असाही एक वेडपट दिवस.

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
16 Sep 2023 - 9:49 am

असाही एक वेडपट दिवस.
आज रविवार होता. गेले दहा पंधरा दिवस बायको माझ्या बरोबर अजिबात भांडली नव्हती. माझ्या माहेरच्या मंडळींची तिला एकदाही आठवण झाली नव्हती. आमच्या कुटुंबाच्या सुखाच्या घडाळ्याचे तीनही काटे म्हणजे तास मिनिट आणि सेकंद काटे घडाळ्याप्रमाणे क्लॉकवाईज फिरत होते. एव्हढेच नव्हे तर तासकाटा एका तासाला एक तास, मिनिटकाट एका मिनिटाला एक मिनिट आणि छोटा सेकंद काटा एका सेकंदाला एक सेकंद ह्या गतीने फिरत होते. नाहीतर इतर वेळी तास काटा आणि मिनिट काटा उलट सुलट आणि वाटेल त्या गतीने फिरत असतात. असो असा योग क्वचितच येणार. मागे जेव्हा असा योग आला होता तेव्हा आम्ही “रेस्टॉरंट अॅट द एंड ऑफ द युनिवर्स” नावाच्या DIY मॉलेक्युलर कॅफेमध्ये गेलो होतो. तो किस्सा मी इथे लिहिला आहेच.
तर जेव्हा माझी बायको म्हणाली कि आपण “हिल्बर्ट’स इंफायनीट हॉटेल”ला चक्कर टाकूया, तेव्हा मी लगेच होकार भरला.
बायकोला ते ऐकून धक्का बसला, “पण तुम्ही नेहमीप्रमाणे तिरसटपणाने विचारले नाहीत “कशाला” म्हणून.”
मला अर्थात माहित होते “कशाला” ते. कालच्याच “लोकसत्तेत” “कशाला” ते आले होते. त्या हॉटेलात ड्रेस, कुर्ती, साड्या, पर्सेस, कानातली, हातातली, पायातली आणि अनेक इत्यादी आयटेम्सचे भव्य प्रदर्शन आणि सेल सुरु होता.
“युअर वीष सॉरी विश इज माय कमांड! जो हुकुम मेरे आका.” सौजन्य सप्ताह चालू होता.
मागल्या वेळी “थॉट एक्सप्रेस” घेऊन आम्ही गेलो होतो. पण आता फक्त चेंबूर ते बांद्रा असा प्रवास असल्याने सुझुकी घेऊन आम्ही निघालो.
बांद्र्याच्या जवळपास कटकटीला सुरवात झाली. सायन कडून बांद्र्याला जाताना उड्डाण पुलाने जावे लागते. हा मार्ग माझ्या गाडी खालचा होता. म्हणून मी मोठ्या मजेत गाडी चालत होतो. थोड्या वेळाने माझी बायको उपरोधिकपणाने कशी बोलते पहा, “मिस्टर भागो, तुमचं लक्ष कुठं आहे? आपण केव्हापासून ह्या फ्लाय-ओवर वर फिरतो आहोत.”
मी म्हणालो, “कुठ काय? मी ह्या गुगल पथदर्शकाप्रमाणे चाललो आहे. हे पहा आता “डाव्या बाजूला वळा” अस सांगतो आहे. ये रहा लेफ्ट टर्न.”
“अहो, पहा केलीत ना चूक. आपण उच्च गुरुत्वाकर्षण किंवा शक्तिशाली विद्युत-चुंबकीय क्षेत्राच्या भोवऱ्यात सापडलो आहोत. तेथे तुमचा गुगल काम करणार नाहीये. माझ्या डाव्या डोळ्याची पापणी फडफडते आहे, त्यावरून मला समजायला पाहिजे होते. आता उजव्या डोळ्याची पापणी फडफडते आहे उजव्या बाजूला वळा.”
गुगलला झिडकारून मी उजवा टर्न घेतला. आम्ही उड्डाण पुलाच्या दुसऱ्या मजल्यावर आलो होतो. हा प्रकार मला जरा नवीन होता. दोन मजली फ्लाय-ओवर!
“आता डाव्या बाजूचा...”
मी डाव्या बाजूला वळलो.
आता आम्ही फ्लाय-ओवरच्या तिसऱ्या लेवल वर आलो. बर झालं आम्ही चौथ्या मजल्यावर जायच्या आधीच पोलिसांनी आम्हाला अडवलं.
“हा मजला सार्वजनिक वापरासाठी नाही.”
“हे वाचलत? तुम्ही शिकलेलं लोक. अर्थ समजला कि नाही? हा मजला केवळ शाहरुख खान साठी राखीव आहे. अपॉईटमेंट आहे? नाही ना? अबाउट टर्न अन आल्या मार्गी परत जायचं.”
आम्ही परत फिरलो.
“आता काय?” मी बायकोला विचारले.
“खरच शाहरुख खान भेटला असता तर काय मज्जा आली असती नाही? मला त्याच्याशी “जवान” बद्दल डिस्कस करायचं होत. अहो, तुम्ही का नाही त्याची अपॉईटमेंट घेऊन ठेवली? आता लक्षात ठेवा. नेहमी त्याची अपॉईटमेंट खिशात ठेवत जा.”
“लक्षात ठेवा”च्या यादीत अजून एक भर.
“लक्षात ठेवेन हं. पण आता पुढे काय?”
“मघाशी कुठला टर्न घेतला होता? डावा ना? म आता उजवा घ्या.”
मी उजवा टर्न घेतला. काही वेळाने पुन्हा त्याच हवालदाराने गाडी थांबवली.
“पुन्हा तुमी? जेन्टलमन भाषेत बोललेलं तुम्हाला कसं समजणार? सांगितलं ना इकडे यायचं नाही म्हणून? चला, लायसन काढा. तुम्हा शिकलेल्या लोकांना दंडाचीच भाषा समजते. तसे नाही तुम्ही लोक ऐकणार.”
“हवालदार साहेब, तुम्ही मला फाईन का मारणार? मी काय गुन्हा केला? मी काही सिग्नल तोडला नाही, का स्पीड लिमिट क्रॉस केली नाही...”
हवालदार थोडा चक्रावला.
“कलम कुठलं लावायचं ते नंतर बघता येईल. कलमे हजार आहेत. उदाहरणार्थ शाहरुखच्या खुनाचा प्रयत्न. दहा वर्ष सश्रम कारावास. सरकारी कामात अडथळा. सहज एक दोन वर्ष जाल.”
“तुम्ही अस करा हापूस आंब्याच कलम लावा. पहिल्या बाराला शंभर रुपयला एक आंबा! अंब्याच कसलं हो, पैशाचच झाड म्हणाना! कलमी पैसे.”
“तुम्ही म्हणजे सुटलाच. जोक मारणं हा पण एक “कलमी गुन्हा” आहे, काढा काढा लायसन काढा.”
मी चुपचाप लायसन्स काढून दिले. त्यानं ते वाचलं. खाडकान एक कडक सल्यूट ठोकला. मी चकित झालो. माझ्या लायसन्सन अशी काय जादू केली?
“सर, भागो पाटील सर. दरवाजा उघडा प्लीज.”
“हवालदार साहेब, ह्या साईडचा दरवाजा परमनंटली लॉक झाला आहे.”
“का उगीच गरीबाची चेष्टा करता राव.” त्याने कुठलीही जादू न करता, दरवाज्याशी दंगामस्ती न करता गेले सहा महिने जाम असलेला दरवाजा हळुवार उघडला.
“गुरुजी, ह्या शिष्याला क्षमा करा,” माझ्या पायाला स्पर्श करून तो म्हणाला, “कधी स्वप्नातही वाटलं नव्हत कि आपली भेट होईल. सर मी पण तुमच्यासारखा एक साहित्तिक आहे. तुम्हाला गुरु करून म्या एकलव्याने तुमच्याच स्टाईलमध्ये एक गोष्ट लिहिली आहे. अर्थात त्याला तुमची सर कशी येणार, सर? तरीपण प्लीज जरा वाचा आणि रिपेर करून द्या, असं करतो ह्या रविवारी तुमच्या घरीच येतो...”
मधेच बायको मला म्हणाली, “लेखक महाशय, कथा रेंगाळती आहे. जरा जोर लावा आणि गाडी पुढे रेटा.”
ती काय बोलतेय ते हवालदाराला समजणे शक्य नव्हते. ती नजरेने बोलते ना.
“या.” इतके बोलून आवरतं घेतलं. हवालदाराने गाडीचे दार बंद केलं.
“हवालदार साहेब, आम्हाला त्या हॉटेलमध्ये जायचे आहे, पण ह्या फ्लायओव्हरने आम्हाला पकडून ठेवले आहे. सोडतच नाहीये कवाधरून.”
“हत्तीच्या मारी शेंडी टोपी! पहिलेच बोलायचे नाय का? तुम्ही असं कराल, ह्या रस्त्यानं अस सरळ जाणार. हॉटेलच्या लॉबीत पोचणार.”

त्याचा सल्ला मानून आम्ही सरळ गेलो आणि काय आश्चर्य आम्ही हॉटेलच्या लॉबीत पोचलो.
हुश्श्य!
लॉबीत एक सुंदरी म्हणजे दिसायला अगदी त्या सुप्रसिद्ध नटीची आठवण करून देणारी. गात्रा गात्रातून सौंदर्य उतू जात होते अशी बहुतेक स्वागतिका विराजमान होती. त्या सौदर्याच्या आयटेम बॉंब मुळे घायाळ मी...
पण माझ्या चलाख पत्नीने ताबडतोब परिस्थितीचा ताबा घेतला. मला नजरेनेच जरब बसवून( “एव्हढे काही पाघळायला नको. नुसता डालडा थापलाय. त्याच्यावरून घसरून पाऊल वाकडे पडेल.”) ती पुढे झाली.
“हॅलो मिस, वुई वॉंट टू गो टू... अहो, प्रदर्शनाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हो? हे मेले इंग्लिश वर्डस.”
“मिस, मराठीतून बोललात तरी चालेल. मला जगातल्या सगळ्या भाषा समजतात. तर तुम्हाला प्रदर्शनाला जायचे आहे. पण त्या प्रदर्शनाचे नाव काय? कुठल्या मजल्यावर आहे? काही कल्पना? इथे एकूण सतराशे साठ प्रदर्शनं आहेत.” सुंदरीने गोड कूजन केले.
“आम्हाला किनई त्या स्त्रियांच्या डेली वेअरला मराठीत काय...”
सुंदरीने संगणकाच्या किया नाजूकपणे बडवल्या.
“मला वाटतंय कि तुम्हाला एकशे सतराव्या मजल्यावर जायचे आहे. आभूषणांसाठी म्हणजे मंगळसूत्रांसाठी एकशे अठरा, कर्णभूषणे बघायची तर एकशे एकोणीस, बांगड्यासाठी एकशे वीस, नथी आणि चमक्यासाठी एकशे एकवीस, बाजूबंदासाठी,,,”
“एकशे बावीस...” मी मधेच बोललो.
“एकूण एकशे एक्कावन्न पर्यंत आहेत.”
“नको नको. आज एव्हढे पुरे आहेत.” मी.
“ओके. आता तुमची नावे सांगा. मला इथे एन्ट्री करायला लागते.
“मिस तुम्ही अगदी अस्खलित मराठी बोलता. एन्ट्रीला आम्ही पण मराठीत एन्ट्रीच म्हणतो. मी भागो पाटील आणि ही माझी प्रिय पत्नी लता. गृहिणी सचिवः सखी मिथः प्रियशिष्या ललिते कलाविधौ...”
“एकूण तुमच्या किती पत्न्या आहेत? म्हणजे ही “प्रिय” आणि उरलेल्या “अप्रिय” किती?”
“मिस तुम्ही उगाचच शब्दच्छल करत आहात.”
“से व्हॉट यू मीन अँड मीन व्हॉट यू से. हे लक्षात ठेवा. तुम्ही ह्यापैकी एक लिफ्ट पकडून नको त्या मजल्यावर जाऊ शकता. आणि नशीबात असेल तर पाहिजे त्या मजल्यावर जाऊ शकाल. हे हॉटेल म्हणजे आपल्या जीवनाचे प्रतिबिंब आहे.”
ती वळली तेव्हा तिच्या पाठीवरील इलेक्ट्रिक प्लग पॉइंट मला दिसला.
“मिस तुम्ही म्हणजे मीन रोबोट आहात.”
मिसने आमच्याकडे एक प्रमाणित हसू फेकले, “अय्या इश्श. मी कसली रोबोट तुम्हीच रोबोट. पण आभारी आहे.”
लिफ्टकडे जाताना बायाकोनं मला विचारले, “रोबोट स्त्रीलिंगी कि पुरुषलिंगी?”
“रोबोट लिंग निरपेक्ष, जात निरपेक्ष, धर्म निरपेक्ष असतात. एव्हढेच नव्हे तर ते माणूस असायला पाहिजेत अशी काही अट नाही. ते प्राणी किंवा यंत्र...”
“कळलं.”
त्या हॉटेलमधल्या गमती जमती पुढच्या भागात.

कथा

प्रतिक्रिया

कंजूस's picture

16 Sep 2023 - 10:35 am | कंजूस

चला या भागात हॉटिल लाबीत पोहोचलो.

विजुभाऊ's picture

16 Sep 2023 - 11:31 am | विजुभाऊ

पुढे.
प्रदर्शनात आभूषणे देखील आयओटी अधारीत होती का?

कर्नलतपस्वी's picture

16 Sep 2023 - 11:48 am | कर्नलतपस्वी

आमच्या दवाखान्यात एक स्कॅनिंग मशीन आहे. आलात तर आपला फॅण म्हणून फुकट दिमाग स्कॅन करुन देतो.

मला बघायचाय, दुसरोंके दिमाग का दही करनेवाला दिमाग कैसा होता है......

सुरवात मस्त पण आपण किती सफाईदार पणे खोटं बोललात यावर अक्षेप....

म्हणे "बायको दहा पंधरा दिवस भांडली नाही",तुम्हाला दहा पंधरा मिनीटे म्हणायचेय का?

आनन्दा's picture

17 Sep 2023 - 8:54 am | आनन्दा

>> म्हणे "बायको दहा पंधरा दिवस भांडली नाही",तुम्हाला दहा पंधरा मिनीटे म्हणायचेय का?

बरोबर पकडलेत :)

भागो's picture

17 Sep 2023 - 10:12 am | भागो

अहो, बायको माझी आहे ... हे लक्षात घ्या!

भागो's picture

16 Sep 2023 - 12:30 pm | भागो

आभार!
@कंजूस लॉबीत जास्त वेळ "काम" नसताना रेंगाळायचं नाही!
@आम्ही तेथपर्यंत पोहोचतो कि नाही? काय माहित.
@कर्नलसाहेब. झाकला दिमाग सव्वा लाखाचा!

टर्मीनेटर's picture

16 Sep 2023 - 12:42 pm | टर्मीनेटर

वाचतोय.

मस्त, झकास हो पंत.
पंधरा दिवस (किंवा पंधरा मिनीटे वगैरे) न भांडण्याचे 'राज' काय ? म्हणजे 'हमेशा इस्तेमाल' करण्यासारखे, किंवा 'सिर्फ एक बार इस्तेमाल करके देखिये' सारखे काही, की 'मिसेस मल्होत्रा के हजबंड' वागतात तसे वागणे, की "बरं, तू म्हणशील तसं करूया" टाईपची काही वाक्यं, किंवा.. (आमची मति इथेच खुंटली राव)

सुखी दांपत्य जीवनाचे रहस्य. आयुष्यातले लहान सहान निर्णय बायकोला घेउद्यात. महणजे उदा. मेहुणीला वाढदिवसाला काय गिफ्ट द्यायची? चिंटूला इंग्लिश मीडीयम स्कूल मध्ये घालायचे इत्यादी. आणि अत्यंत महत्वाचे निर्णय तुम्ही घ्या. उदा. युक्रेन युद्धात आपण काय भूमिका घ्यायची? अशी पालिसी ठेवायची मग भांडण होईलच कसे ?

आंद्रे वडापाव's picture

18 Sep 2023 - 10:31 am | आंद्रे वडापाव

मिपावर हा लेख लिहिण्यासाठी .. आपण आपल्या बायकोची परवानगी घेतली असेलंच ...

:)

अस्मादिकांनी आपल्याला आठवण करून दिलेली बरी ...

(ब्रो-कोडं चे पालन करणारा ... आंद्रे )

मी इकडे भागो म्हणून वावरतो हे बायकोला कुठे माहित आहे? उलट तीच मला काय सांगते, "तुम्ही मिपावर वाचलंं काय? हा भागो म्हणजे अगदी चावट आणि फाजील लेखक आहे." अस मला अगदी कौतुकाने सांगते.

विजुभाऊ's picture

18 Sep 2023 - 11:41 am | विजुभाऊ

वहिनीनी तुमच्या लिखाणावर चांगली प्रतिक्रीया दिली तर काय कराल

चांगलीच प्रतिक्रिया दिली. माझ्या नव्हे भागोच्या लिखाणाला!
"वाचा जरा ते भागो काय म्हणताहेत. गृहिणी सचिवः सखी मिथः नाहीतर तुम्ही. काही अप्रिसियेशन नाही बायकोच."
मला त्या "इंग्लिश विन्ग्लीश "ची आठवण झाली. नवरा कौतुकाने म्हणतो, "लाडू बनवावेत तर तूच." अस काहीतरी. झाल तिथून जी जंप मारली ती थेट वूमन लिब कडे.
असेल त्याची बायकी तशी गुणाची अस म्हणायचे अगदी ओठावर आल होत. पण सावरलो. नाहीतर स्टोव्ह चा भडका उडाला असता.

कंजूस's picture

18 Sep 2023 - 12:54 pm | कंजूस

अरेरे.

कौतूकसुद्धा ताठ मानेने घेता येत नाही.

भागो's picture

18 Sep 2023 - 2:30 pm | भागो

कौतुक? कोण? कुणाच? कुठ? केव्हा? आणि का? आधी सांगायचं तरी.
मान? केव्हाच टाकून दिली/दिला आहे.
मला वाटत होत कि थोडी भंकस थोड्या गप्पा टप्पा चालल्या आहेत. हे सिरिअस होत हे आत्ता समजल. आभार.

'भागो' नावाच्या लेखकाचे कौतूक केले बायकोने तो लेखक मीच असं उघड करता आले नाही याबद्दल विनोदाने म्हटले की "कौतूकही ताठ माने स्विकारता आले नाही."

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Sep 2023 - 11:04 am | राजेंद्र मेहेंदळे

डोके ऑफिसातच ठेवुन यायचे, घरी बायकोच्या डोक्याने चालायचे. मग भांडणे कमी झालीच म्हणुन समजा.

मी तर ऑफिसमध्ये पण डोके वापरत नाही. घरी बायको तर ऑफिसात बॉस. एकूण एकच की हो!

dadabhau's picture

18 Sep 2023 - 6:20 pm | dadabhau

बायको माझ्या बरोबर अजिबात भांडली नव्हती. माझ्या माहेरच्या मंडळींची तिला एकदाही आठवण झाली नव्हती. ..... हे वाचून जरा आश्चर्यच वाटले .....पुरुषाला पण माहेर असते कि...