मध्यंतरी मित्राशी बोलता बोलता जुन्या आठवणी निघाल्या. कशावरुनतरी बेलासिस रोडचा उल्लेख आला. एकदम इस्माईलभाइच्या दुकानातला प्रसंग आठवला.
साधारण ३७-३८ वर्ष झाली असतील, मुंबईत बहुसंख्य टॅक्सी फियाट म्हणजे ११००डी/ पुढे प्रिमिअर प्रेसिडेंट/ पद्मिनी पण कुळ तेच. अनेक गाड्या जुनाट पण तरीही उत्पनाचं साधन होत्या. दरवर्षी टॅक्सी आर्टीओ पासिंगला न्यावी लागायची. पासिंगला न्यायची म्हणजे गाडी जरा चमकावायला लागायची. अर्धे मेकॅनिक स्वतःच झालेले ड्रायवर किरकोळ दुरुस्त्या स्वतःच करायचे, गॅरेजचा खर्चं परवडणारा नव्हता. रंगकाम करायला पेंटर बोलवायचा. जिथे मोठ्या प्रमाणावर टेक्सीवाले असायचे तिथे आपला कंप्रेसर घेऊन पेंटर टॅक्सीवाल्याना रंग विकत आणायला सांगुन मजुरीवर एक कोट मारायचे. स्वस्त आणि मस्त. टॅक्सीवाल्याच्या दृष्टिने एकेक पैसा मोलाचा! तसे ड्युको, आणि अॅडिसन ब्लॅक जोरात चालायचे. पण त्या एरियात इस्माईल भाईच्या दुकानातला म्हणजे नॅशनल पेंट मार्ट मध्ये मिळणारा काळा रंग स्वस्त आणि फेमस होता. काळ्या रंगाचा मोठा दिलासा म्हणजे १ लिटर मध्ये पूर्ण गाडीवर ओवरकोट व्हायचा. तर हा इस्माइलभाईचा रंग इस्माईल ब्लॅक म्हणून टेक्सिवाल्यांमध्ये लोकप्रिय होता.
दुकानाच्या आजुबाजुला सगळी गॅरेजेस. इस्माईलभाईकडे रंग, थिनर, पलटी, कारपॅच, पॉलिश पेपर, वईस असा सगळा माल मिळायचा. दुकानात इस्माईल्भाई गल्ल्यावर बसायचे, मुलगा अनिस गिर्हाईकं सांभाळायचा. रंगसामान मागच्या अंगाला होते. न्यायला गॅरेजमधल्या पोरांची, पेंटर लोकांची वर्दळ चालू असायची. त्या दिवशी मी गेलो तेव्हा इस्माईलभाई नेहेमी प्रमाणे गल्ल्यावर बसलेले होते. आम्ही बोलत असताना दहा बारा वर्षांची दोन पोरं वईस न्यायला आली. वईस म्हणजे कॉट्न वेस्ट चा अपभ्रंश. हे सुतड्यांचे गुंडे म्हणजे बहुधा सूत रिरण्यांमधलं जोड उत्पादन असावं. तेलकट व चिकट हात पुसायला मेकॅनिक लोकांना वईस लागायचा. माणसानं आतून वईसचे पुडे आणले आणि त्या पोरांना दिले. एका पोरानं थोडा सुतडा बाहेर काढला आणि अनिसकडे तो सुतडा नेत त्याने त्यावर थोडे थिनर ओतायची विनंती केली, म्हणाला हात साफ करायला हवं आहे. सिगरेट ओढता ओढता इस्माईलभाईनी ते ऐकलं आणि त्या पोराना एक अर्वाच्य शिवी देत जोरात खेकसले "भोसडीके, थिनर चाहिये तेरेको? ते पोरगं घाबरलं , गयावया करंत बोललं, " सेठ हात साफ करायचे आहेत". इस्माईलभाईंनी पोराना म्हणाले, कायको थिनर रे? ******** हात धोनेका हय? नोकराला हाक मारली आणि तो बाहेर येताच त्याला म्हणाले या पोराना बाहेर नळावर घेऊन जा आणि हातावर थोडी साबू पावडर टाक. मी चक्रावलो, हा इतका का भडकला?
तितक्यात चहावाला पोर्या आला. इस्माईलभाईंनी चहाचा एक कप माझ्या हातात दिला, एक स्वतः घेतला. इस्माईलभाईंनी एक जोरदार झुरका मारत सिगरेट बाहेर टाकली आणि विझवली. माझ्याकडे पाहात हातानंच चहा पी अशी खूण करत मला म्हणाले, काय विचार करतोयस? मला शिव्या घालत असशिल ना? या इस्माईलला चुळकाभर थिनर द्यायची दानत नाही असं म्हणत असशिल? तुला माहित आहे मी थिनर का दिलं नाही? अरे या साल्यांना लत लागल्ये! वईसवर थिनर ओतून बोळा खिशात ठेवायचा आणि गपचुप हुंगायचा. हुंगलं की किक येते. म्हणून मी हराम्यांना थिनर देत नाही, हात बाहेर धुवायला सांगतो आणि हात धुवायला पावडर देतो.
ऐकल्यावर अंगावर सरसरून काटा आला. एस्टर्स, झायलीन, टुलीन........संपूर्ण ऑरगॅनिक केमिस्ट्री आठवली. नावं वेगवेगळी, पण परिणाम एकच. मजासंस्था, फुफ्फुसं, त्वचा एकूण सगळ्या शरिराची बरबादी. बहुतेक करुन युपीतली गरीब कुटुंबातली ही पोरं घरात खायला नाही म्हणून आई बापांनी कामधंदा करायला कुणा ओळखीच्या माणसाच्या शब्दावर विसंबून मुंबईला पाठवलेली. गॅरेजमधल्या मोठ्या पोरांकडून ही व्यसनं शिकतात. भलत्या नादी लागतात. ज्या वयात छातीत वारा भरून हुंदडायचं त्या वयात ही पोरं आपलं शरीर उध्वस्तं करुन घेत होती.
मुंबईत सगळ्यांना काम मिळतं, पोटाला अन्न मिळतं हे खरं . पण कधीकधी त्याची फार जबर किंमत मोजावी लागते.
प्रतिक्रिया
29 Jan 2024 - 12:14 pm | राजेंद्र मेहेंदळे
आता थिनर ऐवजी व्हाईटनर किवा कॉलेजच्या हॉस्टेलवर कफ सिरपच्या आख्ख्या बाटल्या एकावेळेला. ईतकाच काय तो फरक. असे म्हणायला आलो होतो. आणि तसे असते तर फार बरे झाले असते.
परंतु आता मेफेड्रॉन वगैरे ड्रग्स इतकी सहज उपलब्ध आहेत की कुठलेही कॉलेज त्यापासुन सुरक्षित नाही. दुर्दैवाने किस्सा आवडला असे म्हणवत नाही. :(
29 Jan 2024 - 7:07 pm | टर्मीनेटर
+१
असाच नशेचा आणखीन एक भयंकर प्रकार म्हणजे पेट्रोल हुंगणे! जुन्या स्कुटर्स्/मोपेड्सच्या पेट्रोल टँक्सना एकतर लॉक नसायचे किंवा ज्यांना असायचे ते जुन्या गोदरेजच्या फ्रिजच्या छोट्या पितळी चावीने सहज उघडले जायचे. तेव्हा टाकीचे झाकण उघडुन पेट्रोल हुंगण्याचा प्रकार खुप मुले करायची. नवख्या मंडळींना किती प्रमाणात फ्युम्स हुंगायच्या ह्याची कल्पना नसल्याने जास्त प्रमाणात फ्युम्स फुप्पुसात भरल्या गेल्यास काहींना चक्कर येउन बेशुद्ध पडतानाही पाहिले आहे.
सर्वसाक्षी साहेब, तुमच्या ह्या लेखाच्या निमित्ताने 'ड्युको, अॅडिसन ब्लॅक, पलटी, कारपॅच, वईस / कॉटन वाईस, एस्टर्स, झायलीन, टुलीन' अशा अनेक विस्मृतीत गेलेल्या गोष्टींची उजळणी झाली आणि काही जुन्या व्यावसायीक आठवणींना उजाळा मिळाला! विविध घातक रसायने हुंगण्याचा 'अघोरी' प्रकार मी एक दोन वेळा नाही तर तब्बल सात वर्षे केला असल्याने लेखाशी छान रीलेटही झालो. अर्थात ही 'हुंगेगीरी' नशा करण्यासाठी केली नसुन तो माझ्या व्यवसायाचा अपरिहार्य भागच होता! त्या आठवणी दुसऱ्या 'मेगाबाईटी' प्रतिसादात लिहितो 😀
29 Jan 2024 - 7:23 pm | राजेंद्र मेहेंदळे
यावर येउंद्या एक सीरीज!!
29 Jan 2024 - 7:56 pm | टर्मीनेटर
सीरीज नको 😀
आणखीन एक सीरीज सुरु केली तर, "एक ना धड, भाराभर चिंध्या" म्हणत बिरुटे सर छडी उगारतील! त्यापेक्षा खाली एक मेगाबाईटी प्रतिसाद टंकतो 😊
29 Jan 2024 - 1:39 pm | मुक्त विहारि
अंगावर शहारा आला...
29 Jan 2024 - 3:05 pm | अहिरावण
खुप अवघड झाले आहे. आणि आता यात गरीबच नाही तर नवौच्चभ्रुंची मुले आणि मुली एक थ्रिल म्हणुन पहात याच्या आहारी जात आहेत
पुण्यात संध्याकाळी आठ नंतर गल्ली बोळात (अगदी पेठांमधे सुद्धा) बसलेली नवतरुणतरुणींची भयानक कृत्ये उडत्या महाराष्ट्राची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.
29 Jan 2024 - 8:46 pm | टर्मीनेटर
ह्या लेखामुळे उजाळा मिळालेल्या रंग आणि रसायनांशी निगडीत माझ्या काही व्यावसायीक आठवणी:
कॉलेज शिक्षण संपल्यावर सुमारे वर्षभर (आता टुकार वाटत असले तरी एकेकाळी प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या 😀) 'लोकसत्ता' ह्या मराठी दैनिकासाठी एक्स्प्रेस ग्रुपमध्ये नोकरी केल्यावर स्वत:चा इंडस्ट्रीअल लुब्रीकंट्स आणि केमिकल्स विक्री व्यवसाय सुरु केला होता. सर्व प्रकारची इंडस्ट्रीअल लुब्रीकंट्स आणि एल.डी.ओ, एफ.ओ, डीओडोराइज्ड केरोसिन, थिनर/टर्पेंटाईन, अॅसीटोन, आय.पी.ए, मेथनॉल, ऑर्थो झायलीन, टुलीन, बुटाइल कार्बीटॉल, वगैरे पासुन सल्फ्युरीक्/हायड्रोक्लोरीक व अन्य अॅसिड्स, NaOH वगैरे वगैरे, थोडक्यात पेट्रोल आणि डिझेल सोडुन जवळपास काय वाट्टेल ते विकायचो आणि सर्व प्रकारच्या सॉल्व्हंट्स आणि आरोग्याच्या दृष्टीने एकसे एक घातक अशा रसायनांच्या ह्या व्यापारातुन पैसाही बक्कळ मिळत होता.
ह्या व्यापारात लॅब/फार्मा ग्रेड पेक्षा कमर्शिअल ग्रेड केमिकल्सचा वाटा मोठा असल्याने प्युरिटी वगैरे मुद्दा गौण होता त्यामुळे बहुतांश रसायनांचा स्त्रोत हा विविध फार्मास्युटिकल कंपन्या आणि रंग / रासायनिक पदार्थ व खत निर्मिती कारखान्यांच्या निर्मिती प्रक्रीये दरम्यान तयार होणाऱ्या अनेक रसायनांचे मिश्रण असलेल्या 'रासायनीक कचऱ्यावर' प्रक्रीया करुन त्यातले अनेक घटक वेगवेगळे करणाऱ्या डिस्टीलरीज असायच्या.
उदाहरणार्थ - फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये औषध शुद्धिकरण प्रक्रीयेत किंवा यंत्रसामुग्री धुण्यासाठी वापरले गेलेले शुद्ध स्वरुपातले आय.पी.ए, (IsoPropyl Alcohol) ज्यात प्रक्रीये दरम्यान अनेक अन्य घटकांची भेसळ झाल्याने त्याच्या रंग, वास, घनता वगैरे गुणधर्मांत बदल झाल्याने त्यांना पुनर्वापरासाठी निरुपयोगी ठरते. कंपनीच्या द्रूष्टीने 'स्क्रॅप' ठरलेले हे मिश्रण भंगारच्या भावात खरेदी करुन डिस्टील केल्यावर मिळणाऱ्या 'कमर्शिअल / इंडस्ट्रीअल ग्रेड' आय.पी.ए, शुद्धतेच्या बाबतीत दुय्यम दर्जाचे असले तरी त्याचा वापर असंख्य कारणांसाठी केला जातो, आपण ज्याला 'रबींग अल्कोहोल' म्हणुन ओळखतो ते हेच, अर्थात काही विशिष्ट कारणांसाठी मात्र 'लॅब/फार्मा' ग्रेडचाच वापर केला जातो!
दुसरे उदाहरण म्हणजे 'झायलीन'. रंग निर्मीती कारखान्यांमध्ये (एशिअन पेन्ट्स, नेरोलॅक, बर्जर वगैरे वगैरे) एका रंगाची (मग तो लाल असो कि काळा, निळा पिवळा वगैरे) 'बॅच' तयार झाल्यावर दुसऱ्या रंगाची बॅच घेण्याआधी निर्मिती प्रक्रीयेत वापरली जाणारी सर्व यंत्रसामुग्री (मिक्सर, ब्लेंडर, पाइप्स, व्हेसल्स/ टँक्स वगैरे) शुद्ध झायलीन किंवा तत्सम रसायनाने धुवुन काढावी लागते. मग हे रंग मिश्रीत झायलीन पुनर्वापराच्या दृष्टीने निरुपयोगी असल्याने वरील प्रमाणेच भंगारच्या भावात खरेदी करुन डिस्टील केल्यावर कमर्शिअल / इंडस्ट्रीअल ग्रेडचे झायलीन मिळवले जाते. गंमत म्हणजे ह्या प्रक्रीयेत झायलीन बरोबरच बऱ्यापैकी प्रमाणात रंगही मिळतो, फक्त त्याची 'शेड' कुठली असेल ह्याची काहीच खात्री नसते 😀 आपल्यापैकी अनेकांनी एखाद्या कारखान्यात मशिन्स पासुन वर्क शेड पर्यंत सर्वकाही कुठल्यातरी भलतीच रंग छटा असलेल्या रंगाने रंगवलेले पाहिले असेल, त्यासाठी सहसा अशाप्रकारे मिळवलेला थोड्या दुय्यम दर्जाचा स्वस्त आणि मस्त रंग वापरला जातो.
औषधे आणि दर्जेदार रंगांच्या निर्मीती प्रक्रीयेत अशी कित्येक महागडी रसायने पुनर्वापरासाठी निरुपयोगी ठरत असल्याने भंगारच्या भावात विकावी लागतात ज्याचा थेट परिणाम उत्पादन खर्चात वाढ होण्यात आणि पर्यायाने त्यांच्या किंमतीवर होतो.
असो, सांगायचा मुद्दा काय तर डिस्टीलरीतुन अशी कमर्शिअल / इंडस्ट्रीअल ग्रेड रसायने खरेदी करताना केवळ त्यांनी दिलेल्या डेन्सिटी/ग्रॅव्हिटी, बाष्पाचे प्रमाण, प्युरीटी वगैरेच्या तपशिलांवर विसंबुन आणि रसायनाचा रंग वरचेवर तपासुन चालत नसे. त्या पदार्थाला त्याचा मुळचा वास सोडुन अन्य कुठल्या रसायनाचा वास वगैरे येत नाही ना ह्यासाठी शेवटची आणि खात्रीशीर खरेदीपुर्व चाचणी ही स्वतः नाकाने हुंगुनच करावी लागत असे. तब्बल सात वर्षे हा व्यवसाय करताना किती शे किंवा सहस्त्र वेळा नाना प्रकारची घातक रसायने हुंगली असतील ह्याची मोजदात नाही!
ज्या व्यक्तीचे बोट धरुन ह्या व्यवसायात पदार्पण केले होते त्या व्यक्तीनेही सुरुवातीलाच "कितीही चांगला पैसा मिळत असला तरी ह्या व्यापारात फार काळ रेंगाळायचे नाही, योग्य वेळ येताच लाइन बदलायची" असे स्पष्टपणे सांगीतले होते. अर्थात सदर व्यवसायातुन त्यावेळी बाहेर पडताना 'पैसा' की 'आरोग्य' ह्या दोनपैकी एकाची निवड करणे हे वाटते तितके सोपे खचीतच नव्हते, पण शेवटी "जान हैं तो जहान हैं" ही उक्ती तो निर्णय घेताना प्रभावी ठरली.
सळसळत्या तारुण्याच्या दिवसांत हुंगेगीरीचा हा अघोरी प्रकार केला असल्याने असेल कदाचीत पण सुदैवाने त्यातुन कुठ्ल्याही शारीरीक समस्या उद्भवल्या नाहीत, पण मोहात अडकुन पुढे आणखीन काही वर्षे हे प्रकार सुरु ठेवले असते तर आज हा प्रतिसाद टंकणे तर दुरच, कदाचीत मिपावर अवतरण्यापुर्वीच चंदनाचा हार घातलेला अस्मादीकांचा फोटो भिंतीवर टांगला गेला असता 😀
29 Jan 2024 - 10:09 pm | मुक्त विहारि
धन्यवाद
29 Jan 2024 - 11:32 pm | भागो
टर्मिनेटर भाऊ
जेव्हा तुम्ही रसायन हुंगत होता, तेव्हा मी कोळसा आणि राख खात होतो. कोळसा खाणीतले कामगार, खत कारखाने, सल्फ्युरिक असिड प्लांट, हेवी वाटर प्लांट आणि अगदी आटोमिक पॉवर प्लांट हे सर्व धोकादायक प्रोफेशन आहेत. ट्रॅफिकमधून बस चालवणारे ड्रायव्हर हे देखील त्याच प्रकारात मोडतात.
लेखाने आणि प्रतिसादांनी आपल्याला थोडे जागृत केले हे शेवटी महत्वाचे!