h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Baloo 2', cursive;}
p {text-align: justify;font-family: 'Poppins', sans-serif;font-size:16px;}
.img-left {float: left;width:20%;margin-right:20px;}
सकाळी सकाळी अचानक मोबाइलच्या मेसेजचा आवाज येतो. तुम्ही खडबडून उठून बसता आणि मोबाइल बघता. निद्रानाश झालेल्या कुठल्यातरी नातेवाइकाने 'गुड मॉर्निंग'चा मेसेज पाठवून तुमच्या झोपेचं खोबरं केलेलं असतं!
सोशल मीडियाचा अतिरेक करणाऱ्या अनेक मंडळींपैकी ही एक जात आहे. या पीडेकऱ्यांच्या अशा अनेक जाती आणि जमाती आहेत. व्हॉट्सअॅपवर ग्रूप तयार करून तुम्हाला न विचारता त्यात समाविष्ट करणारे, फेसबुकवर रोज न चुकता आपण जसे ब्रश करतो तसे स्वतःचे किंवा आपल्या मुलांचे फोटो टाकणारे, अनेकदा वाचून कंटाळवाणे झालेले जोक्स फॉरवर्ड करणारे, कुठलेतरी बकवास व्हिडिओ पाठवून तुमच्या फोनचं मेमरी कार्ड फुल्ल करणारे!
अशी ही मंडळी पाहिली की मार्क झुकरबर्ग आणि जेन कोम (व्हॉट्सअॅपचा निर्माता) यांच्या सात पिढ्यांचा उद्धार करावासा वाटतो! कशाला शोधून काढावी अशी साधनं, जी वापरून ही अशी पीडेकरी मंडळी आपल्याला वेठीला धरतात? पण मार्क आणि जेनला काय माहीत की आपण शोधून काढलेली ही साधनं वापरून सातासमुद्रापलीकडील काही मंडळी इतरांना वैताग आणणार आहेत!
खरं तर सोशल मीडिया ही किती सुंदर आणि उपयुक्त संकल्पना आहे. त्याचा जर आपण योग्य रित्या आणि संयमाने वापर केला, तर आपलं कंटाळवाणं आयुष्य आपण किती सुसह्य करू शकतो.
दूरदेशात राहणाऱ्या आपल्या मुलाशी फक्त बोलण्याचीच नव्हे, तर त्याला प्रत्यक्ष बघण्याची सोय आता व्हॉट्सअॅपमुळे शक्य झाली आहे. डोळ्यात प्राण आणून आपल्या मुलाची वाट पाहणाऱ्या वृद्ध आईवडिलांच्या कंटाळवाण्या आयुष्यात यापेक्षा अधिक आनंदाचे क्षण कोणते असू शकतात? शाळेतला आपल्या बाकावर बसणारा जुना मित्र जेव्हा फेसबुकवर (टकलासहित) सापडतो, तेव्हा त्याचा आनंद काही औरच असतो. आपल्या आयुष्यातील हरवलेले क्षण परत मिळवून देण्याचं सामर्थ्य सोशल मीडियात आहे. जर त्याचा योग्य तो वापर केला, तर मित्रांचं, स्नेह्यांचं एक उबदार कवच आपण आपल्याभोवती निर्माण करू शकतो, जे कितीही कठीण प्रसंग आला तरी आपल्याला नेहमीच साथ देईल.
पण सध्याच्या काळात याचा इतका गैरवापर होतो आहे की अफूच्या गोळीप्रमाणे सोशल मीडिया हे एक व्यसनच झालं आहे. नुकतीच पेपरमध्ये एक बातमी आली होती की निमहान्स या बंगळुरूमधील प्रख्यात आरोग्यसंस्थेने सोशल मीडियाच्या व्यसनापासून मुक्तीसाठी एक विशेष व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं आहे, इतकी त्याची गरज निर्माण झाली आहे.
मुलांमध्ये वाढलेला सोशल मीडियाचा प्रभाव हा खरं तर स्वतंत्र लेखाचाच विषय आहे. आपण जर आपलं बालपण आठवलं, तर असं वाटतं की अरे, आपलं बालपण किती सहज आणि सुंदर होतं. टी.व्ही., इंटरनेट-मोबाइलपूर्वीचा काळ किती छान होता! तेव्हाचं आयुष्य कसं साधंसरळ होतं. लहान मुलं मनसोक्त हुंदडायची, दंगा करायची आणि घरी आली की (मोठ्या माणसांच्या धाकाने का होईना) रामरक्षा म्हणून अभ्यास करायची. मोठी मंडळी ऑफिसमधून आल्यावर चहा वगैरे घेऊन अंगणात बसून छान गप्पा मारायची आणि त्यामध्ये मग कधीकधी आजूबाजूचे शेजारीही सहभागी होतं. मग त्यामध्ये एखादे तात्या किंवा नाना अनेक गोष्टी रंगवून सांगायचे आणि गप्पा इतक्या रंगायच्या की वेळेचं भानच राहायचं नाही. स्त्रियांचं आयुष्यसुद्धा किती साधंसोपं होतं. सगळ्यांनी एकत्र जमून तिथे नसलेल्या एखाद्या कमलताईंची मनसोक्त निंदानालस्ती करायची, एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढायच्या आणि सगळे सण एकत्र साजरे करायचे! असं निरागस आयुष्य होतं तेव्हा.
खरं म्हटलं तर सोशल मीडिया ही याच निवांत आयुष्याची सुधारित आवृत्ती आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात माणसं एकमेकांपासून दूर गेलीत. पूर्वीसारखं एकत्र बसून गप्पा मारणं आता शक्य नाही. परंतु मनातील स्नेहभाव, मैत्री अजूनही कमी झालेली नाही. त्यामुळेच सोशल मीडियाने स्थळकाळाची बंधनं झुगारून कुठल्याही माणसाला, कुठूनही, कुणाशीही जोडण्याची विलक्षण सोय करून दिली आहे. याचा जर योग्य वापर केला, तर खरंच हा एक क्रांतिकारक शोध आहे. स्नेहाचं, मैत्रीचं हे जाळं जर तुम्ही काळजीपूर्वक विणलं आणि जोपासलं, तर त्याइतका मोठा आनंद नाही.
पण कुठलीही गोष्ट संयमाने, विचारपूर्वक करेल तर तो मानव कुठला? ज्या मानवाने ईश्वराने दिलेली नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश करण्याचा सपाटा लावला आहे, तो सोशल मीडियाचा अतिवापर करणार नाही हे कशावरून?
खरं तर सोशल मीडियाच्या या आभासी जगामुळे आपण खरंखुरं आयुष्य जगण्याची कलाच विसरलो आहोत. व्हॉट्सअॅपवर मित्राशी तासनतास केलेल्या चॅटला प्रत्यक्ष भेटल्यावर पाठीवर थाप मारून केलेल्या गप्पांची सर कधीच येणार नाही. आईशी मोबाइलवर बोलणं आणि तिच्या पायाशी बसून, तिने प्रेमाने आपल्या केसांतून हात फिरवीत मारलेल्या गप्पा - या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्या प्रेमळ स्पर्शाची सर सोशल मीडियाला येणार नाही. फेसबुकवर अनेक फोटो पाहूनही आल्प्स पर्वताचं बर्फाळ सौंदर्य आपल्याला तिथे प्रत्यक्ष जाऊनच कळू शकतं. तिथे अंग गोठवणाऱ्या थंडीची मजा फेसबुक आपल्याला देऊ शकत नाही. खरंखुरं जीवन हे जास्त सुंदर आहे, अधिक जिवंत आहे! त्याचा प्रत्यक्षात उपभोग घेण्याचम सोडून आपण जर सोशल मीडियाच्या खोट्या जगात गुंतून पडलो, तर त्यासारखी दुर्देवी गोष्ट नाही.
सोशल मीडियाचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे आपण वाचन वगैरे पूर्णपणं विसरून गेलेलो आहोत. वाचन म्हणजे व्हॉट्सअॅपवर आलेले बाष्कळ विनोद आणि फेसबुकवरील पांचट पोस्ट्स असा अनेकांचा गैरसमज झालेला दिसतो! ज्या पिढीने श्रीमान योगी, मृत्युंजय, बटाट्याची चाळ, इन्कलाब यासारखं दर्जेदार वाचलं आहे, त्यांच्यासाठी हे अस़ं उठवळ साहित्य (!) वाचणं म्हणजे एक शिक्षाच वाटते!
म्हणूनच सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेल्या तरुण पिढीला असं सांगावंसं वाटतं की, बाजूला ठेवा तो मोबाइल आणि लॅपटॉप! जरा तुमच्या आजूबाजूला बघा. तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल इतक्या सुंदर गोष्टी तुम्हाला आजूबाजूला दिसतील! आयुष्य जिवंतपणे जगण्याची कला आत्मसात करा, म्हणजे मग तुम्हाला या खोट्या आभासांची गरजच भासणार नाही. फेसबुकवरील सनी, कतरिना आणि प्रियांका यांचे फोटो पाहण्यापेक्षा समोर राहणाऱ्या एखाद्या साध्यासुध्या, सुंदर मुलीवर प्रेम करा. मग बघा आयुष्य कसं विविध रंगांनी फुलून येतं ते! खूप प्रवास करा, जग पाहा! पण हो, त्याचे भरमसाठ फोटो सोशल मीडियावर टाकून इतरांना वैताग आणू नका! स्वतःच्या कोषातून बाहेर पडून ज्यांना तुमच्या मदतीची गरज आहे त्यांना मदतीचा हात द्या, कुणास ठाऊक.. प्रकाश आमटेंसारखं एखादं महान कार्य तुमच्याही हातून होऊन जाईल!
आयुष्याच्या संध्याकाळी तुम्हाला असं वाटायला नको की -
वेगवेगळी फुले उमलली, रचुनि त्यांचे झेले
एकमेकांवरी उधळले, गेले ते दिन गेले !
-------------------------------------------------
अविनाश चिंचवडकर
बंगलोर
मो. ९९८६१९६९४०
avinashsc@yahoo.com
प्रतिक्रिया
9 Sep 2022 - 10:21 am | कुमार१
+१११
9 Sep 2022 - 10:23 am | कर्नलतपस्वी
सहमत.
एक पिडीत
9 Sep 2022 - 11:37 am | आग्या१९९०
आता एकत्र येऊन गप्पा काय मारणार ? मोबाईलमुळे आपल्या मित्रांचे , नातेवाइकांचे हालहवाल कळत असतातच. प्रत्यक्ष भेटीत फार नवीन सांगण्यासारखे नसते. अवांतर विषयावर चर्चा करावी तर आपल्याला जे माहीत असते ते गुगलच्या कृपेने समोरच्यालाही बऱ्याचदा माहीत असते. आणि नसेल माहीत तरी ऐकून घ्यायची तयारी नसते, " लिंक पाठव " किंवा " व्हिडिओ पाठव " असे सांगून विषय संपतो. १५ मिनिटात खेळ खल्लास!
9 Sep 2022 - 12:12 pm | राजेंद्र मेहेंदळे
एकाच घरात राहणारी ४-५ माणसे दिवसातील २-३ तास घरात एकत्र असतात, पण वेगवेगळ्या खोल्यात बसुन आपापल्या मोबाइलला चिकटलेली असतात. एकमेकांशी संवाद असा नाहीच, जेवायच्या वेळी एकत्र आले तरच, नाहीतर तेही टि.व्ही. किवा मोबाइलवर एखादा चित्रपट किवा सिरीयल बघताना उरकले जाते.
कोव्हिडमुळे तर शाळाही मोबाईल आणि लॅपटॉपवर आल्या आणि क्लासेसही. त्यामुळे मुले अभ्यास कधी करतात आणि टाईमपास कधी हेच कळत नाही. स्क्रीन टाईम वाढल्यामुळे लहान वयात चश्मे लागण्याचे प्रमाण वाढले आहे.
ओटीटी माध्यमांमुळे रात्री जागुन तरुणाइच्या झोपेचे खोबरे होत आहे. असे एक ना अनेक.
12 Sep 2022 - 5:59 am | nutanm
मेसेज आल्यावर झोपमोड होते , त्यावर सर्व आवाज मोबाइलचे फक्त फोन रिंग सोडून setting मधे जाउन बंद करता येतात( mute करणे) मी तर whtapp alerts, message ring, आलेली व जाणारीतसेच typing करतानाचा आवाज व असे सर्व आवाज मी व माझे बघून घरातयांनीही setting मधे जाऊन बंद केले आहेत त्यामुळे झोपमोड सहसा होत नाही . फोन रिंग शिवाय.फोन आले तर खूप कामाचेच असतात ,अन्यथा येत नाहीत.
12 Sep 2022 - 6:00 am | nutanm
मेसेज आल्यावर झोपमोड होते , त्यावर सर्व आवाज मोबाइलचे फक्त फोन रिंग सोडून setting मधे जाउन बंद करता येतात( mute करणे) मी तर whtapp alerts, message ring, आलेली व जाणारीतसेच typing करतानाचा आवाज व असे सर्व आवाज मी व माझे बघून घरातयांनीही setting मधे जाऊन बंद केले आहेत त्यामुळे झोपमोड सहसा होत नाही . फोन रिंग शिवाय.फोन आले तर खूप कामाचेच असतात ,अन्यथा येत नाहीत.
12 Sep 2022 - 8:11 am | मुक्त विहारि
दुधारी शस्त्र आहे...
आपण कसा वापर करायचा? हे आपणच ठरवायचे ...
22 Sep 2022 - 1:49 pm | श्वेता व्यास
लेखाशी सहमत. आणि खरंच फोनपासून जितकं लांब राहू तितकं जास्त बरं असं वाटू लागलंय.
23 Sep 2022 - 11:16 am | विवेकपटाईत
सोशल मीडिया वर लोक मिसळपाव ,कविता कोष, सहित अनेक साहित्यिक, सांस्कृतिक, आणि विभिन्न विषयांवर माहितीपूर्ण वेबसाइटवर ही लोक वाचन करतात.
23 Sep 2022 - 12:39 pm | चौथा कोनाडा
खरे आहे, पण प्लास्टिक जसे टाळू शकत नाही तसंच सो.मि. देखील टाळू शकत नाही !
✔️
मोबाईल आल्यापासुनच ही व्याधी जडली आहे .....
मधूमेह बरा होऊ शकत नाही पण गोळ्या औषधे घेऊन नियंत्रणात ठेवता येतो तसंच डिजिटल, मोबाईल डी-टॉक्सच्या औषधगोळ्या घेऊन मरण लांबणीवर टाकायचं एवढंच आपल्या हाती !