायचं, तू धावत येशील. मला उचलून घेशील. लाड करशील. बाकीच्या मुलांच्या आया जशा करतात, तसं. पण तू तिथूनच बघायचीस. जरासुद्धा हलायची नाहीस जागेवरून आणि म्हणायची, “ये पिल्लू, नाही लागलंय फार.” तू काही येत नाहीस पाहून मीच माझी धडपडत उठायचे. अस्सा राग यायचा तुझा. खूप वाईट आई आहे आपली वाटायचं.”
“मग ? अजूनही तसंच वाटतंय का?”
“नाही गं, नंतर कळलं. आता काही वर्षांपूर्वी सायकलवरून पडले होते आणि हनुवटी फुटली होती, तेव्हा किती जिवाच्या आकांताने धावत आली होतीस. माझ्या हनुवटीखाली धरलेली तुझी ओंजळ रक्ताने भरली होती. मला तसंच उचलून रिक्षात घालून नेलंस. कोणाची वाट न बघता मला पोटाशी घेऊन तीन मजले चढून गेलीस आणि डॉक्टरसमोर ठेवलं होतंस. आठवतंय मला... आणि तेव्हा अशी वागलीस, म्हणून तर आता मी एवढी कणखर झाले.” गऊ आईला मिठी मारत म्हणाली.
“अग्गो बाई! लेकीकडे लक्ष ठेवून होते, पण हे लक्षात येण्याएव्हढी ती मोठी कधी झाली, ते लक्षातच नाही आलं हो माझ्या.” आई तिला जवळ घेत म्हणाली.
“पण आई, आपल्या बागेचीही तू इतकी काळजी घेतेस. मग ही झाडं का ठेवतेस? यांचा काय उपयोग आहे? नुसतंच रान माजतं यांचं.” गऊ कोपऱ्यात उगवलेल्या झाडांकडे बोट दाखवत म्हणाली.
“असू दे गं, याच दिवसात येतात ती. न चुकता नेमाने याच जागी. कुणी लावायला जात नाही. वारकऱ्यांना कसं कुणी सांगत नाही, वारीला जा म्हणून.. ओढीने येतात ते विठ्ठलाच्या दर्शनाला दर वर्षी.. तशीच ही फुलं. काही त्रास नाही त्यांचा. आणि इंग्लिशमध्ये म्हणतात नं, ‛There is no such thing as weed. These are just misplaced flowers.' किती सुंदर फुलं आहेत बघ ही! जागा चुकली त्यांची फक्त. कुठेकुठे रानात, माळावर फुलून जातात ही. चार दिवसांची माहेरवाशीण येऊन राहून जाते, तशी ही झाडं. हा ‛तेरडा'. रंग तर बघ याचे किती मोहक! गुलाबाला लाजवतील. आकारही नाजूकशी जिवणी असावी तसा. हे ‛पेव'. याच्या फुलांकडे थेट नको बघू. अगदी खालच्या पानांपासून वरच्या पानांकडे बघत जा. गोल गोल फिरत चक्रीजिन्याची एकेक पायरी चढावी, तसं वाटतं. हा जिना चढून वर गेलो की मग पाहावी वर फुललेली ती पांढरी, तळाशी रक्तवर्णी लाल रंग असलेली झोकदार फुलं... आणि ही ‛इंदावेल'. हिला खूप नावं आहेत. कुणी ‛कळलावी' म्हणतात, कुणी ‛वाघनखी'. पाकळ्यांचा रंग बघितलास हिच्या? पिवळा आणि टोकाकडे मात्र लाल. जणू वाघीण नुकतीच शिकार करून आलीये रक्ताने माखलेले नख घेऊन. मला मात्र तिचं अग्निशिखा नाव आवडतं.” एवढ्यात दुरून ढोलताशाचा आवाज येऊ लागला, तसं दोघींचं लक्ष तिकडे गेलं. गऊ धावत फाटकापाशी गेली. गौराईच्या सुंदर मूर्ती मिरवत चालवल्या होत्या. प्रत्येक मूर्तीचं रूप निरखत राहावं असं. गोरापान रंग, दागदागिन्यांनी मढवलेली, सुंदर साडी नेसवलेली प्रत्येक मूर्ती डोळा भरून बघावी अशी.
मिरवणूक पुढे गेली, तशी गऊ आईकडे वळून म्हणाली, “माझा जन्म गौरीगणपतीच्या दिवसात व्हायला नको होता.”
“का गं आज हे खूळ मध्येच अचानक? तुझ्या वाढदिवसात का काही कमी झालंय कधी गौरीगणपतीचं करताना?” आईने गोंधळून तिला विचारलं.
“तसं नाही गं, त्या वर्षी गौरीच्या दिवशी माझा जन्म झाला, म्हणून माझं नाव गौरी ठेवलं तुम्ही. पण माझा रंग तर हा असा. एक तरी मूर्ती होती का माझ्यासारखी इतक्या सगळ्या मूर्तींमध्ये? मराठीच्या धड्यात ‛नाव सोनुबाई, हाती कथलाचा वाळा' ही म्हण वाचली, तर मला माझ्यासाठीच ही म्हण असल्यासारखं वाटलं. गौरी माझ्यासारखी नसतेच का ग?”
“नसते कशी? तू माझी गौरच तर आहेस. या वर्षी आपण अगदी तुझ्यासारखी गौर आणू बरं,” आई म्हणाली, तशी गऊची कळी खुलली. “..पण आता आपली गौर आली घरात, की बोलवीन तुला. मगच बघायला यायचं, तोवर मुळीच लुडबुड करायची नाही. आहे कबूल?” आईने विचारलं.
“हो, कबूल! ” म्हणून गऊ आनंदाने तिच्या वरच्या खोलीत जाऊन बसली.
इकडे आईने तेरडा, पेव, कोंबडा, इंदावेल अशा सगळ्या झाडांच्या फुलं असलेल्या छोट्या छोट्या फांद्या छाटल्या. त्यांना स्वच्छ धुऊन पुसून काढलं. रांगोळी काढून त्यावर पाट मांडला. पाटावर रेशमी वस्त्र अंथरलं. एका तांब्यात पाणी घेऊन त्यात ती पानंफुलं ठेवली. साडीचोळी नेसवली. सौभाग्यलेणं चढवलं आणि हात जोडून म्हणाली, “माहेरवाशीण म्हणून घरात आलीस. दोन दिवस राहा हो सुखाने.” तिने गौरीला हाक मारली,“ गऊ, ये गं खाली. गौर आली बघ तुझी.”
गऊ धावत जिना उतरून खाली आली. आईने तिच्या डोळ्यांवर हात ठेवून तिला गौरीसमोर नेलं आणि डोळ्यावरचे हात काढले. गऊ आनंदाने बघतच राहिली. “आहे नं गौर अगदी तुझ्यासारखीच?” गऊने आईला घट्ट मिठी मारली. दोन्ही गौराया आज अगदी खुशीत हसत होत्या.
1

गौरीपूजन

श्रीगणेश लेखमाला

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

12 Sep 2024 - 1:27 pm | कर्नलतपस्वी

पण त्याची भाषा समजावी लागते. मन तेव्हढेच संवेदनशील असावे लागते. लिखाण खुपच भावले.

मी स्वतः निसर्गात तासंतास भटकत असतो. पक्षांची जीवन पद्धती समजून घ्यायला फार आवडते.

गऊ डोळ्यासमोर उभी राहीली.

खुप सुंदर गऊची निसर्गौची गौराई!
अशी गोष्ट मला मुलीला नवरात्रीत सांगावी लागते :).
गिरीजा -तू कशी उच्च विचारांचीसारखी होशील, म्हणून नवरात्रीत जन्मली.

चौथा कोनाडा's picture

12 Sep 2024 - 2:40 pm | चौथा कोनाडा

व्वा ... सुंदर चित्रदर्शी लेखन .. हुबेहुब गऊ डोळ्यांपुढे उभी राहिली !
असं संवेदनशील निरगस लेखन पाहिलं की मिपावाचक असल्याचा आंनद होतो !

|| पुलेप्र ||

प्रचेतस's picture

16 Sep 2024 - 6:56 am | प्रचेतस

+१.
सुरेख, चित्रदर्शी लेखन.

श्वेता२४'s picture

16 Sep 2024 - 4:14 pm | श्वेता२४

आवडला

जुइ's picture

11 Oct 2024 - 1:57 am | जुइ

निसर्ग गौरई खूपच सुंदर. लेखन मनापासुन आवडले.