सगळं कसं थोडं थोडंसंच उरून बसलेलं..
गिळवतही नसलेलं अन फेकवतही नसलेलं..
बळंच सात आठ घास जास्त खाऊन संपवायला हवं..
नाहीतर मग वाट्यांमधे भरून फ्रीजमध्ये ठेवायला हवं..
फ्रीजमध्ये खूप वाट्या आहेत पूर्वीच उरून बसलेल्या..
उद्या फोडणी देऊ म्हणत परवा तेरवाच नासलेल्या..
पोटातलं फेकून सुटकेची ओशट वाट बघणाऱ्या..
आतल्या शिळवड्याला दाबून डिस्पोजेबल वड्या बनवणाऱ्या..
मोकळ्या होऊन क्षणभरच दवबिंदूनी डवरणाऱ्या..
पुन्हा स्वतःत जळकी ताजी उरलेली अर्धी कच्ची स्वप्नं कोंबून..
त्यांना बायोडिग्रेडेबल शिळी निर्माल्यं करणाऱ्या..
पुन्हा पुन्हा फ्रीजमध्ये ठासलेल्या ठरीव आकाराच्या थंड वाट्या..
कर्कश आवाजात ओरखडून तारखा नावं घातलेल्या षंढ वाट्या..
प्रतिक्रिया
21 Jun 2023 - 5:25 pm | तुषार काळभोर
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही, असं काहीसं लेखकाच्या मनात असावं का?
21 Jun 2023 - 5:42 pm | प्रचेतस
बऱ्याच दिवसांनी खास गविटच काही वाचलं, बरचसं गूढ, पकडलं पण निसटून गेलं असं वाटणारं.
बाकी लिखाणाची वाटी दिलीत, आता साग्रसंगीत भरलेलं ताट पण येऊ द्यात.
22 Jun 2023 - 10:41 pm | प्रसाद गोडबोले
खास गविटच
>>
गवि टच ? आम्हाला तर हे ग्रेसटच वाटले. गविसर तुम्ही जिंकलेला आहात _/\_
आम्हाला असे वाटते की -
कवी जुन्या नाजुक गुलाबी आठवणींना वाट्यांची उपमा देत असावा. सगळेच योग जुळुन येत नाहीत , बरीचशी गणिते चुकतात, उरतात फक्त काही खाडाखोडी , आणि मग गिळवतही नाही अन फेकवतही नाही असे जे कवी म्हणतो तशी अवस्था होऊन बसते.
तिला आयुष्यात आणताही येत नाही , आणि आयुष्यातुन विसरताही येत नाही.
त्या एका नेमक्या क्षणाला , ऑपॉर्च्युन मोमेंट्ला, स्पष्ट बोलायला हवं , अन नाही बोललो तर मग का बोललो नाही ही चरफड मनाच्या फ्रीझ मध्ये वाट्यात भरुन ठेवायला लागते.
आणि मग एका मागुन एक मनाच्या फ्रीझ मध्ये अशा वाट्यांची गर्दी जमायला लागते, कधीतरी परत संधी आली तर बोलु ही भाबडी आशा मन काही सोडायला तयार होत नाही, ती मात्र तिच्या विश्वात कधीचीच पुढे निघुन गेली असते , उरलेलं असतं ते आपल्या मनात, आपल्या आठवणींच्या वाट्यांमधले जुनेपुराणे मोहाचे धागे.
कधी कधी त्या आठवणींनाही वाटत असेल की हे सगळं फेकुन द्यावं , सगळ्या वाट्या रिकाम्या कराव्यात , पण फेकुन द्यायला म्हणुन एखादी आठवण बाहेर काढली की कुठेतरी परत आशेचे घुमारे फुटतात, कोणा मित्राच्या लग्नात दुरवरुन कोणीतरी जाणीवपुर्वक टाळल्याचा अभिनय करत रहातं किंव्वा कदाचित अचानक मेसेज येतो - कसा आहेस , किंव्वा अचानक स्टेटस अपडेट पाहिला जातो , किंव्वा काहीच नाही तर अचानक फेसबुक दशकांपुर्वीची कोणतीतरी सुगंधी आठवण मेमरीज मधुन बाहेर काढुन दाखवंत .
धरावं म्हणलं तर ते आता अशक्य असतं अन सोडावं म्हणलं तरी सुटत नाही . नक्की कोणी कोणाला धरुन ठेवलं आहे देव जाणे ... आपण आठवणींना की आठवणींनी आपल्याला !
आणि मग परत आपण ती वाटी मनाच्या फ्रीज मध्ये कोपर्यात सरकवुन बसतो... षंढपणाने खंत करत ... न केलेल्या धाडसाच्या पश्चातापात .... "एकदातरी विचारयला हवं होतंस , का नाही विचारलंस ?" हा निरुत्तर करुन जाणारा तिचा प्रश्न कर्कष आवाजात मनात घुमत रहातो ...
...
जो ग़म-ए-हबीब से दूर थे वो ख़ुद अपनी आग में जल गए
जो ग़म-ए-हबीब को पा गए वो ग़मों से हँस के निकल गए।
-
असो . चालायचेच .
21 Jun 2023 - 6:27 pm | कर्नलतपस्वी
मन कशात लागत नाही,
अदमास कशाचा घ्यावा ।
अज्ञात झऱ्यावर रात्री,
मज ऐकू येतो पावा ॥
इतकीच दुर्बोध वाटली.
21 Jun 2023 - 6:38 pm | विजुभाऊ
अरे वा .. कर्नलभौ.... एकदम पद्यात उत्तर दिलेत
21 Jun 2023 - 7:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाट्या पोहोचल्या, सॉरी वाट्यांच्या भावना पोहोचल्या.
रचना आवडली.
'नावं घातलेल्या षंढ वाट्या' असे का म्हटलं असेल बरं ?
-दिलीप बिरुटे
21 Jun 2023 - 7:44 pm | पंचक
'षंढ' या शब्दावरून फार पूर्वी इथेच घडलेलं महाभारत आठवलं.
मिपारुपी फ्रीजमधल्या कोणत्या नव्या जुन्या 'वाट्या' कवीला आठवल्या असतील बरं?
21 Jun 2023 - 11:29 pm | सर टोबी
ई मेल्सचा इनबॉक्स, जुन्या पावत्या आणि कागद पत्रं, आय क्लाऊड आणि गुगल फोटोजचं स्टोरेज.
वडील गेल्यानंतर हे असं महत्वाचं म्हणून जपलेलं कसं एका क्षणात कवडी मोल होतं ते कळलंय. म्हणून माझ्या पुरतं तरी बऱ्याच वाट्या जातांना रिकाम्या करून जाईन असं म्हणतोय.
22 Jun 2023 - 5:46 pm | सालदार
<<वडील गेल्यानंतर हे असं महत्वाचं म्हणून जपलेलं कसं एका क्षणात कवडी मोल होतं ते कळलंय.>>
१००% अगदी हेच मलाही वाटलेलं वडील गेल्यावर
22 Jun 2023 - 11:36 am | Bhakti
नाजूक फुलं
कोरलेली खास वाटी
शिरा गुलाबजाम साठी
ठरलेली गोड वाटी...
दोन तीन दिवसांत
गोड पदार्थ संपतो
तरीही स्निग्धता
तशीच उरते वाटीत ....
22 Jun 2023 - 12:10 pm | राजेंद्र मेहेंदळे
पहीले वाटले मुक्तक आहे
मग वाटले शिंदे/ठाकरे/फडणवीस यांच्या खेळाबद्दल काहीतरी आहे
आता वाटतेय----जाऊदे, डोक्याची मंडई झालीये :)
22 Jun 2023 - 4:48 pm | डॅनी ओशन
माणसाचा भार स्वतः वर झेलणाऱ्या, दुखावलेल्या, घुसमटलेल्या
खुर्चीच्या धुळकट खरखरीत पृष्भागावर दबलेल्या वाट्या
संडास क्लिनिंग दिवशी, स्वतःची मर्यादा विसरून, फिनाईलच्या
निळ्या पट्ट्यांचा सर्वव्यापी गंध स्वतःच्या भाळी लाऊन घेणाऱ्या वाट्या
अपमान कुचेष्टेचा विषय राहून, बुटांची चिन्हे स्वतः वर वावरून,
दररोज आपले काम करत राहणाऱ्या वाट्या
झेलणे रखरखीत टॉयलेट पेपर असो, किंवा थंडगार पाण्याचा फवारा,
भगंदर, मूळव्याध झाल्याशिवाय कोणालाही न आठवणाऱ्या वाट्या
दृष्टीआड आणि विचारांतून सुद्धा, दूर केलेल्या, स्पर्श होणाऱ्या वस्त्रांचे
ब्लिचिंग करणाऱ्या परोपकारी वाट्या
22 Jun 2023 - 11:53 pm | रंगीला रतन
वाट्या साठवुनी अती मी दमले
थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला
:=)
23 Jun 2023 - 6:42 am | कंजूस
जमलं.
26 Jun 2023 - 5:51 pm | चौथा कोनाडा
भारी आहे ! काय लिहावं कळत नाहीय !
शेवटी किती किती साठवून ठेवणार ?
हे तर जबरदस्तच !
20 Jul 2023 - 3:03 am | चित्रगुप्त
सगळं कसं थोडं थोडंसंच - (पासून) ... पोटातलं फेकून सुटकेची ओशट वाट बघणाऱ्या.. इथपर्यंत अर्थ सरळ वाटला (म्हणजे प्रत्यक्ष फ्रिजातल्या वाट्या बघून सुचलेल्या ओळी)
यापुढे - "शिळवड्याला दाबून डिस्पोजेबल वड्या बनवणाऱ्या.. पासून कविता काहीशी दुर्बोध होत गेलीसे वाटले.
शेवटल्या ओळीत 'षंढ वाट्या' हा शब्दप्रयोग 'थंड वाट्या' ला अनुप्रास म्हणून सुचला असावा. काय की बुवा.
- मार्कसबुवांना आकळलेला अर्थही भावला. 'दुर्बोधता' हे नवकाव्याचे 'व्यवच्छेदक लक्षण' असल्याचे गंगाधर गाडगिळ फार पूर्वीच सांगून गेलेले आहेत. त्यात एक वेगळीच गम्मत, सौंदर्य असते.
कविता आवडली, हेवेसांनल.
20 Jul 2023 - 1:58 pm | राघव
द्येवा! :-)
रुपकात्मक रचना आवडली. _/\_
5 Aug 2023 - 9:09 pm | शानबा५१२
खाण्याची खुप आवड असुनही घरात बनलेले जेवण बिल्कुल रुचकर लागत नाही असे कवी अप्रत्यक्षपणे सांगत हे अशी मी माझी समजुत करुन घेतली.
पहीली तीन कडवी खुप आवडली........पण ओशट म्हणजे काय असे विचारावसे वाटतेय...मला तो शब्द फार आवडला, पहील्यांदा वाचत आहे.
5 Aug 2023 - 11:15 pm | गवि
ओशट म्हणजे तुपकट थर, तेलकट थर असलेली, स्निग्ध वस्तू (पण अप्रिय, खरकटा अशा अर्थाने)
6 Aug 2023 - 9:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमच्याकडे वशट म्हणजे चीकन, मटन, मासे, असे जे खाणे असेल त्याला वशट असे म्हणतात. आज आमच्याकडे वशट होतं म्हणजे नॉनव्हेज काही तरी पदार्थ बनले आहेत, असा त्याचा अर्थ.
-दिलीप बिरुटे
6 Aug 2023 - 9:52 am | प्रचेतस
अहो ते ओशट वायलं आणि वशाट वायलं. वशाट शब्द वसा (सं.) चरबी, मज्जा ह्या अर्थाने आला आहे.
6 Aug 2023 - 10:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओह, आय माय सी. शब्दाबद्दल आभार. पण जनरली वशटच म्हणतात.
वशट, वशाट, एवढं तेवढं चालायचंच.
-दिलीप बिरुटे
(अधिक मासात वशट बंद असलेला)