शेपूच सँडविच

kool.amol's picture
kool.amol in जनातलं, मनातलं
19 Jan 2023 - 11:08 pm

सांप्रत काळ हा अत्यंत फालतुगिरीचा आहे. फेबु आणि तत्सम प्रकारांमुळे ह्या फालतुगिरीला अत्यंत चांगले दिवस आले आहेत. उदाहरणार्थ कुठल्याही गावाच्या गल्लीबोळात जाऊन तिथं मिळणाऱ्या कुठल्याही पदार्थाचे व्हिडिओ बनवणे. सुरुवातीला उत्सुकता होती नंतर त्यातही साचलेपण आलं आणि आता पुढचा टप्पा..म्हणजेच कैच्या कै पदार्थ बनवणारे लोकं आणि ते खाणारे महाभाग आणि कळस म्हणजे त्यांचे व्हिडिओ बनवणारी जनता. काही खाद्य पदार्थ विक्रेते ह्या व्हिडिओ बनविणाऱ्या लोकांची लई बिना पाण्याने करतात..तरी पण हे थांबत नाहीत. असाच एक व्हिडिओ पाहण्याचा दुःखद योग आला, जो ह्या पोस्टची प्रेरणा देऊन गेला..

तर आज आपण आलो आहोत पुण्यापासून फक्त 120 किमीवर अंतरावर असलेल्या मौजे येडेभोसरी इथलं प्रसिद्ध चुलीवरील शेपू सँडविच खाण्यासाठी. सातारा हायवेवर 70 किमी आत आल्यावर देशी दारूच्या गुत्त्याजवळ हा गाडा आहे. (इथं एक अत्यंत कळकट म्हातारा पोट खाजवत बसलेला आहे).
"नमस्ते काका तुमचं प्रसिद्ध शेपू सँडविच आमच्या प्रेक्षकांसाठी बनवणार का?"
त्यावर म्हातारा एक तुच्छता दर्शक कटाक्ष टाकून पुन्हा पोट खाजवायला लागतो.
"किती वर्षांपासून आपण हे सँडविच बनवता?"
आता त्याच्या जीवावर आल्यामुळे तो "80 रुपये" इतकंच बोलून शेपूची भाजी काढून चिरायला घेतो.
"80 वर्षांपासून म्हणजे ह्यांच्या आजोबापासून हे सँडविच बनवत आहेत ही त्यांची तिसरी पिढी". ह्याच्या अकलेच्या नावाने बोंब आहे. म्हाताऱ्याने ह्याला कधीच फाट्यावर मारले आहे. आता तो काय करतोय हे कळायला मार्ग नाही.
"आपण पाहतो आहोत की ह्या सँडविचसाठी एक विशिष्ट ब्रेड इथे वापरण्यात येत आहे. काय वैशिष्ट्य आहे ब्रेडचं?" उत्तरादाखल म्हातारा थोड्या अंतरावर असलेल्या एका दुकानाकडे हात दाखवतो आणि १ अशी खूण करतो.
"सँडविच ब्रेड आजोबांनी सांगितल्याप्रमाणे समोर दिसणाऱ्या दुकानातून मिळवला जातो". समोरच्या दुकानातून एक पोरगा विडीच बंडल घेऊन येतो आणि म्हाताऱ्याला देतो. म्हाताऱ्याची शेपूची भाजी चिरून झाली आहे. आता तो ब्रेडला कुठलीतरी चटणी लावतो आहे. " ही चटणी आपली speciality आहे. ही घरीच बनवता का आपण?" म्हातारा उत्तरादाखल परत दुकानाकडे बघतो आणि तो मघाचा पोरगा काडीपेटी घेऊन येतो.
"आपण पाहत आहोत की, 80 वर्षांपासून प्रसिद्ध अशी चटणी बनवली जाते. ही त्यांची secret recipe आहे".
म्हातारा ब्रेडमध्ये कापलेला शेपू कोंबतो आणि तिथल्याच एका वर्तमान पत्राच्या तुकड्यावर टाकून देतो.
"आपलं प्रसिद्ध असं शेपू सँडविच तयार आहे, आजी बाहेर गेल्यामुळे चुलीवरच सँडविच आज मिळू शकणार नाही. पण हे सँडविच सुद्धा चवीला भन्नाट आहे. आपण पाहू शकता की शेपूचा हिरवा रंग आणि ब्रेडचा तांबूस रंग ह्यांच्या मिश्रणातून हे सुंदर असं सँडविच ह्यांनी बनवलं आहे."
"८० रुपये" म्हातारा इतकंच बोलून पुन्हा गप्प बसतो.
म्हाताऱ्याला पैसे देऊन तोंड फाटेस्तोवर स्तुती करून स्वतःची आणि चॅनलची जाहिरात करून एकदाचा व्हिडिओ संपतो. तिकडे म्हाताऱ्याने शांतपणे विडी पेटवलेली असते आणि शांतपणे झुरके मारत असतो..व्हिडिओ संपतो!

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

हा हा हा.. चॅनेलो चॅनली बोकाळलेल्या या फूड वलॉगर्सची खुमासदार रितीने धुलाई केली आहे. चुलीवरचे, गावरान, तुपातले वगैरे यशस्वी कलाकार पुणे आणि परिसरात मुबलक दिसतात.

घरचे मसाले, दर्जा, तीन पिढ्यांपासून, कच्चा माल हे सर्व अगदी हवेच. मग चहा आणि बनपाव का विकत असेना.

पण इथे तुम्ही अमूल बटर विसरलात की काय? आणि वरून खिसलेले चीज नाही?? म्हणजे या सर्वाखाली सँडविच गाडले गेले पाहिजे. वरून नापतोलला लाजवेल अशी कॉमेंटरी:
"अहाहा बघा कसं सढळ हाताने बटर वापरताहेत हे आजोबा, आणि तेही फक्त शुद्ध अमूल बटर, द टेस्ट ऑफ इंडिया.." (जाता जाता अमूलकडून स्पॉन्सरशिपचे स्वप्न बघायला काय हरकत आहे?) ;-)

अमूल बटर म्हणजे चैनीची परमावधी. वर चीझ टाकल असेल म्हणजे तर जणू काही यशोदा मातेने श्रीकृष्णाला दिलेला लोण्याचा गोळा असं कौतुक केलं जातं. वैताग आणलाय ह्या लोकांनी.

अगदी खरोखर असंच असतं यूट्यूबवर. फसवाफसवी.

कपिलमुनी's picture

20 Jan 2023 - 1:05 pm | कपिलमुनी

गुलाब जाम बर्गर बघायला दुव्यावर क्लिक करावे

Bhakti's picture

20 Jan 2023 - 1:43 pm | Bhakti

हा हा! जबरदस्त!

Bhakti's picture

20 Jan 2023 - 1:44 pm | Bhakti

आज आपण आलो आहोत रामण्णा चिन्नमा धर्माम्मा continued बरं जाऊ द्या अण्णाच्या 'डोसा चाहिए कौनसा' या होटलावर!
अण्णा कारलं, भोपळा,फरसबी डोशासाठी प्रसिद्ध!
आज जरा अतिप्रसिद्ध शेपू डोसा मागवूया...
"काय अण्णा किती वर्षे झाली होटलाला?"
"मर्हाटी नई आता"
"यिअर यिअर?"
"सोला साल वो गये"
"बघा अण्णांनी बँटर घेतलं,बघा तो ताजा ताजा शेपू.. अण्णांनी शेत सिक्रेट ठेवलंय...कसा बारीक शेपू कापलाय, अण्णा बँटर मध्ये शेपू एकत्र करत आहेत...हे अमूल बटर तव्यावर...सर्र..काय तो आवाज ..हे बघा ते बँटर रांगोळी सारखं गर गर गोल फिरवलं जातंय... इंजिनीअरिंगच्या मुलांनी अण्णाकडं शेप्स शिकायला यावं,अण्णांचा साईड बिझनेस चालेल...चला डोश्यावर फोकस करू...हे गेलं अमूल बटर ...अमूल चीज..अमूल दही..अमूल्य केवळ अमूल्य..शेपूचा डोसा..एकदा खाच"

फक्त 16 वर्षे? किमान ३ पिढ्या हव्यात तरच आम्हाला थापा मारता येतील.

टर्मीनेटर's picture

21 Jan 2023 - 2:21 pm | टर्मीनेटर

शेपूचा डोसा 😂
भक्ती, ह्याला आणखीन फुलवून स्वतंत्र लेख लिहा... मजा येईल वाचायला 😀

Bhakti's picture

22 Jan 2023 - 4:36 pm | Bhakti

धन्यवाद टर्मीनेटर
अगदीच धाग्याच्या प्रेरणेने सुचलं ते लिहिले :)

या निमित्ताने एक वैयक्तिक मत.

खरोखर बेस्ट आणि न चुकवावी अशी जी हॉटेलं, टपऱ्या, स्टॉल असतात तिथे निवांत शूटिंग, मुलाखत, स्टेप बाय स्टेप वर्णन अशी उसंत नसते.

ज्यांना जाहिरातीची गरज आहे असे काही नवे फूड जॉइंट वगळता.

एरवी अशा ठिकाणी विक्रेता यांना बाजूला करेल.

ओ साहेब, रांगेत या. ओ सर, प्लेट घेऊन बाजूला हटा, कस्टंबरचा रेटा लागलाय. हां तुमचे दीडशे झाले.. असे ओरडेल.

तुषार काळभोर's picture

20 Jan 2023 - 9:37 pm | तुषार काळभोर

याचा मी चष्मदिद गवाह आहे:)
सासवडमध्ये मेन रोडवर एक मिसळीचं हाटील आहे. हाटील म्हणजे हाटीलच! एकदम कळकटलेलं. आता सुधारलंय, पण मूळचा कळकटलेपणा जाणवतोच :D
तर, २०१३ मध्ये लग्नाच्या पत्रिका जेजुरीला ठेवून तिथून कोडीत येथे निघालो. मध्ये सासवडमध्ये चुलतभाऊ म्हणाला, की येथे चांगली मिसळ मिळते. तिथे गेलो तर, दारात काही जण सेल्फी घेत होते. आतमध्ये काही लोक मालकाला म्हणत होते की तुमच्यासोबत एक फोटो काढून घ्या आणि हॉटेलात लावा. मालक म्हणाला, ' काय करायचंय? ती पोरं त्याच्या बरोबर इथं फोटो काढत होती, मी बाहेर पाठवलं!'
मी म्हणालो, त्याला कुठं तरी पाहिलंय. भाऊ म्हणाला अरे, तो तर बालगंधर्व!! :)

श्वेता२४'s picture

20 Jan 2023 - 3:58 pm | श्वेता२४

उत्तरादाखल म्हातारा थोड्या अंतरावर असलेल्या एका दुकानाकडे हात दाखवतो आणि १ अशी खूण करतो. समोरच्या दुकानातून एक पोरगा विडीच बंडल घेऊन येतो
म्हातारा उत्तरादाखल परत दुकानाकडे बघतो आणि तो मघाचा पोरगा काडीपेटी घेऊन येतो. हा विनोद लै म्हणजे लैच आवडला..... :))))

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

20 Jan 2023 - 7:59 pm | हणमंतअण्णा शंकर...

अत्यंत कळकट म्हातारा

कशाला शेपुच्या सँडविचचा गाडा टाकेल?

पण खरोखर, मस्त पकडलंय या उपटसुंभांना!

आजकाल गल्लीबोळांत अजून एक जमात खूप फोफावली आहे. केक करून देणार्‍यांची..

नाना प्रकारचे कृत्रिम रंग, भसाभस फासलेली पांढरी डालड्याची क्रीम याइक्स, गिळगिळीत फ्लेवर्स

खेडोपाड्यांतसुद्धा आजकाल दर आठवड्याला याना त्या निमित्ताने हे केक खाल्ले जातात. वैताग आलाय या केकांचा..

आजकाल गल्लीबोळांत अजून एक जमात खूप फोफावली आहे. केक करून देणार्‍यांची..

अगदी अगदी...

चहाच्या पुरापाठोपाठ केकचे ढीग लागलेत.

या बिझनेस आयडिया नेमक्या कशा व्हायरल होतात हे कोडं आहे. केकबाबत तर लोक अगदी दुकानाची जागा, लोकॅलिटी, आणि एकूण कसलाच अभ्यास न करता सुरू करून बसलेले दिसतात. आणि फक्त केकच उपलब्ध असतात. की खरोखर आता लोक पूर्वीप्रमाणे फक्त वाढदिवस नाही तर सर्वच प्रसंग सेलिब्रेट करायला लागलेत म्हणून असेल?

नावेही खूप फॅन्सी.

केक स्टोरी, केक सागा, केक्स अँड बेक्स , केक वॉक, ...,

टर्मीनेटर's picture

21 Jan 2023 - 2:37 pm | टर्मीनेटर

वैताग आलाय या केकांचा..

उठसूट कुठल्याही प्रसंगी केक कपणाऱ्यांनी खरोखर वैताग आणलाय, त्यामुळेच मागे एका लेखात मी खालील वाक्य लिहिले होते 😂
"पुर्वी वाढदिवसा पुरतां मर्यादीत असलेला हा प्रकार आता बारसे, साखरपुडा, लग्न, लग्नाचा वाढदिवस, उद्घाटन समारंभ, रिटायरमेंट पार्टी अशा कार्यक्रमांत पहायला मिळतोच आहे पण त्यापुढे जाउन काही अतिउत्साही मंडळी अंत्यसंस्काराच्यावेळी स्मशानात आणि तेराव्यालाही केक कापण्याचा पायंडा पाडतील की काय असेही वाटु लागले आहे"

असो, मागच्या महिन्यात ख्रिसमससाठी भारतात आलेल्या एका परिचितांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीला गेलो होतो. 'थीम केक' बनवून घेण्यात यजमानीण बाईंनी आपली कल्पकता(?) अक्षरशः पणाला लावली होती. तीन मजली केक वर 61 हा आकडा अशा काही पद्धतीने उभारला होता की बघणाऱ्यांची दातखीळच बसावी! त्यातला योनीसदृश्य आकार दिलेला 6 चा आकडा त्यांचे प्रतिनिधित्व करत होता तर शिस्नाच्या आकारातला 1 चा आकडा आणि त्याखालचे वृषण अनुक्रमे उत्सवमुर्तींचे आणि त्यांच्या दोन मुलांचे (नावानिशी) प्रतिकात्मक स्वरूप दर्शवत होता.
हौसेला मोल नसते हे मान्य! पण आपल्या आचरटपणाचे असे जाहीर प्रदर्शन करून नक्की काय साध्य होत असेल हे अनाकलनीय आहे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2023 - 8:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त...! प्रतिसादही भारी.

-दिलीप बिरुटे

स्मिताके's picture

21 Jan 2023 - 12:17 am | स्मिताके

अगदी खरं आहे.

अनिंद्य's picture

21 Jan 2023 - 1:16 pm | अनिंद्य

हा हा :-)

हे शेपूचे सॅन्डविच आणि चॉकलेट भेळ वाले वैताग आणतात.

या जमातीवर मी पण एक लेख लिहिला होता :-

https://www.misalpav.com/node/50226

टर्मीनेटर's picture

21 Jan 2023 - 2:14 pm | टर्मीनेटर

मार्मिक लेखन 👍

हे बघणं चुकवू नका. प्लीज.. :-)

टर्मीनेटर's picture

21 Jan 2023 - 3:17 pm | टर्मीनेटर

हा हा हा... भारी आहे! पान पराग चाय, ऑम्लेट में फॅण्टा, ओरिओ के पकोडे 😂

चित्रगुप्त's picture

21 Jan 2023 - 3:50 pm | चित्रगुप्त

हॅ हॅ हॅ ... गजब चीज है यार ये तो.
धागा आणि सगळे प्रतिसाद गजब.
.

दादा कोंडके's picture

21 Jan 2023 - 6:46 pm | दादा कोंडके

एस्पेशिअली पुण्यात हल्ली त्या-त्या सणासुदीला लागणारे असणारे पुरणाच्या पोळी पासून मोदकापर्यंत आणि बारमाही पदार्थ जसंकी पापड-लोणची विकायच्या इतक्या पाट्या दिसतात (ही अतिशयोक्ती नाही पण उपनगरांच्या एका गल्लीत प्रत्येक दुसर्‍या घरावर पाटी बघितली आहे) की असं वाटतं की पुण्यात स्वतःसाठी कुणी काही खायला बनवत नाहीत. एकतर बाहेरचं खातात किंवा करून विकतात.

त्यात, 'कुठलाही धंदा वाईट नसतो' या वाक्याला एक्स्प्लॉइट करून ऑथ्रप्र्युनरम्हणून खायचे पदार्थ करून विकायची रोम्यांटिसायझिंगनी भारतीय कनिष्ठ आणि मध्यमवर्गाला ग्रासलंय. त्यामुळे इंजिनिअरींग-एमबिए वगैरे करून रस्त्यावर चहा विकायची वेळ आल्यामुळे लाज ते अभिमान असा उलटा ग्लोरिफाईड प्रवास आपण केला आहे.

श्रीगुरुजी's picture

22 Jan 2023 - 5:29 pm | श्रीगुरुजी

फारच खुसखुशीत लेख आणि प्रतिक्रिया!

सर्वांच्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत. सुचवलेले व्हिडिओ पाहून लोकांना नेमकं झालय तरी काय असा प्रश्न पडतो. एखाद्या गोष्टीची चलती असली की आपण त्याचा पार कचरा आणि विचका करून टाकतो हे परत एकदा सिद्ध झाले.

कर्नलतपस्वी's picture

23 Jan 2023 - 8:40 am | कर्नलतपस्वी

@लेखक भौ, एकदम सहमत.
एखाद्या गोष्टीची चलती असली की आपण त्याचा पार कचरा आणि विचका करून टाकतो हे परत एकदा सिद्ध झाले.

सत्तर वर्षाची म्हातारी सुद्धा माधुरीज किचनला सबस्क्राइबते आहे.

बरे झाले तुम्ही लिहीले नाहीतर आणखी एक फालतू व्हिडिओ मिपाकरांना भोगावा लागला असतो.

खाली डोके रिकामे खोके
एक दिवस डोसा बनवण्यासाठी तयारी होती. तेवढ्यात शेजारीण आली म्हणजे आता एक तास तरी लागणार ब्रेकफास्ट करता. मला पण सुरसूरी आली आणी व्हिडिओ बनवायला घेतला. नाव दिले दोन चमच्यात शंभर डोसे सर्व तयारी होतीच. कामेनटरी झाल्यावर गरम तव्यावर डोश्याच्या पाण्याने मराठीत शंभरचा आकडा काढला.

आपल्याच पहिल्या वाहिल्या अडव्हेंचर वर खुश झालो.

तेवढ्यात सौ आल्या सारी परीस्थीती लक्षात आली. आमचे शंभर डोशे consigned to dustbin. आणी आमची हाकालपट्टी झाली.

अशा रीतीने एका एतंरपिनरला जग मुकले.

लेख भन्नाट.

आमचे शुद्धलेखन अशुद्ध म्हणून समवयस्क मिपाकरांनी एक व्हिडिओ पाठवला मराठीत वेलांटी व उकाराचे नियम.

कुणीतरी मराठीत ग म भ न कसे लिहितात शेर केलात तर नातीला शिकवायला सोपे जाईल. म्हणजेच तीला व्हिडिओ लावून दिला की मी मोकळा.&#128591

श्वेता व्यास's picture

23 Jan 2023 - 12:07 pm | श्वेता व्यास

मस्त लेख आणि प्रतिक्रिया :)