काय आहे 'अज्ञात पानिपत'
गाभा :- अज्ञात पानिपत पुस्तकाच्या निमित्ताने ऐतिहासिक पुस्तकांचे वाचन.
'अज्ञात पानिपत'
( मराठी: इतिहास -संशोधन )
लेखक - मनोज दाणी
पाने ८३०.
(किंमत १३००रु, )
प्रकाशन Merven Technologies.,११ जून २०२३ . पुणे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्था इथून.
उपलब्ध : सह्याद्री बुक्स
ISBN 978-81956210-4-0
सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की ही ऐतिहासिक कादंबरी नाही. म्हणजे ऐतिहासिक नोंदींवरून वीरश्रीपूर्ण आणि भावनिक कथन असलेले पुस्तक नाही. तर आतापर्यंतचे जे कागदपत्र हाती आले त्यावरून आणखी नोंदी असलेले पानिपत कथन आणि त्या नोंदी अथवा कागदपत्रे याच पुस्तकात समाविष्ट केलेली आहेत. म्हणजे ती कागदपत्रे शोधणे नाही. प्रश्न पडतो की ही कागदपत्रे कुठे आहेत किंवा होती आणि ती अगोदरच्या पानिपत कथानकात विचारात का घेतली गेली नव्हती. पुण्याच्या अभिलेखागारात बरीच पत्रे पेशवे दप्तरात अजूनही आहेत. ती सर्व वाचायला परिश्रम हवेत. काही पत्रे जगातल्या विविध संस्थांमध्ये आहेत. ती पूर्वी तिथे जाऊन पाहावी लागत. परंतू आता संगणकीकरण आणि प्रसार (digitalisation and information technology)या मुळे कुठेही पाहता येतात. गूगल लेन्सने खूप सहाय्य दिले आहेच. शिवाय बरीचशी कागदपत्रे फारसी भाषेत,अरेबिक लिपीत आहेत. त्यातही तीन चार प्रकार आहेत. पण लेखक श्री मनोज दाणी यांनी तो प्रश्न सोडवला आहे. ते स्वतः ती लिपी आणि भाषा शिकले आहेत. याचा दुहेरी फायदा म्हणजे रुमाल/कागद ( ऐतिहासिक मूळ नोंदींना म्हणतात.) सापडले की ते कुणा जाणकारास दाखवून वाचून घ्यावे लागतील. मग त्यात काय लिहिलं यांचा संदर्भ आणि क्रमवार लावणे. हे सर्व लेखकाने आवड,हौस आणि छंद म्हणून केले आहे. पुण्यातील दोन इतिहासविषयक संशोधनाच्या संस्थांचे लेखक आजीव सभासद आहेत. त्यापैकी एक भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतूनच ११जून २०२३ मध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. लेखकाच्या सहकार्यामुळे मला हे पुस्तक वाचायची संधी मिळाली.
मला शालेय जीवनापासूनच इतरांप्रमाणे पुस्तक वाचनाची आवड होती. पण पानीपत या विषयावरचे एकही पुस्तक किंवा लेख वाचले नव्हते. इतिहास विषयात जे काही दहा ओळींचे माहीत होते तेवढेच. मराठे आणि पेशव्यांच्या इतिहासाबद्दलही अधिकचे वाचन कधी केलं नाही. खरं म्हणजे माझ्या वर्गातल्या दोन मित्रांना याबद्दल तेव्हाही(आठवी -दहावी)खूप माहिती होती. कोणती लढाई कुठे कोणामध्ये झाली इत्यादी. पानीपत हा तर मराठी लोकांचा आवडता विषय. त्यावर ऐतिहासिक कादंबऱ्याही गाजल्या आणि सतत वाचल्या जातात.
दुसरा मोठा आवडता विषय म्हणजे १८५७चा उठाव. सावरकरांचे यावरचे पुस्तक(१८५७चे समर) आवर्जून वाचले जाते तेही वाचले नव्हते.ते आता वाचले. या अगोदर William Dalrymple यांचे The Last Mughal (2006)(The Last Mughal
https://archive.org/details/lastmughalfallof0000dalr ) वाचले होते. घटना एकच १८५७चा उठाव. पण समर पुस्तकातले लेखन हे वीरश्री पूर्ण भावनात्मक तर द लास्ट मुघल'मध्ये ऐतिहासिक नोंदी देत घटनाक्रम ओघवता लिहिला आहे. कुणाचीही बाजू न घेता , नोंदींतील उतारे देत,संदर्भ देत इतिहास उलगडला गेला आहे.जुनी चित्रे आणि फोटोही आहेत. त्यामुळे असे पुस्तक आवडू लागते.
एकूण इतिहास समजण्यासाठी अगदी तटस्थपणे घटनांकडे बघण्याची गरज असते ती थोडी नंतर येते.
या अवांतरानंतर पुस्तकाकडे वळूया.
'अज्ञात पानिपत'.या नावातूनच कळते की मराठी वाचकांना काही माहिती कथा कादंबऱ्यांतून झाली आहे. वाचनालयातून
पानीपत १७६१,त्र्यंबक शं शेजवलकर, प्रकाशन १९६१ हे मिळवून वाचले. हे ज्ञात पानीपत. पानीपत येथे दोन युद्धे,लढाया याअगोदर झाल्या होत्या. तिसरी लढाई मराठे विरूद्ध अहमदशहा अब्दाली यांच्यात झाली. मराठे महाराष्ट्र सोडून अब्दालीशी लढण्यासाठी दिल्लीच्या पुढे का गेले, एकमेकांचे किती सैन्य होते, सुरुवात कशी झाली, कोणी मराठ्यांना सहाय्य केले कोण फितूर झाले आणि शेवट कसा झाला हे दिले आहे. मराठ्यांकडून नाना फडणवीस(वय१८) आणि इतर शिंदे,होळकर सरदार पत्रे पाठवून घटना काय घडत गेल्या ते पत्रांनी पुण्याला पेशव्यांकडे पाठवत होते. मुघलांची टपाल व्यवस्था होती. काही पत्रे पोहोचवली जात तर काही हस्तगत होत.जी काही आहेत ती पत्रे 'पेशवे दप्तर' या नावाने पुणे अभिलेखागार, सरकारकडे आहेत. हे सर्व आपल्या बाजूने लिहिलेल्या नोंदी आहेत. तर हे आतापर्यंतचे ज्ञात पानीपत.पण शत्रुपक्षानेही नोंदी केल्याच असतील त्या तारीख वार एकच घटना दोन्हींकडून कशी लिहिली आहे ते तपासून अंतिम इतिहास नोंद होईल. ही सर्व कागदपत्रे,बखरी परदेशी वाचनालये,म्युझिअमस, विद्यालये येथून ओनलाईन पाहून चाळून भाषांतर करून पुस्तकात दिली अहेत.
यांचे फक्त संदर्भ सूची मध्ये पुस्तकाच्या शेवटी दिले असते तर पुस्तक चारशे पानांत आटोपले असते. मराठी वाचकांनी वाचले असते परंतू संदर्भ फारसी,अरेबिक आहेत ते जसेच्या तसे देऊन पानापानाचे भाषांतर दिल्याने ते अधिकचे वाचन झाले आहेच शिवाय इतिहासाच्या नवीन अभ्यासकांचा मूळ कागद शोधून वाचण्याचा खटाटोप वाचला आहे. संदर्भ ग्रंथ झाला. वाचकवर्ग व्यापक झाला. आगामी काळासाठी वाचनीय (future proof)ग्रंथ झाला. हेच काम लेखकाने केले आहे. ते आहे 'अज्ञात पानीपत'मध्ये.
(हे पुस्तक आमच्या नगरपालिका वाचनालयात आणा म्हणून सांगणार होतो (निधी भरपूर असतो) परंतू दोन अडचणी लक्षात आल्या. प्रत्येक पुस्तकाला शिवून बांधून घेतात ते नंतर वाचता येत नाही. दुसरे म्हणजे अशी पुस्तके संदर्भ ग्रंथांत टाकून वेगळी ठेवतात.घरी नेऊ देत नाहीत. तिथेच रोज दहा रुपये भरून वाचणे अशक्य आहे. म्हणजे पुस्तक तिकडेच पडून राहणार,वाचले जाणार नाही.)
पुस्तकातील मुख्य लढाईवर्णन संपते त्यानंतर येतात शत्रुपक्षांकडून झालेल्या नोंदी,बखरी. त्यात एक विशेष माहिती पण आहे 'काबूल अखबार'. हे प्रकरण उजेडात आणले ते इतिहासकार ग.ह.खरे यांनी. ही होती त्या काळातली रोइटरसारखी बातमी देणारी संस्था. त्यांची कार्यालये काबूलसह इतर शहरांत असावीत. ते पुण्याचे 'पेशवे' यांना बातम्या पाठवत. ती जमवून काही उदाहरणे दिली आहेत. काशीराजा नावाचा एक लेखनिक तिकडे होता त्याची बखर आहे. शिवाय महमूद अल हुसैनी याने लिहिलेला अहमदशहाचा इतिहास, पानीपतचा अहवाल -लेखनिक बक्षुल्ला,इब्राहिम अली खान याने लिहिलेला इब्रतनामा हे सर्व भाषांतरासह उपलब्ध आहेत. अब्दालीचा अस्सल शिक्का आणि तुघ्रा याचेही फोटो आहेत. हे सर्व पुस्तकात पाहा. इकडे पुनरावृत्ती टाळत आहे.
एकूण खूप कष्ट घेऊन लेखक श्री मनोज दाणी यांनी एक उत्तम ऐतिहासिक पुस्तक मराठी वाचकांसाठी उपलब्ध केले आहे. कादंबरी-छाप पुस्तकांबरोबरच अशी पुस्तके वाचनाची आवड वाचकांत निर्माण होईल यात शंकाच नाही. पुस्तक खपेल का नाही असा व्यावसायिक विचार न करता असे प्रकाशन करण्याचे धाडस दाखवल्याबद्दल Merven Technologies (श्री मनोज केळकर)यांचे आभार मानतो.
प्रतिक्रिया
16 Aug 2023 - 2:56 pm | टर्मीनेटर
छान! पुस्तक परिचय आवडला 👍
हे विशेष भावले! इतिहास वस्तुनिष्ठ पद्धतीनेच लिहिला गेला पाहिजे, त्यात भावनांना स्थान नसावे.
धन्यवाद.
16 Aug 2023 - 2:58 pm | चित्रगुप्त
पुस्तक परिचय आवडला. मला हा ग्रंथ येत्या आक्टोबरात वाचायला मिळणार आहे. उत्सुकता आहे.
आजच्या तरूण पिढीचे मिपाकर मनोज दाणी हे आपले सगळे व्याप सांभाळून एवढे प्रचंड काम हाती घेऊन ते चिकाटीने पूर्णत्वास नेऊ शकतात याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
आज यावरून आठवले की बरेच वर्षांपूर्वी महेश्वरच्या किल्ल्यात गेलेलो असताना तिथले व्यवस्थापक म्हणाले होते की अहिल्याबाईंच्या घराचा वरचा मजला संपूर्णपणे जुन्या कागदपत्रांनी भरलेला असून ते अगदी जीर्ण झालेले आहेत. (त्यांनी ते नर्मदार्पण केले जाण्याची शक्यताही सांगितली होती.. ते ऐकून मला धक्काच बसला होता, आणि त्याकाळी मिपावर याबद्दल एक लेखही लिहीला होता)
मल्हारराव पानिपत युद्धावर गेलेले असल्यामुळे महेश्वरच्या दफ्तरात त्याविषयीचे कागद असण्याची खूप शक्यता आहे. अजूनही कुणी तिथे जाऊन विचारपूस करू शकते. तसेच मल्हारराव माळव्याचे सुभेदार बनण्यापूर्वी इंदूरचे राज्यकर्ते असलेला 'मंडलोई' परिवार अजूनही जुन्या इंदुरातील 'बडा रावळा' नामक महालात रहात आहे. त्यापैकी 'निरंजन जमीनदार' हे इतिहास-संशोधक होते त्यांनी काही पुस्तकेही लिहीलेली आहेत. त्यापैकी 'आणि क्षिप्रा वहात राहिली' या पुस्तकात होळकर-शिंदे यांच्यातील वैमनस्याबद्दल ऐतिहासिक माहिती दिलेली असून ते मी फार पूर्वी वाचले होते. त्यांच्या चित्रकार सुनेचा फोन नंबर मजजवळ आहे. त्यांचेकडेही चवकशी केली पाहिजे. आक्टोबरात इंदूरला गेल्यावर प्रयत्न करेन.
16 Aug 2023 - 3:41 pm | कंजूस
माहितीबद्दल धन्यवाद. तो माहेश्वरचा वाडा पाहिला. फारच सुंदर आहे. नेमके मंगळवारी गेलो त्यामुळे पैठणी विणणारे हातमाग पाहता आले परंतू विणकरांना काम करताना पाहता आले नव्हते,सुट्टी असते मंगळवारी.
कागदपत्रे नक्कीच असणार पण ते पाहून इतिहास लिहिला तर ते हस्तलिखित कुणी छापणारा भेटण्याची शक्यता कमीच. मराठी वाचक कादंबरीकडेच जातात.
असलं काही नफा न मिळणारंही छापणारे एकच होते - वरदा प्रकाशनचे ह.अ.भावे.
16 Aug 2023 - 9:10 pm | चित्रगुप्त
महेश्वर किल्ल्यातली कागदपत्रे मोडीत असल्याने नुसते वरवर बघून काय आहे ते ओळखणेही त्यांना शक्य नाहीये. या बाबतीत माझे इंदूरातील एक मित्र भालू मोंढे यांना फोन केला होता, कारण ते होळकरांचे सध्याचे वंशज शिवाजीराव (रिचर्ड) होळकर यांचे मित्र आहेत. परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नाही. आता ते सगळे ८० च्या घरात आहेत. पुण्याहून मुद्दाम कोणी मोडीचा जाणकार तिथे गेला तरच काही होऊ शकते. कुणी तयार असेल तर मोंढेमार्फत होळकरांशी संपर्क करू शकतो.
-- अर्थात मी हे जे लिहीले आहे ते काही वर्षांपूर्वीचे आहे. आजच्या तारखेला काय परिस्थिती आहे ते ठाऊक नाही.
मुळात हजारो कागदपत्रातून नेमके पानिपतासंबंधी हुडकणे हेही मोठेच काम असेल. कालानुक्रमाने ते व्यवस्थित ठेवलेले आहेत किंवा कसे, काहीच माहिती नाही.
17 Aug 2023 - 3:50 am | मनो
तुमच्याशी फोनवर संपर्क साधतो. पाहूया काय करता येईल ते.
16 Aug 2023 - 6:24 pm | कर्नलतपस्वी
आनादी काळा पासुन युद्ध शास्त्र (military science) एक विषेश अभ्यासाचा विषय आहे.
हाथीयार व दारुगोळा, दळणवळण, संचार साधने, रसद,मानव संसाधन, सेकंड लाईन,थर्ड लाईन सपोर्ट सिस्टीम,वैद्यकीय मदत या व या सारख्या बाबी मुख्य लढाई वरोबरच महत्वाच्या असतात.
जेव्हां वरील सर्व बाबी अतिशय मर्यादित स्वरूपात असताना जवळपास पंधराशे किलोमीटर पेक्षाही जास्त अंतरावर जाऊन शत्रूवर चढाई करणे हे अद्भुत च होते.
या बरोबरच शत्रू,मित्र,भौगोलिक परिस्थिती अडचणी मधे अधिक भर टाकतात व नेतृत्वाच्या कसोटीची परिसीमा होती.
या सर्वांवर प्रकाश टाकणारा पत्रव्यवहार माझ्या सारख्या हार्डकोर मिलीटरी मॅनेजरला नेहमीच आकृष्ट करतो.
पुस्तक संग्रहात समाविष्ट केले आहे. विश्वास पाटलांच्या पानिपत प्रमाणे एका बैठकीत संपवता येणार नाही.
16 Aug 2023 - 8:47 pm | राजेंद्र मेहेंदळे
उत्तम पुस्तक परीचय. उत्सुकता वाढली आहे.
तूनळीवर शोधल्यावर वर ह्या लिंक्स मिळाल्या.
प्रकाशन सोहळा
https://www.youtube.com/watch?v=DVkY7Xq0y8M
श्री. मनोज दाणी यांचे एक भाषण
https://www.youtube.com/watch?v=f_MswWcW_Pk
16 Aug 2023 - 9:28 pm | मनो
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने परवाच पुस्तकातील एका मुद्याचा परिचय करुन देणारा छोटा video इथे टाकला आहे.
https://youtu.be/I50bXXhgkck
17 Aug 2023 - 9:36 am | प्रचेतस
उत्तम परिचय.
मुळात ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ लिहिणे मोठे कठीण काम. मनो यांनी हे परिश्रमपूर्वक हे सिद्धीस नेले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
18 Aug 2023 - 7:57 am | Bhakti
सुंदर परिचय,बखर पत्रे इतिहासाचा लिखीत पुरावा.मनो यांचे कष्ट खुप आहेत हे समजतंय.
19 Aug 2023 - 12:50 am | मनो
पुस्तकातील मनोगतात म्हणल्याप्रमाणे इतिहासाचा अभ्यास तुम्ही ज्यावेळी नियमाने रोज करू लागाल, त्यावेळी तुम्ही स्वतःदेखील त्या वातावरणात न्हाऊन निघता, असा माझा अनुभव आहे. दत्ताजी शिंदे, सदाशिवराव भाऊ, मल्हारराव होळकर, अंताजी माणकेश्वर यांच्यासारख्या इतिहासप्रसिद्ध पराक्रमी वीरांच्या संगतीत गेली काही वर्षे दररोज मला राहायला मिळाले हा माझ्या आयुष्यातील एक मोठा आनंद आहे आणि या कारणामुळेच हे मोठे अवघड काम माझ्या हातून पार पडले. मला स्वतःला जी गोष्ट आवडेल ती वाचकांना पसंत पडेल की नाही याची खात्री मला नव्हती. परवा प्रकाशकांकडून अर्धी आवृत्ती दोन महिन्यांत संपल्याचे कळाले, त्यावरून बऱ्याच इतिहासप्रेमींना पुस्तक आवडलेले दिसते आहे असे मला वाटते.
कंजूसकाका आणि इतर सर्व प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार.