सुचना :
१. हे लेखन , हा धागा धागा "सनातन प्रभात" आहे, तुम्ही सनातनचे फॅन नसाल तर उगाच वेळ वाया घालवुन पुढे वाचण्यात अर्थ नाही. सनातनचे फॅन असाल तर मात्र जरुर एन्जोय करा .
२. ह्या धाग्याचा विषय गणेशोत्सव, गणेशमुर्ती वगैरे आहे. महात्मा फुले ह्यांनी त्यांच्या अखंडामध्ये गणपती हे कशे बामणी दैवत आहे , ब्राह्मणांनी कसे बहुजनांच्या शोषणाकरिता रचलेले कुटील कारस्थान आहे , कसे बामणाचे कसब आहे हे अतिषय रसाळ भाषेत लिहुन ठेवलेले आहे. अभ्यासु लोकांनी जरुर तो अखंड वाचावा. बहुजनांनी गणेशोत्सव ह्या बामणाच्या कटपाला बळी पडू नये.
असो.
-----------------------------------------------------------------------------
सर्वप्रथम, सर्व भाविकांना आगामी गणेशोत्सवाच्या आगाऊ शुभेच्छा !
गणेशोत्सवाची तयारी जोरात चालु असेल ना ! विशेषतः आज वीकेन्ड असल्याने मुर्ती बूक करणे, सजावटीचे सामान ठरवणे, पुजेच्या साहित्याची जुळवाजुळव करणे वगैरे चालु असेल. आमच्या लहानपणी तर हा एक अक्षरशः सोहळा असायचा. आता आपण तत्वज्ञानाच्या लेव्हलला, मानसपुजेच्या लेव्हलला, परापुजेच्या पातळीला पोहचलो असलो तरी घरातील लहान मुलांचा आनंद का हिरावुन घ्या असा विचार करुन आमच्याघरी आजही ही सर्व कर्मकांडे अगदी जोरात साजरी केली जातात.
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः । लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन्कर्तुमहसि ॥ भगवद्गीता ३-२० ॥
असो तर मुळ विषय असा झाला की काल गणेशमुर्तीचे बुकिंग करावे म्हणुन फिरत होतो . २ वर्षं बंगळुरात असल्याने सौथिंडीयन पध्दतीची जी मिळेल ती मुर्ती घेणे ह्याला दुसरा पर्यायच नव्हता . ह्यावर्षी मात्र सॅक्रेडफिग-टर्मरिंडबनियन (सॅफिटर्ब) मध्ये परतल्याने ह्या वर्षी गणेशमुर्तींचे अनेक पर्याय उपल्बध होते. इतक्या सुंदर सुंदर मुर्ती बाजारात उपलब्ध्द होत्या आणि त्यामुळे नेहमी होते तेच - पॅराडॉक्स ऑफ चॉईस झाले. इतक्या विविधप्रकारच्या सुंदर गणेशमुर्ती की अगदी ही घेऊ की ती घेऊ असे झाले. नेहमीप्रमाणे म्हणालो की- तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ । ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ॥ पण गणेशमुर्ती कशी असावी किंव्वा कशी नसावी ह्या विषयी किमान प्रमाणशास्त्रात मला तरी काहीच संदर्भ सापडला नाही. गणेशमुर्ती पार्थीव अर्थात मातीची असावी ह्या व्यतिरिक्त काहीच मार्गदर्शन आढळले नाही. (तुमच्या पाहण्यात काही असल्यास जरुर कळवा.) पण तुर्तास सीझ द ऑपॉर्च्युनिटी म्हणुन आपले आपणच नियम तयार करीत आहे !
गणेशमुर्ती कशी असावी / नसावी ?
१. सर्वप्रथम - जे शास्त्रात स्पष्टपणे सांगितले आहे की - गणेशमुर्ती पार्थीव अर्थात मातीची असावी. पी.ओ.पी ची मुर्ती शक्यतो टाळावी. उगाच पर्यावरणचे कौतुक म्हणुन नव्हे तर विसर्जन केल्यावरही मुर्तीचे अवशेष शिल्लक रहातात ते पाहुन वाईट वाटते बस्स. काहीकाही लोकं पर्मनंट सोने तांबे पितळे वगैरेचे पर्मनंट मुर्ती घेत आहेत पण हे शास्त्रात असलेल्या एकमेव मार्गदर्शनाला विरुध्द असल्याने हे टाळावे. गणेशोत्सव वर्षातुन एकदा येणारा सण आहे , तस्मात त्यात सढळ हाताने खर्च करुन कुंभार/मुर्तीकार लोकांच्या कलेला वाव द्यावा !
२. मुर्ती ही उंदरावर विराजमान असलेली नसावी. उंदीर हे वाहन आहे . आसन नाही . आपण काय दहादिवस आपल्या गाडीत बसुन राहतो का ?
३. शिवपार्वती सोबत गणपती अशी मुर्ती घेऊ नये . मुळातच शंभु आणि शांभवी भिन्न नाहीत त्यामुळे अर्धनारीनटेश्वर व्यतिरिक्त सर्व रुपातील शिवशक्तीच्या मुर्ती ह्या तथ्याला धरुन नाहीत . आणि समजा तुम्ही शिवशक्ती अद्वैताच्या पातळीला पोहचलेले असाल तर तुम्हाला समर्थ रामदास स्वामींचा श्लोक आठवेल - "जयासी लटिका आळ आला | जो मायागौरी पासोनि झाला | झालाचि नाही तया अरुपाला | रुप कैचे || श्रीराम ||" मुळात शिवशक्ती द्वैत च नाही , तर मायागौरी पासुन झाला हाच लटिका अर्थात खोटा आळ आहे. गणेश "झाला" असे नाहीच , तो अरुप आहे आहे मग त्याला कसलं रंग रुप देणार ? तस्मात शिवपार्वती सोबत गणेश अशा मुर्तीची स्थापना करु नये.
३. गणेशमुर्ती शक्यतो पाटावर किंवा सिंहासनावर बसलेली असावी. मयुरेश्वर अर्थात मयुरावर बसलेली मुर्तीही चालु शकेल पण अन्य आसनांवर स्थित मुर्ती टाळावी. हे तक्क्या लोड ला टेकुन बसणे ही माणासांची काऊच पोटॅटो स्टाईल झाली ती देवावर लादु नये. पानावर बसलेली गणेशमुर्ती पाहण्यात आली पण पानावर कोण बसतं राव? आम्ही तर फक्त इमर्जन्सीला झाडाची पानं वापरतो. उभी राहिलेली किंवा नॄत्य करणारी मुर्ती सहसा टाळावी.
सिंहासनाधिष्ठित मुर्ती खुप सुंदर दिसतात पण लालबाग्च्या राजाची एकेवर्षी आलेली मुर्ती मागे चक्क घुबड होते . घु-ब-ड . आर यु किडींग मी !
बाकी सिंहासनाधिष्ठित वरदहस्त मुर्ती मात्र नीट पाहुनच घ्यावी , मागे एक गणेशमुर्ती पाहण्यात आलेली त्यातील गणपती आता सण्णकन कानाखाली लावतो काय असे वाटत होते.
४. पगडी फेटा पागोटे घातलेली मुर्ती टाळावी. व्यवस्थित मुकुट परिधान केलेली मुर्तीच शक्यतो घ्यावी. आपल्याकडे पगडी फेटा पागोटे वगैरे आपापल्या जातीचे निर्देशक म्हणुन वापरायचे. देवावर उगाच जात पोटजात लादु नये. काहीकाही अगदी टकल्या मुर्ती पाहण्यात आल्या तर काहीकाही अगदी केसाळ ह्या अशा मुर्ती बनवणे मागे काय तर्क आहे हे मुर्तीकारालाच माहीत.
५. अन्य देवी देवता साधुसंत महान नेते वगैरेंच्या रुपातील मुर्ती घेऊ नये. बायकोची साडी मेव्हणीने घातली तरी आपले कन्फ्युजन होते , देवाच्याबाबतीत तसले कन्फ्युजन कशाला ?
जे ते ज्या त्या जागी असणे उत्तम , उगाच मिक्स का करा ?
६. मुर्तीचे रंग सहज साधे सोप्पे असावेत . कलियुगात गणेश धुम्रवर्ण सांगितला आहे पण आपण आपल्या स्किन टोन शी जुळत्या रंगाची मुर्ती घ्यायला हरकत नाही. मुर्ती ग्लॉसी का करतात देव जाणे . अर्थात तुमची स्किन अशी गॉसी असेल तर तसेही घेऊ शकता . पण मुर्तीवरील रंग पाण्याचे भयंकर प्रदुषण करतात त्यामुळे कमीत्कमी रंगाची मुर्ती असणे हेच उत्तम. आणि हो, रंग कितीही आकर्षक असले तरी ते लॉजिकल असावेत . काल एक मुर्ती पाहिली त्यात गणपतीला हिरवे धोतर नेसवले होते , हिरवे म्हणजे पोपटी हिरवे ! हे किमान माझ्यातरी आकलनाच्या पलिकडे आहे .
७. घरगुती मुर्तीचा आकार किती मोठ्ठा असावा ह्यावर काही कंसेंसस नाही पण शक्यतो शाडु पासुन भव्य मुर्ती बनवणे अवघड असावे. मुर्ती शक्यतो ६ इंच ते १ फुट एवढीच असावी. अवाढव्य मुर्ती घेतल्यास ती घरी आणताना किंव्वा स्थापन करताना किंव्वा विसर्जन हात वगैरे मोडण्याची भीती असते. बाकी सार्वजनिक गणेशोत्सवात गणेशमुर्ती भव्य करण्याची स्पर्धाच लागली असते , असो काय बोलणार . हे सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे अवघड जागेचे दुखणे झाले आहे , सांगताही येत नाही अन सहनही होत नाही. लोकमान्य टिळकांनी देव्हार्यातील गणापती रस्त्यावर आणाला , तो तेथुन परत देव्हार्यात न्यायला त्यांच्याच तोडीचा माणुस जन्मायला हवा. अर्थात आजकाल काही लोकं हेही म्हणायला लागली आहेत की सार्वजनिक गणेशोत्सव भटमान्य टिळकाने सुरु केला नसुन दुसर्याच कोणी तरी सुरु केला आहे . हुश्श .
असो . वरील नियम म्हणजे काही कमांडमेंट्स नाहीत , काही शास्त्रोक्त नाहीत , त्याला कोणताही अध्यात्मिक वेदोक्त पुराणोक्त आधार नाही. जे मनाला वाटले पटले तसे लिहिले. तुमच्यासाठी तुमचे नियम वेगळे असतील , आपण जरुर इथे प्रतिसादात मांडावेत. मीआधीच म्हणल्याप्रमाणे हा धागा एकदम सनातन प्रभात स्टाईल आहे , तुम्ही खदखदुन हसायला स्वतंत्र आहात , कोणाचीही काहीही हरकत नाही =))))
आपल्याला कोणालाही काहीही पटवुन द्यायचं नाहीये , हे सारं स्वांन्तःसुखाय आहे .
ही आम्हाला आवडलेली गणेशमुर्ती >>>
मोरया मोरया
___/\___
प्रतिक्रिया
28 Aug 2022 - 12:30 pm | प्रचेतस
अहो तुम्ही वेदोप्रणित सनातन धर्म मानणारे पण ऋग्वेदात उल्लेख नसलेल्या गणपतीची मूर्ती तुम्ही घेता ही तर ब्लास्फेमीच.
28 Aug 2022 - 1:19 pm | प्रसाद गोडबोले
हे आपले धर्म - तिन्ही धर्म - बौध्द , जैन आणि सनातन धर्म हे जवळपास दोन अडीच हजार वर्षं जुने आहेत. त्यांची तत्वे नियम सारेच प्राचीन आहेत , त्यामुळे ह्यातील कोणत्याच धर्माचे तंतोतंत १००% आचरण करणे अशक्यप्राय गोष्ट आहे.आपण आपल्या काळाला अनुरुप नियम बनवले पाहिजेत , जे आपल्याला पटते, तर्कशुध्द वाटते तोच खरा आपला खरा धर्म आणि त्यांचेच आचरण केले पाहिजे. जुनाट हजारवर्षे पुराण्या संकल्पनांना आंधळ्यासारखे हट्टाग्रहाने चिकटुन बसायला आपण म्हणजे काही "ते" नाही.
धर्म परीवर्तनशील आहे. जे चांगलं आहे , रादर सोयीस्कर आहे, सुखद आहे, सहज आहे ते आपण स्विकारतो , जे नाहीये त्याचा त्याग करतो. भागवत हिंदुधर्म हा असा बौध्द जैन आणि सनातन धर्माच्या ट्रिनिटीमध्ये आहे एक कॉन्वेक्स लिनीयर काँबिनेशन. त्यात सनातन धर्मातील वेदांतातील उपनिषदोक्त अद्वैत आहे, जैनांच्या अहिंसेचा आग्रह आहे , आणि बौध्दांसारखी मुर्ती बनवणे वगैरे आहे.
भले वेदांत उपनिषदात नसेल गणपतीचा उल्लेख , पण किमान आपल्या आवडात्या महाभारताचा लेखक म्हणुन तर आहे की उल्लेख ! आपल्या श्रीमदाद्य शंकरआचार्यांनी ज्याचे अत्यंत रसाळ वर्णन केले आहे -
गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गषण्डं
चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डम् ।
कनद्दन्तकाण्डंविपद्भङ्गचण्डं
शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् ॥१॥
किंवा माऊली म्हणातात तसे -
देवा तूंचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु ।
म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥
किंव्वा समर्थ म्हणाले तसे -
जयाचें आठवितां ध्यान । वाटे परम समाधान ।
नेत्रीं रिघोनियां मन । पांगुळे सर्वांगी ॥
इतक्या मोठ्ठ्या लोकांनी गणेशाचे चिंतन केले आहे , ही परंपरा टाळणारे आपण कोण?
ध्यान गणेशाचें वर्णितां । मतिप्रकाश होये भ्रांता ।
गुणानुवाद श्रवण करितां । वोळे सरस्वती ॥
जयासि ब्रह्मादिक वंदिती । तेथें मानव बापुडे किती ।
असो प्राणी मंदमती । तेहीं गणेश चिंतावा ॥
जयासि ब्रह्मादिक वंदिती । तेथें मानव बापुडे किती ।
असो प्राणी मंदमती । तेहीं गणेश चिंतावा ॥
____/\____
28 Aug 2022 - 1:56 pm | प्रचेतस
शंकरांचार्यांनी रचलेले स्तोत्र विलक्षण लयबद्ध आहेच. ज्ञानदेवांनी गणपती हा बौद्धमताचे खंडन करताना दाखवला आहे :)
30 Aug 2022 - 9:42 pm | मुक्त विहारि
दोन्ही आवडले ...
28 Aug 2022 - 1:00 pm | चौथा कोनाडा
मयुरेश्वर अर्थात मयुरावर बसलेली मुर्तीही चालु शकेल
हे कसे काय चालू शकेल ? एक शंका, म्हणून विचारले.
28 Aug 2022 - 1:23 pm | प्रसाद गोडबोले
ह्यावर अॅक्च्युअली माझेही कन्फ्युजन आहेच, मुळात मी कधी मोरगांव ला मयुरेश्वराच्या दर्शनाला गेलेलो नाहीये, तिकडे गेल्यावर कोणातरी अधिकारी व्यक्तीला विचारुन मत बनवेन. किंव्वा इथे वाड्यावर विचारेन कधीतरी :)
31 Aug 2022 - 2:49 pm | आनन्दा
या बाबतीत गोंधळच आहे..
आपली दुर्गामाता देखील बऱ्याच ठिकाणी वाघावर बसलेली असते..
कदाचित आपण देवाच्या ज्या रूपाचे ध्यान करतो तशी मूर्ती बनवावी असा संकेत असेल.
मुळात पार्थिव पूजेत ती मूर्ती पूजा झाल्यावर लगेच विसर्जन करायची असते. आपण ती 10 दिवस ठेवतो हाच मोठा घोळ आहे.
बाकी काय बोलणे?
28 Aug 2022 - 1:06 pm | कॉमी
आम्ही सनातनी नसलो तरी लेख वाचून मनोरंजन झाले.
आमचा आणखी एक निकष- चार हात नकोत. (त्या सनातन वाल्या फोटोत आहेत तसे.)
कारण ? चांगले दिसत नाहीत.
लेखातले सगळेच निकष पटले आहेत.
31 Aug 2022 - 9:44 am | तुषार काळभोर
आमचा आणखी एक निकष- चार हात नकोत. (त्या सनातन वाल्या फोटोत आहेत तसे.)
>> चार हात तर बाय डिफॉल्ट सगळ्याच मूर्तींना असतात की.
आमचा एक ॲडिशनल निकष - मूर्ती बघून प्रसन्न वाटायला हवं.
1 Sep 2023 - 8:53 am | चौथा कोनाडा
काही जण म्हणतील गजमुख (सोंड, हत्ती सारखे कान इत्यादि) सुध्दा नको!
28 Aug 2022 - 1:48 pm | Bhakti
वाचत आहे, चांगले मुद्दे लिहिले आहेत.
28 Aug 2022 - 6:54 pm | मदनबाण
मला फेटेवाला बाप्पा लयं आवडतो. _/\_
देवाकडे आणि रुबाबदार फेट्यात जात पाहणारे कपाळकरंटे म्हणायला हवे !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आते जाते खूबसूरत आवारा सड़को पे... :- Anurodh
28 Aug 2022 - 9:58 pm | धर्मराजमुटके
छान ! सुंदर लेख. आम्हाला तर बाबा सगळेच बाप्पा छान दिसतात आणि आवडतात. (शिवाजी जन्मावा पण तो दुसर्याच्या घरात या चालीवर वाचावे).
अगदी अगदी.
आपण कधतरी सासुरवाडीला जावे, बायको, मेहूणी, सासुबाई यांच्या कळपात आपण म्हणजे गरीब गाय होऊन जातो.
बायकोने मेव्हणीची साडी दिवसाउजेडी घातली तर तेवढे कन्फ्युजन होत नाही. पण रात्री झोपताना बायकोने आपला राष्ट्रिय पेहेराव म्हणजे गाऊन मेहूणीला किंवा इतर कोणा स्त्रिला घालायला अजिबात देऊ नये. रात्री आपल्याला कधी पाणी हवे असते कधी डोकेदुखीची गोळी हवी असते, घरातील सगळे झोपलेत म्हणून बायकोला मोठ्याने हाक मारुन बाकीचे जागे होऊ नये म्हणून आपण हात लावून तिला जागे करायला पाहतो आणि कपड्यांची अदलाबदल झाले असेल तर हे राम ! मग पुरुष कुठ्ठे कुठ्ठे म्हणून नेण्याच्या लायकीचे राहत नाहीत.
30 Aug 2022 - 2:10 pm | नि३सोलपुरकर
हा ..हा ..१ नंबर .
लेख आवडला ,बाकी वर चौथा कोनाडा ह्यांनी जी शंका उपस्थित केली त्याचे निरसन लेखक महोदय लवकरच करतील अशी आहे .
( कारण माझी ही नेमकी तीच शंका आहे )
30 Aug 2022 - 8:58 pm | कंजूस
डोळे वर. कधी हे मालक उठणार असा भाव आहे उंदराचा।
27 Aug 2023 - 11:07 pm | प्रसाद गोडबोले
सर्वभाविकांना आगामी गणेशोत्सवाच्या अॅडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा !
आज गणेशमूर्ती बुकिंग केले. पहिल्या स्टॉल मध्येच गेल्यावर्षी सारखीच अत्यंत साधी सात्विक सौम्य रंगाची मुर्ती निदर्शनास पडली, तीही पुर्ण शाडूची आहे असे कळल्यावर जास्त काही पहाण्याची गरजच नव्हती , एक दोन ठिकाणी पाहिले अजुन काही ऑप्शन आहेत का , पण काहीच खास वाटले नाही ,
पहिली आवडली तीच लगेच बूक केली. इन जनरल लाईफ मध्ये हाच बेस्ट अॅप्रोच आहे ह्यावर माझे ठाम एकमत झालेले आहे माझ्याशीच . ;)
बाकी मूर्तींच्या किमतीत मात्र अनाकलनीय वाढ झालेली आहे हे ह्या निमित्ताने नमूद करु इच्छितो. पण ठीक आहे , तेवढे चालायचेच !
28 Aug 2023 - 11:55 am | सौंदाळा
भाववाढ खूपच आहे.
४-५ वर्षांपूरेवी ४००-५०० पर्यंत असणारी मुर्ती आज १२०० च्या पुढे आहे.
बरेच बिगरमराठी लोक स्वतःचे, पोरांचे चोचले पुरवायला गणपती बसवतात.
'हम इसबार गणपती रखनेवाले है, लास्ट ईयर नही हो पाया, लेकीन तीन साल पहले भी रखा था शायद' असे बोलणारे कित्येक महाभाग आहेत. फेसबुक, इन्स्टासाठी हे गणपती बसवणार. सकाळी पूजा 'उरकली' की फोटो, सेल्फी विथ बाप्पा काढून घराला कुलूप लावून सुट्टीचे मस्त बाहेर उंडारायला जाणार.
या लोकांमुळे पण मूर्ती महाग झाल्या असाव्यात.
28 Aug 2023 - 1:10 pm | चित्रगुप्त
धागा आणि प्रतिसाद दोन्ही आवडले. धाग्यावर नजर ठेऊन आहे.
-- कमालीची अद्भुत रचना आहे. थोडेसे अर्थाचे स्पष्टिकरण केल्यास उत्तमच. काही काही शब्दांचे अर्थ समजले नाहीत. हे संपूर्ण काव्य कोणते आहे ?
समयोचित उत्तम धाग्याबद्दल अनेक आभार पंत.