शब्द कल्लोळ!
शाळेच्या दिवसात,'विषय सर्वथा नावडे',या अवस्थेत, सिनेमे व गाण्यांमुळे त्यातल्या त्यात हिंदी फार जवळची वाटे.उर्दू आणि हिंदीतला फरक कळत नसल्याने,
(अजूनही नाहीच म्हणा!)उर्दू हिंदीतच गणली जाई.
गम्मत म्हणजे अनेक शब्दांचे अर्थ माहीत नसत.
अंदाजाने शब्दांचे अर्थ लावायचे.त्यातून अनर्थ होत.
'सबद सबद सब कोई कहे सबद के हाथ न पाव'असं कबीर म्हणतात.सिनेमाची शिर्षके,संवाद आणि गाण्यातल्या,अनेक 'सबदांना',मीच 'हाथ- पाव 'देवून चालवत असे.त्यामुळे,शब्दांच्या पलीकडले, सारे काही ,राग 'अडाण्यातच'असे!
बुचकळ्यात टाकणारे शब्द तर 'पदोपदी 'भेटत.आणि नाते संबंधातील शब्द आले की जास्तच गोंधळ होई.
'अजि बस शुक्रिया 'नावाचा एक चित्रपट आला होता.
त्यातला 'अजि'हा शब्द 'आजी 'आहे ,आणि 'बस' हा शब्द, 'खाली बस' अशा अर्थाचा आज्ञावाचक आहेअसा माझा समज होता.कसा कोण जाणे 'शुक्रीया' मात्र माहिती होता.त्यावरून ,'अजि बस शुक्रिया'चा अर्थ,
'आजी धन्यवाद ,खाली बस !'असा माझ्या बालमनाने काढला .आपल्या आजीला कोण,आणि का बसायला सांगून धन्यवाद देत आहे,हे एक कोडेच वाटायचे .बरं आजीवर कितीही प्रेम असले तरी तीला उद्देशून, 'सारी सारी रात तेरी याद सताए',असं गाणं कुणी म्हणणार नाही असेही वाटत होते.त्या मुळे त्या सिनेमातले ते प्रसिद्ध गाणे ऐकून तर कमी होण्याऐवजी गोंधळ वाढला.
प्रकरण तेवढ्यावर थांबले नाही.नवीन नवीन इंग्रजी शिकायला लागल्याने,मराठी /हिदी शब्दांचे,इंग्रजी भाषांतर करायची सवय लागली होती.त्यातून, 'आजी बस शुक्रिया' चे इंग्रजी रुपांतर .'ग्रॅडमदर सीट.थॅन्क्स !' असे केले होते.मग आजी समोर आली की तीला 'ग्रॅडमदर सीट,थॅन्क्स!'म्हणायचो.ते तीला कळत नसे. मग मराठीत 'आजी बस,शुक्रीया',म्हणायचो.आधी आधी ती कौतुकाने ऐके व काम सोडून समोर बसे.एकदा मात्र,'सारखं सारखं बसायला सांगून शुक्रिया काय म्हणतोस मेल्या',म्हणत तीने माझ्या पाठीत धपाटा घातला होता.तेव्हा कुठे'आजी बस शुक्रिया 'म्हणायचे थांबले.
हीच 'आजी' पुढे 'आरजू 'तल्या 'अजि रुठकर अब कहा जाइएगा?गाण्यात भेटली.कुणावर तरी रुसून घरातून बाहेर जाणा-या,म्हाता-या आजीला उद्देशून,
'आजी आता रुसुन कुठे चाललीस?'असे गाणे असणार वाटले.पण त्या सिनेमात नायिका साधना, एका पार्टीत पियानो बियानो वाजवत हे गाणं म्हणत होती.तिथे
आजीचा पत्ताच नव्हता.आजोबाही नव्हते.ते पाहून पुन्हा बुचकळ्यात पडलो.बहुतेक ते दोघेही आधीच 'रुठकर' कुठेतरी निघून गेले असावेत !
त्याच काळात,'आजी(अजी)ऐसा मौका फिर कहा मिलेगा,आवो तुमको दिखलाता हू पॅरिस की एक रंगीन शाम' (एन इविनिंग इन पॅरिस)हे गाणे कानावर पडले.
आपल्या आजीला चारीधाम यात्रेला नेवून तिच्या पदरी पूण्य पाडण्या ऐवजी, 'पॅरीसची रंगीन शाम' दाखवणारा हा महाभाग कोण असावा म्हणून तो सिनेमा पाहायला गेलो,तर शम्मी कपूर महाशय पॅरीसच्या
प-यांसोबत,पॅरिसच्या रस्त्यावरून,नाचत,बागडत फिरताना दिसले. त्या बायांपैकी, कुणीही,कुठल्याही अंगाने(पन इंटेंडेड)आजी काय आई पण वाटत नव्हती.मी आपला गाणे चालू असताना व नंतर पण सिनेमाभर 'आज्जी'शोधत बसलो होतो.आधीच्या अनुभवावरून घरी आजी समोर ते गाणं मात्र कधी म्हणलं नाही.प्रत्यक्ष नाही तर सिनेमात तरी पॅरिस दाखवायचा मौका आजीला द्यावा असा मनात आलेला विचार ,सिनेमा पाहील्यावर,नासलेल्या दुधा सारखा फेकून दिला.असो.
या 'आजी' प्रमाणे इतर काही नातेवाईक मंडळी पण सिनेमातल्या गाण्यात, शिर्षकात भेटत.
'आयी मीलन की बेला'सिनेमा,व त्यातील 'आयी मीलन की बेला ,देखो आयी', ऐकून,कुणीतरी आपल्या आईला .बेला नावाची मुलगी बघायला सांगत आहे असा समज झाला होता.पण बेलाचा तो 'मीलन' कोण? हा प्रश्न अनुत्तरित राहीला.
'आयी मीलन की बेला' हे गाणे ,त्या वाक्यात क्रियापद नाही म्हणून चुकीचे आहे नं?,असा व्याकरणीय प्रश्न ,हिंदीच्या तासात सरांना विचारला.तो ऐकून माझी पाठ थोपटण्या ऐवजी,त्यांनी माझा कान पिळून, ही सिनेमाचे थेरं बंद करून अभ्यास करा'असे सुनावत माझ्या हुषारीवर आणि उत्साहावर, 'विरजन'घातले. मी कान चोळत गप्प बसलो.दुसरं काय करणार?
आई /वडिलांच्या वडिलांना आपल्याकडे आजोबा म्हणतात.काहीजण 'आजा 'किंवा 'आज्या'ही म्हणत.या 'आज्या'ला हिंदी सिनेमातल्या गाण्यात एवढा भाव का आहे हे कळत नसे.'आजा रे अब मेरा दिल पुकारा' (आह),'आजा के इंतजार मे जाने को है बहार भी' (हलाकू ),'आजा आजा मै हू प्यार तेरा'(तिसरी मंजील)'आजारे प्यार पुकारे '(दिल ने फीर याद किया),
वगैरे वगैरे..एका दमात अशी किमान एक डझन तरी आजोबाची गाणी सांगता येतील.
'राजकुमार' मधल्या,'आजा आयी बहार दिल है' मधे तर
आजोबा सोबत आजी नाहीतर आई पण होती !
गाणे ऐकायला तर मस्त वाटे.पण सिनेमात या गाण्याचे वेळी,साधना व तिच्या सख्या ज्या जल कसरती करत होत्या,त्या पाहून,इथे 'आज्याचे,व आईचे' काय काम असावे,आणि बहार दिल म्हणजे काय?ह्या विचाराने,
डोक्याचे,अगदी 'दही' झाले होते.
पुढे केव्हातरी,' मै आयी आयी आयी ...आजा!!(लवस्टोरी) हे कानी पडले.तेव्हा शाळकरी पुतण्याने,''काका तीला तर बाळच नाही, अन ती मै आई,आई असं का म्हणतोय?आणि तो, मै बाबा ऐवजी आजा का म्हणतोय?",असा बिनतोड सवाल विचारून माझी झोप उडवली होती.
आजी, आजा, आई आल्यावर, बाबा कसे मागे राहातील? 'ना बाबा ना बाबा पिछवाडे बुढ्ढा खासता '(अनिता),आणि 'आज की रात कोई आनेको है रे बाबा' (अनामिका)मधे ते ही आलेच.गोंधळच गोंधळ !
असाच गोंधळ 'बैंया' या शब्दाने होतअसे.अनेक गाण्यातून भेटणारा हा 'बैंया' म्हणजे ,भैया (भाऊ) आहे असेच वाटे.नागिन चित्रपटातील,'जादुगर सैंया छोडो मोरी बैंया,हो गयी आधी रात अब घर जाने दो ',ऐकून वेगळेच कथानक डोळ्यासमोर आले होते. सैंया नामे कुण्या दुष्ट जादुगाराने त्या नायिकेच्या भावाला पकडून ठेवले आहे आणि मध्य रात्र झाली तरी त्याला सोडले नाही, म्हणून ती ,या गाण्यातून ,त्या सैंया जादुगाराला ,'माझ्या भावाला सोड 'अशी विनंती करते आहे असे वाटले.सिनेमात मात्र गाणे म्हणताना वैजयंतीमाला भयभीत न होता,पळत नाचतेय,किंवा नाचत नाचत पळतेय,आणि प्रदीप कुमार 'कर कटेवरी ठेवुनिया' उभा आहे किवा पळतोय,हे दिसले.त्याच्याकडे पाहून,तो
कुणाला किडनॅप,बिडनॅप करेल अशी शक्यता अजिबात वाटत नव्हती .आणि जो पकडलेला असू शकतो , तो भैया मात्र गायब होता.ते गाणे पाहून तर डोक्यातल्या
'दह्याचे अगदी ताक'झाले.
'नन्ना मुन्ना राही हूं देश का सिपाही हूं '(सन ऑफ इंडिया)
गाणे ऐकून ,एक नन्ना मुन्ना शिपाई; आपण देश -काशी ,
पाही हूं',म्हणजेच,देश पाहीला तसेच काशी पण 'पाही हूं ',म्हणजे पाहिली आहे 'असे सांगतोय असे वाटले होते.
सिनेमातल्या नन्ना मुन्नाभाई चे देश पर्यटन पाहून, 'देश पाही हू' तर बरोबर वाटले ,पण 'विश्वेश्वराची' काशी न दिसल्याने ,हा 'काशी पाही हूं 'असे खोटं का सांगतोय? , अशी शंका मनात आली होती.अगदी काशी विश्वेश्वराची शपथ!
आमच्याकडे,वारंवार सांगूनही बोलण्याकडे,लक्ष न देणा-या व स्वतःचे गुंगीत असलेल्या,बावळटाचा उध्दार, 'गुंगटच आहे मेलं!'असा होत असे.(त्यात अर्थातच मीही असे.) .'घुंगट'सिनेमाचे शिर्षक वाचून तो अशाच एखाद्या' गुंगट' माणसाविषयी असणार अशी पक्की खात्री झाली .
तो सिनेमा पाहिला.पण त्यात असे 'गुंगट' पात्र काही दिसलं नाही.नाही म्हणायला 'लागे ना मोरा जिया' असे गाणे होते.पण ती काही गुंगट वाटत नव्हती.सिनेमाचा नायक प्रदीप कुमार होता!त्यामुळे काही एक शंका आली होती.पण सिनेमाची इष्टुरी जेवढी कळली त्यावरून त्याला पुष्टी मिळत नव्हती.
अशा सगळ्या अनुभवावरून,शेवटी;,सिनेमाची शिर्षके, सिनेमातली गाणी व सिनेमातल्या प्रसंगांचा आणि त्या सगळ्यात असलेल्या शब्दांचा काही संबंध नसतो असा निष्कर्ष बालमनाने काढला!
वाढत्या वया सोबत सिनेमातले ते, 'आजी,आजा,
आई,बाबाभैया,वगैरे मंडळी डोक्यातून निघून गेली, आणि शेवटी विचार मंथनातून 'नवनीत' प्राप्त झाले की,तेव्हा,आपणच 'गुंगट' होतो !
नीलकंठ देशमुख
!
प्रतिक्रिया
25 Dec 2022 - 11:59 am | कर्नलतपस्वी
कै च्या कै, नीलकंठ भौ.
"जरा होले,होले मोरे साजणा",ऐकल्यावर काय वाटले तुम्हांला?
आमच्या वर्गात दोन मोरे आणी दोन होलेवाडीची चार होले आडनावाची मुले मिळून सा जणा होती.
25 Dec 2022 - 12:51 pm | नीलकंठ देशमुख
हे तर लय भारी.!छान!. माझ्याकडे अजून बरेच काही आहे..पुढे केव्हातरी..
25 Dec 2022 - 12:56 pm | चित्रगुप्त
वा यार. बहुत बढिया .
मला पण लहानपणाची काही गाणी आठवली. "रमया वस्तावया... मैने दिल तुझ कुदिया" - मधील 'कुदिया' हे कुदणे, उडी मारणे या विषयी आहे असे वाटायचे, 'दिल' ही भानगड ठाऊकच नव्हती. त्यामुळे 'तुझ्या ऐवजी मी उडी मारतो' असा अर्थ वाटून मी पलंगावर चढून "मैने दिल तुझ कुदिया" असे जोरने ओरडत धाडदिशी खाली उडी मारायचो. अशा रोज शंभरेक तरी उड्या मारत असेन.
यापेक्षाही भारी म्हणजे 'आंचल' म्हणजे काय, हे कळायचे नाही. "छोड दो आंचल, जमाना क्या कहेगा" यातला 'जमाना'म्हणजे 'पायजमा' वाटायचा, आणि चांदोबात वगैरेत कृष्णाच्या पाव्याने गायींना पान्हा फुटायचा, त्यांच्या 'आचळातून' दूध वाहू लागायचे, वगैरे वाचल्यामुळे 'आंचल' म्हणजे तेच 'आचळ' असावेत असे वाटायचे. कुणाला विचारण्याची सोय नव्हती, आणि 'छोड दो आंचल' हे भयंकर चावट वाटायचे.
'चिलमन' म्हणजे काय, हे तर सत्तरीत आलो तरी अजून ठाऊक नाही. " किसने चिलमन से मारा" म्हणजे काहीतरी चिलटे वगैरे मारण्याबद्दल असावेसे वाटायचे. मात्र त्या वयातही या गाण्यातले पेटी आणि तबलावादन खूप आवडायचे.
आणखीही अशी बरीच गाणी असतील. आठवल्यावर पुन्हा लिहीन.
25 Dec 2022 - 3:34 pm | नीलकंठ देशमुख
वा! हे तर भन्नाट आहे. माझ्या लेखामुळे लहानपणीच्या अशा गमती आठवल्या, हे छान झाले.
25 Dec 2022 - 6:16 pm | Vichar Manus
काहीतरीच आहे. ओढून ताणून केलेला विनोद
26 Dec 2022 - 10:46 am | नीलकंठ देशमुख
वाचल्याबद्दल व विचारपूर्वक प्रतिसादाबद्दल न्यवाद
26 Dec 2022 - 10:46 am | नीलकंठ देशमुख
वाचल्याबद्दल व विचारपूर्वक प्रतिसादाबद्दल धन्यवाद
27 Dec 2022 - 10:17 am | योगी९००
हा हा ...धमाल धागा..!!
मलाही तसा हिंदीचा सुरूवातीपासूनच त्रास होता. चित्रपटात "फौरन चले जाव" असे काही ऐकले की वाटायचे की आता हे फॉरेनला जाणार. बर्याच हिंदी शब्दाचा अजूनही अर्थ माहित नाही व तसेच अर्थ लावायाचा प्रयत्नही केला नाही. "ढोलना" म्हणजे ढोल्या प्रेमी असाच समज आहे.
27 Dec 2022 - 7:01 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद. लिखाण आवडले व ते कळवले,यामुळे आनंद वाटला.
27 Dec 2022 - 7:02 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद. लिखाण आवडले व ते कळवले,यामुळे आनंद वाटला.
27 Dec 2022 - 8:51 pm | सरिता बांदेकर
होय असं व्हायचं खरं,आता आठवलं की हसू येतं.
पण त्यामुळेच कधी कधी कान पकडून वडील सांगायचे गाण्याचे बोल नीट ऐक.
लहानपणी आतासारखं पाहिजे त्यावेळी गाणं ऐकायला नाही मिळायचं मग गाणं पूर्ण नीट समजे पर्यंत अशाच गंमती जमती होत रहात.
आठवणी जागवल्या बद्दल धन्यवाद.
28 Dec 2022 - 11:25 am | नीलकंठ देशमुख
धन्यवाद. तुमचे वडील गाणे नीट ऐकायला सांगत..हे किती छान!
27 Dec 2022 - 8:51 pm | सरिता बांदेकर
होय असं व्हायचं खरं,आता आठवलं की हसू येतं.
पण त्यामुळेच कधी कधी कान पकडून वडील सांगायचे गाण्याचे बोल नीट ऐक.
लहानपणी आतासारखं पाहिजे त्यावेळी गाणं ऐकायला नाही मिळायचं मग गाणं पूर्ण नीट समजे पर्यंत अशाच गंमती जमती होत रहात.
आठवणी जागवल्या बद्दल धन्यवाद.
27 Dec 2022 - 10:57 pm | चित्रगुप्त
या धाग्याविषयी चर्चा करताना अशी आणखी दोन गाणी मिळाली:
एका मित्राला लहानपणी 'वृंदावनका कृष्णकन्हैय्या सबकी आंखों का तारा' असे ऐकू यायचे:
"ब्रिन्दाबनका किसनकन्हैय्या सबकी आंखों काटा राम"
बायकोला 'हुजुरेवाला, जो हो इजाजत...' असे ऐकू यायचे:
हुजुरेवाला, "जो होगी चादर"
28 Dec 2022 - 11:30 am | नीलकंठ देशमुख
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. या लेखाचे निमित्ताने, अनेकांच्या गाण्यात विषयीच्या गमतीदार जुन्या आठवणी जाग्या झाल्या . छान वाटले.
27 Dec 2022 - 11:04 pm | धर्मराजमुटके
कमाल आहे !
इथे "आप जैसा कोई मेरी जिंदगी मे आये.. तो बाप बन जाये" कोणीच ऐकलं नाही काय ?
28 Dec 2022 - 11:31 am | नीलकंठ देशमुख
हा हा हा!ते राहून गेलं..अशा अनेक गमती राहून गेल्या हे प्रतिसाद वाचून कळले.
27 Dec 2022 - 11:36 pm | चित्रगुप्त
@ धर्मराजः म्हणजे काय ? हे गाणे मुळात असे नाही होय ? मग आहे तरी काय ? कुण्या बाईच्या जिंदगीत कोणी बाप्प्या आला की 'बाप'च बनणार ना ?
28 Dec 2022 - 11:33 am | नीलकंठ देशमुख
त्या काळी ते गाणे असेच म्हणले जात असे..गाण्यात 'बात' हाच चुकीचा शब्द आहे असे नंतर वाटू लागले