नमस्कार खाद्यप्रेमी मिपाकर्स!
तुम्हाला जर चुकून माहित नसलं तर सांगतो, आज जागतिक इडली दिन आहे हं.
दरवर्षी ३० मार्च रोजी जागतिक इडली दिन साजरा केला जातो. २०१५ साली चेन्नईमधील एनियावन नावाच्या एका बल्लवाचार्याने १३२८ प्रकारच्या इडल्या बनवल्या आणि त्याचबरोबर ४३ किलोची एकाच इडली बनवली. तेंव्हापासून इडली दिनाची सुरुवात झाली आणि मग पांढरी, वाफाळती, हलकी, फुसफुशीत अशी असलेल्या इडलीला हा दिवस समर्पित झाला.
तांदूळ आणि उडीदडाळ यांची इडली पचायला हलकी असते. इडलीसोबत शेंगदाणे, दाळवं यांची चटणी ही तेलंगणात लोकप्रिय आहे. आंध्रातही तेच. तामिळनाडूत मात्र इडलीसोबत खोबऱ्याची चटणी हवी. अर्थात सर्वच ठिकाणी इडली-सांबर, इडली-चटणी-सांबर, इडली चटणी-पूडचटणी, इडली रसम... असेही प्रकार पाहायला मिळतात.
पांढरीशुभ्र इडली म्हणजे कोरा कॅनवास आहे असं समजा, त्यावर हवे ते रंग भरता येतात!
इडली हा बहुतेक भारतातील सर्वात लोकप्रिय न्याहारीच्या प्रकार असावा. मला स्वतःलाही इडली हा पदार्थ खूप आवडतो!
अर्थात इडली हा केवळ सकाळीच खाण्याचा पदार्थ आहे असे नाही. आम्ही अनेकदा रात्री इडली खातो. खरंतर आम्ही कोणत्याही वेळी काहीही खातो म्हणून रात्री इडली, डोसा, पोहे, उपमा, शेवया, सुशीला (उग्गानी बज्जी) असे नाना प्रकार आमच्या घरी रात्रीच्या खाण्यासाठीही बनतात.
चला तर मग मिपाकर सुगरणींनो आणि बल्लवाचार्यांनो,
उद्या रविवार आहे. आता लगेच सहा वाजेपर्यंत तीनास एक प्रमाणात तांदूळ आणि उडीदडाळ भिजू घाला. झोपण्याच्या आधी, म्हणजे दहा वाजेपर्यंत मिक्सरमधून सरसरीत फिरवून घ्या आणि त्या पिठावर एक हिरवी मिरची ठेवून झाकून ठेवा. सध्या उन्हाळा आहे, पीठ मस्त आंबेल!
सकाळी उठल्यावर सांबर-चटणीची तयारी करा. आठ-नऊ वाजेपर्यंत, मस्त शेंगदाणे-दाळवांची चटणी, भरपूर फोडी-भाज्या घातलेलं, उकळतं सांबर, पांढरीशुभ्र वाफाळती इडली यांच्या आस्वाद... घेण्याआधी इथे फोटो टाका आणि मगच खायला सुरु करा!
माझ्या घरचे इडलीचे काही फोटु -
इडलीत ताजे मटारदाणे -
इडली सांबर चटणी व अद्रकचटणी -
इडली खाण्याची माझी आवडती प्लेट -
इडली चटणी व शेवग्याच्या शेंगांचे सांबर -
इडलीप्रेमींनो,
आपलं इडलीवरचं प्रेम इथे प्रतिसादरूपात व्यक्त करायला विसरू नका!
#WorldIdliDay2024
प्रतिक्रिया
30 Mar 2024 - 6:16 pm | कंजूस
छान आहेत फोटो.
इडली प्रेमी.
१) दुकानात इडली रवा मिळतो त्यात भिजवून वाटलेली उडीद डाळ घातली की इडल्या हलक्या होतात.
२) मुळगापोडी सुकी चटणी घेऊन त्यावर तिळाचं तेल घातलं की छान चटणी होते.
30 Mar 2024 - 6:40 pm | यश राज
अजुन एक इडली प्रेमी अर्थात मी :)
30 Mar 2024 - 7:02 pm | चौकस२१२
थोडी शिळी झालेली इडली तुकडे करून त्याला ढोकळ्यावर देतो तशी फोडणी द्यायची / मसाला इडली
30 Mar 2024 - 7:53 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
दुसर्या महायुद्धाच्या वेळेस बनवली गेलेली रवा ईडली पण चविष्ट.
2 Aug 2024 - 4:59 am | कंजूस
म्हणजे कांचिपुरम इडली.
यांना गव्हाच्या रव्याचे कौतूक म्हणून रवा इडली. कर्नाटकात या रव्याला ' बॉम्बे रवा' म्हणतात. थोडक्यात सांगायचे तर इडलीच्या रूपातला उपमा. बागलकोटकडचे उप्पीट पातळ चिकट असते.
30 Mar 2024 - 8:11 pm | मुक्त विहारि
इडली, कधीही खातो..
31 Mar 2024 - 9:00 am | निनाद
इडलीप्रेमी मी पण आहे - आणि ईडल्या केल्याच! :)
क्षमस्व! पण माझी माहिती अशी आहे की, २०१५ मध्ये, आठव्या शतकातील तामिळ शिलालेखाचा शोध लागला. या शिलालेखांमध्ये "इडली" आणि "अप्पम" सारख्या पदार्थांचा उल्लेख आहे, ज्यामुळे हे सिद्ध होते की इडली हा आठव्या शतकापासून अस्तित्वात आहे. या शोधाने इडलीच्या इतिहासाबद्दल नवीन माहिती उघड केली आणि "जागतिक इडली दिन" साजरा करण्याची प्रेरणा दिली.
इडलीच्या प्राचिनत्वा विषयी अजून काही ऐकीव माहिती - दावा नाही!
ही कृती आजच्या इडली बनवण्याच्या पद्धतीसारखीच आहे आणि त्यात तांदूळ आणि उडीद डाळ भिजवणे, त्यांचे पीठ बनवणे आणि ते वाफवून तयार करणे समाविष्ट आहे.
थोडक्यात इड्डलिका हा पदार्थ इडलीच आहे. इड्डलिका हे भिजवलेले तांदूळ आणि उडीद डाळीपासून बनवलेले आणि वाफवून तयार केले जात असत.
अर्थातच इडली हा प्राचीन भारतीय पदार्थ आहे यात संशय नाही.
कुणी हे ग्रंथ वाचले असल्यास आणि त्यांतले संदर्भ दिल्यास आभारी असेन.
या शिवाय अजून ऐतिहासिक काही उल्लेख असल्यास मला कल्पना नाही. पण असले पाहिजेत.
इडली हा शब्द कन्नड भाषेतील "इडलीगे" या शब्दापासून आला असावा असा एक कयास आहे. "इडलीगे" या शब्दाचा अर्थ "इडली बनवणे" असा असावा.
31 Mar 2024 - 10:02 am | सौन्दर्य
मला इडली फारच आवडते. मुंबईत कोणत्याही उडिपी रेस्टॉरंटमध्ये कधीही जा, गरमागरम इडली व सांभार मिळणार नाही असे कधीच होणार नाही. आमचे एक मंगलोरीयन शेजारी होते ते एका मोठ्या रगडयावर पीठ वाटायचे व मोठमोठ्या वाट्यात इडल्या बनवायचे व त्यात आंबूसपणा आणण्यासाठी ताडी घालायचे. फारच मस्त लागायच्या त्या इडल्या.
आरोग्याच्या दृष्टीने इडल्या अगदी वरच्या श्रेणीत येऊ शकतात कारण त्यात आरोग्याला अपायकारक कोणताही पदार्थ नसतो.
कॉलेजमध्ये असताना उडिपी रेस्टॉरंटमध्ये मारामारी नावाने इडली-वडा सांभार मिळायचा त्याची चव अजून जिभेवर रेंगाळते आहे. विलेपार्लेच्या रामकृष्ण रेस्टॉरंटमधील इडली म्हणजे अगदी स्वर्गसुख.
अश्या ह्या इडलीची आठवण करून दिल्याबद्दल आभार.
31 Mar 2024 - 10:13 am | कांदा लिंबू
आज सातमजली पडद्यावर Godzilla x Kong: The New Empire बघायला जात आहोत; फारसा वेळ नव्हता म्हणून सांबर करण्याच्या भानगडीत काही आम्ही पडलो नाहीत. कालची उरलेली शेवयाची खीर सोबत खायला घेतली.
31 Mar 2024 - 10:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्या बात है मस्त. इडली आवडते. सर्वांना 'इडली डे'च्या शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
31 Mar 2024 - 11:50 am | प्रचेतस
इडली आवडता प्रकार मात्र सांबार वाटी सेपरेट घ्यायला आवडत नाही. एका खोलगट बाऊलमध्ये इडल्या घेऊन त्या पूर्ण बुडतील असं वाफाळतं सांबार त्यावर ओतून मगच खायला आवडतं.
31 Mar 2024 - 1:25 pm | हणमंतअण्णा शंकर...
बेंगलोर मध्ये हा फरक खूपच मजेशीर केला जातो.
तुम्ही इडली सांबार अशी ऑर्डर दिली की इडल्या आणि सांबार वेगळे मिळतात.
तुम्ही सांबार इडली अशी ऑर्डर दिली की बॉऊल मध्ये इडल्या बुडतील असे सांबार इडल्यांवर ओतून मिळते.
31 Mar 2024 - 1:27 pm | प्रचेतस
भारीय हे, इथं पुण्यात डिप सांगावं लागतं.
31 Mar 2024 - 1:50 pm | तुर्रमखान
एटूबी किंवा तत्सम टिकिट रेस्त्राँमध्ये गेल्यावर याची किंमत एकच असते. त्यामुळे तुम्ही ती रिसिट भटारखान्याच्या काउंटरवर दिली तर तो, 'सांबारा?' आसं विचारतो. 'हो' असं म्हणलं तर बॉउल मध्ये सांबारात इडल्या टाकून देतो. यासाठी बर्याच हॉटेलात वेगळ्या छोट्या इडल्या असतात.
31 Mar 2024 - 1:54 pm | कंजूस
इडली वडे साबार उडपी लोक चांगले बनवत नाहीत. यांची हॉटेल्स मात्र मोक्याच्या जागी टकाटक असतात. .वेटर धावपळ करून पटापट वाढतात.
पण
पण..
..
..
तमिळ लोकांचे हे पदार्थ फारच चांगले असतात. खाल्ल्याशिवाय फरक कळणार नाही.
31 Mar 2024 - 7:06 pm | अहिरावण
वारलो !
31 Jul 2024 - 11:08 am | Bhakti
तोंपासू!
31 Jul 2024 - 11:15 am | Bhakti
तुमच्याकडे मिनी इडली पात्र आहे का?त्यात इडली करून त्यांना फ्राय करून फोडणी द्यायची.पोडीबरोबर छान लागते.
तसेच तट्टे इडली पात्रही मिळते.
31 Jul 2024 - 7:40 pm | मुक्त विहारि
ह्या इडल्या छान लागतात...
1 Aug 2024 - 10:37 pm | सस्नेह
इडलीचे सगळे प्रकार एनीटैम फेवरिट्ट !!
मस्त धाघा आणि तोंपासु फोटो..
4 Aug 2024 - 9:40 am | मारवा
इडली चा आरोग्यदायी लाभ घेण्यासाठी म्हणजे गोड बॅक्टरिया व इतर साठी रेसिपी काय आहे ? तसेच त्यात नेमके काय टाळावे ज्याने सर्वोत्तम लाभ आरोग्यास होतो ?
कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा ?
4 Aug 2024 - 9:43 am | मारवा
चव समजा दुय्यम घटक मानला तर काय केले तर इडली उत्तम आरोग्यदायी होईल ? बाहेर मिळणारी इडली व तिचे कुटके सांगाती वाईट आहेत ?