श्रीगणेश लेखमाला २०२४ - चारोळ्या - रंग मनाचे.. काही गडद, काही फिक्के

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in लेखमाला
11 Sep 2024 - 10:02 am

चारोळ्या - रंग मनाचे.. काही गडद, काही फिक्के

गणपती बाप्पा मोरया.

मिपाकरांना मिपा वर्धापन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. संस्थापकांना नम्र अभिवादन.

1

डिस्क्लेमर - हे मुक्तक आहे. वडाची साल पिंपळाला लावू नये. निरीक्षण, अनुभूती यातून सुचलेले लिखाण आहे. संदर्भ, चूक-बरोबर शोधू नये. जाणकारांकडून आणखी माहिती जाणून घेणे हा उद्देश आहे.

चारोळ्या हे स्फुट लेखन, चार ओळींच्या कवितेला चारोळी म्हणून संबोधले जाते. या काव्यप्रकारात दुसऱ्या व चौथ्या ओळीत अंत्ययमक जुळावे लागते. चारोळीचे कायदे फार सोप्पे. मुक्तछंदी, यमक, लय, नाद, साधे सोपे नेहमीच्या वापरातले अर्थवाही शब्द. मनाला गुदगुल्या तर कधी डोळ्यात अंजन, क्षणात हृदयाला भिडणारा काव्यप्रकार. उगाचच लांबण नाही, जडव्यागळ शब्द नाहीत, वृत्त, छंद, अलंकारिक भाषा इत्यादीचा लोचा नाही. प्रत्येक चारोळी स्वयंपूर्ण, क्षणभरात आपली छाप सोडून जाते.. आर.के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रासारखी.

कमीत कमी शब्द, गंमतीशीर यमके, विडंबन, अतिशयोक्ती, मिस्कीलपणा, थट्टेखोरपणा, मर्मावर बोट ठेवण्याची वृत्ती, दांभिकतेवर प्रहार, द्व्यर्थी शब्दपेरणी हा चारोळ्यांचा आत्मा / लक्षणीय वैशिष्ट्ये होत. केवळ विनोदनिर्मिती हा चारोळ्यांचा उद्देश नसून एक अर्थवाही संदेश देण्याचा प्रयत्न असतो. कदाचित आपण त्याला कोपरखळी म्हणू शकतो.

वात्रटिका, इरोटिका या चारोळीच्या बहिणी म्हणायला हरकत नाही. विषयवस्तूवरून यांचे वर्गीकरण करणे सोप्पे असते. जास्त अभ्यास नाही. (आमची गाडी उतारावर असल्याने वेळ मिळाल्यास अभ्यासेन म्हणतो.) श्री. सदानंद रेगे यांनी हा काव्यप्रकार मराठीत आणला. सर्वश्री पाडगावकर, रामदास फुटाणे, वि.आ. बुवा, फ.मुं. शिंदे, सूर्यकांत डोळस इत्यादींनी जोपासला. वानगीदाखल मंगेश पाडगावकर याची एक रचना -

निराशेच्या पोकळीमध्ये
काहीसुद्धा घडत नाही
आपलं दार बंद म्हणून
कुणाचंच अडत नाही

माझी चारोळ्यांशी ओळख उत्तर हिंदुस्थानातील होळीच्या सणाला झाली. होळीमध्ये 'हंसीमजाक व ठिठोरी' हा भाव प्रकर्षाने जाणवतो. होळीच्या पूर्वसंध्येला हास्य कविसंमेलनाचे आयोजन सणाचे अभिन्न अंग, जरूर बघायला मिळायचे. दूरदर्शनवर हमखास प्रदर्शित व्हायचे. इथेच काका हाथरसी, शैल चतुर्वेदी, हुल्लड मुरादाबादी, सुरेंद्र शर्मा आणि अनेक हिंदी हास्यकवी ऐकायला मिळाले. सुरेंद्र शर्मा यांच्या चारोळ्यांच्या कॅसेटसुद्धा बाजारात उपलब्ध होत्या. हरियाणवी भाषेत, "चार लाईना सुणा रया हूं.. " सुरुवात करायचे. मग पुढे हास्याचा गडगडाट. वानगीदाखल,

पत्नी जी!
मैं छोरा नैं राम बनने की प्रेरणा दे रियो ऊँ
कैसा अच्छो काम कर रियो ऊँ!’
वा बोली — ‘मैं जाणूँ हूँ थैं छोरा नैं
राम क्यूँ बणाणा चाहो हो
अइयां दसरथ बणकै तीन घराळी लाणा चाहो हो!’

चारोळी, मला तुंबलेल्या प्रतिभेचा परिणाम वाटतो. कवीला अचानक एखाद्या विषयावर काहीतरी भयंकर मोठे सुचते. सुचलेला विचार कागदावर खरडताना पहिल्या काही - विशेषत: चार ओळी लयबद्ध, नादबद्ध जुळतात आणि मस्त यमकही जुळते. त्यानंतर पुढे लिहिण्याचा प्रयत्न करत असताना कित्येक 'दिन, महिने, साल गुजरते जायेगें' या अवस्थेत त्या चारोळी सुप्त अवस्थेत पडून राहतात. काही दिवसांनी गुप्त, लुप्त होण्याची संभावना नाकारता येत नाही. दुसरे दुसरेच विचार, विषय डोक्यात आल्याने चारोळीचे भविष्य अंधकारात बुडून जाते. (अर्थातच स्वानुभव). तसे चारोळ्या स्वतंत्रपणेसुद्धा लिहिता येतात.

तुलनात्मकदृष्ट्या चारोळ्या हे 'रखडलेले बांधकाम' असेही म्हणता येईल. चारोळ्या म्हणजे शब्दविटांचे बांधकामच. लिहिणे सोपे आणि अवघडही. उदाहरणार्थ,

'ऊन, पाऊस, छत्री, ती, मी' या शब्दविटा जोडून एक चारोळी पाडायचा प्रयत्न करा बरे.. मी पाडलेली एक चारोळी -

ऊन असो वा पाऊस..
मी छत्री नेहमीच नेतो
ओलेत्या 'ती'ला बघून
बहाण्याने, जवळीक साधतो

एक वय असते, त्या वयात प्रत्येक जण कवी व्हायचा प्रयत्न करत असतो. 'उम्र का तकाजा' बोलो, पण 'आटे दाल का भाव' कळल्याने हवेत उडणारा पतंग लवकरच जमिनीवर येतो. असो. झटपट कवी बनण्यासाठी या काही टिप्स उपयोगी पडतील, आशी आशा करतो. नाही पटल्या, तर द्या खिडकीच्या बाहेर फेकून.

काही चारोळ्या, मी पाडलेल्या....

ओंजळ

जन्मलो जरी इथे वाढलो कुठे कुठे
मन वेडे गुंतले उगा, राहिलो मी जिथे
धाव धाव धावलो न कळे पावलो कुठे
वेचले किती! ओंजळ माझी रिती दिसे

चिनार!

प्रेम आंधळं नसतं,
का बघू चिंचेत चिनार?
खरंच नेशील काश्मीरला,
तरच मी तुझी होणार.....

व्रत

ती आसते उंबरठा, तर तो घराचं छत
ऊन-पाऊस पाठीवर घेत तो राखतो पत
घर बांधून ठेवायचं असावं एकमत
एकमेकांना सांभाळायचं हेच खरं व्रत

काळाची अपूर्वाई

आता होती बाळ, किती गेला काळ,
बाप्पा, काय सांगू काळाची नवलाई
आईची मुलगी आता होणार आई
बघा कशी काळाची ही अपूर्वाई

लहानपण देगा देवा

दुपट्याच्या झाल्या चिंध्या
बाटलीची लागली वाट
इमारत मोठी झाली
म्हणून कपाशी पडली गाठ....

जळवा

सुकले रक्त सारे, धमन्या रिक्त झाल्या
झुंडी मत्कुणांच्या सोडुनी पसार झाल्या
जगणे सुसह्य झाले, जखमा सुकून गेल्या
रक्तपिपासू जळवा जेव्हा गळून गेल्या....

विक्रम-वेताळ

बालपणाचे प्रेत घेऊन
म्हातारपण चालत आहे
इवल्याश्या झुळकेने
पिवळे पान हलत आहे.....

वार्धक्य

वाटलं नव्हतं, वार्धक्य एवढं मस्त असतं
इथं दु:ख महाग आणि सुख स्वस्त असतं
आठवणींच गाठोडं, सोयरसुतक कुणाला
क्षणोक्षणी मात्र ते माझ्याच उरावर बसतं

फाकडा

म्हातारा, म्हातारा म्हणू नये साठीला
कितीतरी अनुभव त्याच्या गाठीला
कणा त्याचा ताठ, वर मिशीचा आकडा
झाला रुपेरी, तरी रुबाब मात्र फाकडा

ववाळणी

धाडली राखीची ववाळणी,
म्हणे, लाडका भाऊ भोळा
नको दावू पासबुक त्याला,
त्याच्यावर दाजींचा ग डोळा

कशासाठी

इन द हार्ट ऑफ द सिटी, सायरन किंचाळत होता
लढत होतं एक हार्ट, एका एका श्वासासाठी
ट्रॅफिकच्या कोलेस्ट्रॉलनं रस्ता ब्लाॅक होता
जीव खाऊन पळत होती पोटं, एका घासासाठी..

होरी

मोहरला अंबा, मोहरला निंब
कोकीळकूजने मने झाली धुंद
कुणा वाट अंब्याची, कुणा ओढ खंब्याची
वसंताळले मन, वाट होळीच्या सणाची....

मान्सून

पाऊलवाट, पावसाची भुरभुर
डोंगरमाथा, गुडघ्यांची कुरकुर
मेघदूत दाटले, हिरवेगार रान
पक्ष्यांची कवने, तृप्त झाले कान.....

लोचा

गंध मछलीचा गेला नसता
कृष्णद्वैपायन जन्मला नसता
विचित्रवीर्य अकाली मेला नसता
अंबिकेला अंधपुत्र झाला नसता,

तर
महाभारताचा लोचा झालाच नसता....

सैनिक

हातात बंदूक, पाठीवर संदूक
पायात जोडा, घरचा ओढा
कोमल तळवे, मनाने हळवे
सीमेवर लक्ष, शैतान भक्ष..

वाचकांचे आगाऊ आभार मानत आवाहन करतो की त्यांना आवडलेल्या, सुचलेल्या चारोळ्या, वात्रटिका प्रतिसाद म्हणून डकवाव्या.

श्रीगणेश लेखमाला

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

11 Sep 2024 - 1:59 pm | कर्नलतपस्वी

'मी भिकारी : संपादका मी काय देऊर
मी कर्जदार :संपादका कसा उतराई होऊर
कृ.बु ने चित्र पेरले आणि म्या पामरास तारे:
तकनिकी मागासवर्गीय मी,चारोळीस चार चांद लावीले.'​

कर्नलतपस्वी's picture

11 Sep 2024 - 2:02 pm | कर्नलतपस्वी

'मी भिकारी : संपादका मी काय देऊर
मी कर्जदार :संपादका कसा उतराई होऊर
कृ.बु ने चित्र पेरले आणि म्या पामरास तारले:
तकनिकी मागासवर्गीय मी,चारोळीस चार चांद लावले.'​

ओर्कुटच्या काळात 'धागा धागा धागा द्या' यामध्ये कमाल चारोळ्या लिहियाचे सगळे, अत्यंत उत्स्फूर्त होतं ते.
चारोळी म्हणजे उत्स्फूर्तपणा!

म्हातारा, म्हातारा म्हणू नये साठीला
कितीतरी अनुभव त्याच्या गाठीला
कणा त्याचा ताठ, वर मिशीचा आकडा
झाला रुपेरी, तरी रुबाब मात्र फाकडा

मस्त!

प्रचेतस's picture

12 Sep 2024 - 8:53 am | प्रचेतस

एकसे एक सरस चारोळ्या.
मजा आली कर्नलसाहेब.

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Sep 2024 - 9:10 am | ज्ञानोबाचे पैजार

महाभारताचा लोच्या झाला
म्हणून गीतेचा लोण्याचा गोळा मिळाला
तसा तात्याला झटका आला
म्हणून मिपाचा झणझणीत रस्सा मिळाला

रस्त्याच्या वळणावर ती दुरूनच दिसली
मला पाहून ती जराशी कावरीबावरी झाली
मी जवळ गेलो तशी ती दूर जाऊ लागली
दुरूनच दगड उचलून ती मला हाड म्हणाली

पाण्याचं पिंप काठोकाठ भरलं होतं
त्यावर एक फुल तरंगत होतं
त्या फुलावर एक फुलपाखरू बसलं होतं
भांडी घासण्याऱ्या अब्दुलच त्या कडे अजिबात लक्ष नव्हतं

एक डास कानाशी गुणगुणताना
घेत होता मालकंसाच्या ताना
मी पण मग मान हलवताना
दाद दिली त्याला हाकलवून देताना

पैजारबुवा,

प्रचेतस's picture

14 Sep 2024 - 11:14 am | प्रचेतस

अरारारा....!!! कहर आहेत

गोरगावलेकर's picture

12 Sep 2024 - 1:55 pm | गोरगावलेकर

चारोळ्या आवडल्या .

चित्रगुप्त's picture

13 Sep 2024 - 5:32 am | चित्रगुप्त

झकास कर्नलसायेब. अनुभवाचे बोल आहेत. पैजारबुवांच्या चारोळ्यापण मस्त.

विजुभाऊ's picture

13 Sep 2024 - 3:29 pm | विजुभाऊ

मिपा हे तात्याचे अपत्य..........

खरेच आपल्यावर त्याचे ऋण आहेत

विवेकपटाईत's picture

13 Sep 2024 - 7:26 pm | विवेकपटाईत

मस्त.

चौथा कोनाडा's picture

13 Sep 2024 - 10:29 pm | चौथा कोनाडा

व्वा कर्नल साहेब, "अभ्यास नाही.. नाही" म्हणत चांगलंच अभ्यासू लिहिलंत की!
झकास काव्य मेजवानी आणि चारोळ्यांची मुशाफिरी झाली !

बालपणाचे प्रेत घेऊन
म्हातारपण चालत आहे
इवल्याश्या झुळकेने
पिवळे पान हलत आहे.....

चटका लावणारी चारोळी
हास्य कवि संमेलन म्हटलं की काका हाथरसी, शैल चतुर्वेदी, हुल्लड मुरादाबादी, सुरेंद्र शर्मा आदि कविंच्या धमाल हास्यकवीता टिव्हीवर पहिल्या होत्या.. शैल चतुर्वेदी यांना तर हिंदी विनोदी सिरियल मध्ये सुद्धा पाहिल्याचे आठवते ! एक्दम धम्माल. . सुरेंद्र शर्मा यांच्या तर आताही यू ट्युब वर ऐकतो :-) मराठीत ही असे काही कार्यक्रम दुद वर व्ह्यायचे, पण तो प्रकार फारसा रुजला नाही !

चारोळ्या तर सगळ्याच मस्त !

ती आसते उंबरठा, तर तो घराचं छत
ऊन-पाऊस पाठीवर घेत तो राखतो पत
घर बांधून ठेवायचं असावं एकमत
एकमेकांना सांभाळायचं हेच खरं व्रत

ही चारोळी वाचताना चंगोची चारोळी आठवली :

घर दोघांचं असतं
दोघांनी सावरायचं
एकाने पसरवलं तर
दुसर्‍याने आवरायचं'

मला वाटतं तो १९९४-९५ चा काळ असावा... त्या पुर्वी चारोळी कधी वाचण्यात आली नव्हती.. पण चंगोचं मी माझा वाचला आणि त्या चारोळ्यांनी झपाटून गेलो.. कित्येक त्या वेळी पाठ झाल्याच आता ही आठवतात ! नंतर मात्र क्वचितच वाचण्यात आल्या , मोजक्या भावल्या !

माझ्या एका विनोदी चारोळीला जबरदस्त हंशा आणि टाळ्या मिळाल्या होत्या .. नंतर बक्षिसही मिळालं होतं

झिजेल म्हणुन बॉलपेन
मी वापरायचं थांबवलं
तर ते माझ्या नकळत
माझ्या मित्रानं लांबवलं

(ओरिजनल चंगो:
झिजेल म्हणून चंदन
मी उगाळायचं थांबवलं
कंटाळून ते म्हणालं
माझं उगीच उरलं आयुष्य लांबवलं)

लैच भारी प्रतिसाद. जाम आवडला.

कर्नलतपस्वी's picture

14 Sep 2024 - 10:47 am | कर्नलतपस्वी

चारोळ्या आवडल्या.

अनन्त्_यात्री's picture

14 Sep 2024 - 2:13 pm | अनन्त्_यात्री

माऊलींच्या प्रतिसादातील चारोळ्या आवडल्या.

स्वराजित's picture

24 Sep 2024 - 5:53 pm | स्वराजित

विक्रम-वेताळ

बालपणाचे प्रेत घेऊन
म्हातारपण चालत आहे
इवल्याश्या झुळकेने
पिवळे पान हलत आहे.....

जबरदस्त
अप्रतिम लिहीले आहे.

सुबोध खरे's picture

24 Sep 2024 - 8:16 pm | सुबोध खरे

अप्रतिम चारोळ्या

कर्नलतपस्वी's picture

24 Sep 2024 - 9:44 pm | कर्नलतपस्वी

आपले प्रतिसाद माझे बक्षिस व माझी प्रेरणा .