गो.नी.दांडेकर हे शिवकालीन गडांचेच नाहीतर त्याकाळच्या भोळ्याभाबड्या पण निष्ठावान लोकांचेही अभ्यासक!
असाच शिवाजीमहाराजांनी इनाम दिलेली तुंगी गडाची हवालदारकी आणि पवनाकाठची दहा एकर जमीन यांचा वारस धोंडी ढमाले!
गोनीदां आपल्याला कोंडीच्या शेतातच नेतात.अगदी जसे भूमितीचा अभ्यास करून सरळ योग्य अंतरावरच्या शेतातल्या पिकांच्या रांगा, जमीनही अशी कसली की एक ढेकूळ उगा दिसत नाही अगदी सगळी माती एकसारखी!धोंडी तिला काळी आई -माय म्हणायचा.शिवकाल गेला, पवनानगरपासून लोणावळा पर्यंत लोकल सुरू झाली.पण धोंडी मात्र अजून हवालदार या उपाधीचा मान ठेवून होता.खळ्यात मोत्यासारखे धान्य झाल की तो पार लोणावळापर्यंत बलूत देऊन यायचा.गावातल्या अडचणीला सगळ्यांसाठी धावून जायचा.सारा गाव त्याला देवमाणूस म्हणायचा.धोंडीला आपल्या पूर्वजांचा मानमरातब जीवनापेक्षा प्रिय होता.हवालदार घराण्याला साजेशीस अशी त्याची कारभारीन सारजा होती गृहलक्ष्मी,अन्नपूर्णा सारे रूप तिच्यात साठलेले.पण आईपणाच्या दानाला मुकलेली.तरीही याची खंत न बाळगता ती धाकट्या दीरासाठी कोंडीसाठी यशोदेचे रूप घेत रमली.पण नवरा धोंडी अगदी मानी,कष्टाळू तर धाकला कोंडी अजून बाळबोध बुद्धीतून मोठा न झालेला.या गमतीशीर कात्रीत ती अनेकदा अडकत.
कोंडीने भावाच्या विरोधात जात अनेक उचापती केल्या.कुस्तीसाठी खुराक, दुधासाठी स्पेशल म्हैस वहिनीच्या मार्फत सारं दादाकडून पुरवून घेतलं.पण कुस्ती हारला धोंडीने विजयी किशाला उचलून घेतलं...हवालदाराला निरपेक्ष साजेसा वागला.पण कोंडी रूसून कुठंतरी जाऊन बसला ,धोंडी त्याला शोधतोय. पण तो सापडेना , हवालदार कुळाचा एकूलता एक वारीस काहीबाही स्वतः बरोबर केलं नसेल ना?,ना ना शंका धोंडीच्या मनात आल्या.शेवटी रात्री कोंडी घरी आला पण काही अपरित त्याच्या मनाने ठरवले.दुधाचा धंदा करायचा...लोकलने इतर लोकांप्रमाणे सकाळी लोणावळ्याला दूध विकायचे आणि परत लोकलने मागे फिरायचे.पण धोंडी कडाडला हवालदार आता गवळ्याचा धंदा करत कावड उचलणार?धोंडीला हे कधीच आवडले नाही.पण सारजाच्या हट्टाने आणि भावाच्या प्रेमापायी कोंडीला म्हशी घेऊन दिल्या..."पण तुझा तो पाण्यात दूध टाकून विकायाचा पापाचा पैका मला,माझ्या घरासाठी कधी वापरू नको"अशी ताकीद दिली.
धोंडी आपला शेतात कष्ट करीत राहिला.कोंडीच्या खांद्यावर दहा एकर देत तीर्थाला जाण्याची त्याची इच्छा अपूरीच राहणार, हे वाटलं.तिकडे कोंडी पण सिगारेट, खाण्यापिण्याची ऐश, नाचगाणी,वाईट मित्र यांच्या नादाला लागत होता.धोंडीला मेल्याहून मेल्यासारखे होई .पण घराण्याची पुण्याई थोर म्हणून 'सरू' सारखी शिकलेली,सालस बायको कोंडीला मागणी घालून आली असं धोंडीला वाटलं आणि आनंद झाला.धुमधड्याकात कोंडीच लग्न लावून दिलं.सारं घर तीन दिवस बत्तीच्या रोषणाईने उजाळत होता.हुस्सैनच्या म्हातारीने ताकीदच दिली होती.धोंडी सज्जन न चुकता बलूत आणून देतो.त्याच्या घरात आपल्याकडून झगमगाट व्हायलाच पाहिजे.
नव्या सुनेच्या रूपात तर धोंडीला आपली आजीच परत आली आहे असं वाटायचे."काय आज्जे नातवाने शेत चांगलं राखलं ना?" तो सरूला आनंदाने विचारायचा.गडाविषयी,पवनामाय, शेतीविषयी बोलायला लागला की धोंडीच्या राठ डोंगरातून अमृत वर्षाव होतोय असं वाटायचं,ऐकतच राहत बसावें वाटायचे.
"सरूताई ,हे शेत आता तुम्ही घेतला म्हणा, आणि आमाला मोकळं करा"
सरूला समजेना ,पण धोंडीदादा म्हणतो म्हणून तिने तसंच म्हटलं.
धोंडीला सारजाला कृतार्थ वाटलं.पण काळ्या ढगांची अचानक कळा हवालदार कुटुंबावर आली.सारजा तापाचं कारण होऊन जग सोडून गेली.सर्वात मोठा धक्का वहिनीच्या लाडक्या कोंडीला बसला.त्याने डॉक्टर आणला पण धोंडीने दूधाचा पापाचा पैसा नको करत ते उपचार होऊ दिले नाही.हाच राग धरत आणि दादा परत म्हशीसाठी पैसे देईना.तेव्हा मित्रांच्या सांगण्यावरून कोंडीने चक्क भावावर अंधारात भ्याड हल्ला केला .धोंडीला तर आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी अवस्था झाली.सरूला समजलं काय करावे कोणालाच समजना पण धोंडीने ठरवलं आणि सारं दहा एकर प्रेमाने कोंडीच्या नावावर केलं आणि स्वतः कर्ज घेत म्हशीही घेऊन दिल्या.
सारं सरळ होईल वाटत असतांनाच पवनामाय रागावली,पावसाने पाठ फिरवली,जनावर फिसकीने मेली.आता शेत नांगरायचं कसं?धोंडी सगळा दिवस एकटाच कुदळीने शेत नांगरत राहिला.पण आता कोंडीला दादाचे हाल पाहवेना.त्याने इर्जिक (सगळ्या गावच्या बैलांच्या मदतीने नांगरणी) आणायची ठरवली.
धोंडी कडाडला,"ज्या शेतात शिवाजी महाराजांचे ऋण आहे तिथे इर्जिकी लावणार, हवालदार घराण्यात असं कंदी झालं नाय,माज रगत काळ्या आईत सांडेन पण इर्जिकी शेतात नाय होणार."
दुसऱ्या दिवशी धोंडी एकटाच म्हातार्या बैलाला एकीकडे आणि स्वतःला दुसऱ्या बाजूला जुंपत नांगरणी करीत राहिला.
'तुंगी गडाचा हवालदार कष्टाने मानाने मातीत मिळाला पण इर्जिकी आणायच्या आधी आपल्या वाटचं काम करीत तिच्यात विलीन झाला '
अनेकदा स्त्री पात्राची सर्व संपन्न रेखाटनी लेखक उभी करतात.पण गोनीदांनी एक रांगड पण तरीही भाबड्या प्रेमाने ओतप्रोत एक पुरुष पात्र लीलया धोंडीच्या रूपाने उभे केले आहे.
आजही तुंगी गड मानाने पवनेकाठी धोंडीच्या निष्ठावानाची साक्ष देत उभा आहे.
या कथेवर आधारित मराठी सिनेमाही आला होता पण तो काही आता कुठे उपलब्ध दिसत नाही.पण गाणी उपलब्ध आहे, खुद्द दीदींच्या आवाजातला "पावनेर मायेला करू" आणि एक प्रसिद्ध गीत उषाताईंच्या आवाजातले आहे-"काय बाई सांगू कसं ग सांगू?'" #&128512;
तसेच संपूर्ण ओडिओ पुस्तक तूनळीवर उपलू आहे- https://youtu.be/vCz10U5SX3g?si=Eb_YZGXLsNhQHHja
-भक्ती
प्रतिक्रिया
14 Jul 2024 - 6:38 am | खेडूत
आवडले.
खूप वर्षांपूर्वी वाचल्यामुळे काहीं प्रसंग विसरले होते. उजळणी झाली, आता परत वाचायला हवं.
16 Jul 2024 - 12:50 pm | भागो
भक्ती ताई.
ह्या परीच्या बद्दल अनेक धन्यवाद. शाळा कॉलेजच्या झोपी गेलेल्या मराठी साहित्य विश्वाच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा जे हाती पडेल ते वाचत सुटलो होतो. आणि आता...
प्लीज अशीच पुस्तके निवडा आणि रसग्रहण करा.
14 Jul 2024 - 8:48 am | Bhakti
धन्यवाद खेडूत!
इतरत्र ह्या पुस्तकाच्या परिचयावर मिळालेली रोमांचित माहिती.
14 Jul 2024 - 9:47 am | कर्नलतपस्वी
होय, सिद्धेश्वर टाॅकिज मधे लागला होता. मी पण तेव्हांच पाहिला.
आमच्या गावातील श्री हरकशेठ कासवा हे चित्रपटगृहाचे मालक,मुलांसाठी ऐतिहासिक, सामाजिक, देशभक्ती अशा विविध विषयांवर चित्रपट परिक्षा झाल्यावर लावायचे व पंचवीस पैसे फक्त तिकीट ठेवायचे.
आमच्या गावात एक समृद्ध वाचनालय आहे. त्यामुळे लहानपणापासून वाचनाची गोडी लागली.
14 Jul 2024 - 12:15 pm | Bhakti
राजगुरुनगर (खेड) समृद्धच वाटतं आहे.परवा सुट्टी आहे जावा काय फिरायला तिकडे ;)
14 Jul 2024 - 9:34 am | धर्मराजमुटके
ही सगळी पुस्तके मराठी माणसाने वयाच्या २०-३० वर्षात वाचली पाहीजे तुम्हाला अंमळ उशीरच झाला म्हणायचा किंवा तुम्ही खरोखरीच त्या वयाचे असाल.
माझ्या आवडत्या लेखकांत गोनिदांचा क्रमांक सगळ्यात वर आहे. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.
बाकी अजूनही कोणी इतक्या प्राचिन लेखकांची अर्वाचीन पुस्तके वाचत आहेत हे पाहून मन सुखावले.
14 Jul 2024 - 12:13 pm | Bhakti
बरोबर मी तिशीतली आहे, आणि
गोनीदां प्राचीन लेखक? नाही ओ जोपर्यंत हे दुर्ग ,गड आहेत तो पर्यंत ते नित्य नवे प्रत्येक दुर्गप्रेमीला त्याचेच सवंगडी वाटणार 😀
14 Jul 2024 - 9:56 am | कर्नलतपस्वी
गोनिदा,मिरासदार,शंकर पाटील, आण्णाभाऊ साठे श्री ना पेंडसे ,व्यंकटेश माडगूळकर,जि ए आणी असे अनेक उत्तम लेखकांचे साहीत्य लहानपणी वाचले पण आता पुन्हा वाचतोय कारण त्यातली अवीट गोडी आजही तशीच आहे.
फकिरा,गारंबिचा बापू,शितू,पडघवली गावाकडच्या गोष्टी ,काजळमाया..... आणी इतर मुद्दाम उपलब्ध करून मागील एक वर्षात वाचली आहेत.
14 Jul 2024 - 7:09 pm | पाषाणभेद
छान लिहीले आहे.
पण शिर्षकातले ऐसी अक्षरे चा संदर्भ काढून टाकायला हवा होता.
मला सर्व वेबसाईट सारख्याच आत्मियतेच्या आहेत, पण हे असले शिर्षक द्यायला नको होते.
@संपादक: या लेखाचे शिर्षक संपादित करावे.
14 Jul 2024 - 9:25 pm | Bhakti
धन्यवाद पाभे! पण..
ऐसी अक्षरे ....मेळवीन ही पूर्ण ओळ वापरत असे . नंतर मेळवीन शब्द मलाच जड वाटू लागला म्हणून काढला.
ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे ही,अशी रसाळ अक्षरे(पुस्तके) मराठीत आहे ज्यांचा मला आनंद घ्यावयाचा आहे _/\_
इतर संपादन करण्यासारखे काही संबंध नाही (काहीतरीच ;))इतकही सोमिवर संबंध लावत बसू नये,#दिलबडाहोनाचाहिए 😀
15 Jul 2024 - 8:48 am | प्रचेतस
गोनीदांसारखा लेखक होणे नाही.
त्यांची अजून काही पुस्तके सुचवेन.
लक्ष्मीसेतू/गडदेचा बहिरी (सध्या कुठेच मिळत नाही)
तांबडफुटी (सध्या कुठेच मिळत नाही)
कादंबरीमय शिवकाल
माचीवरला बुधा
जैत रे जैत
वाघरु/त्या तिथे रूखातळी
आनंदवनभुवनी
जवळपास त्यांची सर्व पुस्तके संग्रही आहेतच.
15 Jul 2024 - 8:59 am | भागो
कुणा एकाची भ्रमणगाथा.(?).
15 Jul 2024 - 9:20 am | प्रचेतस
ते तर आहेच, मी जनरली त्यांची फारशी वाचली जात नाहीत अशी पुस्तके दिलीत. अन्यथा त्यांची सर्वच पुस्तके वाचनीय आहेत.
शितू, पडघवली, स्मरणगाथा, दुर्गभ्रमणगाथा, किल्ले, दहा दुर्ग दहा दिवस, आम्ही भगीरथाचे पुत्र, मृण्मयी, मोगरा फुलला, दास डोंगरी राहतो, तुका आकाशाएव्हढा.
16 Jul 2024 - 12:05 pm | भागो
मी शाळेत "हद्दपार" नावाची कथा वाचली होती. त्याचे लेखक कोण? कुणाला माहित आहे का? माझ्या मते श्री ना पेंडसे हे जबरदस्त ताकदीचे लेखक होते. उदा. आई आहे शेतात.
16 Jul 2024 - 12:10 pm | प्रचेतस
'हद्दपार' देखील श्री. ना. पेंडसेंचीच. दुर्गेश्वर बुरोंडीच्या राजेमास्तरांची ही कथा. ह्या कादंबरीतले दापोलीचे गॅडनीचे चर्च अजूनही तेथे भग्नावस्थेत आहे.
पेंडश्यांच्या टॉप फाईव्ह मधे हद्दपार, तुंबाडचे खोत, लव्हाळी, हत्या, गारंबीचा बापू ह्यांचा समावेश व्हावा. बरेचजण रथचक्रला पेंडश्यांची सर्वोत्तम मानतात पण मला मात्र ती विशेष आवडली नाही.
16 Jul 2024 - 12:14 pm | भागो
श्री.ना. पेंडसे यांनी ‘खडकावरील हिरवळ’ (1941) हे व्यक्तिचित्रण, तर ‘एल्गार’ (1949), ‘हद्दपार’ (1950), ‘गारंबीचा बापू’ (1952), ‘हत्या’ (1954), ‘यशोदा’ (1957), ‘कलंदर’ (1959), ‘रथचक्र’ (1962), ‘लव्हाळी’ (1966), ‘ऑक्टोपस’ (1973), ‘आकांत’ (1981), ‘तुंबाडचे खोत’ (1987), ‘गारंबीची राधा’ (1993), ‘कामेरू’ (1998), ‘आभाळाची हाक’ (2007) या कादंबऱ्या लिहिल्या.
माफी आई आहे शेतात ही र वा दिघे ह्यांची आहे,
16 Jul 2024 - 12:17 pm | प्रचेतस
एक होती आजी ही अजून एक कादंबरी आणि जुम्मन हा कथासंग्रह राहिला.
16 Jul 2024 - 12:19 pm | प्रचेतस
मात्र तुंबाडचे खोत ह्या त्यांच्या सर्वश्रेष्ठ महाकादंबरीनंतर त्यांचा आलेख खालावत गेला. राधा, कामेरु नंतर तर एक होती आजी, आभाळाची हाक खूप साधारण वाटल्या.
15 Jul 2024 - 11:50 am | Bhakti
नशीबवान आहात _/\_
खरोखरच महाराष्ट्राचे भूषण गो नी दांडेकर यांची साहित्य संपदा हिरीरीने नव्या पिढीपर्यंत नेत राहयला हवी.
16 Jul 2024 - 10:38 am | टर्मीनेटर
गोनीदा चांगले लेखक होते ह्यात दुमत नाही, पण त्यांचे लेखन मलातरी 'कालातीत' वाटले नसल्याने असेल कदाचीत पण आपण दिलेल्या यादीतली बहुतेक सर्व आणि बाकिचीही पुस्तके वाचली असली तरी त्यांचे एक 'पडघवली' वगळता अन्य कुठल्याही पुस्तकाचे कथानक अजिबात आठवत नाही. एका ठरवीक वयात त्यांच्या पुस्तकांनी निश्चीतच वाचनानंद मिळवुन दिला हे मात्र नक्की!
16 Jul 2024 - 11:30 am | गवि
"पडघवली"वर आधारित एक टीव्ही सीरियल फार फार पूर्वी दूरदर्शन वर आलीं होती असे स्मरते. रथचक्र नाव होते की काय.. लालन सारंग त्यात होत्या असे वाटते. चुभुदेघे.
तेरा एपिसोड किंवा मर्यादित एपिसोड असणाऱ्या साप्ताहिक सिरियलांचे ते दिवस. पुढील एपिसोडसाठी एक आठवडा वाट बघणे. पेशंस आपोआप डेव्हलप होत असे. धीर निघण्याची सवय फार उपयुक्त असते ती आता लागणे अवघड. रोजच्या रोज एपिसोड आणि हवे तर रात्रभर जागून सर्व एकत्र बघून आख्खा सिझन संपवण्याची देखील सोय.
बरे वाईट असे काही नाही. खूप बदल होत असतात हे खरे.
16 Jul 2024 - 11:35 am | प्रचेतस
रथचक्र श्री. ना. पेंडसेंची.
16 Jul 2024 - 11:58 am | भागो
बरोबर.
मी ती नको त्या वयात वाचली.
राधाबाई आठवते.
16 Jul 2024 - 12:04 pm | प्रचेतस
रथचक्र- कृष्णाबाई.
राधा ही गारंबीच्या बापूची.
16 Jul 2024 - 12:20 pm | गवि
मग पडघवली या नावानेच होती का सीरिज? होती इतके नक्की. आता खूप काळ लोटला. ऐंशीच्या दशकात.
16 Jul 2024 - 12:24 pm | प्रचेतस
हो, ती गोनीदांच्याच कादंबरीवर आधारीत होती. रथचक्रवर देखील मराठी मालिका आली होती. आणि बापूवर तर काशिनाथ घाणेकर अभिनित चित्रपटच आला होता.
16 Jul 2024 - 12:59 pm | गवि
आम्ही तेव्हा प्रॉपर कोंकणातच राहत असल्याने अशा सीरियल्स आपल्या आसपास घडणाऱ्या घटना असाव्यात असेच वाटत असे.
16 Jul 2024 - 12:31 pm | टर्मीनेटर
मला पडघवली कादंबरी लक्षात राहण्यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे गोनीदांची हि एकमेव कादंबरी मी दोनवेळा वाचली आहे आणि दुसरे कारण असे कि खूप लहान असताना, म्हणजे अर्धी चड्डीचं काय कुठलीच चड्डी न घालण्याच्या वयापासून 'स्ट्रेचलॉन'च्या चड्ड्या घालण्याच्या वयापर्यंत आजोळी जायचो तेव्हा मामाच्या जुन्या मोठ्या घराच्या पडवीत एक 'पडगुलीची आजी' मुक्कामाला होती.
जुन्या काळच्या अनिष्ट रीती-परंपरांची बळी ठरल्याने केशवपन केलेली, तांबडे लुगडे नसणारी ही बालविधवा 'आजी' खरंतर आईच्या आईची म्हणजे माझ्या आजीची 'मावशी आजी' म्हणजे माझी खापर पणजी होती. पण घरातले लहान-मोठे सगळेच तिला 'पडगुलीची आजी' असेच म्हणत. मूळ-बाळ नव्हतेच आणि सासरच्या मंडळींचा अजिबात आधार नसलेल्या आपल्या मावशी आजीचा माझ्या आजी, आजोबा आणि मामाने तीच्या अखेरच्या श्वासापर्यंत प्रेमाने सांभाळ केला होता. थोडे मोठे झाल्यावर कळले कि ही खापरपणजी 'पडघवलीची' सासुरवाशीण होती आणि त्या गावाच्या नावाचा (कोकणी माणसांच्या जन्मजात सवयीला अनुसरून 😀) बोलीभाषेत अपभ्रंश झाल्याने तिला सगळेजण 'पडगुलीची' आजी म्हणत!
+१०००
बिंज वॉचींग करुन वेब सिरिजचा अख्खा सिझन बघण्याची मजा काही औरच... पण त्यातही पुढच्या सिझनची फार वाट पहायला लागली तर मजा जाते! त्यामुळे चित्रपट पहाण्याला मी प्राधान्य देतो. पण त्यातही 'कटप्पाने बाहुबलीको क्यु मारा?' ह्याचे उत्तर मिळायला उत्तरार्धाची वाट पहायला लागलेला काळही फार कंटाळवाणा वाटला होता. त्याबाबतीत अनुराग कश्यपला पैकीच्या पैकी मार्क्स द्यावेसे वाटतात. गँग्स ऑफ वासेपुरचा दुसरा भाग त्याने केवळ पंधरा की वीस दिवसात प्रदर्शित केल्याने मजा आली होती,
15 Jul 2024 - 10:12 am | सौंदाळा
खूप वर्षांपूर्वी वाचले होते. वाचताना कित्येकदा डोळयातून पाणी आले. धोंडीचे राकट, रांगडा, हळवा, कुटुंबवत्सल असे सर्वच स्वभाव गोनीदांनी प्रचंड ताकदीने दाखवले आहेत.
पुस्तक ओळख मस्तच पण खरच सांगतो हे पुस्तक परत वाचणे भावनिकदृष्ट्या शक्य नाही मला तरी.
15 Jul 2024 - 11:51 am | Bhakti
धन्यवाद!
15 Jul 2024 - 9:33 pm | श्वेता२४
कसे काय कुणास ठाऊक पण हे पुस्तक मात्र वाचायचे राहून गेले .आता वेळ काढून नक्की वाचणे आले. तुम्ही लिहिलंच आहेत का सुंदर की खरंच ते पुस्तकच वाचले आहे की काय असं वाटत होतं खूप छान पुस्तक परिचय
15 Jul 2024 - 10:16 pm | भागो
ताई, तुम्ही स्वतःचा यू ट्यूब चानेल सुरु करा. म्हणजे बाहेरच्या वाचकांचाही फायदा होईल.
16 Jul 2024 - 7:45 am | सुजित जाधव
खूपच छान परिचय भक्ती ताई..!
यावर्षीच्या जानेवारी महिन्यात मी गो. नी. दांडेकर यांचं माचीवरला बुधा हे पाहिलं पुस्तक वाचलं. त्यानंतर मी त्यांच्या आणखी पुस्तकांचा शोध घ्यायला सुरुवात केली.. तेव्हापासून शितू आणि पवनाकडचा धोंडी ही दोन पुस्तकं माझ्या बकेट लिस्ट मध्ये आहेत. तुमच्या लेखामुळे ती वाचायची उत्सुकता आणखीनच वाढलीये.. लवकरच वाचेन..
16 Jul 2024 - 10:27 am | टर्मीनेटर
पुस्तक परिचय आवडला 👍
17 Jul 2024 - 8:40 pm | किल्लेदार
'दुर्गभ्रमण गाथा' हे सगळ्यात आवडते पुस्तक. गोनीदांची 'दुर्गभ्रमण गाथा' आणि 'दुर्गदर्शन' ही दोनच पुस्तकं वाचलीत. बाकीच्या कथा असल्यामुळे वाचल्या नाहीत.
प्रस्तावनाच काय सुंदर लिहिली आहे.
"किल्ले पाहणे हा एक निदिध्यासाचा विषय झाला आहे. आयुष्यभर सर्वाधिक प्रेम जर कोणावर केलं असेल, तर ते किल्ल्यांवर. सगळा जन्म तो छंद प्राणपणानं जोपासला आहे.
कधी कुण्या किल्ल्याच्या तटाखालून चालतो आहे. कधी त्याचा उत्तुंग कडा चढतो आहे. कधी त्या मध्ये कोरलेल्या बहुता काळीच्या खोबणी मध्ये बोटं चिटकवून त्या बळावर कुडी वर ओढतो आहे. कुठं कुणा किल्ल्याच्या माथ्यावरून आसुदान रंगलेला भंवताल शोधतो आहे. कुठं कंबर कंबर, छाती छाती गवतांत पावलं खुपशीत कुण्या किल्ल्याच्या तटावरून हिंडतो आहे. कधी कुण्या बुरूजातल्या चोर वाटेनं कसा बसा तोल सांभाळीत खाली उतरतो आहे. कधी दोन प्रचंड गिरीदुर्गांमधील मैलच्या मैल अंतर कडाडत्या उन्हात चालून जातो आहे. कुठं एखादा बेलाग कड्यावरला तट तळातूनच न्याहाळतो आहे. तर कधी तळातल्या कुण्या कपारीतून ठिपकणारं थेंब थेंब पाणी ओंजळीत भरून तहान शमवतो आहे. कुठं कुण्या गडातळीच्या खनाळात कुणी कधी काळी मांडलेल्या तीन धोंड्यांवर खिचडी शिजवतो आहे. कधी कुण्या किल्ल्यावर जात असता कुण्या दरीचे चढ उतार भटकतो आहे. कधी कुण्या खोगळीत शांतपणे झोपी जातो आहे. कुठं कुण्या किल्ल्याच्या पठारावर चांदिण्या रात्री उलथा झोपून माथ्यावरलं नक्षत्रभरलं आकाश दुर्बिणीतून न्याहाळतो आहे. कधी कुण्या चोर दिंडीनं तटात प्रवेशतो आहे. कधी कुण्या खंदकातून आश्चर्यमाखल्या मुद्रेनं चालतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावरील सदरेवर घडलेले ऐतिहासीक प्रसंग स्मरून तिथं मुजरा घालतो आहे. कधी कुण्या गडावरल्या अंबरखान्याच्या भवताली कायबाय हुडकतो आहे. कुठं शेजारच्या कुण्या अलंगेच्या सावलीत बसून कपाळावर साकळलेला घाम पुसतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावर पोचणार्या भुयारातं गुढग्यांवर रांगत तसूं तसूं पुढं सरतो आहे. कधी कुण्या प्रचंड महाद्वाराच्या भव्यतेनं चेपून जातो आहे. कुठं शेजारचा प्रचंड बुरूज निरखून दाद देतो आहे. कुठं कुण्या तटाच्या जंगीतून तळातलां टप्पा ध्यानी घेतो आहे. कधी कुण्या जळभरल्या टाक्यांत डोकावतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावरल्या तळ्यातल्या चिंब थंड पाण्यांत पोहोतो आहे. कुठं कुण्या गडाभंवतालीच्या मेटांचा तलाश करतो आहे
कधी कुण्या किल्ल्याभंवतालीचे पाहारे हुडकून काढीत ते नकाशावर नोंदतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावर अजून जीव धरून उभ्या असलेल्या देवळांत शिवमहिम्नाचा पाठ करतो आहे. कधी कुण्या किल्ल्यावरचे बेभान वारे अनुभवतो आहे. कुठं कोणी एक किल्ला चढून जात असतां वरून कोसळणार्या धुवांधार पावसांत काकडतो आहे. कधी धडधडत्या थंडीत एखाद्या बालेकिल्ल्याभंवतालींच्या गच्च धुकटांत हरवून जातो आहे. कुठं कुण्या गडातळीच्या एखाद्या वीरगळासमोर नम्र होतो आहे. कधी दो किल्ल्यांमधले तुडुंबले खळाळत्या जळाचे ओढे ओलांडतो आहे. कधी वाघरासारखा पालथा पडून कुण्या गडावरल्या झरप्यांतलं पाणी पितो आहे. कुठं कुण्या तटाच्या सांवलीत पाठीवरल्या पिशवींतला तहान लाडू - भूक लाडू खातो आहे. कधी कुण्या किल्ल्यांवर मैतरांसवे भटकतो आहे. कितीकदा एकूटवाणा रात्री बेरात्री कुण्या गडाच्या तटा बुरूजांवरून सैराट हिंडतो आहे.
कधी आनंदानं थिरकलो, कधी प्रमादाच्या पुराबरोबर वाहात गेलो. कधी मनं स्थिरावलं कधी गढूळलं -
मीही कुणी ऋषि मुनि नव्हे, प्रमादशील मानव आहे.
ते असो -
पाचं तपं उलटून गेली, असा किल्ल्या गडांचा वेध घेत त्यांच्या वाटा तुडवतो आहे. या दुर्लक्षित आयुष्यापैकी जवळ जवळ तिसरा भाग गड किल्ले भटकतां त्यांचं चिंतन करता, त्यांवर जायचे बेत आंखतां, त्या साठी झुरता व्यतीत झाला.
आयुष्याच्या या सायंकाळी क्षण स्वस्थ बसून ती स्मरणं आठवीन म्हणतो."
19 Jul 2024 - 1:05 pm | मुक्त विहारि
धन्यवाद....
19 Jul 2024 - 1:46 pm | Bhakti
सर्वांना खूप खूप धन्यवाद _/\_