अलौकिक!!

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
23 Mar 2023 - 5:09 pm

नमस्कार मंडळी
नोकरदार आणि संसारी माणसाची बऱ्याचदा "हम तो बिझी राहते है फालतू के कामो मे" अशीच अवस्था असते. त्यातही विकांताला एक सुंदर कार्यक्रम बघण्याचा योग आला. योगच म्हणावे लागेल, कारण रविवार सकाळ मोकळी मिळणे, घराजवळ कार्यक्रम असणे आणि चक्क फुकट पास मिळणे हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो ३ असेच झाले नाही का? तर आमच्या तबल्याच्या क्लासच्या कायप्पा ग्रुपवर एका दानशूर व्यक्तीने ही माहिती कळविली आणि पास हवे असल्यास व्य नि करण्यास सांगितले . लगेच हावरटपणा करून एक पास राखून ठेवायला विनंती केली. कार्यक्रम २ दिवस होता.पण पहिल्या दिवशी मुख्य गायन होते, आणि गाण्यातले मला काही कळत नाही. (तसे मला कशातलेच काही कळत नाही म्हणा) त्यामुळे मी पास घेऊन आलो, पण पहिल्या दिवशी दांडी मारली.

a

दुसऱ्या दिवशी सकाळी धावत पळत कार्यक्रमाला पोचलो. बाहेरच्या स्वयंसेवकाने मला विचारले "निमंत्रित की जनरल" . अर्थात माझ्या नावाने पास घेतला असल्याने ऐटीत "निमंत्रित" असे उत्तर दिले. त्यावर तो मुलगा जातीने मला आत सोडायला आला आणि वेगळ्या दरवाजाने आत सोडले. मला एकदम अंगावर मूठभर मांस चढल्यासारखे वाटू लागले. मी त्याला विचारले "कुठे बसू?" त्यावर त्याने "पहिल्या ४ रांगात कुठेही" असे उत्तर दिले. माझा स्वतःच्या कानावर विश्वास बसेना. मी बावळटासारखे पुन्हा विचारले "पहिल्या ४ सोडून का?" त्यावर त्याने अदबीने "नाही सर, पहिल्या ४ मध्ये कुठेही" असे उत्तर दिल्यावर मला स्वर्ग दशांगुळे उरल्याचा अनुभव आला. मग जन्मजात आगाऊपणाच्या जोरावर मी पहिल्याच रांगेत मध्यभागी स्टेजच्या अगदी समोरच बसलो. आसपास सिल्क साड्या,गजरे दरवळत होते.झब्बे ,लेंगे ,नमस्कार चमत्कार ,पाय लागू, कानाच्या पाळीला हात लावून बोलणे , वाढवलेली झुल्पे, दाढ्या, मोठमोठे टिळे वगैरे सगळे साग्र संगीत होते. मी मात्र बावळटासारखा टी शर्ट आणि जीन्स घालून गेल्याने चुकून शेवटच्या रांगेतील विद्यार्थी पहिल्या रांगेत बसल्यावर शिक्षकांना काय वाटेल? तसा दिसत असणार. पण ते असोच.

कार्यक्रम सुरु झाला आणि रमाकांत गायकवाड यांचे गायन , साथीला संदीपान मुखर्जी तबला आणि सुयोग कुंडलकर यांचे संवादिनीवादन झाले. त्यांनी "पिया मिलन की आस" आणि "हरी ओम तत्सत" सादर केले . पण कार्यक्रम गायनाचा असला तरी माझे लक्ष संदीपान मुखर्जी कडे जास्त होते. आणि त्यानेही दिलेल्या एक दोन जागांचे सोने करून बहारदार तिहाई वाजवल्या. इतक्या की मी रेकॉर्ड करून क्लासच्या ग्रुपवर पाठवल्या आणि विचारले की "ही तिहाईच आहे ना की चक्रदार?"

यानंतर एक छोटा ब्रेक आणि मग सुरु झाला मला पाहिजे होता तो कार्यक्रम म्हणजे "शुभ महाराज" यांचे सोलो तबला वादन. तबल्यात बनारस, लखनौ,दिल्ली , फरुक्काबाद ,अजराडा अशी अनेक घराणी आहेत. बनरस घरन्यचे संस्थापक होते रामसहाय. शुभ महाराज यांची थोडी ओळख म्हणजे बनारस घराण्याचे उस्ताद किशन महाराज यांचे नातू. किशन महाराजांची कल्पना यायला एक व्हिडीओ तूनळीवरून साभार

किशन महाराज

तर शुभ महाराज स्टेजवर आले. वीरासन घालून बसले. २५-३० चे वय. प्रसन्न मुद्रा. माईक चेक , मॉनिटर चेक वगैरे सोपस्कार झाले. प्रेक्षकातील एक दोन बुजुर्गाना नमस्कार झाले. आणि मग एक तणावपूर्ण शांतता पसरली. फक्त स्टेजवर लाईट्स होते. कुजबुज एकदम बंद. पिनड्रॉप सायलेन्स.आणि संवादिनीवर लेहरा सुरु झाला. क्षणातच शुभमहाराजांनी त्रितालचा ताल पकडला, कुस्तीच्या सुरुवातीला जशी खडाखडी चालते आणि प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीचा अंदाज घेतला जातो तसे काहीसे जरा वेळ चालले. इथे प्रतिस्पर्धी नव्हता पण सोलो तबला म्हटले की अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. आपल्याला काय येते यापेक्षा प्रेक्षकांना काय समजेल आणि आवडेल याचा अंदाज घेऊन सादरीकरण करावे लागते.वेळेचे भान ठेवावे लागते. आपल्या भात्यातले कोणते बाण वापरायचे हे ठरवावे लागते. आणि मुख्य म्हणजे ठाय लयीतून सुरुवात करून एक एक कसब दाखवत मध्य आणि शेवटी द्रुत गतीमध्ये वादन संपवावे लागते. त्यातही आपापल्या घराण्याची परंपरा सांभाळून, घराण्याच्या विशेष गोष्टी जसे की रेले,गती,मुखडे,तुकडे,कायदे,पलटे, तिहाई, उठाण, चक्रदार,लयकारी पेश कराव्या लागतात. त्यात भेसळ होऊन चालत नाही. चुकून प्रेक्षकात उत्तम जाणकार बसलेले असतील तर तुमची इज्जत निघालीच समजा. उदा. हैद्राबाद कॉलेजमध्ये नंदकुमार भातलवंडे नावाचे प्रिन्सिपॉल होते.त्यांनी एकदा जाहीर कार्यक्रमात झाकीर भाईंना सुनावले होते की हे तुम्ही चुकीचे वाजवले. त्यावर झाकीर भाईंनी हात जोडले आणि नंतर खाजगीत म्हणाले "की सर पुन्हा असे स्टेजवर बोलू नका, काय ते मला कान पकडून खाजगीत सांगा " असो. अजूनही काही फरक असतात.बनारस घराण्याचे तबलावादन जोरकस तर लखनौ घराण्याचे कोमल असते. डग्गा ठेवायची पद्धत वेगळी असते. (शाई आपल्याकडे किंवा शाई समोरच्या बाजूला).

शुभ महाराज व्हिडिओ
शुभ महाराज

तर शुभ महाराज एक एक गोष्टी पेश करायला लागले आणि वातावरण तंग होउ लागले. काही समजते आहे असे वाटता वाटता गोष्टी हातातून निसटू लागल्या. आता मी कंठे पापांची एक चीज पेश करतो, आता मी आजोबांची (किशन महाराजांची) एक चीज पेश करतो. असे करत करत मध्ये मध्ये माईकवर बोल म्हणत कधी एकाच बोलाची बढत तर कधी उतरण दाखवत कार्यक्रम पुढे सरकू लागला. एक दोन ठिकाणी तर "धिर धिर" चे पलटे त्यांनी ईतक्या वेगाने वाजवले की मी ते तोंडानेही त्या वेगात म्हणु शकणार नाही.

अजुन एक व्हिडिओ
शुभ महाराज

गाण्यात जशी आलापी असते तशी आलापी बनारसवाले वादक तबल्याच्या बोलांमध्ये वाजवून दाखवतात. त्याचे नमुने दाखवून झाले. हळूहळू लय वाढायला लागली आणि एका बहारदार तिहाईने कार्यक्रमाची सांगता झाली. मंत्रमुग्ध झालेले प्रेक्षक नकळत उठून उभे राहिले आणि सभागृह टाळ्यांच्या गजरात बुडून गेले.(समाप्त)

संगीतप्रकटन

प्रतिक्रिया

छान... कुठे झाला कार्यक्रम?

प्रचेतस's picture

24 Mar 2023 - 6:11 am | प्रचेतस

व्हिडिओ नाही पाहिलेत अजून मात्र तुम्ही एकदम बहारदार वर्णन केले आहे.

चांदणे संदीप's picture

24 Mar 2023 - 2:10 pm | चांदणे संदीप

तुम्ही एकदम बहारदार वर्णन केले आहे.

मजा आली वाचून.
किशन महाराज यांचा व्हिडिओ पाहिला, आवडला. आता पुढचे पाहतो.

सं - दी - प

सौंदाळा's picture

24 Mar 2023 - 11:49 am | सौंदाळा

लेख आवडला. पद्म्श्री विजय घाटेंचा सोलो तबला एकदा ऐकला आहे आणि अजून विसरु शकत नाही. बाकी तबलजी ऐकायचा योग अजून आला नाही.

आसपास सिल्क साड्या,गजरे दरवळत होते.झब्बे ,लेंगे ,नमस्कार चमत्कार ,पाय लागू, कानाच्या पाळीला हात लावून बोलणे , वाढवलेली झुल्पे, दाढ्या, मोठमोठे टिळे वगैरे सगळे साग्र संगीत होते. मी मात्र बावळटासारखा टी शर्ट आणि जीन्स घालून गेल्याने चुकून शेवटच्या रांगेतील विद्यार्थी पहिल्या रांगेत बसल्यावर शिक्षकांना काय वाटेल?

हे वर्णन मात्र खासच

आंबट गोड's picture

24 Mar 2023 - 11:57 am | आंबट गोड

पण कुठे झाला कार्यक्रम? कुणी आयोजित केलेला?

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 Mar 2023 - 6:06 pm | राजेंद्र मेहेंदळे

कार्यक्रम "बाल शिक्षण म्ण्दीर, मयुर कॉलनी, कोथरुड्,पुणॅ" येथे होता.

तालायन आणि पंचम निषाद या दोन संस्थानी मिळुन आयोजन केले होते.

कर्नलतपस्वी's picture

24 Mar 2023 - 9:53 pm | कर्नलतपस्वी

कधी प्रयत्न केला होता.त्रिताल, रूपक व एकताल गुरूजींनी शिकवले पण लग्न झाल्यामुळे बेताला झालो. शिकवणी सोडावी लागली.

आयुष्यात बरेच काही करायचे होते पण काही मी करू शकलो नाही काही नोकरीमुळे करता आले नाही.

संगीतातले कळत नाही पण आवडते. तुनळीवरील दिग्गज गायकांना जरूर ऐकतो.

लेख वाचून हे समजले आपल्याला तबलावादन आवडते व शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण घेतले असावे.

तुषार काळभोर's picture

25 Mar 2023 - 12:24 pm | तुषार काळभोर

कार्यक्रम छान झाला असणारच. तुम्ही अतिशय छान वर्णन केलंय.
व्हिडिओ पाहिले. पहिला पाहताना खाली सुचवण्यातून आणखी पाहिले. पुढे तासभर वेगवेगळे तबला, बिस्मिल्ला खाँ यांचे शहनाई वादन ऐकत महेश काळे यांच्या 'कानडा राजा पंढरीचा' नंतर पुन्हा लेखाकडे आलो. :)
सगळ्या व्हिडिओमधून एक गोष्ट लक्षात आली, हे कलाकार लोक खूप विनम्र आणि अदबशीर असतात. एखादा विक्षिप्तपणाचा अपवादात्मक किस्सा ऐकू येतो, पण सामान्यतः त्यांच्या वागण्यात विनय जाणवतो.

मनःपूर्वक आभार!

कंजूस's picture

25 Mar 2023 - 6:34 pm | कंजूस

तीनही वादन ऐकले.
सुरेल.
पहिल्या रांगेतून एवढं छान रेकॉर्डींग कसं काय केलंत?

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Mar 2023 - 8:20 pm | राजेंद्र मेहेंदळे

@कर्नलकाका-- शिकायला वय नसते. आवड असेल तर चालु करा पुन्हा शिकायला
@तुषार--पुढे तासभर वेगवेगळे तबला, बिस्मिल्ला खाँ यांचे शहनाई वादन ऐकत धन्यवाद. असे असेल तर लेखाचा उद्देश साध्य झाला म्हणायचा.
@कंजूसकाका--जन्मजात आगाऊपणाच्या जोरावर रेकॉर्डिंग केले :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Mar 2023 - 12:43 pm | राजेंद्र मेहेंदळे

श्री. ओजस आधिया@ कर्नाट्क हायस्कुल, पुणे

https://youtube.com/shorts/OoOnQBSzfDM?feature=share

https://youtu.be/93FIXojKI1s

सुधीर कांदळकर's picture

28 Mar 2023 - 5:13 pm | सुधीर कांदळकर

बर्‍याच काळानंतर संगीताबद्दल हरवून जावे असे सुरेख कांहीं वाचले. पहिल्या दुव्यावरची किशन महाराजांची परण सुप्रसिध आहे आणि बहुतेक मैफिलीत या परणीची फर्माईश होई असे ऐकून आहे. शुभ महाराज त्यांचे नातू हे प्रथमच कळले. तरुण वयात शुभ महाराज उत्साही आणि आक्रमक वादन करीत त्यामानाने या दोन्ही दुव्यातले वादन छान मुरलेले, सर्जनशील वाटले. तिसर्‍या दुव्यातले ते मध्येच झोका देत शिवाशिवी खेळणे, झकासच. सारे खरेच शीर्षकाला साजेसे अलौकिक.

शानदार लेखाबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

कुमार१'s picture

28 Mar 2023 - 5:29 pm | कुमार१

अतिशय छान वर्णन केलंय.
दिलखुश !

प्रदीप's picture

3 Apr 2023 - 3:24 pm | प्रदीप

सोलो तबलावादनाच्या कार्यक्रमाविषयी येथे सविस्तर लेख लिहील्याबद्दल आभार! दुसर्‍या व तिसर्‍या दुव्यांतील बोल सुंदरच. विशेषतः मला वाटते, तिसर्‍या दुव्यातील बोल, 'सवाल- जवाब' अशा सदरांतील होता. हे बरोबर आहे का?

ह्यानिमीत्ताने, बनारस घराण्याच्या वैशिष्ट्यांबद्दल वाचावयास आवडले असते.

चौथा कोनाडा's picture

3 Apr 2023 - 5:29 pm | चौथा कोनाडा

व्वा, क्या बात... सुंदर !