इंदूर - छप्पन दुकान आणि सराफ्याची खाद्य भ्रमंती

प्रचेतस's picture
प्रचेतस in जनातलं, मनातलं
26 Dec 2023 - 12:53 pm

अगदी नुकतेच इंदूर भटकंती झाली. मांडू, उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर सर्व काही पाहिले. पण खास आकर्षण होते ते छप्पन दुकान आणि रात्रीच्या सराफ्याचे. छप्पन दुकान हा छप्पन गाळ्यांचा समुच्चय. छप्पन दुकान दिवसभर सुरु असते. शेवटचे १/२ कपड्यांचे गाळे वगळता इतर सर्व खादाडीचीच दुकाने आहेत. इथले सर्वाधिक खास म्हणजे विजय चाट हाऊस, जॉनी हॉट डॉग आणि बाबू नारियल क्रश.

a

वेगवेगळ्या स्टॉल्सवरुन खादाडीचे पदार्थ घेऊन निवांतपणे खाता यावेत म्हणून इकडे जागोजागी सीट आउट्स आहेत.

a

विजय चाट हाऊसचे सर्वच पदार्थ एकदम जबरदस्त. खोबरा पॅटिस इथला युएसपी. एकदम मऊसूत पॅटिसमध्ये खोबर्‍याचे सारण आणि आंबटगोड चटणी. एकदम सुख.

a

खोबरा पॅटिस

a

इथला साबुदाणावडा सुद्धा अशक्य भारी आहे. दही, फराळी चिवडा आणि चटणीसोबत तो देतात. आपल्याकडच्या साबुदाण्या वड्यापेक्षा सर्व्ह करण्याची वेगळी पद्धत पण चव जबरदस्त.

a

असेच सलग एका रांगेत छप्पन गाळे आहेत.

a

इथला फेमस बाबू नायियल क्रश. शहाळ्याचे पाणी आणि त्यातलीच मलई एकत्र करुन मिक्सरवर फिरवून ग्लासमध्ये देतात. एकदम मस्त.

a

दुपारचं खाणं असं छप्पनमधील विविध प्रकार खात खातच केलं. साबुदाणा वडा, खिचडी, भुट्टे का किस, गराडू ढोकळा, खोबरा पॅटिस, बास्केट चाट, पनीर टिक्का, मसाला सोडा, नारियक क्रश अर्थात सर्व डिश शेअर करतच खाव्या लागतात कारण सर्वच हवेहवेसे वाटते.

बाकी छप्पन तर फक्त ट्रेलर आहे. खरी मजा तर सराफ्यालाच येते. दिवसा सराफ बाजारात सगळी दुकाने आहेत ते सराफांची, मात्र जशीजशी ते रात्री साडेआठ नवाला बंद होऊ लागतात तसातसा सराफा विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सने फुलायला लागतो. रात्री दहाच्या आसपास जवळपास संपूर्ण सराफा हा पूर्णपणे सुरु होतो ते पार उत्तररात्री दोन तीन वाजेपर्यंत. रविवारच्या दिवशी मात्र दागिन्यांची दुकाने बंद असल्याने संध्याकाळी सहापासूनच सराफा फुलायला लागतो. आणि गेलो तो रविवारच होता आणि राती साडेनऊला पोचलो असल्याने सर्व स्टॉल्स उघडले होते आणि प्रचंड गर्दी होती. येथे एक मात्र सांगणे आवश्यक. सराफा हा जुन्या इंदूरात ऐन बाजारात असल्याने येथे स्वतःची गाडी घेऊन येऊ नये. इंदूरातल्या कुठल्याही कोपर्‍यातून येथे येण्यासाठी व रात्री कितीही उशिरा जाण्यासाठी येथे रिक्षा उपलब्ध असतात. आम्ही देखील कार जिंजरवर ठेवूनच रिक्षाने सराफ्यात आलो. सराफ्यातल्या दुकानदारांप्रमाणेच येथले रिक्षावालेही अगदी हसतमुख आहेत.

रिक्षाने आम्हाला होळकर राजवाड्यापाशी सोडलं. राजवाडा असा झगमगत होता.

a

राजवाड्याच्या डाव्या बाजूच्या रस्त्याने थोडे पुढे जाताच सराफ्याच्या गल्लीची सुरुवात होते.

a

a

आतमध्ये प्रवेश करताच की एकदम स्वर्गच, दोन्ही बाजूंना विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स

a

a

इथले प्रमुख आकर्षण म्हणजे जोशी दही बडा हाऊस. प्लेटमधला दहीवडा हवेत उंच उडवून परत प्लेट्मध्ये झेलणारे आणि एकाच चिमटीतून सैंधव, काळी मिरी, चाट मसाला आणि जीरावम दहिवड्यावर खुबीने पेरणारे जोशीबुवा इथली खासियत. आम्ही गेलो तेव्हा जोशी नेमके तिथे नव्हते, सराफा मनसोक्त खादाडून परत येतांना त्यांचे दर्शन झाले. , त्यांचा मुलगा तेव्हा दुकानावर होता.

a

अफलातून चवीचा दहीबडा

a

थोडं पुढं गेल्यावर कुल्फीच्या दोन स्टॉल्सवर सोन्याचे प्रचंड दागिने घालून हसतमुखाने स्वागत करणारे दोन भाऊ आपल्या दिसतात. येथे आपल्याला सोन्याचा वर्ख लावलेली कुल्फी देखील ३०० रुपयात मिळते. इतर कुल्फ्या अगदी २०/३० रुपयांपासून मिळतात.

a

a

गराडू हे येथले अजून एक आकर्षण. एक प्रकारचे कंदमूळ आहे. आधी ते वाफवून घेतात आणि तेलात तळून त्यावर लिंबू आणि एक प्रकारचा विशिष्ट मसाला पेरुन एकदम गरमागरम खायला देतात. छप्पनमधल्या गराडूपेक्षा इथला गराडू शतपटीने भारी.

a

a

a

सराफ्यात खाद्यपदार्थांची प्रचंड विविधता आहे. अगदी चायनीज पासून मोमोज पर्यंत, पावभाजी पासून पिझ्झ्यापर्यंत विविध स्टॉल्स आहेत. इतके सर्वच खाणे शक्य नाही पण नुसते पाहण्यास तरी काय हरकत आहे. आणि तुम्ही येथे खात नसलात तरी दुकानदार खडूसपणाने बघत नाहीत, उलट खाऊ नका पण आमचे फोटो बिंधास्त काढा म्हणत असतात.

हा मोमोजचा स्टॉल

a

चाट

a

दहिवडा

a

डेझर्ट्स

a

ही १२ चवींची पाणीपुरी एकदम भन्नाट. त्यातही हिंग लसूण, हाजमा हजम आणि पायनापल स्वाद तर एकदम भारी. १२ चवींची पाणीपुरी खाताना मात्र शेयर करुन खाऊ नये कारण वेगवेगळे स्वाद मिस होऊ शकतात आणि त्यातही सराफ्यातले प्रमुख पदार्थ खाल्यावरच पाणीपुरीस हात घालावा कारण ह्या बारा पुर्‍या गप्पकन पोटात बसतात.

a

गराडूप्रमाणेच भुट्टे का किस येथले अजून एक आकर्षण. मक्याचे दाणे किसून आणि वाफवून मसाला टाकून देतात.

a

अग्रवालची मिठाई म्हणजे एकदम भारी. राजभोग, गुलाबजाम, कलाकंद, रसमलई, रबडी, मालपुवा, काय नाही ते विचारा.

a

a

a

रबडी तर अशी घट्ट, सायीचा प्रचंड दाट थर असलेली.

a

a

येथली जिलेबी पण लै भारी. जवळपास ७०० ग्रॅम असलेली एकच भलीमोठी जिलबी मागणीनुसार तळून देतात. सोबत असतात ते मालपुवे.

a

a

आता इतकं खाल्ल्यावर नवीनचं कोकोनट क्रश हवंच, छप्पनमधल्या बाबूपे़क्षाही नवीनचा नारियल क्रश जगात भारी. येथे एक अ‍ॅडिशन म्हणजे नारियल क्रशमध्ये नवीन वरतून पुन्हा शहाळ्याची कोवळी मलई टाकतो, त्याने तर अजूनच भारी चव येते.

a

सगळं खाऊन पचवायला इथे पानांचे देखील विविध प्रकार आहे. साध्या पानापासून चॉकलेट पानापर्यंत, बनारस पासून कलकत्त्यापर्यंत, स्मोक पानापासून फायर पानापर्यंत.

a

शेवटी काय, खायची कितीही इच्छा असली तरी पोट तर भरतं पण मन मात्र भरत नाही. सराफ्याला किमान दोन रात्री तरी हव्यात. शिवाय सगळे पदार्थ शेयर करुनच खावेत त्यामुळे येथली चव तर कळतेच आणि वैविध्यही अनुभवास येते.

खरंच पृथ्वीवरील स्वर्ग आहे हा सराफा म्हणजे आणि तेथील खाद्य म्हणजे स्वर्गसुखाची परमावधी.

इंदुरीविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

26 Dec 2023 - 1:02 pm | मुक्त विहारि

सध्या तरी इतकाच प्रतिसाद...

जाता जाता,

पुणे आता परिघा बाहेर गेलेले खेडेगाव आहे, हे परत एकदा जाणवले...

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Dec 2023 - 1:04 pm | राजेंद्र मेहेंदळे

तोंपासु!!
प्रचेतस शैली पेक्षा वेगळाच लेख. फोटो पाहुन जळजळ झाली :)

ईंदुर च्या या सराफ्याची महती बरीच ऐकुन आहे. एकदा जायलाच हवे. बकेट लिस्ट मध्ये अ‍ॅडवतो.

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Dec 2023 - 1:04 pm | राजेंद्र मेहेंदळे

प्रतिसाद टंकेपर्यंत मुविकाकांनी नंबर लावला :(

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Dec 2023 - 1:39 pm | अमरेंद्र बाहुबली

मज्जा मज्जा नी नूसती मज्जा. छप्पन दुकानांना एकदा जाऊन आलोय परत एकदा जायचंय. सराफाही गाठायचाय.

या ठिकाणी गेलो होतो. इतके काही खास वेगळे वाटले नाही. वर उल्लेख केलेल्यातले अनेक पदार्थ टेस्ट केले होते. अर्थात व्यक्तीसापेक्ष आवड निवड बदलते हे खरे. शिवाय कोणत्या वेळी तिथे जातो, सिझन, तापमान, कितपत भूक लागली आहे , कितपत हाईप ऐकून आलो आहे, यावर देखील मते बनतात.

पदार्थ वाईट नव्हते पण सामान्य वाटले होते. एक अत्यंत इरीटेटिंग प्रकार म्हणजे बहुतांश पदार्थ, मग ते कोणत्याही टेक्सचरचे का असेनात, ते खायला आईस्क्रीमचा लहान लाकडी चपटा चमचा असतो तो देतात. अगदी साबुदाणा खिचडीसाठी पण.

इंदूरची स्वच्छता मात्र खूप आवडली. लेख फोटो छान रे प्रचु.

कर्नलतपस्वी's picture

26 Dec 2023 - 2:20 pm | कर्नलतपस्वी

बाजरीची भाकरी आणी हि मि चा ठेचा व ताक खाल्ल्या,पिल्या नंतर लेख वाचतो आहे.

कायप्पावर स्टेटस बघितल्यावर कल्पना आली होती.

सर्व वाचकांना नम्र सुचना, भुकेल्या पोटी हा लेख वाचून नये. वाचल्यास होणाऱ्या जळजळी करता लेखक जबाबदार नाही.

धन्यवाद श्री प्रचतेस. नवीन माहिती मिळाली.
सदर पदार्थ जीभेसाठी चांगले असते तरी शरीरासाठी चांगले असतील असे वाटत नाही.

हे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी मिळतात ही गम्मत.

श्वेता व्यास's picture

26 Dec 2023 - 4:11 pm | श्वेता व्यास

अरे वाह! मस्त ठिकाणे आहेत खादाडीसाठी.
इंदूर ला जाणं झालं तर छप्पन ची भेट आता नक्की, ते जरा सुटसुटीत दिसतंय.

सरिता बांदेकर's picture

26 Dec 2023 - 4:33 pm | सरिता बांदेकर

मस्त वर्णन आणि फोटो पण. बकेट लिस्ट मध्ये आहेच आता अंडकरलाईन करून ठेवलं.

विशेष म्हणजे छप्पन दुकान दिवसभर सुरू झाले. सराफा रात्री नऊनंतर फक्त.
१)खोबरा पॅटीस - खोबरे, किशमिश भरलेली बटाट्याची कचोरी. आम्ही करतो. नेरळ स्टेशन टॅक्सी स्टँडजवळ देसाई हाटेलमध्ये संकष्टीला मिळते.
२)गराडु - रताळ्यासारखे दिसणारे मूळ. गोड नसते. यात पांढरा आणि जांभळा गर असे दोन प्रकार असतात. शिवाय चिकट आणि कणीदार यापैकी कणीदार चांगले लागते. उकडून तुकडे करून चाट मसाला टाकून खाता येते. कोकणात यास कोनफळ म्हणतात. मार्चमध्ये जमिनीत लावतात. ओक्टोबर नोव्हेंबर मध्ये वेल उपटल्यावर खाली मोठी कोनफळं दिसतात. दिवाळीनंतर बाजारात विकायला येतात. गुजराती उंधियोतील मुख्य पदार्थ. मुंबईत मालाड रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडे भाजी मार्केटमध्ये आता ढिगाने मिळतील. नवरात्रीच्यानंतर एकूण आठ प्रकारची कंदमुळे मिळू लागतात त्यात कोनफळ सर्वात उत्तम. बाल्कनीत कुंडीत ही वाढवता येतात.
३) पाणीपुरी- याबद्दल मुंबईत भरपूर प्रकार मिळतात.
४) दुधाचे पदार्थ मावा,रबडी,पेढे वगैरे - गुजरात, राजस्थान आणि ओडिशा प्रसिद्ध.
५) नारळ आणि शहाळी- ओडिशात भुवनेश्वर आणि पुरी येथे दहा पंधरा रुपयांत चौकाचौकांत सायकलवर विकत मिळतात.
६)भुट्टे का कीस - म्हणजे मक्याच्या कणसातील मक्याच्या सांजा. पण पांढरा मका जाऊन गोड मका ( स्वीट कॉर्न) फार येऊ लागला आणि गंमत संपली.
७) जोशी बडेवाले - याचा मालक कधीकधी बसतो तेव्हा तो बडा प्लेट कशी सजवतो हे पाहण्यासारखे आहे. ( यूट्यूब विडिओ आहेत).
८) फायर स्मोक पान - ही एक तरुणांसाठी गंमत आहे. (यूट्यूब विडिओ). चॅलेंज
९) सोडा - एका दमात ग्लासभर सोडा पिणे.(यूट्यूब विडिओ).चॅलेंज

Bhakti's picture

26 Dec 2023 - 6:50 pm | Bhakti

मस्तच प्रतिसाद!

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Dec 2023 - 11:53 am | राजेंद्र मेहेंदळे

पारनाका कल्याण येथे ताम्हणकरांच्या हॉटेलात मिळते.

जाहीरात
खाद्ययात्रा कल्याणची!!

कर्नलतपस्वी's picture

26 Dec 2023 - 5:42 pm | कर्नलतपस्वी

थोडक्यात काय, तुझं आहे तुझपाशी मग तू इंदूर ला कशास जाशी.

चांदणे संदीप's picture

26 Dec 2023 - 6:05 pm | चांदणे संदीप

इंदूर ला जाणार्‍यांसाठी हा लेख म्हणजे, चला, आटपा, निघा लौकर असा पाठीमागे लकडा लावणारा ठरेल. तोंपासु!
एक बार देखा (चखा) है, एक और बार देखने (चखने) की तमन्ना है असंच झालं मला लेख वाचून. :)

सं - दी - प

तोंपासू लेख, भटकंती!
दुपारीच प्रतिसाद दिला असता तर नक्कीच संध्याकाळी पाणीपुरी खाल्ली असती ;)

नचिकेत जवखेडकर's picture

27 Dec 2023 - 8:34 am | नचिकेत जवखेडकर

खल्लास!! कधी छप्पन आणि सराफाला जातोय असं झालंय. किमती साधारण आहेत का महाग वाटल्या नेहमीच्या स्टॉल्सपेक्षा?

प्रचेतस's picture

27 Dec 2023 - 8:48 am | प्रचेतस

नेहमीच्या स्टॉल्सइतकेच दर आहेत. ५/१० रु मागेपुढे. आम्हा तिघा मित्रांचे मिळून ७३५ रू झाले.

गोरगावलेकर's picture

27 Dec 2023 - 8:41 am | गोरगावलेकर

फोटो आणि लेख दोन्हीही आवडले. आता जायलाच हवे एकदा चव चाखायला

विजुभाऊ's picture

27 Dec 2023 - 3:24 pm | विजुभाऊ

इंदूर म्हणजे शाकाहारी खवय्यांसाठी झकास जागा.
छप्पन दुकान हा भाग आता बराच बदलला आहे. तेथे पूर्वी छोटी छोटी दुकाने होती. त्यांच्या संख्येवरून छप्पन दुकान हे नाव पडले.
इंदुरात तुम्ही शिकंजी खाउन पहा. ( रबडीची बहीण असते ही)
इंदुरात सर्राफ्यातले पोहे लाजवाब असतात.
समोसा , खस्ता कचोरी तर विचारूच नका.
सकाळी सकाळी लोकाना पोहे खाऊन झाल्यावर दूध आणि जलेबी हे पदार्थ तर हवेतच

जास्त गोड नको म्हणून शिकंजी पिणे टाळले. बाकी पोहे तर जागोजागी आहेत. अगदी १० रुपयांपासून मिळतात.

इंदोर, उज्जैन भाग मुंबई -पुणे कडून रेल्वेने जायचे झाल्यास प्रथम खांडवा येथे उतरून ओंकारेश्वरला जाणे. (खांडवा इंदोर मीटर गेज सध्या नाही. पण पूर्वी पंजाब मेलला जोडून एक गाडी थांबलेली असे.) ओंकारेश्वरला दर्शन करून माहेश्वरला (४०)जाऊन मुक्काम करणे. तिथून मांडू (४०)एक मुक्काम. तिथून इंदोर (८०) एक मुक्काम. तिथून उज्जैन(५०) एक मुक्काम. तिथून रेल्वेने परत. असा प्लान सोपा पडतो. सावकाश शहरे पाहून होतात.
इंदोरला राहून १)ओंकारेश्वर माहेश्वर, २)मांडू धार, ३)उज्जैन अशा मात्र वाहनाने करतात ते फार उडत उडत आणि वेळखाऊ असते. टॅक्सी, बोटवाले आणि पुजारी लुटायला बघतात. सगळं फिक्सिंग असतं.
(एक सुचवली. सर्वांनी असंच करावं असा आग्रह नाही.)

प्रचेतस's picture

28 Dec 2023 - 11:51 am | प्रचेतस

आम्ही कारने गेल्यामुळे पुढिलप्रमाणे प्लान केला होता.

दिवस ०- पुण्यातून संध्याकाळी पाचला निघून रात्री 2 च्या आसपास मध्य प्रदेशात प्रवेश करून एका ढाब्यापाशी कार पार्क करून गाडीतच थोडी विश्रांती घेतली.

दिवस १- पहाटे पाचला निघून सात वाजेपर्यंत मांडवला पोहोचलो. भल्या सकाळी सोनगड किल्ला पाहून हॉटेल जहाजमहालला रूम ताब्यात घेऊन दोन तास आराम केला. हॉटेल अगदी तळ्याच्या काठाशी आणि निसर्गरम्य आहे, मोठ्या खोल्या. साडेदहाला बाहेर पडून स्थानिक गाईड घेऊन रूपमती महाल, बाजबहादूर पॅलेस, जामी मशीद, अश्रफी महाल, श्रीराम मंदिर, होशंगशाह मकबरा, जहाज महाल, हिंदोळा महाल, जल महाल, लोहानी गुंफा इत्यादी आकर्षणे बघून हॉटेलवर परत, रात्री जेवायला दादाजी मध्ये अप्रतिम दाल बाफले आणि दाल पानिये

दिवस २ - सकाळी ९ वाजता निघून साडेदहाच्या आसपास इंदूरास हॉटेल जिंजर येथे आगमन. बिझनेस क्लास हॉटेल असल्याने रूम लहान आहेत. दुपारी छप्पन दुकानला खादाडी आणि तिथून जवळच अपना स्वीट्समधून खरेदी. संध्याकाळी एबी रोडवर जरा भटकून रात्री ९ च्या आसपास सराफ्याला गेलो. येथे रिक्षानेच जावे. स्वतःची गाडी असल्यास येथे आणू नये, पार्किंग नाही. रात्री बाराच्या पुढे परत हॉटेलवर.

दिवस ३ - सकाळी निवांत उठून दुपारी बाराच्या आसपास उज्जैन गाठले. वाहनतळावर गाडी लावून २५० रु चा व्हिआयपी पास काढून पंधरा वीस मिनिटात महाकालाचे दर्शन झाले. जेवण करून इ बाईक रिक्षाने कालभैरव, गंडकालिका, संदीपनी आश्रम, मंगळग्रहमंदिर आणि सिद्धवट पाच ठिकाणे फिरवतात. जुनी बांधकामे लोप पावल्याने सगळीकडे आधुनिक सिमेंटचे बांधकामच दिसते. येथे न गेल्यासही फारसा फरक पडत नाही किंवा बघायचे राहिले याची चुटपुट लागत नाही. माणशी १०० ते १५० रु घेतात ठिकाणे दाखवायचे. वाहनतळावर संध्याकाळी परत येऊन मात्र महाकाल मंदिरानजीकचा महाकाल लोक कॉरिडॉर बघणे अवश्य. दिवसापेक्षा रात्री त्याचे सौंदर्य अधिक. ८ वाजता निघून नऊच्या आसपास परत इंदूरला पोहोचलो. सराफ्यात न जाता बापू की कुटिया मध्ये जेवण केले. जेवण एकदम रुचकर आहे.

दिवस ४ - सकाळी आठ वाजता ओंकारेश्वरसाठी निघालो. रस्ता बराच खराब आहे, शिवाय चार लेनचे बांधकाम सुरू असल्याने डायव्हर्जन्स आहेत. दोन तास लागतात. एकदम बाजारू तीर्थक्षेत्र आहे. १२:१५ ला मंदिर तासभर आरतीसाठी बंद राहते त्यामुळे खूप गर्दी होते, ३०० रु चा व्हिआयपी पास काढूनही पाऊण तास लाईनीत उभे राहावे लागले. मात्र मंदिर बंद व्हायच्या दर्शन झाले. उज्जैनला महाकालासाठी दर्शनाचे नियोजन उत्तम तर ओंकारेश्वरला नुसता केओस आहे. ओंकारेश्वर करून तीनच्या आसपास महेश्वरला पोहोचलो. अतिशय उत्तम. निवांत शहर. नर्मदेचे सुरेख पात्र आणि काठावरील मंदिरे. अहिल्याबाईंचा राजवाडा, तसेच इतर मंदिरे पाहिली, थोडं गावात भटकून परत संध्याकाळी नर्मदेच्या घाटावर आलो. अंधार झाल्यावर लोक नर्मदेत दिवे सोडतात, सुंदर दृश्य आहे ते. साडेसातच्या आसपास महेश्वर सोडून साडेदहाला धुळ्यात पोहोचलो. हायवेवर टॉपलाईन रिसॉर्टवर रात्रीचा मुक्काम.

दिवस ५ - सकाळी साडेसातला धुळे सोडले. साधारण ३० किमी अंतरावर हायवेवरच झोडगे गावी माणकेश्वर महादेवाचे भूमिज शैलीतले शिल्पसमृद्ध देवालय आहे. ते पाहून लासलगाव,विंचूर फाटा, नांदूरमध्यमेश्वर मार्गे सिन्नरला गोंदेश्वर मंदिर पाहिले. आणि वाटेत जेवण करून संध्याकाळी साडेपाच वाजेतो पुण्यात परत.

सगळा प्लान व्यवस्थित आखल्यामुळे कुठेही उलटसुलट जावे लागले नाही. कमी वेळात सर्व ठिकाणे व्यवस्थित पाहून झाली.

तुमचं स्वतःचं वाहन असल्याने शक्य झाले. मात्र भाड्याचे वाहन महागात पडते.

तुषार काळभोर's picture

28 Dec 2023 - 3:12 pm | तुषार काळभोर

इतकं फिरून, इतकं पाहून पाचव्या दिवशी पुण्यात परत, म्हणजे अगदी काटेकोर नियोजन झाले.

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Dec 2023 - 11:51 am | अमरेंद्र बाहुबली

सहमत आहे. इंदोरातून सुरू करनार असाल तर पुढील प्रमाणे करावे. पहाटे पहाटे कारने इंदोरहून निघून सरळ ओंकारेश्वर गाठावं. ओंकारेश्वर मोठं आहे नी बेट पुर्ण पाहनार असाल तर दिवस जाईल, दोनेक तासात ओंकारेश्वर आटोपून बाजूलाच बाजिराव पेशवे समाधी (३०किमी) पहावी. मस्त दुपारी कडक ऊन्हात नर्मदा नदी नी समाधी पाहण्यात मजा येते. तिकडून तडक निघून तास दिड तासात महेश्वर पोहोचावे. दुपारी तीन नंतर सुंदर दिसतो घाट. महेश्वरात पायपीट बरीच होते. मूक्काम करून सकाळी मांडू, धारचा किल्ला नी मग इंदोर परत. ऊज्जैन मध्ये महाकाल मंदीर नी कालभैरव करावे. वाटल्यास जवळच देवासच्या च्या टेकडीवरील देवीही करावी.
ह्या सर्व प्रवासात गर्दी वीरहीत बाजीराव पेशवे समाधी खुप लक्षात राहील. मी ह्यावर्षी जानेवारीत गेलो होतो. समाधी पासून समांतर अंतरावर नदीत एक चौथरा आहे त्यावर महादेवाची पिंड आहे. तो चौथरा कसला हे कळाले नाही नावीक बोलला का घोड्याची समाधी आहे.

Nitin Palkar's picture

28 Dec 2023 - 7:26 pm | Nitin Palkar

सुंदर लेख.. आणि त्याहीपेक्षा सुंदर प्र. चि.
_/\_

सराफा बाजार हे केवळ खादाडी नसून गंमत करण्याची जागा.

विडिओतील मैथिली, रिषभ ,अयाचि ठाकूर ही प्रसिद्ध गाणारी मंडळी आहेत.
https://youtu.be/Xj4OnvQMNyE?si=p8lASSPro2ohO31s

टर्मीनेटर's picture

14 Jan 2024 - 10:10 pm | टर्मीनेटर

लेख वाचल्यावर सराफावरुन "तेरा सराफा ऐसा हैं..." हे गाणं आठवले 😍

काय ते एक एक पदार्थ... वाह!
इंदोरला दोन वेळा गेलो आहे (एकदा कामासाठी तर एकदा आमच्या सारख्या 'भोगी' लोकांची झटपट नर्मदा परिक्रमा करण्यासाठी 😉) पण हा सराफा आणि अब तक 'छप्पन' वगैरे बघितले नाहिये. आता सराफ्यातल्या खादाडीसाठी एकदा खास तिथे जावे लागणार!