या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतारिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे. राहते मात्र तिच्या स्वकमाईच्या सुंदर सजवलेल्या घरात, एकटी. स्वतः सुखवस्तू आहे आणि वयोपरत्वे येणाऱ्या छोट्या कुरबुरी सोडल्या तर बाकी तिला कोणाचा आणि तिचा कोणाला काहीच त्रास नाही.
तर ही ऐंशीपार सखी सध्या एका वेगळ्या विचाराने झपाटलेली आहे. तीन वर्षांपूर्वी एका स्वीडिश जोडप्याच्या निमंत्रणावरून स्वीडनला जाऊन आल्यानंतर आणि विशेषतः करोनाच्या वावटळीत दोनदा सापडल्यानंतर तिला Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात' सिन्ड्रोमने पछाडले आहे. आपल्याला 'मृत्यू' म्हटलं की बहुदा दुःख, निराशा, रडारड अशा नकारात्मक भावना दाटून येतात. नकोच तो विषय, त्यात काय बोलायचं. जेव्हा जायची वेळ येईल तेंव्हा बघू असेच सर्वांचे साधारण मत असते. माझेही तसेच मत आहे. पण ही सखी वेगळीय. तिला संध्याछाया जरी भिववीत नसल्या तरी 'मोकळ्या हाताने' पैलतीरी जायचे आहे यावर ठाम आहे.
तर काय आहे हे Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात'? अगदी थोडक्यात सांगायचे तर एका विशिष्ट वयानंतर स्वतः आयुष्यभर केलेला पसारा स्वतः आवरणे. स्वीडिश लेखिका मार्गरेट मॅग्नसन हिचे The Gentle Art of Swedish Death Cleaning: How to Free Yourself and Your Family From a Lifetime of Clutter असे भारदस्त नावाचे पुस्तक आहे यावर. त्याचा एका वाक्यात सारांश:-पुढच्या प्रवासाला निघतांना आपल्या मागे राहणाऱ्या प्रियाजनांसाठी आवरण्याची कमीत कमी कामे सोडून जाणे. साधारण २०१७ सालापासून ही कल्पना त्यांच्याकडे जोर धरू लागलेली आहे. भारतात वर्षानुवर्षे 'वानप्रस्थाश्रम' ही कल्पना आहे, पण ती थोडी वेगळी आहे, घरदार-संसारातून पाश पूर्णपणे सोडवण्याची. इथे घरातच राहत असतांना, स्वतःच्या हयातीत, स्वतःच्या हाताने आयुष्यभराचा संसार Stada म्हणजे स्वच्छ - मोकळा - नीटनेटका करून मग पुढच्या प्रवासास निघणे असा आहे. सोपे नाही. सिमटे तो दिल-ए-आशिक और फैले तो जमाना है !
सखीनं पुस्तक वाचलंय, मी अजून नाही. चर्चेवरून मला थोडंफार समजलंय ते इथे लिहितो. मार्गरेटनी 'मोकळ्या हातांनी जाण्यासाठी' काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत, ती अशी :
१. एकट्याने सुरुवात करणे :-
हा प्रवास मोठा आहे, आयुष्यभर जमवलेला पसारा ४-२ दिवसात आटोपणार नाहीच. सुरवातीला कोण्या दुसऱ्याला हा विचार पटवून द्यायला वेळ लागेल, जोडीदारालाही पटेलच असे नाही. त्यामुळे सुरवात 'एकट्याने' करा. जे जमेल तेव्हढेच.
२. पुढच्या टप्प्यावर जोडीदार, परिवार आणि मित्रांना हळूहळू सामील करणे. आयुष्यभर हौसेनी जमवलेल्या हजारो वस्तू कुणाला हव्या आहेत की कुणालाच नको आहेत याचा अंदाज घेत घेत वाटचाल करणे. यात पुस्तके, छंदापोटी जमवलेल्या वस्तू, घरगुती वापराच्या अधिकच्या वस्तू, सजावटीचे सामान, फर्निचर असे खूप काही येईल. सगळेच काही एकावेळी देऊन टाकण्यासारखे नसले तरी मोठ्या प्रमाणात वस्तुकपात करायला परिवार आणि मित्रमंडळी मदत करू शकतात. त्यांना जे हवे आहे ते बेलाशक देऊन टाकणे. अर्थात यासाठी वय उलटण्याची वाट बघायला नकोच, हे आपण सततचा गृहपाठ म्हणून करू शकतो - वापरात नसलेल्या-बिनकामाच्या वस्तू त्यांचा ज्याला उपयोग आहे त्याला देऊन टाकणे.
३. योग्य वस्तूंपासून आवरण्याची सुरुवात करणे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जर सुरवातीलाच फोटो अल्बम, आईच्या/स्वतःच्या लग्नातल्या साड्या-बांगड्या आणि जुनी पत्रे काढून बसलात तर काम पुढे सरकत नाही, भावना दाटून येतात असा ‘पटेबल’ युक्तिवाद आहे. त्यामुळे सोप्पे काम आधी. गाद्या-दुलयांमध्ये जीव तेव्हढा गुंतलेला नसतो, वापरलेल्या जुन्या कपड्यांमध्ये, भांड्यांमध्ये पण कमीच. त्यामुळे ते आधी. अर्थात हे व्यक्तिपरत्वे बदलेल. कुणाला पुस्तके देववणार नाहीत तर कुणाला जुने कॅमेरे, जुनी भांडी. स्वतः मुखत्यार व्हावे, काय आधी काय नंतर स्वतःपुरते ठरवावे.
४. ज्याला हवे त्यालाच द्यावे. सगळं सामान कुणावरही ओतू नये. वेळ काळ पाहून एक-एक वस्तू समोरच्याला विचारून देत राहावी. संचयातल्या एखाद्या वस्तूचे आपल्याला अप्रूप असले तरी जुनेपाने हल्ली कुणालाच नको असते हा विचार नेहेमी असू द्यावा. जिथे वापर होईल अशा ठिकाणी, ज्याला किंमत असेल, आवड असेल अशा लोकांना ती-ती वस्तू द्यावी. उदा. गावातले घर सोडले तेंव्हा आमच्या सुमारे २४०० पुस्तकांवर अनेक पुस्तकप्रेमींचा डोळा होता. काही त्यांच्याकडे गेलीत, काही पिताश्रींनी मित्राच्या वाचनालयाला दिलीत, अधिकाधिक लोकं वाचतील म्हणून. बागेतील शंभरेक कुंड्यातील सुंदर झाडांना सर्व बागप्रेमी मंडळी - शेजारीपाजारी यांच्याकडे नवीन घर मिळाले. तर, योग्य वस्तू योग्य व्यक्तीस आणि त्यांना हवी असेल त्याच वेळी हा नियम पाळावा.
५. जीव गुंतलेल्या वस्तूंना सरसकट दूर न करणे. आपण उद्याच जग सोडणार नाही आहोत. ज्या वस्तू आनंद देतात त्या आपल्यासोबत असू द्याव्यात. फोटो काढणे-बघणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे, एखादे वाद्य असे आपले छंद असल्यास त्याला लागणाऱ्या वस्तू जपाव्यात, उत्तमपणे शेवटपर्यंत वापराव्यात. आपल्यापश्चात समछंदी व्यक्तीला मिळतील अशी व्यवस्था करून ठेवावी. आपल्याला परमप्रिय असलेल्या अनेक वस्तू आपल्यानंतर कचऱ्यात जाऊ शकतात हे भान असू द्यावे, त्याने काम सोपे होते. परमप्रिय वस्तूंचे प्रमाण कमी असते, किंबहुना कमीच असावे. आवरायला सोपे असावे, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.
६. पुनर्विचार न करणे. प्रत्येक वस्तुबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्यावा, हवा तेव्हढा वेळ निर्णयासाठी घ्यावा पण एकदा एखादी वस्तू देण्यासाठी काढली की मग ती पुन्हा घरात न घेणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. नाहीतर चार पावले पुढे आणि चार मागे करत मोकळ्या हातांनी करायच्या प्रवासाची तयारी काही संपणार नाही. अगदी कुणीच घेणारा नसेल तर ती वस्तू विकून टाकावी, भंगारात द्यावी पण परत घरात घेऊ नये. ही आवराआवर पुन्हा पुन्हा करायची नाही आणि हा प्रवास परतून येण्यासाठी नाही ही जाणीव ठेवल्यास हा कठीण टप्पा पार पाडता येतो.
७. दस्तावेज वगैरे. हा टप्पा विचारपूर्वक आणि योग्य सल्ले-विचार घेऊन मगच पार पाडण्याचा आहे. आपल्या हयातीत कमावलेली संपत्ती, घरदार, दागदागिने, पैसाअडका वगैरे आपल्यापश्चात कुणाला मिळावे यासाठी मृत्युपत्र- इच्छापत्र जाणकार व्यक्तीच्या मदतीने करून घ्यावे. संपत्ती आणि बँकखाती, आयुर्विमा वगैरेसाठी वारसांचे नामनिर्देशन करावे. अनेक शहरात असलेला जमीनजुमला किंवा बँकेत अनेकजागी खाती / लॉकर्स कमी करू शकलात तर वारसांचा वेळ वाचेल आणि त्यांना पडणारे कष्ट कमी होतील. जवळच्या मित्रांना आणि वारसांना त्याबद्दलची माहिती देऊन ठेवावी. नेत्रदान-देहदान वगैरेचे काय ते ठरवून त्याचे दस्तावेज, औषधोपचार आणि दीर्घकालीन कोमा वगैरे झाल्यास उपचार थांबवण्यासाठीचे अधिकार कुणाला द्यावे याबद्दलचे आरोग्यविषयक इच्छापत्र, अंतिम संस्काराचे विधी कसे आणि किती करावेत याबद्दलची इच्छा, जमल्यास त्याबद्दलची आर्थिक तरतूद हे सगळे झाले की मग बऱ्यापैकी मोकळे हात घेऊन मजेत जगावे.
आणि हो, पुन्हा पसारा जमा होऊ देऊ नये, नाहीतर सगळे मुसळ केरात !!!
सखीची तयारी जोरात सुरु आहे. मलातरी हा 'मोकळ्या हातांनी प्रवासाचा' विचार आवडला आहे. इथल्या मंडळींचे काय मत ?
प्रतिक्रिया
2 Dec 2022 - 6:35 pm | मिसळपाव
अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे हा. त्याची व्याप्ती लक्षात घेउन 'प्रकल्प' म्हणतोय! पण दुर्दैवाने याची जाण नसते कीवा थोडीफार जरी असली तरी "हयात असताना कशाला ही आवराआवर?" या विचाराने दुर्लक्षिलेली असते. सध्याचं आयुर्मान लक्षात घेता पन्नाशीनंतर याचं भान ठेवावं, साठीनंतर संचयात भर पडताना आधीच हे काही निकष लावावेत, सत्तरीनंतर बाकी सगळं बाजूला ठेऊन यावर लक्ष द्यावं आणि ऐंशीनंतरही हा प्रकल्प हातावेगळा झालेला नसला तर .... तर काही नाही, देव तुमच्या मुलाबाळाना/नातेवाईकाना तुमचा पसारा आवरायची शक्ती देवो !!!
३,४ आणि ५ क्रमांकाचे मुद्दे परत, परत वाचावेत. अजून एकदा वाचले तरी चालेल! पण पाचव्या मुद्द्याचा अतिरेक करून बहुतांशी वस्तू ठेउन घेउ नयेत. :-)
चौथ्या मुद्द्याबद्दल अजून थोडं - एखादी वस्तू (पुस्तक, कॅसेट, फोटो, पुस्तकाच्या पानात जपलेलं मोरपीस) तुम्हाला जरी लाख मोलाचं असलं तरी बाकी कोणाला एकदा ते बघण्यापलीकडे स्वारस्य नसेल हे अगदी लक्षात ठेवावं. आणि अशी वस्तू अगदी जुनीपानीच असते असं नाही. त्यामुळे सगळंच काही दुसर्या कोणाकडे सुखाने नांदायला जाईल अशी अपेक्षा ठेऊ नये आणि मुख्य म्हणजे त्यासाठी कोणाला गळ घालून अडचणीत पाडू नये. दागिना घ्यायला बरेच जणं तयार असतील पण 'आठवणी गुंतलेली वस्तू' कोणी कदर करणारा/री मिळाला/ली तरच देईन हा निकष ठेऊ नये. चटकन कोणाचं नाव नाही आठवलं, आठवड्याभरात नाही आठवलं तर बहुदा तुमच्या माघारी हे फेकून दिलं जाणारे हे स्विकारावं.
"मी उद्या गेलो तर माझ्या मुलाना / नातेवाईकाना हे आवरायला, याचा योग्य विनियोग करायला कीती कष्ट पडणारेत?" हे भान सतत ठेवावं.
या प्रकल्पामागे झपाटलेली आहे लिहिलंय तुम्ही. तुमच्या सखीला म्हणावं You are absolutely on the right track.
2 Dec 2022 - 7:37 pm | मिसळपाव
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
5 Dec 2022 - 4:28 pm | अनिंद्य
हे आवरायला, याचा योग्य विनियोग करायला कीती कष्ट पडणारेत?" हे भान सतत ठेवावं.
हेच हेच, कळते पण वळत नाही, हे निग्रहाने जमवावे लागते :-)
2 Dec 2022 - 6:36 pm | कंजूस
असे पुस्तकही आहे म्हणजे कमालच झाली.
तुमचे मुद्देही पटले.
आताच्या नवीन डिजीटल जगात पासवर्डची द्यावे लागतील. ते मी एका कागदावर तसेच एका ईमेलवर , नोटवर गुप्त पण सांकेतिक ठेवलेत. ( ते कसे ओळखायचे ते दाखवलेत.) दर महिना सर्व चालवून बघतो आणि अमुक महिन्याचे पासवर्ड यादी ठेवतो.
पुस्तके फारशी नाहीत ,आहेत ती संदर्भांची आहेत. कथा कादंबऱ्या नाहीत. म्हणजे राहीली तरी चिंता नाही.
विचार आवडले आणि अशी चर्चा सुरू केली ते बरं झालं.
2 Dec 2022 - 7:36 pm | सस्नेह
उत्तम प्रकल्प.
2 Dec 2022 - 8:03 pm | Nitin Palkar
अतिशय चांगला आणि नवीनच विचार. विचार करायला लावणारा लेख.
2 Dec 2022 - 9:49 pm | मनो
यासाठी पन्नाशी किंवा साठीपर्यंत वाट कशाला बघायची, आपल्याला वाटेल तेंव्हा सुरू करावे. एकदा-दोनदा वाचून झालेली पुस्तके, वापरात नसलेली बँक खाती, दोन-चार वर्षात कधीच भेट न दिलेल्या जमिनी-मालमत्ता सगळे विकून टाकतो, बंद करतो किंवा भेट देऊन टाकतो. त्यांचे फोटो मात्र काढून ठेवतो, हवे तेंव्हा पटकन पाहता येतात आणि कोणत्याही व्यावहारिक त्रासाविना भावनिक बंध मात्र कायम राहतात.
5 Dec 2022 - 4:30 pm | अनिंद्य
वाट कशाला बघायची, आपल्याला वाटेल तेंव्हा सुरू करावे.
+१
बरोबर !
पसारा कमीत कमी साठवणे आणि त्याला सतत कमी करत राहणे हाच उत्तम मार्ग आहे :-)
2 Dec 2022 - 10:25 pm | मुक्त विहारि
विचार आवडले
2 Dec 2022 - 10:41 pm | गवि
फारच रोचक, महत्वाचा विषय. धन्यवाद या धाग्याबद्दल.
3 Dec 2022 - 12:19 am | चित्रगुप्त
काय योगायोग आहे बघा ...गेली काही वर्षे मी असाच विचार आणि त्याप्रमाणे थोडाफार उद्योग करत आलेलो होतो. सुमारे वर्षभरापूर्वी वयाची सत्तर वर्षे पूर्ण झाल्यावर आता मात्र हाच उद्योग सर्वात महत्वाचा, असे ठरवून त्यामागे लागलो. जानेवारी ते जुलाई २०२२ या काळात घरातले अर्ध्याहून जास्त सामान कमी करून शेवटी १९९१ साली हौसेने बांधलेले घर विकून मूळ गावी स्थानांतरित झालो.
खरेतर या अनुभवावर एक लेख गेल्या महिन्यात लिहूनही ठेवलेला आहे. तो पुन्हा एकदा वाचून थोडी भर घालून लवकरच प्रकाशित करेन.
या सुंदर धाग्याबद्दल लेखकाचे अनेक आभार.
5 Dec 2022 - 4:31 pm | अनिंद्य
तुमचा लेख अवश्य प्रकशित करा, अनुभवाचे बोल वाचायला उत्सुक आहे.
3 Dec 2022 - 10:52 am | राजेंद्र मेहेंदळे
विषय अवघड आहे. एकत्र कुटुंब असेल तर फारच अवघड. सासुने जमवलेली भांडीकुंडी,पाण्याची पिंपे,ताटेवाट्या,साड्या वगैरे सुनेला फाफटपसारा वाटतो, लहान मुलांचे दगड्गोटे,खेळणी,जुने कपडे वगैरे मोठ्यांना पसारा वाटतो, नवर्याने छंदापायी जमवलेल्या वस्तू बायकोला पसारा वाटतात आणि बायकोच्या ओसंडुन वाहणार्या ड्रेस, पर्स,चपला,मेक अपची साधने नवरोबाला खुपतात. आणि या बाबतीत जास्त डोके चालवले तर घराचे महाभारत होते. मग कसे करावे?
अवांतर---
माझा ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन पसाराच जास्त आहे. वर कंजुसकाकांनी म्हटले त्याप्रमाणे बॅंका, ईन्शुरन्स, एल आय सी,एम एस ई बी, गॅस कसली कसली कामाची/ बिनकामाची अकाऊंट्स आणि त्यांचे पासवर्डस(मेटाडाटा). किंबहुना एखादी नवीन गोष्ट सुरु झाली की ती पहीले ऑनलाईन कशी होईल याच्याच मागे मी असतो. त्यामुळे हे पासवर्ड्स वाढतच चालले आहेत.
हा पसारा कसा आवरावा?
6 Dec 2022 - 3:28 pm | अनिंद्य
खरंय, डिजिटल पसारा आणि कचरा, डिजिटल लीगसी हा विषय आपल्या जीवनात डोकावू लागला आहे. याबाबद्दल लिहीन एकदा, किंवा अन्य कुणी लिहिल्यास भर घालीन.
नवीन स्मार्टफोन, लॅपटॉप वगैरे घेतानाच जुन्याला फॉरमॅट करून एक्सचेंज मध्ये देणे हा साधा उपाय केला तरी बराच पसारा कमी होतो.
4 Dec 2022 - 8:38 am | कर्नलतपस्वी
अनिद्य, सर्व प्रथम तुझे अभिनंदन. भाग्यवान आहेस आशी मैत्रीण मीळाली जीला पाहून तू हे विचार लिहीलेय.
राजेंद्र भौ,
हा पसारा कसा आवरावा?
बाळ जन्माला येताना,नवीन घर बांधताना इत्यादी साठी जशी पूर्वतयारी करावी लागते तशीच तयारी करावी लागेल.
प्रवासाला जाताना आपण विचारपुर्वक तयारी करतो,आठवणीने सर्व काही घेतो. एखादी गोष्ट नाही घेतली तर कधी अडचण होते कधी नाही पण परतीचा प्रवास आसल्यामुळे फारसा काही विचार करत नाही.
मृत्यू कधी येईल याची शाश्वती नसते. ऐन उमेदीत अचानक त्याची भेट होते तीथे तयारी असेल नसेल काही सांगतायेत नाही . पण तो येणार हे शाश्वत असल्या मुळे सदैव तयारीत रहाणे केव्हाही योग्य.सामान्य माणूस भ्रमात असतो,कदाचित जीवनाच्या धकाधकीत त्याच्या लक्षात येत नाही, लक्षात आले तरी दुर्लक्ष करतो किवंहूना त्या पेक्षा कबीरदास म्हणतात त्या प्रमाणे सर्व सामान्यांची अवस्था असते, मोह माया सुटत नाही.
"माया मरी न मन मरा, मर-मर गया शरीर ।
आशा तृष्णा न मरी, कह गए दास कबीर ॥"
तेंव्हा "गुंत्यात गुंतूनी पाय माझा मोकळा" ही मानसिक तयारी केली पाहीजे. आपण सामान्य, जगरहाटी पासून दुर जाता येत नाही पण जसे प्रवासाला जाताना पाठीमागे राहाणाऱ्या वर घर सोपवून जातो,सांगून जातो व ते काळजी घेतील या विश्वासाने निर्धास्त रहातो तसेच न परतीच्या प्रवासाची तयारी करावी. नाहीतर तुकाराम महाराज यांच्या आवा सारखं. पुर्ण अभंग खाली देत आहे.
ये परिसे गे सुनेबाई |
नको वेचू दूध दही ||१
आवा चालीली पंढरपुरा |
वेसींपासुन आली घरा ||२
ऐके गोष्टी सादर बाळे |
करि जतन फुटके पाळे ||३
माझा हातींचा कलवडू |
मज वाचुनी नको फोडूं ||४
वळवटक्षिरींचे लिंपन |
नको फोंडू मजवाचून ||५
उखळ मुसळ जाते |
माझे मनं गुंतले तेथे ||६
भिक्षुंक आल्या घरा |
सांग गेली पंढरपुरा ||७
भक्षी परिमित आहारु |
नको फारसी वरों सारू ||८
सुन म्हणे बहुत निके |
तुम्ही यात्रेची जांवे सुखे ||९
सासुबाई स्वहित जोडा |
सर्वमागील आशा सोडा ||१०
सुनमुखीचे वचन कानी |
ऐकोनी सासु विवंची मनी ||११
सवतीचे चाळे खोटे |
म्या जावेसे इला वाटे ||१२
आता कासया यात्रे जाऊ |
काय जाऊन तेथें पाहू ||१३
मुले लेकरे घर दार |
माझे येथेंचि पंढरपूर ||१४
तुका म्हणे ऐसे जन |
गोवियेलें मायेंकरून ||१५
संत तुकाराम महाराज
आवा यात्रेला गेली नाही पण इथे तसे नाही.
मृत्यू कुणाला चुकत नाही. कोबंड झाकलं तरी नारायण येणारच.
हे जेंव्हा कळेल तेंव्हा नामदेव महाराज म्हणतात तसे होईल.
काळ देहासी आला खाऊ
आम्ही आनंदे नाचू गाऊ
लिहीणे,सांगणे,वाचणे सोपे आहे.....
तरीही वाचत रहावे मनाची तयारी होत जाईल व एकदा ती झाली की पुढचे सर्व सोपे.....
तुम्ही यात्रेची जांवे सुखे ||९
सासुबाई स्वहित जोडा |
सर्वमागील आशा सोडा |
पांडुरंग हरी वासुदेव हरी.....
4 Dec 2022 - 12:43 pm | राजेंद्र मेहेंदळे
लेखा एव्हढाच तुमचा प्रतिसादही आवडला आहे. शाळेत असताना पाठ्यपुस्तकात "आवा चालली पंढरपुरा" ही कविता होती, अर्धवट पाठही होती, पण इथे तुमच्यामुळे पुन्हा पुर्ण कविता वाचायला मिळाली. धन्यवाद.
आता घेतो आवराआवरी करायला.
5 Dec 2022 - 4:38 pm | अनिंद्य
आभार.
"आवा चालली पंढरपुरा" तुकोबांनी लिहलंय म्हणजे परिग्रहाचे व्यसन जुनेच आहे आणि वस्तूंमधून भावना काढून घेण्याची गरजही जुनीच :-)
5 Dec 2022 - 10:09 pm | गवि
दुसर्या बाजूने बघू गेलं तर यात जगण्यातील वस्तू, व्यक्ती, परिसर यांच्यातील भावना काढून घेण्यातली निरर्थकता दिसते. तशाही कोनातून बघता येईल. तशी गरज एखाद्याला वाटत नसेल तर ते जिवंतपणाचं लक्षणही मानता येईल. मोहमाया सोडू न शकणे म्हणजे काहीतरी पराभव असे असावेच असे नाही.
फार तर पुढच्या पिढीच्या दैनंदिन जीवनात लक्ष घालू नये हे योग्य.
आवराआवरी (त्यांना पुढे किचकट प्रोसेस नको म्हणून) करणे वेगळे आणि मनच काढून घेणे, कोरडे होऊन दूर जाणे वेगळे. ते तर जायचेच असते एक दिवस.
6 Dec 2022 - 12:33 pm | Bhakti
अप्रतिम लिहिलंय!आवा भारी वाटते पण!
4 Dec 2022 - 9:17 am | Bhakti
आताची ४०तली पिढी हा प्रकल्प नक्कीच अवलंबू शकते.मागच्या पिढीचे सांगता येत नाही , पण अजूनही चमच्यातही जीव अडकलेली पिढीतर नाही,असो विचार आपले आपले.
हे आतापासूनही करू शकतो.एखादी गोष्ट बिघडली की ती अत्यंत महत्वाची असेल तरच पुन्हा खरेदी करते उदा. मिक्सर.
6 Dec 2022 - 11:29 am | अनिंद्य
हे आतापासूनही करू शकतो.
+१
4 Dec 2022 - 9:48 am | कर्नलतपस्वी
आम्ही सैनीक सदैव तत्पर, तयारीत असतो. देवाच्या दयेने इमारत अजून शाबूत आहे. अशीच कृपा राहीली तर गेला बाजार पंधरा वर्ष कुठेच गेली नाहीत. आगोदर दोनदा भेट झालीयं म्हणून ओळख आहे. तरी सुद्धा आवरा आवरी बरोबरच दररोजआनंदरावां सोबतच आसतो.
"कण अमृताचे "
मिपावरील कविता नसून ती अनुभूती आहे.
वाचून बघा.
प्रेरणा आमची दैवते.
नाही पुण्याची मोजणी
नाही पापाची टोचणी
जिणे गंगौघाचे पाणी
कशाचा न लागभाग
कशाचा न पाठलाग
आम्ही हो फुलांचे पराग
आम्हा नाही नाम-रूप
आम्ही आकाश स्वरूप
जसा निळा नळा धूप
पुजेतल्या पानाफुला
मृत्यू सर्वांग सोहळा
धन्य निर्माल्याची कळा
गीत – बा. भ. बोरकर
संगीत – पं. जितेंद्र अभिषेकी
6 Dec 2022 - 12:29 pm | Bhakti
सुंदर!
8 Dec 2022 - 3:29 pm | प्रचेतस
एक वेगळाच विषय तुम्ही पुढे आणलात.
लेख आणि त्यावरील प्रतिसाद देखील आवडले.
8 Dec 2022 - 5:33 pm | स्वधर्म
अनिंद्य भाऊ, लेख आवडला. हे करणे महत्वाचे आहे. मला वाटते वय वाढेल तसे वस्तूमधली गुंतवण कमी होतच जाते, अर्थात सर्वच तसे नसतात. मात्र वाचताना आईची आठवण आली.
माझ्या आईने वयाच्या पंचाहत्तरीत हे करू पाहिलं आणि अतिशय शांतपणे तिचं म्हणून जे काही होतं, ते आंम्हा भावंडांना कुणी काय घ्या ते सांगून टाकलं. ती तेव्हा आजारीही नव्हती, त्यामुळे आंम्हा सर्वांना कसेतरीच झाले होते व आंम्ही काही दिवस तो विषय टाळत होतो. शेवटी तिने निकराने आंम्हाला समोर बसवून ही निरवानिरव केली. जाताना ती आजारी नव्हतीच आणि घरचे काम करत असतानाच १५ मिनिटात ती गेली. नंतर तिचं सगळं सामान एका छोट्या सूटकेसमध्ये मावलं, जो आंम्हा सर्वांचा आयुष्यभराचा अमूल्य ठेवा आहे.
9 Dec 2022 - 11:43 am | श्वेता व्यास
+१, माझी आजी आणि आजेसासूबाईंना हे करताना पाहिलं आहे.
त्यांच्याकडे भरपूर ठेवा होता, पण चालत्या फिरत्या असतानाच त्यांनी वस्तू वाटून टाकल्या.
त्यामागे माझी भावना अशी झाली होती की त्यांना आता हे लागत नाही म्हणून देऊन टाकत आहेत, मृत्यूबद्दल विचार केला नव्हता.
त्याला असं विशिष्ट नाव असेल अशी कल्पना नव्हती, ते या लेखामुळे समजलं.
नंतर तिचं सगळं सामान एका छोट्या सूटकेसमध्ये मावलं
तंतोतंत!
8 Dec 2022 - 11:57 pm | सौन्दर्य
ऐहिक सुखांचा मोह टाळला किंवा दूर सारला तर मृत्यू देखील शांतपणे येत असावा असा माझा अंदाज आहे.
मी मानसिकरित्या रिक्त होण्याचा प्रयत्न करत आहे, ऐहिक वस्तूंचा त्याग त्यातल्या त्यात जास्त सोपा आहे असे वाटते.
9 Dec 2022 - 10:40 am | श्वेता२४
आपण जाणारच आहोत तर माघारी राहणाऱ्या वस्तु ज्यांना हव्या असतील त्यांना देऊ टाकणे व हळूहळू हा पसारा कमी करणे कधीही चांगले. तथापी भारतीयांच्या बाबतीत बाकी काही नाही केलं तरी चालेल पण हयात असतानाच संपत्तीची वाटणी मात्र स्पष्टपणे करुन ठेवण्याची गरज आहे. ती बऱ्याच ठिकाणी होताना दिसत नाही. त्यामुळे ती व्यक्ती गेल्यानंतर वारसांमध्ये भांडणे होतात. किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तीला संपत्तीचा काही भाग एखाद्याला द्यायचा असेल तर बाकीचे वारस त्यात आडकाठ्या आणतात इ.इ. वस्तुंची विल्हेवाट काय कशीही लागतेच ती मिळाली किंवा नाही मिळाली तरी इतका फरक पडत नाही. परंतू संपत्तीचा वाटा मात्र गरजू व्यक्तीला (वारसाला) नाही मिळाला तर खूप फरक पडतो. लोक याबाबत ठाम नसतात किंवा उदासिन असतात, असे माझे निरीक्षण आहे.
9 Dec 2022 - 5:58 pm | कर्नलतपस्वी
आमच्या इमारतीत एक तरूण आय आय टी पदवीधर जोडपे रहात होते. मनमीळाऊ.
दररोज संध्याकाळी आम्ही रिकामटेकडे म्हातारे इमारतीच्या खाली कट्ट्यावर कुटाळक्या करायचो.
एक दिवस आय आय टीयन पाण्याने भरलेली छोटी बादली घेऊन खाली आला. आमचा एक खडूस मीत्र फिरकी घ्यायच्या उद्देशाने म्हणाला " आहो इकडे कुठे? घरीच जायचे ना!
बुद्धिमान तरूणाने प्रश्नाचा रोख ओळखला व म्हणाला " काका मौत आणी शौच सांगून येत नाही म्हणून कायम तयारीत असलेले बरे",काकांचा चेहरा बघण्यात सारखा होता.
12 Dec 2022 - 9:31 pm | अनिंद्य
@ कंजूस
@ सस्नेह
@ Nitin Palkar
@ मुक्त विहारि
@ गवि
@ चित्रगुप्त
@ प्रचेतस
@ स्वधर्म
@ श्वेता व्यास
@ सौन्दर्य
@ श्वेता२४
@ कर्नलतपस्वी
लेख आवडल्याचे कळवल्याबद्दल, विषयाचे वेगळे पैलू समोर आणल्याबद्दल आणि स्वःतचे / स्वकीयांचे अनुभव मांडल्याबद्दल अनेक आभार.
हा विषय हळवे करणारा असल्यामुळे आणि त्यात सध्या मिपाच्या अतिहळू गती आणि संथपणामुळे लेख कुणी वाचेल की नाही अशी शंका होती मला, ती आपण दूर केलीत, आनंद झाला :-)