A Midsummer Night's Dream.

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
26 May 2024 - 1:20 am

A Midsummer Night's Dream
संध्याकाळचे पाच वाजले कि माझी पाउलं शेट्टीच्या हॉटेलकडे वळतात. शेट्टीच्या हॉटेलमध्ये माझे एक खास टेबल आहे. शेट्टीला हे माहित आहे. मी येईपर्यंत तो त्या टेबलावर रिझर्वडची पट्टी लावून ठेवतो. त्या टेबलावरून मला रस्त्यावरची रहदारी पहायला आवडते. तसेच हॉटेलात बसलेल्या काही लोकांचेही दर्शन होते. त्यांना पाहून विचारांची गाडी स्वैर धावू लागते. किती शिकला असेल, कुठे नोकरी करत असेल, आपल्या आयुष्यात हा सुखी समाधानी असेल का?
ह्या विचारांना काही अंत नाही.
त्या दिवशी आकाशात ढग आले होते. पाउस पडण्याची लक्षणे होती. त्यामुळे हॉटेलात गर्दी नव्हती. माझ्या पलीकडच्या टेबलापाशी एक पंचेचाळीस पन्नास वर्षांचा इसम लॅपटॉप खोलून बघत होता. दीज पीपल! जेथे जातो तेथे आपल्या लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसलेले असतात. लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसलेल्या लोकांबद्दल मला प्रचंड आदर आहे. अशा लोकाना मी निवडून खड्यासारखे माझ्या विचारांच्या मर्यादेबाहेर ठेवतो,
इतक्यात तो आला. रॉयल एन्फील्डच्या इंजिनचा आवाज वेगळा असतो. त्याने गाडी पार्क केली आणि तो हॉटेल मध्ये आला. चाल भरदार आणि दमदार. वर्ण गोरा, नजर तीक्ष्ण. शरीरयष्टी कमावलेली. तरीपण किंचित, अगदी किंचितशी नाजूकतेची झाक.
हा हीरो थोडा विवंचनेत दिसत आहे. माझं विचारसत्र सुरु झाले. काय असावा ह्याचा प्रॉब्लेम?
वेटर एक चक्कर टाकून गेला. मेन्यू कार्ड समोर ठेऊन उभा राहिला.
“थोडं थांब.”
वेटर समजला. “बहुत अच्छा.”
एक लक्षात घ्या. ते काय बोलत आहेत ते मला ऐकू येत नव्हते. मी आपले एकूण त्यांच्या हावभावा वरून देहबोलीवरून, चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशंस वरून, लिप रीडिंग करून हे संवाद लिहिले आहेत.
तुम्ही चार्ली चाप्लीन, जाड्या रड्या ह्यांचे मूकअभिनय बघितले असतीलच. कधी तुम्हाला सलीम जावेदची आठवण झाली?
सिनेमा म्हणजे डायलॉगबाजी नव्हे. कल्पना करा. ऑफिसमध्ये मर मर काम करून नवरा जेवणाच्या वेळेपर्यंत कसाबसा घरी पोहोचला आहे, ऐका त्याचा हा डायलॉग.
“ऐ गुलबदन, लाल छडी, किचनमे खडी, मेरे दिलकी राणी. भगवती प्राणेश्वरी चल वाढ. जळकी पोळी, अर्धाकच्चा भात, पातळ वरण, गोSSSड तिखट जे काय केले आहेस ते वाढ. बडी जोरकी भूक लगी है.”
ह्यावर बायको पण एक सज्जड डायलॉग देते आणि पतीचा जो उद्धार करते. तो ऐकून मेलेले डुक्कर पण म्हणेल, “शिव शिव, हेच ऐकायचं राहीलं होतं. ह्याच साठी मी मेलो होतो का?”
चला बॅक टू हॉटेल अँड अवर स्टोरी.
अखेर ती पण आली. सडपातळ, गोरी, नाकेली. फिकट आकाशी रंगाचा ड्रेस. चेहऱ्यावर दुःखाची किंचित छटा. अगदी निरखून बघणाऱ्याला दिसेलशी. पर्स बाजूला ठेवून ती त्याच्या समोर बसली.
“काय घेणार? चहा घेशील?”
ती मानेनच नकार देते.
“अगं, आलीच आहेस तर काहीतरी घे. कॉफी घेशील?”
तिचे हो किंवा नाही काहीही नाही. हाच होकार समजून त्याने ऑर्डर दिली.
“दोन कॉफी,”
“हॉट कि कोल्ड?”
“हॉट. हॉट.” कोल्ड कशाला? माझ्या नशिबाची कोल्ड कॉफी तर समोर बसली आहे.
हे त्याचे स्वगत होते पण मला स्वच्छ ऐकू आले.
त्याने कर्दळीच्या पानात बांधलेला मोगऱ्याचा गजरा समोर ठेवला. तिने हलक्या हाताने बाजूला सारला. भलतीच दुखावलेली दिसतेय! गजरा नाकारते आहे. ह्या स्त्रिया!
“आता आज अजून का बोलावले आहेस?”
“मला काही बोलायचे आहे.”
“मिस्टर अनि जोशी, तुम्हाला बोलायचे असेल पण मला ऐकायचे नाहीये.”
काही दिवसापूर्वी ही मला “अरे अन्या” असं म्हणायची. तो मनातल्या मनात.
“सुलू, तुला माहित आहे कि माझे तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे.”
“ये बात! हे तुझ्या परमप्रिय मित्राने म्हणजे त्या चालू बेवड्या पक्याने लिहिलेले डायलॉग मला ऐकवतो आहेस का? त्यानेच सांगितलं असणार कि अशी ओपनिंग कर. हो ना?
त्याला सांग की कुठे मराठी तमाशा मध्ये सोंगाडयाचा पार्ट मिळतोय का बघ. स्वतः पैसे कमाव. दुसऱ्यांच्या खिशाला जळू सारखा चिकटू नकोस. माझ नाव घेऊन बिंदास सांग.”
मला हसू आवरात नव्हते. पण कष्टाने दाबून धरले. सुलूचे वाक्ताडण संपलं नव्हते.
“अच्छा आणि त्या छान छबेली मोनिकासाठी काय डायलॉग लिहिले आहेत पक्याने? “मोनिका माय डार्लिंग, आय लव यू.” ए, तिच्याशी तुला इंग्लिशमध्ये बोलावे लागत असेल नाही का? मिस्टर जोशी, तुझे नूमवि इंग्लिश आणि तिचे कँपातले. ती काय म्हणते ते समजते तुला? वाक्या वाक्यात फक आणि बास्टर्ड. आवडतं तुला? तू म्हणणार प्रिये, आज हुलग्याचं पिठलं कर. ती म्हणणार “व्हाट इज धीस ह्युलागया?” कधी पिठल्याची इच्छा झाली तर माझ्याकडे ये हो. मी तुला खाऊ घालेन. कसं होणार तुझं.”
“सुलू, काय बडबडते आहेस. एक तर पक्याला ह्यात का ओढते आहेस? नाईस गाय ही इज! बिचारा कथा लिहून पोट भरतोय. आणि ही मोनिका, अग त्या दिवशी तिला घेरी येत होती म्हणून मी तिला सावरली. त्यावरुन तू आमचे लग्न पण लावून दिलेस. जरा समजून घ्यायचा प्रयत्न कर. तू समजतेस तसं आमच्यात काही नाहीये.”
“पक्या इज अ नाईस गाय! मोनिकाला फक्त घेरी येते. आणि मी?”
“यू आर तो सच अ स्वीट सुलू.”
“हा हा समजलं. यू स्वीट लायर! तुझे जर बोलून झालं असेल तर मी जाते. आज मला पहायला येणार आहेत. काय करणार? बरा वाटला तर हो म्हणून टाकते. बीई एमबीए आहे.” ती उठली, दुपट्ट्याची मोहक हालचाल करत ती हॉटेलच्या बाहेर पडली. स्कूटरला नाजूक टाच मारून भुरकन उडून गेली. तिचं म्हणजे सगळच नाजूक.
ती गेली. तो डोके धरून बसला होता.
तो उठला आणि सरळ माझ्या समोर येऊन बसला.
“बघितलस ना पक्या काका. केवढा हट्टीपणा. राग तर नाकाच्या शेंड्यावर. सांगून सांगून दमलो. बाई ग तू समजतेस तसं काही नाहीये. किती नाकदुऱ्या काढू. पण ऐकेल तर शपथ. वर तुझ्यावर पण आगपाखाड.”
ते सगळे बघून मला हसू येत होतं. मजा वाटत होती.
“पक्या, तुला हसायला होतंय. इकडे माझा जीव चाललाय.”
“पोरा खेळ रंगात आलाय नि तू इतका व्याकुळ झालास. अरे तू ह्या खेळात नवशिका आहेस. थिंग्स आर ब्राईटनिंग अप. थोडा दम खा.”
“खोटी आशा. नाही पक्या. आय अॅम अ लूजर... ती लग्न करायची गोष्ट करतेय.”
“लक्ष देऊ नकोस. तुला जळवण्यासाठी ती फेकतीय.. एक गोष्ट तू नोटीस केलीस? जाताना तू आणलेला गजरा तिने हळुवारपणे हुंगला आणि सस्मित पर्समध्ये ठेऊन दिला. तुझं लक्षं कुठं होतं? तू आपला स्वतःच्या दुःखाला कुरवाळत बसला होतास.”
त्याने वळून मागे पाहिले. खरच कि. गजरा टेबलावर नव्हता. फक्त त्याचा सुगंध मात्र दरवळत होता.
“खरच की रे, ती गजरा घेऊन गेली.” हीरो गाण्याच्या तालात म्हणाला, “अरे वेड्या, ती गजरा घेऊन गेली!”
“कट! एक्सलंट. हा फायनल टेक.” टाळ्या वाजवत तो माझ्या शेजारच्या टेबलापाशी बसलेला इसम म्हणाला.
स्कूटरला टाच मारून अदृश्य झालेली हिरोईन पण आली.
“काका, हीरो, हिरोईन तुम्हा सर्वांचा कमाल अभिनय.”
पॅकअप नाऊ.
सगळे आपापल्या लवाजम्या बरोबर वेग वेगळ्या दिशांना पांगले. डायरेक्टर दादा माझ्याजवळ येऊन बसला.
“पक्या काका, तुला काही शेड्युल नाही? बाकी तू पण अभिनयाची थोडी चुणूक दाखवून जुन्या काळाची आठवण करून दिलीस हा.”
“दादा, एवढ्या लहानश्या अपिअरन्ससाठी केव्हढी मोठी कथा रचावी लागली.”
(समाप्त)

कथा

प्रतिक्रिया

मिसळपाव's picture

26 May 2024 - 3:25 am | मिसळपाव

शेवटच्या वाक्यांवरनं नीटसं नाही कळलंय बट दॅट्स ऑल राईट - ष्टोरी झकास सांगितल्येय

लेखक (पक्या) हा अडगळीत गेलेला नट आहे. बऱ्याच दिवसानंतर तो अभिनय करत आहे, दादाची कृपा. तो पक्याच्या भूमिकेत आहे. पक्या म्हणजे Puck. प्रेमी युगलांच्नी ताटातूट आणि मीलन करणारा खोडकर imp. त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी आणि मूडमध्ये येण्यासाठी तो कथा जगतो आहे.
Puck- पक्या हे रत्नाकर मतकरींकडून ( शेक्सपिअर) परत न करण्याच्या बोलीवर उसनवार घेतले आहे. पहा "नयन तुझे जादूगार" लेखक रत्नाकर मतकरी --- प्रशांत दामले.
हे सर्व सहन केल्याबद्दल आभार!

साधारण असं असल्याचा अंदाज होता पण "यात अजून काही आहे का काय?" वाटत होतं!

संजय मिश्राचा "कामयाब" पाहीला आहेस का? नसलास तर जरूर पहा. पाहीलास की का बघायला सांगतोय ते कळेलच.

रत्नाकर मतकरींची ही पुस्तकं / नाटकं माहीत नव्हती. बघतो मिळतात का. साधारणतः "खेकडा", "मध्यरात्रीचे पडघम" लिहीणारे म्हणून मतकरी ठाऊक असतात. त्यांचं "जौळ" वाचलं आहेस का?

माफ करा. गलतीसे मिस्टेक हो गयी.
नाटकाचे नाव आहे "जादू तेरी नजर "आणि लिंक आहे
https://www.youtube.com/watch?v=8gM0heG2KLY
Enjoy.
BTW रत्नाकर मतकरी हे माझे अत्यंत आवडीचे लेखक आहेत.
त्यांच्या भयकथांचे वाचन नेट वर आहे. काही खास नाही पण चालवून घ्या.

भागो's picture

26 May 2024 - 9:57 pm | भागो

चॅनेलचे नाव आहे "Bhaykatha Marathi"
इथे मतकरींच्या भयकथा ऐकू शकता.
मिसळपाव , मी पुन्हा ऐकायला सुरवात केली आहे. पण त्या आधी जादू... नाटक पहा. अवीट गाणी! धमाल.
बघाल तर पुन्हा एकदा तारुण्यात (नसाल तरुण तर हा) प्रवेश कराल.

मिसळपाव's picture

26 May 2024 - 11:16 pm | मिसळपाव

... ऐकतांव हां.

कर्नलतपस्वी's picture

26 May 2024 - 5:51 am | कर्नलतपस्वी

भागो टच नाय.

प्रांजळ मत.

सर आपल्या प्रांजळ प्रतिसादाचा आदर आहे.
ट्रॅक बदलत आहे त्यामुळे खड खडात ऐकू येत असावा.

प्रयोग आवडला. यशस्वी झाला आहे. सुरुवातीला प्लॉट टिपिकल वाटतो त्याचे रहस्य शेवटी कळते. एखाद्या जुन्या खोडाला गेस्ट अपियरंस करायची संधी किंवा निमित्त म्हणून प्रसंग लिहावे लागणे हे रोचक..

भागो's picture

26 May 2024 - 4:21 pm | भागो

गवि सर
आभार.

भागो's picture

26 May 2024 - 9:43 pm | भागो

एका चुकीची दुरुस्ती
माफ करा. गलतीसे मिस्टेक हो गयी.
नाटकाचे नाव आहे "जादू तेरी नजर "आणि लिंक आहे
https://www.youtube.com/watch?v=8gM0heG2KLY
Enjoy
तसदी बद्दल क्षमस्व.

हल्लीच्या भाषेत सांगायचं तर टॅलेंट आणि पोटेन्शियल आहे.

भागो's picture

27 May 2024 - 8:28 pm | भागो

आभार!
हे माझ्यासाठी आहे असे समजून!

सौंदाळा's picture

27 May 2024 - 6:35 pm | सौंदाळा

अप्रतिम

भागो's picture

27 May 2024 - 8:30 pm | भागो

सौंदाळा
धन्यवाद.

नठ्यारा's picture

28 May 2024 - 1:33 am | नठ्यारा

नेहमीसारखी नाहीये. भागो टच म्हणजे नेमकं काय हे मलाही सांगता येत नाही. तरीपण कथा चांगली खुललीये.

-नाठाळ नठ्या

स्टिरिओ टाइप होऊ नये म्हणून प्रयत्न करतोय. म्हणून जे जे आवडेल त्यावर लिहितो.

उत्कंठावर्धक वळणे घेत घेत पुढे जाणारी कथा मस्त जमली आहे.
लहानपणापासून 'नाकेली' हा शब्द वाचत आलेलो असून अजूनही 'नाकेली' चे नाक नेमके कसे असते ते कळलेले नाही. एकादोन नाकेल्या नट्या वगैरेंचे फोटो द्या राव, म्हणजे नीट कळेल.
-- 'छान छबेली' (की 'छैल छबेली' ?) वाचून १९६० च्या 'छबिली' मधील स्नेहल भाटकरांची नूतनने गायलेले "ऐ मेरे हमसफर, रोक अपनी नजर" आणि हेमंतकुमारचे "लहरों पे लहर" ही सुंदर गाणी आठवली.

-- या कथेतला 'तो' आणि 'ती' दोघेही 'गोरे' असल्याचे वाचताना मागे मिपावर कुठल्याश्या धाग्यात गोरेपणाच्या उल्लेखावरून कुणीतरी आबजेक्षण घेतले होते आणि त्यावर बरीच खडाजंगी वगैरे झाल्याचे आठवले. (कुणाच्या लक्षात आहे का तो धागा कोणता ते )
'A Midsummer Night's Dream' हा शब्दसमुच्चय अनेकदा वाचनात आलेला असूनही आजवर ही भालगड नेमकी काय आहे, ते ठाऊक नव्हते. या कथेच्या निमित्ताने जरा शोध घेता ते शेक्स्पियराचे नाटक असल्याचे कळले.

.

.

.
Titania sleeping in the moonlight protected by her fairies, 19th century painting by John Simmons

.

Titania and Bottom(painting - Edwin Landseer)

भागो's picture

28 May 2024 - 8:05 pm | भागो

प्रथम आभार मानतो.
नाकेली मला वाटते कि सिने सृष्टीत सगळ्या नाकेल्याच नात्या आहेत, काही कमी काही जास्त. नकट्या आणि यशस्वी झालेल्या म्हणजे निम्मी, मुमताज, श्री देवी आणि तिच्या मुली. इथे फोटो चढवण्याचे कौशल्या नाही म्हणून क्षमस्व.
काळा आणि गोरा. मी पण वाहत गेलो. पण एक मात्र खरे आहे जगात भारतीय लोक सगळ्यात जास्त रेसिस्ट आहोत.
प्लीज ते नाटक पहा, प्रशांत दामले बरोबर काम करणारी नायिका साधीच आहे, पण तिचा ठसका आणि अभिनय पहा. लाजवाब!
सर तुम्ही तर स्वतः चित्र कर्मी आहात. तुम्ही शोधून टाकलेली चित्रेही खास आहेत. आपुन तो कुछ जाणता नाही. पण तरीही आवडलेल्या चित्रांची यादी देतो
Starry Nights Café Terrace at Nigh Hokusai great wave
The girl at the window
आणि हिंदी फिल्म गीते.
हे पहा माझी पसंद
https://www.youtube.com/watch?v=CqrGULfXZ6Q नूर जहाॅं मुंबईत 1982
शिल्पा राव कलंक सोलो ,
https://www.youtube.com/watch?v=ASXJV84ufyM
मानवी आवाज आणि पियानो ह्यांचा अवीट संगम.