स्मरणरंजन : रेडियो

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in जनातलं, मनातलं
3 Aug 2022 - 11:00 am

ये आकाशवाणी का पंचरंगी कार्यक्रम है, विविधभारती... रात के ग्यारंह बजने को है, पेश है बेला के फूल...

बाबांनी 1981 साली कोल्हापूर वरून रेडियो आणला. तामिळनाडू चा नूरी ब्रँड चा दोन स्पीकर वाला सन्मायका लावलेला लाकडी रेडियो. त्याआधी ग्रामपंचायतीचा volve वाला रेडियो असायचा. रेडियो आला आणि आमची सकाळ दुपार संध्याकाळ रात्र, सगळं काही रेडियोमय होऊन गेलं.

या नवीन रेडियो वर लांब वरची स्टेशन्स सुद्धा चांगली ऐकू यायची. संध्याकाळी धारवाड हुबळी स्टेशन वरची मराठी गाणी, पहाटे मुंबई अ, आणि मग रत्नागिरी वरची भक्तीगीते. रात्री मात्र पर्मनंट विविधभारती...

बाबांना नाट्यसंगीत खूप आवडायचं... त्यांच्यामुळे माझीही सगळी नाट्यगीते तोंडपाठ... रात्रीच्या अंधारात झोपता झोपता बेला के फूल कार्यक्रम लागायचा... त्यातली जुनी हिंदी गाणी एका निराळ्याच विश्वात आमच्या बालमनाला घेऊन जायची...

पुढे कॉलेज ला असताना एफेम रेडियो शी ओळख झाली. रत्नागिरी जवळ एफेम स्टेशन नसलं तरी बऱ्याच वेळा त्यातल्या त्यात उंच जागी मुंबई, पणजी, पुणे चे सिग्नल यायचे. पावसाळ्या अगोदर एप्रिल मे मध्ये तर चक्क पाकिस्तान, अरब कन्ट्री आणि केरळ तामिळनाडू चेही एफेम सिग्नल घरामागच्या डोंगरावर गेलो तर ऐकू यायचे...

रेडियोवर क्रिकेट कॉमेन्ट्री ऐकणे हा तर जिव्हाळ्याचा विषय... 1992, 1996 च्या वर्ल्ड कप च्या वेळी रेडियो कॉलेजसाठी प्रवास करताना सतत उपयोगी पडे...

झूमरी तलय्या या गावाबद्दल एक जबरदस्त अनामिक आकर्षण वजा कुतूहल विविधभारती मुळे त्यावेळी निर्माण झालेले... कारण फर्माईश कार्यक्रमात बरीचशी पत्रे झुमरी तलय्या वरूनच यायची. उर्दू सर्व्हिस वर फर्माईश कार्यक्रमात अनेक पत्रे सीमापार पाकिस्तान आणि अफगाणिस्तान चीं असायची...

1989 साली आकाशवाणी ने विज्ञान प्रसारासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी म्हणून "विज्ञान दृष्टी " नावाची स्पर्धात्मक सीरीज प्रसारित केली. या स्पर्धेत देशातील 150 ब्राईट स्टुडन्ट निवडण्यात आले, त्यात मी एक होतो, हे सांगताना अभिमान वाटतो!

विदेशात असतानाही रात्री आवर्जून विविध भारती नेट वरून ऐकत असायचो... असा हा आमचा रेडियो सोबतचा प्रवास... या आठवणी सदैव सोबत राहतील...!

संगीतप्रकटन

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

3 Aug 2022 - 11:47 am | चौथा कोनाडा

व्वा, सुंदर लेखन.
माझ्या मामाचा व्हॉल्वचा रेडिओ आणि त्याच्याशी केलेल्या खटपटी आठवल्या. नंतर थेट हॉस्टेलला ट्रान्झिस्टर.
त्या दशकातले रेडिओ श्रवण म्हणजे आयुष्यातील मोठाठेवा आहे

सौंदाळा's picture

3 Aug 2022 - 12:07 pm | सौंदाळा

छान स्मरणरंजन.
नातेवाईकांकडे मोठा (वाल्व्ह वाला) रेडिओ होता. अगदी १९९८-९९ पर्यंत पण चालू होता. नंतर संगणक घेतल्यामुळे त्याला जागा करण्यासाठी रेडिओ काढून टाकला.
आता मोठे घर घेतल्यावर त्यांना हळहळ वाटते आहे की तो रेडीओ पाहिजे होता. शोपीस म्हणून तरी पाहिजे होता.

Nitin Palkar's picture

3 Aug 2022 - 1:19 pm | Nitin Palkar

आमच्या घरी १९६९ साली रेडीओ आला. सकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी लागणारे 'वंदे मातरम्', सहाच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि नंतरची 'मंगल प्रभात' यांनीच दिवसाची सुरुवात होत असे.
आकाशवाणी मुंबई 'ब' केंद्रावरच्या बातम्यांसह अनेक कार्यक्रमांच्या आठवणी अद्याप मनात घोळतायत. काही निवडक कार्यक्रमांचा उल्लेख इथे करावासा वाटतो. सकाळी अकरा आणि संध्याकळी साडेसहाची कामगारसभा, दुपारचे वनिता मंडळ (हा आईचा कार्यक्रम), 'बिनाका गीतमाला' हा कार्यक्रम सुरुवातीला रेडीओ सिलोनवरून सादर होत असे,नंतर तो विविध भारतीवरून सादर होऊ लागला. संगीत सरिता, बेला के फुल, जयमाला, अनुरोध गीत, हवामहल हे विविध भारतीचे कार्यक्रम, मुंबई 'अ' वरील 'Sports Round Up' आणि 'Cricket Commentry', रेडीओ सिलोनवरून सादर होणारे सकाळी साडे सातचे 'पुरानी फिल्मोन्का संगीत' आणि पाठोपाठ आठ वाजता 'आप हि के गीत' हे कार्यक्रम म्हणजे शाळा, कार्यालयात जाणाऱ्यालोकांसाठी घड्याळाचे काम करत.
अशाच आठवणीत रमू शकणार्यांसाठी बिनाका गीतमालेचा एक दुवा https://www.youtube.com/watch?v=jHCnQQxfrMU
रेडीओच्या वापरासाठी वार्षिक परवाना शुल्क भरावे लागत असे ही सुद्धा एक आठवण.

दर वर्षी, मी आणि माझा भाऊ, हे काम करत असो ...

रेडियो आणि TV साठी ....

कर्नलतपस्वी's picture

3 Aug 2022 - 1:57 pm | कर्नलतपस्वी

आमच्या घरी १९६६ मधे रेडिओ आला. दोन मोठे बांबू मधे जाळीदार पट्टीची एरीयल,अन्टेना , जड सहा बाय चारची बॅटरी.
एक मोठा कोनाडा ,रेडिओ वर क्रोशीया चे सजावटी कव्हर. दर बुधवार बिनाका गीतमाला ऐकण्यास गल्लीतले लोक जमा व्हायचे. पोस्ट ऑफिस मधे वार्षीक परवाना मीळत आसे.
एक आठवण.

आग्या१९९०'s picture

3 Aug 2022 - 2:12 pm | आग्या१९९०

छान लेखन!
थोड्याच वेळापूर्वी सिनेमा गल्लीवर तुमचा लेख वाचला.
....इस गीतके गीतकार शकील बदायुनी और संगीतकार जयदेव... हे ऐकताना कधीच ह्या कलाकारांचे चेहरे समोर येत नसत. फार ग्लॅमर नव्हतं त्यांना. योगायोगाने आज ह्या दोघांची जयंती आहे,त्यांना विनम्र अभिवादन.

सरिता बांदेकर's picture

3 Aug 2022 - 2:17 pm | सरिता बांदेकर

माझ्या जन्माच्या आधीपासूनच मार्कोनी कंपनीचा रेडिओ घरात होता.खूप वर्ष वापरला. नंतर नंतर त्याला थपडा माराव्या लागत महच तो चालू होई.पण तो कधी विकला काही आठवत नाही.
बिनाका गीतमाला,आपली आवड आणि ते महिलांचा कार्यक्रम अजून आठवतोय.
तुम्ही त्या आठवणी ताज्या केल्या त्याबद्दल तुमचै मनापासून धन्यवाद.
आणि एक आठवण म्हणजे गाणं लागले की त्यातले बोल लिहून घेण्याची धडपड.मला आयतं मिळायचं ते पण ताई लिहून घ्यायची आणि ती आणि तिच्या मैत्रीणींची धडपड असायची सगळे बोल मिळे पर्यंत मग ती एका वहीत सुरेख अक्शरात लिहून ठेवायची. तिला गाण्याची वही असं नांव दिलं होतं. म
माझ्याकडे अजून ती वही आहे.
ती हातात घेतली की तो रेडिओ आठवतो.

सिरुसेरि's picture

3 Aug 2022 - 3:59 pm | सिरुसेरि

रेडीओच्या छान आठवणी . आकाशवाणीवरील आपली आवड , आपकी पसंद , चिंतन , श्रुतीका , मुलाखती हे कार्यक्रम लक्षात आहेत . तसेच "हॅलो तरंग" अशा काहिशा नावाचा कार्यक्रम असे . यामधे श्रोते एका ठराविक नंबरवर फोन करुन आपल्या आवडीच्या गाण्याची फर्माईश करत असत . व ते गाणे आपल्याला का आवडते आहे ते निवेद्काला सांगत असत .

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Aug 2022 - 4:15 pm | राजेंद्र मेहेंदळे

माझी आजी आणि आई दोघींचा ट्रांन्झिस्टर लावुनच दिवस सुरु होत असे. स्वयंपाकघरात घड्याळ नसल्याने रेडिओमुळेच वेळ कळे. " वर सांगितलेले सर्व कार्यक्रम एकेक करुन चालु असत. आणि त्याच्या तालावर रोजची कामेही.

एक गंमत--"आजच्या कार्यक्रमाची रुपरेषा" असा एक प्रकार सकाळी ६.५० ला रेडिओवर सांगत. ती लागली की घरुन निघायचेच नाहितर शाळेत पोचायला उशीर होत असे. कधीकधी रुपरेषा संपली तरी मी घरीच असे. मग मात्र जोरात धूम ठोकायची, नाहीतर शाळेत जन गण मन सुरु आणि उशीर झाल्याबद्दल शिक्षा ठरलेली.

ते एक गीर्वाणवाणीतले गाणे / भजन नेहमी सकाळी लागयचे. आता शब्द आठवत नाहीत. ऑनलाईन कुठे असेल तर कृपया लिंक पाठवा.

मंदार कात्रे's picture

6 Aug 2022 - 1:24 pm | मंदार कात्रे

सर्व प्रतिसाददात्याना धन्यवाद

गामा पैलवान's picture

6 Aug 2022 - 5:45 pm | गामा पैलवान

मंदार कात्रे,

लहानपणी रेडियोने माझा पावलोव्हचा कुत्रा करून टाकला होता. सकाळी ११ वाजता कामगारांच्या कार्यक्रमाचं संगीत सुरू झालं की अस्मादिकांना भूक लागे. तोडम मोठं झाल्यावर हीच भूक 'मंगलप्रभात' च्या वेळेस उफाळून येई. यथावकाश जवानीत प्रवेश केल्यावर अभियांत्रिकी नामे छळछावणीत नियुक्ती झाली. तेव्हा वसतिगृहात रहात असल्याने 'बेलाके फूल' च्या समयी चायनीज भूक लागे.

एकंदरीत रेडियो म्हंटलं की खाद्यजत्रा आठवते. पण एक रत्नं मात्र रेडियोवरंच सापडलं. ते म्हणजे रामदास कामतांनी गायलेलं शिवतांडवस्तोत्र. तूनळीवर इतर प्रकारे गायलेली स्तोत्रं बरीच आहेत. पण रामदास कामत ते रामदास कामतच.

असो. स्मृतिरंजन आवडलं. लिहिते असा.

आ.न.,
-गा.पै.

पर्णिका's picture

10 Aug 2022 - 2:56 am | पर्णिका

'आकाशवाणी पुणे, सुधा नरवणे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत.' या आवाजानेच दिवसाची सुरुवात होत असे, हे आठवले.
छानच झालंय स्मरणरंजन ! बिनाका गीतमाला, विविधभारती असे कार्यक्रम आजही आठवतात.
माझे बाबा अजूनही सकाळच्या बातम्या रेडिओवरच ऐकतात.
या आठवणी सदैव सोबत राहतील...! अगदी सहमत