रानभाजी - आघाडा

आलो आलो's picture
आलो आलो in पाककृती
17 Jul 2023 - 3:16 pm

रोजच्याप्रमाणे आजहि सकाळी भुईकोट किल्ला परिसरात आमच्या मातोश्री फिरायला गेल्या व येताना "आघाडा" या रान वनस्पतीला घेऊन आल्या.
हाडाची शिक्षिका असल्याने आधी सर्वांना त्या भाजीचे महत्व समजावून सांगितले व नंतर हळुवारपणे भाजी निवडून मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून काढली .... नंतर जिरे, मोहरी, मीठ,मिरची, थोडासा दाण्याचा कुट व लसूण एव्हढ्या अल्प सामग्री च्या बळावर अफलातून अशा चवीची हि पालेभाजी खाऊ घातली.

आईकडून समजलेली माहिती हि अशी : पावसाळा सुरु झाला कि बहुतांश ठिकाणी रानभाज्यांना बहर येतो. आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा या औषधी वनस्पती कुठलीही विशेष अशी मेहनत न घेता निसर्ग आपोआप आपल्याला देत असतो आपण फक्त थोडेसे ज्ञान घेऊन डोळे उघडे ठेऊन वावरले कि आपल्याला या भाज्यांची पर्वणी साधता येते.
या रानभाज्या चविष्ट व पौष्टिक असतात. ठराविक ऋतूतच येत असल्या कारणाने त्यांचे महत्वही आपण जाणून घ्यायला हवे तरच त्याचे फायदे आपण मिळवू शकतो.

आघाडा रोपवर्गीय रानभाजी आहे. ‘अ’ जीवनसत्वाने भरपूर अशी ही भाजी आहे. हाडे बळकट करण्यासाठी आघाडा खावा. आघाडा रक्तवर्धक आहे, पाचक आहे. मुतखडा, मुळव्याध व पोटदुखीवर गुणकारी आहे.

पावसाळ्यात रानातील या भाज्या मुळातच चवदार असतात. अगदी थोडेसे पाकसंस्कार त्यावर करून त्या शिजवल्या कि झालेच कि, नैसर्गिक व पौष्टिक असल्याने या हंगामी भाज्‍या आवर्जून सर्वांनी खायलाच हव्यात.

मी तर बुवा आज सकाळीच आस्वाद घेतलाय आणि मिपाकरांसाठी काही फोटो. फार काही अवघड नसल्याकारणाने अगदी डिट्टेल अशी पाकृ देत बसत नाही. (तसेही मला त्यात विशेष ज्ञान नाहीच)

येथील तज्ञ् जाणकारांनी आणखी काही रानभाज्या व त्यांचे महत्व विशद करावे जेणेकरून येणाऱ्या पिढीलाही त्याचे ज्ञान होईल.

भाजी बनवतानाचे काही क्षण.

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

17 Jul 2023 - 3:44 pm | चांदणे संदीप

आघाडा खातात हे माहिती नव्हते. गावाकडे जिकडे तिकडे कायमच दिसतो. इथे आमच्या आजूबाजूच्या परिसरात दिसत नाही.

सं - दी - प

आलो आलो's picture

19 Jul 2023 - 8:16 pm | आलो आलो

गावाकडे जिकडे तिकडे कायमच दिसतो.

संदीप राव ... चला या निमित्ताने तुम्हाला आठवण तरी झाली गावाकडची.

टर्मीनेटर's picture

17 Jul 2023 - 4:46 pm | टर्मीनेटर

आघाडा खातात हे माहिती नव्हते.

+१ मलाही हे माहिती नव्हते!
पुर्वी श्रावणात आई जिवतीची पुजा करतेवेळी वाहाण्यासाठी शाळेतुन येताना (आमच्या शाळेच्या मैदानात उगवायचा) आघाडा घेउन यायला सांगायची, पण त्याची भाजी करतात हे आजच समजले!
तशाही मला सगळ्याच पालेभाजा आवडतात, त्यामुळे हि भाजी पण नक्कीच ट्राय करणार. पावसाळ्यात उगवणाऱ्या अनेक रानभाज्यांपैकी माझी सर्वात आवडती भाजी म्हणजे 'कर्डु / कुर्डु' आणि त्यानंतर 'कर्टुली'.

चांदणे संदीप's picture

17 Jul 2023 - 6:20 pm | चांदणे संदीप

पुर्वी श्रावणात आई जिवतीची पुजा करतेवेळी

मलाही या वनस्पतीचा उपयोग पूजेसाठीच माहिती होता. गावाकडून इकडे पुण्यात आल्यावर शोधायला फिरफिर व्हायची.

सं - दी - प

हा आघाडा बहुतकरून शाळांच्या आसपासच्या मैदानांतच उगवताना दिसतो, मीही लहानपणी शाळेतून येताना श्रावणात आघाडा घेऊन येत असे. ह्याची भाजीही करतात हे मात्र माहीत नव्हते.

आलो आलो's picture

19 Jul 2023 - 8:19 pm | आलो आलो

हा आघाडा बहुतकरून शाळांच्या आसपासच्या मैदानांतच उगवताना दिसतो

अंदाज बरोबर असावा ....
माझी आईसुद्धा शाळेतूनच आणायची (रिटायर्ड होईपर्यंत) ...तुमच्या प्रतिसादातून हे अचानक जाणवले कि हो ...
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

तशाही मला सगळ्याच पालेभाजा आवडतात, त्यामुळे हि भाजी पण नक्कीच ट्राय करणार.

नक्की ट्राय करा ....आवडेल याची खात्री.

कर्नलतपस्वी's picture

17 Jul 2023 - 5:56 pm | कर्नलतपस्वी

कित्येक रानभाज्या लुप्त झाल्यात.

माठ,चवळी,शेवगा,शेपू आघाडा आणी अशा अनेक .

टर्मीनेटर's picture

17 Jul 2023 - 6:50 pm | टर्मीनेटर

लाल् / हिरवा माठ, चवळी आणि शेपूची भाजी आमच्याकडे अजुनही अनेकदा बनते, त्यामुळे ह्या भाज्या लुप्त झाल्यात असे वाटत नाही!
चवळीची (ही एकमेव) पालेभाजी मला गुळ मिक्स करुन खायला आवडते 😀

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

17 Jul 2023 - 7:49 pm | हणमंतअण्णा शंकर...

सुद्धा या भाज्या खाल्या जातात. युरोप मध्ये लाल/हिरवा माठ, हिरव्या मिरच्या, चवळी, पावटे वगैरे भाज्या बहुतेकदा आफ्रिकेतूनच आयात केल्या जातात.

टर्मीनेटर's picture

17 Jul 2023 - 7:57 pm | टर्मीनेटर

इंटरेस्टींग माहिती!

आलो आलो's picture

19 Jul 2023 - 8:23 pm | आलो आलो

अण्णा ....
हे बाकी माहिती नव्हतं ....
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

लाल् / हिरवा माठ, चवळी आणि शेपूची भाजी>>> आम्ही तर नेहमी खातो. लुप्त कशा होतील.? चवळी नाही चवळइ म्हणा.

सौंदाळा's picture

17 Jul 2023 - 8:05 pm | सौंदाळा

शेवगा आणि आघाडा सोडून बाकी भाज्या महिन्यातून एकदा तरी खाल्ल्या जातात.
रविवारी भरपेट सामिष भोजन झाली की सोमवारी शक्यतो पालेभाजी फिक्स असते. आज पण आहेच ;)
माठ, चवळी, पालक,चाकवत, मुळा, शेपू, कांदा पात, करडई असतेच.
अळू कधीतरी असते पण आंबट चूका घालूनच.
सिझन मधे लसूण पात पण असते मात्र त्याचे पराठे करतो किंवा तव्यावर तेल मिरचीबरोबर परतून खातो.
शेवगा आणि हरभर्‍याचा पाला पूर्वी एखाद-दोन वेळा खाल्ला होता. आवडला नाही.

आलो आलो's picture

19 Jul 2023 - 8:26 pm | आलो आलो

सोमवारी शक्यतो पालेभाजी फिक्स असते.

पालेभाजी खातो ...पण दर आठवड्याला नित्यनेमाने खातोच असे नाही ... तुमची पण कमालच आहे बुवा !
लसूण पात पराठे वाह वा..!

आलो आलो's picture

19 Jul 2023 - 8:16 pm | आलो आलो

कित्येक रानभाज्या लुप्त झाल्यात.

कर्नल सर
अगदीच लुप्त अशा नाही पर....लुप्त होणे कि कगारपर नक्कीच आहे.

सौंदाळा's picture

17 Jul 2023 - 7:08 pm | सौंदाळा

मस्त
श्रावणात आणि गणपतीला पत्रीपुजन करायला आघाडा लागतो इतकेच माहिती होते. भाजी पहिल्यांदाच बघितली.
मिपावर (कदाचित जागु यांची) रानभाज्यांची एक लेखमालाच आहे.

हेच नोंदवायला आलो होतो. धन्यवाद.

उत्तम विषयावर धागा. करटोली, कुर्डू, मायाळू या अतिशय आवडत्या भाज्या. चिऊ नावाची एक भाजी लहानपणी आजी बनवत असे. ती साधारण ऑफिस टाईमसारखी चिमुकली पाने असलेली जमिनीवर पसरणारी वेलसदृश भाजी असे. तिची मुख्य खूण म्हणजे अगदी स्वच्छ धुवून देखील तिला मातकट स्वाद येत असे. तो स्वाद हाच त्या भाजीचा आवडता भाग होता.

त्यानंतर ती वनस्पती आजतागायत मिळाली नाही. कुठे बाजारात विचारावे तरी कोणाला नावाने कळत नाही. चिऊ हे फार रूढ नाव नसावे.

तिची मुख्य खूण म्हणजे अगदी स्वच्छ धुवून देखील तिला मातकट स्वाद येत असे. तो स्वाद हाच त्या भाजीचा आवडता भाग होता.

रोचक! आता हा विशिष्ट स्वाद अनुभवण्यासाठी 'चिऊ' हि भाजी शोधणे आले...

जालावर शोधताना "ओळख रानभाज्यांची - चिवळ" हे सापडले. हिच चिऊची भाजी आहे का?

Portulaca Quadrifida
Portulaca quadrifida

हीच.. वाह वाह.. अनेक धन्यवाद..!!!

पाने याहून अधिक गोल आकाराची असत असे आठवले म्हणून अधिक शोध घेतला असता Portulaca oleracea ही उपजात अगदी तंतोतंत जुळली.

मग तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या वेब साईटवर चक्क चिऊ या नावाचाही उल्लेख सापडला.

https://smallscience.hbcse.tifr.res.in/wild-vegetables/

घोळ / घोळू हे नाव आधीपासून माहीत होते पण तो जरा मोठ्या आकाराचा असतो.

पुन्हा एकदा धन्यवाद..

अरे वाह! Portulaca oleracea ची पाने थोडीफार मेथीच्या पानांसारखी वाटत आहेत, दिसते का कुठे बघतो.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या वेब साईटवर चक्क चिऊ या नावाचाही उल्लेख सापडला.

क्या बात हैं! भारीच.

आलो आलो's picture

19 Jul 2023 - 8:33 pm | आलो आलो

आपल्याला लहानपणचे स्वाद अजून आठवताहेत वाह वा !
बहुतेक मनाच्या कुपीत जपलेले असावेत.

आलो आलो's picture

19 Jul 2023 - 8:30 pm | आलो आलो

सौंदाळा / टर्मीनेटर
दोघांचे आभार या निमित्ताने जागु ताईंचा जुना धागा वर काढलात.
आईला जागु ताईंच्या सर्व रेसिपी वाचायला दिल्या ....एक दोन वगळता सर्व तिने खाल्लेत आणि त्याचीही आठवण (तिच्या बालपणीची) सांगितली.
आईतर्फे सुद्धा आपले आभार.

Bhakti's picture

17 Jul 2023 - 10:11 pm | Bhakti

आघाडा पश्चिम महाराष्ट्र जास्त सहज मिळतो म्हणून भाजी होते.तशा वरील उल्लेख केलेल्या भाज्या सह्याद्री,कोकण ,पालघर पर्यंत सहज उगवताना आढळतात.त्या नजीकच्या मुंबई उपनगर भागात त्या सहज पोहचवून मोठ्या प्रमाणात विकल्याही जातात.आश्चर्य की मुंबई सारख्या मोठ्या शहरातील लोकांना या भाज्या सहज मिळतात पण पश्चिम महाराष्ट्रात निम शहरी भागात सहज मिळत नाही.याबाबत सध्या माझी आवडती आणि गुणी अभिनेत्री ते शेतकरी संपदा जोगळेकर कुलकर्णी यांच्या होम स्टे या अग्रीकल्चर टुरिझमचे व्हिडिओ पाहत असते.त्यात उभयतांनी घेतलेले शेतीतले कष्ट कमालच आहेत.

आलो आलो's picture

19 Jul 2023 - 8:39 pm | आलो आलो

व्हिडीओ पहिला खरंच जोगळेकर कुलकर्णी खूपच कमल काम करताहेत.
प्रतिसादाबद्दल व नव्या माहितीबद्दल धन्यवाद !

छान लेख , मलाही थंडीत पालेभाज्या खायला फार आवडतात मी 90__98 पर्यंत भाजीवाला ही कुठली ई० विचारुन‌. नेहमी वेगवेगळ्या पालेभाज्या इथे लांबच्या उपनगरात मिळवून खात असे, नंतर आम्ही काही वर्षे मुंबई शहरात मध्यभागी रहायला गेल्या वर मला इथे मिळणारा वस्तू ,पदार्थ भाज्या मिळत नसतं म्हणून खूप वाईट वाटायचे. आता आम्ही ‌परत आमच्या जून्या घरी आल्यावर ‌थंडीत जाणे होत नाहीत कारण नोकरी‌संपविली‌व‌घरीच तेव्हा आॅफिसर येता खूप प्रकारच्या ‌मोसमी भाज्या मी घेऊन येई व आमच्या कडे एकच प्रकारे‌करायची पद्धत कांदा लसूण ,वाटण न‌. घालता भाजी आमटी करणे‌,जास्त मसालेदारही नकोत मग मी‌भाजी फक्त हळद हिंग मोहरीच्या फोडणी वर टाकून‌खूप परतें व नंतर रोजच‌सगळयात तिखट ,मीठ ,साखर व‌खवलेले नारळ घालून‌नोकरीवर जाताना भाजी करे व सर्वांना ती‌तशीच‌आवडे शेवटी हाताच्या चवीवर‌. सर्व असते म्हणून मी माझे‌समाधान करुन घेउ, कधीतरी रस्सा भाजीत टोमॅटो घालून वैविध्य आणण्याचा प्रयत्न करेन. पण तेव्हा मी 90 ते.98 पर्यंत खूप पालेभाज्या खाल्लंया, त्यात मला नेहमी आंबट चुका, अंबाडी रविवारी खायच्या असा नियमच झाला कारण एक दिवसच दुपारी ‌जेवायला‌घरी‌व‌सकाळी भात खाता येईल ,एरवी फक्त रात्रीच आमटी भात‌, खिचडी, पापड. ब्रेड पोळया कमी असल्या वर जेवत असू.खिचडी पुरवठयाला व वेगळी पौष्टीक म्हणून. तेव्हा मला‌. आंबट चुका चाकवत ,अंबाडी पालक , मेथी, ( मला खूप आवडते) व‌ थंडीत‌. कोवळया पानांची भरपूर. मिळते‌मग ताक घालन‌पातळ भाजी , मेथी ओवा धणे.ईरे पूड घालून पराठे मेथी बेसन घालछन‌भगरा भाजी , घआईमधए मेथी‌गोळा भाजी
असे‌. प्रकार. मी वारंवार करे‌व त्या नंतर. माझा सकाळ संध्याकाळ मिळून‌ चार तासांचा जीवघेणा प्रवास ‌असे‌ त्यामुळे घरातले आज भाजी झाली‌ रोज केली‌ की ताटात
पोळीशी खायला काहीतरी प्रकार आहे
कारण कधी कधी काहीच जमत नसे व सगळ्यात विशेष करुन मुलगी व. सासूबाईंना. हायसे वाटे
आज व रोज हिला जमले व्यवस्थीत पोळीभाजी करुन जाणे जमले व ताटात मुलीला शाळेत जाताना नीट जेवण मिळे, सासूबाई फक्त गरम भात वरण फक्त हळद हिंग घालून सारखे केलेले. व गरम वरण. भातावर वर तूप लिंबू पिळून स्वतः घेत व. मुलीला. वाढत हेच मोठे काम केल्या सारखे करत ते पण मी सांगून बजावले असायचे म्हणून.
न बजावले म्हणून.मला उद्या ला पाले
भाजी‌. निवडून ठेवत किंवा मी‌दुसरया काही. भाज्या आणलेल्या निवडून चिरून‌ठेवत कारण सकाळी मला 9.10. ला निघावे
च लागे.
त्यावर,

आताचा छान मोठा प्रतिसाद उडाल्याने परत तेव्हढे लिहिण्यासाठी उत्साह व त्राण ही उरले नाही

आता नाही ते‌ दिवस वय व. नोकरी वुतसाह उरला नाही रोज बाहेर पडणे होत तेवहा नोकरीवरून येताना रोज भाज्या ,फळे भरपूर आणणे खूप कौतुकाचे वाटे कारण नाही कधी लहानपणी इतके आईवडिलांकडे पैसे बघितले व. ही कधी‌सवैपाक व इतके जबाबदारीने काम संसार केला .आता गेला तो उत्साह गेले‌वय व सासूबाई ही उरल्या नाहीत व नाही त्या शेवटपर्यंत आमच्याकडे राहिल्या व मुलगीही चांगलीच मोठी नोकरी करणारी कर्ती झालीय‌,गेले ते‌वय ,दिवस व आठवणी मित्र मैत्रिणी रोज भेटण्याचे‌दिवस व ‌जो. ही डबा प्रत्येकाचा असे तो चवीचा ,बेचव काही रोजच्या डब्या बरोबर आणलेले प्रत्येकाच्या घरआपरमआणए पदधतघचे‌वेगळज पदार्थ सणांचे‌. म्हणजे दिवाळी‌ व‌. गणपतीचे वेगळै व कधी सर्वांनी बरोबर वर्गणी काढून‌केलेली दसरा दिवाळी चार आदल्या दिवस व आॅफिसचया. कोणीतरी पुढाकार घेऊन आणलेले पदार्थ एकत्र खाणे यातली मजा गेली‌. व उरलेत ते एकटे‌ व. घरातले‌. तिघांचेच विश्र्व. ज्यात नवीन काहीच नाही. जे नोकरी तर रोज वेगळे काही नकोसे हवेसे घडे ध. नविन माहिती,अनुभव मइळएपण हवे होते‌तसज संथ ,निवांत आयुष्य रोज जगायला बर्या पैकी पैसे त्याची आयुष्यात. खूप कमतरता 40 पर्यंत होती तीही नाही महणून‌बरे वाटते .

लिहिण्यात खूप व. शब्द टाकण्यात घाईने अशुद्ध झाले आहे . कॄपया. समजून घेणे.प्रतिसाद. उडेल‌. या भितीने परत न वाचता व‌.
दुरुस्त. न करता. प्रसिद्ध केलेय कॄपया समजून घेणे व त्या बद्दल माफी असावी .

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Jul 2023 - 12:23 pm | राजेंद्र मेहेंदळे

मोबाईल्वर टायपत असल्यास माहीत नाही, पण संगणकावर असेल तर

https://marathi.changathi.com/

यावर हवे ते टाईप/एडिट करुन मग चोप्य्/पस्ते करा

आलो आलो's picture

19 Jul 2023 - 8:37 pm | आलो आलो

प्रतिसाद दिलात व मनातील भावना व्यक्त केल्यात त्या पोहोचल्या.
प्रतिसादासाठी केलेले कष्ट समजले .... अनेक अनेक धन्यवाद !

वामन देशमुख's picture

18 Jul 2023 - 1:10 pm | वामन देशमुख

चवदार धागा काढलाय!

श्रावणात इतर अनेक झाडांच्या पानांसोबत आघाडा, केना यांचीही पाने पत्री म्हणून म्हणून वापरतात. पण आघाड्याची भाजीही होते हे माहीत नव्हते. आता एकदा try करून बघीन.

तरवंटा / तरोटा ही याच दिवसांत येणारी अजून एक भाजी मराठवाड्यात आढळते. कुणी खाल्लीय का?

जागूंच्या पालेभाज्यांच्या लिंका आवडल्या.

चौकस२१२'s picture

20 Jul 2023 - 8:14 am | चौकस२१२

आघाडा दुरवा फूले .....अशी आरोळी ऐकलिय तो आघाडा अणि हा एकच का?

आलो आलो's picture

20 Jul 2023 - 2:07 pm | आलो आलो

आघाडा दुरवा फूले .....अशी आरोळी ऐकलिय तो आघाडा अणि हा एकच का?

हो हो ...तो आघाडा म्हणजेच हा ...

आलो आलो's picture

19 Jul 2023 - 8:35 pm | आलो आलो

प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

तरवंटा / तरोटा ही याच दिवसांत येणारी अजून एक भाजी मराठवाड्यात आढळते. कुणी खाल्लीय का?

याबद्दल आणखी वाचायला आवडेल.

चामुंडराय's picture

20 Jul 2023 - 2:10 am | चामुंडराय

पुण्यात रानभाजी महोत्सव होतो ना?

तेव्हा वेगवेगळ्या रानभाज्या मिळतात.

आलो आलो's picture

20 Jul 2023 - 2:05 pm | आलो आलो
रानभाजी महोत्सव

ऐकून आहे मी पण या बाबत पण कधी महोत्सवाला भेट देण्याचा योग नाही आला....आपण आपले अनुभव शेअर करा.

आमच्याकडे विपुल प्रमाणात मिळतो आघाडा. बहुतेक हा उष्ण गुणधर्माचा असावा असे वाटते.

रानभाज्यांमध्ये 'कडवंची' ची भाजी मला फार आवडते. चव आणि खाताना येणारा कुडुम कुडुम आवाज !!

रीडर's picture

25 Jul 2023 - 1:04 am | रीडर

आघाडा पूजेला वापरतात हे माहिती होत.. भाजी करतात आताच कळलं. करून बघणार
घराच्या compound chya भिंतीवर खूप यायचा
केणा नावाची एक भाजी पण अशीच उगवून यायची.. त्याच्या पानांची कुरकुरीत भजी मस्त लागते..