समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.
हा लघुलेख साहित्यक्षेत्रातील आणि वृत्तमाध्यमांतील अशा काही अनुभवांचा आहे. साहित्याच्या प्रांतात लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक आणि लेखक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.
मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.
यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.
वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?
३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
.......
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
...................................
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.
एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये बुडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात. खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. ते वाचून जरा अस्वस्थ झालो आणि मग त्यांना ईमेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.
आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.
सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘करोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/ ) हाच आहे. मग या वृत्तपत्रास ईमेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.
गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही !
बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.
बस ... आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो .फोनबिन जाऊदे मरूदे, हे धोरण.
लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही तोपर्यंतच !
..........................................................................................
प्रतिक्रिया
18 Mar 2022 - 4:21 pm | कुमार१
https://marathi.abplive.com/news/maharashtra/pune-sambhaji-bhide-controv...
विषय स्फोटक आणि भरपूर वाचक खेचणारा आहे. इथे तरी व्यवस्थित लिहायचे !
22 Mar 2022 - 7:41 pm | कुमार१
सध्याच्या गरमागरम चर्चांमुळे पकला असाल तर शांत व्हायला हे बघा ......
त्या मधल्या शब्दाच्या शेवटी T तरी लावायचा होता 😋
22 Mar 2022 - 9:02 pm | गामा पैलवान
हाहाहा, T तरी लावायचा किंवा मग ट्यांकरचा आकार तरी कमी हवा होता.
-गा.पै.
22 Mar 2022 - 9:55 pm | हरवलेला
नावात चूक नाही. हि प्राणी पशुवैद्यकीय कंपनी आहे.
https://www.rajasthansemen.com/
22 Mar 2022 - 9:59 pm | कुमार१
गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद !
22 Mar 2022 - 10:09 pm | हरवलेला
:)
23 Mar 2022 - 7:35 pm | गामा पैलवान
गुड क्याच! धन्यवाद! :-)
-गा.पै.
23 Mar 2022 - 7:41 am | कुमार१
एका गोष्टीबद्दल कुतुहल आहे.
त्या टँकर मधून ते नक्की कशाची वाहतूक करत आहेत ? जनावरांसाठी पाणी ?
23 Mar 2022 - 5:30 pm | हरवलेला
द्रवरूप नायट्रोजन असावा. छायाचित्रात डाव्या (वरच्या) बाजूला तसे लिहिलेले दिसत आहे. हि कंपनी द्रवरूप नायट्रोजनची पुरवठादार आहे.
23 Mar 2022 - 5:56 pm | कुमार१
आता समजले
धन्यवाद !
24 Mar 2022 - 7:11 pm | सुरिया
नुकतेच गावाकडे जाऊन आलो, एक बोर्ड बघण्यात आला.
.
सिंटेक्स टाकी धून मिळेल.
लोणची कामे केली जातील.
.
च्यायला हा कोण भप्पीलैरी कसल्या धूना राजरोस विकतोय?
आणि लोणची कामे म्हणजे काय कैर्या वगैरे फोडून मसाले खार लावून देणारे की काय?
24 Mar 2022 - 7:30 pm | कुमार१
धून, लोणची
>>> आई ग !
पंधरा मिनिटे हसवले बाबा या प्रतिसादातील शब्दांनी....😀 😀 😀
25 Mar 2022 - 7:09 am | चौकस२१२
सिंटेक्स टाकी धून त्यात लोणची होल्सेल ला करून मिळतील असे असणार ( चक रावलेली स्माईली )
26 Apr 2022 - 10:27 am | कुमार१
लेखाचे शीर्षक पहा:
भाषासूत्र : निर्थक शब्दयोजना, निर्थक अनुस्वार
भाषाविषयक धाग्याला सुद्धा निरर्थक शीर्षक !!
काय म्हणावे याला?
( शब्दकोशात जाऊन निर्थक हा शब्द नसल्याची खात्री करून घेतली) :)
13 May 2022 - 7:40 am | कुमार१
लष्कराच्या भाकऱ्या
या शब्दप्रयोगाचे दोन्ही प्रकारचे अर्थ इथे छान स्पष्ट केलेत :
साभार !
17 Jun 2022 - 5:55 pm | कुमार१
सुरुवातीस स्पष्ट करतो, की वरील बातमी फेकाफेकी नाही ! त्यामध्ये शास्त्रीय तथ्य आहे.
जेव्हा मद्यपानामुळे विषबाधा होते तेव्हा बऱ्याचदा अशा मद्यपींनी methanol हा घटक असलेली गावठी/ भेसळयुक्त दारू प्यालेली असते. मौजमजेसाठी आपण जे ‘अधिकृत’ मद्यप्राशन करतो ते ethanol असते.
methanol हे अतिशय घातक रसायन आहे. त्याने विषबाधा झालेला रुग्ण जेव्हा रुग्णालयात दाखल होतो, तेव्हा सुरुवातीचे उपचार म्हणून इथेनॉलयुक्त मद्य भराभर देता येते. यामुळे मिथेनॉलने शरीरावर होणारे दुष्परिणाम तात्पुरते रोखता येतात. हा उपचार बाधेनंतर लवकरात लवकर केल्यास उपयुक्त ठरतो. खरे म्हणजे वैद्यकीय दर्जाचे ethanol इंजेक्शनद्वारा द्यायचे असते.
अर्थात, यानंतर डायलिसिस आणि अन्य पूरक उपचार करावे लागतात, जेणेकरून मिथेनॉलचा पूर्णपणे निचरा होतो.
17 Jun 2022 - 6:53 pm | गामा पैलवान
कुमारेक,
माहितीबद्दल धन्यवाद. मिथेनॉलच्य सेवनामुळे अंधत्व कसं येतं? आणि हे मद्यपींना माहित नसतं का? की गरिबीमुळे ते चक्क दुर्लक्ष करतात?
आ.न.,
-गा.पै.
17 Jun 2022 - 7:59 pm | कुमार१
मिथेनॉल सेवनाने शरीरात formic acid तयार होते हे रसायन डोळ्यांच्या मुख्य चेतातंतूला घातक असते.
गरिबीमुळे ते चक्क दुर्लक्ष करतात >>>
होय. ही शोकांतिका आहे
24 Jun 2022 - 10:27 am | कुमार१
वाचावे ते नवलच
"असं असतानाच राज्यातील सत्ता नाट्य संपेपर्यंत प्रभारी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला नियुक्ती द्यावी अशी मागणी एका शेतकऱ्याने महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे केलीय. यासंदर्भातील पत्रच या शेतकऱ्याने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाठवलं आहे.
25 Jun 2022 - 6:55 pm | कुमार१
तापलेल्या राजकीय पर्यावरणात असं काही चित्रविचित्र वाचलं की क्षणभर हास्याची लहर पसरते आणि मजा वाटते !
हे पहा
नक्की काय म्हणायचेय यांना ? :)
28 Jul 2022 - 4:00 pm | कुमार१
आज अनेक वृत्तपत्रात ही बातमी आली आहे:
यातील "विषाणूला वेगळं केलं आहे" हे निर्बुद्ध भाषांतर झालेले आहे. :)
योग्य वैज्ञानिक वाक्यरचना अशी हवी:
" रुग्णाच्या नमुन्यांमधून विषाणूला शोधून त्याला प्रयोगशाळेत वाढवण्यात यश आलेले आहे. (कल्चर).
24 Sep 2022 - 4:10 am | कुमार१
२७ जुलै २०२२ रोजी वेस्ट इंडिजमधील पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात प्रत्येकी ५० षटकांचा सामना खेळला गेला.
भारत पहिला डाव खेळत असताना वारंवार पावसाचा व्यत्यय येत होता. अखेर या डावात भारताला ३६ षटकेच फलंदाजी करता आली.
षटके कमी केल्यामुळे दुसर्या डावात फलंदाजी करणार्या वेस्ट इंडिजसाठी डकवर्थ-लुईस नियमानुसार २५८ धावांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले. पण वेस्ट इंडिजचा डाव जेमतेम २६ षटकांत १३६ धावांतच संपुष्टात आला.
हा भारताचा दणदणीत विजय होता परंतु लोकसत्ताने कसे दिशाभूल करणारे शीर्षक दिले होते :
."..डकवर्थ-लुईस नियमाने केला यजमानांचा घात"
या शीर्षकाचा खरपूस समाचार घेणारा आणि सुंदर विश्लेषण करणारा लेख इथे
24 Nov 2022 - 8:42 am | कुमार१
माध्यमांची बेपरवाई, बेफिकिरी वगैरे वगैरे...
काही वर्षांपूर्वी निशिकांत कामत अत्यवस्थ असताना त्यांच्या मृत्यूच्या बातम्या कित्येक तास आधी पसरवल्या गेल्या होत्या.
आज त्या इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आहे....
विक्रम गोखलेंच्या बाबतीतही तेच होत आहे
निषेध !
24 Nov 2022 - 8:56 am | कुमार१
विक्रम गोखलेंच्या संदर्भात
सकाळी नऊ तीस वाजता अधिकृत वैद्यकीय बातमीपत्र जाहीर होणार आहे
25 Nov 2022 - 2:07 pm | अनिकेत वैद्य
ताजे बातमी
२५ नोव्हेम्बर २०२२, दुपारी १२:३९ वाजता.
विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा, व्हेंटिलेटर सपोर्टही निघू शकतो; रुग्णालयाची माहिती
25 Nov 2022 - 2:36 pm | कुमार१
आताच वाचली बातमी.
त्यांना शुभेच्छा !
25 Nov 2022 - 2:36 pm | कुमार१
आताच वाचली बातमी.
त्यांना शुभेच्छा !
7 Feb 2023 - 9:10 am | कुमार१
काल Türkiye ( तुर्कीये) या देशात भूकंप झालेला आहे. पूर्वी या देशाचे नाव टर्की असे होते. परंतु ते आता बदलून वर्षाहून अधिक काळ उलटला आहे.
आज महाराष्ट्रातील चार प्रमुख मराठी वृत्तपत्रे (इ आवृत्ती) पाहिली असता त्यात कुठेही या नव्या नावाचा उल्लेख नाही.
टर्की, तुर्की, तुर्कस्तान असे उल्लेख आढळले.
एका संपादकांना इ-मेल केली आहे. त्यांच्या छापील अंकातही जुनेच नाव दिलेले असल्यामुळे.
15 Mar 2023 - 10:17 am | कुमार१
आतापर्यंत सामुदायिक विवाह ऐकले होते बुवा !
सामुदायिक.. आणि .. सार्वजनिक..
काय बोलावे आता ?