बेलफळ पहिल्यांदाच पाहिलं.मोठ्या शहरात ते उन्हाळ्यात विकतही सहज मिळते.मला मात्र झाडाचा शोध लागला म्हणून मिळाल.
तर सध्या एकच बरं म्हणून एकच आणलं.टणक बाहेरच्या हिरवट केशरी रंगाच्या आवरणाला जरा चिर होती.जरा सुगंध घ्यावा वाटला.अहा,काय तो परिमळ!घरी पोहचेपर्यंत सगळ्या रस्त्याने तो मधुर गंध मनभर भरून घेत राहिले.
फळं तसच ठेवलं.निवांत सरबत ,जेली करेन असं ठरवलं.आज दुपारी त्याची आठवण आली.पुन्हा गंध घेतला,बत्त्याने टणक आवरण दोन भागात फोडले.आत मध्यम पिकलेला पिवळसर गर होता.कौट फळासारखाच बिया,शिराधागे होते.जरा चिकट होता.गर चमच्याने काढला.थोडासाच गर मिक्सरमधून फिरवला.गाळून घेतला,भलताच तुरट लागला.साखर वापरायची नव्हती.तेव्हा यु-ट्युबकडे जावेच लागले.तेव्हा योग्य पाककृती समजली.
कृती-बेलफळाचा गर अर्धे पाण्याने भरलेल्या पातेल्यात चमच्याने कुस्करून घ्यावा.बिया फुटू देऊ नये.तुरटपणाला त्याच जबाबदार असतात म्हणूनच मिक्सरमधून बियासह गर फिरवू नये.
तर तो गर पाण्यात अर्धा -एक तास ठेवावा.नंतर गाळून घ्यावा.शक्यतो इथे पण साखर लागतेच.आवडीनुसार साखर ,पूदिना पानं,सैंधव मीठ घालावे.बर्फ आणि आणखीन गार पाणी घालावे.सुंदर रंगाचे बेलफळ सरबत तय्यार!चवही एकदम रिफ्रेशिंग आहे.
बेलफळ सरबत उपयोग -बेलफळात व्हिटामिन C मुबलक आहे.अनेक पोटाच्या विकारावर औषधाप्रमाणे,अन्टीबक्टेरियल असा गुणधर्म यांचा आहे.(माहिती -गुगल)
माझ्या मिक्सरमधून वाटून एकत्र केलेल्या गरात पाणी, बर्फ,साखर टाकून निवांत उन्हाळ्यात अखेर अखेरच्या दुपारी याचा आस्वाद घेतला.आणि पुन्हा एक पारंपारिक पाककृती करण्याचे समाधान मिळवलं
-भक्ती
प्रतिक्रिया
11 Jun 2023 - 7:38 pm | राजेंद्र मेहेंदळे
अरे वा!! मस्तच की. कधी बेलफळ मिळाले तर करुन बघेन
11 Jun 2023 - 8:28 pm | कंजूस
मी प्यायलो आहे दोन चार वेळा. किंचित कडसर चव असते पण उन्हाळ्यासाठी चांगले. उप्रमध्ये मोठ्या शहाळ्याएवढी मिळतात.
((खूप मिळाली तर गर वाळवून ठेवावा. त्याचं कधीही पेय करून पिता येतं डिसेंट्रीसाठी आणि तापात गारवा म्हणून उपयोगी. ))
11 Jun 2023 - 8:35 pm | धर्मराजमुटके
कशातही साखर टाकली की त्या पदार्थाच्या औषधी गुणधर्मांची वाट लागलीच हे नक्की ! बाकी जिव्हा तृप्त करण्याच्या दृष्टीकोणातून छान पाककृती.
अवांतर : कवठ च्या फळाला घाटाखाली काय म्हणतात ? मी एकदा एका कोकणस्थाला कवठ दाखविले तर तो हे बेलफळ आहे असे म्हणाला. मला ते खरे वाटले नाही पण तो काही मिपा सदस्य नसल्यामुळे कशाला उगाच वादविवाद म्हणून विषय सोडून दिला.
15 Jun 2023 - 3:21 pm | सोत्रि
हा हा हा , ये लगा सिक्सर...
- (मिपसदस्य असलेला) सोकाजी
16 Jun 2023 - 2:53 pm | विजुभाऊ
कवट हाणि बेलफळ हे दोन वेगवेगळे आहे.
इंग्रजीत दोन्हीला वुडअॅपल म्हणतात म्हणुन गोंधळ होतो.
कवझ्ठ खूप आंबट असते.
बेलफळाचा गर चिकट असतो. आणि थोडा रसदारदेखील असतो.
कवठाचा गर त्यामानाने घट्ट असतो
24 Jun 2023 - 10:05 am | इपित्तर इतिहासकार
इंग्रजी भाषेत
बेलफळ - स्टोन ॲपल
कवठ - वूड ॲपल
गूगल सर्च संदर्भ खालीलप्रमाणे.
11 Jun 2023 - 9:43 pm | कर्नलतपस्वी
मध्यम ते उच्च वर्गीय कुटुंबात,साॅफ्ट ड्रिंक्स,चिप्स,कुरकुरे,बिस्किटं,चॉकलेट्स इत्यादींनी कपाटे भरलेली दिसतात.
लहानपणी आमचा सर्व खाऊ उंच झाडावर टांगलेला असे. कैरी, जांभळं,बोरं,आवळे,चिंचा,उंबर भोकरं,करवंद,ताडफळं आणी अशी अनेक. सहज उपलब्ध, त्यामधे बेलफळ एक.
पुढे उत्तर भारतात नोकरी करताना उन्हाळ्यात बेळफळाच्या सरबतांनी भरलेल्या हातगाडय़ा (रेडी) रस्त्यावर दिसत. गरिबांचे साॅफ्ट ड्रिंक.
सरबताचा ग्लास मस्त दिसतोय.
11 Jun 2023 - 9:46 pm | शेखरमोघे
आकर्षक चित्र, माहिती आणि पाककृती. अभिनन्दन.
अनेक पोटाच्या विकारावर औषधाप्रमाणे,अन्टीबक्टेरियल असा गुणधर्म यांचा आहे.(माहिती -गुगल)
काही काळापूर्वी माझे आणि पत्नीचे नेहमीच पोट "अस्वस्थ" असे आणि त्यावर अनेक आयुर्वेदिक तज्ञान्कडून मिळालेल्या सल्ल्यानुसार "बेलपाक" वापरल्याचा -काही प्रमाणात- उपयोग झाला.
"बेलपाक": पुण्यात रविवारपेठेतल्या अनेक दुकानात "चिरलेली बेलफळे (बहुतेक फक्त गर), साखरेचा पाक आणि इतर काही (असल्यास)" असा, काहीसा मोरावळ्यासारखा, औषधी प्रकार सहज मिळतो. चविष्ट असतो आणि वापरायला ही सोपा असल्यामुळे इतरही वेळी "Jam" सारखा खायला हरकत नाही असे (त्यावेळी) वाटले. नन्तर काही मुद्दाम रविवारपेठेत जाणे झाले नाही आणि म्हणून हा पदार्थ वापरलादेखील गेला नाही.
मी (कोकणस्थ नसलो तरी) बेलफळ आणि कवठ दोन्ही देखील प्रत्यक्ष पाहिलेली असल्यामुळे "ही दोन्ही वेगवेगळी फळे आहेत" हे ठामपणे म्हणेन. कवठाची बर्फी हा एक नरसोबाच्या वाडीला खालेल्ला पदार्थ इतर कुठे सहसा पाहिला नाही.
12 Jun 2023 - 11:18 am | Bhakti
"
जुन्या भागात असे पारंपारिक प्रकार 'जपले' जातात याचं कौतुकच आहे.
यावरून नगरचे 'आलेपाकवाले काका' आठवले.किती काळ लोटला पण ते अजूनही अविरत आलेपाक तयार करून विकतात_/\_
11 Jun 2023 - 9:46 pm | कर्नलतपस्वी
गरिबांचा सर्व खाऊ पौष्टिक असतो.
11 Jun 2023 - 10:02 pm | Bhakti
वाह !धन्यवाद मंडळींनो.
सर्वांचेच खुपचं सुंदर सुरेख प्रतिसाद आहेत :)
मस्तच वाटलं!येऊ द्या अजून!
12 Jun 2023 - 5:32 am | कंजूस
हत्तींचं आवडतं फळ - कवठ.
--------
बेलफळाचा मुरंबा - बेल मुरब्बा. हे आयुर्वेदात 'अनुपान' प्रकारात येतं. म्हणजे औषधाबरोबर खायची वस्तू. याने डिसेंट्रीच्या औषधांचा गुण वाढतो. (च्यवनप्राश हेसुद्धा अनुपान आहे. खोकल्याच्या,अशक्तपणाच्या औषधासह घेण्याचे.)
12 Jun 2023 - 10:31 am | प्रचेतस
बेलफळाचं सरबत ना कधी ऐकलं ना कधी पाहिलं. (घरी बेलाचं झाड आहे पण लहान असल्याने अजून फळे लागली नाहीत). एक हटके पाकृ दिल्याबद्द्ल आभार. पांढर्या साखरेस पर्याय म्हणून मध घालावा. त्याची एक वेगळीच अशी चव येते.
12 Jun 2023 - 11:30 am | Bhakti
होय मध वापरल होतं तरी साखरही लागलीच.
12 Jun 2023 - 10:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाह ! बेलफ़ळाच्या रस्ता वोडका वगैरे टाकून दिलं तर अजून आराम लाभत असेल असे वाटले बाय द वे बेलफ़ळाचा रस लै भारी दिसतोय. आमच्याकडे आमची आजी गळसूट झाली की बेलाच्या फ़ळाला कढून काढा द्यायची, त्याची आठवण झाली.
अजून एक माझ्या नौकरीच्या गावी एक महादेवाचं मंदिर आहे आणि शेजारीच बेलाचं झाड आहे, म्हणजे पानं पडली तर, पिंडीवरच पडतील अशी सोय. नंतर, मंदिर केलं. श्रावणात तुडुंब गर्दी असते. मजा असते सगळी.
-दिलीप बिरुटे
12 Jun 2023 - 10:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बेलफ़ळाच्या रसात. असे लिहायचे होते.
-दिलीप बिरुटे
12 Jun 2023 - 11:31 am | Bhakti
वोडका? :) :)
12 Jun 2023 - 10:46 am | इपित्तर इतिहासकार
पण तुम्ही चुकीचे बेलफळ आणलेत.
हे सरबताचे बेलफळ होय, पातळ पापुद्रा साल, भरगच्च मधुर गर, कमी बिया, पूर्ण गोलाकार आकार.
तुम्ही केलेत ते लंबगोलाकार आहे. चव उत्तमच असते पण कडसर चव जास्त असते.
तुम्ही जे बेलफळ वापरले आहे ते खालीलप्रमाणे हिरवे कच्चे असताना बारीक चिरून लोणचे घालता येते, लोणची मसाला अधिक भरपूर लिंबूरस घालून ते पण उत्तम लागते.
12 Jun 2023 - 10:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत.
-दिलीप बिरुटे
12 Jun 2023 - 11:10 am | Bhakti
बहुतेक चुकीचे नाही.फोटो चांगला नाही म्हणून दिला नव्हता.याचही सरबत करतात फक्त बिया घ्यायच्या नाहीत.
बाकी कंकाकानी सांगितल्याप्रमाणे ते मोठं शहाळ्याच्याही आकाराचे असत,हे मी एका दक्षिण भारतीय काकूंना follow करते तिथं रेसिपी पाहिली होती.
12 Jun 2023 - 11:14 am | इपित्तर इतिहासकार
ओके!
16 Jun 2023 - 2:56 pm | विजुभाऊ
या फोटोत दिसते आहे ते कवठ आहे.
12 Jun 2023 - 11:04 am | कंजूस
उगाच लाईक साठी फेसबुकवर टाकून ते आठ दिवसांत हरवून जातात कायमचे.
Bhakti, तुमच्या भागात गोंदण्याची झाडं अजून आहेत का? (भोकराची एक लहान लांबडी जात. लाल मुंगळे यावर फार असतात.)
12 Jun 2023 - 11:26 am | Bhakti
शोधावं लागेल, खुप दिवस गावाकडे नाही गेलं
रचक्याने बकुळीचा फोटो पोस्ट केल्यावर माझ्या जुन्या सरांनी मला मोठी पारंपारिक फळांची यादीच दिली आहे,हे पण शोधायचं आहे :)
सरांची यादी-
Madhuka indica ( moha) is also member of sapotaceae( chickoo family ). Moha flowers have very peculiar aroma, are fleshy and very delicious. I have tried fruits also. But Bakul is more tasty.. Khirani( Manilkara hexabdra)is another member of the family with edible fruits. My mother tried all those fruits in Motibag of Kanhur pathar. Now there is no bakul no khirani. Another fruit tree she remembered that is gondan( Cordia dichotoma) . Cordia myxa ( Bhokar) is near my house on Kamothe.
15 Jun 2023 - 4:42 pm | Bhakti
@कंजूस काका
श्री समर्थ रामदास स्वामी रचित बाग प्रकरण -यात पारंपारिक २७७ वनस्पतीचा उपयोग, गुणधर्म नुसार नोंदी आहेत.
नक्की ऐका
https://youtu.be/L3-nf2uwn8w
15 Jun 2023 - 8:59 pm | कंजूस
ऐकलं.
12 Jun 2023 - 11:52 am | तुषार काळभोर
पॅशन् फ्रूट सरबतात साखर नाही टाकली तरी गोड होतो.
बेलफळ कधी पाहिलं नाही (किंवा दिसला असेल पण लक्ष दिलं नाही).
चव कवठासारखी असते का? मला कवठाचा वास आणि चव, दोन्ही आवडत नाही.
12 Jun 2023 - 12:08 pm | इपित्तर इतिहासकार
बेलफळ वायले, कवठ वायले.
कवठ - गोडसर आंबट चव, गर प्रॉपर केशरी किंवा कथ्या रंगाचा
बेलफळ - कडसर मधुर, गर पिवळा किंवा केशरी पिवळा.
16 Jun 2023 - 9:37 am | सुबोध खरे
बेलफळ https://en.wikipedia.org/wiki/Aegle_marmelos
कवठ Woodapple fruit https://en.wikipedia.org/wiki/Limonia_acidissima
12 Jun 2023 - 1:16 pm | चौकस२१२
पाषाण फ्रुट सारखे नाही वाटत
24 Jun 2023 - 7:16 pm | सुरिया
बावधन फ्रुट आहे बहुतेक. ;)
24 Jun 2023 - 7:19 pm | इपित्तर इतिहासकार
भूगाव ?
12 Jun 2023 - 12:08 pm | गवि
उन्हाळ्यात थंडावा देणारी पाकृ.
बेल फळ आणि पॅशन फ्रूट यांत काहीतरी साम्य आहे.
बाकी अनेक ठिकाणी कवठाचा उल्लेख वाचून:
कवठ प्रत्यक्ष एखाद्या पदार्थात वापरले जाणे हे नरसोबावाडी, कुरुंदवाड इत्यादि भागात बर्फी रुपात पाहिले आहे. बर्फी आणि मुरंबा देखील असतो. बर्फी दुधाची नसून आंबावडी टाइप असते.
बाकी कोंकणात कवठ, कवट म्हणजे अंडे.
12 Jun 2023 - 12:14 pm | प्रचेतस
कवठाची चटणी घरी महाशिवरात्रीला होत असते. चांगले पिकलेले कवठ मिळणे भाग्याचे, बरेचदा अर्धवट कच्ची कवठे मिळतात. गूळ भरपूर घालावा लागतो.
14 Jun 2023 - 4:03 pm | कंजूस
ही एप्रिल मे मध्ये मिळतात. कर्नाटक भागात तसेच जवळच्या कोल्हापूर,सांगली जिल्ह्यात यांची झाडं आहेत. आम्ही लहानपणी शेतात हुंदडायचो तेव्हा एका भागात आजी जाऊ नका सांगायची. कारण तिथे भले मोठे कवठाचे झाड होते त्याची फळे खाली पडत.
मग ती मालकीण आम्हास पिकलेली कवठं पाठवायची. ही पांढुरकी झालेली,हलकी आणि कवठाचा खास सुगंध येणारी असतात. सालीच्या आतला गर गोळा होऊन हलतो. तसेच वर खडा मारल्यास टणक आवाज न येता 'ढुप' हा आवाज येतो. पिकलेला गर छान गोड लागतो. गूळ घालावा लागत नाही.
डोंबिवलीत अजूनही विकायला येतात. ती आणतो. त्याचे विक्रेते वेगळे असतात. शाळांच्या जवळ चिंचा,बोरे विकणाऱ्यांकडे हातगाडीवर जी कवठं असतात ती सर्व कच्ची असतात. त्याचा भाव सुद्धा करू नये.
12 Jun 2023 - 2:16 pm | Bhakti
बेल फळ आणि पॅशन फ्रूट यांत काहीतरी साम्य आहे.
बेल आणि कवठ एकाच घरातले-Rutaceae . पॅशन/कृष्णफळ-Passiflora
12 Jun 2023 - 12:15 pm | यश राज
बेल फळ सरबत खूपच छान लागते.
माझ्या मामाच गावात पूजेच्या सामानाची व आयुर्वेदिक वस्तूंचं दुकान आहे. दुकानात खूप बेलफळ असत .आजोबा असताना उन्हाळ्यात बेलफळ पाण्यात भिजवून ठेवत व दुपारी त्याचे सरबत सर्वांना प्यायला देत असत. उरलेला गरात पुन्हा दुसरे पाणी टाकून भिजत ठेवले जाई. एका बेलफलाचे साधारण २ ते ३ दिवस सरबत बनवता येते. तो पर्यंत त्याची चव शाबूत राहते.
14 Jun 2023 - 12:30 pm | टर्मीनेटर
बेलफळाचा सरबत छान लागते! (मला तरी साखर घालुन बनवलेलेच आवडते)
पूर्वी मामाचा जुना वाडा होता तेव्हा घरामागे बेलफळ, आंबा, आवळा, चिंच, कवठ अशी अनेक झाडंही होती. पण वाडा पाडून तिथे इमारत उभी राहिल्यावर गेले ती घरची फळे खाण्याचे दिवस! बऱ्याच वर्षांत हे सरबत प्यायला मिळाले नाहीये. आंबट कवठात गूळ मिक्स करून खायला पण मजा यायची. तीन वर्षांपूर्वी फार्मवर एक बेलाचे झाड लावले आहे, आत्ताशी सहा फूट उंचीचे झाले आहे, त्याला फळे यायला अजून अवकाश आहे.
माझ्या हयातीत त्याला बेलफळे लागली तर पुन्हा हे सरबत पिण्याचे भाग्य लाभेल म्हणतो 😀
14 Jun 2023 - 1:29 pm | Bhakti
यशराज आणि टर्मिनेटर दोघांनी मामेकडे धमाल अनुभवली , नशिबवानच.
सर्वांना धन्यवाद!
14 Jun 2023 - 1:30 pm | Bhakti
https://www.instagram.com/reel/Csp25lRxL27/?igshid=MzRlODBiNWFlZA==
24 Jun 2023 - 12:01 pm | Bhakti
आज शेफ कुणाल कपूर बेलफळ सरबतासोबत :)
24 Jun 2023 - 8:22 pm | धर्मराजमुटके
बेलफळाच्या धाग्याचा कवठाचा धागा केल्याबद्द्ल क्षमस्व !
26 Jun 2023 - 1:13 pm | पुष्कर
सुंदर. आमच्या वाड्यात बेलाचं झाड होतं. म्हणजे आता त्याचं खोड अजूनही शिल्लक आहे, पण झाडाची वाट लागली. पण माझ्या लहानपणी ते ३ मजली उंच होतं. महाशिवरात्रीला माझे वडील त्याच्या वरपर्यंत चढून बेलाची पानं काढायचे आणि वाड्यातले इतर लोकही त्यांच्याकडून काढून घ्यायचे. त्याची गोल फळं खाली अंगणात पडायची (ती वरच्या फोटोतल्यासारखी, इडल्याकृती नव्हती). आमच्या वाड्यातल्या एका काकूंना पाठीचा त्रास होता, त्या ती फळं फोडून काहीतरी लेप बनवायच्या. माझ्या आजीने क्वचित बेलाची चटणी बनवलेली आठवते आहे. सरबत कधी प्यायलं नाही मी. ज्या काळी 'बेला के फूल' प्रसिद्ध होता, त्यावेळी माझं अनुभवविश्व हे 'बेला के फल' डोक्यावर टपकणार नाही ना, या चिंतेत खेळताना गेलं आहे. :)