काही नाती अशी असतात की ती कितीही जुनी झाली तरी नि:स्वार्थी, प्रेमळ, मन प्रसन्न, ताजीतवानी ठेवणारी. असेच एक नाते, ते म्हणजे बायकोची बहीण. या नात्याबद्दल काय सांगायचे.. बायको या फ्रंटवर लढण्यासाठी असलेला एकमेव मित्रपक्ष. तर सांगायचे प्रयोजन असे की आग्रहाचे निमंत्रण पेंडिंग होते. बरेच दिवस झाले जायचा योग येत नव्हता. पण म्हणतात ना, किस्मत से जादा और समय से पहले कुछ भी नही मिलताl शेवटी एकदाचा योग आला. पुणे-हैदराबाद शताब्दीचे तिकीट आरक्षित झाले. खरे तर मला चारचाकीने जायचे होते, बर्याच दिवसांत चारचाकीने दूरचा प्रवास केला नव्हता. पण घरातील सर्वानी मला 'म्हातारे झालात' म्हणून गप्प केले. चांगला एक आठवड्याचा मुक्काम ठरला.
इयत्ता चौथीपासून माहीत झाले, हैदराबाद म्हणजे चार मिनार (इतिहासाच्या पेपरातील एक मार्क पक्का) पुढे निजाम, मराठी साम्राज्य, गोवळकोंड्याचा किल्ला, कुतूबशाही, रझाकार, पोलीस अॅक्शन इत्यादीमुळे ओळख वाढत गेली.
नोकरीमुळे येणे-जाणे आधीपासून चालू होते. बरेच वेळा अगोदर गेलो असल्याने, स्थानिक गोष्टी बघून झाल्या होत्या. लग्नानंतर हैदराबाद फ्रीक्वेंट फ्लायर डेस्टिनेशन बनले.
'D' day'च्या आदल्या रात्री सामानाची बांधाबांध करताना नटश्रेष्ठ प्रो. लक्ष्मण देशपांडेच्या 'वऱ्हाड'ची आठवण आली. आमच्या सौसुद्धा मराठवाडी, वर्णन तंतोतंत लागू पडते.
दोन दिवस खुप उमस होती. उकाड्याने जीव नकोसा झाला होता. छतावरचा पंखा मालकाला थंडावा देण्यासाठी इमानेइतबारे जीव खाऊन पळत होता. सकाळी लवकर उठून हैदराबाद शताब्दी पकडायची होती. साडेचारची ओला बुक केली, बरोबर मनातल्या मनात पहाटे तीनचा गजर लावला (माझे बायलाॅजिकल घड्याळ अजून तरी मस्त चाललेय) व निद्राधीन झालो. तसा 'प्लॅन बी' म्हणून मोबाइललासुद्धा तीन वाजता उठव म्हणून बजावले.
मी आगोदर उठलो. नंतर मोबाईलने बांग दिली. 'प्लॅन बी'ची जरूर पडली नाही. खिडकीतून बाहेर नजर टाकली. झमाझम, मुसळधार पाऊस पडत होता. बत्ती गुल होती. फटाफट तयार झालो. इतरांनाही तयार होण्यास मदत केली. हुकमावर हुकूम कानावर आदळत होते, सवयीनुसार त्यांचे पालन होत होते.
प्रवासातील पहिला झटका - ओला बुकिंग रद्द झाले होते. 'जोरदार पावसामुळे पाणी तुंबले आहे, येत नाही (जा!!...)' इतका वेळ ऑर्डर्सवर ऑर्डर्स सोडणारा कर्णकर्कश आवाज अचानक कर्णमधुर झाला. कुटुंब माझ्याकडे तारणहार म्हणून प्रेमळ नजरेने बघून घायाळ करत होते. परिस्थितीच तशी आणीबाणीची होती. सकाळचे पाच वाजले होते. पाच पंचावन्नची शताब्दी पकडायची, मुसळधार पाऊस, रेल्वे स्थानक घरापासून अर्धा तास दूर, अर्थात वाहतूक कोंडी नसेल तरच. फटफटू, झुंजूमुंजूची वेळ असली तरी काळ्याकुट्ट मेघांनी सूर्यनारायणाचा रस्ता अडवला होता. सारे काही शांत होते, फक्त आणि फक्त पावसाचा आवाज येत होता.
आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे
घेऊन एकतारी गातो कबीर दोहे,
अशी सभोवार परिस्थिती, तर माझी..
अंधार दाटला घोर, नजर भिरभिरती
दीपस्तंभ का दिसेना, चुकचुकते कोण आढ्यावरती
शताब्दी मिळते की चुकते, या विचाराने मन साशंक झाले. तरीसुद्धा, "मै हूं ना" असे डोळ्यात भाव आणले. पण..
कळा ज्या लागल्या जीवा मला की ईश्वरा ठाव्या!
कुणाला काय हो त्यांचे ? कुणाला काय सांगाव्या ?
पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मनात निराशेचे ढग दाटून आले.
नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा
भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौंकडे दावा.
'भुतांची' म्हणजे 'भूतां परस्परे..'सारखी भुते. ही भुते खऱ्या भुतावळीपेक्षा जास्त खतरनाक असतात.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले होते. गाणे गुणगुणत स्वत:ला सावरू लागलो.
'सदैव सैनिकां पुढेच जायचे
न मागुती तुला कधी फिरायचे'
या काव्यपंक्ती मनाला धीर देत होत्या. सवयीनुसार 'प्लॅन बी' तयार होता. पण पुन्हा एकदा ओला/उबर बुकिंग करून बघू, नाहीतर 'प्लॅन बी' अमलात आणू, असा विचार केला.
प्लॅन बी गुलदस्त्यातच राहिला. उबरने कृपावंत होऊन चारचाकी धाडली. स्थानकाकडे प्रयाण केले. सर्व रस्ते खरोखर पाण्याने दुथडी भरून वाहत होते. हसतमुख चालक बघून जिवात जीव आला. रक्तचाप थोडा कमी झाला. स्टेशनजवळ पोहोचत असताना त्याने विचारले, "शताब्दी सहा नंबरवर लागणार आहे, पाठीमागून प्लॅटफॉर्म जवळ पडेल." त्याची आत्मीयता व प्रसंगावधान पाहून गदगदून आले. मी काही बोलणार, तेवढ्यात कुटुंब म्हणाले, "नको,नको, तिकडून खुप मोठ्ठा जिना आहे, पुढच्या बाजुलाच सोडा." मी काही बोललोच नाही, कारण बोलून काही फायदाच नव्हता. पावसाचा जोर कायम होता, त्या अवकाळी वेळेतसुद्धा वाहतूक कोंडी, सगळेच मुसळ पाण्यात, (मला केरात म्हणायचे होते). पुन्हा एकदा देवदूताने कुशलतेने कोंडी फोडत सफाईदारपणे चारचाकी सुखरूप रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस आणून उभी केली. पाच पंचेचाळीस झाले होते. दरवाजा उघडताच लाल शर्टमध्ये आणखी एक देवदूत उभाच होता. पटापट एंट्रन्स गेटवर पोहोचलो.
उद्घोषिकेचे मंजुळ स्वर कानावर पडले. "गाडी नंबर बारा हजार पंचवीस पुण्यावरून हैदराबादकडे जाणारी शताब्दी एक्स्प्रेस फलाट क्रमांक सहावर जाण्यास तयार आहे, तुमची यात्रा मंगलमय होवो." धडधड वाढली, पण सोबत आश्चर्याचा आणखी एक धक्का बसला - मठ्ठ, मख्ख लोखंडी जिन्याच्या जागी हुश्शार सरकत्या काळ्या पिवळ्या पायघड्या (Escalator) प्रवाशांना सफाईदारपणे न थकवता वाहून नेताना दिसल्या. पाच सत्तेचाळीस झाले होते. तीनच मिनिटे उरली होती फक्त, 'And your time start now', अंतराळातून बच्चनवाणी (K B C) ऐकू आली. कुली (मराठी शब्द जरी हमाल असला, तरी कुली म्हणणे वेगळाच फिल देतो) हा प्राणी अशा वेळेस तारणहार वाटतो. सर्व कौशल्य पणाला लावून त्याने गाडीत सामानासकट आम्हांला कोंबले. केवढे कौतुक वाटले म्हणून सांगू. कानात संदीप खरे कुजबुजत होते -
गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन ओले
गाडी सुटली, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले
आम्हीं सकुसप (सह कुटुंब सह परिवार) जात होतो. फलाटावर इतरांचे हलणारे रुमाल आणि पाणीदार डोळे पाहत होतो.
तेवढ्या घाईत, शहारूख खानचा तो 'सारी कायनात जुट जाती है, ब्ला ब्ला..'वाला डायलॉग आठवला. म्हणतात ना, मन चंचल चपळ..
हुश्श.. सर्व काही व्यवस्थित झाले. गाडीत बसलो आणि पाऊस थांबला. जणू काही माझी परीक्षा घेण्यासाठीच आला होता. पावसातली अग्निपरीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालो.
प्रवास सुखकर चालू होता. खाण्यापिण्याची रेलचेल होती. बाहेरचे वातावरण बघून पर्जन्यराजाने दिलेली ओढ जाणवत होती. अस्मानीमुळे रान आबादानी नव्हते. हैदराबादजवळ पोहोचत असताना फोन आला, "कुठे उतरणार आहात? बेगमपेठ ते आमचे घर दहा कि.मी. अंतर आहे, तर सिकंदराबादवरून पंधरा कि.मी. पण बेगमपेठला फक्त एकच मिनिटाचा थांबा. (सवारी अपने सामान की खुद जिम्मेवार हैं.)" एका मिनिटात खाली उतरणे थोडे अशक्य वाटत होते. मी म्हणालो, "आपण शेवटचा स्टाॅप सिकंदराबादला आरामात उतरू. उगाच घाई गडबड नको." अपेक्षित उत्तर आले, "कशाला उगाच? वेळ लागेल, बेगमपेठ ते सिकंदराबाद गाडी चाळीस मिनिटे घेते. सिकंदराबादला पोहोचण्याअगोदरच आपण घरी असू. (केव्हढा आत्मविश्वास), आपण बेगमपेठलाच उतरू." तुम्हीं अगोदर सर्व सामान घेऊन दारापाशी थांबा, पटकन उतरून जाऊ." गाडीवानाला माझ्यावर दया आली. एक मिनिटाऐवजी तब्बल पाच मिनिटे गाडी थांबवली. "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" असे म्हणून गाडीने फलाटावरून सिकंदराबादकडे प्रस्थान केले.
सामानाची मोजदाद करताना 'बेगमपेठ' असे तीन वेगवेगळ्या भाषांतील सिमेंटच्या पिवळ्या फलकाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाच्या नकळत दणक्यात सेल्फी घेतला व तेवढ्याच सफाईदारपणे 'बेगमपेठ में बेगम के साथ' टॅग लाइनसह कायप्पावर टेपला.
बाकी, कुली, रिक्षावाला यांच्याबरोबर गोड बोलत व "तुम्ही थाबां हो" म्हणत कुटुंबाने पुढाकार घेतला व उदारवादी धोरण स्वीकारून त्यांच्या सर्व मागण्या परस्पर मान्य केल्या.
रिक्षाचालक मस्त बडबड्या होता. त्याला बोलते करावे म्हणून मी म्हणलो, "तेलंगणा के लोक सिंम्पल होते है." इथले लोक हिंदी चांगले समजतात, बोलतात. बोलण्याची पद्धत खुपच मजेशीर आहे. 'द अंग्रेज' चित्रपट पाहिला तर कळेल.
'द अंग्रेज', लिंक दिलीय, जरूर बघा. फुल्ल २ धमाल.
द अंग्रेज
आता मी गप्प झालो व तो सुरू झाला. गणपतीबाप्पाच्या मोठ्ठ्या मूर्ती रस्त्याच्या दोन्ही बाजूंना न्याहाळत होतो. "हौव, इस गलीमें सबसे बडा गणेश होना, पेपरमें गिरता कते" त्याला काय म्हणायचे ते मला समजले का नाही, याची पर्वा न करता त्याची बडबड सुरूच राहिली. सरतेशेवटी आमची सवारी पाहुण्यांच्या घरी पोहोचली.
नवीन घर होते, वास्तूची ओळख झाली, वा, मस्त, छान असे करत दिवाणखान्यात येऊन बसलो. सेंटर टेबलावर वाफाळलेला चहा, खास खाद्यपदार्थ बघून तरतरी आली. गप्पांचा दौर सुरू झाला. "हे घ्या ना, खास तुमच्याच साठी मागवलयं." कागदाच्या पुडीसारखा पदार्थ घेण्याचा आग्रह झाला. "पुडी सोडू नका, तसेच खा." एक तुकडा तोडला, तोंडातच विरघळला."वा ,मस्तच" एवढाच शब्द फुटला. "काय नाव याचे?" मेव्हणी म्हणाली "पुथारेकुलू" दोन-तीन वेळा ऐकल्यावर नाव कळले.
putharekulu
"दोन दिवसांपूर्वी मैत्रैयपुरमला गेलो होतो, तिथली स्पेशालिटी आहे." सर्वांना आवडली, जाताना घेऊन जाऊ. अॅमेझॉनवर ऑर्डर करू शकतो कळल्यावर आणखीनच आश्चर्य वाटले.. आणि गलेमासाठी (गणेश लेखमाला) विषय मिळाला. अगदी अशीच मिठाई 'बाकलावा पिस्ता रोल' तुर्कियेची प्रसिद्ध मिठाई (Turkish sweet) अम्रिकेत खायला मिळाली होती.
पुथारेकुलू (పూతరేకులు)
तेलुगूमध्ये 'पुथा' म्हणजे परत (Layer) आणि 'रेकू' (बहुवचन रेकुलू) पान किंवा चादर (Sheets). तांदळाचा पातळ आटा घेऊन त्याच्यापासून बटर पेपरपेक्षाही पातळ अशी परत (सोईस्कर म्हणून याला आपण तांदळाच्या पिठाचा रुमाल असे म्हणू) बनवून त्यात सारण घालून बनवलेली मिठाई.
जन्मस्थान - मैत्रैयपुरम, गौतमी गोदावरी आणी वसिष्ठ गोदावरी या नद्याच्यां दोआबात ऋषी अत्री यांच्या नावाने वसलेले अज्ञात छोटेसेच खेडेगाव. आता तेलंगण, पूर्वी आंध्र प्रदेश, ईस्ट गोदावरी जिल्ह्यातील एक छोटेसे खेडेगाव.
जन्मतारीख - नक्की माहीत नाही, पण दोनशे-तीनशे वर्षांहून अधिक.
जन्माची गोष्ट - कर्नाटकमधली एक युवती मैत्रैयपुरम गावात लग्न करून आली. एक दिवस भाताची हांडी उकडवताना त्यातील पेज त्या हांडीच्या बाहेर आली व उष्णतेने ती वाळली. त्या बनलेल्या पापडीवर तिने चांगले तूप, साखर घालून मिठाई बनवली. ही या मिठाईची जन्मकथा.
(माझ्या लहानपणी आमच्या घरी वरण आणि भात बनवण्यासाठी दोन वेगळी पितळेची भांडी होती, ज्याला 'टोप' असे म्हणायचे, भात वरण उतू गेल्यावर मीसुद्धा आशी पापडी जमताना बघितली होती. पण कधी डोके चालले नाही. नाहीतर ही मिठाई आज महाराष्ट्राची शान ठरली असती. कदाचित चितळे, काका, कराची आज माझ्यावर जळले असते. मुकला महाराष्ट्र एका जी आय टॅगला..)
पुढे त्यात सुधारणा होत गेली. शाही परिवाराची मुख्य,आवडती मिठाई बनली. सुरुवातीला फक्त शाही परिवारातच बनत असे.आज घराघरात ही मिठाई दिसते.
जिने इतक्या मस्त,चविष्ट मिठाईचा शोध लावला, त्या अज्ञात गृहिणीला (Unsung) कोटी कोटी धन्यवाद.आज ही मिठाई जगभरात प्रसिद्ध आहे. लवकरच या मिठाईला जी आय टॅग (Geographical Indications Tag) मिळण्याची शक्यता आहे. छोटेसे खेडेगाव मैत्रेयपुरम जी आय टॅगद्वारे जगाच्या नकाशावर दिसू लागेल व देशाचे नाव बुलंद करेल, यात शंकाच नाही.
आज त्या माउलीमुळे दोन हजारपेक्षा जास्त महिलांना गृहउद्योग मिळाला, तर एवढ्या छोट्या गावात पाच हजारांहून जास्त उद्योगपती याचा व्यवसाय करत आहेत. इथल्या मिठाईला इतकी मागणी आहे की ती पूर्ण करण्यास चोवीस तासही कमी पडत आहेत.
काही विशेष माहिती -
१. पुथारेकुलू मिठाई वीस ते तीस दिवस चव न बदलता टिकू शकते.
२. काळा डेरा (माठ) चुलीवर उलटा ठेवून गरम करण्यासाठी नारळाच्या झावळ्या इंधन म्हणून वापरतात. हे इंधन कंटिन्युअस विशेष तापमान देते व तांदळाच्या बॅटरपासुन पेपर शीट्स बनवताना लगणारी उष्णता एकसारखी राहते.
३. नारळाच्या झावळ्या पुरवणे हा एक जोडधंदा स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
४. चविष्टपणा आणि विविधता आणण्यासाठी यात डबल/सिंगल शीट्समध्ये गूळ, साखर, ड्रायफ्रूट्स चवीनुसार सारण म्हणून विविध पदार्थ वापरतात.
५. १५ ते २५ रुपये एक पीस अशी किमान किंमत आहे.
रेसिपी
पुथरेकुलू हे एक लोकप्रिय दक्षिण भारतीय मिष्टान्न आहे. हे तयार करण्याची एक विशेष कला व मनोरंजक पद्धत आहे. तांदळाच्या पिठाच्या घोळात रुमाल बुडवून उलट्या तापलेल्या डेरा/कढईवर (जसे वऱ्हाडात मांडे बनवण्यात वापरतात) पसरवून पोथारेकुलू तयार केले जाते. कढईवर पिठाचा डाग राहण्यासाठी रुमाल त्वरित काढून टाकला जातो. गरम कढईमुळे ते कागदापेक्षा पातळ व कुरकुरीत होतात. नंतर त्यावर तूप आणि साखर पसरवून विशिष्ट प्रकारे पुथारेकुलूला दुमडून रोल बनवले जातात. अशा रितीने चविष्ट आणि पौष्टिक पुथारेकुलू तयार होतात. अत्यंत सोपी अशी ही दक्षिण भारतीय रेसिपी एकदा तरी नक्की करून पाहा. साहित्य आणि बनवण्याची पद्धत खाली दिली आहे.
पुथारेकुलू बनवण्याकरता साहित्य
१. १०० ग्रॅम तांदूळ.
२. ५० मि.ली. पाणी.
३ ४ चमचे साखर.
४. ४ चमचे तूप.
पुथारेकुलू कसे बनवायचे!
१. प्रथम तांदूळ २-३ वेळा धुवा आणि किमान २ तास पाण्यात भिजवा.
३. ग्राइंडरचा वापर करून, पाण्यात भिजवलेल्या तांदळाचे मऊ बारीक पीठ करून घ्या.
४. आता एक भांडे स्टोव्हवर उलट्या स्थितीत ठेवा आणि ते गरम होऊ द्या. (चूल आणी डेरासुद्धा वापरू शकतो. खाली दिलेली चित्रफीत बघा.)
५. पुथरेकुलू बनवण्यासाठी स्वच्छ पातळ पांढरे शुभ्र चौकोनी कापड (रुमाल) वापरा.
६. दळलेले पीठ घ्या, त्यात पाणी घाला, ते पातळ एकसंध गुठळीविरहित घोळ (Batter) बनवा . त्यात घेतलेले कापड व्यवस्थित बुडवा.
७. कढईची मागील बाजू तुपाने चोपडून घ्या. बुडवलेला रुमाल कढईवर पसरवा आणि पटकन काढा. कढईला पातळ पिठाचा कोट होईल असे बघा.
८. पातळ पिठाचा कोट क्षणार्धात कुरकुरीत होईल. हाच आपला पुथारेकुलू. तो कुरकुरीत झाल्यावर काढून घ्या.
९. अधिक पुथरेकुलू बनवण्यासाठी हीच प्रक्रिया पुन्हा करा.
१०. आता तांदळाचे बनवलेले पुथरेकुलू घ्या, बाजूला एकावर एक ठेवा.
११. आता बनवलेल्या पुथरेकुलूवर एक चमचा तूप पसरवा आणि एक चमचा साखर/गुळाची पावडर, ड्रायफ्रूट्स समान रितीने पसरवा. आता सर्व बाजू आतील बाजूने दुमडून एक आयताकृती पुथारेकुलू बनवा. पूर्ण झाल्यावर रोल तयार करण्यासाठी एका बाजूने दुमडून घ्या.
१२. आलेल्या पाहुण्यांसमोर सर्व्ह करा.
इतर महत्त्वाची माहिती -
१. प्रति नग वजन - १८ ते २२ ग्रॅम.
२. कॅलरीज १५८
३. एकूण चरबी ४ ग्रॅम
४. एकूण कर्बोदके ३१ ग्रॅम
५. एकूण प्रथिने २ ग्रॅम
तूनळीवरील संदर्भ.
पुथारेकुलू
पुथारेकुलू
बाकलावा पिस्ता रोल्स
बाकलावा, तुर्कियेचा (Turkish) पारंपरिक पदार्थ, पुथारेकुलूसदृश, पण कणकेच्या पातळ परत (Sheets)मध्ये पिस्ता, अक्रोड, बदाम भरून बनवले जाते. या मिठाईचा इतिहास खुप जुना, ऑटोमन तुर्की साम्राज्यापर्यंत जात असावा, याचा काही संदर्भ लागत नाही.
सतराव्या शतकात इस्तंबूलमध्ये टोपकापी राजवाड्यातील मुदपाकखान्यात या मिठाईचा जन्म झाला, असेही म्हणतात. तेथील सुलतान रमजानच्या पंधरव्या दिवशी आपल्या सैनिकांनी ही मिठाई देत असे. याला 'द बाकलावा परेड' असेही म्हणायचे. हे एक प्रकारचे शक्तिप्रदर्शन होते. बाकलावा या मिठाईला 'फिलो पेस्ट्रीज' या नावानेसुद्धा ओळखतात. तुर्किये, इराण, अरब ग्रीस, बाल्कन, दक्षिण कॉकेशस, सोमालिया आणि मध्य आशियामधली एक प्रसिद्ध मिठाई आहे.
आंतरजालावर विविध प्रकारची माहिती उपलब्ध आहे.
अपुन क्या मतलब किसीसे
इतिहास या भूगोल से,
अपुन को मतलब सिर्फ मिठाई खानेसे.....
बाकलावा पिस्ता रोल्स
आभारप्रदर्शन -
अंतरजालावर मिळालेल्या माहितीवरून.
संकलकांचे मनापासून आभार.
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. चविष्ट पुथारेकुलू बाप्पाला नवीन खिरापत म्हणून बनवा. भक्त आणि बाप्पा दोघे आनंदित व्हाल, अशी अपेक्षा.
प्रतिक्रिया
27 Sep 2023 - 12:11 pm | कर्नलतपस्वी
पुथारेकुलू
https://youtu.be/FBu7aHLqwMs?si=35jXQoehX4o-fWe1
बाकलावा पिस्ता रोल
https://youtu.be/iCROD7Kd0HQ?si=CQnAJOgiDF5Yrse7
27 Sep 2023 - 12:13 pm | कर्नलतपस्वी
https://youtu.be/iIc0PLt2vM0?si=RDWU4zpkKLYpL4Ae
27 Sep 2023 - 12:28 pm | राजेंद्र मेहेंदळे
खुसखुशीत लेख आणि खुसशुशीत पुथारेकुलु. पावसामुळे गाडी चुकते की काय अशी भिती वाटत होती, पण नीट पावते झालात हे बरे झाले.
लगेच अमेझॉनवर जाउन शोधले तर २५० ते ६५० अशा वेगवेगळ्या किंमती दिसल्या. कदाचित सारण कुठले त्यावर ठरत असावे. नक्की खाउन बघणार. आणि द अंग्रेजही बगह्तो विकांताला.
30 Sep 2023 - 7:58 pm | सुखी
कुठले मागवले त्याची लिंक अन् चव अवडल्यास कळवावे म्हणजे तसे मागवता येतील
27 Sep 2023 - 7:55 pm | विजुभाऊ
द अंग्रेज हा चित्रपट आल्या नंतर तशा चित्रपटांची लाट आली होती.
पुथुरेकुलू खाल्ला आहे. करायचा प्रयत्न केला नाही कधी.
पण गुळ ,तीळ, थोडेसे खोबरे हे सारण असलेला सर्वात भन्नाट लागतो
27 Sep 2023 - 8:23 pm | कंजूस
इतिहास, भूगोल,पाककृती, मराठी वाङ्मय,तत्परता,आणि विनोदाची पुटे असलेला ताजा लेख.
मजा आली.
28 Sep 2023 - 12:26 pm | श्वेता व्यास
+१, सर्वच काही असलेला लेख आवडला.
30 Sep 2023 - 6:46 am | प्रचेतस
हेच म्हणतो.
एकदम अनवट पदार्थ समजला.
28 Sep 2023 - 12:54 pm | मुक्त विहारि
मस्तच
28 Sep 2023 - 2:07 pm | निमी
सुरेख सुंदर लेख..खरच तुमची गाडी चुकली नाही त्यामुळे मिठाईची गोडी आणखी वाढली.. शोलेमधल्या गब्बर सारखे 'ये हाथ मुझे दे दो कर्नल साब' म्हणावेसे वाटते.. हात तुमच्या लेखणीतील प्रतिभेसाठी..
28 Sep 2023 - 8:32 pm | Bhakti
खुप सुंदर लिहिले आहे.
अय्यो पण व्हिडिओ पाहून मला तुप साखर पोळी आठवली (हा हा).
29 Sep 2023 - 5:46 pm | चौथा कोनाडा
मस्त ... सुरेख ... लई झ्याक !
🧡
सुरुवातीचे वर्णन झकासच ,, वाचताना मजा आली ... गाण्यांच्या ओळींनी बहार आणली आणि डोळ्यांपुढे चित्र उभा केले.
द अंग्रेज सिनेमा पाहिला होता ... एक नंबर ...
पुथारेकुलू भारी दिसतंय ! एकदा चाखायला पाहिजे !
एकंदरीत लेख लै भारी टेस्टी झालाय !
29 Sep 2023 - 6:00 pm | कर्नलतपस्वी
वाचकांचे धन्यवाद.
29 Sep 2023 - 6:44 pm | रंगीला रतन
நேரம் கடந்து
:=)
29 Sep 2023 - 7:58 pm | कर्नलतपस्वी
నేను సమయానికి పంపాను కాని సాహిత్య సంపాదకుడే ఆలస్యం చేసాడు.
29 Sep 2023 - 8:02 pm | राजेंद्र मेहेंदळे
പാവങ്ങള് നിങ്ങളെ കുറ്റം പറയില്ല.
30 Sep 2023 - 3:30 pm | चौथा कोनाडा
আপনার প্রতিক্রিয়া পড়তে ভাল.
30 Sep 2023 - 5:32 pm | कर्नलतपस्वी
আমার প্রথম জিঙ্গাত ছিল বাঙালি,ধন্যবাদ.
30 Sep 2023 - 6:07 pm | चौथा कोनाडा
+१
😆
🧡
29 Sep 2023 - 7:06 pm | अमरेंद्र बाहुबली
हा पदार्थ मी आणला होता. मला फार आवडलेला. पण मी जे जे आणलं ते ते वाईटच अशी परंपरा असल्याने घरात कुणालाही आवडला नाही.
3 Oct 2023 - 2:25 pm | मुक्त विहारि
हा पदार्थ , तुम्हाला आवडला असेल तर, जास्त विचार न करता, परत आणा ...
3 Oct 2023 - 3:16 pm | अमरेंद्र बाहुबली
हो नक्की.
29 Sep 2023 - 8:29 pm | भागो
रंगीला रतन= वेळ निघून गेली.
कर्नलतपस्वी= मी वेळेवर पाठवले पण साहित्य संपादक उशिरा आले.
राजेंद्र मेहेंदळे =गरीब तुम्हाला दोष देणार नाही.
3 Oct 2023 - 11:54 am | नि३सोलपुरकर
कर्नलतपस्वी= मी वेळेवर पाठवले पण साहित्य संपादकांनी दिरंगाई केली.
_/\_
29 Sep 2023 - 9:42 pm | कर्नलतपस्वी
मिपाकरांना तेलगू बी येतयं की.
1 Oct 2023 - 12:11 pm | स्नेहा.K.
तांदळाचा पापुद्रा करून, त्यापासून इतका नाजूक पदार्थ बनवणं एकदम कल्पक आणि कौशल्यपूर्ण आहे.
चव छान असेल, यात शंका नाही.
1 Oct 2023 - 7:25 pm | सविता००१
करून पाहते येतोय का . वर्णन खूपच आवडलं
15 Oct 2023 - 11:48 am | आमोद
लेख आवडला