श्री गणेश लेखमाला २०२४ -सिंदुरात्मक गणेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in लेखमाला
13 Sep 2024 - 12:20 pm

माझे आजोळ आणि मामाचे गाव शेंदुरवादा. एक शेत सोडले की मामाची शेती आणि माझे आजी-आजोबा सख्खे शेजारी. बालपण इकडेच दोघामध्ये गेलेले. छत्रपती संभाजीनगरातील डोंगरातून सुरू झालेली ही खाम नदी शहरातून वाहत वाहत शेंदुरवाद्यास येते. पाच-पन्नास वर्षांपूर्वीच्या नदीपात्राच्या विविध आठवणी आहेत. गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा हे खाम नदीच्या काठावर वसलेले गाव.

photo_2024-09-10_20-12-34

सिंदुरात्मक गणेश

छत्रपती संभाजीनगरपासून बत्तीस किलोमीटरवर, तर गंगापूर शहरापासून पंचवीस किलोमीटर असलेले हे शेंदुरवादा गाव. नदीपात्रात खेळलो बागडलो. टिपूर चांदण्यात वाळूपात्रात कधी आजी-आजोबांबरोबर आंबा-पेरूच्या बागेत चांदोबाशी गप्पा करीत अंगावर लेपडे, जाड कपड्यांचे पांघरूण अंगावर घेऊन झोपणे. अहाहा.. सर्वच रम्य आठवणी.

तर, अशाच नदीच्या पात्रातच प्रसिद्ध असे सिंदुरात्मक गणेशाचे मंदिर आहे. शके १७०६मध्ये इ.स. १७८४मध्ये बांधल्याचा शिलालेख आहे. मंदिराचे बांधकाम अष्टकमानी संपूर्ण दगडी आहे. कायगाव टोका येथे जशी दोन-तीन मंदिरे आहेत, तशाच समकालीन असलेल्या या मंदिरात सिंदुरात्मक गणेशाची वाळूची भव्य दक्षिणमुखी मूर्ती आहे. गावाच्या बाजूने उतरत नदीकाठी उतरायला छोटासा दगडी घाट आहे. जवळच भाविकांना राहण्यासाठी जुन्या काळात बांधलेली चिरेबंदी सराई आहे. श्रीगणेशाच्या चरणी भागीरथी तीर्थकुंड आहे. त्याला ’विनायक तीर्थ' असेही म्हणतात. नदीला जेव्हा पूर येत असे आणि मंदिरातील गणेशाच्या डोक्याच्या वरून पाणी जायला लागले की मंदिरातून भोंगा वाजावा तसा आवाज येत असे. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने अष्टकमानी मंदिराच्या पोकळ भागातून जोरदार वारे आणि पाणी यामुळे तो आवाज येत असावा: पण श्रद्धाळू म्हणत की, गणपतीचा कोप होते असे आणि मग नदीचा पूर ओसरायला लागत असे.

photo_2024-09-10_20-12-33

कीर्तिमुख असलेला स्तंभ

इथे आसरा आहेत, अर्थात अप्सरा. पाण्यात कोणी उतरले की या जलपरी त्यांना थेट स्वर्गात घेऊन जातात अशी आख्यायिका आहे, त्यामुळे तिथे कोणी पोहायला जात नसे. मुली तर नाहीच नाही. साती आसरा म्हणजे सात अप्सरा. आसरा प्रामुख्याने कोकणातच, पण मराठवाड्यातही या आसरा दिसतात. आसरा कायम भीतिदायक असत. त्या पाण्यात ओढून नेतात, तिकडे जाऊ नये, अशी वदंता तिथे होती. आसरांची पूजा करताना अनेकदा पाहिले आहे. गणपतीच्या शेजारीच या आसरा आहेत.

सिंदुरात्मक गणेशाबद्दल जी कथा सांगितली जाते, ती अशी की एकदा झोपेतून उठलेल्या ब्रह्मदेवाने दिलेल्या जांभईतून महाकाय राक्षस सिंदुरासुराचा जन्म झाला. ब्रहादेवाने त्याला 'तू ज्याला मिठी मारशील, तो भस्मसात होईल' असा वर दिला. आता दिलेल्या वराची प्रचिती पाहण्यासाठी त्याने ब्रह्मदेवालाच मिठी मारण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्याच्यापासून बचावासाठी ब्रह्मदेवासह सर्वच भयभीत देवादिकांनी बाल गणेशाला साकडे घातले. गुरू पराशर ऋषींच्या आश्रमात विद्या आत्मसात करणाऱ्या बाल गजाननाने त्या असुराला युद्धासाठी आव्हान दिले. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. गणेशाने विश्वरूप धारण करून आपल्या पाशाने गळा आवळून त्या राक्षसाला ठार केले. रक्ताने गणेशाचे अंग शेंदरासारखे माखले. आता कोणी म्हणतं ठार मारले, कोणी म्हणतं की सिंदुरासुराचा पराभव झाला तो गणेशाचा दास झाला आणि आता तुझ्याच पाठीशी मला राहु दे, अभय दे. लोक तुला नमस्कार करतील नैवद्य देतील तर, तुझ्या पाठीशी मलाही स्थान राहु दे म्हणून पूर्व दिशेस गणेशाच्या मूर्तीतच डाव्या बाजूस त्याचेही स्थान आहे. हे युद्ध जिथे झाले, ते ठिकाण म्हणजे शेंदुरवादा. येथील गणेशाला 'सिंदूरवदन' किंवा 'सिंदुरात्मक गणेश' असे म्हणतात. परिसरात या सिंदुरात्मक जन्माच्या विविध आख्यायिका सांगितल्या जातात. गणेशाच्या डाव्या बाजूला राक्षसाचीही पुसटशी मूर्ती कोरलेली दिसते.

photo_2024-09-10_20-12-31

विनायक तीर्थकुंड

असे सांगितले जाते की, पानिपतच्या लढाईच्या अगोदर नानासाहेब पेशवे आणि निजाम यांच्यात झालेल्या तहानुसार दौलताबाद मुलखाच्या चौथाई वसुलीचे अधिकार आणि देवगिरी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर सुमारे चाळीस वर्षे या भागात मराठ्यांचा अंमल होता. तत्कालीन मराठा सरदारांनी, जहागीरदारांनी दिलेल्या दानांमधून पैठण, कायगाव टोका, औरंगाबाद या भागात त्या वेळी कित्येक मंदिरेही उभी राहिली. अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केले गेले. देवगिरी किल्ल्यावरील गणपती मंदिर आणि शेंदुरवादा येथील सिंदुरात्मक गणेशाची स्थापना याच काळात झाली. अजूनही छ. संभाजीनगर येथील जहागीरदार यांच्याकडे हे मंदिर आणि शेजारची जागा असल्याचे म्हटले जाते.

आम्ही लहानपणी आजी-आजोबांबरोबर बाजाराला येत-जात असू, तेव्हा गणेशाचे दर्शन करून मध्वमुनींच्या वाड्यात खेळत असू. कधीतरी येणारे जाणारे वाटसरू कधीतरी दर्शनास येत असायचे. तेव्हा, नदीही आपली हळुवार आपल्या संथ गतीने वाहत असे. आता फक्त नदी पावसाळ्यात वाहते आणि छत्रपती संभाजीनगर शहराचे सर्व सांडपाणी बारामाह या नदीपात्रातून वाहत असते. शहरीकरणाचे जे जे परिणाम व्हायचेच, ते इथेही निदर्शनास येतात. आता चतुर्थीला गणेशाच्या दर्शनासाठी भक्तांची तुडुंब गर्दी होते.

photo_2024-09-10_20-12-34 (2)

मध्वमुनीश्वर

शेंदुरवाद्यास प्रसिद्ध संत कवी मध्वमुनीही राहिले आहेत. सिंदुरात्मक गणेश मंदिराच्या शेजारीच मध्वमुनींचे संस्थान आहे. मध्वमुनी व अमृतराय ही पेशवेकाळातील गुरुशिष्याची जोडी आपल्या नादमधुर व खटकेबाज गीतांनी या काळातील मराठी साहित्यात अमर होऊन राहिली आहे. अत्यंत लोकप्रिय अशा पद्य रचनाकारांत मध्वमुनींचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. मध्वमुनी स्वतः उत्तम कीर्तनकार होते.

मध्वमुनीश्वर हे नाशिकचे राहणारे. वडील नारायणाचार्य. यांचे घराणे माध्व संप्रदायी कट्टर वैष्णव. पण त्र्यंबकेश्वराच्या प्रसादाने पुत्र झाला, म्हणून मूळ नाव 'त्र्यंबक' ठेवले गेले. व्याघ्ररूपाने दर्शन देणाऱ्या शुक्राचार्यांकडून प्रथम गुरुपदेश मिळाला, तेव्हा विशिष्ट दैवताचा, संप्रदायाचा अभिमान नष्ट होऊन ते अद्वैतवादी झाले. मध्वाचार्यांचे 'मध्वमुनीश्वर' असे नामकरण झाले. भगूर क्षेत्री गजाननाकडून वरप्रसाद मिळाला आणि तेव्हापासून काव्यरचनेला प्रारंभ झाला. मध्वमुनींनी उदंड तीर्थाटन केले. पारनेरास शिवलिंग स्थापना केली. पंढरपूरवारीचा नेम पाळणे वृद्धापकाळी अशक्य, म्हणून शेंदुरवाद्यास विठ्ठलाची स्थापना केली. पुढे इ.स १७३१मध्ये तेथेच समाधी घेतली. शेंदुरवाद्यास त्यांचा मठ आहे. मध्वनाथांच्या शिष्यवर्गात अमृतराय, भोजराज, लक्ष्मणराव आदीकरून मोठमोठे लोक होते. श्री. गुब्बी यांना १९२५ साली औरंगाबादेस मध्वमुनींच्या कवितेचे बाड मिळाले. त्यावरून त्यांनी १९२६ ते १९२८ ह्या काळात प्रथम 'मुमुक्षु' मासिकातून त्यांची कविता प्रसिद्ध केली होती. संदर्भ-माहिती - प्राचीन मराठी वाङमयाचे स्वरूप : ह.श्री. शेणोलीकर.

अशी ही माझ्या आजोळची श्री सिंदुरात्मक गणेश आणि मध्वमुनी यांच्या साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण. सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.

श्रीगणेश लेखमाला

प्रतिक्रिया

लेख, फोटो, आख्यायिका, तुमच्या आठवणी सर्वच आवडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Sep 2024 - 8:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

sindurasur
सिंदुरासुर

गलेमा लेखासाठी लेखनाचे दोन व्हर्जने पाठवली होती. दुस-या व्हर्जनात हा बाजूचा फोटो लावला होता, वरील लेखात राहून गेला. बाय द वे, या गणेशाच्या डाव्या बाजूला सिंदुरासूर आहे, गावाकडं राक्षस म्हणतात. गणेशास आपलं गोडधोड नैवद्य तर, या राक्षसास वशट नैवद्य. असं बरेच दिवस होतं. हळुहळु आता बंद झालं. मध्वमुनींच्या रचनेवर स्वतंत्र लेखन कधी तरी करता येईल.

लेखास आवर्जून प्रतिसाद लिहिणारे सौंदाळा आणि मिपा वाचकांचेही आभार. गलेमा संयोजकांनी लेखाचा गलेमात समावेश केला प्रोत्साहन दिले. आभार.

-दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी's picture

14 Sep 2024 - 10:43 am | कर्नलतपस्वी

सहसा लक्ष दिले जात नाही. एकाच जागी कित्येक वर्ष राहूनही त्या बद्दल स्थानिक लोकांना माहीत नसते.

समयोचित लेखाद्वारे शेंदूरवादा गावाचा इतीहास व सिंदूरात्मक गणेशा बद्दल अख्यायीका वाचकांपर्यंत पोहोचवली या बद्दल धन्यवाद.

प्रचेतस's picture

14 Sep 2024 - 3:26 pm | प्रचेतस

व्वा...!
खूप दिवसानंतर गणेश लेखमालेच्या निमित्ताने तुम्ही लिहिते झालात आणि ह्या मंदिराचे दर्शन घडवून आणलेत. मंदिर जरी पेशवेकालीन असले तरी येथे असलेला किर्तीमुख कोरलेला स्तंभ येथे यादवकालीन किंवा त्यापेक्षाही जुने मंदिर असले पाहिजे हेच दर्शवतोय. गजान आणि पाठीमागे असलेला सिंदुरासुर आवडला.

मध्वमुनींच्या रचना किर्तनाच्या अंगाने जातात, सतत वेगवेगळी कवने करणार्‍या हरदासांवर केलेला त्यांचाच एक फटका असा-

ओव्या श्लोकपदे प्रबंध रचना हे तो निघाली नवी
टप्पे ख्याल कितेक गाति यमकें झाले फुकाचे कवी
गीता भारत वेदशास्त्र न रुचे गेली जनाची चवी
ऐसें देखुनि मध्वनाथ म्हणतो देवा मला वाचवी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Sep 2024 - 11:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचु फटका आवडला. मध्वमुनींच्या रचनेवर स्वतंत्र लेखन ओळख कधी तरी करुन द्यायला जमलं पाहिजे. 'एकाखडी' ही त्यांची रचना वेगळी आहे. क क क क कळो ये रे प्रपंच माईक' असे क्ष पर्यंत मुळाक्षरे घेऊन बोधपर रचना केली आहे.

संसार सासरा अविद्या हे सासू | ईचा आला त्रासू मजलागी ||
वासना नंदन तोडी माझे लोळे | कोण इचे लळे पुरवावे ||
निष्फळ अहंकार भर्ता |करु नेदी वार्ता माहेरीची ||
कामक्रोध दीर मारिती हे लाता | याची मज व्यथा अहर्निश ||
( रचना मध्वमूनी )

-दिलीप बिरुटे

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Sep 2024 - 12:49 pm | ज्ञानोबाचे पैजार

माहिती व फोटो दोन्ही आवडले
पैजारबुवा,

कंजूस's picture

15 Sep 2024 - 1:02 pm | कंजूस

जसा हा सिंदुरात्मक गणेश लेखकाला पावला तसा सर्वांना पावो.

आणि काही विसरल्यास देवा मला वाचवी.

श्वेता२४'s picture

15 Sep 2024 - 7:56 pm | श्वेता२४

माहितीपूर्ण लेख...

लेख, माहिती आणि फोटो सगळे आवडले. मध्वमुनीश्वर यांच्या रचनांबद्दल नक्की लिहावे. वल्लीने दिलेला शार्दूलविक्रिडितातला फटका पण मस्त. त्यामुळे त्यांच्या आणखी रचनांबद्दल उत्सुकता वाढली आहे. अनेक आभार.

झकासराव's picture

18 Sep 2024 - 4:24 pm | झकासराव

छान लेख.
अशा छोट्या आडबाजूच्या गावातील मंदीर जास्त प्रसिद्ध नसतात. मूर्ती छान आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Sep 2024 - 11:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गलेमा लेखनास प्रतिसाद लिहिणारे मिपाकर वाचकांचे मनापासून आभार.

-दिलीप बिरुटे

टर्मीनेटर's picture

14 Oct 2024 - 12:27 pm | टर्मीनेटर

वाह! सचित्र लेख तर आवडलाच, आणि गलेमाच्या निमित्ताने आपण लिहिते झालात हे पण आवडले 👍
आता दिवाळी अंकातही तुमचा एखादा (मिपा १८+ किंवा राजकीय विषयवरील) लेख वाचायला मिळेल अशी अपेक्षा बाळगतो!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Oct 2024 - 9:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मित्रो, मी लिहीन पण माझा 'राजकीय विषय' तुम्हाला आवडणार नाही. ;)

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

16 Oct 2024 - 10:19 pm | प्रचेतस

तुम्ही चावट लिहा ना मग, ते सर्वांना आवडेल (असे वाटते).

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Oct 2024 - 10:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चावट लेखन जमणार नाही वाटतं. सारखं घसरत जाईल लहान लेकराच्या घसरणा-या चड्डीसारखं. चावटपणा जाऊन नागडं लेखन होईल असे वाटते. चावट म्हणजे कसं गच्च मुसमुसलेलं AI च्या माध्यमातून चित्र काढून जमवू की कसं ? ;)

-दिलीप बिरुटे

कायतरी जमवाच, योग्य वाटलं तर संपादक स्वीकारतीच,.

टर्मीनेटर's picture

17 Oct 2024 - 8:26 am | टर्मीनेटर

पण माझा 'राजकीय विषय' तुम्हाला आवडणार नाही. ;)

आवडेल की नाही ते मायबाप वाचकांवर सोडु, पण तुम्ही लेख लिहाच अशी आग्रहाची विनंती...

तुम्ही चावट लिहा ना मग, ते सर्वांना आवडेल (असे वाटते).

ह्यालाही दणकुन अनुमोदन...

सतिश गावडे's picture

17 Oct 2024 - 8:35 am | सतिश गावडे

खूप वर्षानी तुम्ही लिहिलेला लेख वाचला.

बालपणीच्या आजोळच्या आठवणी आणि गणेश मंदिराची माहिती यांचा छान मेळ घालणारा ओघवता लेख आहे.

गावडे साहेब,
माझी स्मरणशक्ती दगा देत नसेल तर, तीन-चार वर्षांपुर्वीच्या दिवाळी अंकातील लेखानंतर तुमचेही काही लेखन वाचायला मिळालेले नाही...
तुम्ही पण घ्या की राव लिहायचं मनावर!

सतिश गावडे's picture

17 Oct 2024 - 9:49 am | सतिश गावडे

गेली तीन चार वर्षे मी ही काही लिहीले नाही.
परवा कर्नल तपस्वी काकांच्या जून्या लेखासंबंधी प्रतिसादात माझ्या धन्या या दुसऱ्या आयडीचा उल्लेख वाचून मला भरुन आले होते :)

बघू पुन्हा लिहीते होण्याची अंत:स्फूर्ती केव्हा मिळते ते :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Oct 2024 - 9:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सगा पूर्वी प्रतिसाद लेखन चांगले करायचे. पण, दोन हजार चौदापासून त्यांचा लिहिण्याचा मुड गेला
अशी सुत्रांची माहिती आहे. त्यांनी, राजकीय परिस्थिती, देशाचं होणारं वाटोळं याची चिंता करुन नये.
आपलं जे व्हायचं ते होतच असतं.

लिहिते राहावे. ;)

-दिलीप बिरुटे